कोकणातील माणिक ... रातांबे ( कोकम )

Submitted by मनीमोहोर on 12 April, 2019 - 14:59

निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात.

कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात.

रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . आमची झाडं खूप जुनी आहेत. ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात. झाड उंच असल्याने मोहोर नजरेला पडणं कठीण जातं पण हल्ली आम्ही नवीन लागवड म्हणून रातांब्याची काही कलमं लावली आहेत, ती झाड कलमाची असल्याने जास्त उंच वाढत नाहीत त्यामुळे त्यांचा मोहोर मात्र नीट पहाता येतो.

रातांब्याच झाड ( फोटो नेटवरून )

kokkam 3.JPG

रातांबे तयार झाले की एखाद्या दिवशी त्यांची काढणी केली जाते. काढणी म्हणजे ते सरळ काठीने जमिनीवरच पाडले जातात. आंब्याच्या काढणी सारखे घळ वैगेरे लाड काही रातांब्यांचे केले जात नाहीत. लाले लाल पिकलेल्या रातांब्याचे हारे मागच्या खळ्यात येऊन पडतात. ते आंबट रातांबे खाण्यासाठी पोरांच्या त्यावर उड्या पडतात. रातांब्याची बी दाताला लागली तर दात तात्पुरते पिवळे पडतात म्हणून "बी दाताला लावू नका, जपून खा" असे घरातल्या मोठ्या बायका मुलांना अगदी दरवर्षी नेमाने बजावत असतात.
रातांबे
cWIMG_20160423_114601455_1.jpg

फोडलेली फळं
IMG_20160430_153050941.jpg

रातांबे धुवून पुसून ते फोडायला ( आवळ्याहून थोडं मोठं आणि फार कडक ही नाही खर तर हे फळ , त्याला काय फोडायचंय फणस आणि नारळा सारख? पण तरी कोकणात कोकम कापत / चिरत नाहीत तर फोडतातच. ☺ ) घेतले जातात. सालं आणि बिया वेगळ्या करतात. बिया आणि सालं ठेवलेली ताटं कलती ठेवून त्यांचा रस वेगळा गोळा केला जातो. त्यात काम करायला माझे हात शिवशिवतात पण जास्त वेळ आंबटात हात घातले तर माझी बोट दुखायला लागतात म्हणून ह्या कामात माझा सहभाग मात्र शून्य असतो. रातांब्याच्या सालींना त्या वेगळ्या ठेवलेल्या रसाची त्यात थोडं मीठ घालून सात दिवस सात पुटं चढवून ती उन्हात
खडखडीत वाळवली की मग त्याचं कोकम बनत. चांगली वाळलेली कोकमं घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवली तर दोन एक वर्ष सहज टिकतात. आंबटपणासाठी कोकणात ह्याचा भरपूर वापर होतो. कुळथाच पिठलं, रोजची आमटी वैगेरे मध्ये कोकणात कोकमाचाच वापर होतो. चिंचेसारखी भिजत घाला मग कोळ काढा अशी कटकट नसल्याने नसल्याने कोकम वापरणं सोपं जातं. श्राध्द पक्षाच्या सैपाकात मीठ, गूळ, जिरं आणि तिखट घातलेली अतिशय चविष्ट अशी कोकमाची चटणी करावीच लागते कोकणात. मात्र इतकी चविष्ट चटणी फक्त श्राध्दाच्या सैपाकतच करतात . एरवी कधी विशेष केली जात नाही.

