माझी बावळट बायको
आमची परिस्थिती तशी बेताचीच . लग्नाच्या बाजारात उभं राहताना इंजिनिअरची पदवी, आणि चांगल्या पगाराची कंपनीतली नोकरी, एवढच काय ते क्वालिफिकेशन. इस्टेट, घर-दार बाकी झिरो. त्यामुळे मुलीबाबतच्या माझ्या अपेक्षा पण माफक होत्या हो! बायकांचे साड्या,कपडे, दाग –दागिने, नट्टा-पट्टा याचा खर्च काही कमी असतो का? म्हंटल तिचा खर्च तिने उचलला तर बरच, तेव्हा बायको नोकरी करणारी असावी, त्यात सरकारी नोकरी असली तर उत्तमच. सर्वसामन्यांप्रमाणे माझी पण थोडी उच्च श्रेणीत जगण्याची स्वप्न होती ना! नोकरीवाली म्हणजे अर्थातच पदवीधर तर असावी, हे ओघाने आलेच ना! दिसायला हजार जणीत नाही पण दहा जणीत तर उठून दिसणारी हवी, ही तर माफकच अपेक्षा! मुख्य म्हणजे माझ्या आई-वडिलांशी त्यातले त्यात आईशी सांभाळून वागणारी हवी. वस्ताद नको. स्वभावाने गरीब असावी. ‘बैठ जा बैठ गयी ,खडी हो जा खडी हो गयी’ अशी नवऱ्याच्या आज्ञेत असावी. ही पण माफकच अपेक्षा ना हो! माहेरचा तोरा,माहेरच्या माणसांच कौतुक अजिबात नको. ही तर अगदीच अल्पशी अपेक्षा! देवाशपथ सांगतो, देवाने माझ सार ऐकल की हो! अगदी तशीच बायको मला मिळाली.
सुरुवातीला मला वाटलं आपल्याला हवी तशी बायको मिळाली. पण हळू हळू सहवास वाढला आणि मला समजून चुकल की आपली बायको गरीब स्वभावाची नाही तर बावळट आणि अव्यवहारी आहे. लग्नानंतरचा सुरुवातीचा किस्सा सांगतो, हिच्या माहेरी जायला आम्ही एस .टीने निघालो. रिझर्वेशन केलेलं होत. एस. टीला शाळेच्या सुट्यामुळे गर्दी होती. एस .टी फलाटावर लागली, लोकांची गर्दी एस टीत घुसू पहात होती. मी पण त्या गर्दीत एक सुटकेस घेऊन चढलो. हिच्या हातात पण एक सुटकेस होती. ही माझ्या पाठोपाठ चढेल असं वाटलं, पण हिला एका बाईने मागे सारल, गर्दी वर चढत राहिली आणि ही वेंधळी चढणाऱ्या गर्दीकडे पहात राहिली. सगळ्यात शेवटी ही बया चढली. आमच रिझर्वेशन मागच्या सीटच. जागा न मिळाल्याने बरेच लोक उभे होते. ह्या सर्व लोकांमधून वाट काढत, लोकांच्या त्रासिक, तिरस्काराच्या नजरा झेलत ही सीटपाशी आली. मी म्हणल, “ आधी नाही का चढायचं?”
तर म्हणाली, “ मला लोकांची धक्का बुक्की आवडत नाही. आणि रिझर्वेशन होतच ना!”
“पण आता भरलेल्या एस टीतून मागच्या सीट वर येताना ती झालीच ना!”
मग ही काहीच न बोलता गप्प बसली. मला वाटलं हिला उलट उत्तर देण नको असेल, म्हणून गप्प बसली असेल. हे चांगलच आहे ना! पण नंतर नंतर माझ्या लक्षात येत गेलं. हिला दुरुत्तर नाही तर लोकांना उत्तरच देता येत नाही. मग हिच्यावर अन्याय झाला तरी चालेल, ही गप्पच बसणार. आपलं ते खर करणाऱ्या, सासरच्या लोकांना पुरून उरणाऱ्या, न बोलून आपला मतलब साधणाऱ्या बायकाच माझ्या पाहण्यात होत्या. पण इथ मला वेगळीच काळजी लागली होती. आमच्या घरच्या बायकांनी जरा आवाज चढवला की हिची बोलतीच बंद व्हायची, घाबरून ही गप्पच बसायची, बायका त्यात माझी आईसुद्धा आपला मतलब साधून घ्यायची आणि वर पुन्हा बायकात कुचु कुचु बोलण व्हायचं, ‘ बोलत नाही आतल्या गाठीची आहे,’ हे ऐकूनही गप्प बसणाऱ्या बावळटीशी माझी गाठ पडली होती. मी तिच्या बरोबर असलो की माझ्या पुणेरी स्टाईल मध्ये लोकांना उत्तर द्यायचो. पण सगळ्या ठिकाणी मी थोडाच तिच्या बरोबर राहू शकणार होतो? त्यामुळे व्हायचं तेच होत गेलं, सगळे हिला, पर्यायाने मला लुटत गेले. मी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेत होतो. तिला तिच्या पगारात घरातले खर्च करायला लावायचो. कधी कधी फिस्कारायची, पण माझ्या डरकाळी पुढे नमत घ्यायची. तिच्या ऑफिस मध्ये असच चालायचं. ही ऑफिसच्या सगळ्या कामात एक्स्पर्ट, अमुक एक गोष्ट कशी करायची हे तिचे सहकारी तिला विचारायचे आणि गोड बोलून हिच्याकडून काम करवून घ्यायचे. काम झाल्यावर ही गोष्ट हिच्या लक्षात यायची. ऑफिस मध्ये ही कॉफी घ्यायची तर बाकी चहा घेणारे असायचे. आपल्या कॉफीला जास्त पैसे पडतात तेव्हा इतरांना जादाचा भुर्दंड का? म्हणून आपल्या कॉफीच्या पैशांबरोबर ही दहा जणांचे चहाचे पैसे देऊन मोकळी व्हायची. त्यातच कोणी तरी नाश्ता पण हाणायच आणि सगळ्यांचे पैसे ही बावळट सचोटीने देणार.