उंबरठा - (बरीचशी बदलून - संपूर्ण)

Submitted by अज्ञातवासी on 18 May, 2019 - 16:26

टीप - कथा बरीचशी बदलली आहे, ज्यांनी वाचली असेल त्यांनीही पुन्हा वाचून आपला अभिप्राय कळवावा ही विनंती...

सुषमा आज पुन्हा ऍमेझॉन चाळत होती.
'द. भा. कणकवलीकर...समुद्राची गाज... किंमत सोळाशे रुपये...' फक्त एक प्रत उपलब्ध होती.
'ही प्रत गेली, तर पुन्हा हे पुस्तक बघायला मिळणार नाही, पण एवढ्यात आपल्याला एका महिन्याच लाईट बिल भरता येईल,' असा विचार करून सुषमाने मोबाईल बाजूला ठेवला.
सासूबाई तिला नेहमी म्हणायच्या, सुषमा कधीकधी घरच्या जबाबदारीपेक्षा स्वतःचा आनंद शोधावा, पण कळतंय तरी वळत नाही अशी तिची अवस्था होती.
आयुष्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये गेल्याने आधीपासूनच काटकसरीची सवय. कधी स्वतःसाठी जगायला पैसा आणि वेळच मिळाला नाही...
तिचं कणकवलीकरांच एवढं एकच पुस्तक वाचायचं बाकी होतं. तेवढ्यात फोन वाजला.
ताईचा फोन होता, ताई, सुषमाची मोठी बहीण.
"सुषमा, येतेस का?"
"कुठे जायचंय?"
"कोकणात, अलिबागजवळ."
कालच तिच्या नात्यातल्या एका व्यक्तीचे लग्न असल्याने ती प्रचंड दमली होती...
"ताई मी कालच लग्नाहून आलीये, आज लगेच निघायचं?" ती चाचरतच म्हणाली.
"बरं, बरं राहू दे, तुम्ही काय मोठी माणसं. मी रेवा, प्रिया आणि आई आहे. बरोबर मुली असतील. ओन्ली लेडीज! फक्त ड्रायविंगला रोहनला घेतोय. यायचं असेल तर कळव. बाय!"
अचानक फोन कट झाला.
सुषमा ला जी भीती होती तेच घडलं. गाडी पुन्हा तिच्या श्रीमंतीच्या टोमण्यावर येऊन थांबली.
'सख्खी बहीण मी यांची, नीट प्रेमाने आग्रहही करू शकत नाही? फक्त एक औपचारिकता म्हणून कॉल करावा? आणि काय कायम श्रीमंत, श्रीमंत. लग्न झाल्यावर माहेरकडून एका प्रेमाच्या शब्दासाठी आसुसलेली गरीबी आहे माझी...' सुषमा स्वतःशीच म्हणाली.
आणि तीला स्वतःचेच हसू आले. द भा कणकवलीकरांच्या सासरवास मधलं हे वाक्य होतं.
"आई कुठे जायचं होतं?" आद्या मध्ये येत म्हणाली.
आद्य सुषमा ची मुलगी आता चौथीत शिकत होती. शाळेत प्रचंड खोडकर पण तितकीच हुशार म्हणून प्रसिद्ध होती.
"आद्या तू सगळं ऐकतच राहतेस ना? बॅड मॅनर्स!"
"ऐकलं नाही ग कानावर पडलं." आद्या खट्याळपणे म्हणाली.
"जा आता, स्टडी कर." सुषमाने आद्याला पिटाळून लावले.
तेवढ्यात फोन वाजला.
आज काय सारखे फोनच चालू राहणार आहेत का? सुषमाने मनाशीच विचार केला.
"ए मावशी तु येणार नाहीस असं ऐकलं मी!" फोनवर कृती तावातावाने बोलत होती.
कृती, ताईची मोठी मुलगी... ताईला दोन जुळ्या मुली होत्या, कृती आणि अपूर्वा. दोघी आता शाळा संपवून कॉलेजला जायला लागल्या होत्या.
कृती तुला हे कोणी सांगितलं?"
"आईने. थांब मी अपूर्वालाही कॉलवर घेते. तिलाही कळायला हव आपलं काय बोलणं झालं ते"
"मावशी ओल्ड लेडीज मध्ये तू मला एकटं सोडणार आहेस?" अपूर्वाचाही पारा चढलेला होता.
"तुला नाही आपला दोघींना." कृती मध्येच म्हणाली.
"शांत व्हा बायांनो, मी कोणालाही नाही म्हटलेलं नाही!"
"मग मला आईने का सांगितलं की तू येणार नाही असं?"
'मी हो नाही काही म्हटले नव्हते, तरी त्यांनी मनाशी ठरवून टाकलं मी येणार नाहीये. वा,' सुषमा मनाशीच म्हणाली.
"हे बघा, तुम्हाला दोघींना सांगते मी येणार आहे की नाही हे अजून काही ठरलेल नाही. आणि आजच इतक्या लवकर निघायची काय घाई होती? या आधी या प्लॅनविषयी मला काहीही माहिती नव्हती."
"मावशी काहीही बोलू नकोस. आठवडाभरापासून तयारी चालू होती. आणि आईने तुला फोनही केला होता."
'पुढच्या आठवड्यात बहुतेक अलिबागला जाऊ एवढच ताई म्हणाली होती. आठवडाभरापासून तयारी आणि आज मला सांगतात. मी न यावं अशीच त्यांची इच्छा दिसते.' सुषमाचा पारा चढला होता.
"मावशी ते काही असू दे, तु आम्हाला हवी आहेस. बाय" आणि दोघींनी फोन कट केला.
आद्या कोपऱ्यात उभी होती.
"आता तू काय ठरवलं आहेस?" आद्या डोळे मोठे करत म्हणाली.
"आठवड्यापासून ठरवत होते ना सगळे, आता तर मुळीच जायचं नाही!" सुषमाही डोळे मोठे करत म्हणाली.
"बर बाई, जाऊदे. पण आज बटाटेवडे बनवतेस का? कधीपासून सांगतेस तू बनवणार, बनवणार, परंतु अजून काही मुहूर्त लागला नाही. मला सकाळपासून उपाशी ठेवून तुला काय मिळणार आहे?" ती मानभावीपणे म्हणाली.
"चिंबोरे आता फक्त साडेदहा वाजलेत आणि तू सकाळी नाष्टा केला आहेस."
" मग आज बटाटेवडे कॅन्सल?"
"नाही गं...थांब! मी पाव मागवते. बटाटेवडे नको खाऊस नुसते. वडापाव खा!"
"दॅटस माय मॉम!"
सुषमाने बटाटे उकडत टाकले.
तिचं विचारचक्र चालूच होतं.
'ताई, मी आणि प्रिया! आई-बाबांनी किती कष्टात वाढवलं आम्हाला? पण कधीही भेदभाव केला नाही. यांनीही तरी का करावा? कधीकधी असं वाटतं, मी मधली असल्यामुळे कायम मध्यातच दबत राहिले. जीजू बँकेत मॅनेजर आहेत. आता त्यांच्या परिस्थितीपेक्षा माझी परिस्थिती चांगली आहे हा काय माझा दोष?'
पुन्हा फोन वाजला. सुषमाची तंद्री तुटली.
"आई बोल कशी आहेस? तू जाणार आहेस त्यांच्याबरोबर?" सुषमाच्या आईचा फोन होता.
सुषमाची आई आता साठीच्या जवळपास होती...
"सुषमा तू येणार नाहीस असं कळलं! तुझ्याविना मन लागणार नाही ग बाई तिथे!"
"अग तिथे ताई आहे, मुली आहेत, प्रिया आहे."
"कुणीतरी समजदार पाहिजे ग सुषमा. प्रिया पाहिली अशी. ताईला वेळेवर काही सुचत नाही आणि दोघींनाही राग आला तर माझ्या म्हातारीची काही धडगत नसते बाई."
सुषमाने अजूनपर्यंत हा विचारच केला नव्हता.
आईच बरोबर होतं. दोघी वेळ असल्या तर खूप चांगल्या आणि वाईट वेळ असेल तर खूप वाईट अशा प्रकारच्या होत्या.
"सुषमा जमलं तर नक्की ये. कुणीतरी माहितगार तिथे असायला हवं."
सुषमाला आई ची काळजी वाटू लागली होती. या दोघी आईला काही बोलल्या असत्या तर तिची संपूर्ण ट्रीपची खराब झाली असती.
