चान्स मिळाला रे मिळाला की अभिनय!

Submitted by स्वीट टॉकर on 17 April, 2019 - 06:31

होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात.

एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली. तेव्हां त्यांनी मला सांगितलं, "आधी घेऊ शकत नाही, पण तुम्ही परत आल्यावर फोन करा. नंतर घेऊ."

आल्यावर असं कळलं की तीच कंपनी दिग्दर्शनाचे, सिनेमॅटोग्राफीचे आणि अभिनयाचे वर्ग सुरू करणार होते आणि आपल्या कडे असलेलं infrastructure सर्वांना दाखवण्यासाठी दोन आठवड्यांनी एका रविवारी सकाळी एक प्रेझेंटेशन देणार होते. निश्शुल्क. प्रेझेंटेशन संपलं की माझी ऑडिशन घ्यायचं ठरलं.

पूर्वग्रह म्हणा किंवा शंकेखोर म्हणा, 'नि:श्शुल्क' म्हटलं की माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतेच!

पोहोचल्यावर लक्षात आलं की तीन मजली पूर्ण इमारतच या कंपनीच्या मालकीची आहे. पॉश नसेल, पण स्वच्छ होती, नवी होती, आणि पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी अशी बिल्डिंग असणं काही खायचं काम नाही. चुकचुकणारी पाल चुप बसली.

रिसेप्शनिस्टनी फॉर्म भरून घेतला आणि दुसर्‍या मजल्यावरच्या वर्गात जाऊन बसायला सांगितलं. मी वर्गाच्या दरवाज्यामधून आत पाऊल ठेवलं मात्र, आत बसलेल्या पंधराएक विद्यार्थ्यांनी उठण्यासाठी खुर्च्या मागे ढकलल्या!

वीसची कपॅसिटी असलेल्या वर्गात साधारण दहा मुलगे आणि पाच मुली अशी पंधरा डोकी होती. वय वर्षे वीस ते तीस. मला पाहून त्यांना वाटलं असणार शिक्षकच आले!

ते बघून मला एक आयडिया सुचली!

मीच शिक्षक असल्याच्या आविर्भावात टेबलापाशी उभा राहिलो. गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर म्हटलं, "एक बातमी आहे. काय असेल?"

एकच कल्ला झाला! "ऑडिशनचा रिसल्ट लागला असेल!" दोन आठवड्यांपूर्वी हेच सगळे ऑडिशनसाठी आले होते. होतकरू अभिनेत्यांच्या जगतात बातमी म्हटलं की ती एकच असू शकते!

"इतकी चांगली बातमी नाहिये." थोडा पॉज घेऊन सगळ्यांकडे नजर फिरवत, "आजचा प्रोग्रॅम काही अपरिहार्य कारणास्तव आम्हाला कॅन्सल करावा लागतोय." मी.

प्रत्येकाची / प्रत्येकीची रिअ‍ॅक्शन थोडी वेगवेगळी होती, पण ती साधारण कशी असेल ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल!

"पण का?", "आधी नाही का सांगायचं?", "तुम्ही तर आला आहात, तुम्हीच द्या प्रेझेंटेशन." वगैरे वगैरे.

"तुम्हाला कारण सांगून काही फरक पडणार आहे का? जर आम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकत असतो तर आम्ही इतक्या मेहनतीनी आणि खर्चानी प्लॅन केलेलं प्रेझेंटेशन रद्द करू का?" मी.

मुली पहिल्या ओळीत बसल्या होत्या. त्यातली एक काकुळतीला आली होती! "सर, मी शिरूरहून आलिये, आमच्या घरी कोणालाही अ‍ॅक्टिंग करणं पसंत नाही. किती मुश्किलीनी मी आलिये! आणि आता हे?" बिचारीचे अश्रू अगदी पडण्याच्या बेतात होते!

"मला वाईट तर वाटतंच आहे बेटी, तुझं कौतुकही वाटतंय. पण काही गोष्टींना नाइलाजच असतो. ते कोणाच्याच हातांत नसतं."