(म्हणजे स्वत:च्या कॉफीच्या तिप्पट हो ) मला जेव्हा ही असे किस्से सांगयची तेव्हा खरोखरीच मला हिची चीड यायची., मी हिला चिडून म्हणायचो, “ अग बावळटे सगळ्यांचे पैसे देण्यापेक्षा स्वत:च्या कॉफीचे पैसे देऊन मोकळ व्हावं.” मग मला तत्वज्ञान शिकवायची, “ जाऊ दे सुवासिनींना चहा पाजल्याच पुण्य मिळेल.” मग तर माझा अजूनच संताप व्हायचा. मी म्हणायचो, “अग, ह्या तुझ्या ऑफिसच्या भवान्या, फुकट्या, त्यांना चहा –नाश्ता देऊन पुण्य जमा करण्यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत कर, किंवा कोणी अडचणीत असेल त्याला पैसे दे”. मग लगेच बारीक चेहरा करून गप्प बसायची., मग मलाच वाईट वाटायचं. संसारात बऱ्याच ठिकाणी हिचा देवभोळा स्वभाव नडत गेला. हिला बऱ्याच वेळा नाही नेहमीच असं वाटायचं, माणसांनी कृतीतून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.,बोलून दाखवू नये. नाही तर आपलं, ‘कोरडी माया उपाशी नीज ग बाया’ काय उपयोगाची? ही आपली प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची, किंवा बाहेरून प्रत्येकाच्या आवडीच घरात काहीतरी आणत रहायची. पण बोलायची काहीच नाही. माझ्या भावजया त्याच्या विरुद्ध करायच्या, म्हणायच्या, “ सासूबाई तुमच्यासाठी अमुक एक गोष्ट आणू का?, मामांजी थंडीच स्वेटर घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही बरका!” प्रत्येक्षात आईसाठी घरात घालायला स्लीपर किंवा बाबांसाठी स्वेटर हिने कधीच आणून ठेवलेला असायचा. पण बोलायचं नाही कधी ना! मग माझे आई- बाबा म्हणायचे, “ह्या पोरीं ना आमची भारी काळजी घेतात, अगदी जीव लावतात, पण तुझ्या बायकोच्या मनात कुणाविषयी कणभर सुद्धा प्रेम नाही हो!” एकदा तर रागामध्ये माझे बाबा हिला चक्क ‘दगड’ म्हणाले.वाईट मला सुद्धा पण हिची बाजू घेऊ शकलो नाही. ही नेहमीप्रमाणे मुसमुसत राहिली. सुरुवातीला मलाही तसच वाटायचं मग खरी गोष्ट उमजली. मग मी हिला म्हणायचो, “ अग मनात असो वा नसो प्रेमाने बोलत जा” मग ही फणकारत म्हणायची, “मी सगळ्यांसाठी सगळ करते, तुम्हाला दिसत नाही का?” मला तिला समजावून सांगाव लागायचं, “बाई ग माणसांना कृती फार उशीरा लक्षात येते. हे जग सध्या दिखाव्याचे झाले आहे, एखाद्या साठी काही केल नाही तरी चालत, पण गोड बोलेल माणूस लक्षात ठेवतो. गोड बोलणारा माणूस जास्त जवळचा वाटतो. मनात नसेना का पण ढोंग करता आल पाहिजे, ते आधी शिक, तुझ्या ढोर मेहनतीचा नाही तर काहीच उपयोग होणार नाही”. माझी बायको म्हणजे ग्रेट त्यावर अक्कल पाजळायची; म्हणायची,
“तो परमेश्वर बसला आहे वरती, सगळ्यांचे हिशोब ठेवत असतो. तुम्ही लोकांनी जरी माझ्या चांगल्या कृत्यांचा हिशेब ठेवला नाही तरी तो ठेवतो, तो माझ शेवटी चांगलच करेल”. हिला लोक फसवत रहायचे, हिला soft टार्गेट बनवून हिच्याशी वाईट वागायचे तरी ही म्हणणार , “ तो माझा परमेश्वर बसला आहे, तो बघून घेईल, कुणाला काय शिक्षा द्यायची ते, मला कुणाशी वाईट वागता येत नाही, भांडता तर त्याहून येत नाही.” तरी मी तिला समजावत असतो. “देव असा प्रत्येकाची लढाई लढण्यासाठी रिकामा बसलेला नाही. प्रत्येकाला स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागते. तो फक्त सारथ्य करत असतो., तू जशास तसं वागायला शिक, तुझ्याशी प्रतारणा करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत जाऊ नकोस. तुला स्वाभिमान आहे हे त्यांना पण कळू दे.” माझ्या ह्या उपदेशाच्या डोसा वर ती नुसतीच मान हलवते पण प्रत्यक्ष वेळ आली की ती शत्रूशी सुद्धा चांगली वागते. मला हा तिच्यातला चांगुलपणा तिचा दुबळेपणाच वाटतो.
