साळु

Submitted by राजे १०७ on 29 April, 2019 - 13:20

आठ-दहा दिवस झाले साळु आजारी असल्यासारखी वागत होती. कामात नीट लक्ष नव्हते. घरकाम व्यवस्थित करणारी साळु अळमटळम करीत कामं उरकित होती. एक दिवस सांजच्याला दिवा न लावता निजून राहिली होती.
साळुचा नवरा काळु तिला उठवत म्हणाला का गं साळु गप? साळुचा पोरगा बाळु म्हणाला का गं आये गप? साळु बोलली काय नाही. काळु बोलला काय नाही कसं? पाच चपात्या खाणारी एक चपाती खाती.‌ उद्याच्याला डागदर कडं जावू. काळुनं साळुच्या आवशीला निरोप दिला.
आजूबाजूच्या मैतरणी तब्येतीची विचारपूस करायला आल्या. दुपारी आवशी आली,पोरीची परवड पाहून रडायला लागली. कुणा पिसाळलेल्या कुत्र्याने माझ्या पोरीला नजर लावली, फुलासारखी पोर माझी पार वाळली.
आवशीला पाहुन साळुला भरुन आलं. गळ्यात पडून हमसून हमसून रडली.
साळु घरस्री असल्यानं काळुबाळु बाहेर पडले की दिवसभर फैसबुकवर वावरत असायची. फैसबुकात मातृभाषा नावाचा ग्रुप बनवलेला होता. साळु तिथं तिचं अगाध ज्ञान पाजळत असे. सुरुवातीला तिच्या लिखाणाची भरपूर तारिफ होत होती, मग साळु स्वत:ला नामचीन लेखिका समजायला लागली.‌ हळूहळू तिचं लिखाण अतिरंजित, फेकाडं होत गेलं.‌ काही लोकांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण साळु कशाला ऐकायला. आणि तो दिवस उगवला.‌
त्या दिवशी साळुला ग्रुपवरुन हटवा अशी बऱ्याच जणांनी/जणींनी मागणी एडमिनकडं केली.‌ साळुला हा आपला भयंकर अपमान वाटला व तिनं फैसबुक उघडायचंच बंद केले. इतके दिवस हरभऱ्याच्या झाडावर चढवणारांनी तिला आपटवलं हे तिला सहन न होण्याजोगं झालं होतं.
मग तिनं एक फैसबुक डागदर गाठला व यावर उपाय काय हे विचारलं. तो मनला हे असं चालायचंच. आभासी जगातील शेरे, टोमणे मनाला लावून घ्यायचे नसतात. तू सरळ ग्रुप बदल नाही तर आयडी बदलून लिव्ह. हे ऐकून साळु खुप खुश झाली. घरी जाऊन सहा चपात्या भाजीबरूबर खाल्या.

(हे लिखाण संपूर्ण काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंधित नाही. यात कोणत्याही प्राण्याचे शोषण केले गेले नाहीत. वाचून करमणूक झाली तर तेच आमचे श्रम/टंकन परिहार रुपी बक्षिस राहील. धन्यवाद!!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सहमत !
आभासी जगात सर्वांना बॉट्स समजून राहिले म्हणजे सुखी राहतो माणूस. सगळे आभासी आहे.

साळु Happy