'आता एकच व्यक्ती आपल्याला नीट गाईड करेल,' सुषमाने विचार केला, आणि रेवाला फोन लावला.
रेवा म्हणजे ताईची छोटी नणंद. सुषमापेक्षा चार पाच वर्षानी लहान... सुषमा आणि तिचं छान जमायचं.
"वहिनी येतेस ना, वाट बघतोय तुझी." रेवा म्हणाली.
"रेवा ताईने मला काही सांगितलं नव्हतं ग, आणि आज सकाळी तिचा फोन आलाय. माझी काही तयारी नाही, त्यात कृती, अपूर्वा आणि आई सगळ्या खूप आग्रह करतायेत. काय करावं ते कळत नाही."
"हॅलो, असं कसं करू शकते ती? थांब मी कृतीला बोलायला लावते. ती बरोबर झापेल तिला, आणि तयारी होत असेल तर नक्की ये. आपल्या दोघींची कधीच भेट नाही, निदान या निमित्ताने तरी वेळ घालवायला मिळेल. चल मीही तयारी करते, बोलू नंतर!" आणि रेवाने फोन ठेवला.
'रेवा असेल तर आपण जाऊ शकतो एक वेळ. किमान ती तरी आपल्याला समजून घेईल.' सुषमा स्वतःशीच म्हणाली.
"आद्या अलिबागला जायचं असेल तर लवकर तयारी कर," सुषमा किचनमधूनच ओरडली.
आता सगळ्यात मोठं काम होतं तिचा नवरा प्रथमेशला राजी करणं...
"हॅलो प्रथमेश, ताईने अलिबागला जायचा प्लान बनवलाय. मला खूप आग्रह करताय रे. मला जावं लागेल." सुषमा फोनवर बोलत होती.
"सुषमा के बोलतेय तू? कसं तुम्ही लगेच निघू शकतात? मला कळवलही नाही? तसंही आज ऑफिसला भरपूर काम आहे, आधीच वैताग आलाय!"
"अरे तिने मला आजच सांगितलं. तिचा खूप आग्रह आहे रे." सुषमाला खोटं बोलताना कसनुस वाटलं.
"तरीही माझं रात्रीच जेवणाचं करून जा, आणि कामवाल्या बाईला नीट सूचना देऊन ठेव."
"बरं!"
'एक दिवस हा प्राणी बाहेरून काय मागवू शकत नाही. आधीच मला वेळ नाही, आणि याने आता काम लावलंय...' सुषमाने पुन्हा भाजी करायला घेतली.
एक तासात घरातले सगळे आवरून दोघी मायलेकी रेडी होत्या.
"ताई आम्ही वाट बघतोय तुझी." सुषमाने ताईला फोन लावला.
"आम्ही तुझ्याकडेच निघालोय. अर्धा तास तुझ्याकडे वळसा घालून यावे लागते. तुम्ही मायलेकी आल्या असत्या जवळ तर आपला दीड तास वाचला असता."
रोहनने बंगल्याजवळ येऊन हॉर्न वाजवला. रोहन ताईचा लहान दीर.
सुषमा पटापट बॅगा उचलून निघाली.
निघतानाच तिला उंबरठ्याची ठेच लागली...
"आई ग," सुषमा कळवळली.
अंगठा चांगलाच सुजलेला दिसत होता.
आद्या पटकन घरात जाऊन मलम घेऊन आली.
"खूप लागलंय का मम्मी, लावून देऊ का." तिने उदास चेहरा करून विचारले.
याही परिस्थितीत सुषमाच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं...
"लावते मी. आणि तू इतक्या लवकर मोठी होऊ नकोस..." सुषमा तिचा गालगुच्चा घेत म्हणाली.
...आणि आद्याच्या हाताला धरून सुषमा उंबरठा ओलांडून निघाली..
----------------------------------
सुषमाच्या बंगल्याखाली गाडी थांबली होती. सुषमा हळूहळू जिना उतरून खाली गेली.
"आद्या एंजल," म्हणून कृती आणि अपूर्वा ने तिला जवळ घेतले. गोबऱ्या गालाच्या आद्याचे गाल ओढताना त्यांना मजा वाटत होती.
रोहन गाडीतून उतरला, आणि सुषमाची बॅग मध्ये ठेऊ लागला. तो सुषमाच्या नजरेस नजर मिळवत नव्हता.
मागे एका लग्नात रोहन सुषमाला 'तू मला आवडतेस' म्हणून तिच्या मागेच लागला होता. सुषमाला हे असह्य झालं, आणि तिने ते ताईच्या कानावर घातलं. ताईने रोहनला तिची माफी मागायला लावली, आणि तिनेही त्याला माफ केलं. हळूहळू दोघांमध्ये सगळं नॉर्मल होत होतं...
"हॅलो रोहन, कसा आहेस?" सुषमाने वातावरणातला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
"माय फेअर लेडी, वेलकम!" रेवा गाडीतून उतरत म्हणाली.
"दोघी मैत्रिणी एकत्र आल्या. आम्हाला कोण विचारतंय?" प्रिया गाडीतूनच म्हणाली.
प्रिया... सुषमाची सगळ्यात लहान बहीण... अभ्यासात प्रचंड हुशार, पण लहानपणापासूनच बंडखोर... पूर्णपणे टॉमबॉय... प्रिया कधी कुणाला काय बोलून बसेल, याचा नेम नसे...
सुषमा आणि आद्या गाडीत बसल्या.
'गणपती बाप्पा मोरया!'
आणि प्रवास सुरू झाला, अलिबागच्या दिशेने...
----------
गाडीत सगळ्यात पुढच्या सीटवर रोहन आणि प्रिया बसले होते. मधल्या सीटवर ताई, आद्या आणि दोन्ही मुली बसल्या होत्या तर सुषमा, आई आणि रेवा मागच्या सीटवर होत्या.
"सो रोहन, कसं चाललय तुझं इंजीनियरिंग?" प्रिया रोहनला म्हणाली.
"चांगलं चाललंय, शेवटचं वर्ष..." रोहन गाडी चालवत म्हणाला.
"चांगलय, पण सालं तुम्ही इंजिनिअर चार वर्ष घासून नोकरीला चिटकली की आयुष्यभराची ददात नसते."
रोहनचा चेहरा कसानुसा झाला.
"मग फ्रेंड्स बरोबर बियर, दारू वगैरे मारतोस की नाही?" प्रियाने आणि अनपेक्षित बॉम्ब टाकला.
"प्रिया..." ताईने डोळे वटारले.
"रागावतेस काय, इंजिनियर आहे तो. काय रे रोहन गर्लफ्रेंड विषयी सांगितलं का नाही ताईला?"
रोहनचा चेहरा प्रचंड कसानुसा झाला. कुणालाच काय बोलावं हेच सुचेना...
"सुषमा कसं चाललंय तुझं?" आईने विषय बदलण्यासाठी प्रश्न विचारला.
"ठीक चाललय आई."
"मध्यंतरी बंगल्याचे काही काम काढलं होतं ना?"
"हो, म्हणजे आता पुन्हा बंगल्याविषयी डिस्कशन करायचय."
"म्हणजे ग?"
"आई बंगला खूप जुना झालाय. आवारही खूप मोठा असल्याने प्रथमेश तिथे फ्लॅट सिस्टिम करायचं म्हणतोय."
"पण तुझे दीर तयार आहेत का त्याच्यासाठी?"
"प्रत्येकाच्या वाट्याला तीन तीन कोटी आणि दोन फ्लॅट येणार म्हटल्यावर तयार असतीलच."
"चांगलय,चांगलय. नाहीतर आमच्याकडे आहेच भाड्याचं घर." ताई मधेच म्हणाली...
सुषमाला कसंनुस झालं...
"छ्... लोकांनाही पैशाचा कसला माज असतो, नाही?" प्रिया मध्येच छद्मी हसत म्हणाली.
...आणि सुषमा चिडली.
"प्रिया..." आईने आवाज चढवला.
"जनरल सांगितलं ग." तीच हसणं चालूच होतं...
"मावशी आपण कुठे राहणार आहोत?" आद्या निरागसपणे म्हणाली.
"केलीये बाई सोय, तुमच्यासारखे थोडं राजमहालात राहतो?"
