निवडणूक माझा दृष्टिकोन…
कुणीतरी म्हटलय मतदान एक श्रेष्ठ दान आहे. हे कोणीतरी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर माझ्यातला एक अगदी किरकोळ मी.
या काळात जोडून सुट्ट्या आल्या म्हणून सहलीवर जाणारे लोक. हजार पाचशे ची नोट घेऊन मत विकणारे. उमेदवार प्रचारासाठी कोट्यवधीचा खर्च करतात तरीपण ते निवडणूक आयोगाच्या जाळ्यात सापडत नाहीत. प्रचारात पुराव्याशिवाय एकमेकावर भ्रष्टाचाराच्या आरोपाची राळ उठवतात तरी कोणच कोणाला कोर्टात खेचत नाही. कार्यकर्ते एकमेकाच्या उरावर बसतात परंतु एकमेकाला पाण्यात पाहणारे परस्पर विरोधी नेते “तेरे मेरे सपने अब एक रंग है” असं म्हणत हात हातात घेतात. 24 तास राजकारणात असलेली माणसं कोट्यवधींची माया बाळगून असतात. ( निवडून येणे म्हणजे मायाबाजार चालविण्याचा परवाना मिळणे का? ) काही न करता त्यांच्याकडे पैसा कोठून येतो ? बऱ्याच राजकारण्यांचे उद्योग आहेत हे उद्योग चालवायला त्यांना वेळ कुठून मिळतो?राजकारण्यांनी काढलेल्या सहकारी संस्था दिवाळे निघण्यासाठीच का असतात ? या संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालू शकत नाहीत का? एकदा निवडून आल्यावर पाच वर्ष मतदारसंघात न फिरकणारे पुढारी पुन्हा निवडणूक कसे जिंकतात? पक्षाने तिकीट नाकारल्यावर दुसऱ्या पक्षात जाऊन लगोलग तिकीट कसे मिळते? राजकीय पक्षांना कोट्यावधींचा रकमा देणग्या म्हणून कोण आणि कसे देते? घोडेबाजाराला पैसा कोण देते? भ्रष्टाचाराची एवढी विविधता फक्त माझ्या देशातच आहे का? “तुम्ही आम्ही भाऊ भाऊ, आपण सगळे मिळून खाऊ” ही विविधतेतली एकवाक्यता आमच्या सगळ्या राजकारण्यांच्या नसानसात कशी रुजलीय?
असे बाळबोध प्रश्न माझ्या डोक्यात सतत प्रहार करत असतात आणि मग वाटू लागते खरंच माझं मत श्रेष्ठ आहे की भ्रष्ट आहे. राजकारण जर बदमाषांचा शेवटचा आश्रय असेल तर असे बदमाष लोकच माझा आश्रय आहेत का?
निवड तरी कोणाची करायची ? जे वरवर चांगले दिसतात तेही भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकतात आणि लोकांना सांगतात हे विरोधकांनी रचलेले राजकीय कुभांड आहे. लोकसेवकाचे चारित्र्य संशयातीत असावे या भोळ्या मताचा मी. मग शोधत असतो त्यातल्या त्यात बरा वाईट प्रतिनिधी.( selection of better evil). यासारखे भयानक अगतिकचे दुसरे कुठलेच उदाहरण मला मिळत नाही.
प्रजाहितदक्ष राजकारणी कसा असतो ?तो कुठे राहतो? कुठे हिंडतो ? तो काय खातो ? यासारखे अर्जुनाला स्थितप्रज्ञा बाबतीत पडलेले प्रश्न मलाही पडतात.
हे सगळं लोकशाहीच्या नावाने चांगभलं म्हणत चालतं आणि सामान्य माणसाची सर्व स्तरावर चाललेली गळचेपी थांबत नाही.
मला बँकेतून पन्नास हजाराच्या वर रक्कम काढायची असेल तर फॉर्म भरावा लागतो . मी काढलेल्या रकमेबाबत अहवाल इन्कम टॅक्स ला जातो. बरं बँकेतून एवढी रक्कम काढली तरी आपल्याला कोण पाहत तर नाही ना? कोण आपल्या अंगावर घाण टाकून काका तुमचा सदरा घाणीने खराब झालाय मी धुण्यासाठी मदत करतो असे म्हणून हातातली पैशाची पिशवी कोण लांबवणार तर नाही ना? अश्या बऱ्याच शंका-कुशंका मनात येतात. मी पाच-पन्नास हजार रुपयाला जीवाच्या आकांताने जपत असतो. पण इलेक्शन काळात कोट्यवधीच्या रकमा बँकांतून लोक ( तथाकथित सज्जन) कसे काढतात हे एक माझ्या लेखी न सुटलेलं कोडं आहे. या नोटा इकडून तिकडे नेताना पकडल्या जातात आणि त्याचे नंतर काय होते हे कोणालाच कळत नाही.