दोनचार मिनिटं असा वाद चालला. रद्द केल्याबद्दल मला फारसं वाईट वाटंत नाहिये हे लक्षात आल्यावर मुलांच्या आवाजाला धार आली!

"कॅन्सल करण्याचं कधी ठरलं?" एका मुलानी रागारागांत विचारलं.

"ही आत्ता दहा मिनिटं झाली असतील." मी फारसा विचार न करता उत्तर दिलं.

"शक्यच नाही. मी पाच मिनिटापूर्वी आलो. रिसेप्शनिस्टनी मला वर यायला सांगितलं."

मी मनातल्या मनात जीभ चावली. माझा निष्काळजीपणा झाला होता. आता त्याला काय उत्तर द्यावं अशा विचारात असतानाच दरवाजातून एक हेल्पर टाइपचा मुलगा आत आला. त्याच्या हातात एक ट्रे होता. त्यावर कॉफीची किटली आणि बरेचसे डिस्पोसेबल पेले होते.

माझ्या हाती कोलीत मिळालं. मीही माझा आवाज चढवला, "हे बघ, एक तर हे प्रेझेंटेशन फुकट आहे. वर रिफ्रेशमेन्ट्स देखील आम्ही देतोय. त्यामुळे आवाज वाढवायचं काम नाही. कळलं?"

आता मात्र त्याची सटकली.

"मी सरांनाच भेटतो. हे कोण लागून गेले? आम्हाला काय भीक लागलिये काय? म्हणे रिफ्रेशमेन्ट्स देतोय." असं म्हणंत दाणदाण पाय आपटत तो बाहेर गेला.

तो बाहेर गेल्याबरोबर मी अनाउन्स केलं. "आता खरं काय तो ऐका. मी काही सर नाही. तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे आणि प्रेझेंटेशन कॅन्सल वगैरे झालेलं नाही. मी सगळ्यांची भंकस केली!"

एकदम गलका झाला! "काय टेन्शन दिलंत राव!", "च्यायला. आम्हाला खरंच वाटलं" एकंदर चांगलाच हशा झाला. त्या रडवेल्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून माझी अपराधीपणाची भावनाही नाहिशी झाली.

मी दोन्ही हातांनी थांबायची खूण केली. "खरी मजा पुढेच आहे. आपण सगळे अ‍ॅक्टर बनायला आलोय. आता खरी अ‍ॅक्टिंग करायची. आता तो आणि सर आले की सगळ्यांनी म्हणायचं की असं काही झालंच नाही! ओके?

शेवटी सरांना खरं तर आपण सांगणारच आहोत. पण तोपर्यंत जी मजा करायची त्यात चांगली अ‍ॅक्टिंग करून सरांना impress करायचं आहे. लक्षात ठेवा, अजून ऑडिशनचा निकाल लागायचा आहे!"

सगळेच तिशीच्या आतले. मला वाटलं होतं की उत्साहानी सगळे सामील होतील. पण तसं काही झालं नाही. एकमेकाकडे द्विधा मनस्थितीत बघू लागले.

मात्र शिरूरच्या मुलीला आयडिया एकदम पसंत पडली!

"अरे घाबरताय काय? करूया ना!" ती.

एखाद्या मुलीनी "घाबरताय काय?" असं विचारणं म्हणजे मुलांना टेस्टोस्टरोनचं इंजेक्शन दिल्यासारखंच असतं! माना डोलल्या.

अपेक्षेप्रमाणे काही मिनिटांतच तो मुलगा, त्याच्यामागोमाग थोडेसे चिडलेले सर आणि रिसेप्शनिस्ट असे वर्गात शिरले.

मी विद्यार्थ्यांमध्ये बसलेला पाहून तो मुलगा क्षणभर गोंधळला पण लगेच सावरला.

" ह्यांनी सांगितलं." माझ्याकडे बोट दाखवून.