सुषमाचा पारा चढतच होता तरी तिने मोठ्या मुश्किलीने स्वतःवर ताबा ठेवला.
सगळ्या मुली एकमेकांबरोबर खेळत गर्क झालेल्या...सुषमा मोबाईल काढून काहीतरी वाचत होती...
"कणकवलीकर वाचतेय का?" रेवाने डोळे मिचकावून विचारलं...
...आणि सुषमा हसली.
तीन तासानंतर सगळे मुक्कामाच्या गावी पोहोचले.
ताईने बुक केलेलं फार्महाउस काही केल्या सापडत नव्हतं. गावातल्या लोकांना त्याचा पत्ताही माहीत नव्हता.
शेवटी एका म्हातारीने सांगितले...
"साहेब फार दूर आहे, तिकडे खाजणी कडे..."
सगळ्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या.
अवघड वाटेवरून गाडी खाजणीच्या दिशेनं निघाली.
प्रचंड पसरलेली घाण... त्याच्यामध्ये एक जुनाट कळकट बंगला... अशी तिथे अवस्था होती.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नापसंतीची भावना होती.
"आई आपण इथे राहायचं?" कृती चिडून म्हणाली.
"आजची रात्र काढू या, इथेच बुक केलय तर. उद्या काहीतरी बघू." ताई कशीबशी म्हणाली.
"आत्ताच्या आत्ता गाडी घराकडे घे, अशा ठिकाणी राहण्यापेक्षा!" अपूर्वाही आता चिडली होती.
"वहिनी तुला हीच जागा सापडली होती का? सुषमाला विचारून तरी घ्यायचं..." रेवा म्हणाली.
प्रथमेशच्या बऱ्याच साईट चालू असल्याने सुषमाला रेवदंडा, अलिबाग अशा परिसराची खडा न खडा माहिती होती...
"आपल्या बजेटमध्ये बसलं ते घेतलं... आता मला काय माहिती? मी स्वतः कधी बघून गेले होते?" ताई आता जरा चिडली होती.
"तरी अशा ठिकाणी मुलांना ठेवणं बरोबर नाही ताई, मी काहीतरी मार्ग काढते." सुषमा म्हणाली.
सुषमा ने फोनाफोनी केली आणि थोड्याच वेळात तिला एक नंबर मिळाला.
"नमस्कार कुडाळकर का? हो, हो,हो, ठीके, ठीके, पेमेंन्टसाठी नंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला लोकेशन पाठवते. किती अंतरावर असेल घर? ओके पोहोचतो आम्ही." आम्ही सुषमाने फोन ठेवला...
"इथून दहा किलोमीटर अंतरावर एक बंगला आहे. त्यांनी मला फोटो पाठवलेत, जागा सुंदर आहे, आपण तिकडे जाऊ शकू..." सुषमा म्हणाली.
"ठीक आहे रोहन लोकेशन सांग तो बरोबर घेऊन जाईल." ताई म्हणाली
रोहनने लक्ष देण्यास सुरुवात केली.
"डावीकडे वळ, उजवीकडे, डावीकडे, हो आता..." सुषमा दिशा दाखवत होती.
सगळ्या मुली आणि आई सुषमाकडे कौतुकाने बघत होत्या.
कुडाळकरांच्या फार्महाऊसपाशी गाडी थांबली. एक मोठा आलिशान बंगला होता. आजूबाजूला बरीच शेती होती आणि अतिशय प्रसन्न वातावरण होतं...
"इथे आयुष्यभर राहिलो तरी आपल्याला कंटाळा येणार नाही," कृती म्हणाली.
सगळ्यांनी पटापट बॅगा काढल्या. सगळा बंगला आता त्यांच्या ताब्यात होता.
"रेवा, तू आणि मुली सगळे एका रूम मध्ये. मी प्रिया आणि आई एका रूममध्ये. रोहन तुझ्यासाठी ती सगळ्यात शेवटची लहान रुम घे." ताई सूचना देत होती.
सुषमाने निमूटपणे बॅगा खोलीत आणून ठेवल्या. मुलींनी आता येतच बेडवर उडी मारली.
"पाण्याच्या बॉटलची बॅग बाहेरच राहिली." रेवा म्हणाली.
'वेट, मी आणते,' म्हणत सुषमा बाहेर गेली.
बाहेर प्रिया आणि रोहन बोलत होते.
"साला सगळा पैशाचा माज, दुसरं काय? ही बाहेर जाते जॉब करते. पैसा येतो, अशांच्याच असतात बरं ओळखी खूप. नाहीतर आपण कितीही घासा, कुणीही ओळखत नाही." प्रिया डोळा बारीक करत नेहमीसारखी छद्मीपणे हसत म्हणाली.
सुषमाच्या डोक्यात तिडीक गेली.
"प्रिया बस झालं. पैशाचा माज, पैशाचा माज, काय करतेस? हो आहे मला पैशाचा माज, आणि ते माझ्याच बळावर... आज नसते मी तर राहिली असतीस खाजणी जवळ... तसंही आज पर्यंत काय केलस ग तू? मला पैशाचा माज आहे ना, पण स्वतःची जबाबदारी घेतलीस का तिशी उलटली तरी? अजूनही आई बापाच्या जीवावर जगतेस? लग्न कर म्हटलं कुणी तर लग्न करायचं नाही, कायम नाकपुड्या फुगवून हिंडायच. आणि आहेत माझ्या ओळखी, पण तुला वाटतं तसल्या ओळखी नाही. तुला बोलताना तरी थोडी लाज वाटायला हवी होती."
सुषमा तावतावात बोलत होती.
आई कोपऱ्यात बघून हे बघत होती, मात्र आता परिस्थिती बिघडेल हे बघून ती प्रियाजवळ आली.
"सुषमा, अग असं काही म्हटली नसेल ती." आई म्हणाली.
"सोड ग आई, इतकी माजोरडी ही, तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आपण? आणि मी तुला रिक्वायरमेंट सांगितलं ना ताई, मला कसला मुलगा हवा ते? ज्याला आईबाप, भाऊ-बहीण, कुठलीही नाते नसलेला. अनाथ ... त्याला फक्त जगात मी असेल..."
"तू सायको आहेस," सुषमा म्हणाली.
"मावशी तू मध्ये चल," कृती सुषमाला ओढतच रूम मध्ये घेऊन गेली.
प्रियाही खिदळत तिथून निघून गेली. रोहनही आपल्या रूममध्ये गेला.
'तू बरोबर होतीस सुषमा, पण तू समजून घेशील, प्रिया नाही.' आईच्या डोळ्यात पाणी होतं
सुषमा रूममध्ये येऊन ढसाढसा रडू लागली... 'कशाला आले मी यांच्याबरोबर? यांना फक्त गरजेच्या वेळी सुषमा आठवते. आईला यांच्याबरोबर तिला आधार होईल म्हणून सुषमा आठवली. ताईला कृतीच ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हाच सुषमा आठवली. बँकेत जिजूनी काहीतरी घोळ केला तेव्हाच त्यांना सुषमा आठवली. मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का नाही?'
आईची अवस्था बघून आद्या हादरली होती... रेवाने तिला जवळ घेतलं व तिला बाहेर घेऊन गेली.
संध्याकाळी सगळे टेबलावर जेवायला बसले. सुषमाचं कुठेही मन लागत नव्हतं. चार पाच घास खाल्ले आणि समोर प्लेट करून ती शांतपणे बसून राहिली.
जेवण झाल्यावर रेवा सुषमाला म्हणाली.
"सुषमा, झालं ते झालं,पण मुलींना त्यांची सुषमामावशी हवीये. आणि कीही माझ्या मैत्रिणीला मिस करतेय. पटकन रूममध्ये ये, मस्त गप्पा मारू."
सुषमा हसली, आणि मात्र सुषमाची कळी खुलली.
रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या होत्या.