सुखवत टाकलेली कोकमं

IMG_20190413_153604.jpg

रातांब्यांची सालं आणि साखर एकत्र मिसळून उन्हात ठेवलं की चार आठ दिवसात साखर विरघळून त्याचा अर्क तयार होतो. हा वर्षभर सहज टिकतो. आयत्या वेळी ह्यात पाणी , मीठ आणि थोडी जिऱ्याची पूड मिसळून अवीट गोडीचे सरबत म्हणजेच अमृत कोकम करता येते. ह्याला इतका सुंदर लाल रंग येतो की पाहणारा प्यायच्या आधीच खुश ! आणि जर चांदीच्या पेल्यात वैगेरे दिलं असेल तर मग बघायलाच नको. कोकणात आमच्याकडे कैरीच्या पन्ह्या पेक्षा हेच सरबत अधिक प्रिय आहे. एखाद्या वर्षी घरी कोणाची मुंज वैगेरे करायचं घाटत असलं की मुंजीत सगळ्याना पेय म्हणून हेच दिलं जात आणि मग त्या वर्षी त्या हिशोबाने जास्त करून ठेवतो सरबत. अमृत कोकम करून झाल्यावर सालं उन्हात वाळवून ठेवतो. आंबट गोड चवीची ती सालं मुलांना खूप आवडतात आणि त्याना येता जाता तोंडात टाकायला लागतं तेव्हा देता ही येतात.

हल्ली कोकम आगळ म्हणून अमृत कोकम सारखाच पण बिन साखरेचा अर्क बाजारात मिळतो. तो वापरून नारळाचं दूध घातलेली सोलकढी अगदी पट्कन आणि मस्त होते. पण सोलकढी प्रिय आहे जास्त करून मालवण सावंतवाडी भागात. आमच्या देवगड भागात ती फार केली जात नाही . कधीतरी आठवण झाली आणि मुद्दाम केली तरच होते. आणि आम्ही त्याला सोलकढी न म्हणता सोलांचं सार म्हणतो.

हे सगळं करून झाल्यावर रातांब्याच्या ज्या बिया उरतात त्या धुवून चांगल्या वाळवतात आणि मग त्यांची वरची सालं काढून आतला भाग पाण्यात घालून चांगला उकळवतात थोड्या वेळाने बियांच तेल वर तरंगू लागतं. थंड झालं की ते थिजतं. ते अलगद काढून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवतात. हेच ते कोकम तेल. तो गोळा थोडा विस्तवावर धरायचा आणि वितळलेला भाग थंडीत पाय , ओठ फुटतात त्यावर चोळायचा. ह्या वितळलेल्या तेलाचा एक मंद मस्त वास येतो जो मला खूप आवडतो. पूर्वी मे महिन्यात कोकणातून येतानाच्या आमच्या सामानात हे कोकम तेलाचे गोळे हमखास असत. तेव्हा घरोघरी हेच तेल वापरत थंडीत पण आता जमाना बदललाय, पाच दहा रुपयात व्हॅसलीन ची डबी मिळते विकत म्हणून ह्याला कोणी विचारत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी बाहेरून आल्यावर हे सरबत प्यायले तर dehydration कमी होत, उन्हामुळे डोकं दुखत असेल तरी ही बरं वाटत. पित्तावर हे रामबाण औषध आहे. कधी कधी अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्यावर जर कोकमं पाण्यात भिजवून ते पाणी हलक्या हाताने चोळलं तर लगेच गुण येतो. कधी तोंडाला रुची नसेल तर थोडी साखर घालून एखाद कोकम चोखलं तरी फायदा होतो. असे अनेक गुण आहेत या कोकमाचे.

सालापासून बियांपर्यंत सगळ्यांचा उपयोग असणाऱ्या ह्या बहुगुणी परंतु दुर्लक्षित अशा रातांब्याची आणि कोकमाची ही कहाणी इथे सफल संपूर्ण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाचला नाही अजून. रातांबे म्हटल्यावर धावत आले, फोटो क्युट, लवली लाल गुलाबी रातांबे अगदी तेजोमय माणिक. छान नाव दिलंय लेखाला.

रातांबे वाचल्यावर माहेरचे घर आठवते कोकणातले आणि हाराभरून रातांबे फोडायला बसणारे आम्ही लहान मुलं. लाल लाल होणारे हात आणि मधेच एखादे तोंडात चघळून लाल होणारे तोंड आठवतं. सासरी पण आहेत, तिथेही गेलेकी मदत करते पण काही गोष्टी मला माहेरच्या कोकणात नेतात.

वाह सुंदर लेख.

तुम्ही किती प्रेमाने अभ्यासपुर्ण लेख लिहिता.

मला रातांबे विळीवर कापण्यापेक्षा हाताने फोडायला जास्त आवडतात. मजा येते हाताचा रंग बघतांना.

