आंबा, आमरस, नाॅस्टॅल्जिया वगैरे...

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 8 May, 2019 - 05:06

उन्हाळा सुरु होतो. शाळेच्या सुट्ट्यांचे वेध लागतात.
परीक्षा संपल्या कि एकच हुर्यो होतो आणि मे येतो.
सोबत येतो तो.
आंबा.
फळांचा राजा.
आंब्याच्या आठवणी सांगणं कठीण आहे कारण प्रत्येक चांगल्या आठवणीत आंबा आहेच. लहान होतो तेंव्हापासून सगळ्या उन्हाळ्याच्या आठवणी गावाशी जोडलेल्या. माझं गाव छोटंसं खेडंच खरंतर. डोंगरांच्या मधोमध वसलेलं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे गावी चांगले दीड महिनाभर सुट्टीला जायचो. वीस बावीस जणांचं कुटुंब. सगळे काका काकू, चुलतभावंडं, आतेभावंडं जमायचो. फुल्ल दंगा चालायचा.

रानातलं घर. सकाळी उठायचो, ठरलेला नाश्ता म्हणजे चहा चपाती. जे हादडायचो! आमच्या माऊल्यांची कमाल वाटते अजूनही. सकाळी उठून मोठी माणसे रानात जाणार असायची त्यामुळे ती चपातीचा नाश्ता करूनच निघायची कारण दुपारच्या यायला काही वेळ ठरलेली नसायची. मग आम्ही पोरंही त्यांच्याबरोबरच खाऊन घ्यायचो. खाऊन झालं कि हुंदडायला मोकळे. वडील आणि काकांबरोबर रानात जायचो. उन्हाळा असल्यामुळे मस्त बोरी करवंदी पिकलेल्या असायच्या. तो रानमेवा तेंव्हा जसा लागला तसा परत कधीच नाही मिळाला. आताही करवंद वाली कोणी म्हातारी उन्हाळ्यात दाराशी येते, तेंव्हा विकत घेतलेल्या त्या मूठभर करवंदात, त्या फ्रॉकच्या ओटीत भरून घेऊन खातानाच्या
करवंदांची चव शोधात राहते मी. इकडे परदेशातल्या ब्लॅकबेरीजना त्या करवंदाची सर येत नाही. कारण हि माती माझी नाही, मग फळांना तरी तो स्वाद कसा असणार? 

आमची पेरूची बाग होती, पपईचीही, पेरूच्या झाडावर बसून पेरू खायचे. तहान लागली कि चेम्बरमधलं पाणी प्यायचं. चेम्बरमधलं पाणी पिताना त्यावर येणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यावर तोंड टेकलं कि गारगार वाटायचं. मग दुपार होत आली कि घरी पुन्हा पळायचं. किती पळायचो आणि किती चालायचो याची तर गिणतीच नाही. तेंव्हा पेडोमीटर्स असते तर किमान वीस हजार पावलं तरी रोज झाली असती. घरी येऊन आयांनी केलेलं जेवण घेऊन पुन्हा शेतात जायचं. मग तिथे पप्पा काका आणि आम्ही सगळी पोरं अंगतपंगत मांडून जेवायचो. पोटभर जेवून, पाटाचं खळाळतं पाणी पिऊन मोठी माणसे पुन्हा कामाला लागायची. आम्ही इकडे तिकडे फिरायचो.

एका रानाच्या विहिरीजवळ एक नागचाफ्याचं झाड होतं. त्याची बक्कळ फुलं खाली पडायची. ती वेचून आम्ही पोरी त्याच्या अंगठ्या करायचो. केसात खोचायचो. मग सगळे मिळून ती फुलं घेऊन जोतिबाच्या मंदिरात जायचो. शेताच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर बरंच जुनं. काळ्याकभिन्न फत्तरात रेखलेली जोतिबाची मूर्ती. तिला वर्षाकाठी पप्पांबरोबर माजणं करायचं. माजणं म्हणजे सुपाऱ्या
भाजायच्या, त्या कुटायच्या आणि तेलात त्या कुटलेल्या सुपाऱ्या मिसळून मग ते मिश्रण जोतिबाला उटणं लावल्यासारखं लावायचं. मग त्यानंतर छान स्वच्छ पाण्यानं त्याला अंघोळ घालायची. माजण्यामुळे मूर्तीला एक छान काळीशार तकाकी यायची. या मंदिरात बसून माझ्या वडिलांनी त्यांचा अभ्यास केला होता, त्यांच्या पहिल्या नोकरीचं पत्र यायची वाट बघितली होती, त्या जुन्या आठवणी ऐकल्या आहेत मी. ते मंदिर आजही मला श्रद्धास्थान म्हटलं कि डोळ्यासमोर उभं ठाकतं.
कधीही देवाला हात जोडले, तो आहे , तो सगळं बघून घेईल म्हटलं कि त्या माजणं केलेल्या जोतिबाच्या पायावर वाहिलेल्या नागचाफ्याचा सुगंध मनात रुंजी घालतो. मन पाखरू होऊन त्या देवळाच्या झेंड्याला गिरक्या घालून येतं. 