"कृती आता एक दोन वर्ष तुलाही मुलगा बघावा लागेल. तर सांग कसा हवा मुलगा?"
"ये मावशी काहीही बोलू नकोस. मला आयुष्यभर यांची घाणेरडी धुणी नाही धुवायचीत तुमच्यासारखी. लग्नाच्या बेडीत अडकवून आयुष्यभर यांची गुलामी करण्यापेक्षा ना, असं मोकळं राहावं स्वतःसाठी..." कृती चवताळून म्हणाली.
आद्या कावरीबावरी होऊन कृतीकडे बघू लागली...
"देवा! काय करावं तुम्हा मुलींच? लग्नबेडीत असं म्हणताय तुम्ही.अनादी काळापासून चालत आलेली रीत आहे ही!" सुषमा म्हणाली.
"काय रीत? लग्न झालं तर नवरा जिथे जॉब करेल तिथे तुम्हाला जावे लागेल, मग तुमचा जॉब किती का चांगला असेना. नवऱ्याने चित्रपटाचे तिकिट काढून आणले तेच बघायचं, मग बुक माय शो वर तुम्हाला किती का सुंदर
चित्रपट लागलेला दिसेना. दिवसातून चार वेळा सासूबाईंच्या पाया पडायचं, मामंजींना खुश ठेवायचं, आपल्या स्वतःच काय?" अपूर्वानेही कृतीची री ओढली.
"पण हीच नाती आपल्यावर वाईट वेळ आल्यावर सांभाळायला येतात ना?"
"मावशी काळ बदलला आहे. या नात्यांनी आपल्यावर वेळ आल्यावर सर्व सांभाळले नाही तरी चालेल, ठेचकाळत उभं राहू, पण त्यासाठी कायम ही नातीच सांभाळत बसावीत हेच मला पटत नाही...स्त्री अनंत जन्माची भगिनी, अनंत जन्माची माता, अनंत...अनंत जन्माची सून, सासू अनंत जन्माची सहचारिणी,अर्धांगिनी काही... काही... पण मुळात एक स्त्री ही स्वतंत्र स्त्रीच असते हे कधी समजणार लोकांना?" अपूर्वा म्हणाली।
"सुषमा तू नको लक्ष देऊस... मात्र माझं लग्न झाल्यापासून अजून पर्यंत माझ्या नवऱ्याने एकदाही मला त्रास होईल असं काही केलेलं नाहीये." रेवा म्हणाली.
"बघ थोड्या दिवसांनी नखरे दाखवतो का नाही ते..." सुषमा हसत म्हणाली
"हाताखालून काढेल त्याला..." रेवा मोठ्याने म्हणाली.
सगळे जोरात हसू लागले.
-------------------------------
सुषमा मनाशीच विचार करू लागली.
'किती लहान होतो आपण? २२ वय असेल. आपल्याला एमबीए करायचं होतं, मात्र बाबांची पेन्शन घर चालवायची, आणि इतक्या मोठ्या स्थळाला नकार देऊच शकत नव्हतो. बिल्डर आणि त्यात शेंडेफळ, लाडवलेला. त्याला आवडले मी म्हणूनच होकार आला, नाहीतर त्याच्या वडिलांनी नकारच दिला होता. पण लग्नानंतर प्रथमेश किती बदलला? आधी छोट्या छोट्या गोष्टीत माझा विचार करणारा, नंतर थोड्या कारणांवरून मारझोड सुद्धा करायला लागला?'
सुषमा अचानक विचार झटकले आणि ती पुन्हा गप्पांमध्ये सहभागी झाली.
"सुषमा चल माझ्याबरोबर... मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय..." ताई आत येत म्हणाली.
आणि सुषमा ताईच्या मागोमाग निघाली.
"महाभारत!!!!" असा कृतीने सूर लावला, आणि त्यात अपूर्वा आणि आद्यानेही आपला सूर मिसळला.
ताईच्या रूममध्ये आई, रोहन आणि प्रिया आधीच बसलेले होते.
"सुषमा तू प्रियाची आत्ताच्या आत्ता माफी मागितली पाहिजे."
"का?"
"तिला लग्नावरून टोचून बोलण्याची काहीच गरज नव्हती. तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. विनाकारण भांडण उकरून काढलं. सगळ्या ट्रिपचा सत्यानाश केलास!"
"मी भांडण उकरून काढलं? रोहनला विचार कोण आधी कोण बोलत होतं."
"मला काय माहिती," रोहन गांगरून म्हणाला. "आम्ही दोघे बोलत होतो, पण सुषमा आली आणि..."
"ऐकलंस? एक शब्द बोलू नकोस एवढा अहंकार काहीच कामाचा नसतो सुषमा." ताई चिडून म्हणाली.
"तुम्हाला जे हवं ते करा," सुषमा बाहेर निघाली.
ताईही तिच्या मागोमाग बाहेर आली.
"ती सकाळी रोहनच्या शेजारी बसलीस म्हणून तू एवढा राग केलास ना?"
"ताई," सुषमा कडाडली. "रोहन माझ्याशी कसा वागला हे तुला सांगितलं, तर तू आज मलाच कॅरेक्टरलेस ठरवतेय? मी चुकले... मोठ्या विश्वासाने तुला सांगितलं की तुझा दीर चुकतोय, सांभाळ त्याला... तर..." सुषमा आता ढसाढसा रडायलाच लागली होती.
"बरं, जाऊन झोप आता!" ताई कसनुस स्वतःला सावरत म्हणाली.
-------------------------------
सगळ्या मुली खेळून गप्पागोष्टी करून दमल्या आणि निवांत झोपल्या.
आता फक्त समुद्राची गाज ऐकू येत होती.
सुषमाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सकाळी दुखावलेल्या अंगठ्याच दुखणं आता जास्तच जाणवत होतं. रडून डोळे कोरडे पडले होते.
सुषमा हळूच रूमच्या बाहेर आली आणि टेरेसवर जाऊन बसली...
समुद्र फार सुंदर होता, काळाशार आणि वरून चंद्र त्याच्यावरच चांदीची बरसात करत होता... सुषमा उभी राहिली आणि तिने दोन्ही बाहू पसरले...
समुद्रावरुन येणारा वारा तिच्या अंगावर खेळू लागला...
द. भा. कणकवलीकरांच लेखन असंच असायचं... समुद्राच्या जवळ... कोकणाचं अक्षरशः जिवंत वर्णन करायचे. कोकणाच्या भूतापासून तर कोकणच्या खोतापर्यंत सगळ्यांची भेट त्यांनी घडवून आणली होती.
त्यांच्या कथा संपूर्ण कॉलेजमध्ये फेमस होत्या. सुषमाला तिचा परीकथेतल्या राजकुमार त्यांच्या कथांत दिसायचा. त्याकाळी मोठ्या मुश्किलीने तिने त्यांची सगळी पुस्तके वाचली होती... फक्त आता 'समुद्राची गाज' बाकी होतं...
'एवढी किंमत कशी ठेवू शकतात? बरोबर कणकवलीकरांचं पुस्तक म्हणून काहीही किंमत ठेवू शकतात... त्यांची फॅन वाचणारच...' सुषमाने मनाशीच विचार केला.
तिने मोबाईल उघडला... त्यांच्या लेखनाचे पेज उघडलं आणि अधाशीसारखी वाचू लागली.
पहाट झाली तरी तिला कळलं नाही.
वारा आता सुषमाच्या अंगाखांद्यावर मनसोक्त खेळत होता. चंद्र आता पूर्ण बहरात आला होता...
...आणि त्यातच तिला ते स्वर ऐकू आले, आणि सुषमाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
'रेशमाच्या रेघांनी...'
कितीतरी वर्षांनी तिला हे गाणं ऐकू येत होतं.