एकदा अशी परिस्थिती आली, माझी तब्येत ठीक नव्हती. ऑफिसमधल्या सहकाऱ्याच्या अंत्यविधीसाठी जाणे मला शक्य नव्हते. कुणाचा फोन आला तर मी घरात नाही असं सांग असं हिला म्हणल, तर म्हणते, मला खोट बोलण जमणार नाही. मग मुलीने माझ काम केल. हिच्या नको तेव्हा सत्यवादी वागण्याचा मला रागच आला.दोन दिवस हिच्याशी अबोला धरला. पण हिच्या शिवाय सत ना गत करतो काय, झकत बोलायला सुरुवात केली.
घरात कुणी आजारी असल की, त्याला दवाखान्यात नेण, औषध आणणं, पथ्याच जेवण बनवण सगळ करणार पण मायेने कपाळावर हात ठेवून आता कसं वाटत आहे? हे बोलण तिला जमायचं नाही. हे काम माझ्या भावजयना बरोबर जमायचं आणि सर्वांच्या लेखी त्या मोठ्या व्हायच्या.. आणि ही रडत बसायची, “मी सगळ करून कुणाला माझी किंमत नाही म्हणायची. घरात सगळे तुमच्या भावजयशी मन मोकळ करतात त्यांना मोठेपणा देतात, त्यांना मोठेपणा मिळतो म्हणून मला वाईट वाटत असं नाही. पण मी कुठे कमी पडते? हे मला समजत नाही.” मी पुन्हा हिला तेच म्हणायचो, आधी नीट बोलायला शिक, कृती नंतर महत्वाची. आणि पुन्हा हसत हसत म्हणालो, ‘manegr never works, they manages all the things’ हिने चिडून मला चिमटा काढला.
माझी मुलगी सुद्धा हिला हातोहात उल्लू बनवत असते. लहानपणी हिच्या प्रत्येक गोष्टी ऐकणारी,हिला सोडून कुठलाही खाऊ न खाणारी, भातुकली मधला खाऊ सुद्धा आईला नेऊन देणारी आमची चिमु आता वस्ताद झाली आहे. स्वत:च्या वाटणीच खाऊन पुन्हा हिच्या वाटणीच पण लंपास करते. स्वत:चे नव्या fashion चे कपडे तर वापरतेच,पुन्हा हिने स्वत:साठी आणलेले ड्रेस आवडले तर तेही लंपास करून मोकळी होते. हिची कानातली, गळ्यातले सेट तुला नाही शोभत ममा असं म्हणते आणि लंपास करून मोकळी होते. आणि मी मध्ये पडलो तर हीच मातृ वात्सल्य लगेच उफाळून येत. लेकीची कड घेऊन म्हणते, “ जाऊदे पोर जिन्नस आहे, खाऊ दे , माझ्या पोटात्त थोडच त्याच सोन होणार आहे?, वापरू दे माझे ड्रेस, तिच आता नटण्या –मुरडण्याच वय आहे. वापरू दे माझे दागिने, मी थोडीच आता कानातली गळ्यातली बदलून मिरवत रहाणार आहे?” तिने असं म्हणल की माझी बोलतीच बंद होते. हेच मी हिला सांगत असतो, “माझ्या पुढे हजरजबाबीपणा दाखवण्यापेक्षा लोकांसमोर दाखवत जा. त्यांची बोलती बंद करायला शिक. स्वत:च्या हक्कासाठी भांडायला शिक.” की हीच पुन्हा तत्वज्ञान सुरु, “ हक्क कृतीतून मिळवायचा असतो, भांडून ओरबाडायचा नसतो.” ही तत्वज्ञानात गुरफणार ,तेवढ्यात माझ्या भावजया आणि बहिणी आई-वडिलांची मालमत्ता हडप करून बसायच्या. माझी बायको ही अशी बावळट म्हणून शेवटी मनात नसताना मला एकदा बायकांच्या भानगडीत पडाव लागलं. आई म्हणत होती, “अरे मी तुझ्या बायकोला विचारलं, “बाई ग तुला माझे कोणते दागिने हवे आहेत?, तर म्हणाली, सासूबाई मला काही नको आहे.” तेव्हा मीच म्हणल, “अग आई माझ्या बायकोला काही नको असेल पण तुझ्या नातीला तरी देशील ना!” माझ्या लेकीला जेव्हा कळल तेव्हा तिने मध्ये पडून आपल्याला हवे ते दागिने आजीकडून पदरात पाडून घेतले. वर पुन्हा आजीलाच सुनावून मोकळी झाली, “ कर्तव्य पार पाडायला आई आणि फायद्या साठी इतर का?”
