अल-अझीज

Submitted by हरिहर. on 8 April, 2019 - 10:55

अल अजीज.jpg
सकाळपासुन काही ना काही गोंधळ होत होता. सुरवातच उशीरा उठण्याने झाली होती. उशीर झाला म्हणून घाईने बाथरुममध्ये घुसलो तर ब्रश करताना तो जोरात हिरडीला लागला. कळवळत अंघोळ उरकली आणि कपडे घालून सोफ्यावर बसलो. यात मात्र माझा कधी वेळ जात नाही कारण माझे वार्डरोब ब्लु जिन्स आणि ब्लॅक टीशर्ट यांनीच भरलेले आहे. त्यामुळे ‘आज काय घालू?’ या प्रश्नात वेळ जात नाही. बायको कधी कॉफी देतेय याची वाट पहात सोफ्यावर टेकलो तर ‘अजुन उशीर होऊ नये’ म्हणून बायकोने अगोदरच कॉफीचा मग सोफ्याच्या आर्मवर आणून ठेवला होता, त्याला धक्का लागला. कॉफी गेली त्याचे वाईट नाही वाटले, पण मी कुठून कुठून शोधुन आणलेल्या मग सेटमधल्या शेवटच्या मगाचा बळी गेला. एक होता स्टडीटेबलवर पण त्यात माझे पेन आणि ब्रश वगैरे सामान होते. बरं बायकोवर वैतागन्यात काही अर्थ नव्हता. तसही तिला कॉफीचा मग गेल्याचे फारसे काही वाटणार नव्हते. ती सरळ मद्राश्यासारखी फुलपात्रात कॉफी पिते. ‘मरो ती कॉफी’ म्हणत मी मोजे ठेवलेल्या ड्रॉवरकडे हात केला पण तो विचार सोडून दिला. नकोच आज बुट. मोजे असतीलही जाग्यावर पण नसले म्हणजे डोक्यातल्या वैतागाला अजुन एक वेढा बसायचा. त्यापेक्षा सँडेल्स बरे. सँडेल्स चढवून मी दाराच्या बाहेर जाऊन उभा राहीलो. दातात कंगवा धरुन बायकोची अजुनही काहीतरी शोधाशोध चाललीच होती. शेवटी पर्स घेऊन ती बाहेर पडली. तिला हट्टाने दारापासुन दुर करत मी स्वतः कुलूप लावले. नाहीतर तिला कुलूप लावायला दहा मिनिटे तरी लागले असते. खाली पार्कींगला येवून दुरुनच गाडी अनलॉक करायचा प्रयत्न केला तर होईनाच. म्हटलं आज काय नजर वगैरे लागली की काय कुणाची? काय चाल्लय हे? अगदी गाडीजवळ जाईपर्यंत मी हातातली की दाबत राहीलो पण कार काही अनलॉक झालीच नाही. तेवढ्यात बायकोने गाडीची चावी पुढे केली आणि मग लक्षात आले की इतक्यावेळ मी घराचीच चावी प्रेस करुन लॉक उघडायचा प्रयत्न करत होतो. इतरवेळी मी हसलो असतो पण आता मात्र स्वतःच्या मुर्खपणावरच जाम चिडलो. वैतागुन गाडी पहिल्या गेटमधून बाहेर काढली. आमच्या सोसायटीला दोन गेट आहेत. पहिले सोसायटीजवळ आणि दुसरे अर्धा किलोमिटर दुर, मेन रोड जवळ. दुसऱ्या गेटच्या समोरुनच मेन रोड आडवा गेला आहे. गेटच्या दोन्ही बाजूला भाजीचे, फळांचे स्टॉल, राजस्थान्यांची ‘बालाजी’ सुपर मार्केट्स वगैरे आहेत. गेट दिसताच मी दुरुनच हॉर्नवर हात ठेवला तो काढलाच नाही. वॉचमन बिचारा पळत आला व गाडी जवळ यायच्या आतच त्याने पुर्ण गेट उघडले. एऱ्हवी तो अर्धेच उघडतो. मी थोडीही गती कमी न करता गाडी बाहेर काढली आणि डावीकडे वळवली. समोर पाहीले आणि मी करकचून ब्रेक मारला. आजचा दिवस माझा नव्हताच एकुन. त्यात माझी मनःस्थीती आता अशी झाली होती की मला चिडायला काहीही कारण चालले असते. तेच झाले होते. गेटच्या शेजारी तिन चार बंद गाळे होते. ते आताही बंदच होते पण त्यावर चांगला लांबलचक हिरवागार बोर्ड लावलेला होता. त्यावर पिवळ्याजर्द अक्षरात लिहिले होते “अल-अझीज” निम्या बोर्डवर देवनागरीत तर निम्या बोर्डवर उर्दुमध्ये. त्या नावाखेरीज त्या बोर्डवर कसलाही उल्लेख दिसत नव्हता. काही लोगो, कसले दुकान आहे, कुणाचे आहे, फोन नंबर वगैरे काही नाही. फक्त नाजुक अक्षरात लिहिलेले अल-अझीज.
“गोविंदभाऊ….इकडे या अगोदर” मी वॉचमनला हाक मारली. बिचारा अजुन गेट लावतच होता. ते अर्धवट सोडून तो पळत आला.
मी समोरच्या बोर्डकडे हात करत विचारले “हा कसला बोर्ड आहे गोविंदभाऊ? काल तर येथे नव्हता. काय सुरु होते आहे?”
“जी, माहित नाही साहेब. मी पण सकाळीच बोर्ड पाहिला”
आधिच उशीर होत चालला होता त्यात या गोविंदलाही काही माहित नव्हते.
“अहो पण तुम्ही येथे असताना बोर्ड लागतो आणि तुम्हाला माहितही नाही? असं कसं चालेल गोविंदभाऊ? कुणाचा बोर्ड आहे, कसला आहे याची चौकशी करुन मला सांगा संध्याकाळी” म्हणत मी निघालो.
बायको म्हणाली “एवढं चिडायला काय झालं? असतो एखादा दिवस असा”
“तसं नाही गं. दिवसाचे आता वाटोळे झालेच आहे पण तो बोर्ड डोक्यातच गेला एकदम. उर्दुत काय बोर्ड लावतात येथे? मुसलमान वस्ती आहे का? आणि कसले दुकान आहे तेही माहित नाही. एखादा युपी बिहारी असला आणि त्यात त्याने भाजीचा वगैरे स्टॉल लावला तर बंदच करायला लावेन मी. लाज वाटायला लागलीय मला आता “भैय्या जरा दो रुपये की कोथिंबीर द्येव चांगली” या आपल्या हिंदीचा. ते भय्ये आपल्याला कुत्सित हसतात असा भास होतो मला नेहमी. ‘भाजीवाल्या मावशी’ हा प्रकारच नामशेष केलाय आपण”

वाटला होता तसा दिवस वाईट गेला नाही. दोघेही कामात चांगलेच गुंतून गेलो. उलट नेहमीपेक्षा आज जरा जास्तच कामे निघाली. दुपारच्या जेवणालाही दांडी मारावी लागली. पाच मिनिटात सँडविच खावून पुन्हा दोघे कामाला जुंपलो गेलो. आज रोजपेक्षा जरा उशीरच झाला घरी निघायला. बाहेरच छानसे जेवण करुन घरी निघालो. डोक्यातुन तो सकाळचा बोर्ड गेला होता. दिवस चांगला गेल्यामुळे वैतागही नव्हता. गेट जवळ आल्यावर मी इंडिकेटर दिला आणि काच खाली करुन स्पिड कमी करत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. गाडी गेटकडे घेताना अचानक इतका सुरेख बिर्याणीचा वास आला की माझ्या मेंदुतल्या आठवणींच्या तारा क्षणात छेडल्या गेल्या. खायचे तर दुरच, असा सुगंध घेऊनही मला काही वर्ष झाली होती. हा नुसत्या बिर्याणीचा वास नव्हता तर अगदी पारंपारीक पध्दतीने केलेल्या, आदर्श बिर्याणीचा सुगंध होता. पोट भरलेले असुनही त्या वासाने जीभेचे टेस्ट बडस् चेतवले गेले. भुक लागल्याचा भास झाला.
बायको म्हणाली “गेटच्या आत घेऊन थांबव गाडी. आपण पाहूयात कुठे नविन हॉटेल वगैरे झाले आहे का ते”
मी नकार देत गाडी सरळ घराकडे वळवत म्हणालो “शक्य नाही. नुसत्या वासावरुन मी सांगतो की ही अशी बिर्याणी फक्त प्रचंड अनुभवातूनच बनवता येते. आणि असा अनुभवी माणूस काही असे कुठेही हॉटेल काढणार नाही. तो स्टार हॉटेलमध्येच काम करनार. ही नक्कीच कुणाच्या तरी दादी-नानीने बनवलेली बिर्याणी असणार. दे सोडुन”
बायकोही मान हलवत म्हणाली “जाऊ दे मग. मी करेन रविवारी बिर्याणी. अगदी घड्याळ लाऊन करेन प्रत्येक स्टेप. मग तर झाले?”
बायको तशी सुगरण. तिच्या हाताला खरच फार सुरेख चव आहे. पण बिर्याणी मात्र तिला इतक्या वर्षात प्रसन्न झाली नाहीए. म्हणजे जमते, नाही असे नाही पण तो प्रकार अगदी डॉक्टरांसारखा असतो. डॉक्टर जसे शेवटी सांगतात “मी माझ्या परिने सर्व प्रयत्न केले आहेत, आता पुढे सर्व काही त्याच्या हातात” अगदी तसेच असते बायकोच्या बिर्याणीचे.