हे सगळं पाहिल्यावर मतदान हे श्रेष्ठ की भ्रष्ट दान हा प्रश्न मला पुन्हा पुन्हा सतावतो? तरीपण मी कधीतरी बदलेल हे सारं या एकाच आशेवर आज पर्यंत मतदान केले.
मित्रांनो मी खरंतर कुठल्याही सरकारी नोकरीत नाही पण सरकारी कामाचा दुरान्वयाने संबंध का काय म्हणतात तसा आलेला आहे. लग्न ठरवताना कसं म्हणतात अहो नातं निघतय आपलं माझ्या आजोबांच्या पणजोबाच्या मावशीच्या मुलाच्या मामाच्या आत्याची मुलगी किंवा मुलगा. मला तर असली दुरान्वयाची नाती चक्रावून सोडतात . तर असंच काहीसं दुरान्वयाने सरकारी कामाचं तुमचं आणि माझं नातं. सरकारी कामाला सरकारी खाक्या का म्हणतात हे मला घरात बायकोला निवडणूक ड्युटी आली तेव्हा समजतं. बायकोचा रागरंग बदलतो. म्हणजे घरात ती माझ्यावर सतत रागवत असते आणि त्यामुळे तिचा सावळा रंग किंचित राखाडी वाटतो. एकंदरीत आमच्या घराला या काळात तिचा खाक्या समजतो आणि एरवी काव्य शास्त्र विनोदात रममान घर वृक्ष खाकी रंगात रंगते.
निवडणूक आयुक्तांचे व्यवस्थित निर्देश असतानाही निवडणुकीची (अ)व्यवस्था पाहणारे लोक किती भयानक असतात याचे एकच उदाहरण देतो जे कर्मचारी नजीकच्या एक वर्षाच्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत अशांना निवडणूकीचे काम देऊ नये असा निर्देश असताना बऱ्याच वेळेला गुडघे दुखी असणारे वयाची ५९ वर्ष पार केले लोक कसातरी पाय ओढत ओढत निवडणुकीची सामग्री वाहात आदल्या दिवशी मतदान केंद्रावर जातात. दिवस वेगवेगळ्या सामानाचे चेकिंग आणि कामाचा/रिपोर्ट चा अभ्यास करण्यात जातो. रात्री एक दोघे जण तिथेच थांबतात. झोपायला काहीच नसले तरी फरशीवर टेबलावर झोपतात. दोन दोन वर्ष बंद असलेल्या इमारती अशा कामासाठी उघडल्या जातात त्यात असलेल्या धुळीतच हे कर्मचारी काम करतात. कुठून तरी वायरिंग करुन अशा ठिकाणी तात्पुरता वीज पुरवठा होतो. निवडणुकीचा दिवस म्हणजे सकाळी सहापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत कामाचा दिवस. जेमतेम काहीतरी वेळ मिळेल तसे पोटात ढकलायचे. मोठा शहरातून स्रीयांनी रात्री दोन तीन वाजल्यानंतर प्रवास करायचा. वर या कामासाठी दिला जाणारा मोबदला हास्यास्पद असतो. या सगळ्या गोष्टींमुळे निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कर्मचारी निरुत्साही असतात. प्राप्त परिस्थितीला ते निमूटपणे शरण जातात.
