मधमाशाचे पोळे झाले आहे?

Submitted by सुनिधी on 16 May, 2019 - 19:55

आजच व्हाट्सपवर एक संदेश आला की मधमाशांचे पोळे झाले असेल तर त्यांना न मारता कसे हलवावे?
तो अत्यंत उपयुक्त वाटला व मायबोलीवर असा काही धागा असल्याचे दिसले नाही म्हणुन जसाच्यातसा इथे देत आहे.

ही सिद्धी जाधव यांची पोस्ट आहे. ( धन्यवाद हर्पेन).
https://www.facebook.com/siddhi.jadhav.75/posts/2521131027898405

व्हाटसपवर संबंधीतांचा फोन नंबरपण आहे त्यामुळे इथेही तो आला तर हरकत नसावी. तरीही हरकत असल्यास काढता येईल.

>>>>

आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळ बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात हि केलेली.. सुरुवातीला २०-२५ माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत पाहून आम्ही थोडासा धूर केला आणि त्यांना हाकलवून लावलं. दोन दिवसांनी अचानक पुन्हा त्यांचा वावर सुरु झाला. आम्ही दोघेही पुन्हा बेचेन झालो. या वेळेस मात्र त्या हॉलच्या खिडकीतून स्टुडिओच्या दिशेनं जात होत्या आम्हाला काही कळेना.. विक्रांत ने पुन्हा धुर केला आणि त्यांच्या मागे लागला. आम्हाला थोडी गडबड वाटली म्हणून तो स्टुडिओ च्या दिशेनं गेला आणि त्याची जोरात हाक आली.. सिद्धी लवकर ये! हे बघ काय. पाहतोय तर मधमाश्यांची लाख दीडलाखांची फौज २ फुटांचा पोळ बांधण्याचं काम शांतपणे करत होत्या. आम्ही दोंघेही उडालो. धस्स झालं आत्ता काय? घाबरून/ वैतागून आत्ता ह्यांची विल्हेवाट लावायची या हेतूने पेस्ट कंट्रोल वाल्याना फोने केला. त्यांनी २००० रुपये सांगितले आम्ही तयार झालो आणि दुसऱ्यादिवशी सकाळी येतो असे सांगून फोने ठेवून दिला.
हे सगळं करत असताना विक्रांत पटकन म्हणाला त्यांना आपण कसे वाचवू शकतो म्हणजे कोणी संवर्धन करणार असेल का? माझा माश्यांवर रिसर्च चालूच होता त्यात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या होत्या. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम ४ वर्षेच जगू शकेल असे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. हे सगळं वाचून आम्ही खाडकन जागे झालो आणि चार दिवसापूर्वी आमच्यासोबत झालेला पुण्यातील किस्सा आठवला. आम्ही आमचा मित्र अभिनव काफरे कडे गेलो असता त्यांच्या सोसायटी मध्ये असच कोणीतरी पेस्ट कंट्रोल करून लाख एक माश्या मारून टाकल्या होत्या. इथे भरदिवसा माणसं मारली जातायत माशांचं काय. लाखो जीव तडफडत मारत होते. आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यामुळे लाखो मेलेल्या माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले, बहुतेक तो प्रसंग आठवून विक्रांतला त्यांना संवर्धन करण्याचं डोक्यात आलं असणार. माझा रिसर्च सुरु असताना मला एका बी किपर अमित गोडसे, आयटी क्षेत्रातील (कॅपजेमिनी) नोकरी सोडून पूर्णवेळ या कामासाठी वाहून घेणारा.. मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला हा तरुण समोर आला. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शास्वत पद्धती असू शकते अशी त्याची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्याने पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.
त्याला फोने केला अतिशय नम्र आणि शांतपणे त्याने आवश्यक माहिती जाणून घेतली. यावर त्याने ४०००/- रुपये घेईन असे सांगितले. जीव वाचवण्याचे ४०००/- आणि जीव घेण्याचे २०००/- आताच्या जगात जीव वाचवण्यापेक्षा जीव घेणं किती स्वस्त झालाय. तसं काम सुद्धा जोखमीचं होत त्यात तो पुण्याहून मुंबईला येणार होता. शेवटी त्यानेच पैसे कमी केले ३०००/- मध्ये उद्या १२ वाजेपर्यंत येतो म्हणाला. त्याला पैशांपेक्षा माशांचा जीव महत्वाचा वाटला असणार, नक्कीच!
आम्ही कलाकार हळव्या मनाचे, पैसे गेलेतरी चालतील पण आपण त्यांना वाचवायचं असा आम्हीही निर्णय घेतलेला आणि लगोलग अमितला येण्यास सांगितले. आज तो बरोबर सांगितल्या प्रमाणे १२ वाजता स्टुडिओवर आला. आल्याबरोबर आमची थोडी चर्चा झाली काही मिनिटातच आम्ही चांगले मित्र बनलो. शेवटी एक विचारी माणसं काही ना काही कारणाने आपल्याला भेटतातच. त्याच्या विलक्षण कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही दोघेही उत्सुक होतो.
अंगावर कोणत्याही प्रकारचं आवरण न घालता फक्त चेहऱ्यावर मास्क टोपी घालून तो बाल्कनीत उतरला. पहिल्यांदा त्याने केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करून हलक्याहाताने माशांना गोंजारत तो थेट पोळ्यापर्यंत पोहचला. नुकताच बनत असलेला पोळ त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर त्याने जेल लावून ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. आत्ता तिथे पुन्हा माश्या येणार नाहीत आणि १० किलोमीटर बाहेर त्या आपली नवीन जागा शोधतील आणि तिथें पोळ बांधायला सुरुवात करतील. हे सगळं तो एवढ्या सध्या सोप्या पद्धतीने हाताळत होता आम्ही दोघे सुद्धा त्याच्याबरोबर तिथेच होतो एकही माशी आम्हाला चावली नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का बसला नाही आणि लाख दीडलाख माश्यांचे जीव वाचले. मधमाशांबद्दलची एवढी भीती आपल्या मनात लहान पानापासून बिंबवलेली असते कि त्यांना पाहूनच त्यांना मारण्याचा विचार पाहिला आपल्या डोक्यात येतो. एवढा सगळं शांतपणे होत असलेला पाहून मी त्याला विचारलं.. त्यांनी आपल्यावर हल्ला का नाही केला? कारण बहुतांश वेळा आपण त्यांच्या कामात अडथळा आणला तर ते आपल्यावर हल्ला करतात हे पाहून आणि वाचून माहित होत. तो म्हणाला... आपण त्यांना त्रास द्याच्या उद्देशाने काही करत नव्हतो आणि हे त्यांना कळत. दुसरं म्हणजे आपण त्यांना अलगत /शास्त्रोक्त पद्धतीने हाताळलं हेच जर आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा वर केला असता तर त्यांनी आपल्याला फोडून काढलं असता एवढं नक्की! हे सार इतकं विलक्षण होत कि आम्ही दोघेही भारावून गेलेलो. जीव घेणं जरी स्वस्त असलं तरी जीवनदान देण्याचा सुखद अनुभव त्या पैशांपेक्षा मोलाचा वाटला. आपल्याबरोबर निसर्ग वेगवेगळे प्रसंग घडवून आणतो त्यावेळेस आपण त्यावर कसे प्रतिसाद देतो कि प्रतिकार करतो हे माणूस म्हणून आपल्या हातात असत.
पोस्ट लिहिण्याचा उद्देश एवढाच कि या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्या संवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचा संवर्धन/ प्राण वाचावे व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत. अमित गोडसे त्याचे कार्य आणि वेबसाईट लिंक खालील प्रमाणे. जास्तीत जास्त शेअर करा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा.

