कोकणातील माणिक ... रातांबे ( कोकम )

Submitted by मनीमोहोर on 12 April, 2019 - 14:59

निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात.

कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात.

रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . आमची झाडं खूप जुनी आहेत. ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात. झाड उंच असल्याने मोहोर नजरेला पडणं कठीण जातं पण हल्ली आम्ही नवीन लागवड म्हणून रातांब्याची काही कलमं लावली आहेत, ती झाड कलमाची असल्याने जास्त उंच वाढत नाहीत त्यामुळे त्यांचा मोहोर मात्र नीट पहाता येतो.

रातांब्याच झाड ( फोटो नेटवरून )

kokkam 3.JPG

रातांबे तयार झाले की एखाद्या दिवशी त्यांची काढणी केली जाते. काढणी म्हणजे ते सरळ काठीने जमिनीवरच पाडले जातात. आंब्याच्या काढणी सारखे घळ वैगेरे लाड काही रातांब्यांचे केले जात नाहीत. लाले लाल पिकलेल्या रातांब्याचे हारे मागच्या खळ्यात येऊन पडतात. ते आंबट रातांबे खाण्यासाठी पोरांच्या त्यावर उड्या पडतात. रातांब्याची बी दाताला लागली तर दात तात्पुरते पिवळे पडतात म्हणून "बी दाताला लावू नका, जपून खा" असे घरातल्या मोठ्या बायका मुलांना अगदी दरवर्षी नेमाने बजावत असतात.
रातांबे
cWIMG_20160423_114601455_1.jpg

फोडलेली फळं
IMG_20160430_153050941.jpg

रातांबे धुवून पुसून ते फोडायला ( आवळ्याहून थोडं मोठं आणि फार कडक ही नाही खर तर हे फळ , त्याला काय फोडायचंय फणस आणि नारळा सारख? पण तरी कोकणात कोकम कापत / चिरत नाहीत तर फोडतातच. ☺ ) घेतले जातात. सालं आणि बिया वेगळ्या करतात. बिया आणि सालं ठेवलेली ताटं कलती ठेवून त्यांचा रस वेगळा गोळा केला जातो. त्यात काम करायला माझे हात शिवशिवतात पण जास्त वेळ आंबटात हात घातले तर माझी बोट दुखायला लागतात म्हणून ह्या कामात माझा सहभाग मात्र शून्य असतो. रातांब्याच्या सालींना त्या वेगळ्या ठेवलेल्या रसाची त्यात थोडं मीठ घालून सात दिवस सात पुटं चढवून ती उन्हात
खडखडीत वाळवली की मग त्याचं कोकम बनत. चांगली वाळलेली कोकमं घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवली तर दोन एक वर्ष सहज टिकतात. आंबटपणासाठी कोकणात ह्याचा भरपूर वापर होतो. कुळथाच पिठलं, रोजची आमटी वैगेरे मध्ये कोकणात कोकमाचाच वापर होतो. चिंचेसारखी भिजत घाला मग कोळ काढा अशी कटकट नसल्याने नसल्याने कोकम वापरणं सोपं जातं. श्राध्द पक्षाच्या सैपाकात मीठ, गूळ, जिरं आणि तिखट घातलेली अतिशय चविष्ट अशी कोकमाची चटणी करावीच लागते कोकणात. मात्र इतकी चविष्ट चटणी फक्त श्राध्दाच्या सैपाकतच करतात . एरवी कधी विशेष केली जात नाही.

सुखवत टाकलेली कोकमं

IMG_20190413_153604.jpg

रातांब्यांची सालं आणि साखर एकत्र मिसळून उन्हात ठेवलं की चार आठ दिवसात साखर विरघळून त्याचा अर्क तयार होतो. हा वर्षभर सहज टिकतो. आयत्या वेळी ह्यात पाणी , मीठ आणि थोडी जिऱ्याची पूड मिसळून अवीट गोडीचे सरबत म्हणजेच अमृत कोकम करता येते. ह्याला इतका सुंदर लाल रंग येतो की पाहणारा प्यायच्या आधीच खुश ! आणि जर चांदीच्या पेल्यात वैगेरे दिलं असेल तर मग बघायलाच नको. कोकणात आमच्याकडे कैरीच्या पन्ह्या पेक्षा हेच सरबत अधिक प्रिय आहे. एखाद्या वर्षी घरी कोणाची मुंज वैगेरे करायचं घाटत असलं की मुंजीत सगळ्याना पेय म्हणून हेच दिलं जात आणि मग त्या वर्षी त्या हिशोबाने जास्त करून ठेवतो सरबत. अमृत कोकम करून झाल्यावर सालं उन्हात वाळवून ठेवतो. आंबट गोड चवीची ती सालं मुलांना खूप आवडतात आणि त्याना येता जाता तोंडात टाकायला लागतं तेव्हा देता ही येतात.