आपल्या लोकशाहीत सध्या संमिश्र सरकारांचे दिवस. एक ना धड भाराभर चिंध्या. सगळ्यांना आपापला अजेंडा पुढे रेटायचा असतो . त्यामुळे दुसऱ्या कुणी पाय आडवा घातला की लगेच त्याचा पाय मोडायची तयारी . पण बऱ्याचदा तडजोडी इतक्या असतात की अगदी एकला चलोरे म्हणणारे अशा वेळी कधी न पटणा-याला मिठी मारतात. (तुझं माझं पटना आणि तुझ्या बिगर कठना) काही करून सत्तेच्या ढेपेला मुंगळ्यासारखे चिकटणे हाच एक कलमी कार्यक्रम असतो. अगदीच पटले नाही तर काडीमोड होतो. त्यामुळे कधी राज्य सरकार पडते. कधी केंद्र सरकार पडते. कधी महापालिकेच्या निवडणुका कधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी पंचायत समितीच्या निवडणुका . असं वाटतं माझी एक लग्नाची निवड चुकली तर किती मोठी निवडणुकीची शिक्षा. ही शिक्षा रंगात आलेल्या प्रत्येक निवडणुकीच्या फडात मला नाच नाच नाचवते घरी दारी. मी तर आता विचार करतोय एक माझ्यासारख्या निवडणूक पीडितांची सेना काढून निवडणूक लढवायची. लोकशाहीचा जेव्हा जेव्हा महोत्सव चालू असतो तेव्हा तेव्हा आमच्या घरात शिमग्याची बोंबाबोंब चालू असते. त्यामुळे या इलेक्शन ड्युटीचा काळ म्हणजे माझ्यासाठी खरंच काळ होऊन आल्या सारखा वाटतो. मला तर वाटते घोडेबाजार आणि पाडापाडी करणाऱ्याला फाशीची शिक्षा हवी. अहो शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड फार तसलाच सगळा प्रकार. आई एका पक्षात, बाप दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात. बाहेर दिवसभर एकमेकाला शिव्या घालतात एकमेकाविरुद्ध निदर्शने करतात, मोर्चे काढतात, उपोषण करतात, पण घरात अख्खा देश प्रेमाने वाटून खातात. त्यांच्यातला कोण न कोण सत्तेत असतो त्यामुळे सत्तेत नसणार्यांची कामेदेखील बिनबोभाट मार्गी लागतात. आमच्या मात्र साध्या साध्या कामातही नुसत्या अडचणीच अडचणी. नळाला पाणी येत नाही म्हणून आठ आठ दिवस महानगरपालिकेत खेटे घालूनही काम होत नाही . मग घरी ऐकायला मिळते एक काम धड होईल तर शप्पथ. आता तुम्हीच सांगा पाणी भरायच्या रांगेत कधी पुढारी पाहिलाय का तुम्ही ?
इलेक्शन ड्युटी मुळे आमच्या घराचे दोन भाग होतात मधमाशां सारखे. एक राणीमाशी आणि दुसरी कष्टकरी माशी. कष्टकरी माशांनी मधाचे पोळे बनवायचे असते. पिलांची काळजी देखील कष्टकरी माशी घेते असाच मी असतो या काळात. ( एका दृष्टीने हे आवडते देखील कारण त्यानिमित्ताने बायकांचा जन्म कळतो हे तूम्ही बायकोला सांगू नका नाहीतर माझ्या घरी कायमची निवडणूक लागेल).
एका इलेक्शन ड्युटीने आमच्या घराचं पार रखरखीत कच्छचं रन झालंय असं वाटतं .
बाहेर एका घरातले ते तीन पक्षातले तीन तिघाडे घरात हसत खेळत थंड डोक्याने लोकशाहीचा खात्मा करत असतात. तिघाडं असलं तरी त्यांच्या घरी कधीच बिघाड होत नाही. मला खूप वाटतं या काळात आमच्या बायकोने डोकं थंड ठेवावे पण कसं ठेवणार तिला ४५ डिग्रीत नामधारी पंखा असतो.
आमच्या बायकोच्या हातात निवडणूक आयुक्तांचे सहीचे नेमणूक पत्र पडले आणि तिला वाटू लागले आपण एका महान राष्ट्र कार्याचे भाग आहोत. आता माघार नाही. मी सुद्धा भारावून गेलो तशातच सोशल मीडियावरचे दोन व्हिडिओ डोळ्याखालून गेले आणि माझे डोळे ओलावले .
Screenshot_2019-05-02-14-15-56-967_com.mi_.android.globalFileexplorer_0.png (43.9 KB)
( व्हिडिओ अपलोड करू शकत नाही त्यामुळे फोटोची लिंक कल्पना येण्यासाठी देत आहे.)
या व्हिडिओचे बॅकग्राऊंड सॉंग “कर चले हम फिदा जाने तन साथियो” ऐकले अन व्हिडिओतले निवडणूक सामग्री घेऊन चालणारे कर्मचारी म्हणजे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैन्या सारखे भासले. मी खूप भारावलो. मलाही या राष्ट्र कार्याचा अप्रत्यक्षपणे भाग झाल्याचा गर्व वाटू लागला. दुस-या व्हिडिओत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले सगळ्यात मोठे ऑफिस राष्ट्राध्यक्षाचे नसून जनतेचे आहे .