सुट्टीला येऊन एकदोन दिवस झाले कि ती चर्चा सुरु व्हायची. पाडाची. कुठल्या आंब्याला पाड लागलाय. आंब्यांच्या झाडांची नाव पण मस्त होती. ज्या शेताच्या कडेला आंबा आहे त्यावरून पडलेली नावं. शेरीतला आंबा, मळवीतला आंबा, खडकीतला आंबा, लोणच्याचा आंबा. यातला शेरीतला आंबा पक्का देशी. अप्रतिम चव होती याची. हापूसला फिक्की पडेल अशी. मग मळवीतला आंबा, याची गर्द डेरेदार सावली आजही आठवते. किती सुखाच्या गप्पा केल्यात त्या सावलीत बसून. पुढे तो आंबा गेला. आजही त्या शेतात गेलं कि त्याची रिकामी जागा नजरेला टोचते. खडकीतला आंबा म्हणजे लहानसं झाड होतं, त्याला छोटे छोटे गोल आंबे यायचे. २-३ घासत संपावा एव्हढा आंबा. पण मस्त गोड असायचा. कुठला आंबा कधी उतरवायचा याची ठरवाठरवी व्हायची. 

आंबे उतरवायचा एक सोहळाच असायचा. आदल्या दिवशी रात्री झेलण्या नीट आहेत का नाही, कुठे काही दुरुस्ती हवी आहे का हे बघून ठेवलं जायचं. मग सकाळी सगळे जण लवकर आवरून जो आंबा उतरवायचा आहे त्या शेतात जायचे. पप्पा आणि काका झाडावर चढायचे. झेलणीने आंबे काढायचे. मोठ्या मुलांचं काम त्या झेलण्या रिकाम्या करून परत त्यांच्याकडे देण्याचं. आणि लहान पोरं लिम्बूटिंबू, त्यांनी चुकून एक दोन खाली पडलेले आंबे गोळा करायचे. दुपारपर्यंत कार्यक्रम चालायचा. मग सगळे आंबे गोळा करून घरी आणायचे. घरी आणल्यावर त्यांची वर्गवारी व्हायची. कच्चे, पाड लागेलेले आणि मार लागलेले. मग छानपैकी भात्याणावर आंबे पसरायचे. तो राजा आहे तर त्याला मानही तसाच हवा ना? त्यावर पुन्हा भात्याण टाकून आंबे पिकत ठेवायचे. तिथून पुढे सुरु व्हायची खरी मज्जा. पाच सहा दिवस कसाबसा कड काढायचा. आणि मग सुरु व्हायचा शोध! पिकलेल्या आंब्यांचा. रोज दुपारी एका मोठ्या घमेल्यात आया पाणी द्यायच्या. पिकलेले आंबे काढून आणून त्या पाण्यात धुवून घ्यायचे. आणि गोल करून बसून आम्ही पोर ते आंबे चापलायचो.

आंबा फोडी करून खाणं म्हणजे तेंव्हा वेडेपणा वाटायचा. आंबा खावा कसा? वरचा देठाकडचा टिकलीसारखा भाग काढून टाकायचा. त्याखाली थोडा चीक असतो म्हणून हाताने की हलकेच दाबून तो दोनतीन थेंब रस टाकून द्यायचा. मग दोन्ही हातात धरून छान चोखत आंबा खायचा. हातात धरून कोय खाणे हि गोष्ट आजकालच्या पोरांना यक्क वाटते! वेडे! हातावरून रस न ओघळू देता कोयीचा गाभा जो खाऊ शकतो तो खरा पट्टीचा आंबा खाणारा. यात तोंड, हात, दात सगळं आंब्याच्या रसाने माखतं, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे असायचा. चांगले चारपाच आंबे प्रत्येकी खाल्ल्यावर मग आता अजून किती खाल्यावर बास म्हणावं लागेल याचा विचार व्हायचा, तीन आंब्यांच्या खाली आंबे खाणाऱ्याला काय लेका तू? अशाने मोठा कसा होणार? असा घराचा आहेर असायचा. आंबे खाऊन मस्त झोप काढाव्यात कि नाही आम्ही? पण नाही. वर्षातून एकदाच मे ची सुट्टी येते ना? मग घराच्या मागे एक ओढा वाहायचा, बारकासाच होता तो. त्याच्या कडेला गोठा होता. बैल शेतात गेलेले असले कि तो रिकामा असायचा. तिथे जाऊन मस्त गप्पा ठोकत बसायचो आम्ही. वर्षभरात शाळेत झालेल्या मज्जा सांगत बसायचो एकमेकांना.