“माझ्या परिने मी निगुतीने केली आहे, आता त्या हांडीतल्या कोंबडीच्या मनात असेल तसे होईल” असे म्हणून हांडीला दम लावला जातो. तासाभराने लुसलुशीत बिर्याणी ताटात येणार की खिचडी हे दैवावर अवलंबुन असते. गाडी आणि बिर्याणीचा विचार पार्कींगलाच सोडून आम्ही घरी आलो. दमलो होतो. अंघोळ उरकून मी ब्लँकेटमध्ये गुरफटून घेतले.

दुसऱ्या दिवशी कामानिमित्त भल्या पहाटे पुणे सोडले आणि ती बिर्याणी मागे पडली. कामाच्या व्यापात सँडविच-कॉफी जरी वेळेत मिळाली तरी देव पावला अशी अवस्था होती. त्यात कुठून ही बिर्याणी लक्षात रहाणार. त्यातही त्या बिर्याणीचा नुसता दरवळ अनुभवला होता, ती कशी लक्षात रहावी? चार दिवसांनी कामे उरकुन, दिवसभर ड्राईव्ह करत संध्याकाळी एकदाचा पुण्यात पोहचलो. चार पाच दिवस घरी नसल्याने नकळत घराची ओढ लागली होती. दुपारी कधीतरी उभ्या उभ्या काहीबाही खाल्ले होते त्यामुळे भुकही लागली होती. कधी एकदा घरी जावून अंघोळ करतोय आणि वाफाळता वरणभात कोशिंबीर खातोय असं झालं होतं. गेटवर पोहचल्यावर हेडलँप बंद केले. गोविंदने गेट उघडले. गाडी अर्धी गेटच्या आत, अर्धी बाहेर अशी उभी करुन मी काच खाली केली आणि गोविंदला विचारले “कसे आहात गोविंदभाऊ?”
ही माझी नेहमीची सवय. “मी बरा आहे साहेब” एवढं ऐकायचे आणि निघायचे. पण काच खाली केली आणि तोच त्या दिवशीचा बिर्याणीचा दरवळ नाकाशी सलगी करुन गेला. नुसत्या वासावरुन कोणता मसाला किती पडलाय याचा मला अंदाज आला. तुपाच्या वासाबरोबर खरपुस भाजलेल्या बटाट्याचाही किंचीत वास त्यात होता. म्हणजे अगदी जाणत्या सुरकुतल्या हाताने बिर्याणी केली असणार. मी गोविंदला विचारले “गोविंदभाऊ वास फार सुरेख येतोय हो. येथे कुठे नविन हॉटेल सुरु झालेय का?”
गोविंदने त्रासीक चेहरा करत सांगीतले “हॉटेल नाही हो साहेब. एक मुसलमान रोज संध्याकाळी बिर्याणी करतो हांडीभर आणि रस्त्यावरच विकत बसतो. आपल्या गेटसमोर येते गर्दी कधी कधी. मी चेअरमनला नाहीतर तुम्हाला सांगणारच होतो. बरे झाले तुम्हीच आठवण काढलीत. त्रास आहे नुसता त्या म्हाताऱ्याचा”
मी पुन्हा गाडी रिव्हर्स घेत गेटबाहेर काढली. मी जिथे अल-अझीजचा बोर्ड पाहीला होता तेथे छोटेसे पत्र्याचे शेड केले होते. एक मोठा हॅलोजनसारखा दिवा लावलेला होता आणि छताखाली नुसती गर्दी उसळली होती. मी विचार केला की एक पार्सल घेऊन जावे टेस्ट करण्यासाठी. मग निवांत बायकोला घेवून येता येईल. पण मी गाडीतुन खाली उतरलोच नाही. कारण जरा लक्ष देऊन पाहिल्यावर लक्षात आले की समोर जी गर्दी होती ती सगळी कामगार लोकांची होती. आजुबाजूला ज्या कन्स्ट्रक्शन साईट सुरु होत्या तेथले हे मजुर असावेत. कामावरुन परस्पर इकडेच आल्यासारखे वाटत होते. तेच कपडे, तसेच सिमेंट धुळ उडालेले दमलेले चेहरे, आणि आपण घाई नाही केली तर बिर्याणी मिळणार नाही अशी प्रत्येकाची केविलवाणी पण चिड आणनारी चढाओढ. ते दृष्य पाहुन मला “नको ती बिर्याणी” असे झाले आणि मी “गरीबाला भुक लागलीच नसती तर किती बरे झाले असते” असा विचार करत मागे फिरलो.
केबिनबाहेर येणाऱ्या गोविंदला केबिनमध्येच थांबायचा इशारा करुन मी विचारले “का हो गोविंदभाऊ, हा म्हातारा काय फुकट बिर्याणी वाटतो की काय? किती गर्दी आहे ती!”
रजिस्टर मिटत गोविंद म्हणाला “नाही साहेब. फुकट नाही देत, पण फक्त ६० रुपयात बिर्याणीचे पार्सल देतो. जरा तिरसट असावा म्हातारा पण बिर्याणी एकदम फस्टक्लास असते साहेब. मी अशी बिर्याणी बापजन्मात नाही खाल्ली. तुम्ही व्हा पुढे साहेब, जर म्हाताऱ्याने दिले तर एक पार्सल पाठवतो मी घरी”
त्या संध्याकाळी काही पार्सल घरी आले नाही. रविवारी बायकोने केलेली बिर्याणीही मस्त जमुन आली आणि तो विषय तेवढ्यापुरता मागे पडला. एक दिवस मी काम संपवून दुपारीच घरी परतलो. बायको नेहमीच्या वेळेवर येणार होती. जेवण झाले नव्हते. मी घरी येऊन किचनमध्ये भाजी काय आहे ते पाहिले. भोपळ्याची भाजी दिसली आणि मी गोविंदला फोन करुन काहीतरी पार्सल पाठवायला सांगितले. फ्रेश होईतो दारावरची बेल वाजली. वॉचमन पार्सल देवून गेला. मी रात्रीचे अर्धवट राहीलेले पुस्तक काढले, प्लेट घेतली आणि पार्सल उघडले. आहाऽहा! तोच बिर्याणीचा दरवळ. एकुन आज नशिबात होती त्या म्हाताऱ्याची बिर्याणी. मी घाईने पुस्तक बाजुला सारले आणि ताट व्यवस्थित वाढुन घेतले. कोणतीही बिर्याणी प्रथम वासावरुन कळते, मग स्पर्शावरुन कळते आणि मग चविवरुन समजते. वास तर मी गेले आठवडाभर घेत होतोच. मी थोडा पांढरा-केशरी भात, थोडा मसाला एकत्र केला तेव्हाच कळाले की भात अतिशय तलम शिजला होता. पहिला घास घेतला आणि चिकनचा एक छोटा तुकडा मी तोंडात टाकला आणि अक्षरशः त्या चविने मी मोहरुन गेलो. गेले कैक दिवस ज्या चविसाठी जीव आतुर झाला होता ती चव फक्त साठ रुपयात माझ्या ताटात आली होती. मित्राची दादी बिर्याणी करायची ती चव आठवली. दादी गेल्यानंतर आम्ही तिच्यापेक्षा तिच्या बिर्याणीलाच जास्त मिस केले होते. त्यालाही आता पंचविस वर्षे उलटून गेली होती. समोरची बिर्याणी दादीच्या बिर्याणीपेक्षाही काकणभर सरसच होती. पुर्ण बिर्याणी खाईपर्यंत त्यात मला एकही खडा मसाला सापडला नाही की संपल्यावर खाली ताटाला किंचितही तेलाचा किंवा तुपाचा थर जमा झाला नव्हता. सोबत रायते नव्हते हे ही माझ्या लक्षात आले नव्हते. कमाल! कमाल! आफ्रिन! मनासारखे चवदार अन्न मिळणे या सारखे सुख नाही दुसरे. त्यात या असल्या दुर्मीळ चवी पुन्हा मिळने म्हणजे तर भाग्यच. आणि ही बिर्याणी आमच्या गेटबाहेर मिळत होती. त्यासाठी कुठे हैद्राबाद, लखनौला जायची गरज नव्हती. मी अत्यंत तृप्त मनाने उठलो. डिश बेसीनमध्ये सरकवली आणि रवंथ करायला जनावरे सावलीला बसतात तसा मस्त जाऊन बेडवर लवंडलो. पुस्तक नाही की संगीत नाही. नुसताच डोळे मिटून जुने दिवस आठवत पडून राहीलो. एका साठ रुपयांच्या बिर्याणीने केलेली कमाल होती ती.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता. काही प्लॅन्स नव्हते. दिवस लोळूनच काढायचा होता. जमलं तर आज कॅन्व्हास लावायचा विचार होता इझलवर पण तेही नक्की नव्हते. फ्रिज साफ करुन आठवडाभरासाठी भरुन ठेवणे आणि गाडी धुणे ही कामे होती पण ती संध्याकाळी करायची होती. त्यामुळे आजची दुपार बिर्याणीवाल्या म्हाताऱ्याबरोबर घालवायची असं मी ठरवले. लागले काही हाताला नविन तर लागले. चार वाजता वाडगाभरुन दुध-शेवया खाल्या, खिशात मुठभर खारवलेले पिस्ते भरुन घेतले आणि त्या म्हाताऱ्याला भेटायला निघालो. माझा बर्म्युडा-बंडीतला अवतार पाहुन बायकोने हटकले, पण ‘कुठे महत्वाच्या कामाला निघालोय?’ असा विचार करुन तसाच बाहेर पडलो. एक एक पिस्ता सोलुन तोंडात टाकत मी दहा मिनिटात अल-अझीजजवळ पोहचलो. तिन शटरपैकी डाव्या बाजुचे शटर अर्धे उघडे होते. बाकी दोन बंद होती. रस्ता आणि दुकाने यांच्यामध्ये खुप मोठे बाभळीचे झाड होते. त्याची पिवळीधमक फुले सगळीकडे पडली होती. अधेमधे वाळलेल्या शेंगाही विखुरल्या होत्या. दुकानांसमोर पत्र्याचे शेड होते. शेडमध्ये दाक्षिणात्य पध्दतीची शिसवी आरामखुर्ची होती. त्यावर एक धिप्पाड शरीराची म्हातारी व्यक्ती बसली होती. खुर्चीवर बसलेली असुनही त्या व्यक्तीची उंची लपत नव्हती. सहा फुटांच्या पुढेच असावी. अत्यंत धारदार नाक. निळे आहेत की हिरवे हे कळू नये असे तेजस्वी टपोरे डोळे. दोन्ही डोळ्यात कचकचीत सुरमा घातलेला. बुबळाभोवती किंचीत पांढरी वर्तुळे. डोक्यावर अगदी छोटीशी, संजाब असावा अशी आणि बरीचशी मागील बाजुला चेपुन बसवलेली पांढरी जाळीदार टोपी. आधीच भरदार असलेले व लहान टोपीमुळे जास्तच मोठे दिसणारे कपाळ. दोन्ही भुवयांच्या मध्ये नमाज पढुन उमटलेला काळसर चट्टा. गुरु नानकांसारखी पांढरी आणि भरदार दाढी. मिशा अगदीच साफ केलेल्या. त्यामुळे भालबांच्या चित्रपटातील अफजलखान दिसे तसा दिसणारा चेहरा. नितळ गोरी कांती. उजव्या हाताच्या बोटांमध्ये एक चांदीच्या कोंदणात बसवलेली कवडीची अंगठी तर दुसऱ्या बोटात स्टिलच्या कोंदणात सुपारीएवढा निळा फिरोज. गळ्यात जायफळाच्या आकाराचे आणि तशाच रंगाचे असलेल्या मण्यांची माळ. अंगात अतिशय तलम, शुभ्र पठाणी व झब्बा यांचे मिश्रण असलेला कुर्ता. खाली चार जणांचे पायजमे शिवून होतील एवढा पायघोळ असलेला पायजमा. खुर्चीचा एक आर्म बाहेर ओढलेला. त्यावर मोठा काचेचा ग्लास. त्यात बहुतेक ब्लॅक टी असावा. मला वाटते मी बराच वेळ त्यांच्याकडे मुर्खासारखा पहात असणार.