ते व्हिडिओ पाहून निवडणूक कर्मचाऱ्यांचा त्याग डोळ्यासमोर आला.
ट्रेनिंगसाठी गेल्यावर उन्हाळ्याचे दिवस असल्याने मंडपात भयंकर उकाडा एका मंडपात हजारो कर्मचारी आणि दूरवर कुठेतरी मंचावर उभे राहून त्यांना सूचना देणारा एक ठीपका. तीन-तीन चार-चार तास जागेवरून उठायचे नाही पाणी प्यायचे नाही. लघवीला देखील जायचे नाही. एरवी लंच टाईम व्यवस्थित पाळणारे सरकारी कर्मचारी त्या काळात कधीकधी चक्क उपाशी असतात किंवा पाच सहा वाजता जेवतात. नाश्ता चाय देखील त्यांच्यासाठी चैन भासू लागते.
आमच्या घरी आता भाजी कुठली करू किंवा कोशिंबीर करू का? रविवारी चिकन की गोड याच्या चर्चा थांबल्या होत्या. त्याऐवजी आता माझी राष्ट्रनिष्ठ बायको EVM, VVPAT मशीनची पॅकिंग, सुरक्षा, याविषयी बोलायची आता ती किराणा पॅकिंग, साखरेचे डब्याची मुंग्या पासून सुरक्षितता विसरली होती. तिला किराणा मालाच्या आणि मुलांच्या वह्या पुस्तकांच्या याद्या विस्मरणात गेल्यासारखं वाटत होत्या. त्याऐवजी ती मतदार याद्यांच्या प्रती आणि पुरवण्याचा ताळमेळ कसा घालायचा यावर तासन्तास व्याख्यान देत होती. मतदारांच्या ओळखी कशा पटवायच्या हे सांगताना आंबेमोहर तांदूळ कसा ओळखावा हे जसे सफाईदारपणे सांगायची तितक्याच सहज ती आता मतदार कसा ओळखायचा याविषयी बोलायची . पण निवडणुकीच्या दिवशी तिला समजले की मतदान यादीवर असलेला फोटो वीस वर्षांपूर्वीचा आहे मग अशा माणसाची ओळख कशी पटवायची?
बोटाला शाई कशी लावायची हे ती पोळीला तूप किती आणि कसे लावावे इतक्या सहजतेने सांगायची. पण मतदानाच्या दिवशी शाई लावणाराची पाची बोटं तुपात भिजल्यासारखी कशी माखली अन भा(सु)जली हे करुण स्वरात सांगितले.
सगळ्या निवडणूक वस्तूंची नोंद कशी ठेवायची त्या सुरक्षित परत कशा द्याव्यात
मशीन पोलिंग बूथ मध्ये कुठे ठेवावे त्याला धक्का लागणार नाही अशी कशी काळजी घ्यावी.
मतदान गुप्त राहील हे कसे पहावे (एरवी बायकांच्या पोटात काही राहत नाही असे बोलले जाते) , निवडणूक केंद्रातील सर्व राजकीय पुढाऱ्यांचे फोटो कसे झाकावेत, पोलिंग एजंट कुठे बसवावेत मतदानापूर्वी डमी मतदान कसं घ्यावं त्याचा डेटा मशीन मधून कसा काढून टाकावा मतदानानंतर सगळे साहित्य सुरक्षित कसे परत करावे.
2215 गोष्टी. आमचं घर निवडणुकीचा आखाडाच व्हायचं.या आखाड्यात जिंकायची ती बायकोच.
थोडे जिंकण्याचे समाधान आम्हालाही मिळायचे कधीकधी. मुलांनी आणि मी या काळात घराचा उकिरडा केलाय हे तिच्या लक्षात यायचं नाही.
तिला माझ्या केविलवाण्या परिस्थितीची बिलकुल दयामाया काही नसते. निवडणुकीच्या राष्ट्र निष्ठेने भारावल्या अवस्थेत ती माझ्यावर अन्याय करते हे ही विसरते. चक्कीतून दळण आणताना डब्याला चिकटलेले पीठ झटकायला विसरतो आणि घरी येईपर्यंत माझा अवतार चक्की चालवणाऱ्या सारखा झालेला असतो त्यावरून लगेच चालू होते बघा आमच्या मतदार केंद्राबाहेर हद्दीसाठी फक्की मारणारे देखील असला अवतार करत नाहीत. अशावेळी सरकारी कर्मचारी सुलतानासारखे भासतात.