हल्ली कोकम आगळ म्हणून अमृत कोकम सारखाच पण बिन साखरेचा अर्क बाजारात मिळतो. तो वापरून नारळाचं दूध घातलेली सोलकढी अगदी पट्कन आणि मस्त होते. पण सोलकढी प्रिय आहे जास्त करून मालवण सावंतवाडी भागात. आमच्या देवगड भागात ती फार केली जात नाही . कधीतरी आठवण झाली आणि मुद्दाम केली तरच होते. आणि आम्ही त्याला सोलकढी न म्हणता सोलांचं सार म्हणतो.

हे सगळं करून झाल्यावर रातांब्याच्या ज्या बिया उरतात त्या धुवून चांगल्या वाळवतात आणि मग त्यांची वरची सालं काढून आतला भाग पाण्यात घालून चांगला उकळवतात थोड्या वेळाने बियांच तेल वर तरंगू लागतं. थंड झालं की ते थिजतं. ते अलगद काढून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवतात. हेच ते कोकम तेल. तो गोळा थोडा विस्तवावर धरायचा आणि वितळलेला भाग थंडीत पाय , ओठ फुटतात त्यावर चोळायचा. ह्या वितळलेल्या तेलाचा एक मंद मस्त वास येतो जो मला खूप आवडतो. पूर्वी मे महिन्यात कोकणातून येतानाच्या आमच्या सामानात हे कोकम तेलाचे गोळे हमखास असत. तेव्हा घरोघरी हेच तेल वापरत थंडीत पण आता जमाना बदललाय, पाच दहा रुपयात व्हॅसलीन ची डबी मिळते विकत म्हणून ह्याला कोणी विचारत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी बाहेरून आल्यावर हे सरबत प्यायले तर dehydration कमी होत, उन्हामुळे डोकं दुखत असेल तरी ही बरं वाटत. पित्तावर हे रामबाण औषध आहे. कधी कधी अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्यावर जर कोकमं पाण्यात भिजवून ते पाणी हलक्या हाताने चोळलं तर लगेच गुण येतो. कधी तोंडाला रुची नसेल तर थोडी साखर घालून एखाद कोकम चोखलं तरी फायदा होतो. असे अनेक गुण आहेत या कोकमाचे.

सालापासून बियांपर्यंत सगळ्यांचा उपयोग असणाऱ्या ह्या बहुगुणी परंतु दुर्लक्षित अशा रातांब्याची आणि कोकमाची ही कहाणी इथे सफल संपूर्ण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Btw भिरंडा हा शब्द मात्र अगदीच नवीन आहे माझ्यासाठी.>>>>

दर 12 मैलावर भाषा बदलते हे ऐकून आहे, आज प्रत्यय आला. तुझ्या व माझ्या गावात फारतर दीडशे किमी म्हणजे साधारण 90 मैलांचे अंतर आहे. त्या अंतरावर काही शब्द इतके वेगळे आहेत की तुला भिरंडा माहीत नाही व माझ्या गावी रातांबे माहीत नव्हते. आता काही घरांत तळकोकणातल्या सुना आल्यामुळे भिरंडाना रातांबे म्हणतात हे माहीत आहे.

मस्त लेख. लहानपणी शेजारच्या घरातल्या अंगणात रातांब्याचं रोप लावलं होतं. त्याची कोवळी पानं आम्ही गडग्यावरून हात घालून खायचो ते आठवलं.

मोबाईल वरून टायपिंग कटकटीचं आहे, सविस्तर नंतर लिहीन.