या गाण्यावर ती बेभान होऊन नाचली होती. टाळ्या आणि शिट्यानी संपूर्ण कॉलेज दणाणलं होतं. तिसऱ्या वन्स मोरला तर अक्षरश: ताई तिला स्टेजवरून ओढून मध्ये घेऊन गेली होती.
'सुशे, आज इतकी सुंदर दिसतेय ना, कुणी ब्रम्हर्षीसुद्धा उचलून घेऊन जाईल, चल लवकर घरी,' असं म्हणत ताई तिला घरी घेऊन आली होती, आणि आईने चार चारदा तिची मीठ-मोहरीनी दृष्ट काढली...
गाण्याचा आवाज मोठा होत होता...
...आणि सुषमाने पहिली गिरकी घेतली...
कितीतरी वेळ बेभान होऊन ती नाचत होती.
-----------------------------------------------------
सकाळी सुषमाला जाग आली. ती बाहेरच्या खुर्चीवरच झोपली होती. तिच्या अंगावर एक ब्लॅंकेट पांघरलेलं होतं...
तेवढ्यात मुली डोळे चोळत टेरेसवर आल्या... "मावशी झोपलीस का नाही रात्रभर?" कृतीने विचारलं.
"हो झोपले होते, आत्ताच एवढ्यात जाग आली." सुषमा स्वतःशीच हसत म्हणाली.
"चल आम्ही आवरतोय, आद्या तूही आवर," असं म्हणत ती मध्ये गेली.
सगळे आपापल्या तयारीला लागले.
तेवढ्यात रेवा बाहेर आली.
तिच्या हातात कॉफीचा कप देत म्हणाली.
"तुला कॉफी करून देते...पुढच्या वेळेस माझ्याकडे ये आणि तीन कप बनव माझ्यासाठी, व्याज म्हणून." ती हसत म्हणाली.
"आणि इतकंही सुंदर नाचू नये माणसानं, की कुणाच भान हरपून तो तुझ्याकडेच बघत बसेल..."
"रेवा?" सुषमा चकित होऊन म्हणाली.
"रात्री कितीतरी वेळ बघत होते मी... आणि तू वेडी नाचून दमल्यावर तिथेच खुर्चीवर झोपून पडलीस... शेवटी मला तुझं ब्लँकेट तुझ्या अंगावर आणून टाकावं लागलं..."
"रेवा किती करतेस गं माझ्यासाठी," सुषमा तिच्याकडे बघत म्हणाली.
काल नाचताना किती सुंदर दिसत होतीस माहितीये का तुला? अप्सराच जणू! रेवा म्हणाली.
सुषमा थोडीशी लाजली.
"सुषमा हे बघ मला माहितीये, इथे तुला कोणी तुला आनंद वाटावा म्हणून घेऊन आलं नाही. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ होता किंवा एका औपचारिकता म्हणून तुला विचारलं होतं याची मला जाणीव आहे... पण आयुष्यात खूप दिवसानंतर तुला हा एकांत मिळाला आहे... आणि काल तुला थोडासा मोकळा वेळ मिळाला तर इतकी सुंदर नाचलीस... आज तुझ्याकडे पूर्ण दिवस आहे... तुला जे हवं ते कर...कुणाची फिकीर करू नकोस कारण आयुष्यात असे दैवी क्षण पुन्हा पुन्हा नाही येत." रेवा पुढे म्हणाली.
'थँक्स रेवा, माझ्याबरोबर असल्याबद्दल,' एवढंच ती म्हणू शकली.
आणि सुषमाचा फोन वाजला.
सासूबाईंचा फोन होता.
'अरे सासूबाईंना कळवायच आपल्या लक्षात कसं राहीलं नाही,' सुषमाला स्वतःचाच राग आला.
"केव्हा गेलीस मला कळलं सुद्धा नाही, आणि बरं झाले कळवल नाहीस... मी थांबवलं असतं तुला...आज आमच्या क्लबात योगा मास्टर येणार होते...एन्जॉय कर, मी नंतर आहेच तुला त्रास द्यायला, आणि फोन नको करुस, मी बिजी असेन आज योगा सेशनमध्ये."
त्यांनी फोन ठेवला.
'प्रथमेशलाही फोन लावायला हवा.' असा विचार करून तिने प्रथमेशला फोन लावला.
"आता आठवण झाली नवऱ्याची, पण जाऊदे. इकडे सगळं मस्त आहे आज मी सगळ्या कामातून सुट्टी घेतलिये. आज मी मस्त बाहेर जाऊन मिसळ चापणार आहे. तू असलीस तर मला बाहेरचं खाऊ देत नाहीस. तुलाही एकच दिवस मिळालाय स्वतःसाठी. मस्त मजा कर."
'प्रथमेश असं बोलू शकतो,' सुषमाचा विश्वास बसत नव्हता.
"बघितलंस सुषमा, आजचा दिवस कसा सुंदर आहे आणि तुला त्याला अजून सुंदर बनवायचय, काय?" रेवा म्हणाली.
सुषमाच्या डोक्यात मात्र निराळाच विचार चालू झाला होता.
"रेवा मला पळायचय कुठेतरी. कायमचं पळून जाईन असा विचार करू नकोस. संध्याकाळपर्यंत परत येईन. मला जायचय तिथे आणि आज जाण्याचा योग आला नाही तर पुन्हा कधीच येणार नाही. कारण तेव्हा मी पुन्हा जुन्या कोशात गुरफटून गेलेली असेल."
"मग आत्ताच्या आत्ता जा, कारण माझ्या मैत्रिणीचा प्रवास अधुरा राहिलेला मला आवडणार नाही" रेवा ठामपणे म्हणाली.
"आद्या कडे लक्ष ठेवशील ना."
"तिच्या सुरक्षिततेचा बाबतीतच. बाकी मी मुक्त बागडू देणार आहे तिला. आणि तुसुद्धा तेच कर. बाकी सगळ्यांना काय सांगायचं ते मी ठरवेन. पण तू जा आता."
"थँक्स रेवा, आज खूप उधारी करून ठेवलीस माझ्यावर. कशी फेडेन कळत नाही... बाय."
सुषमा अंघोळीला पळाली आणि तिने पटकन अंघोळ उरकली.
...आणि ती टॅक्सी स्टँडकडे पळाली...
---------------------------------------------
"दापूरवाडी, दापूरवाडी," टॅक्सीवाला मोठमोठ्याने ओरडत होता.
सुषमा त्याच्याजवळ गेली.
"दहा रुपये शीट. बसा..अजून सहा शीट भरायची आहेत."
"मी साठ रुपये देते, चला लवकर."
तो तिच्याकडे पाहतच राहिला. आयुष्यात त्याने असं शीट बघितलं नव्हतं...
सुषमा मधल्या सीटवर बसली.
दापूरवाडी, मस्त ऐसपैस पसरलेलं गाव...
"कणकवलीकर कुठे राहतात?" सुषमा ने टॅक्सीवाल्याला विचारले.
"कोण दत्तोबा?" टॅक्सीवाल्याने उलट विचारले
"नाही द. भा. कणकवलीकर."
"अहो तेच आमचे दत्तोबा..."चला सोडतो...
टॅक्सीवाल्याने तिला सरळ कणकवलीकर यांच्या बंगल्यासमोर आणून सोडले.
"रामभाऊ मॅडम आल्यात, दत्तोबाना भेटायला," त्याने राखणदाराला आवाज दिला आणि तो दिसेनासा झाला.
सुषमा आणि त्याचा संवाद सुरू झाला.
"बाई,परमिशन काढली का साहेबांची."
"मला फक्त पाच मिनिट त्यांना भेटायचय, प्लीज जाऊ द्या."
"असं कुणालाही साहेब भेटत नाही, जा परमिशन काढून आणा."
"हे बघा मी खूप लांबून आलेय आणि आज तरी मला त्यांना भेटल्याशिवाय जाता येणार नाही. आयुष्यात मी पुन्हा इकडे येईल का नाही तेही मला माहिती नाही."
"असं असेल तर मी तुम्हाला भेटायलाच हवं,"
... हातात झाडे कापायची कात्री घेतलेले एक गृहस्थ हसत गेटजवळ आले...
सुषमाच्या समोर साक्षात कणकवलीकर उभे होते.
सुषमा कणकवलीकरांच्या दिवाणखान्यात बसली होती.
"सौभाग्यवती चहा आणा," कणकवलीकरांनी मध्ये आवाज दिला.
"माफ करा मी तुमचा वेळ घेतला," सुषमा म्हणाली.