त्यांनी उजवा हात किंचीत उचलून हसत विचारले “सलाम! क्या चाहीए बेटा? बिरयाण शामको मगरीब के बादही मिलेगा”
एक तर त्या माणसात काहीतरी विचित्र आकर्षण होतेच पण आवाज घसा बसल्यासारखा असुन देखील त्यात एकदम मिठास होती. जिव्हाळा होता. उच्चार पेशावरी उर्दु लहेजाचे होते. त्या माणसाच्या नुसत्या नजरभेटीने मी इतका भाराऊन गेलो होतो की मला माझाच एकदम राग आला. “काय कारण आहे कुणी नुसत्या नजरेने आपल्यावर अशी सत्ता गाजवायची?” असा काहीसा विचित्र विचार मनात आला आणि मी अगदी माझ्या स्वभावाच्या उलट वागत त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करुन त्या अर्ध्या उघड्या शटरमधुन आत घुसलो. समोर लाकडी टेबलवर एक तिस वर्षांच्या आसपास असलेला माणूस अॅप्रन घालुन अत्यंत सफाईने कांदा कापत होता. मला पाहुन तो “आदाब साहब” म्हणाला आणि परत त्याच्या कामात गुंतला. बाहेरुन जरी तिन शटर दिसत असली तरी आतमध्ये ते एक गोडाऊनसारखे आडवे एकसंध दुकान होते. मी आत नजर फिरवली. सगळ्या दुकानाला विसंगत अशा सुंदर क्रिम कलरच्या टाईल्स जमीनीवर बसवलेल्या होत्या. एका बाजुला पोत्यांची थप्पी लावलेली होती. त्यावर लिहिलेल्या ब्रँडवरुन तो उत्तम दर्जाचा बासमती असणार हे लक्षात येत होते. दुसऱ्याबाजुला कांद्यांच्या आणि बटाट्याच्या काही गोणी रचुन ठेवलेल्या होत्या. समोरच काही बॅग्ज व्यवस्थित मांडलेल्या होत्या. त्यातली एक फोडलेली होती. त्यात अख्खे काजु होते. शेजारीच साजुक तुपाच्या डब्यांची उतरंड होती. शटर शेजारी एक लाकडी ड्रम होते. त्यात लांब आकाराचे कलथे आणि दोन झारे उभे करुन ठेवले होते. दोन मोठ्या मुघलाई हंड्या पालथ्या घालुन ठेवल्या होत्या. तिन चार झाकणे भिंतीला टेकवून उभी केलेली होती. मला समजेनाच की इतक्या उत्तम दर्जाचे साहित्य वापरुन हा म्हातारा साठ रुपयाला कशीकाय बिर्याणी विकत होता? मागील बाजुस एकच कमी रुंदीचे शटर होते. मी दुकानाच्या मागे डोकावून पाहीले. तेथे एक मोठी चटई अंथरलेली होती आणि त्यावर उभा पातळ कापलेला कांदा वाळत घातलेला होता. शेजारी काही गॅसचे सिलेंडर दिसत होते. मी पुन्हा दुकानात आलो. जरा एका बाजुला दोन शेगड्या मंद पेटलेल्या होत्या. त्यातल्या एकीवर हॉटेलमध्ये असतो तसा मोठा पावभाजीचा तवा होता व त्यावर एक हंडी ठेवलेली होती. वरच्या झाकणावर मोठा खलबत्ता ठेवलेला होता. जरा दुर असलेल्या दुसऱ्या शेगडीवरही जरा लहान आकाराची हंडी होती. तिचे तोंड जाड कापडाने गुंडाळलेले होते व त्या कापडावरुन जड झाकण ठेवलेले होते. कांदा कापणाऱ्या व्यक्तिव्यतिरीक्त दुकानात कुणीही दिसत नव्हते.
मी त्या मुलाला विचारले “ते बिर्याणी बनवतात ते कुठे आहेत?”
“जी, क्या कहाँ आपने?” म्हणत तो प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहात राहीला.
बहुतेक त्याला मराठी समजली नसावी. मी पुन्हा विचारले “बिर्याणी बनाते है वो कहाँ है?”
आता मात्र त्याला समजले असावे. त्याची थांबलेली सुरी पुन्हा लयीत सुरु झाली आणि तो म्हणाला “कौन रसुलचाचा? वो बाहर बैठे है। आपने देखा नही आते वक्त?”
माझ्या कपाळावर आठ्या आल्या. म्हणजे मी ज्या म्हाताऱ्याला भेटायला आलो होतो त्याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर अगोदरच उभे होते. लांब बाह्याचे बनियन, खाली निळ्या किंवा हिरव्या रंगाची चौकड्याची लुंगी, जाड फ्रेमचा चष्मा, टक्कल, गळ्यात एखादा हिरवा ताईत, पायात स्लिपर असं काहीसं चित्र मी ‘बिर्याणीवाल्या म्हाताऱ्याचे’ रंगवले होते. साठ रुपयाला मजुरांना बिर्याणी विकणारा युपी बिहारचा म्हातारा यापेक्षा काय वेगळा असणार होता. पण हा पोरगा सांगत होता की बाहेर बसलेले रसुलचाचा आहेत आणि तेच बिर्याणी बनवतात. हे काय चाललय तेच मला समजेना. बाहेर बसलेली व्यक्ती एखाद्या मोठ्या मॉलच्या गुबगुबीत खुर्चीत शोभुन दिसेल अशी होती. मी नुकताच त्यांचा अपमान करुन आत आलो होतो. आता मला त्यांच्यासमोर जायला कसेतरीच वाटत होते. मी ठरवले की दुकानाबाहेर पडायचे आणि सरळ घर गाठायचे. त्यांच्याकडे वळूनही पहायला नको. मी मान खाली घालून बाहेर पडलो आणि झपाट्याने सोसायटीच्या गेटकडे निघालो. इतक्यात मघाचाच तो मार्दव भरलेला आवाज आला “जरा सुनो बेटा. यहाँ आईए”
माझा आता अगदी नाईलाज होता. मला खुप शरमल्यासारखे वाटत होते. मी ओशाळे हसत मागे वळालो आणि आवाजात शक्य तितकी सहजता आणत म्हणालो “आदाब चाचा, कैसे मिजाँज है?”
चाचा हसुन म्हणाले “खैरीयत है बेटा. उसकी निगाहे करम है, इनायत है” मग मागे पहात म्हणाले “अरे बेटा अस्लम, जरा कुर्सी लगा साहब के लिए और चाय का बंदोबस्त कर जल्दी”
त्यांचा तो अस्लम खुर्ची घेवून येईपर्यंत मी चाचांसमोर वेंधळ्यासारखा उभा होतो. इतक्या निटनेटक्या माणसापुढे मी बर्मुडा आणि चुरगळलेली बंडी घालुन उभा होतो. घरातुन निघताना बायकोचे ऐकले असते तर बरे झाले असते असं वाटलं. इतक्यात अस्लम एक घडीची लाकडी खुर्ची घेवून आला. त्याने ती उघडून चाचांच्या समोरच ठेवली. अॅप्रनच्या खिशातुन किचन नॅपकीन काढुन अगदी व्यवस्थित स्वच्छ पुसली आणि पुन्हा आत गेला.