आम्ही रतांबाच म्हणतो.
बांदा वगैरे साईडला तरी रतांबाच म्हणतो.
माझ्याकडे कोकम बटर. जरा स्टाईल मध्ये म्हणायचे कोकम तेल म्हणण्यापेक्षा. Wink किंमत वाढते.
अजुनही गावचीच कोकमं खातो. बाजारची लाकडासारखी दिसणारी खातच नाही.
माझी आजी , रतांब्याच्या फोडी, वेलची, एखादेच लवंगआणि गुळ असे काचेच्या बरणीत दाबुन भरून तीन चार दिवस उन्हात वाळवायची. हे असे सरबत साखरेपेक्षा मस्त असते. उन्हाळ्यात प्याल्याने, डोक्यात भरून कफ होत नाही.

रतांब्याच्या फोडी, वेलची, एखादेच लवंगआणि गुळ असे काचेच्या बरणीत दाबुन भरून तीन चार दिवस उन्हात वाळवायची. हे असे सरबत साखरेपेक्षा मस्त असते.>>>>> झकास आहे हे! पण भिरिंडे पक्षी रातांबे आणायचे कुठून?

ममो, तुला दंडवत. दर वेळेस जादूगाराने पोतडीतुन काही तरी चमत्कारीक वस्तु बाहेर काढावी, तसा नवीन नवीन खजिना बाहेर काढत असतेस.

आम्ही आमसुले म्हणतो, कारण घाटावरचे ना. Proud पण साधी आमटी, दाण्याची आमटी, जिरवणी व सोलकढी आमसुलाशिवाय कशी पूर्ण होईल?

कोकमाच्या तेलाचा गोळा मी आणलाय घरी, पण तसाच पडुन आहे.

कोकणातले फोटो टाक गं प्रत्येक लेखाच्या वेळी. मला कोकण प्रचंड आवडते.

मनीमोहोर, खूप छान लिहिला आहेस लेख. मस्त माहिती. सोललेल्या फळांचा टाकलेलं प्रचि अप्रतिम आहे. रातांब्याला माणिक उपमा का दिलीस ते लगेच कळलं. खरच माणकासारखा तेजस्वी लालबुंद रंग आहे.

सिद्धीने टाकलेले प्रचि पण खूप आवडले.

कोकम तेल कुठे मिळतं? आयुर्वेदीक औषधांच्या दुकानात घेतलं तर साधारण काय किंमत रिझनेबल असेल?

मीरा, कोकमतेल हे गोठलेल्या घट्ट गोळ्याच्या स्वरुपात असतं. कलर गुलाबी + ऑफ व्हाईट असतो. मोठ्या आयुर्वेदीक दुकानात सहज मिळेल. मी अजून वापरलं नाही. किंमत फार नाही तरी १०० ते १५० च्या घरात असेल, मला आठवत नाही मी कितीला घेतले ते.

https://www.google.com/search?q=kokum+oil+price&rlz=1C1CHZL_enIN813IN813...

ऑनलाईन घेण्यापेक्षा दुकानातुन घे.

नेहमीप्रमाणेच सुरेेख लिहीलंय ममो. लेख वाचताना मनाने गावी जाऊन पोचले.
साधनातैच्या पहिल्या पुर्ण पोस्ट ला अनुमोदन. आमच्याकडे भिरंडा आणि सोलाच. सोलकढी अतिप्रिय.
सोलकढी म्हणजे विशिष्ट लोकांनी उगीच लाडीक दिलेले नाव आहे आणि हॉटेलवाल्यांनी केलेला वापर.>>>>>>हॉटेलमधली कढी भिकार असते.आमच्यात कढी म्हणजे सोलकढी>>>>>>> देवकी पूर्णपणे सहमत
@झंपी माझं सासर बांद्याला पण तिथे भिरंडा च म्हणतात.
मला तो भिरंडा शब्द किती वेळ आठवलाच नव्हता, लेख वाचायला सुरूवात केल्यापासून मनात येतंय काहीतरी वेगळा शब्द वापरतो आपण याला पण आठवेनाच. मुंबईकर होत चालले की काय मी. Uhoh
सिद्धीने दिलेले प्रचि पण सुरेखच.
चला आता भिरंडा फोडूक.

परत तेच सांगते सगळेच प्रतिसाद सुंदर .