"अजून तास दोन तास वेळ घेतलात तरच तुम्हाला इथे बसायची परवानगी देईन," कणकवलीकर हसत म्हणाले.
...आणि कितीतरी वेळ सुषमा आणि कणकवलीकर बोलत होते.. तिच्या कॉलेजच्या दिवसाविषयी, त्यांच्याच कादंबऱ्याविषयी...
कणकवलीकर फक्त ऐकत होते, मध्ये मध्ये हसत होते...
मध्येच तिने कणकवलीकरांना विचारलं, "मी तुमचा खरंच खूप जास्त वेळ घेत नाहीये ना?"
"आम्ही लेखक माणसं सुषमा, आम्हाला दररोज चाहते भेटत नाहीत, आणि कॉलेजच्या जीवनापासून माझ्या लेखनावर निस्सीम प्रेम करणारे आणि आज इतक्या वर्षानंतर मला भेटायला येणारे तर नक्कीच नाहीत..."
सुषमा प्रसन्नपणे हसली...
कितीतरी वेळा त्यांच्या गप्पा चालू होत्या...
"माझ्या स्वप्नातला राजकुमार तुमच्या पुस्तकातलाच असायचा." सुषमा म्हणाली...
"बहुतेक वेळा मी माझं स्वतःचं चित्रण करायचो," आणि ते मिश्कीलपणे हसायला लागले.
"समुद्राच्या गाजविषयी तू काही बोलत नाही सुषमा?"
"नाही हो, अजून वाचलंच नाही. नुसतं सोळाशे रुपये किंमत!!! एवढी कधी पुस्तकाची किंमत असते?" आणि पुढच्याच क्षणी सुषमाने जीभ चावली.
कणकवलीकरांना हसू आवरत नव्हतं...
दुपारी कणकवलीकरांनी सुषमाला आग्रहाने जेवायला बसवलं.
कणकवलीकरांच्या पत्नी सुद्धा सुषमाकडे मोठ्या कौतुकाने बघत होत्या.
जेवण झाल्यावर सुषमा निघू लागली.
"अग एक मिनिटं थांब," म्हणत त्यांनी एक कपाट उघडलं, आणि त्यातून एक जाड हस्तलिखित काढून सुषमाच्या हातात सोपवलं...
"मला टाईप करता येत नाही, मी लिहितो आणि मग प्रकाशकाचा माणूस ते टाईप करतो...समुद्राची गाजच्या दहा-बारा प्रती माझ्याकडे सुद्धा आहेत, मात्र शिंच्या प्रकाशकाने त्याच्यात अनेक बदल केलेत. हे त्याचं मूळ हस्तलिखित..."
सुषमा अक्षरशः भारावून गेली...
"आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट... माझं सिक्रेट...मी परिकथेतील राजकुमारा बरोबर मी त्याची परिकथेतील राजकुमारी सुद्धा चित्रित करायचो... मला तेव्हा ती राजकुमारी गवसली नव्हती, पण आज सांगतो ती राजकुमारी तु होतीस असं वाटतंय... इन शॉर्ट तू खूप सुंदर आहेस..."
सुषमा ला बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते.
"नेहमीच आपल्याला राजकुमार मिळेन असं नाही, पण आपणच आपलं राजकुमारीपण जपायचं काय?"
सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं.
'बाबा आपल्याला कायम राजकुमार म्हणायचे,' तिला अचानक बाबांची आठवण आली
"जा बेटा, सुखी रहा."
ते तिला गेटपर्यंत सोडायला आले, आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. त्यांच्या पत्नीही सोबत होत्या.
"आपलीच पोर माहेरी येऊन गेल्यासारखं वाटतंय हो," त्या म्हणाल्या.
कणकवलीकरांच्याही डोळ्यात नकळत पाणी जमा झालं होतं.
-------------------
बाहेर आल्यावर सुषमाने बाबांना फोन लावला.
कितीतरी वेळ ती त्यांच्याशी बोलत होती...
तेव्हाचाच टॅक्सीवाला तिथून जात होता.
"दादा, अजून किती शीट बाकी आहेत," तिने हसत विचारले.
"एकच हाये, या," तोही हसत म्हणाला.
त्याने तिला सरळ फार्महाऊसवर आणून सोडले.
ती दिसल्याबरोबर आद्या तिला बिलगली.
"आई तू कुठे गेली होतीस? आम्ही आज किती एन्जॉय केला म्हणून सांगू..."
"अग मी ना कामासाठी बाहेर गेले होते." ती रेवाकडे बघत म्हणाली.
"बरं झालं, नाही तर तू बोर केलं असतं." प्रिया म्हणाली.
म्हणजेच रेवाने तिचं काम चोख बजावलं होतं.
सुषमाने प्रियाकडे लक्ष दिले नाही. आज ती वेगळ्याच विश्वात रममाण होती.
"मग सुषमा कसा झाला प्रवास," रेवाने विचारले.
"खूप सुंदर."
"खूप सुंदर काय? काय केलंस ते तर सांग." रेवाने विचारलं
"सिक्रेट आहे माझं, पण तू यांना काय सांगितलंस, एकानेही शब्दाने विचारलं नाही कुठे गेली होतीस म्हणून?
"ते मग माझं सिक्रेट आहे." रेवा मिश्कीलपणे म्हणाली.
रात्रीचा चंद्र वर आला होता, आणि आज सुषमा ला समुद्राची गाज स्पष्टपणे ऐकू येत होती...
-------------------------------------------------
दुसर्‍या दिवशी सगळे लवकर निघाले.
रोहनला रस्ता सापडत नव्हतं
सुषमा एक शब्द बोलत नव्हती. सगळ्या गोष्टींकडे फक्त मूक प्रेक्षक म्हणून बघत होती.
प्रिया इकडून घे, तिकडून घे म्हणून त्याला भंडावून सोडत होती.
शेवटी न राहून आई बोलली. "सुषमा तुला माहितीये ना रस्ता? मग मदत कर ना त्याला."
"इथून सरळ उजवीकडे घे, तिथून डावीकडे घे, सरळ जा आणि डावीकडे." सुषमाने एवढं सांगून कृतीला डोळा मारला, आणि पुन्हा डोळे मिटून घेतले.
सगळे तिच्याकडे अचंबित होऊन बघत होते...
------------------------------------------------------
सुषमा घरी आली आणि तिने कुलूप उघडले. उंबरठा बघताच तिला तिच्या दुखण्याची आठवण झाली.
'काहीही म्हणा, शेवटी हा उंबरठा ओलांडणं आणि लक्ष्मण रेषा ओलांडणं सारखंच,' सुषमा स्वतःशीच म्हणाली.
पण आता तिला ठेच लागणार नव्हती!
-------------------------------------------
"आद्या, तुला बटाटेवडे खायचे आहेत ना? आज करुयात."
आद्याने टीव्ही लावला, आणि चॅनेल बदलता बदलता गाणं वाजलं.
'रेशमाच्या रेघांनी...'
आद्या ते बघतच बसली.
"बघतेस काय नुसती, नाच." सुषमाच्या शब्दांनी ती भानावर आली...
आणि आद्या मनसोक्त नाचू लागली.
सुषमा डोळेभरून तिच्याकडे बघत होती...
'आज मीठ मोहरीने दृष्ट काढावी लागेल, माझीच नजर लागेल पोरीला,' असं म्हणत तिने डोळ्याच्या कडा पुसल्या...
आद्याचा गालगुच्चा घेऊन सुषमा पुन्हा कामात गुंतली.
आज तिला पटकन आवरायचं होतं.
समुद्राची गाज तिला खुणावत होती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीच आपल्याला राजकुमार मिळेन असं नाही, पण आपलं राजकुमारीपण जपायचं काय?">> मस्तच..
खूप सुंदर कथा आहे...
खूप आवडली..