चाचा माझ्याकडे पहात म्हणाले “बैठो बेटा आरामसे. कहो कैसे आना हुआ. क्या चाहिए था? लगता नही के बिर्याणके लिए आए हो”
मी खुर्चीवर बसत म्हणालो “बिर्याणी साठी नव्हतो आलो बिर्याणीच्या कुकला भेटायला आलो होतो. काल बिर्याणी खाल्ली आणि दादीची आठवण आली. पंचविस वर्षानंतर अशी बिर्याणी खाल्ली”
चाचा गोंधळुन माझ्या चेहऱ्याकडे पहात राहीले. “माफ करना बेटा, बदकिस्मतीसे मराठी जुबाँ समज नही पाता हूं”
(चाचांना पुढे वर्षभर प्रयत्न करुनही मराठी आलीच नाही. त्यामुळे त्यांचे सगळे संवाद मराठी हिंदी मिश्र भाषेत लिहिणार आहे.)
मग मी त्यांना हिंदीत सांगीतले मी कशासाठी आलो होतो ते. ते ऐकले आणि त्यांचे डोळे लहान मुलासारखे आनंदाने चमकले. माझा हात हातात घेत थोपटत ते म्हणाले “जर्रानवाजी का शुक्रीया बेटा. अल्लातालाने तेवढीच कला दिली आहे बंद्याला. शुक्रान, बहोत शुक्रीया”
इतक्या छोट्याशा कौतुकाने त्यांना एखाद्या लहान मुलासारखा आनंद झालेला पाहुन मला गम्मत वाटली. त्यांनी चार चार वेळा मोकळेपणाने आभारप्रदर्शन केले ते ऐकुन संकोचही वाटला. काही वेळ एकमेकांची ओळख करुन घेण्यात गेला. मला सुरवातीला वाटलेला संकोच काही वेळातच दुर झाला. चाचाही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत होते. जरा वेळाने चाचांनी हातातली तसबीह खुर्चीच्या आर्मला अडकवली आणि टोपी काढून खिशात ठेवली. मीही खिशात हात घालुन मुठभर पिस्ते काढुन त्यांच्या समोर धरले. निवडल्यासारखे करत चाचांनी त्यातले काही पिस्ते उचलले आणि म्हणाले “जनाब आप भी हमारे जैसेही शौक पालते हो हुबहू. बडा अच्छा लगा आपसे मिलकर”
तासाभरात आमचा एकदा ब्लॅक टी आणि एकदा मसाला दुध घेवून झाले. ‘जनाब’ ‘आप’ अशा शब्दांनी सुरु झालेल्या गप्पा तासा दिडतासातच ‘बेटा’ ‘अप्पा’ या संबोधनापर्यंत आल्या. चाचा गप्पांमध्ये इतके रंगले होते तरी त्यांनी दोन वेळा अस्लमला गॅस मंद करायला आणि नंतर बंद करायला सांगीतले होते. खाली सगळीकडे पिस्त्यांची टरफले पडली होती. माझ्या खिशातला शेवटचा पिस्ता मी तोंडात टाकला
“बेटा, मगरीब का वक्त हो गया है. मुझे चलना होगा. बेवजह नमाजको कजा करना अच्छा नही लगता. तु येशील ना उद्या नक्की? मतलब अगर फुरसत हो तो जरुर आना. बडा अच्छा लगा तुमसे बात करके. मी उद्या इंतजार करेन. पक्का आना” म्हणत चाचा उठले. मग मीही उठलो. उठल्यावर मात्र चाचांची उंची एकदम नजरेत भरली. मी तर त्यांच्या पुढे अगदीच खुजा दिसत होतो. त्यांनी टोपी काढून डोक्यावर घट्ट बसवली व एका हाताने माझ्याशी हस्तोंदलन करुन तो हात ह्रदयावर ठेवत पुन्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी यायचा आग्रह केला. अस्लम खाली पडलेली टरफले झाडूने गोळा करत होता. चाचा आत जाईपर्यंत मी तेथेच शेडखाली उभा राहीलो. ते नजरेआड झाल्यावर मीही घरी निघालो. सुर्याचे मोठे लाल बिंब सोसायटीच्या इमारतीमागे झपाट्याने उतरत होते. उद्या पुन्हा याच वेळी चाचांना भेटायचे आहे हा विचार चालताना मनात आला आणि मला बरं वाटले. काही तासांपुर्वी ज्या माणसाला मी पहिल्यांदाच पाहिले होते त्या माणसाविषयी मला ही कसली वेडी ओढ लागली होती ते समजेना. चाचाही ज्या पध्दतीने पुन्हा पुन्हा उद्या यायचा आग्रह करत होते त्यावरुन त्यांनाही माझी सोबत आवडल्याचे दिसत होते. मी घरी आलो, अंघोळ करुन टिव्ही लाावला. बायकोचे किचनमध्ये काहीतरी चालले होते. मी टिव्हीचा आवाज बारीक करुन बायकोला आमच्या भेटीविषयी सांगत होतो. किचन मधुन बायको “हं, हूं” करत कामे उरकत होती. शेवटी मी टिव्ही बंद करुन बेडमध्ये जावून पुस्तक काढुन बसलो. आज मी “जेवायला काय आहे” वगैरे प्रश्न विचारले नव्हते याचे बायकोला आश्चर्य वाटले असावे. इतक्यात बेल वाजली. “आलो” म्हणत मी उठलो आणि दार उघडले. समोर अस्लम उभा. हातात फॉईलने बंद केलेला मोठा बाऊल.
त्याला पाहुन मला आनंद वाटला “अरे आत ये अस्लम” म्हणत मी दार पुर्ण उघडले.
“जी नही भाईजान. जरा जल्दी है. चाचाने ये बिर्याणी भेजी है” म्हणत अस्लम आत आला. कोण आलय ते पहायला बायको बाहेर आली होती. मी तिला अस्लमच्या हातातील बाऊल घ्यायला सांगीतले. अस्लम मानेने नकार देत म्हणाला “मै रखता हुं दिदी. कहाँ रखू?”
मग तो बायकोच्या मागे मागे किचन मध्ये गेला आणि सांगितलेल्या ठिकाणी त्याने बाऊल ठेवला. “हांडी खोलने का वक्त हो गया है भाईजान. मै चलता हुं. चाचाने आपको कल बुलाया है. जरुर आना” म्हणत अस्लम गेला.
तशीही आमची जेवायची वेळ झाली होतीच. बाऊलचा आकार पहाता, ती बिर्याणी दोघांना संपणार नव्हती. स्वयंपाक तसाच राहणार म्हणून बायकोने जरा तणतणतच टेबलवर ताटे मांडली. ऐन वेळी बिर्याणी आल्याने तिने मुठभर बुंदी दह्यात कालवली आणि आम्ही जेवायला बसलो. तिच चव, तोच दरवळ. बायकोने पहिला घास खाताच म्हटले “काय सुरेख केलीय बिर्याणी. खास पाहुण्यांसाठी निगुतिने करावी तशी केलीय अगदी. आपल्याला म्हणून वेगळी दिलीय की हिच विकतो चाचा साठ रुपयांना?”
बायकोने जणू काही माझेच कौतुक केलय अशा आवाजात मी म्हणालो “फक्त सुरेख? अगं जन्नती पकवान म्हणतात ते हेच. चाचा हिच बिर्याणी साठ रुपयाला देतात. आपल्यासाठी कधी वेगळी करणार? संध्याकाळी गेलो होतो तेंव्हा दम लावला होता ऑलरेडी त्यांनी”
जेवता जेवता बायकोने विचारले “तुझ्या लक्षात आलीय का एक गोष्ट?”
“कोणती” मी चिकनचा पिस तोडत विचारले.
“तु मघाशी त्या बिर्याणीवाल्या चाचाकडुन आल्यापासुन फक्त त्याच्याच विषयी बोलतो आहेस. कुठला आहे हा चाचा? कसा आहे मानूस? जरा जपुन राहा बाबा. तुला भारावून जायला काहीही कारण पुरते. आजकाल पाहतोय ना आजुबाजुला कशी लोकं आहेत ते”
मी चिडुन म्हणालो “उद्यापासुन तुझं बोट धरुनच बाहेर जात जाईन. मग तर झालं”
हातातला घास तसाच ठेवत बायको म्हणाली “अरे पण चिडतो कशाला एवढा. मी जनरल विधान केलं. तुझा स्वभाव काय मी ओळखत नाही का?”
मीही राग सोडुन म्हणालो “अगं पण मघापासुन तु अरे तुरे काय करतेयस चाचांना? असं कुणी बोलतं का?”
दुपारपर्यंत मीही चाचांना नुसते अरेतुरे नाही तर चक्क ‘बिर्याणीवाला म्हातारा’ म्हणत होतो ते मी सोयीस्करपणे विसरलो. पण मी बायकोने चाचांचे आडनाव काय आहे? कुठले आहेत? काय करतात? की सुरवातीपासुन हॉटेल व्यवसायातच आहेत? येथे कुठे राहतात? फॅमीली आहे का सोबत? कोण कोण आहेत त्यांच्या घरी? यातल्या एकाही प्रश्नाला उत्तर देवू शकलो नाही. बायकोला अर्थात आश्चर्य वाटले नाही. दिड तास गप्पा मारुन मला फक्त त्यांचे नाव कळाले होते, तेही अस्लमने सांगीतले म्हणून. बायकोने कुणासोबत अर्धा तास जरी गप्पा मारल्या असत्या तर चार जन्माची कुंडली काढली असती एखाद्याची तिने.

त्यानंतर दोन तिन दिवस मला चाचांकडे जायला वेळ मिळाला नाही. आम्ही दोघेही सकाळी लवकर जात होतो आणि रात्री घरी यायला साडेनऊ-दहा वाजायचे. येताना अल-अझीजवर भरपुर गर्दी असल्याने चाचा भेटायचा प्रश्नच नव्हता. दोन दिवसानंतर रात्री दहा वाजता अस्लम घरी आला. त्याला इतक्या उशीरा आलेले पाहुन मला जरा आश्चर्य वाटले. थोडी काळजीही वाटली.