दर 12 मैलावर भाषा बदलते हे ऐकून आहे, आज प्रत्यय आला. तुझ्या व माझ्या गावात फारतर दीडशे किमी म्हणजे साधारण 90 मैलांचे अंतर आहे. त्या अंतरावर काही शब्द इतके वेगळे आहेत की तुला भिरंडा माहीत नाही व माझ्या गावी रातांबे माहीत नव्हते. >> साधना माझ्या ही अगदी हेच आलं मनात.

माझी आजी , रतांब्याच्या फोडी, वेलची, एखादेच लवंगआणि गुळ असे काचेच्या बरणीत दाबुन भरून तीन चार दिवस उन्हात वाळवायची. हे असे सरबत साखरेपेक्षा मस्त असते. उन्हाळ्यात प्याल्याने, डोक्यात भरून कफ होत नाही. >> फारच मस्त लागेल हे . देवकी म्हणते तसे इथे शहरात जे रातांबे मिळतात ते इतके निस्तेज आणि निर्जीव दिसतात की घ्यायची इच्छा च होत नाही.

प्रज्ञा, नक्की लिही सविस्तर . मजा येईल वाचायला.

मीरा, रश्मी ने लिहीलय ते तेल द्रव रुपात नसते , घन रुपात असते. मी कधी विकत नाही घेतलंय , पण महाग नसेल अजिबात.

रश्मी, कारवी, मीरा, किट्टू , झम्पि मस्त प्रतिसाद.

एक गोष्ट मला सारखी जाणवतेय आज ती म्हणजे रातांब्या सारखी एक छोटी गोष्ट ही आपल्याला गावी घेऊन जाते, जुन्या आठवणीत आपलं मन रमवते . आपल्या मनाच्या तळाशी कायम आपलं गाव असत आणि काडी इतक्या आधाराने ही आपण मनाने गावाला जाऊन पोचतो.

कोणीतरी त्या भिरंडाच्या उच्चाराचा ऑडिओ टाका बरं इथे. उत्सुकता शिगेला पोचलेय आता.

त्याकढीला फुटी कढी म्हणतात. >>> आमच्याकडे सासुबाई फुट्या सार म्हणतात याला, जेव्हा खोबरं किंवा नारळ दुध न घालता करतात तेव्हा.

अगोळची मी करते तेव्हा सोलकढी म्हणते आणि कोकम भिजवून करते तेव्हा सार म्हणते.

सिद्धि फोटो फार सुंदर.

मी कोकम, आमसुलं दोन्ही शब्द ऐकते पण मला लहानपणापासून कोकम म्हणायची सवय आहे. आमसुली रंग हा कोकम रंगासाठीच वापरला जातो. सोलं शब्द मी दोन्हीसाठी ऐकला आहे आंबोशी आणि आमसुल. सासुबाईंच्या तोंडी आंब्याची सोलं हा आंबोशी साठी ऐकला आहे.

भिरंडा शब्द मीही पहील्यांदा ऐकतेय. छान वाटतं असे वेगवेगळे शब्द समजतात तेव्हा.

काही काही गोष्टी नुसत्या बघून ही किती समाधान वाटत ना >>> हो ना.

एक गोष्ट मला सारखी जाणवतेय आज ती म्हणजे रातांब्या सारखी एक छोटी गोष्ट ही आपल्याला गावी घेऊन जाते, जुन्या आठवणीत आपलं मन रमवते . आपल्या मनाच्या तळाशी कायम आपलं गाव असत आणि काडी इतक्या आधाराने ही आपण मनाने गावाला जाऊन पोचतो. >>>>> किती सुंदर लिहिलंय!

खुपच सुंदर लिहीलय नेहेमीप्रमाणे. माणिकाची उपमा अगदीच छान.
रातांबे फोडून झाले, सालं बियांचे सोपस्कार पार पडले की श्रमपरिहार म्हणून, मला वाटते बिया/गर याचे एक सरबत करत, थोडीशी हिरवी मिरची असे चुरडून लावलेली...अशी आठवण जागी झाली लेख वाचून.

कोकम तेल एका गाडीवरून आणले होते.त्यात धूळ/घाण खूप आहे.वितळून पायाला लावल्यावर पाय काळे झाले ☺️☺️
मग अमेझॉन वरून इंग्लिशाळलेलं बाटलीतलं कोकम बटर थोड्या महागात आणलं.ते छान स्वच्छ आणि शुद्ध आहे.

हम्म्म अनु.