वाणसामानाचे बजेट वाढले तर म्हणते निवडणुकीच्या काळात आचार संहिता असते त्यामुळे जास्तीचा फंड मिळणार नाही. आहे त्यात भागवावे लागेल. मग मी सुचवतो टूथपेस्ट ऐवजी पीठाने दात घासावे लागतील.
काही प्रापंचिक काम असेल तर अर्ज करा असे सांगते. हो एखाद्या दिवशी मी कंटाळून तिला म्हटलं आज खूप थकलोय अंथरुण तू घाल तर म्हणते अर्ज करायला हवा. तिला सरकारी काम करायला लागतं म्हणून मी घरात राबतो ( ऑफिसात सुद्धा ) म्हणजेच फ्रंटवर सियाचिन ग्लेशियर मधल्या सैनिका सारखा सदैव दक्ष असतो. थंड नाही तर घरातील गरम वादळे नित्य झेलत अविरत कष्टाचे डोंगर बर्फाच्या डोंगरासारखे बाजूला सारत असतो. सकाळी सकाळी लवकर उठावे लागते पहिले चहाचे आदन टाकतो मग सौ ला आवाज देतो . चहात साखर टाकायला विसरतो म्हणून दिवसाची सुरुवात कडू करून घेतो आणि हे चहाच्या प्याल्यातले गरम वादळ क्षमवता क्षमवता माझी दमछाक होते.
या काळात नाश्त्याला कॉर्न फ्लेक्सच मदतीला धावून येतात. जेवणाला डाळ भात. रुचिपालटासाठी डाळीवर तूप अन् लोणचं, पापड. एरवी मी भात खात नाही पण या काळात अगदी मद्रासी लोकांसारखी गोळाफेक करत असतो. मुठीतून सुटलेला भाताचा गोळा तोफ गोळ्यासारखा माझ्या आ वासलेल्या जबड्यात अचूक पडतो. अशावेळी मुलांचा गनिमी कावा चालू होतो. ते म्हणतात काय रे बाबा रोज डाळभात आम्हाला नको. मग माझ्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून मी त्यांना विचारतो, बाहेरून मागवतो काय खाणार? त्यांना देखील हेच हवे असते. मुलं सांगतात पिझ्झा, बर्गर किंवा गेला बाजार हक्का नूडल्स चालतील. माझ्याही तोंडाची चव गेलेली असते आणि मी त्यांच्या या गनिमी काव्यात सामील होतो. बायको सांगत असते बजेट वाढले तर पैसे मिळणार नाहीत. आचारसंहिता चालू आहे.
या निवडणूका शालेय जीवनातही भरपूर उलथापालथ घडवतात. आमचा गण्या कुणा एका पुढाऱ्याचे टीव्हीतले कॉलर उडवण्याचे फोटो पाहून आज-काल एका एका वाक्यानंतर बोलताना कॉलर उडवतो. कविता पाठांतरापेक्षा निवडणुकांच्या जाहिराती पटकन पाठ होतात. “:बदल होणारच ….. सरकार येणारच” किंवा “ मी कशाला देशाची काळजी करू ….. पाठवतो”, “सत्तर वर्ष लूट केली…..लाज वाटते ” असे काहीतरी दूरदर्शन वर पाहिलेले आणि ऐकलेले बरळतो. जास्ती जास्त वेळ बाल्कनीत थांबून प्रचाराच्या मिरवणुका न्याहाळतो. कधी कधी चक्रावून टाकणारे प्रश्न विचारतो. बाबा आपल्याकडं निवडणूक भावनिक प्रश्नावर जिंकता येते असं राम चे बाबा म्हणतात . म्हणजे जात, पात, धर्म, देशभक्ती, आतंकवाद का बाबा? मग लोकांचे रोजचे प्रश्न अन्न, वस्र, निवारा, पाणी, प्रदूषण, शिक्षण, आरोग्य, नोकरी हे कोण बघणार?