"काय सांगितलं?" मी. चेहर्‍यावर शक्य तितकं आश्चर्य!

"कॅन्सल झालं म्हणलात ना!" तो.

"आँ? कोण? मी? Are you crazy? मी असं कशाला सांगीन?" चमकून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागलो! हा असे काय वाटेल ते आरोप करतोय असा आविर्भाव!

"अरे सांग ना सरांना हे काय बोलले ते!" हे त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला उद्देशून.

"काय बोलले ते?" तो पण साळसूद.

"तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना? अरे मग बो-ला-की!" हे जोरात सगळ्यांना उद्देशून. सगळे निर्विकार.

त्या मुलाला कळे ना काय करावं ते. मुलगे खोटं बोलतात सर्रास. पण मुली नाहीत. तो शिरूरच्या मुलीकडे वळला.

"तू तरी खरं सांग की!"

"खरं म्हणजे? बाकीचे काय खोटं बोलतायत?" ती.

आता मात्र त्याचं सगळं अवसानच गळालं. त्याचा आवाज त्या मुलीहून केविलवाणा झाला! "शप्पथ सर, इथे - - - इथे उभं राहून त्यांनी सांगितलं! सगळे खोटं बोलतायत. आई शप्पथ!”

त्याचा क्षीण आवाज ऐकून मात्र माझ्यासकट कोणालाच कंट्रोल करता येई ना! हास्यस्फोट झाला!

काय झालं ह्याची कल्पना येऊन सरही हसायला लागले. मी उठून त्या मुलाकडे गेलो, त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटलं, "सॉरी बॉस. पण तुला खरं वाटलं की नाही?"

मात्र त्यानी झालेला विनोद अजिबात appreciate केला नाही. माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून आपल्या जागेवर जाऊन बसला.

कायकाय झालं हे मी सरांना सांगितलं. वर्ग शांत व्हायला मिनिटभर लागलं. मग सरांनी आणि त्यांच्या असिस्टंटनी प्रेझेंटेशन द्यायला सुरवात केली. तीन तासांचं उत्तम प्रेझेंटेशन झालं.

संपल्यावर मी सरांना माझ्या ऑडिशनबद्दल विचारलं. "आता जरूरच काय ऑडिशनची?" ते म्हणाले, "मी तुमचं अ‍ॅक्टिंग बघितलं आणि कॉन्फिडन्सही. तुमचं शो रील मला पाठवून द्या. तुमच्या योग्य रोल असला की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो."

वयानी मोठा म्हणून लहानांना फसवण्याची मुभा मी घेतलीच होती. भरपाई करणं ही योग्यच होतं. खाली गेल्यावर सगळ्यांना उसाचा रस पाजला, झाल्या प्रसंगावर पुन्हा सगळे हसलो, आणि पांगलो.

रोल मिळेल अथवा नाही. मात्र अर्धा दिवस मजेत गेला आणि होतकरूंच्या आणखी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मी सामील झालो एवढं खरं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किस्सा छान आहे. पण घडलेल्या प्रसंगामुळे त्या मुलाला नक्कीच आपली फजिती झाल्यामुळे खजील झाल्यासारखे वाटले असेल. त्यामुळे प्रेझेंटेशन संपल्यावर त्या मुलाची प्रतिक्रिया काय होती ते वाचायला आवडले असते.

हाहाहा! भारीच!
तुम्हाला अशा गमती करायला आवडतात असं दिसतंय. तुम्ही मागे एका लेखात अजून एक गंमत लिहिली होतीत. घरी आलेल्या एका पाहुण्या बाईंना टेबलावरचा तुमचा आणि पत्नीचा तरुणपणातला फोटो हा तुमच्या मुलाचा आणि सुनेचा वाटला आणि तुम्हीही खोटं न बोलता तो गैरसमज फुगवत फुगवत नेलीत. मस्त होता तोपण किस्सा!!