मी त्याला विचारले “क्यु अस्लममिया, बडी देर करके आये हो. सब खैरीयत है ना?”
“सलाम भाईजान. चाचाने आपकी गाडी देखी अभी आते हुऐ. तो याद कर रहे थे आपको”
मी पायात चप्पल सरकवली आणि की स्टँडवरुन बायकोच्या व्हेस्पाची चावी घेत म्हणालो “चलो अस्लम. अभी हाजीर होते है हुजुर के सामने”
बायकोने ‘नको जावू’च्या खुप खाणाखुणा करुनही मी अस्लम सोबत बाहेर पडलो. आता अल-अझीजवर कुणीही नव्हते. चाचा नेहमीप्रमाणे बाहेर खुर्ची टाकुन बसले होते. मला पहाताच एकदम उठुन उभे राहीले. मला पाहुन त्यांना खुप आनंद झाल्याचे त्यांचा चेहराच सांगत होता. दोन्ही हातांनी हस्तोंदलन करत म्हणाले “तकलीफ दिली ना बेटा? माफ करना. ये कम्बख्त दिल जो ठान लेता है तो सुनता नही है किसीकी. बस सकाळपासुन तुझी आठवण येत होती म्हणून अस्लमला पाठवले. बैठो”
मलाही त्यांना पाहून फार बरे वाटले होते. सगळी संध्याकाळ बिर्याणीचे पार्सलस् वाटूनही ते नुकतेच अंघोळ केल्यासारखे फ्रेश वाटत होते. मग आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. अस्लमने न सांगता मसाला दुधाचे ग्लास आणून दिले. आकाशात नाजुक चंद्रकोर उगवली होती. तिच्याकडे पहात चाचा म्हणाले “बेटा, या बुढ्याला माफ कर. असं तुला रात्री बोलावून घ्यायला नको होतं. तु येतो म्हणूनही आला नाही म्हणून अस्लमला पाठवले. अब ऐसा नही होगा”
मी त्यांच्या मांडीवर हात ठेवून म्हणालो “असं काही नाहीए चाचा. कधीही आठवण आली तर बोलवा मला. काही हरकत नाही. हा माझा मोबाईल नंबर घ्या. केंव्हाही फोन करा. मी घरी असलो तर नक्की येईन. न बोलावताही येईनच”
बारा वाजत आले होते. मी निघायच्या तयारीने उठलो.
चाचा म्हणाले “चल बेटा, तुझे पार्कींगतक छोड आता हुं. तोपर्यंत अस्लम शटर बंद करेन व्यवस्थित”
मी हातातली चावी त्यांना दाखवत म्हणालो “नको चाचा. मी गाडी आणलीय बायकोची. मी जाईन”
“तो क्या हुआ बेटा. चलो” म्हणत चाचा उठले आणि दुकानाच्या मागील बाजुस गेले. मला समजेना की चाचा पार्कींगपर्यंत येणार, मग परत कसे जाणार. नाही म्हटले तरी गेटपासुन पार्कींगचे अंतर अर्धा किलोमिटर होते. एवढ्यात सफाईदार वळण घेत चाचांनी दुकानाच्या मागील बाजुला पार्क केलेली फॉर्च्युनर बाहेर काढली आणि माझ्या अगदी समोर थांबवत म्हणाले “बैठो बेटा. तुझी चाबी दे अस्लममियाकडे”
मी निमुटपणे चावी अस्लमकडे फेकली आणि गाडीला वळसा मारुन चाचांच्या शेजारी बसलो. चाचांनी गाडी गेटमधुन आत घेतली. सावकाश पण सफाईदारपणे चालवत आमच्या पार्कींगला आणून उभी केली. दोन मिनिटातच मागुन अस्लम माझी व्हेस्पा घेवून आला. त्याने माझ्या हातात चावी दिली आणि तो गाडीत बसला. चाचा खाली उतरले. त्यांनी पुन्हा एकदा “तकलीफसाठी” माफी मागीतली आणि “सलामत रहो बेटा, शब्बा खैर” म्हणत गाडीत बसुन निघुनही गेले.
मी माझ्याकडच्या चावीने दार उघडून घरात आलो. बायको जागीच होती. नुसती जागी नाही तर काळजीतही होती. मी बेडमध्ये गेल्यावर ती लहान मुलावर ओरडावे तशी ओरडली “अरे तुला काही कळते की नाही? किती वाजलेत? असा कसा कुठेही जातो बिंधास्त? कुणावरही विश्वास टाकायची ही तुझी सवय एखादे दिवशी घात करेल आपला”
“अगं असं ओरडतेस काय? आणि ‘कुठेही’ नव्हतो गेलो तर चाचांकडे गेलो होतो. एवढी काय काळजी करतेस?”
बायको डोक्याला हात लावत म्हणाली “अरे हा तुझा चाचा आहे तरी कोण? तुझ्या लक्षात येतय का, आज तु फक्त दुसऱ्यांदा भेटला आहेस त्या माणसाला. जन्माची ओळख असल्यासारखा काय बोलतोय तु? मी बाबांनाच बोलावून घेते या रविवारी. मला नाही झेपत तुझं हे असं वागणं. भितीने जीव अर्धा होतो तुझ्यामुळे नेहमी”
मला आश्चर्य वाटले. खरच की, मी आज फक्त दुसऱ्यांदाच भेटलो होतो चाचांना. आणि बायको म्हणते तसं जन्माची जरी नसली तरी खुप जुनी ओळख असल्यासारखा जिव्हाळा वाटत होता मला त्यांच्या बाबत. मी बेडवर बसुन नुसताच विचार करतोय म्हटल्यावर बायको अजुन चिडली. “झोपणार आहेस का तू? की जायचय चाचाकडे?”
मग मात्र मी निमुट ब्लँकेट ओढुन घेतले. तरीही मी बायकोचा खांदा हलवुन तिला म्हणालो “एेक तरी मी काय म्हणतोय ते. अगं चाचा पार्कींगपर्यंत आले होते सोडवायला. त्यांची फॉर्च्युनर आहे. नविनच असावी. कमाल आहे ना?”
बायको ब्लँकेट बाजुला करुन उठुन बसली. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर आणि आवाजातही चांगलीच काळजी दिसत होती. म्हणाली “तुला समजतय का तुझं काय चाल्लय ते? साठ रुपयाला एक बिर्याणी विकणारा कुणी म्हातारा. दुकान सुरु करुन अजुन आठही दिवस झाले नाहीत. तेही बिना टेबल खुर्चीचे हॉटेल. टपरी टाईप. आणि त्याच्याकडे नविन फॉर्च्युनर आहे. तुला काहीच शंका येत नाही? संमोहन वगैरे करतात रे असे लोक आजकाल. तसच असणार काहीतरी. आणि तु त्या माणसाला आपल्या पार्कींगपर्यंत घेवून आलास? मी उद्याच बाबांना फोन करुन बोलावून घेते”
मीही उठुन बसत म्हणालो “असं काय करतेस? मी आजवर कधी माणसे ओळखायला चुकलोय का? मी चाचांना कॉफीसाठी बोलावतो घरी तेंव्हा तुच पहा”
“अजिबात नाही. कोणत्याही अनोळखी माणसाला घरी आणायचे नाही तू. आत्ताच सांगते” म्हणत बायकोने रागात ब्लँकेट गुरफटून घेतले आणि माझ्याकडे पाठ करुन झोपली. मलाही तिचे ऐकुन जरा प्रश्नच पडला की खरच दोन भेटीत एवढी घनिष्ट मैत्री कशी होऊ शकते? ही म्हणते तसं तर काही नसावे ना? मग मी फारसा विचार न करता झोपायचा प्रयत्न सुरु केला.

या दहा बारा दिवसात कामाचा ताण जरा वाढला होता. लवकर जाणे आणि उशिरा येणे सुरु झाले होते. तरीही मी दोन तिन वेळा चाचांकडे चक्कर टाकुन आलो होतो. चाचांनी कधी माझ्या घरची माहिती विचारली नाही आणि मी त्यांच्या भुतकाळाची चौकशी केली नाही. आमचे विषय असायचे सुफीझम, शायरी, जिक्र-नामस्मरण, हिंदू साधनामते आणि सुफी साधनामते यातली साम्यस्थळे, राबिया बसरी, निजामुद्दीन औलीया, फरीदुद्दीन गंजे शकर, मन्सुर या सारखे सुफी संत आणि त्यांच्या कथा, हादिस आणि कुराण. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, ज्ञानेश्वरीतले काही विशिष्ट अध्याय. अगदी काहीही. आम्हाला मिळेल तेवढा वेळ कमी पडे. या आठ दहा दिवसात जेंव्हा जेंव्हा आम्ही दहानंतर घरी आलो तेंव्हा तेंव्हा अस्लम आम्हा दोघांना पुरेल एवढी बिर्याणी किंवा व्हेज पुलाव घरी पोहचवायचा. बायकोच्या लक्षात आले नसेल कदाचीत पण त्यामागे बरेचदा वार पाळलेला असायचा. म्हणजे सोमवारी, गुरवारी कधी चिकन बिर्याणी घरी पाठवली नाही चाचांनी. अर्थात मी ‘सातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीर’ या वृत्तीचा असल्याने मी कधी आहाराचा आणि धर्माचा संबंध जोडत नव्हतो पण चाचांनी ते पाळले. दहा नंतर जर आमची गाडी अल-अझीजसमोरुन गेटच्या आत आली तर “बहु आता इतक्या उशीरा काय बनवणार?” असा विचार त्या पुलाव पाठवण्यामागे असायचा. बायकोचा कितीतरी त्रास वाचायचा पण तिच्या डोक्यात का कुणास ठाऊक पण चाचांविषयी एक आढीच बसली होती. तिने चार वेळा मला बोलूनही दाखवले होते की “हा माणूस चांगला नाही, तुला एक दिवस अनुभव येईल तेंव्हा माझे म्हणने आठवेल” अर्थात तिच्या बोलण्याकडे मी साफ दुर्लक्ष करत असे हा भाग वेगळा.

