झोप येत नाही.

Submitted by मुग्धमानसी on 4 May, 2019 - 09:07

बडी धीरे जली रैना.... धुआं धुआं नैना....

अशी एक संपूर्ण अखंड साक्षात रात्र पसरलेली असते समोर! गात्र अधू अन् मेंदू निस्तेज. डोळे तरिही टक्क जागे! चामड्याच्या पांघरूणाखाली चुळबुळत. वळवळत. काहीतरी शोधत, विव्हळत.
समोरून अथकपणे सरकत राहणार्‍या ओळखी-अनोळखी, चित्र विचित्र रंग आकार रूप चेहरा आकार निराकार वस्तू स्मृती गती व्यक्ती.... कशा कशाचा अर्थ लागत नाही! डोळे नुस्तेच चुरचुरत राहतात. डोळ्यांच्या भोवतालच्या खोलगट डोहात रात्र थेंब थेंब साचत जाते. तो अंधार मग चेहर्‍यावर शापासारखा चिकटून राहतो. अशी एखादी रात्र अंगावर धावून येते. मग रात्रीमागून रात्रींचा थवा बेजार करू लागतो. काळ्याशार चोचींनी घायाळ अंतरात रात्र अत्यंत सावकाश कण कण जळत राहते. तिथलं सारं ओलं-सुकं एकसाथ जळत राहतं. पडू न शकलेल्या स्वप्नांच्या धुरानं डोळ्यांची आग आग होत राहते. झोप हवी. झोप नाही. झोप काही केल्या येत नाही! झोप येत नाही!

एक छोटासा लमहा है... जो खत्म नही होता...
मै लाख जलाता हूं.... वो भस्म नहीं होता!

एकच तर क्षण असतो रात्रीचा! गाढ शांत झोप लागावी अन् डोळे उघडताच सकाळ दिसावी. रात्र मुळी कधी नजरेलाच पडू नये. एका क्षणात तिला असं झोपेची बगल देऊन पुढे निघून जाता यावं. कारण रात्र जरा नजरेला भिडली की विलक्षण भूल घालते. मतीला चकवा लावते. फ़िरून फ़िरून सारे जे टाळलेले असते, गाळलेले असते, विसरलेले असते, घसरलेले असते... तिथवरच नेम धरून अल्गद नेऊन सोडते. निस्तेज शरिराला झगडता येत नाही. गोंधळल्या थकल्या मेंदूला विश्रांती मिळत नाही. रात्र तिच्या सार्‍या अंधार्‍या हातांनी रात्रभर गदागदा हलवत राहते. याच हातांनी कधी अलगद कुशीत घेऊन शांत निजवलेले खोल कुठेतरी आठवत राहते. त्या अथांग शांत झोपेची स्वप्न जागत्या रात्री विलक्षण अस्वस्थ करतात. रात्रीचा एकच क्षण असतो.... आत्ता जळून जाईल... आत्ता सारं ठीक होईल... वाटत राहतं. स्वत:ची समजूत घालत घालत जळत्या रात्रीचा धूर मी श्वास श्वास छातीत भरत राहते.... पण रात्र जळून जात नाही. धग धग भग भग नुस्ती सुस्त जळत राहते.

झोप येत नाही!

रात्रीशी मैत्रीच करावी कधी तर तेही नकोच! कारण मग रात्र रंगात येऊन बर्‍याच रंगेल गप्पा मारते. स्वत:चं काही सांगत नाही... मला बोलतं करते. हसायला लावते, रडायला लावते.... वेड लावते पार! कधी दोघी मिळून आम्ही खेळ खेळतो. चांदण्यांची लगोरी.... ढगांची भातुकली... अंधाराच्या एकसंध रंगात बुडून गायब झालेल्या सगळ्याच रंगांची लपाछपी.
डोंगरांतून गुरगुरणारा वारा अंगभर ओढून घेऊन रात्र कधी भिववणारी हडळ होते. दूरवर रोरावणारा समुद्र असेल तर रात्र एकदम तत्त्ववेत्त्यासारखी धीरगंभीर होऊन जाते. घरातला एखादा ठिबकणारा नळ... टकटकणारे घड्याळ... फडफडणारे कॅलेंडर... भिरभिरणारा पंखा.... दूरवर एखादा जळणारा दिवा.... सार्‍या सार्‍यातून भिंतीतून ओल झरावी तशी रात्र सावकाश झरत मुरत जाते. काय काय बंद करावे? मिटून टाकावे, मोडून-फाडून टाकावे, झाकावे, विझवावे? आणि त्यात पुन्हा काळोखलेल्या घराबाहेर धबाधबा कोसळणारा पाऊस असेल तर???? कसे कसे नी कुठून कुठून साक्षात पावसाला पुसून टाकावे? वाहते डोळे जिथे पुसायला हात उचलत नाहीत....