सुरेख लिहिलय! हे संवाद नेहमीच आजुबाजूला ऐकायला येतात. छान निरिक्षण.
पण मला एखाद्या कथेत इतकी पात्रे झेपत नाहीत. डोक्यात पार गोंधळ झाला. अर्थात हा माझा दोष आहे.

कथा चांगली आहे.इतकी पात्रं वाचून पहिले डोक्यात 'गाडी इनोव्हा केली का टेम्पो ट्रॅव्हलर' हा पहिला टेक्निकल प्रश्न डोक्यात आला.

अज्ञा,तु आजवर इथे लिहिलेल्या कथांपेक्षा खुप वेगळी आणि सुंदर कथा आहे. Happy
तुझी हि पहिलीच कथा मला एकाच वाचनात कळाली. Wink

छान लिहिलंय.. थोड्या शुद्ध लेखनाच्या चुका टाळल्या तर न अडखळता वाचायला अजून छान वाटेल..
इतकी पात्रं वाचून पहिले डोक्यात 'गाडी इनोव्हा केली का टेम्पो ट्रॅव्हलर' हा पहिला टेक्निकल प्रश्न डोक्यात आला. >>+१ मला पण !

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. मुळात हे असलं काही लिहिणं माझा प्रांत नाही. हे कथानक बोरिंग आणि विस्कळितही वाटू शकेल, पण कधीकधी काही खऱ्याखुऱ्या छोट्याशा गोष्टी मोठं कथानक बनवून जातात. Wink
मोबाईलवर टाईप करत असल्याने शुद्धलेखनाच्या चूक राहून जातात, माफी असावी.
@srd - थँक्स. उंबरठा माझा आवडता चित्रपट, त्यावरून सुचलं.
@ शालिदा धन्यवाद - नाती अशी आहेत.
आई.
आईच्या तीन मुली, ताई, प्रिया आणि सुषमा.
ताईला दोन मुली, अपूर्वा आणि कृती.
सुषमाची मुलगी, आद्या.
रेवा, ताईची नणंद.
रोहन, ताईचा दीर.
प्रथमेश, सुषमाचा नवरा.
कुडाळकर, बंगल्याचे मालक
कणकवलीकर, लेखक

@ mi_anu आणि मित - माझ्या नजरेसमोर ही गाडी होती. थोडीशी ऍडजस्टमेंट केली असावी सगळ्यांनी Wink
प्रतिसादासाठी धन्यवाद!

chevrolet-enjoy-p.jpg

भावंडातही टोकाची असूया असू शकते ( यथार्थ ) . तरी म्हणायचं Blood is thicker than water. अन् शेवटी ते पाणीच ( समुद्राची गाज ) श्रांत मन शांत करतं.