संध्याकाळचे चार वाजले कि आई, काकवा रात्रीच्या स्वयंपाकाची सुरुवात करायच्या. त्यात सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे आमरस. मग त्यांच्यातली एक हे काम हातात घेणार. चांगले पिकलेले आंबे घ्यायचे, मग ते स्वच्छ धुवून त्यांच्या एका मोठ्या पातेल्यात रस काढायचा. आंबा गोड असल्यामुळे वरून जास्त साखर टाकायची गरज पडायची नाही. अामरसात दूध, वेलदोडा, तूप, सुंठ असले फुटकळ पदार्थ कधीच आमच्या घरी टाकले गेले नाहीत. त्याने आंबा आणि त्याच्या अंगभूत स्वादाचा अपमान होतो. सगळे रात्री सातलाच जेवायला बसायचो. रसाच्या वाट्याच्या वाट्या गट्टम व्हायच्या. ते भलं थोरलं पातेलं रिकामं व्हायचं. मग छान अंगणात ताडपत्री पसरून त्यावर वाकळा नुसत्याच पायाशी ठेऊन गप्पा मारत मारत झोपून जायचं. आमरसाने आपलं काम केलेलं असायचं, जी काही गुंगी यायची कि बासच. मस्त गुडूप झोपायचो. आंब्याने आमचं बालपण आनंदी केलं. उन्हाळी सुट्टीच्या आणि आंब्याच्या त्या आठवणी खरंच सुरेख आहेत, अगदी जगण्याला पुरून उरतील इतक्या. 

काल बाल्कनीतल्या शेतात उगवलेल्या मेथीच्या पुऱ्या करणार होते. मग सोबत काय असं ठरवताना, देशातून आणलेल्या मॅंगो पल्पची आठवण झाली. आमरसाचा बेत ठरला. लेकाला(वय वर्षे ३) जेवायला देताना म्हटलं अरे काय चमच्याने खायची गोष्ट नाहीये हि. लाव वाटी तोंडाला! पठ्ठ्याने निराश केलं नाही. दोन वाट्या आमरस पिला आणि म्हणाला, “ममा, मस्तय हा मँगो ज्यूस!” डोळ्यात पाणी आलं. म्हटलं चला. मातीतून आलेलं सगळंच नाही देता आलं तरी हा गुण घेतला बेट्याने! त्याचं आंब्यावरचं प्रेम असंच टिकून राहू दे आणि या फळांच्या राजाची त्याच्यावर नेहमीच कृपा राहू दे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हजारो ख्वाईशे ऐसी तुम्हाला एक बीग ह्ग .. अगदी घट्ट मिठी !! माझं हि बालपण अगदी सेम टू सेम अस्संच गेलं , फक्त काकाच्या जागी मामा आणि गाव अर्थात वेगळं !! प्रत्येक शब्द न शब्द तंतोतंत जुळणारा !! छान लिहिलंय !!
आंबे उतरवण्याचा सोहळा, मग आढी घालायची , आमरस , आंब्याचं साट वाळवायची , ती आंब्याच्या झाडांची नावं, फणसाचे गरे ,केळफुलाची भाजी , काजूबिया भाजण्याचा आणि मग सोलण्याचा सोहळा .. अगदी सग्गळं जसच्या तसं डोळ्यासमोर आहे ... मस्त मज्जा !!
धन्यवाद या लेखाबद्दल आणि नॉस्टॅल्जिक केल्याबद्दल

काय भारी लिहिलय! अगदी मस्त. आमचेही दिवस यापेक्षा काही वेगळे नव्हते. बहुतेकांचे असेच असावेत.

आज्जी आमरसात एक कोय तशीच ठेवायची. ती ज्याच्या वाटीत येईल तो भाग्यवान. रस वाढायला आज्जीच असे. वाढताना आम्ही खुप आरडा ओरडा करायचो “आज्जी, अजुन हलव” मग आज्जी पुन्हा रस हलवायची वाढायची. पोट भरले तरी भाग्यवान व्हायच्या नादात आम्ही अजुन आमरस खायचो. आम्हाला आश्चर्य वाटायचे की आमरस संपत आल्यावरच कोय का मिळते? आणि प्रत्येकाला बरोबर ‘पाळी’ असल्यासारखी आलटुनपालटून कशी येते? आम्ही मोठे झालो आणि हिच ट्रिक वापरुन आता आई आमच्या बच्चे कंपनीला फसवून आमरस खाऊ घालते. Happy
काय सुरेख आठवणी जागवल्यात तुम्ही! वाह!