बाहेरचा अनुभव नाही, घरुन आलेलं आहे आमच्याकडे. त्यालाही खूप वर्ष झाली, मी तसाच गोळा ठेवलाय.

कोकम तेलाचा गोळा फारसा महाग नाही. रु 25 ला एक असा मिळायचा. आकार साधारण आपल्या आडव्या बंद मुठीएव्हढा . पॅकिंग न करता विकतात त्यामुळे कचरा चिकटलेला असतो.

कैलास जीवन क्रिम, क्रॅक क्रिम मध्ये कोकम तेलच वापरतात असे माझे निरीक्षण आहे. Happy Happy

लेख छानच आहे. नेहेमीप्रमाणेच.
रक्त + आम्र = रक्ताम्र - रतांबा.
भिर्न्डेल पूर्वी स्वयंपाकातही वापरीत. ताकाच्या किंवा सोलांच्या कढीच्या फोडणीसाठी आवर्जून वापरीत. ते गोळे रंगाने अतिशय शुभ्र असत. ती शुभ्रता मिळवण्यासाठी बियांवर खूप मेहनत घ्यावी लागे. रतांबे फोडल्यावर निघालेल्या बिया ह्या बुळबुळीत सफेद आवरण आणि कवचयुक्त असतात. बुळबुळीत आवरणामुळे त्याखालची साल काढता येत नाही. म्हणून ह्या बिया राखेत घोळून चांगल्या कडक खडखडीत सुकवीत. कवचापासून बी सुटी होऊन खुळखुळू लागे. मग एकत्र गोळा करून हलक्याश्या चिव्याने हलके हलके झोडपीत. बुळबुळीत आवरण राखेत भिजून सुकल्यामुळे फुटून सुटे होई. बिया शक्यतो अखंड राहाव्यात म्हणून हलकेच झोडायच्या. मग घोळून पाखडून आणि शेवटी हाताने वेचून राख आणि बिया वेगळ्या केल्या जात. अति किचकट आणि चेंगट प्रकार. पण शुभ्रतेसाठी हे करावे लागे. मग बिया जात्यावर दळून त्याचे पीठ करायचे आणि ते मोठ्या हंड्यात घालून पाण्यात चांगले उकळायचे. ते फार थंड होऊ न देता लोण्यासारखे हातावर झेलून झेलून त्यातले पाणी बाहेर काढायचे आणि गरम असतानाच पटापट आकार द्यायचा. थंड झाल्यावर आकार देता येत नाही. या पद्धतीने बियांचा आणि आवरणाचा किंचित गुलाबी रंग तेलात उतरत नाही. निव्वळ शुद्ध तेल मिळते.
काटेकुमारी किंवा कोरफडीचा गर वेगळा करण्याची पद्धतही थोडीफार किचकट आहे.
यात यंत्रवापर आणि प्राणिवापर नाही, केवळ मानवी श्रम, म्हणून ऋषिपंचमीला स्वयंपाकात हे तेल चालते.

म्हणून ह्या बिया राखेत घोळून चांगल्या कडक खडखडीत सुकवीत. कवचापासून बी सुटी होऊन खुळखुळू लागे.>>>>>>> आता कळतंय,गावी कुळवाड्यांच्या घरासमोर ह्या राखेतील बियांचे रहस्य.त्यावेळी वाटे काय वाळत घातलंय्?पण कधी विचारायची बुद्धी झाली नाही.
भिरिंडेल शब्दाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

सुपारीच्या झावळीच्या खालच्या पांढऱ्या रोवळी(?) तून वाडीत सकाळी चक्कर मारताना पडलेले रातांबे वेचून आणलेले आठवतात. आणि ताज्या रातांब्याच्या फोडी बियांसकट (जास्तच कोकणीपणा करायचा तर फक्त बिया आणि सोबतच्या गरच )साखर मीठ घालून बरणीत भरून सुटलेल्या रसाचे जिऱ्याची पूड घालून कोकम सरबत तर निव्वळ अप्रतिम. आणि मग ओसरीवर घातलेल्या मांडवावर वाळत पडलेली कोकमं दुपारी शिडीवर चढून अधेमधे तोंडात टाकणे.

