Odd Man Out (भाग २४)

Submitted by nimita on 3 May, 2019 - 07:25

शेवटी एकदाचा संग्राम ऑफिसला जायला निघाला.Luckily आज त्याला लवकर जायचं होतं., त्यामुळे नम्रताला तिच्या सीक्रेट मिशन साठी थोडा जास्त वेळ मिळणार होता.. एरवी तो दिसेनासा होईपर्यंत लिव्हिंग रूमच्या खिडकीतून त्याला बघत बसणारी नम्रता आज मात्र त्याची पाठ वळल्या वळल्या लगेच स्वैपाकघरात पळाली. 'मीटिंगला जायच्या आधी निदान पुरण तरी शिजवून ठेवावं' असा विचार करून ती झरझर कामाला लागली. अकरा वाजता मिसेस घोष येणार होत्या त्यामुळे त्याच्या आधी बाकी सगळ्या बायकांना AWWA सेंटर मधे पोचणं आवश्यक होतं. त्या हिशोबानीच तिनी आदल्या दिवशी सगळी प्लॅंनिंग करून ठेवली होती. बरोब्बर साडेदहा वाजता नम्रताच्या घराची बेल वाजली. नम्रताला घेऊन जायला युनिटची एक जीप बाहेर हजर होती. इतर ज्युनिअर लेडीज ना सेंटर मधे सोडून ड्रायव्हर तिच्या घरी आला होता. नम्रता तयारच होती. एकीकडे मीटिंगच्या agenda ची मनात उजळणी करत ती जीपमधे बसली.

त्या दिवशीची मीटिंग ही खास होती. युनिट लवकरच फील्ड मधे जाणार होती आणि त्या संदर्भात JCO आणि जवानांच्या परिवारांशी चर्चा करून, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असले तर ते समजून घेऊन त्यातून मार्ग काढणं हे या मीटिंगचं मुख्य उद्दिष्ट होतं. मिसेस घोष ठरलेल्या वेळेला म्हणजे बरोब्बर अकरा वाजता आल्या आणि मीटिंग वेळेत सुरू झाली.

आत्तापर्यंत युनिट मधल्या सगळ्यांनाच या मूव्ह बद्दल समजलं होतं. आणि- व्यक्ती तितक्या प्रकृती- सारखंच ही बातमी कळल्यानंतरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येत होत्या. नम्रताच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून तिला या सगळ्याची थोडीफार कल्पना होतीच.JCO आणि जवान्स पैकी बऱ्याच जणांच्या बायका आपापल्या घरी (मोस्टली सासरी) राहायला जाणार होत्या. ज्यांची मुलं मोठी होती त्या मात्र मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून SFA मधे राहायचा विचार करत होत्या. मिसेस घोष नी नम्रता आणि बाकी लेडीज च्या मदतीनी मीटिंग मधे आलेल्या सगळ्या स्त्रियांशी सविस्तर चर्चा करून, त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेतले. सगळ्याची व्यवस्थित नोंद करण्यात आली. 'लवकरच या सगळ्या गोष्टींचा विचार करून आवश्यक ती सगळी मदत केली जाईल.'अशी खात्री देऊन त्या दिवशीची मीटिंग संपवून मिसेस घोष बाहेर पडल्या. सगळं कसं ठरलेल्या वेळेत झालं होतं.

पण त्यात काहीच नवल नव्हतं. Punctuality ही तर सैनिकी आयुष्याची खासियत आहे...इथे 'दिलेली वेळ पाळणं' हे एखादं वचन पाळण्याइतकंच महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येकजण वेळेच्या बाबतीत अगदी जागरूक असतो..ऑफिसर्स आणि जवान्स पासून ते अगदी त्यांच्या परिवारातल्या सदस्यांपर्यंत - प्रत्येकजण वेळेची बांधिलकी अगदी काटेकोरपणे पाळतो. आणि नम्रता आणि तिच्या मुलीही याला अपवाद नव्हत्या.

नम्रताला नेहेमीच एक गोष्ट खटकायची....आणि ती म्हणजे 'वेळ न पाळणाऱ्या लोकांची मानसिकता'...असे लोक एक तर स्वतः कधीच वेळेचा मान ठेवत नाहीत आणि त्याहीपेक्षा irritating गोष्ट अशी की स्वतःच्या या अशा वागण्याचं समर्थन करत त्याला हसण्यावारी नेतात..

या एका गोष्टीवरून कितीतरी वेळा नम्रताची आणि तिच्या काही मित्र मैत्रिणी तसंच नातेवाईकांची अगदी जोरदार चर्चाही व्हायची. नम्रता त्यांना वेळेचं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करायची..'समोरच्या व्यक्तीचा वेळही तितकाच महत्वाचा असतो आणि प्रत्येकानी हे लक्षात घेतलं पाहिजे,' ती पोटतिडकीनी त्यांना समजवयाची.'जर नीट प्लॅन करून वेळेत कामं पूर्ण केली तर चोवीस तासात आपण छत्तीस तासांची कामं करू शकतो..ट्राय तर करून बघा एकदा..." पण त्यांचं आपलं 'ये रे माझ्या मागल्या' !