आपल्याकडे कोकम सार करायची पद्धत आहे सोलकढीपेक्षा याला अगदी अगदी.

कोकमतेल माझ्याकडे आहे जपून ठेवलेलं, वापरलं जात नाही, अधूनमधून बघायला आवडतं.

तुम्ही म्हणता तितकं मला दुर्लक्षित नाही वाटत, कोकणात तरी ह्याच्याशिवाय पान हलत नाही. कुळथाच्या पिठल्यात आणि तुरीच्या आमटीत आवर्जून कोकम घालावं असं मला वाटतं कारण कुळीथ आणि तूर पित्तकर आणि कोकम त्यावर मात करते. सरबत, सोलकढी तर आता सर्वदूर लोकप्रिय आहे.

आमच्याकडे चिंच गुळ वगैरे टाकून केलेल्या आमटीकडे नेहमीच तु. क. आहे. बनवतच नाही.
कोकम टाकून , वाटण लावुन केलेली आमटीच मन जिंकते.

कोकम सारास अगदी अगदी. सोलकढी म्हणजे विशिष्ट लोकांनी उगीच लाडीक दिलेले नाव आहे आणि हॉटेलवाल्यांनी केलेला वापर.

मस्त लेख! नेहेमीप्रमाणेच Happy
कोकम तेल लहानपणी वापरल्याच आठवतंय... कृत्रिम (?) पेट्रोलिअम जेलीपेक्षा हे नैसर्गिक प्रकार उत्तम.

नेहेमीप्रमाणे मस्त लेख. किती मनापासून छान माहिती देता तुम्ही.
कोकम गोळा आठवला मला लहानपणी आजीकडे होता. तुम्ही लिहिलंय तसं मेणबत्तीवर वितळवायचो आणि खास करून टाचेच्या भेगांना लावल्याचे आठवतंय. एक गोड चवीचे आमसूलं पण मिळायची ते कसे करतात?

एक गोड चवीचे आमसूलं पण मिळायची ते कसे करतात? >>> कोकम सरबत (अमृत कोकम) करण्यासाठी रातांबे फोडून त्यात साखर भरून ठेवतात, ते रोज काही दिवस उन्हात ठेवायचं, मग साखर विरघळून तयार होतं ते अमृत कोकम आणि बाहेरची साले अजून सुकवतात ती गोड आमसुले किंवा गोड कोकमं, इति नवरा.

मस्त लेख आहे
कोकम चा ओरिजिनल रंग खरंच माणिक दिसतो

मस्त!
आमच्याकडे मात्र रातांबा हा शब्द वापरत नाहीत. कोकम हाच शब्द रूढ आहे. कोकम/ कोकंब. कोकंबाचं झाड. वाळवलेल्या सालांना आमसुलंच म्हणतो आम्ही. तुमच्या भागात सोलं नाही का म्हणत ?
आणि आंब्याची ती आंबोशी.
बाकी सगळं तुमचं आमचं सेम सेम Happy सोलकढी करायची पद्धत नाही. कोकम सरबत मात्र प्रिय. लहानपणी किती तरी कोकमांचा पांढरा गर खाऊन दात आंबवून घेतलेत त्याला सीमा नाही. आता आठवणीनेही दातांवर शिरशिरी येते Happy

मी कालच रात्री सोले भिजत घातली. आज हा लेख. आज सार करणार आहे भाताबरोबर. तो साखर घातलेला सरबत काँसन्ट्रेटचा रस फार सुरेख दिसतो. आपल्याला आवश्यक ते सर्व रंग निसर्गात आहेत. ती चटणी पण चांगलीच लागते चवीला. माझ्याकडे तो तेलाचा लांबट गोळा होता एकेकाळी. खरेतर नैसर्गिक व भेसळ नसलेली अशी किती उत्पादने आहेत कोकण खजिन्यात.

हेमा किती सुंदर लिहिले आहेस....