नींद से आँख वो मिल कर जागे..
कितने सोए हुए मंज़र जागे!

झोपेला पारखा सगळा जीव आतून पोकळ पोकळ होत जातो. झोप येत नाही!
पुस्तक वाचावे एखादे छानसे. कधी कधी रात्रीला टाळायला हे निमित्त्य बरे पडते. पण त्यातही कधी रात्र अपमानित झाल्यासारखी मध्येच कडमडते. डोळ्यांत कसलेसे झोपेचे भ्रम भरून शिताफिनं हूल देते.
हे असे काही करत रहावे... तसे काही ऐकत रहावे...
वेळ सरत राहतो फक्त. रात्र मात्र सरत नाही.
ती हट्टाला पेटते तेंव्हा.... युगे सांडून जातात पण एक क्षण भरत नाही!

जलते चरागों में नींद ना आये...
फूंक से हमने सब तारे बुझाय़े...
जाने क्या खली रात की पिटारी से
खोले तो कोई भोर की किनारी रे
सूजी अखियोंसे... धुंआं जाये ना....

कसली तरी कारस्थानं असावीत. सारं जग गाढ झोपेत आहे. ही रात्र त्यांच्यासाठी जणू नाहीच. आणि इथं ही सारी रात्र अशी अस्ताव्यस्त ठाण मांडून बसून आहे. किंचितही हलत नाही. सरत नाही. राख होत नाही. हा नक्कीच काहीतरी कट आहे!
रात्रीच्या कुलूपबंद पेटीत काहीतरी अभद्र शिजत असेल का? ही कसली हुरहूर आणि पोटाच्या तळाशी हुळहुळणारी अनाकार भीती? ही रात्र अशीच अनंत काळ इथंच राहणार? सारं जग रात्रीसकट तिच्यात बुडून गेलेल्या मलाही बगल देऊन सरळ पुढे निघून जाणार? ते सारे जागे होतील... रहाटीला लागतील! मी जागीच होणार नाही. मी झोपलेच नाही....
रात्रीची ही पेटी उघडेल तेंव्हा त्यातून ती नाजूकशी पहाट बाहेर पडेल. सुजल्या जळत्या डोळ्यांनी ती पहाट बघताना रात्र सरल्याचा आनंद साजरा करण्याचेही त्राण माझ्यात असणार नाहीत....
त्या आधी झोप लागावी. पण... झोप येत नाही!

कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नज़र नहीं आती
मौत का एक दिन मुअय्यन है, नींद क्यूँ रात भर नहीं आती
-ग़ालिब

झोप येत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नज़र नहीं आती
मौत का एक दिन मुअय्यन है, नींद क्यूँ रात भर नहीं आती
-ग़ालिब
अप्रतिमच

खूप छान. आवडले. मुग्धा ताई तुम्ही आजकाल अगदी मनातलं लिहिता असं वाटतं Happy बिती ना बितायी रैना .. हे गाणं आठवलं .

अतिशय तरल लेखन. आवडलं. खूप रिलेट झालं.
निंदिया ना आये, रैना बीती जाये ... अशी परिस्थिती कधी उद्भवलीच तर खरंच तुम्ही वर्णिली आहे तशीच अवस्था होते - शरीराची आणि मनाचीही.
इतक्या सुंदर लेखाचे शीर्षक थोडे रूक्ष वाटते आहे. हेमावैम. राग मानू नये. (आता आगाऊपणा करतेच आहे तर ... नीज ना ये नयनी / लोचनी असे केले तर ? :))