आगळाच्या कॅन मध्ये प्रिझर्व्हेटिव्ह नसतं कारण आगळ/ कोकम खराब होत नाही असं माझं अझमशन आहे. ख खो दे जा.
ममो, छान लेख. फक्त फळाचा फोटो... टॅनजरिन च्या देठाला, जिकडे सगळं एकवटतं तिकडे जशा नाजूक फोल्डस/ मोदका सारख्या कळ्या असतात .. तसा फोटो लेखात शोधत होतो तो नाही सापडला. Happy

ममो, मस्त लेख. खूप आठवणी ताज्या झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात तरी सेम वावेने लिहिलंय तसंच फळाला कोकम/कोकंब म्हणतात. सोलाना आमसूलच म्हणतात आणि वाळवलेल्या कैरीच्या पांढऱ्या तुकड्यांना आंबोशी.
गेल्या उन्हाळ्यात काढलेला एक आमच्या वाडीतला फोटो देते.
झाडावर पिकलेले कोकम, फोडलेले कोकम आणि ताजं आंबटगोड सरबत!
2019-04-14-21-56-51-492.jpg

सगळयांच्या आठवणी किती सुंदर.

अंजू सुंदर माहिती.

नमिता खूप छान लिहीलय.

कैलास जीवन क्रिम, क्रॅक क्रिम मध्ये कोकम तेलच वापरतात असे माझे निरीक्षण आहे >> अगदी अगदी. अमृत मलम नावाचं एक ओठांना लावायचं मलम येत त्यात ही कोकम तेलच असत अस मला वाटत.

अनु गाडीवरच नसेल एवढं चांगलं . आणि मुळात आम्ही कधी विकत आणलंय ते तेल ?

हिरा खूपच छान माहिती.

एक गोष्ट मला सारखी जाणवतेय आज ती म्हणजे रातांब्या सारखी एक छोटी गोष्ट ही आपल्याला गावी घेऊन जाते, जुन्या आठवणीत आपलं मन रमवते . आपल्या मनाच्या तळाशी कायम आपलं गाव असत आणि काडी इतक्या आधाराने ही आपण मनाने गावाला जाऊन पोचतो. >>>>> किती सुंदर लिहिलंय! देवकी थँक्यू.

अमितव छान आठवण . आज अख्ख्या रातांब्याचा फोटो दाखवता आला तुम्हाला. तरी अजून कोकमं सुखत घातल्याचा फोटो इथे दाखवायचा आहे. होत नाहीये अपलोड.

मॅगी मस्तच फोटो सगळेच. सरबतचा फोटो मस्त . आणि इथे नव्हता ही एक ही सरबताचा फोटो.

हिरा किती सुंदर माहिती, मला नेहेमीच तुमच्या पोस्टस वाचायला आवडतात. कित्ती छान शैलीत सांगता, अभ्यासू आणि ओघवत्या शब्दात.

मॅगी फोटो आहाहा.

ममो, आंबट आमसुलावरचा कित्ती गोड मिट्ट लेख!! लिटरली चव
अनुभवत वाचला.
लहानपणी मुंबई ची मावशी थंडी च्या दिवसात आवर्जून मैसूर सॅंडल सोप सारखा दिसणारे कोकम घेऊन यायची आमच्या कडे येताना. आज कळलं,
अय्या!! हेच ते इतक्या वर्षांनी का होईना, ज्ञानात भर पडली, मस्त वाटलं .साधना, देवकी चे उस्फूर्त प्रतिसाद खूप आवडले
सिद्धी ने शेअर केलेले फोटो ही फारच सुंदर

छान लेख. रातांबा हा शब्द बहुतेक ठिकाणी कोकमाच्या झाडासाठी वापरतात असे दिसतेय. कोकमासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे आमसुल/आमसोल किंवा सोल हे खुप वेळा ऐकले होते पण भिरंडा हा शब्द पहिल्यांदा कळला. गावी रातांब्याची झाडे एकाच ठिकाणी अनेक आहेत असे पुर्वी कधी पाहिले नाही. रानात किंवा नदी किनारी असलेल्या शेताच्या बांधावर ही झाडे असत. वर्षभरासाठी घरापुरती कोकम मिळाल्याशी मतलब म्हणून कोण जास्त लक्ष सुध्दा देत नसत. मुळात महाराष्ट्रात कोकमाचा जेवणात वापर हा पुर्वीपासून कोकणातच जास्त होत होता. माश्याचे कालवण, तिख्ले किंवा तळण्याआधी त्याचा उग्रस वास जाण्यासाठी कोकमाचाच वापर होतो. आज सुध्दा मला नाही वाटत की कोकणी माणसं सोडली तर शहरात महाराष्ट्रातील इतर भागातील गृहिणी कोकमाचा स्वयंपाकासाठी वापर करत असतील. कोकमाचा व्यावसायिक फायदा हा खरा तर कोकम सरबत या पेयामुळे जास्त होत आहे असे मला वाटते.

