नातीगोती - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 14 April, 2019 - 15:34

नातीगोती - भाग २

तब्बल दोन वर्षांनंतर हा भाग टाकतोय, माफी असावी.

भाग १ -https://www.maayboli.com/node/63469

'माऊ असं नाही म्हणायचं ग. काहीवेळा आपलीच जीभ आपल्याला तथास्तु म्हणते. आणि त्या व्यक्तीशी नाही बोलता येत कधीच आयुष्यात!'
एवढंच वाक्य माझ्या डोक्यात भुणभुण करत होतं. एवढंच वाक्य!
पप्पाचा अंत्यविधी सुरू होता, मम्मा, सगळ्यांशी व्यवस्थित बोलत होती.
'काहीच कसं वाटत नसेल हिला. डोळ्यात पाण्याचा एक थेंब नाही. असं कसं सगळं कोरडं आणि रुक्ष? नाही आवडत मला हे मम्मा.'
"मम्मा!" मी ओरडले.
मम्मा शॉक झाली, आणि पटकन माझ्याजवळ येऊन म्हणाली.
"सायली, इतकं मोठ्याने ओरडतेस? घरात काय झालंय कळतंय का?"
"तुला कळतंय का? माझा बाबा गेलाय, तुझा नवरा वारलाय, कळतंय का? माझा बाबा मला कधीच दिसणार नाहीये... माझा बाबा माझ्याशी कधीच बोलणार नाहीये, कळतंय का? माझा बाबा मला माऊ म्हणून हाक मारणार नाहीये, कळतंय का? जरातरी दया दाखव ना त्याच्यावर. आजतरी जरा त्याच्याविषयी काही वाटू दे. गेलाय तो... नाही आता येणार परत... निदान आजतरी..."
मी ऑक्सबोक्शी रडत होते. मला नव्हतं आवरायचं आज स्वतःला!
"बाई, नको रडू एवढं. तुझ्या बाबाचा तुझ्यावर खूप जीव होता. खूप. घरीही आला ना, तर फक्त तुझ्याविषयीच बोलायचा. तुझं लहानपण नाही बघता आलं आम्हाला. एकुलती एक नात आमची, नाही खेळवता आलं ग, पण तो कुठेही असू दे, नक्की तुझ्याकडेच बघत असेन."
पूर्णा आजी, बाबाची काकू! बाबाचे आई वडील दोन तीन वर्षापूर्वी वारले होते. तसंही बाबाच्या बाजूच्या नातेवाईकांमध्ये मला कधीही जास्त मिसळण्याची संधी मिळाली नव्हती. महाराष्ट्रात कुठल्यातरी गावात त्याचे बरेचशे नातेवाईक होते. मी कधीही त्यांच्याकडे गेले नव्हते. बाबा वर्षातून जायचा एकदा त्यांच्याकडे. तोही एकटा... पंधरा वीस दिवस राहून परत यायचा.
नाही म्हणायला शेवटी दोन तीन वर्ष आजी आजोबा राहिले होते आमच्याकडे. खूप धमाल यायची आजी आजोबांसोबत.
आजही बाबाचे दहा बारा नातेवाईक होते. मम्माकडून मात्र पन्नास साठ मंडळी आली होती. त्यातली वीस-पंचवीस मंडळी तर इथलीच होती.
"महेश, बाबा तुलाच करावं लागेल सगळं." पूर्णाआजी म्हणाली.
महेश, बाबाचा पुतण्या. गजानन काकाचा लहान मुलगा.
"सायली, बाबाला न्यावं लागेल बाई आता. दर्शन घे."
मी बाबासमोर आले, बाबा तसाच होता, शांत. असं वाटलं, कधीही झोपेतून उठून बसेल.
"ये बाबा, उठ ना, मी कधीही बोलणं सोडणार नाही तुझ्याशी. तुझं मी सगळं ऐकेन, तुझी माऊ आहे ना मी."
माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. हळूहळू डोळ्यासमोरच सगळं चित्र अस्पष्ट झालं, आणि मी केव्हा बेशुद्ध झाले, मलाच कळलं नाही.
----------------------------------------------------
दिवसेंदिवस मी एकटी होत चालले. मम्माने स्वतःच्या बिजनेस मध्ये झोकून घेतलं. सकाळी लवकर घराबाहेर पडायची, आणि रात्री केव्हा घरी परतायची नेम नसायचा.
माझंही कॉलेजमद्धे मन रमत नव्हतं. बाबा कॉलेजमध्ये कमिटीवर होता, म्हणून सगळ्यांना माहिती होता. बऱ्याच देणग्या दिल्या होत्या त्याने कॉलेजला.
सगळे वाईट झालं, वाईट झालं म्हणत होते. पण कुणाच आयुष्य काही अडलं नव्हतं. फक्त माझं आयुष्य अडकून पडलं होतं बाबाच्या आठवणीत!
दरवर्षी आमच्या कॉलेजच्या कल्चरल फेस्टिवलमध्ये मी व्हायोलिन वाजवायचे. आता मात्र मला त्यात काडीचाही रस राहिला नव्हता. टिचर्सने खूप समजावल...
...पण बाबा नव्हता म्हणून काहीही नव्हतं माझ्यासाठी तरी!
एके दिवशी रात्री हॉलमध्ये आम्ही दोन्हीच जेवायला बसलो होतो.
"सायली." मम्माच्या आवाजाने मी भानावर आले.
"तू नीट काही खात नाहीयेस कधीची. आजारी पडलीस तर कसं चालेल? सायली, मला वेळ नसतो आता ऑफिसमधून. मोहन गेल्यापासून सगळं एकटीवर भार आलाय. कळतंय ना? तू आजारी पडलीस तर कोण लक्ष ठेवेन?"
"इनफ मम्मा," माझा बांध तुटला, "बस झालंय आता. बाबा गेला म्हणजे काही चूक नाही केली त्याने. ना कधी त्याच्याशी धड बोललीस, आणि कमीत कमी तो गेल्यावर तरी नीट बोल ना, माझ्याशी आणि त्याच्याविषयीही."
माझ्या डोळ्यातलं पाणी का थांबत नव्हतं मलाच कळत नव्हतं!
"जेवण कर, आणि बेडमध्ये जा," मम्मा तशीच उठत म्हणाली.
"आणि हो, उद्या बाबाचा महिना आहे. महेश, पूर्णाकाकू, सगळे येतील. तुला थांबावं लागेल..."
"मम्मा, मी कुठेही जात नाहीये. ओके? मला जायला नाहीये कुठे जागा, तुझ्याशिवाय, या घराशिवाय... बाबा असतांना कुठेही गेले तरी त्याची सोबत वाटायची. आता एकटी पडलीये ग मी!"
मम्मा क्षणभर माझ्याकडे बघत राहिली, आणि नंतर वरच्या रूममध्ये निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून लगबग सुरू झाली. गुरुजींनी सगळं साहित्य मांडलं, महेशदादा पूजेला बसला, आणि मी सगळयांच्या बाजूला.
आज बरीच मंडळी जमली होती. मात्र सगळ्यांच्या केंद्रस्थानी माझाच विषय होता. बऱ्याच लोकांनी तर मला बघितलंही नव्हतं.
मोहनची मुलगी, कधीही न बघितलेली...
मात्र माझं सगळं लक्ष गुरुजींच्या मंत्रोच्चाराकडे होतं.
दादा पाणी सोडत होता, गुरुजी विचारत होते
"गोत्र - कोंडीण्य
काकांच नाव - मोहन
त्यांच्या वडिलांचं नाव - भार्गव
आजोबांचं नाव - प्रल्हाद
आईचं नाव - कलावती
आजीचं नाव - सरस्वती
आईच्या वडिलांचं नाव - सोनू
आईच्या आईच नाव .."
दादा अडखळला, तेवढ्यात अन्नपूर्णाआजी म्हणाली...
"सौदामिनी."
आणि पुन्हा मंत्र चालू झाले.
मला यापैकी माझ्या आजी आजोबांचं सोडलं, तर एकही नाव माहिती नव्हतं!
मला माझ्या बाबाविषयी, त्याच्या परिवाराविषयी काहीही माहिती नव्हतं!
आजपर्यंत कधी इच्छाही का झाली नाही, जाणून घेण्याची? बाबा होता म्हणून...
पण आता मला आस लागली होती, सगळं जाणून घेण्याची.
सर्व उरकल्यावर मी आजीला विचारलं...
"आजी, मला काहीच माहिती नाहीये, आपल्या कुळाविषयी, पूर्वजांविषयी."
अन्नपूर्णाआजी समाधानाने हसली, आणि म्हणाली.
"मोहन, खूप हुशार होता ग. म्हटला होता, माझी पोर एक दिवस नक्की मुळाचा, कुळाचा शोध घेईन!"
आणि आजीने बोलायला सुरुवात केली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
@कटप्पा - थँक्स!!! नाऊ peace Wink
@शालिदा ये ना चोलबे, तुम्ही पाटीलच्या वेळीही असंच म्हणालात आणि गायब झालात Wink
धन्यवाद प्राचीन
@srd - नाही, आता दोन वर्षांनी पुढचा भाग येईल, त्यामुळे तू मायबोलीवर येत तरी राहशील.
धन्यवाद देवकी.