आमच्या आंबोली घाटात रातांब्याची झाडे आहेत. मे मध्ये मुले जंगलातून रातांबे गोळा करून आणतात आणि मग सगळ्यांच्या खळ्यात सुपात सोला वाळत घातलेली दिसतात. आमच्या गावी कोकम हा शब्द ओळखीचा नाही. रातांब्यांना भिरंडा म्हणतात. (त्याचा उच्चार मी शब्द जसा लिहिलाय तसा नाही होत, तो उच्चार लिपीत पकडता येणार नाही Happy ) कोकमाना सोला म्हणतात.

मुंबईत आल्यावर आमसूल म्हणजे सुकलेली कैरीची सोले हे कळल्यावर मी चक्रावले होते Happy माझ्यासाठी आमसुले म्हणजे आमची सोला म्हणजे कोकम. आमसुली रंग हा कोकमाचाच रंग आहे. माझी आई आलुबुखारांना भिरंडा समजून, मुंबईत भिरंडा लोक विकत घेतात म्हणून चक्रावली होती Happy भिरंडा ही विकत घ्यायची गोष्ट आहे याचा तिला धक्का बसलेला Happy

कोकम तेल जे सामान्य तापमानाला गोठते त्याचे खूप उपयोग आहेत. हे तेल शुद्ध करून वापरले तर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. कोको बटरच्या जागी स्वस्त पर्याय म्हणून ह्याचा वापर केला जातो. कोको बटर अतिशय महाग आहे, त्याच्या जागी हा स्वस्त पर्याय तितकाच चांगला आहे. कोकणी माणसांसाठी हा खूप मोठा धंदा होऊ शकतो पण आजूबाजूला मुबलक आढळणाऱ्या कुठल्याही उपयोगी गोष्टीची ' आमच्याकडे कोणिव ह्येका ईचारणार नाय' म्हणत उपहास करायची एक वृत्ती कोकणी माणसात आहे त्या वृत्तीने त्याची धंदा करायची दृष्टी मारलीय. आता कोकणात बाहेरच्या लोकांचा जो सुळसुळाट झालाय ते लोक नक्कीच याचा धंदा करून करोडो कमावतील.

लहानपणी किती तरी कोकमांचा पांढरा गर खाऊन दात आंबवून घेतलेत त्याला सीमा नाही>

हो, तो पिवळा रंग चढायचा ते आता आठवले तरी yukk वाटते Happy Happy तेव्हा काही वाटायचे नाही. कोकमे बी दाताला लागू न देता खायची धडपड असायची.

छान.
आमच्या बालपणी आमसूल (कधीकधी आमटीत घालायला) आणि आमसूलचे तेल (हिवाळ्यात अंगाला लावायला) असायचे घरात. कोकम हा शब्द पुण्यात आल्यावर ऐकला. ते आमसूलपेक्षा वेगळे काहीतरी असते असे वाटत होते. कोकम सरबत आवडते.
सोलकढी अज्याबात आवडत नाय.
आणि हो आमच्याकडे चिंच फक्त पितळी भांडी धुवायला वापरली जायची. आणि पोह्यांखेरीज इतर तिखट पदार्थात साखर/गूळ घालत नाही Lol

मस्त लेख मनीमोहोर.
मी फार काही केलं नाहिये, आजोळी बघितलं आहे लहानपणी!

नेहमीप्रमाणे मस्त लेख! आम्ही रोजच्या आमटीत आमसुलंच (कोकमच) वापरतो. सोलकढी आवडते तिही अधूनमधून केली जाते. मला बाजारातलं आगळ आवडत नसल्याने (प्रिझरवेटीव्ज टाळायला)आमसुलं भिजत घालून सरबत किवा सोलकढीत वापरते. नारळाबरोबर भिजत घातलेली आमसुल वाटली की सुरेख रंग येतो तसेच दाण्याच्या आमटीलाही.

आणि हो आमच्याकडे चिंच फक्त पितळी भांडी धुवायला वापरली जायची>>>

मीही हेच लिहिणार होते पण म्हटले जाऊदे, चिंचप्रेमीसुद्धा असणार. मला कित्येक वर्षे चिंच सैपाकात वापरतात हे माहितही नव्हते. सांबार घरात शिरले व त्याच्यासोबत चिंच. Happy Happy

नेहमीप्रमाणे मस्त लेख.

कोकणातील माणिक >>> पर्फेक्ट उपमा. फोटो सुद्धा यम्मी.