गण्याने असं विचारल्यावर माझ्या डोळ्यांपुढे दोन वेळच्या अन्नाला मोताद मजूर, हताश शेतकरी आणि पुढार्यांचा दावणीला बांधलेले बेकारांचे तांडे उभे राहतात. त्यांना जातीपाती, धर्माच्या अफूच्या गोळ्या दिल्या की काम मिटतं. पोलिसांनी पकडले की सोडवायचे. पुन्हा कार्यभाग साधतो. मग लग्न, मयत,दहावा इत्यादीला हजर राहिले की साहेब किती थोर हे कार्यकर्त्यांना पटते. ग्रामीण भागात पुढा-यांच्या नावात लग्नपत्रिका आणि सत्कारात लग्न मुहूर्त हरवतात. गणेश उत्सव आणि दहीहंडी बीभत्स उत्सव झाले असे वाटायला लागते.
हल्ली गण्या खेळ खेळताना देखील जिंदाबाद, निवडणूक जाहीरनामा, निवडणूक पत्रकार असेच खेळ खेळतो.
जिंदाबाद हा खेळ जेवढे जमतील तेवढी मुले खेळतात. काही झेंडे बनवले जातात. काही मुले कागदाचे उपरणे बनवतात. कोणी टोपी बनवते. या सगळ्यावर पेनाने पक्षचीन्ह काढले जाते. काही मुलांच्या हातात निवडणूक जाहीरनामा असतो. मग गण्या पुढारी होतो आणि घोषणा देतो. “येऊन येऊन येणार कोण… गणेश शिवाय आहेच कोण”. बाकी पोरं री ओढतात आणि गल्लीभर धुमाकूळ घालतात मग एका कोपऱ्यावर एका दगडावर गण्या उभा राहतो आणि भाषण ठोकतो. भाषण करण्यापूर्वी मुलांना तो सांगतो मध्ये मध्ये गssणेश, गssणेश असे ओरडायचे आणि टाळ्या पिटायच्या.
आमचा पक्ष निवडून आल्यावर
1) प्रत्येकाला खेळण्यासाठी अमर्याद टाईम मिळेल. रोज अभ्यासाची सक्ती नसेल.
२)आई-वडिलांच्या जाचातून मुक्तता जसे दुकानात पिटाळणे, दळण आणणे वगैरे वगैरे.
३) मारकुट्या मास्तरांना कोंबडा बनवू.
४) हवी तेवढी चिंचा, बोरे बारोमाही पुरवू.
५) रोज रात्री घरातल्या मोठ्या माणसांनी गोष्ट सांगणे बंधनकारक असेल.
६) वाढदिवशी केक, वेफर्स, पिझ्झा आईस्क्रीम हट्टाने मिळवू. जंकफूड वरची बंदी उठवू.
७) पिळवणूक होऊ देणार नाही.
८) मुलांसाठी आमच्या कायद्याचं राज्य आणू.
अशी एकेक अलौकिक कलमे या जाहिरनाम्याची असायची.
आज-काल गण्याच्या शाळेत मास्तरांनी मुलांना विचारले तू कोण होणार तर सांगतात मी चहावाला होणार, चौकीदार होणार. मास्तरांनी का विचारले तर म्हणतात पंतप्रधान होण्याआधी चहावाला किंवा चौकीदार व्हावे लागते. डॉक्टर, वकील, इंजिनीयर व्हायला जेवढे बौद्धिक कष्ट लागतात तेवढे चहावाला आणि चौकीदार व्हायला लागत नाहीत असं मुलं बोलतात.
शेतकरी व्हायला कोणालाही नको आहे कारण कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करतो असंही त्यांना वाटतं. एकंदरीत उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी हे गणित कधीच खरे नसावे.
गण्याला मी सद्य परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडवितो. कारण तसे केले नाही तर अजानता खेळता खेळता तोही या जीवघेण्या निवडणुकीच्या खेळात अडकू नये.