अमित गोडसे, पुणे.
+91 83083 00008

https://www.beebasket.in/online-media/

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख मुळ कोणी व कोठे सर्वात पहिल्यांदा लिहीला हे माहिती नाही. माहिती असल्यास सांगावे म्हणजे नमुद करता येईल. फक्त याचे फार महत्व वाटल्याने व मायबोलीद्वारे हे खुप लोकांपर्यंत पोचवता येईल म्हणुन लिहीला. (आता आमच्या गावात पण असे कोणी आहे का ते शोधणे आले).

Next time त्या भिंतीला लावलेल्या रिपेलन्ट जेल बद्दलही विस्ताराने लिहा म्हणजे अनेक रेसिडेंशियल सोसायटीमध्ये तत्सम प्रकार उद्भवता खबरदारी म्हणून उपयोगात येईल.

वीक्ष्य, मला बाकी खरंच काही माहिती नाही. २-३ वर्षापुर्वी मैत्रिणीकडे असंख्य मधमाशाचे पोळे झाले व त्यांना पोळी काढणार्‍यांना मारुनच टाकावे लागले होते. ते कुठेतरी खोलवर मनात राहिले होते त्यामुळे आज मधमाशांना न मारता पोळे हलवु शकतो हे कळताच इथे लिहीले.

