उपमा

Submitted by सायो on 3 April, 2009 - 14:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी खमंग भाजलेला रवा, अर्धा मिडीयम साईझ कांदा, १ टोमॅटो, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, १,२ सुक्या लाल मिरच्या,भिजत घातलेली हरभर्‍याची/चण्याची डाळ १ टेस्पून, कढीपत्त्याची पानं साधारण ८,१०, आलं किसून- १ टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, ओलं खोबरं- अर्धी वाटी, १,२ टी.स्पून तूप, फोडणीचं साहित्य.

क्रमवार पाककृती: 

रवा बारीक गॅसवर किंचित तूप घालून खमंग भाजून घ्यावा. नॉनस्टीक पातेल्यात तेलाची मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, चणा डाळ ह्यांची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात टोमॅटो व आलं घालून पुन्हा परतावं व जरा पाणी सुटू द्यावं. हे करत असातानाच एकीकडे पाणी उकळत ठेवावं. पाण्याला उकळी आली की त्यातलं दोन वाट्या पाणी काढून घेऊन ह्या फोडणीत घालावं. थोडं तूप, मीठ घालून ढवळून घ्यावं. ह्यात थोडी कोथिंबीरही घालावी. व उकळी आल्यावर भाजलेला रवा एका हाताने गुठळी होणार नाही ह्याची काळजी घेत पेरत घालावा. सगळं मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यावं व गॅस बारीक करुन झाकण घालून वाफ काढावी. वाढताना ओलं खोबरं, कोथिंबीर,लिंबू, बारीक शेव घालून द्यावा.

वाढणी/प्रमाण: 
२,३ जणांना
माहितीचा स्रोत: 
पन्नाने केलेला जास्त आवडल्यामुळे ह्याच पद्धतीने नेहमी केला जातो.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकीकडे फोडणीचं पाणी, दुसर्‍या भांड्यात दूध, साखर पाणी. एकाच वेळी घाऊक भावात रवा भाजून वाटीभर इकडे वाटीभर तिकडे. उपमा आणि शिरा एकाच टायमाला. Happy
मस्त पाकृ.

सायो धन्यवाद इतक्या तत्परतेने पाककृती टाकल्याबद्दल.

आपण करत नाही कधी, पण उपमा आणि शिरा एकत्र खायला छान लागतो. एक चमचा हा एक चमचा तो.
सिटीलाइट चौकातल्या, शोभा होटेलात असा एकत्र मिळतो.

बंगलोरला IIScच्या कँटीनमधे पण मिळतो उपमा आणि शिरा एकाच प्लेटमधे. त्याला चौ-चौ भात म्हणतात. Happy
एक चौ चौ भात, एक इडली वडा आणि एक कडक 'काफी'. तरी लॅब मधे येऊन झोपा. काय दिवस होते. Happy

उपम्याच्या फोडणीमधे उडदाची डाळ चमचाभर टाकावी. मात्र ही डाळ चांगली खमंग होइपर्यंत तळावी लागते मग फोडणीचं इतर साहित्य घालायचं.

शिवाय पाणी उकळत असताना मी त्यामधे थोडं ताक अथवा दही पण घालते. टोमॅटो न घालता छान आंबट चव येते त्यामुळे.