हिच्या बरोबर बाजारहाट करण्यासाठी मी कधी जात नसतो. अशा कामांचा मला नेहमी कंटाळा. पण एक दिवस ही म्हणाली, “अहो, आपण बाहेर फिरायला जात आहोत तर जाताना तेवढ पाच मिनिट वाण्याकडे जाऊन येऊ, त्याने खूप खवट खोबर दिल आहे. ते परत करू.” मी बर म्हणल. वाण्याकडे आम्ही गेलो तर, वाण्याने गर्दी मध्ये आधी दहा मिनिटे हिच्याकडे लक्षच दिले नाही, मीच मग म्हणालो, “आम्ही पण तुमचेच गिऱ्हाईक आहोत, दहा मिनिटे ताटकळत उभे आहोत.” मग तो आमच्याकडे वळला, ही म्हणाली, “ तुमच्याकडून परवा खोबरे नेले ते खराब आहे हो, बदलून देणार?” हीच हे इतक्या साजुक भाषेतलं बोलण, त्यावर वाणी म्हणाला, “ भाभी सगळा असाच माल आहे.” मला राहवलं नाही, मी मध्ये पडलो आणि आवाज चढवून म्हणलो, “ तर मग आम्हाला नको आहे ते! आम्ही काही कवड्या मोजल्या नाहीत. परत घ्या हे”. वाणी चपापला, आतून लगेच दुसरे चांगले खोबरे घेऊन आला. आणि ही आळीपाळीने माझ्या आणि वाण्याच्या तोंडाकडे पहात राहिली. नंतर मी हिच्याशी रस्त्यात शांतपणे चर्चा करत चाललो होतो,म्हणालो, “असाच बावळट सारखा बाजारहाट करत राहातेस का ग?” तर तेव्हा हिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाली, “नाही हो!, मला बोलायला सुचत नाही असे नाही. पण मला भांडण आवडत नाही. मी घाबरते भांडणाला. मी लग्नाआधी ज्यांच्या कडे पेईग गेस्ट म्हणून रहात होते, त्यांच्या घरात सारखी भांडण असायची, कित्येक वेळा त्यांच्या भांडणाच्या पायात मी उपाशी राहिले आहे, घरात अन्न शिजायच नाही.त्या भांडणाचा शेवट घर डूबण्यात झाला. घरातली चांदीची भांडी,सोन-नाणं सगळ मोडीत निघालं. बँकेची जप्ती आली होती घरावर. म्हणूनच आपल्या घरात कोणी भांडणाचा सूर छेडला की मी गप्प बसते. कुणी तरी नमत घ्याव लागत तेव्हा भांड्यांचा खडखडाट थांबतो, नाहीतर तो घराबाहेर जायला वेळ लागत नाही.” मी म्हणालो, “हे जरी बरोबर असल तरी कायम गप्प बसण, माघार घेण म्हणजे आपला दुबळेपणा दाखवण होत. लोक आपल्याला चिरडत रहातात. लुबाडत रहातात. लोकांकडून फसवणुक करवून न घेण्या इतका धूर्तपणा आपल्यात नक्कीच हवा.” हिला माझं बोलण पटत होत, मग म्हणाली, अहो माझी मैत्रीण नीता पण मला हेच म्हणत होती, “ अग आता तुझ्या मुलीचं लग्न होईल, जावई येईल, अशीच गरीब रहाशील तर जावई आणि मुलीच्या सासरचे लुबाडत राहतील, आधीच तुझ्या सासरच्या लोकांनी तुला लुबाडून झालेच आहे.” मी म्हणालो, “तूच बघ, तुझ्या जवळच्या मैत्रिणी सांगतात तेव्हा तरी तुला पटत आहे ना?” हिने मान डोलावली खरी पण मनापासून नव्हती. म्हणाली,
“आपल्या चांगल्या वागण्याचा हिशेब परमेश्वराजवळ नक्कीच असतो. आपण लोकांना मुठीने दिल तर तो आपल्याला ओंजळीने देतो. आणि आपण चांगल वागून सुद्धा जे आपल्याला फसवतात ते नियतीकडून कधीतरी लुबाडले जातातच.” त्यावेळी मी हिला जास्त काही बोललो नाही. मला हिच्या चांगुलपणाची कीव आली, हिची दया आली, म्हणल, ‘परमेश्वरच तुझ कल्याण करो.’
आमच्या चिमुच लग्न ठरल म्हणजे तिनेच ठरवलं आम्ही त्याला नुसता होकार दिला. तर सांगायची गोष्ट म्हणजे मला वाटलं आता माझी खर्चाकडून चांगलीच धुलाई होणार. लेकीच्या सासरचे तर लुबाडणारच आणि त्याबरोबर घरचे पण हात धुवून घेणार. हिच्याकडून भारी भारी साड्या वसूल करणार. ही मोठ्या मनाने सगळ्यांना तथास्तु म्हणणार आणि पैठण्या घेऊन देणार. मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक आलेच पुन्हा. सगळ्यांना ही ओंजळ भरून देत राहणार. पुन्हा हौस मौज, जावयाच लेकीच कौतुक ह्यापायी आम्ही लुटले जाणार. म्हणल , ‘परमेश्वरा तूच आवर रे माझ्या बायकोला’
पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हिच्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक झाडून सगळे हिच्या मदतीला धावून आले तेही निरपेक्षपणे. कोणी हिच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही. उलट स्वत:च्या खिशाला वेळप्रसंगी झळ लावून घेऊन मदत केली. आख्खं रुखवत सगळ्या मैत्रिणीनी बनवून दिल. वाणी, दुधवाला न सांगता घरात हवी ती मदत करत होते. वाणी वाट पहायला न लावता घरपोच वाजवी दारात सामान आणून टाकत होता. सोसायटीचा रखवालदार सोसायटीचे लोक सारखं हिला विचारून येत जाता काम करून जात होते. साऱ्या सोसायटीची सजावट सगळ्या लोकांनी मिळून केली. लेकीच्या सासरच्यांनी तर फक्त नारळाची मागणी केली.लेक तर खुप इमोशनल झाली होती. म्हणाली, आयुष्यभर माझ्यासाठी खूप केल आईने आता माझ्यासाठी जास्त खर्च करू नका.आणि मला तिचा एकही दागिना नको आहे. तिनेही थोडक्यात खर्च आवरता घेतला. लग्नाचा खर्च माझ्या अपेक्षेच्या अर्धा झाला. तरिही लग्न धुमधडाक्यात पार पडलं. हिने आयुष्यभर सगळ्यांसाठी दिलेला मदतीचा हात वेळेला उपयोगी पडला. हिच्या परमेश्वराने आखेर हिच्या पदरात झुकत माप टाकल होत.
