अंधार असा ओघळतो

Submitted by माउ on 11 May, 2019 - 13:45

अंधार असा ओघळतो
रात्रीची ढळते काया
चंद्राला घालुन फुंकर
अवतरते पहाटछाया

छायेची चाहुल ओली
भिजलेला श्वास नभाचा
अत्रुप्त तनावर येतो
उरलेला भास सुखाचा

सुख चाखुन घेता होते
ही पहाट रात्र धुक्याची
इच्छांना मिळते चादर
काजळल्या कुंद मनाची

मन रुजून होते अंकुर
या ओल्या प्रहराखाली
स्वप्नांची हिरवी पाने
निजल्या श्वासांना आली

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

Sundar

ग्रेसांची 'पाऊस कधीचा पडतो' ही कविता आठवली.>> अगदी मी हेच लिहायला आलेले
भिजलेला श्वास नभाचा
आणि
मन रुजून होते अंकुर
या ओल्या प्रहराखाली
स्वप्नांची हिरवी पाने
निजल्या श्वासांना आली>> हे खूपच आवडलं !!
सुंदर कविता !!