एक दिवस सुट्टी असल्याने आम्ही घरच्या कामांचा फडशा पाडत होतो. बरीचशी आवराआवर झाल्यावर दुपारी आम्ही काही खरेदी करावी म्हणून बाहेर पडलो. खरे तर भरपुर वेळ होता त्यामुळे मला चाचांकडे जावून बसायचे होते. दोन दिवसात चक्कर झाली नव्हती. पण बायकोपुढे बोलायची चोरी होती. मी कॉलेजला असताना बायकोच्या प्रेमात पडलो होतो तेंव्हाही इतकी बंधने पाळली नव्हती. तिला भेटायला इतके प्रयास करावे लागले नव्हते तेवढे आता मला चाचांना भेटायला करावे लागायचे. काही तरी निमित्त सांगुन घराबाहेर पडायचे, इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो असं खोटेच सांगायचे असले पोरकट प्रकार मला बायकोपुढे करावे लागायचे. तिच्याही ते लक्षात यायचे. मी निमुटपणे गाडी काढली आणि निघालो. गाडीत बसल्या बसल्या “हे घ्यायचय, ते संपलय, अमुक आणून पाहु या वेळी” अशी बायकोची यादी करणे सुरु होते. मी गेटच्या बाहेर गाडी काढली. शेडमध्ये चाचा त्यांची आवडती खुर्ची टाकुन बसले होते. नुकतेच आले असावेत. अस्लम आतमध्ये झाडलोट करत असावा. त्यांना पाहुन मी गाडी बाभळीच्या झाडाच्या आतुन घेतली आणि अगदी शेडला खेटुन उभी केली. बायकोचे अजुनही आयपॅडवरच्या यादीत भर टाकायचे काम सुरुच होते. गाडी थांबल्यावर तिच्या लक्षात आले की आपण थांबलोय. तोवर आम्हाला पाहुन चाचा घाईघाईने उठुन जवळ आले. माझ्या सोबत बायकोला पाहिल्यावर तर त्यांना खुपच आनंद झाला असावा. बायकोनेही का थांबलोय आपण म्हणून वर पाहीले तर चाचा स्वतः तिच्या बाजुचे दार उघडत होते. मला एकदम थांबल्याचा पश्चाताप झाला. बायको जर काही विचित्र वागली तर चाचांना वाईट वाटले असते. बायको भांबाऊन चाचांकडे पहात होती.
चाचांनी एखाद्या शोफरसारखे अत्यंत अदबीने दार उघडुन धरले आणि म्हणाले “खुशामदीद बहु! आवो. सावकाश उतर. कितनी बार अप्पाला सांगितले बहुको लेके आ गरीबखानेपर लेकीन त्याने आणलेच नाही तुला. आज वक्त मिला उसे. ये, ये बेटा”
मी घाईने खाली उतरलो आणि चाचांना म्हणालो “अहो चाचा तुम्ही काय दार उघडुन धरले आहे? उतरेल ती”
बायको पुर्ण गोंधळली होती. तिला मुळात असे कुणी दार उघडुन धरणे वगैरेची अजिबात सवय नव्हती. त्यात ती पहिल्यांदाच चाचांना पहात होती तेही इतक्या जवळून. चाचांना पहिल्यांदा पहाताना माझी जी अवस्था झाली होती तिच अवस्था आता यावेळी तिची झाली होती. तिने चाचांना ओळखले नव्हते. ती गोंधळलेल्या मनःस्थितच खाली उतरली. चाचांनी अजुन दाराचे हँडल सोडले नव्हते. बायको खाली उतरल्यावर त्यांनी अदबीने कारचे दार लावले आणि बायकोकडे पाहुन चक्क एअर इंडीयावाला महाराजा ज्या पध्दतीने उभा राहतो तसे झुकुन दोन्ही हात अल-अझीजकडे करत “आईए, आईए खुशामदीद” म्हणत बायकोचे स्वागत केले आणि अस्लमला आवाज न देता स्वतःच खुर्च्या आणायला आतमध्ये गेले. बायकोने शेडमध्ये उभे राहील्या राहील्या मला विचारले “कोण आहेत हे? मला कसे काय ओळखतात? आणि या बिर्याणीच्या दुकानात काय करतायेत?”
मी हसुन म्हणालो “तुला ज्याचा राग येतो ना तोच हा संमोहन करुन फसवणारा बिर्याणीवाला म्हातारा आहे”
इतक्यात चाचा दोन लाकडी खुर्च्या घेवून आले. त्या व्यवस्थित उघडुन त्यांनी समोर मांडल्या. त्यातली एक खुर्ची तळहाताने पुसत ते बायकोला म्हणाले “बस बेटा. बाहेरच बसावे लागेल. अंदर सब सामान बिखरा पडा है. बैठो आरामसे”
मी म्हणालो “कैसे हो चाचा? सब खैरीयत?”
चाचा हसुन वर पहात म्हणाले “अल हम्दू लिल्लाह”
मी मिश्किलपणे म्हणालो “चाचा मी पण बसु का खुर्चीवर?”
चाचा मोठ्याने हसत बायकोला म्हणाले “बडा बदमाश है बेटा तुम्हारा शौहर. घरी पण असाच त्रास देतो का तुला?”
बायको प्रथमच हसली आणि चाचांबरोबर अगदी जुनी ओळख असावी अशा आवाजात म्हणाली “तुम्हाला पण त्रास देतो ना?”
“अरे नही नही बेटा. मी मजाक केला. बहुतही नेक बच्चा है. अप्पा खडा क्यु है? बैठ. मी दुध आणतो तुमच्यासाठी थोडेसे” म्हणत चाचा आत गेले. नुकतेच अल-अझीज उघडल्यामुळे अस्लमच्या आत बाहेर फेऱ्या चालल्या होत्या. बायकोला बहुतेक अल-अझीज आतुन पहायची इच्छा असावी. इतक्यात एका ट्रेमध्ये चाचा दुधाचे पेले घेवून आले. एका बाऊलमध्ये मिक्स ड्रायफ्रुट होते. त्यांनी एक ग्लास माझ्या हातात दिला मग खिशातला कशिदाकाम केलेला पांढरा शुभ्र रुमाल काढुन ग्लासभोवती गुंडाळला आणि बायकोच्या हातात देत म्हणाले “गरम है बेटा. हात जलेगा. सँभलके”
मग आमच्या समोर बसुन त्यांनी ड्रायफ्रुटचा बाऊल हातात घेऊन तो आमच्या समोर धरला.
मला त्यांचे ते स्वागत पाहुन जरा संकोचल्यासारखे झाले. ते बायकोशी काहीतरी बोलत होते. त्यांची उर्दु मिश्रीत अस्सल हिंदी आणि बायकोची ‘धाबकन पड्या’ हिंदी असुनही दोघांनाही गप्पा मारायला काही अडचण येत नव्हती. मी उठुन आत गेलो. अस्लमकडुन एक दुधाचा ग्लास घेतला आणि एक खुर्ची घेऊन मी बाहेर आलो. ग्सास चाचांच्या हातात दिला आणि खुर्ची मध्ये सेंटरटेबलसारखी ठेवली व त्यांच्या हातातला बाऊल खुर्चीवर ठेवला. दहा पंधरा मिनिटे गप्पा मारल्यावर मी बायकोला ‘खरेदीची’ आठवण करुन दिली. “चाचा आमच्याकडे नक्की यायचे हं कॉफी प्यायला. नाहीतर जेवायलाच या” वगैरे आग्रह करुन शेवटी नाईलाज असल्यासारखी बायको निघाली. “जरा ठेहरना बेटा” म्हणत चाचा आतमध्ये गेले आणि दुसरा बाउलभरुन ड्रायफ्रुटस् आणले. बायकोच्या हातातला त्यांचा रुमाल घेवून त्यात त्यांनी ते ड्रायफ्रुट व्यवस्थित गुंडाळले आणि बायकोच्या हातात देत मिश्किलपणे म्हणाले “अकेले खाना बेटा. याला बिलकुल देवू नकोस”
तिनेही विनासंकोच, अजिबात आढेवेढे न घेता ती छोटीशी पोटली घेतली. आम्ही कारमध्ये बसलो. मी चाचांना “येईन संध्याकाळी” म्हणालो आणि कार स्टार्ट केली. तेवढ्यात चाचा कारजवळ आले आणि एक हात बायकोच्या डोक्यावर ठेवून दुसऱ्या हाताची बंद मुठ तिच्या तळहातावर ठेवत तिच्या हाताची मुठ बंद केली. म्हणाले “पहली बार आयी हो बेटा मेरे गरीबखानेपर. रिवायत है . ना मत कहना”
मला काही समजले नाही पण बायको दार उघडुन खाली उतरली आणि तिने रस्त्यातच चाचांना वाकून अगदी हिंदु पारंपारीक पध्दतीने तिन तिन वेळा नमस्कार केला.
दोन तास मॉलमध्ये खरेदी करुनही बायकोची अर्धी यादी तशीच राहीली होती. पाच साडेपाचला आम्ही घराकडे निघालो.
मी हसुन बायकोला विचारले “तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?”