गोवा, कारवार या भागात शब्दांत ' र' वर अनुस्वार असेल तर 'र' आणि 'न' चे उच्चार विशिष्ट पद्धतीने होतात. ' र' अर्धाच उच्चारला जातो. ' न' तर अर्धा असतोच. असेच य आणि न शब्दांतर्गत एकत्र असतानाही होते. करंजी हे कर्न्जी असे उच्चारले जाते. आधी क पूर्ण, मग शिरोरेखेच्यावर रफार असल्याने त्याचा आधी उच्चार, मग अर्धा न आणि मग नंतरचे अक्षर. र चा उच्चार थोडासा ऋषीतल्या ऋ सारखा. स्वररहित. उदाहरणच द्यायचे झाले तर भायंदर चा उच्चार आपण भाइंदर करतो तेव्हा आपण ' य' अर्धाच उच्चारत असतो. मायंदाळ चा उच्चार माइंदाळ होतो. तसेच वायंगणकर चा उच्चार तिकडे वाइंगणकर होतो. ' इ' लघु. वा यं ग ण कर असा नव्हे. कोंकणीत ग चा उच्चार अनुनासिकासह असेल तर अनेकदा वांग्मय मधल्या (मोबाइलवर हे अक्षर लिहिता येत नाहीय) न्ग सारखा नाकीं होतो. संस्कृतमधल्या शार्न्गधर, शार्न्गपाणि सारखा.

मला कैलास जीवन, अमृत मलम , क्रॅक इ. सर्व कोकम तेल वाले प्रकार प्रिय आहेत.वास घेतला की सौम्य आणि छान वाटतं.

कसलं भारी ग ! लालचुटुक माणिक अगदी समर्पक शब्द !! सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . खूप मस्त लेख
वरच्या बऱ्याच पोष्टी पटल्या .. "भिरंडा" आमच्याकडे(रायगड /रत्नागिरी ) तरी मी नाही ऐकलेला. वावे आणि मॅगी म्हणाली तसं फळाला कोकम/कोकंब म्हणतात. सोलकढी चं पण तसंच .. अगदी सर्रास नाही केली जात.
सिद्धि मॅगी फोटो मस्तच !
हे झाड चढायला तितकंसं सोप्प नसतं . कॉम्प्लेक्स असतं .. खूप जवळजवळ फांद्या आणि भरगच्च असं. केस/ कपडे अडकतात .
आमच्या शाळेच्या मागे एक मोठं झाड होतं , दगड मारून /लांब काठीने इतक्या वेळा आम्ही कोकमाचा कोवळा पाला खायचो /रातांबे लागले कि तर झुंबड असायची .. भयंकर आंबट लागतात पोपटी कोवळी पानं . शिवाय दात पिवळे पडतात आणि दातांवर पुटं चढवल्यासारखं वाटत राहातं . पण तरी त्या बिया गरासकट गपकन गिळून टाकायला काय मज्जा यायची ..
हिरा मस्त पोस्ट !
सगळ्यांच्या आठवणी प्रतिसाद मस्तच !

लेख , प्रतिसाद आणि सगळे प्रचि मस्त!
साधना यांनी उल्लेखिलेले बंद मुठीच्या आकाराचे कोकमतेलाचे मुटके लहानपणी आजीकडे बघितलेले आठवतात. शेतात अनवाणी राबून तळपायांना (आणि टाचांना) तसेच तळहातांना पडणाऱ्या भेगांवर मलम म्हणून हा घरगुती उपाय करीत असत. या निमित्ताने काही रक्ताळलेल्या भेगा आठवल्या आणि एक कळ उठली काळजात. असो.
या मुटक्यांना ‘मुटियाल’ असेही म्हणतात बहुतेक. (जि. सिंधदुर्ग)

Pages