माझं छोटसं मध्यमवर्गीय भावविश्व निवडणुकीच्या काळात बदलतं तरी एरवी त्याची घडी फारशी विस्कटत नाही. तरीदेखील मी त्रागा करतो. ते घडी विस्कटणे मला परीटघडी सारखे वाटते. मोडली तरी पुन्हा बसते. पण उपेक्षितांची परिस्थिती यापेक्षा बरीच वेगळी आहे. त्यांच्या संसाराची घडी कधीच बसली नाही. स्वातंत्र्य, लोकशाही हे शब्द अजूनही त्यांना अनभिज्ञच आहेत. बरेच वयस्क आदिवासी / ग्रामस्त अजून निवडणूक म्हणजे नक्की काय हे सांगू शकत नाहीत. पोटाची आग विझवायला त्यांना व्यक्ती स्वातंत्र्याची आहुती द्यावी लागते. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य कदाचित माहितच नाही. याच अगतिकतेतून मत विकले जाते. अजूनही कितीतरी लोक फक्त एक वेळचे जेवतात. कुणी म्हणेल मग एवढी वर्ष काहीच झाले नाही का? हो झाले. प्रश्न अंशत: सुटलेत पण बहुतांश वर्षानुवर्ष तसेच रेंगाळतायेत . अक्राळविक्राळ बक्काल शहरं का निर्माण होताहेत ? कुठे हरवलाय अंत्योदय ? विजा घेऊन येणारी पिढी याचा जाब निश्र्चित विचारेल. सद्या आम्ही फक्त म्हणायचे लोकशाहीचा महोत्सव. कोणाची लोकशाही? कोणाचा महोत्सव? अशावेळी अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या आपल्याला आपल्या देशातल्या राजकारणा सारखीच काहीशी भ्रष्ट स्वरूपात आहे असे वाटते.
Democracy is a government "of (off) the people, by(buy) the people, and for(far) the people."
© दत्तात्रय साळुंके
निव्वळ भारी लिहिलय. शैली तर
निव्वळ भारी लिहिलय. शैली तर एकदम झकास. दुसरे कुणी सांगितलं असतं की हे साळूंकेदादांचे लेखन आहे तर मी विश्वास ठेवला नसता. तुम्हाला असे लिहिताना पाहिले नाही कधी. एकदम जबरदस्त लिहिलय.
खुमासदार झालाय लेख.
शेवटच्या वाक्यातले कंस म्हणजे वास्तव आहे.
वाह!!!
आतापर्यंत पंचवीस तीस वेळा
आतापर्यंत पंचवीस तीस वेळा मतदान केंद्राध्यक्ष/ निर्णय अधिकारी /झोनल अधिकारी म्हणून काम केले. कितीही डोळ्यात तेल घालून काम केले तरी काही लोकांनी बितवण्याचा प्रयत्न केला. फार फार तणावात जातात ते दोन दिवस. नेमणूक पत्रात लोकप्रतिनिधी नियम १९५२ की कोणते साल, अंतर्गत सरळ धमकीच असते कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही म्हणून. एकदा भर उन्हाळ्यात खूप आजारी असतानाही काम करावे लागले होते. ग्रामीण भागातील मतदान काम करणं शहरी भागापेक्षा कधीही चांगले असते. शहरात पोहोचलेले गुंड फार त्रास देतात व चहा सुध्दा कोणी विचारीत नाही. ग्रामीण भागात खूप ठेप ठेवतात गावकरी. लोकशाही धनवान, गुंड लोकांनी बटिक करून ठेवली आहे. सामान्य लोकांनी ठेविले अनंते तैसेचि रहावे हा मंत्र जपत बसायचं फक्त.
क्या यार बोकलत?
क्या यार बोकलत?
छान ! आवडले लेखन.
छान ! आवडले लेखन.
वास्तवदर्शी.
खरंच शाली म्हणतात तसंच काहीसं
खरंच शाली म्हणतात तसंच काहीसं वाटलं. आवडलं लिखाण.
आवडले लिखाण.
आवडले लिखाण.
जबरदस्त....
जबरदस्त....
वास्तववादी.... प्रचंड आवडले लेखन....
एक शंका:
एक शंका:
अंध व्यक्ती मतदान कसे करतात ? त्यांच्यासह मदतनीस कक्षात जातो का? तसे असल्यास ते गुप्त राहणार नाही.
अंध व्यक्तीला मदतनीस घेता
अंध व्यक्तीला मदतनीस घेता येतो व त्याचा फॉर्म भरून घेतला जातो. अंध व्यक्तीच्या वतीने मदतनीस मतदान करतो. शाई अंध व्यक्तीला लावली जाते व मदतनीस फक्त एका अंध/ अपंग व्यक्तीला मदतनीसाचे कार्य करू शकतो. मतदान गुप्त रहात नाही पण अंधांसाठी वेगळी किचकट यंत्रणा करावी लागेल त्यामुळे असे केले जाते.
हो की. माझ्याही हे लक्षात आले
हो की. माझ्याही हे लक्षात आले नाही.
काही तरी ब्रेल सिंबॉल असावीत मशिनवर.