आता आमचं सगळ चांगल आहे. जावई आणि लेक परदेशात सुखात नांदत आहेत. मोठ्या पगाराच्या, मोठ्या हुद्द्याच्या पोस्ट वर आहेत. हिलाही चांगली पेन्शन आहे. २००० स्क़्वेर फिटच्या flat मध्ये रहात आहोत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदात व्यतीत करत आहोत.हिच्या म्हणण्याप्रमाणे हिला लुबाडणारे फारसे शांतीचे जीवन जगत नाही आहेत. कुठे तरी मनात सल घेऊनच जगत आहेत. असो , आता हिच्यातही बराच बदल झाला आहे. जास्त फसवली जात नाही. सावध असते. पण अहो मलाच बेमालूमपणे फसवत असते. आणि म्हणतात ना , मेरी बिल्ली मुझपर म्याव असं झालं आहे आता.
जयश्री देशकुलकर्णी
९४२३५६९१९९
तुमची कथा तर आवडलीच नाही,
कथा तर आवडलीच नाही, शिर्षकही पटलं नाही!
पण मला आश्चर्याचा सुखद धक्का
पण मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हिच्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक झाडून सगळे हिच्या मदतीला धावून आले तेही निरपेक्षपणे. कोणी हिच्याकडून काही अपेक्षा ठेवली नाही. उलट स्वत:च्या खिशाला वेळप्रसंगी झळ लावून घेऊन मदत केली. आख्खं रुखवत सगळ्या मैत्रिणीनी बनवून दिल. वाणी, दुधवाला न सांगता घरात हवी ती मदत करत होते. वाणी वाट पहायला न लावता घरपोच वाजवी दारात सामान आणून टाकत होता. सोसायटीचा रखवालदार सोसायटीचे लोक सारखं हिला विचारून येत जाता काम करून जात होते. साऱ्या सोसायटीची सजावट सगळ्या लोकांनी मिळून केली >>> हे नाही पटलं. जे लोकं पूर्वी कसे वागत होते लुबाडत होते. ते तसंच वागणार लुबाडणार. त्यांना किती दिली तरी कमीच असता. त्यांची हाव हाव काही संपत नाही. बाकी कथा म्हणून चांगली आहे पण एक कमावती बाई एवढी पण बावळट नसते हो. न कमावणाऱ्या पण चांगल्याच ढालगज असतात.
व्यक्तिचित्रणासाठी पैकी च्या
व्यक्तिचित्रणासाठी पैकी च्या पैकी मार्क्स. एकेका प्रसंगातून अनावश्यक गांधीगिरी पदोपदी जाणवत राहते.
कमालीचा शमळू स्वभाव असणारे एक काका शेजारीच राहायला होते, त्यांची आठवण झाली. मुलांना सुद्धा शिक्षा म्हणून क्वचित रागवायचे झाले, तरी त्यांच्या तोंडातून शब्द निघण्याआधी डोळ्यातून गंगा जमुना बाहेर पडत. आपल्या कमालीच्या शंतीप्रिय स्वभावाने भरवस्तीत त्यांच्याईतकी अवहेलना झेलणारा दुसरा कुणी पैदा झालाच नाही.
अख्खं आयुष्य तंगीत गेलं,पण त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट. कॅन्सरसारख्या आजाराचा विळखा पडला तेव्हा अख्या सोसायटीने मिळून त्यांच्या उपचारांचा खर्च केलेला.
बाकी यज्ञात बळी शेळ्यामेंढ्यांचाच जातो, वाघाचा नाही.
शिर्षक अजिबात आवडलं नाही....
शिर्षक अजिबात आवडलं नाही.... त्यामुळे कथा वाचलीच नाही.
" ती आई आहे, बायको आहे, बहिण किंवा मैत्रीण कोणीही असो पण ति एक स्त्री आहे ." कोणत्याही परिस्थितीत तिला बावळट म्हणण्याची हिंमत मला होणार नाही.
कथा म्हणून आवडली.
कथा म्हणून आवडली.
सुरुवातीच्या अपेक्षा वगैरे वाचून कथा किमान 30 वर्षांपूर्वीच्या काळात जन्मलेली असावी असं वाटतं.
