त्वचेआत भगवा, हिरवा वा निळा कुणीही नसतो

Submitted by बेफ़िकीर on 14 April, 2019 - 12:55

कुणी पाजले अनुयायांना प्याले हे सांगा की
नको व्हायला होते ते का झाले हे सांगा की

आगी नेत्यांनीच लावल्या, पटले तुमचे म्हणणे
तुमच्या मनात इंधन कुठून आले हे सांगा की

छातीवर झेलतात त्यांची पूजा करता करता
पाठीतच घुसलेत कुणाचे भाले हे सांगा की

स्वतःहून चाललात की गेलात तुम्ही चालवले
हात रिकामे अन् का पायी छाले हे सांगा की

त्वचेआत भगवा, हिरवा वा निळा कुणीही नसतो
लालच रंगाने सारे का न्हाले हे सांगा की

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेगड्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा डोळस धर्माभिमान कधीही चांगला!
इतनाही साथ का हात मत बढाओ, की कोई हात काट के लेक जाये..!
सो पटलं तर नाहीच, रिलेटही झालं नाही...

छान.

निरुत्तर करणारं आहे. फाळणी झाली मनांची, रंग हे प्रतिक आहेत मनातल्या विखारांचे. वरवर दिसतेय आग विझलेली, आत धुमसत आहेत नफरतीचे निखारे.

अप्रतिम लेखन.
धर्म कोणताही असो,धर्म हा फक्त आणि फक्त माणुसकीच शिकवत असतो.

स्वतःहून चाललात की गेलात तुम्ही चालवले
हात रिकामे अन् का पायी छाले हे सांगा की >>> समर्पक, सुरेख