पुण्यात SFA मधे राहात असताना तिनी बऱ्याच वेळा या सगळ्याचा अनुभव घेतला होता. एखाद्या कार्यक्रमाला किंवा get together ला ती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन अगदी बरोब्बर दिलेल्या वेळेला पोचायची. पण बाकी कोणाचाच पत्ता नसायचा. त्यांची वाट बघण्यातच नम्रताचा अर्धा वेळ आणि patience ही संपून जायचा. सुरुवातीला काही वेळा हा अनुभव आल्यानंतर मात्र तिनी सगळ्यांना सांगितलं होतं," मला तुमच्या हिशोबानी वेळ नका देऊ. कारण तुमची ठरवलेली वेळ आणि यायची वेळ यांत खूप अंतर असतं. म्हणून मला तुम्ही तुमची यायची वेळ सांगत जा. इथे बसून उगीच तुमची वाट बघत वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढ्या वेळात मी काहीतरी दुसरं constructive काम करीन." सगळ्यांनी तिचं म्हणणं ऐकून त्यावर अंमलबजावणी देखील केली..पण तिच्यासारखं 'वेळ पाळणं' काही कोणी आत्मसात केलं नाही. आणि गंमत म्हणजे- उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी काही जण उलट नम्रतालाच ऐकवायचे-" तुझं बरं आहे गं.. संग्राम नाहीये ना, त्यामुळे फ्री च असतेस. म्हणून जमतं तुला वेळेवर यायला.पण आम्हांला इतक्या कामातून कसं जमेल?" अशावेळी तिला वाटायचं- त्यांना ओरडून सांगावं..' नवरा घरापासून लांब असला तर त्या बाईला काही काम नसतं हा केवढा मोठा गैरसमज आहे तुमचा. एकाच वेळी ती दोघांची कामं करत असते. घराची आणि बाहेरची अशा दोन्ही आघाड्या ती एकटी सांभाळत असते; आणि तेही समर्थपणे. तिच्या मुलांना त्यांच्या वडिलांची उणीव भासू नये म्हणून ती वेळप्रसंगी घरच्या पुरुषाचीही भूमिका वठवते. कितीतरी वेळा, आणीबाणीच्या प्रसंगी तिला तिचा नवरा तिच्या शेजारी असावा असं वाटत असतं, त्याचा तो धीर देणारा स्पर्श हवा असतो, त्याचा आवाज ऐकायचा असतो, पण स्वतःचं हे शल्य इतरांना न दाखवता ती हसत हसत समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना सामोरी जाते. आणि सगळ्यात क्रेडीटेबल गोष्ट म्हणजे या सगळ्याबद्दल तिची कधीच कोणतीच तक्रार नसते.'

आणि म्हणूनच की काय; पण बघणाऱ्यांना आणि त्यातही खास करून नम्रताच्या नात्यातल्या आणि ओळखीच्या बायकांना वाटायचं," वा! मजा आहे हिची..स्वतःला पाहिजे ते आणि पाहिजे तेव्हा करू शकते.' तिची एक मैत्रीण तर एकदा तिला म्हणाली होती," किती लकी आहेस गं तू! एकटीच राहतेस..नाहीतर मी..दिवसाचा सगळा वेळ नवऱ्याची हांजीहांजी करण्यात जातो. तुला मात्र एकदम मोकळं मोकळं वाटत असेल ना ? नवऱ्याचं बंधन नाहीये !" नम्रता म्हणाली होती,"मला काही हौस नाहीये एकटं राहायची. पण हां, एक गोष्ट मात्र तू अगदी बरोबर म्हणालीस- मी खूप लकी आहे! कारण मी माझ्यापरीनी आपल्या देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकते." हे म्हणताना नम्रताच्या चेहेऱ्यावरचं समाधान बघून तिची ती मैत्रीण पूर्णपणे गोंधळून गेली, "एकटं राहाणं आणि देश यांचा काय संबंध ?" तिचा हा प्रश्न ऐकून नम्रता म्हणाली,"माझा नवरा जरी तिथे बॉर्डरवर देशासाठी लढत असला तरी त्याला एक खात्री आहे की त्याच्या मागे मी आमचं घर, आमच्या मुलींची नीट काळजी घेईन.आणि म्हणूनच तो त्याचं सगळं लक्ष त्याच्या ड्युटीवर देऊ शकतो.म्हणजे मी indirectly देशसेवाच करतीये ना!" नम्रताचं हे लॉजिक ऐकून "खूप बद्दललीयेस हं तू नम्रता..आजकाल तुझं काहीतरी वेगळंच असतं बाई,"असं म्हणत तिच्या मैत्रिणीनी तिथून काढता पाय घेतला होता. नम्रताच्या मनात आलं,' खरं आहे, माझं बरंच काही वेगळं आहे तुमच्यापेक्षा!"

तिचा एक मित्र तर तिच्या या punctuality ची चेष्टा करत म्हणायचा," हे तुझं घड्याळाच्या तालावर नाचणं तिकडे आर्मी मधे चालत असेल , पण इथे तुझं ते घड्याळ ठेव बॉक्समधे. यहाँ हम वक्त के गुलाम नहीं हैं । वक्त हमारा गुलाम है।"
आता असा विचार करणाऱ्या लोकांना किती आणि कसं समजवायचं ! त्यामुळे त्या सगळ्यांच्या या युक्तिवादावर नम्रता काही न बोलता गप्प बसून राहायची.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users