" ती आई आहे, बायको आहे, बहिण
" ती आई आहे, बायको आहे, बहिण किंवा मैत्रीण कोणीही असो पण ति एक स्त्री आहे ." कोणत्याही परिस्थितीत तिला बावळट म्हणण्याची हिंमत मला होणार नाही >>
बावळट व्यक्तीला बावळट नाही म्हणायचं तर मग काय म्हणावे? केवळ स्त्री आहे म्हणून बावळट म्हणू नये असा कायदा झाला की काय?
विलभ, गोष्टीतल्या स्त्री ला
विलभ, गोष्टीतल्या स्त्री ला बावळट म्हणायचं, आणि इतकी वर्षे उघड्या डोळ्याने बघून तिने केल्याचं कौतुक न करता फक्त नावं ठेवणारा नवरा, सासू,फायदा घेणारी मुलगी यांना काय म्हणावं बरं?
काल्पनिक कथालेखक या सो कॉल्ड बावळट बाईकडून सर्व बेनिफिट घेऊन, कामं करवून घेऊन, कुठेही सपोर्ट न करता वर स्वतःला आयुष्यभर सहन करावं लागल्याप्रमाणे शहाजोगपणे कथा लिहितोय ☺️☺️
जगात इतका स्मार्ट असताना (कथेत तसं प्रोजेक्ट करत असताना) त्याला लग्नापूर्वी हे गुण कळले नाहीत म्हणजे याला महा बावळट म्हणायला हरकत नाही.
तुमच्यासारख्या pseudo
तुमच्यासारख्या pseudo फेमिनिस्ट वर मी लवकरच धागा काढणार आहे.
बाकी लेखिकेने मस्त लिहिले आहे व्यक्तिचित्रण। माझ्यातर्फे वीस पैकी वीस गुण।
अशी स्त्री मिळाली तर मुलांची रांग लागेल लग्न करायला। काहीच कटकट नाही। पण दुर्दैवाने अशा स्त्री फक्त कथेत असतात।
बापरे 'बावळट बायको' या
बापरे 'बावळट बायको' या शिर्षकाखाली बायकोचं चक्क कौतुक सुरू आहे.
बावळट पेक्षा सोशिक हा शब्द
बावळट पेक्षा सोशिक हा शब्द योग्य आहे .
आणि सर्वच जन कमजोर व्यक्तीचे शोषण करतात हे पण खरे नाही उलट अशा लोकांचा सन्मान च होतो .
छान
छान
काश अशी बायको मला मिळाली असती.....!
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद . ही कथा ३० वर्षापूर्वी लग्न झालेल्या बाईचीच आहे. अशीच माझी एक मैत्रीण आहे.
लोल.. जबरी आहे कथा. अशी बायको
लोल.. जबरी आहे कथा. अशी बायको प्रत्येकाला हवी हावीशीच वाटेल, हा हा.
. ही कथा ३० वर्षापूर्वी लग्न
. ही कथा ३० वर्षापूर्वी लग्न झालेल्या बाईचीच आहे. अशीच माझी एक मैत्रीण आहे.>>>> धन्य आहात __/\__
कथा शीर्षक अन कथेतील नायिकेचे character मध्ये मला तरी ताळमेळ जाणविला नाही अन त्यात तुम्ही लिहिलंय की तुमची अशी एक मैत्रीण आहे जिचे व्यक्ती चित्रण तुम्ही केलेय तर मला एक प्रश्न पडलाय की तुमच्या मैत्रिणीला माहीत आहे का की तुम्ही त्यांना बावळट समजता अन त्यांच्या वर किंवा त्यांच्या बावळटपणा वर तुम्ही हा लेख लिहिलाय
तुमच्या मैत्रिणीला माहीत आहे
तुमच्या मैत्रिणीला माहीत आहे का > जरी कसेतरी कळले तरी बावळट मैत्रीण काहीच करणार नाही. म्हणून यांनी बहुतेक लिहून टाकले असावे
"माझा बावळट नवरा" असा लेख
"माझा बावळट नवरा" असा लेख येऊदे आता. जास्त टी.आर.पी. मिळेल.
शिर्षकावरून दोस्तोवस्कीची The
शिर्षकावरून दोस्तोवस्कीची The Idiot आठवली.
त्यातला नायक कसा इतरांच्या दृष्टीकोनातून बावळट असला तरी ऍक्चुली त्याने त्याचा मार्ग जाणूनबुजून निवडला असतो आणि त्यावर अटळ राहतो. तशीच इथली नायिका असेल?
सोशिक (अलका कुबल) स्त्रीचे कौतुक करायचे आणि त्याच साच्यातल्या नवीन स्त्रिया (पुरुषसत्ताक व्यवस्थेतील कुटुंबपद्धत चालवणारी, टिकवून ठेवणारी) पिढ्यानपिढ्या बनवत रहायच्या कि त्यांना बावळट म्हणायचे आणि पुढची पिढी यांच्याकडून 'कसे असू नये' शिकेल ही अपेक्षा करायची?
===
>" ती आई आहे, बायको आहे, बहिण किंवा मैत्रीण कोणीही असो पण ति एक स्त्री आहे ." कोणत्याही परिस्थितीत तिला बावळट म्हणण्याची हिंमत मला होणार नाही. > ती नेहमीच कोणाचीतरी कोणीतरी असते. एक स्वतंत्र विचार, व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती कधीच नसते. म्हणूनच ती बावळट असेल?