वाह! सुरेखच.
अगदी गप्पा मारत सांगावं अशी स्टाईल आहे लिहिण्याची. निवेदनापेक्षा संवादातून कथानक उलगडत गेले की वाचायला छान वाटते. अगोदरचा भाग वाचला होता, आवडलाही होता पण प्रतिसाद का दिला गेला नाही हे लक्षात नाही. दोन भागांमधले अंतर वर्षाचे असेल तर कठीण आहे ब्वॉ!
पुभाप्र

Lihi na patapt... Vrsh vrshbhr waiting nahi krnar ...aprtim likhan

@उर्मिला- थँक्स, नाही, वर्षभर वाट बघायला नाही लावणार. पण एकावेळी तीन कथा पूर्ण करतांना दमछाक होतेय, तेही तितकंच खरं.
@makali - खूप धन्यवाद... It matters a lot.

मुळात जेव्हा नातीगोती लिहायला घेतलं, तेव्हा संदर्भ वेगळे होते, त्यानंतर ते पूर्णपणे बदलले, म्हणून रस राहिला नव्हता. मात्र आता जुनेच संदर्भ किंबहुना अधिक ठसठशीतपणे लागू झालेत, म्हणून हा लेखप्रपंच!

चांगलं लिहिताय.
लिंक तुटु देउ नका.

माउच्या नावात गोंधळ झालाय का?
पहिल्या भागात आर्या डॉक्टराना फोन कर असा उल्लेख आलाय आणि आता सायली.