मतदान हिशोब देताना सर्व
मतदान हिशोब देताना सर्व प्रकारच्या मतदारांची वर्गवारी जसं स्त्रिया, पुरुष, अंध/ अपंग, चॅलेंज व्होट किती झाले हे द्यावे लागते. तिथे प्रत्येक उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी हजर असतात, कुणी बोगस मतदार आला तर आक्षेप घेतला जातो. शंभर टक्के पुर्ण पारदर्शक प्रक्रिया असते. वेगवेगळ्या कोष्टकात सर्व माहिती असते. इव्हीएम मशीन सीलबंद असते व हिशोबात दाखवल्याप्रमाणे मतमोजणी करताना मतदार संख्या पडताळली जाते. शिवाय मतमोजणी करताना उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात.
मतदान सुरू करण्याआधी
मतदान सुरू करण्याआधी प्रतिनिधींसमोर मॉक पोल( खोटे मतदान) घ्यावे लागते. प्रत्येक उमेदवाराला मत देऊन, मतदान क्लोज करुन रिझल्ट दाखविला जातो. दिलेले मत त्याच उमेदवारांना मिळाले हे दाखवले जाते. परत मशीन क्लीयर केले जाते. मतदान शुन्य असल्याची खात्री करून प्रतिनिधींसमोर सीलबंद करून मतदानास सुरुवात केली जाते. हे मशीन बनवणाराला माझा खरंच सलाम आहे.
( न विचारता उत्साहाच्या भरात माहिती देत आहे. कृपया क्षमस्व.)
सर्वात दिलासा देणारं म्हणजे
सर्वात दिलासा देणारं म्हणजे मतदानाचे काम करताना पगाराव्यतिरिक्त मोठ्या रकमेचा भत्ता वेळेत, केंद्रावरच दिला जातो. वेगवेगळ्या खात्यांतील लोक असतात व आदल्या दिवशी टिम बनवली जाते. तालुक्यात काम करता येत नाही, कधीकधी जिल्हा बदलून काम दिले जाते. काही गावांच्या अविस्मरणीय आठवणी जमा झाल्या आहेत.
धन्यवाद !
धन्यवाद !
@ कुमार १, उशिरा प्रतिसाद
@ कुमार १, उशिरा प्रतिसाद देत आहे माफी असावी.
पुढील लिंक अंध मतदाराने मतदान कसे करावे यासंबंधी आहेत.
१)https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/marathi/mumbai/lok-sabha-...
२ )Voting by Blind and infirm Voters-instructions- regarding..pdf (95.14 KB)
३) https://timesofindia.indiatimes.com/india/visually-impaired-blind-voters...
४)
https://enabled.in/wp/form-7a-lok-sabha-elections-2019-guidelines-for-pe...
मलाही याबाबत जास्त माहिती नव्हती. पण या निवडणुकीत ब्रेल मतदाता स्लीप, आणि मशिनवर देखील ब्रेल होते जिथे असे मतदाते होते.
@ कुमार १, उशिरा प्रतिसाद
@ शाली- तुमचा दिलखुलास प्रतिसाद नेहमी मला चांगले लिहायला प्रवृत्त करतो.
कुमार१, प्राचीन, शशांक, हर्पेन आपण सारे माझ्या लिखाणाचा प्राणवायू आहात
शक्तीमान धन्यवाद, माझे लिखाण कसे वाटले हे प्रतिसादात अपेक्षित होते . ते लिहायचे राहिले का ?
दत्तात्रय साळुंके
दत्तात्रय साळुंके
धन्यवाद, सवडीने वाचतो.
सत्यपरिस्थिती दाखवली आहेत
सत्यपरिस्थिती दाखवली आहेत आपण
आपल्याकडे फक्त दोनच पक्श आहेत ruling & opposition बस मग कोणीही असले तरी
निलुदा धन्यवाद आवर्जून लेख
निलुदा धन्यवाद आवर्जून लेख कसा वाटला हे कळविल्याबद्दल...
निवडणूकीचे वारे वाहतायेत....
निवडणूकीचे वारे वाहतायेत....
बघा मी २०१९ साली लिहिलेलं कितपत बदललंय...
यावेळेस 5 टप्प्यात मतदान
यावेळेस 5 टप्प्यात मतदान ठेवले आहे महाराष्ट्रात..असे का केले असावे..
यातले 3 टप्पे मे महिन्यात आहेत. या काळात शाळा बंद असल्यामुळे लोक सुट्टीच्या निमित्ताने स्थलांतरित होतात. याचा परिणाम मतदानावर होणार नाही का?