> सुरुवातीच्या अपेक्षा वगैरे वाचून कथा किमान 30 वर्षांपूर्वीच्या काळात जन्मलेली असावी असं वाटतं. > अजूनही मुलांच्या याच अपेक्षा असतात हे प्रतिसाद वाचून कळलं असेल मग
> काल्पनिक कथालेखक या सो कॉल्ड बावळट बाईकडून सर्व बेनिफिट घेऊन, कामं करवून घेऊन, कुठेही सपोर्ट न करता वर स्वतःला आयुष्यभर सहन करावं लागल्याप्रमाणे शहाजोगपणे कथा लिहितोय
कथा शीर्षक अन कथेतील नायिकेचे character मध्ये मला तरी ताळमेळ जाणविला नाही > अविश्वसनीय निवेदक?
===
बाकी नायिका ज्या कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून रहात होती त्यांची कथा वाचायला आवडेल.
कथा शीर्षक अन कथेतील नायिकेचे
कथा शीर्षक अन कथेतील नायिकेचे character मध्ये मला तरी ताळमेळ जाणविला नाही > अविश्वसनीय निवेदक?
>>> ॲमी, तसे म्हणू शकता हवेतर. मला असे वाटले की भांडणांमुळे एक संसार उद्ध्वस्त झालेला तिने पाहिलाय, अन म्हणून तिने स्वतः हा स्वभाव म्हणा वा वृत्ती स्वीकारली आहे, मग त्यात गैर काय? तो तिचा मार्ग होता. अन असे निर्णय घेणारी व्यक्ती बावळट कशी??? उलट ती तिने घेतलेला निर्णय जगतेय ,अन हे जर तिच्या नवऱ्याला कळत नाही, तर खरा बावळट कोण?
तुमच्या मैत्रिणीला माहीत आहे का > जरी कसेतरी कळले तरी बावळट मैत्रीण काहीच करणार नाही. म्हणून यांनी बहुतेक लिहून टाकले असावे>>>> जर तिला कळले तरी ती काही करणार नाही, हा तिचा चांगुलपणा असेल, बावळटपणा नाही.
जर लेखिकेने अशी व्यक्ती खरेच आहे अन ती त्यांची मैत्रीण आहे असे लिहिले नसते तर मी इकडे प्रतिसाद देणारच नव्हते, कारण हल्ली माबोवर नकारात्मक प्रतिसाद स्पोर्टइंग्ली घेत नाहीयेत बरेच जण
हम्म.एखाद्या प्रिय मित्र
हम्म.एखाद्या प्रिय मित्र/मैत्रिणीने व्यक्तिचित्र लिहायला मला वापरलेलं मला तरी आवडणार नाही.(याच कारणासाठी मुक्तपीठ वर 'माझ्या अमक्या मैत्रिणीच्या सुना कश्या वाईट/तिचा घर सांभाळायचा दृष्टिकोन कसा वाईट' या सुरात लिहिलेले लेख मला आवडत नाहीत.परिचिताच्या घरातल्या खाजगी बाबी जज करून त्यावर स्वतः प्रसिद्धी मिळवण्यासाठी लिहिण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला?)किमान इथे आपण असं समजू की लेख पब्लिश करण्या पूर्वी मैत्रीणिला दाखवला असेल किंवा तिच्यातलं अगदी 10% घेऊन बाकी काल्पनिक असेल.
अजून एक सांगावेसे वाटते की
अजून एक सांगावेसे वाटते की माझ्या मते कधीच कोणी बावळट वा मूर्ख नसते. काही साधे असतात तर काही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही , घाबरतात पण याचा अर्थ लोकं आपापल्या सोयीनुसार लावतात. पण त्यांनाही त्रास होतो.
अन हो स्त्रिया तर बिलकुल बावळट नसतात, वेळ आली तर कठीणतील कठीण निर्णय घेऊन ते अमलात आणने जितके स्त्रियांना जमते तितके पुरुषांना नाही असे माझे मत आहे.
माझी एक मैत्रीण आहे अशी, मी तिला सांगत असते की बाई ग जे नाही पटत त्याला नको/नाही बोलायला शिक, लोकांना समजू दे तुझ्या भावना. त्यांना कळू दे की दरवेळी तुला ग्रांटेड घेणे चुकीचे आहे. पण तिचे लहानपण खूप त्रासात गेलेय, सो घाबरते ती. पण म्हणून ती काही मूर्ख नाही, परिस्थिती ला हतबल आहे. पण लकिली तिचा नवरा समंजस आहे. अन त्याच्यामुळे हळूहळू तिचा कॉन्फिडन्स देखील वाढतोय.
असो, माझेच प्रतिसाद जास्त झाले इकडे, सो थांबते आता☺️
जून एक सांगावेसे वाटते की
जून एक सांगावेसे वाटते की माझ्या मते कधीच कोणी बावळट वा मूर्ख नसते. काही साधे असतात तर काही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही , घाबरतात पण याचा अर्थ लोकं आपापल्या सोयीनुसार लावतात. >>>>> VB, प्रतिसाद आवडला,पटला.बरीच माणसे असतात अशी.त्यांना बावळट म्हणणे पटत नाही.