मस्त! छान लिहीलय. वाचताना खरच मजा आली. अनेक वर्षांपूर्वी इंजिनीयरिंग कॉलेज मधे लॅब बाहेर उभ्या असणार्या मुलांना जाऊन, 'आज सर येणार नाहीयेत, प्रॅक्टीकल कॅन्सल झालय' असं सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली. अर्थात बरीचशी मुलं नाराज वगैरे काही न होता, खूश झाली होती. आणी त्या घोळक्यात उभं राहून, उरलेल्या मुलांना 'अरे हो, मला स्वतः सरांनीच निरोप देऊन पाठवलय' वगैरे कन्विन्सिंग चालू असताना, वळून न बघता ज्या मुलाच्या गळ्यात हात घातला ते लॅब घेणारे सर च निघाले. ओशाळवाणं हसून, 'सर, गंमत केली' वगैरे माफी मागितली होती.

बापरे फारच घाबरवलांत हां मुलांना.
तुम्ही याबद्दल त्यांना लंच ट्रीट द्यायला हवी असं मी त्या मुलांना सांगणार आहे ☺️☺️☺️

किल्ली, नरेश, अन्जली, वावे, नमोकर, स्वदेशी, मंजूताई, फेरफटका, देवकी आणि मी_अनु,
धन्यवाद !
नरेश माने - सांगतो.
तो मुलगा त्या क्षणी जरी वैतागला असला तरी थोड्याच वेळात पूर्णपणे शांत झाला. मी लिहिल्याप्रमाणे सगळ्यांना रस पाजला तेव्हां त्यानी त्याचं आणि सरांचं रिसेप्शनमध्ये कसं मजेशीर बोलणं झालं त्याचं वर्णन केलं. ('मजेशीर' म्हणायचं कारण असं की सरांनाही त्यानी सांगितलेलं पटत नव्हतं. मग रिसेप्शनिस्टनी सुचवलं की एखादेवेळेस आपला कॉम्पिटिटर तर काड्या करंत नसेल? हे प्रकरण भलत्याच दिशेला जाण्याची शक्यता दिसू लागल्यावर सर तडक वर आले!) एकंदर काय, तर शेवटी सगळ्यांनी मजा घेतली. त्या मुलासकट!

वावे - अच्छा! तुम्हाला तो लेख आठवतोय! मात्र तेव्हांची परिस्थिती प्रचंड चॅलेंजिंग होती! कारण एकही शब्द खोटं बोलायचं नव्हतं. मी लिहिल्याप्रमाणे ते खरोखरंच ब्लिट्झ्क्रीग बुद्धिबळच होतं!
त्या मानानी ह्या वेळचं अगदी सोपं.

फेरफटका- Wink

मी -अनु - आतापुरता रस. पुढचा पिक्चर मिळाला की लंच!

भारीच Happy
शीर्षकासकट आवडलं !
खूप शुभेच्छा...

हे असं प्रॅन्क वगैरे मला स्वतःला आवडत नाही पण तिथले सगळेजण ओके होते म्हणजे ठिकचय Lol
ॲमी +१११११११

अॅमी +1.
आणि अंत भला तो सब भला.

सगळ्यांन, खासकरुन त्या सरांनी वैगेरे मजेत घेतलं म्हणुन ठीक आहे नाहीतर तुम्ही केलंत ते मला तरी पट्लं नसतं. पट्लं नाही.
अनोळखी माणसांच्या फजित्या केलेल्या आवडत नाहीत.
अ‍ॅमी + १

सर्वजण,
धन्यवाद. तुमच्यापैकी बर्याच जणांना चेष्टा पसंत पडली नाही त्यांच्या मताचा मी आदर करतो.
दहापैकी नऊ जणांना विनोद आवडतात. फायनल हिशोब नफ्यात असतो.

फायनल हिशोब नफ्यात असतो.>> हिशोब. त्या १% लोकाण्ना मनस्ताप दिला त्याची व्ह्लॅल्यु पण आहे साहेब. प्लीज काइंडली कन्सिडर नेक्स्ट टाइम.