लहानपणी दर सुट्टीत आज्जी बरोबर कोकणात जायचे. तिच्या माहेरी. तेव्हा ही सगळी मजा अनुभवली आहे. आता इतक्या वर्षांनी ह्या महिन्या अखेरीस जातीये कोकणात. आज्जीच्या गावी . आता हा लेख वाचुन पुढेचे दोन आठवडे कधी संपणार ह्याची वाट बघतिये.

मस्त लेख. वाचुन बरं वाटलं.
आमची गावी एक बाग आहे. जवळपास ३६० कोकमाची झाड.
आठवड्यापूर्वीच काढलेले हे फोटो....
.
IMG-20190409-WA0000.jpg

.
IMG-20190409-WA0006.jpg

.
IMG-20190409-WA0012.jpg

.
IMG-20190409-WA0016.jpg

ममो, अतिशय सुंदर लिहिलंय!

सगळ्यांच्या खळ्यात सुपात सोला वाळत घातलेली दिसतात. आमच्या गावी कोकम हा शब्द ओळखीचा नाही. रातांब्यांना भिरंडा म्हणतात. (त्याचा उच्चार मी शब्द जसा लिहिलाय तसा नाही होत, तो उच्चार लिपीत पकडता येणार नाही Happy ) >>>>>> साधना, अ बिग हग! आमच्याकडे सोलं म्हणतात. सोला हा कोकणी अवतार!
भिरंडा ...भिरिंडा...भिन्ना ऐकलं आहे.आईचं उगाडयाला घर होतं.घरी फक्त आईचे मामा असत.भरपूर माड,फणस!भिरिंडाची झाडेही असतील अनेक.२ झाडे तर घराकडे यायच्या वाटेवर होती.नदीवर पोहून येताना कधी ती भिरिंडे खात खात यायचे.पण वर साधनाने म्हटल्याप्रमाणे कोणी कधी ती फळे वेचून घरी आणली नाहीत की सोलं बनवली नाहीत.सगळी फुकट जात असतील.एकदाच फक्त भिरिंडे फोडून वाळत घातलेली पाहिली होती.तीही अशीच विना कष्ट करून मिळालेली! भिरिंडाच्या पानांनी बायका तांब्या-पितळेची भांडी घासताना पाहिलंय!

रातांबा हा शब्द भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज या पुस्तकात पहिल्यांदा वाचला.आईने अर्थ सांगितल्यावर झालेले 'अरे देवा' आठवते.

सोलकढी म्हणजे विशिष्ट लोकांनी उगीच लाडीक दिलेले नाव आहे आणि हॉटेलवाल्यांनी केलेला वापर.>>>>>>हॉटेलमधली कढी भिकार असते.आमच्यात कढी म्हणजे सोलकढीच.पहिल्या भातावर वरण /आमटी,दुसर्‍या भातावर कढी.केवळ माशांच्या जेवणातच नाही तर रोजच्या जेवणात कढी असतेच.गोव्याला या कढीत नारळाचे दूध घालत नाहीत.त्याकढीला फुटी कढी म्हणतात.

ममो,अवांतराबद्दल क्षमस्व!

सगळेच प्रतिसाद खूप च सुंदर ,मूळ धाग्याची शोभा वाढवणारे.

एक गोड चवीचे आमसूलं पण मिळायची ते कसे करतात? >> अंजली अंजू ने लिहिलंय अगदी तसच करतात. मी ही वर लिहिलं आहेच.
तुमच्या भागात सोलं नाही का म्हणत ? >> हो, वावे म्हणतात सोलं अस ही .

कोकमतेल माझ्याकडे आहे जपून ठेवलेलं, वापरलं जात नाही, अधूनमधून बघायला आवडतं. >> अंजू हे फार आवडलं, काही काही गोष्टी नुसत्या बघून ही किती समाधान वाटत ना !