अप्रतिम लेखन . पुढील
अप्रतिम लेखन . पुढील कथेच्या आतुरतेने प्रतीक्षेत.
-----------------------------------------------------------------------
हा आटोरिप्लाय आहे.
VB प्रतिसाद आवडला. बरेचसे
VB प्रतिसाद आवडला. बरेचसे मुद्दे पटले.
@ॲमी - ती नेहमीच कोणाचीतरी कोणीतरी असते. एक स्वतंत्र विचार, व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती कधीच नसते. म्हणूनच ती बावळट असेल? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ॲमी, दंडवत घे. कमीत कमी शब्दात खूप जास्त मांडलंय.
अगदी हेच लिहायला आलो होतो.स्त्रीचं गौरवगीत गाताना ती जननी, ती माता, ती बहीण, ती पत्नी असे उल्लेख वाचतोच आपण. तिने मुले जन्माला घातली, कुणा भावाला राखी बांधायला ती बहीण झाली, कुणा पुरुषासाठी ती पत्नी झाली, एवढंच तीच अस्तित्व असावं?
आणि हो, तीस वर्षांनंतरही याच अपेक्षा आहेत. सार्वत्रिकीकरण करत नाहीये, पण गोड़ गोजिरी, लाज लाजरी हीच अजूनही बऱ्याच मुलांची अपेक्षा असते. अजूनही कंपनीमध्ये मशीनवर काम करणाऱ्या, क्वालिटीवर काम करणाऱ्या मुली जास्त करून मुलांना आवडत नाहीत. नाजूक साजूकच हवी.
छान आहे व्यक्तीचित्रण.
छान आहे व्यक्तीचित्रण.
असे लोक पाहिलेत. कायम नमतं घेणारे. जाउदे जाउदे करणारे.
आणि खरं तर ढालगज लुबाडणारे लोक त्यांना बावळटच म्हणतात.
कथेतील बायको बावळट नाही हो
त्या बायकोच्या वागण्यात कुठेच बावळटपणा नाही जाणवला. बाकीचे लोक मात्र तिचा उपयोग करून घेतात त्यामुळे ते चलाख वाटले.
कथेतील बायको बावळट नाही हो सोशिक वाटते, आणि असतात असे लोक जे घडघडीत बोलण्यापेक्षा शांत राहणे पसंत करतात ज्याने शांतता नांदावी.
कथेचा टायटल बदला प्लीज. अश्या
कथेचा टायटल बदला प्लीज. अश्या बायका असतात आणि आहेत आज पण.
लेखिकेची कथा आहे. तिला शीर्षक
लेखिकेची कथा आहे. तिला शीर्षक वाटलं ते तिने दिलंय. जशी पात्र रंगवावी वाटली तशी रंअग्वलीयेत.
तर स्त्रीला बावळट म्हणू नका, शीर्षक बदला, तुम्हीच तिला बावळट समजता की काय वैगेरे प्रतिसाद धागा कुठे घेउन जाणार आहेत ते बघा.
कथेला कथा म्हणुन बघणं कधी जमणार आहे आपल्याला?
तरी बरं की कथा एका स्त्री ने लिहिली आहे. पुरुष लेखक असता तर हा लेखक स्वतःच्याच बायकोला बावळट म्हणतोय म्हणून तुटुन पडले असते सगळे.
कथेला कथा म्हणुन बघणं कधी
कथेला कथा म्हणुन बघणं कधी जमणार आहे आपल्याला?
>>> सस्मित, अहो आधी फक्त एक कथा म्हणून बघितली, अन नाही आवडली तर कशाला उगा नकारात्मक प्रतिसाद म्हणून काही लिहिले नव्हते, पण जेव्हा लेखिका बोलली की कथा खरी आहे अन तिची एक अशी मैत्रीण आहे, तेव्हाच इतके सारे लिहिलेय मी, नाहीतर दुर्लक्ष च केले होते
तरी बरं की कथा एका स्त्री ने
तरी बरं की कथा एका स्त्री ने लिहिली आहे. पुरुष लेखक असता तर हा लेखक स्वतःच्याच बायकोला बावळट म्हणतोय म्हणून तुटुन पडले असते सगळे.+१११
कथेला कथा म्हणुन बघणं कधी जमणार आहे आपल्याला? +++infinite
कथा खरी आहे अन तिची एक अशी
कथा खरी आहे अन तिची एक अशी मैत्रीण आहे>>>>>>>>>>>> असेल की मग.
तरीही ही लेखिकेने तिच्या नजरेतुन लिहिलेली कथा आहे.
तिला, तिच्या कथेतल्या पात्राला दुसरं पात्रं बावळट वेडगळ वाटुच शकतं.
आणि कुणी कुणाला बावळट म्हणायचं समजायचं हे त्या त्या व्यक्तीवर आहे की.
मी माझ्या वरच्या प्रतिसादात लिहिलंय की,
असे लोक पाहिलेत. कायम नमतं घेणारे. जाउदे जाउदे करणारे.
आणि खरं तर ढालगज लुबाडणारे लोक त्यांना बावळटच म्हणतात.
तुम्ही आयुष्यात कुणाला, बावळट आहे, सरबरीत आहे असं म्हणत असालच की. मग का आंजावर फक्त गुडीगुडी वागुन/ लिहुन दुसर्याचा निषेध करायचा.
Pages