@ दत्तात्रेय साळुंके : प्रत्येक शब्दाशी सहमत...
तस कधी कोकणात जायचा आणि राहायचा योग्य आला नाही. कालपरवाच मुहूर्त लागत होता, पण गावी काम निघालं. Sad
बघूयात जमतंय का...

कालपरवाच मुहूर्त लागत होता, पण गावी काम निघालं. Sad
बघूयात जमतंय का...

कोकण मला पावसाळ्यात विशेषतः गणपतीत अधिकच मंत्रमुग्ध करतो. मी गणपतीत केळशीला गेलो होतो. मित्राची समुद्र किनारी नारळ पोफळीची वाडी, गोड्यापाण्याची विहीर, गणपतीतलं भक्तीरसात न्हालेलं वातावरण . रात्रीची भजनं, आरत्या, मोदक, सकाळी यथेच्छ समुद्र स्नान, शिंपले गोळा करायचे, घरच्या विहीरीवर गोड्या पाण्याची आंघोळ, सायंकाळी पुन्हा बीचवर मजा , कुठलीही वर्दळ नाही, रात्रंदिवस घरापर्यंत ऐकू येणारी मंतरलेली समुद्राची गाज, हिरवीगार भातशेती, सगळचं मंत्रमुग्ध करतं.

नंतर सुटीचे दिवस सोडून अलीबागला गेलो , गुहागरला गेलो कुटुंबियांसह सकाळी किनारी भटकंती , रात्री चांदण्यात धिरगंभीर गाज ऐकत गप्पा चालू होत्या, थंड वारा पीत बराच वेळ घालवला .
पण गणपतीतली अनुभूती काही औरच.

कथा गंडलेली आहे असे वाटले. कोणतेच कॅरेक्टर नीट उभे राहत नाही आणि त्यांच्या वागण्याचे लॉजिक कळत नाही.

@ दत्तात्रेय - असं कुणी लिहिलं ना, कोकणची ओढ प्रकर्षाने जाणवते.
@ maitreyee - हम्मम. पुन्हा वाचल्यावर मलाही जाणवलं, खूप कॅरेक्टर असल्याने नीट कॅरेक्टर डेव्हलपमेंट करता आली नाही बहुतेक. नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेन. Happy
प्रतिसादासाठी धन्यवाद!

कथा खूप विस्कळीत आणि पात्र जरा गोंधळलेली वाटताहेत. तुमचं लिखाण एरवी खूप छान असतं, मी आवर्जून वाचते,म्हणून या कथेबद्दल प्रतिसाद देते आहे. कथेचा विषय छान आहे, फक्त मांडणी गडबड वाटते

सुषमा जर श्रीमंत आहे, तर पुस्तक घेताना तेवढी रक्कम इलेक्ट्रिसिटी बिल भागवेल म्हणून आवडत्या लेखकाचं पुस्तक विकत घेणार नाही असं का करेल? विशेषतः तो लेखक एवढा आवडता आहे की स्वतःच वय स्टेटस विसरून ती अपॉईंटमेंट न घेता, घरात कोणाला विश्वासात न घेता सरळ त्याच्या घरी थडकते. असे क्रेझी फॅन्स किंमत वगैरे पहाणार नाहीत आणि सुषमा तर श्रीमंत सुद्धा आहे.

"प्रत्येकाच्या वाट्याला तीन तीन कोटी आणि दोन फ्लॅट येणार म्हटल्यावर तयार असतीलच." >> आपल्या बहीणी पैशांचा विषय काढल्यावर टोमणे मारतात हे माहीत असताना त्यांच्यासमोर असं का बोलावं.

@मीरा- धन्यवाद! तुम्ही माझ्या कथा वाचता आहात हे ऐकूनच छान वाटलं.
कॅरेक्टर डेव्हलपमेंट अजून करायला हवी होती, किंबहुना सुस्पष्टता आणायला हवी होती हे आता प्रकर्षाने जाणवतंय...

सुषमा जर श्रीमंत आहे, तर पुस्तक घेताना तेवढी रक्कम इलेक्ट्रिसिटी बिल भागवेल म्हणून आवडत्या लेखकाचं पुस्तक विकत घेणार नाही असं का करेल? विशेषतः तो लेखक एवढा आवडता आहे की स्वतःच वय स्टेटस विसरून ती अपॉईंटमेंट न घेता, घरात कोणाला विश्वासात न घेता सरळ त्याच्या घरी थडकते. असे क्रेझी फॅन्स किंमत वगैरे पहाणार नाहीत आणि सुषमा तर श्रीमंत सुद्धा आहे.>>>>>>
हे लिहिताना माझ्या डोळ्यासमोर बरीच उदाहरणे होती. बऱ्याच स्त्रिया बघितल्यात अशा, की ज्या श्रीमंत असूनही फक्त संसाराचा विचार करत मन मारतात. काही उदाहरणे तर घरातलीच म्हणावीत अशी आहेत Happy
पण म्हणतात ना, माणसाचा एक ट्रिगर पॉईंट असतो, आणि तो एकदा शूट झाला, की माणूस बेभान होतो. सुषमाच्या मनात बरीच विचारजंत्री चालू होती भांडणामुळे, आणि सकाळी रेवाच्या बोलण्यात तो पॉईंट शूट झाला. स्वतःच्या आनंदासाठी आज काहीतरी करायचंय, काहीतरी मिस झालंय, ते आज मिळवायचंय, अशी सुषमाच्या मनात भावना निर्माण झाली. आणि निघाली ती आनंदाच्या शोधात... Happy

@प्रतिज्ञा - सर्वप्रथम अभिप्रायासाठी धन्यवाद!

आई भेटली की मनात काही न राहता भडाभडा बोलून जातो माणूस. शेवटी आईजवळ नाही तर कुणाजवळ मन मोकळं करणार? मग कशाचं भान राहतं नाही...
Happy

रोहन तुझ्यासाठी ती सगळ्यात शेवटची लहान रम घे."
:- समुद्रकिनारा म्हणजे रम हवीच.

छान लिहिली आहे कथा,मनाला भिडली।

पात्र खूप आहेत. सगळ्या लहान मुलींना कटाप करून फक्त आई, तिच्या तीन मुली आणि त्यांच्यातले हेवेदावे दाखवले असते तर चाललं असतं.

छान आहे.. सगळे पात्रे मस्त रंगवली आहेत. असतात अशा बहिणी अन असे नातेसंबंध काही प्रमाणात. आईसुध्दा दुर्बळ, गरीब मुलांना साथ देते असेच पाहिलेय.. असो..

छान आहे कथा , पात्रे बरीच आहेत. पण ट्रीप मध्ये ती आवश्यक असतात. दोन सख्या बहिणीमध्ये बऱ्याच वेळा एकमेकी बद्दल असूया पहावयास मिळते.

छान आहे.. सगळे पात्रे मस्त रंगवली आहेत. असतात अशा बहिणी अन असे नातेसंबंध काही प्रमाणात. आईसुध्दा दुर्बळ, गरीब मुलांना साथ देते असेच पाहिलेय.. असो.. >>>> +१११११११११

Pages