धन्यवाद सुनिधी
माहितीसाठी लेखातील नंबरला संपर्क करतो

उपयुक्त माहिती.
मागे एका कंपनीत उंचावर अशीच पोळी दिसली होती. १०० वर्ष जुनी कंपनी आणि जवळजवळ ६० फूट उंचावर असल्याने नेमकी उपाययोजना करता येत नव्हती. असं कुणी इंडस्ट्री साठी करत असेल तर खूप मोठा बिजनेस होईल....

उपयुक्त माहिती आहे !!! धन्यवाद सुनिधी .आमच्या सोसायटीमधील झाडांवर दरवर्षी मधमाशा पोळे बांधतात आणि सोसायटी ते दरवषी पेस्ट कंट्रोल वाल्यांकडून पाडून घेतात. हजारो मधमाशा अशाच मारून पडलेल्या असतात. पोळे सुद्धा मधासकट असेच पडलेले असते Sad त्यांना आता अमित गोडसे यांचा नंबर देतो. लक्षात राहण्यासाठी निवडक दहात नोंदवतोय.

खालसा कॉलेजात दर्शनी भागात तिसऱ्या मजल्यावर होते पोळे, त्यातला मध पहिल्या मजल्यावर कठड्यावर टपकत असे. हातावर झेलछन खाल्लाही आहे. कधीच त्रास दिला नाही माशांनी. माटुंगा ,ते परळ भागात झाडे भरपूर त्यामुळे मध असायचाच. गोरेगावलाही गांधी उद्यान जवळच.

धन्यवाद. तुम्ही कोणी हा प्रयोग केलात तर नक्की इथे लिहा म्हणजे इतरांना कळत राहील व सर्वजण तेच करतील. आमच्या गावात मिळाले ( ‘बीहाईव्ह रिलोकेट‘ ) शोधल्यावर असे करणारे. अर्थात अशी वेळ येऊ नये हीच इच्छा आहे.

हर्पेन , धन्यवाद. म्हणजे सिद्धी जाधव यांनीच हा अनुभव लिहिला आहे. बर झालं कळलं.

नुकताच बनत असलेला पोळ त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर त्याने जेल लावून ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. >> कापल्यावर पोळं आणि माशा कुठे आणि कशा नेल्या ते कळालं नाही.
बी-फार्म वाले सुद्धा बहुअधा प्रोटेक्टिव गीअर वापरूनच हाताळतात. 'त्यांना कळते' ह्या भरवश्यावर सिविलिअन एरियात अशी रिस्क अनवॉलंटरी वाटली.

Whatsapp वर 10 वेळा तरी हा लेख वाचलाय.

आधी खरेच बरे वाटले, जीव वाचला माशांचा.

आता जसजसा लेख कळू लागतोय तसतसे लक्षात येतेय की माश्याना तिथून हाकलून त्यांचा जीव वाचला म्हणून मी खुश झाले तरी माश्या बेघर झाल्या याचे काय?

तिथून 10 किमी परिसरात त्या येणार नाहीत, पण त्या 10 किमी परिघाबाहेर त्यांना जागा सापडेल याची काय खात्री? मुंबईत 10 किमीच्या बाहेर जंगल नाहीये जिथे माश्या सुखाने राहतील. यत्रतत्रसर्वत्र फक्त काँक्रेटचे जंगल आहे. माश्याना तिथूनही हाकलणारच आहेत. मग त्यांनी जायचे कुठे?

माणसाने इतर सजीवांची जागा हिसकावून घेतलीय. पण माणसाचे दुर्दैव हे की त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या निसर्गात त्याचा सहभाग शून्य आहे. तो नसला तरी निसर्ग राहील पण तो ज्यांना तडीपार करतोय ते संपले तर निसर्ग व पर्यायाने मानव संपेल.

अशा वेळी गरज आहे तडीपारांना स्वतः सोबत जागा देणे.

आज चिमण्या संपल्यावर लोक चिमण्यांसाठी घरे बाल्कनीत लटकवायला लागले.

उद्या मधमाशा संपल्यावर खोटी पोळी बाल्कनीत लटकवण्याऐवजी खरी पोळी जिथे आहेत तिथे त्यांचे संरक्षण करायला हवे.

यासाठी लोक प्रबोधन करायला हवे. ज्या सोसायटी पेस्ट कंट्रोल करून मारतात त्यांना थांबवायला हवे. यासाठी लोकांच्या मनातील माश्याबद्दलची भीती काढायला हवी. या बारीक माश्या अजिबात त्रास देत नाहीत. आग्यामोहोळ वाल्या माश्या धोकादायक असतात पण त्या सहसा लोकांच्या इतक्या जवळ येत नाहीत.