मुंबईत आल्यावर आमसूल म्हणजे सुकलेली कैरीची सोले हे कळल्यावर मी चक्रावले होते Happy माझ्यासाठी आमसुले म्हणजे आमची सोला म्हणजे कोकम. आमसुली रंग हा कोकमाचाच रंग आहे. माझी आई आलुबुखारांना भिरंडा समजून, मुंबईत भिरंडा लोक विकत घेतात म्हणून चक्रावली होती Happy भिरंडा ही विकत घ्यायची गोष्ट आहे याचा तिला धक्का बसलेला >> मजा आली वाचून साधना
आता कोकणात बाहेरच्या लोकांचा जो सुळसुळाट झालाय ते लोक नक्कीच याचा धंदा करून करोडो कमावतील. >>अगदीच परफेक्ट लिहिलं आहेस साधना

विकतची सोलकढी न आवडणारे इथे आहेत हे वाचून बरं वाटलं. मंजू , बरोबर करून दिलीस आठवण, दाण्याच्या आमटीत ही सोलंच चांगली लागतात ताक किंवा चिंचे पेक्षा.

नताशा, एन्जॉय कोकण ट्रिप , फुल नॉस्टॅल्जिक होऊन घे दोन आठवडे.

लहानपणी आम्ही कोकम गोळाच लावायचो , चिमणीवर धरला की वितळायचा. आता कोणी विचारत नाही पण तेव्हा तो ही पुरवून पुरवूनच वापरला जात असे.

देवकी मस्तच प्रतिसाद . गोवा भागात रोज ही बिन नारळाच्या दुधाची कढी असते हे मैत्रीणीमुळे माहितेय. मस्त माहिती लिहिली आहेस.

Btw भिरंडा हा शब्द मात्र अगदीच नवीन आहे माझ्यासाठी.
सिद्धी फोटो साठी लाख लाख धन्यवाद. काल खूप शोधून ही मिळाला नाही माझ्याकडे म्हणून शेवट नाईलाजाने नेट वरचा
टाकला होता. माझ्याकडे अख्ख्या रातांब्याचा आणि वाळत घातलेल्या सोलांचा आहे फोटो ,पण तो अपलोड होत नाहीये. बघते परत ट्राय करून.

रातांब्याच माणिक नाव आवडलं, आवर्जून सांगितलं, खूप खूप धन्यवाद.

मनीमोहोर- धन्यवाद कसले त्यात, हे फोटो अपलोड करून माझ्या मनाला कित्ती समाधान मिळल, तुमच्या पोस्ट मुळेच हे शक्य झालय.

छान आहे लेख मनीमोहोर. गावातली आजी शेजारच्या बायकांच्या मदतीने हे सगळे वाळवण काम करायची ते आठवले. आम्ही फक्त माकडमेवा खायच्या कामाचे.
इतका लालबुंद रंग आहे तर लोह पण भरपूर असेल रातांब्यांमध्ये. बघायला पाहिजे. बाकी पित्त, अपचन, उन्हाळ्यात भूक मंदावणे, शोष पडणे यावर गुणकारी आहेच.

कोकम चटणी आणि सार कितीही चविष्ट + देखणे असले तरीही चटणी फक्त पितृपक्षात करायची आणि सार सणाच्या / शुभकार्याच्या दिवशी रात्रीच्या जेवणातही करायचे नाही असा दंडक होता इकडच्या आजीचा. ती घरी नसली तरीही तिच्या सुना कितीही मस्का लावला तरी करायच्या नाहीत.

साधना तो उच्चार भिरणा(+डा) = भि --- र अर्धा रफारासारखा फास्ट म्हणायचा --- णा इथे ण थोडा नाकात म्हणायचा त्याला पुसटसा ऐकू येईल इतकाच ड जोडून. असा काहीसा आहे ना?

'सिद्धि' फोटो सुरेख आहेत.

उच्चार भिरणा(+डा) = भि --- र अर्धा रफारासारखा फास्ट म्हणायचा --- णा इथे ण थोडा नाकात म्हणायचा त्याला पुसटसा ऐकू येईल इतकाच ड जोडून. असा काहीसा आहे ना?>>> हो ग कारवी

कारवी, हो तसाच काहीसा आहे. ऐकणाऱ्याला भि आणि डा स्पष्ट ऐकायला येते, मधले र आणि ण असेच अधांतरी लटकतात... Happy Happy मालवणीच माणूस हवा ते उच्चारायला.

Pages