ती म्हणाली “हो. नेहमीप्रमाणे आजही खरेदीची यादी आपण पुर्ण करु शकलो नाही. अनावश्यक सामानच घेतलय बरचसं”
“ते नाही म्हणत ग मी. तु दुपारी चाचांना भेटल्यापासुन आतापर्यंत फक्त त्यांच्याच विषयी बोलते आहेस. तुझ्यावरही संमोहन केलेले दिसते त्या लबाड म्हाताऱ्याने. आणि हातात काय दिलय चाचांनी? दोन तास तशीच मुठ बंद ठेवून फिरतेय सगळ्या मॉलमध्ये”
“म्हातारा काय म्हणतोस त्यांना. मी त्यांना पाहिले नव्हते म्हणून तसे म्हणत होते सुरवातीला” म्हणत बायकोने तिची बंद मुठ माझ्यासमोर धरुन उघडली. त्यात पाचशेच्या चार आणि शंभरची एक नोट होती.

रिवायत म्हणून बहुच्या हातात बक्षिस देणारे चाचा अनेकदा रिवायत पाळतही नसत. एकदा आम्ही खुर्च्या टाकुन गप्पा मारत बसलो होतो. मगरीब शिवाय चाचा उठणार नव्हते. त्या अंदाजानेच अस्लम बिर्याणीला दम लावत असे. गप्पा मारत असताना दोन तरुण साधू ‘अल्लख’ करत समोर उभे राहीले. साधु म्हणजे नाथ सांप्रदायातले असावे. अंगावर सहेलीशिंगी, कुंडल, चिमटा वगैरे खुणा बाळगुन होते. कपडे बिन शिलाईचे होते. चाचांनी अस्लमला आवाज दिला. अस्लमने पांढराशुभ्र भात आणि त्यावर लोणचे घालुन दोन पार्सल त्यांना आणून दिली. चिमटा वाजवत ‘अल्लख’ गाजवत दोघेही चाचांना आशिर्वाद देवून गेले. मी आश्चर्याने चाचांना विचारले “हे साधु कधीपासुन यायला लागले येथे? आणि त्यांना तुमच्या येथील भात कसा काय चालतो चाचा?”
चाचा हसुन म्हणाले “अप्पा, सच्ची इबादत करणारा असेल तर इन्सानची पहचान अपनेआप होते. तसच असेल काही”
मी मान डोलावली. चाचा म्हणाले “आपण अंदाज बांधू नये कुणाविषयी. किमान अध्यात्मात तरी नाहीच नाही. अब एक बात हो सकती है, ये दोनो पाखंडी हो सकते है लेकीन उन्होने जो दरवेश के कपडे पहने है त्याची तर मला इज्जत केली पाहीजे की नको? तुझे एक वाकया सुनाता हूं. मेरे वालिदने मुझे सुनाया था. एक मौलवी का वाकया है. एक बार मौलवी नमाज पढने के बाद मश्जीद के बाहर खडे थे. समोरुन एक बुढा हबशी आला. भुका था कई दिन से. सामने काफीर को देखकर मौलवीसाहबने मुह मोड लिया. फिर भी भुके हबशीने उनके के पास एक वक्त का खुराक मांगा. भुका क्या न करता. तो मौलवीने फर्माया “मै एक वक्त का खुराक देता हुं लेकीन एक शर्तपर. तु यहाँ कलमा पढ के दिखा और एक क्या दो वक्त का खुराक लेके जा. बुढा हबशी सोचने लगा. दो वक्त के खुराक के बदलेमे मौलवीसाहब उसका इमान माँग रहे थे. कुछ देर सोचने के बाद हबशी मुडकर चल पडा. तभी वहाँ एक फरिश्ता नाजिल हुआ और उसने फर्माया “इस बुढे हबशी को सत्तर सालसे खुदा बगैर कुछ पुछे जरुरत की हर चिज देते आए है. और आज एक वक्त के खुराक के बदले मे तुने उसका इमान माँगा? लानत है तुझपर” अब अप्पा ये वाकया सच है या झुठ, ये कैसे हो सकता है ये सब मत सोच. वाकयेमे जो बात कही गयी है उसके बारे में सोच. आज ये दोनो गेरुए फकीरोका खुराक मेरे जरीए अल्लाह उनके पास पहुचांना चाहता था वो मैने पहुंचा दिया. इस काम के लिए अल्लाहने मुझे चुना इस बात का मुझे बडा नाझ है, फक्र है. चाचांचे असे सरळ साधे विचार मला फार मोलाचे वाटायचे. चाचा हादीसमधल्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेत मला सांगायचे. त्या ऐकताना एक जाणवायचे की या कथांमधील तत्वे चाचा प्रत्यक्ष जीवनात अमलात आणत. आजुबाजुची परिस्थिती पाहुन ते जास्त दुखावत नसत त्याला हेच कारण होते. एकदा मला त्यांनी एका मुर्शीद आणि त्याच्या मुरीदचा वाकया सांगितला होता.
“मुर्शिदने अपने मुरीदको फर्माया, जा और शामतक मुझे एक हराम का टुकडा लाके दे” बेचार मुरीद गुरु की इच्छा सुनके पुरा दिन घुमता रहा और शामको खाली हाथ लौटा. बेचारा हैरान था की अब गुरु को कैसे बताये की कही भी हराम का टुकडा नही मिला. तभी मुर्शीदने हसके फर्माया “बेटा आज तुझे हराम का टुकडा नही मिला, लेकीन एक दौर ऐसा आएगा की तुझे हलाल का एक टुकडाभी नही मिलेगा. उस दौरमे पाच वक्त की नमाज, अल्लाह का जिक्र और इमानही तुझे बचा सकता है.” अप्पा, वही दौर चल रहा है आजकल. बस इमान पे कायम रहना चाहीए हर इन्सान को. चाचांनी अशा शेकडो गोष्टी मला सांगीतल्या. त्या गोष्टींनी मला खुपदा अंतर्मुख केले.

आमचे भेटणे साधारण दहानंतरच होत असे. साडेदहापर्यंत शटर खाली ओढले की दुकानाच्या मागे सिमेंटचा कोबा केलेला ओटा होता व ओट्यापासुन मागे बरीच दुरवर वेगवेगळ्या बिल्डर्सनी कुंपणे घातलेली पडीक जमीन पसरली होती. अस्लम आम्हाला या ओट्यावर एक पांढरी गिर्दी पसरुन देई व दोन तिन तक्के देई टेकायला. एकदा आमची बैठक बसली की साडेअकरा बाराच्या दरम्यान तो आम्हाला मसाला दुध करुन देई आणि मग दिवसभराचा गल्ला मोजुन, डायरीत हिशोब लिहुन तो त्याच्या किचनओट्यावर चादर टाकुन चक्क झोपत असे. निघायच्या वेळी चाचांनी आवाज दिला की इतक्या चटकन जागा होई की हा झोपला होता की नव्हता याची शंका यावी. चाचांचे बरेचसे ताळतंत्र त्याला अवगत होते. आजही आम्ही मागे ओट्यावर गिर्दी टाकून बसलो होतो. एकमेकांची वैयक्तीक माहिती विचारायची नाही असा काही नियम नव्हता आमच्यात, कधी विषय निघाला नव्हता इतकेच. आज मी ठरवूनच आलो होतो की चाचांची थोडीतरी माहिती करुन घ्यायची. एखादे वली किंवा दरवेश असावेत असं व्यक्तिमत्व असलेल्या चाचांना कुणीच कसे नाही. या वयात बिर्याणी विकायची वेळ त्यांच्यावर का आली? इतकी छान बिर्याणी बनवायला ते कुठे शिकले? बरं इतक्या स्वस्तात बिर्याणी विकुन त्यांना असा फायदा तरी कितीसा होत असणार? मग रोजचा खर्च कसा भागवतात एवढ्या कमी पैशात? नोकर तर वाटत नाही मग अस्लम कोण आहे त्यांचा? असे अनेक प्रश्न मला पडले होते. त्यांचे आज निरसन करुन घ्यायचेच असं मी ठरवलं होतं. अस्लम आतमध्ये पैसे मोजत होता. मी गिर्दीवर टेकलो न टेकलो तोच चाचांना म्हणालो “चाचा आज राबीया और मन्सुर की बाते रहने दो. मला तुमच्या गोष्टी सांगा आज. कोणते गाव आहे तुमचे? आणि सगळ काही सांगा आज. पहाट झाली तरी चालेल. मला ऐकायचे आहे. ऐकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही”
चाचा मला थांबवत म्हणाले “अरे भाई इन बातो का कभी जिक्र हुवाही नही म्हणून मिही ती बात छेडली नाही. त्यात लपवण्यासारखे काही नाहीए. सांगतो तुला सर्व. वैसे तो खुदा के अलावा किसी की तारीफ करना गुनाह है फिरभी चाहे सुबह हो जाए, आज इजहारे खयाल हो ही जाए. माझी कहानी म्हणजे त्या खुदाचे कौतुकच आहे. लेकीन घरपर बात करते है, यहाँ नही”
मीही आनंदाने उठलो. एक तर चाचांची कहानी ऐकायला मिळणार होती आणि उशीरा का होईना पण चाचा घरी यायला तयार झाले होते. चाचांनी अस्लमला आवाज देवून गाडी काढायला सांगीतली. आम्ही बाहेर रस्त्यावर येवून उभे राहीलो. अस्लमने गाडी काढली. शटर बंद केले. मी आणि चाचा मागे बसलो. पण अस्लमने गेटकडे वळवायच्या ऐवजी मेन रोडवर गाडी घेतली. मी आश्चर्याने चाचांकडे पाहीले. चाचा म्हणाले “अप्पा, अस्लम छोडेगा तुझे घर तक. अभी हम मेरे घर जा रहे है”