या एका लेखासाठी मी तुमचा चाहता झालोय.
अंजली आमच्याकडेही आंब्याला नावे असायची. गम्मत म्हणजे आमचाही एक ‘शेरीतला आंबा’ होता. लोणच्याचा आंबा होता त्याला बरण्यांबा म्हणायचे. हापुस आम्हाला ऐकुनही माहीत नव्हता तेंव्हा.

बहुतेकांचे असेच असावेत>> हो नक्कीच !! आमरस असला कि बाकी कश्या कश्याची गरज नसायची .. अश्या कैक वाट्या आमरस आणि अगणित पोळ्या रिचवल्या त्याला तोड नाही ! धन्य त्या आई/आज्जी/मामी आणि काकवा ज्यांना आपापल्या मुलं/नातवंड /भाचरं / पुतण्यांसाठी कितीतरी पोळ्या लाटल्या आणि पातेलं भर आमरस काढला ..

छान लिहिलंय.
आंबा अतिप्रिय. आमरस इतका नाही आवडत.

काय सुंदर लिहिलंय, अख्खं बालपण आठवलं.

ते हापुस खाऊन रंगलेले कपडे, हाताचा येणारा वास... आहा !हापुस ची बाग असुनही दुसऱ्याचे आंबे चोरुन खाण्याचा मोह सार सारंच miss करते आता.

झेलण्याना ईकडे झेल्ंं म्हणायचे, त्याने अलगद आणि न पाडता आंबे काढायचे ही एक कलाच! आंबे काढताना केव्हा केव्हा ते झेल्ंं तुटुन जायचं, केवढ वाईट वाटायचं तेव्हा.
आणि परत ते बनवण्यासाठी किती खटपट करावी लागायची कारण तेव्हा ते बाजारात वैगरे विकत मिळायच नाही, आजोबा घरीच बनवायचे.

खूप छान वर्णन .. त्या काळाचे !

आमच्या बालपणाच्या सुट्ट्या पुण्यातल्याच आजी-आजोबांच्या वाड्यात जायच्या. पण आंबे , फणस , कलिंगडे , खरबूज , जांभळे , करवंदे आणि जाम व ताडगोळे या सार्यांच्या लयलूटीमधे उन्हाळा सुसह्य व्हायचा. दुपारी घरातले खेळ जसे कि कॅरम , पत्ते ( लॅडीज , बदाम सात , झब्बू आणि बरेच) वाड्यातली सगळी टाळकी कोणातरी एकाच्या घरात जमून खेळायचे. यात वय वर्षे तीन पासून सतरा-आठरा पर्यंत मुलं-मुली असा असा मोठा गोतावळा असायचा. संघ्याकाळी उन्हे उतरली की अंगणातले खेळ चालायचे .. भस्मासूर (अम्रुत पाणी) , डबा ऐसपैस , क्रिकेट वगैरे.
पुढे मोठेपणी कोकणात मित्राकडे एकदा जाऊन आल्यावर कोकणाची गंमत समजली. आता एक तरी सहल होतेच. ती घरे - गोठे - शेते - आमराया सगळे अनुभवणे हे विलक्षण सुखदायी आहे. आणि सकाळ - संध्याकाळ समुद्रावरची रपेट ! स्वर्ग तो आणखीन वेगळा काय असणार आहे !

मस्तच लेख.. बालपण आठवल..
मन एका क्षणात गावाला घेऊन गेले. आताच्या पिढीला नाही कळणार ते आपले बालपण.
आम्हाला बालपणी कोण तरी सवंगडी खबर द्यायचा की
राजाच्या बागेतील आंब्याला पाड लागला आहे
मग काय आमची बच्चे कंपनी ८ ते १० जणांची टोळी बागेतील आंबा दगडाने पाडायला जात असत.
खुप मजा यायची ती मजा विकतच्या आंब्याला नाही आता.

आपल्या लेखात ग्रामीण बोली भाषेमधील शब्द आले आहेत जसे त्या तसे.
(झेलण्या, भात्याण, वाकळा तर आताच्या पिढीला नाही कळणार)
नक्की गाव तुमचे घाटावरचे (पश्चिम महाराष्ट्र) असणार आहे.

मस्त मस्त लेख!!!
आंबा आमचा पण ऑल टाईम फेव्हरिट...
आंबा पोळी असली की जेवायला दुसरं काही नसलं तरी चालतं...
हा उन्हाळा सहन व्हायचं एकच कारण... आंबा आंबा आणि आंबा!!!

खूप धन्यवाद मंडळी Happy
शाली, आज्जीची कोयीची आयडीया किती भारी आहे Happy