मी शांत बसुन राहीलो. दहा मिनिटात अस्लमने एका गेटवर गाडी थांबवली. वॉचमन चाचांची गाडी चांगलीच ओळखत असावा. तो खुपच अदबीने पळत आला आणि त्याने अस्लमच्या हातात रजिस्टर दिले व त्याची सही घेतली. अस्लमने गाडी आत घेवून लिफ्टसमोर उभी केली. आम्ही उतरल्यावर तो गाडी पार्क करायला निघुन गेला. मी ज्या सोसायटीत उभा होतो ती मी चांगलीच ओळखत होतो. आमच्या परिसरातील उच्चभ्रु लोकांच्या सोसायटींपैकी ती एक होती. मी चकितच झालो. आम्ही लिफ्टने वर आलो. चाचांनी त्यांच्या फ्लॅटचे दार उघडले. आम्ही आत आलो. आतमध्ये नजर फिरवल्यावर मला चक्कर यायचीच बाकी राहीली. अत्यंत आधुनीक पध्दतीने पण अतीशय सौम्य रंगसंगतीने हॉल सजवला होता. एका कोपऱ्यात हार्मोनियम होती. शेजारीच मृगाजीन होते. भारतीय बैठकीशी साधर्म्य असणारा प्रशस्त सोफा होता. खाली घोट्यापर्यंत पाय रुतावे असा गालीचा होता. एका भिंतीवर कुराणातील कलम्याची फक्त काळ्या आणि गडद भगव्या रंगातली कॅलीग्राफीची मोठी फ्रेम होती. दुसऱ्या भिंतीला पुर्ण भिंत व्यापणारी खिडकी होती. खिडकीच्या खालीच एक बैठे वॉल टू वॉल टेबले होते. त्यावर सोनीची म्युझीक सिस्टीम आणी एक कलींगडाच्या आकाराचा मोठा शंख होता. शेजारी पितळी उंटांची जोडी. आतमध्ये जायला जी लॉबी होती त्या दाराशेजारी पाच फुटांच्या आसपास लाकडी चमचा, एक काटा आणि एक सुरीची प्रतिकृती भिंतीवर लावली होती. खरे तर हे किचन डेकोरेशन होते, चाचांनी ते हॉलमध्ये का लावले होते ते समजेना. इतक्यात अस्लमही आला. चाचांनी त्याला मधला काचेचा सेंटर टेबल हटवायला सांगीतला. तिनही भिंतीना कव्हर करणाऱ्या सोफ्याच्या मध्ये सेंटर टेबल काढल्यामुळे मस्त जागा झाली होती. चाचांनी सोफ्यावरची एक पिलो माझ्याकडे फेकली आणि एक स्वतःसाठी घेतली आणि खाली गालीच्यावर आरामात बसले. मलाही बसायची खुण करत म्हणाले “आराम फर्माईए जनाब. इत्मीनानसे बैठो. आज रात पुरी होगी लेकीन रसुल की कहानी पुरी नही होगी. बैठो”
अस्लमने थोड्यावेळाने मोठा थर्मास आणि काचेचे ग्लास आणुन ठेवले आणि तो आतमध्ये कुठेतरी नाहीसा झाला. चाचांनी अगदी त्यांच्या लहानपणापासुन सांगायला सरुवात केली. मी कधी सोफ्याला टेकून ऐकत होतो तर कधी मांडीवर उशी घेवून हातावर हनुवटी ठेवून ऐकत होतो. मध्ये मध्ये तर अगदी पोटावर झोपुन पाय हवेत हलवत लहान मुलाने आजोबांची गोष्ट ऐकावी तसे पालथे झोपुनही ऐकत होतो. ऐकताना कित्येकदा माझे डोळे विस्फारत होते तर कधी पाणावत होते. तिन चार वेळा आमची कॉफी झाली होती. अत्यंत गोड असलेली कॉफी आणि चाचांचे अरेबियन नाईटपेक्षाही अद्भुत असलेले आयुष्य ऐकताना झोप जवळपासही फिरकत नव्हती. चाचा सुरवातीला माझ्या चेहऱ्यावरचे भाव पहात त्यांची आयुष्याची कथा मला सांगत होते, पण नंतर नंतर त्यांचे बोलणे स्वतःशीच बोलावे तसे स्वगतासारखे होवू लागले. माझेही हुंकार थांबले होते. बऱ्याच वेळाने अस्लम हॉलमध्ये आला. त्याने खिडकीवरचे पडदे दुर केले. बाहेर चक्क उजाडले होते. अस्लमने माझ्या हातात मोबाईल देत सांगीतले “रातको दिदी का फोन आया था. मैने कह दिया है आप यहाँ हो”
पुर्ण रात्र चाचा बोलत होते आणि मी ऐकत होतो. एखादी रोमांचक कादंबरी वाचल्याचा अनुभव मला आला होता. चाचा हसत उठले आणि म्हणाले “अप्पा जल्दी नहा लो फिर निकलते है. अस्लम, अप्पाको घुसलखाना दिखा”
मी अंघोळ उरकली. चाचांचीही अंघोळ झाली होती. मी पाहिले तेंव्हा ते किचनमध्ये काही तरी करत होते. मीही त्यांना जॉईन झालो. चाचांनी चटकन तिन चार बटाटे सोलुन कापुन तळुन घेतले. सात आठ अंडी बाऊलमध्ये मिक्स करुन घेतली. बटाटे, मिरपुड टाकुन चांगले दोन तिन इंच जाडीचे फ्रेंच ऑम्लेट बनवले. टोस्टर मधुन टोस्ट काढले आणि आम्ही प्लेट घेवून हॉलमध्ये येवून बसलो. अस्लम ब्लॅक कॉफी घेवून आला आणि आम्हाला जॉईन झाला. तिघांचाही नाष्टा झाल्यावर चाचा स्वतः मला घरी सोडायला निघाले. मी त्यांच्याकडुन चावी घेतली आणि गाडी बाहेर काढली. मी पुढे पाहुन ड्राईव्ह करत होतो.
चाचा म्हणाले “क्या कहु अप्पा, अल्लाहतालाने मेरे औकातसे जियादा दिया मुझे, बिन मांगे दिया. आजतक जो गुजरी है बस उसीकी करमसे गुजरी है. जो भी मैने सुनाया उसका अपने दोस्तीपर असर नही होगा ना अप्पा? नही होगा. क्युंकी खुदा ने कभी मेरे पास तबीब को आने नही दिया और हबीब को दुर जाने नही दिया. तेरे दोस्ती के लिए, प्यार के लिए शुक्रीया अप्पा”
माझे घर आले होते. आम्ही खाली उतरलो. मी गाडी बंद केली नव्हती कारण मला माहित होते चाचा माझ्या घरी येणार नाहीत.
“अल्लाह हाफीज अप्पा, शामको मिलते है” म्हणत चाचा गाडी वळवून निघुन गेले. मी सुन्न होऊन लिफ्ट ऐवजी जीन्याने घरी आलो. चाचांनी जे सांगितले त्याचा थोडक्यात मतितार्थ असा होता: चाचांचे लहानपण दिल्लीजवळील सोनपतजवळ एका गावात गेले होते. वडील जमिनदार होते. मोठा खानदानी वाडा होता. अगणीत संपत्ती होती. लहानपणापासुनच कुकींगचे वेड होते. त्यामुळे ग्रॅज्युएशननंतर त्यांनी सहा वर्ष वेगवेगळ्या कॉलेजमधुन शेफचे शिक्षण घेतले होते. त्याच वेडापायी अमेरीकेत दिड वर्ष तर इटलीत एक वर्ष कुकींगचे ज्ञान गोळा करत फिरले होते. भारतात परतल्यावर ‘ताज’च्या वेगवेगळ्या हॉटेल्समधे सतरा वर्ष काम केले होते. ताजच्याच टिमबरोबर एकदा इराकला गेले आणि खुद्द सद्दाम हुसेनने ताजवर दबाव आणून चाचांना त्याच्याकडे घेतले होते. सद्दाम हुसेनच्या अनेक शेफमध्ये चाचा त्याचे फेव्हरेट शेफ होते. पाच वर्ष इराकमध्ये राहुन शेवटी चाचांनी काय काय प्रयत्न करुन अखेर भारत गाठला होता. या दरम्यान त्यांचे लग्न झाले होते, मुलं झाली होती, त्यांच्या अब्बांचा इंतकाल झाला होता. मुलाला मार्गाला लावायचे म्हणून मुंबईत त्याला रेस्टॉरंट काढून दिले होते. आज भारतातल्या प्रमुख रेस्टॉरंट चेनमध्ये त्यांचे नाव होते. भारतात आल्यानंतर ऑस्ट्रेलियात हॉटेलची चेन सेट करण्यासाठी चाचा दोन तिन वर्ष तिकडे गेले. तिन वर्षांपुर्वी पत्नीचे निधन झाले आणि चाचा पुन्हा भारतात येवून मुंबईला स्थिरावले. पत्नी गेल्यानंतर मात्र त्यांनी सगळ्यातुन लक्ष काढुन घेतले. दोन वर्ष फक्त नमाज, कुराणवाचन आणि जिक्र करत घरात बसुन काढले. मुल्ला, मौलवी आणि फकिरांची संगत वाढली. शेवटी दरवेश व्हायचे वेड त्यांच्या डोक्यात भरले. “ख्वाजाके आस्थाँ पे पडा रहुंगा, गुंबद के साये मी जींदगी बसर करुंगा. मुझे जाने दो” असं म्हणत मुलाच्या, सुनेच्या मागे लागले. शेवटी सुनेने समजावून सांगीतले “आपल्या पुण्यातल्या फ्लॅटवर वर्षभर जावून रहा. अल्लामियाँकी जो भी इबादत करनी है करो, सारी राते जिक्रमे बसर करो, मजलुमोंकी खिदमत करो. लेकीन दरवेश बनके हाथ कुछ नही आएगा. खुदा हर चिज मे मिल सकता है, यहाँ तक के, काफीर के दिल में भी मिल सकता है लेकीन बेरुखीमे कभी खुदा के नुर का कतरा भी नही मिलेगा.” हे चाचांना पटले आणि अस्लमला सोबत नेणार, दर दोन दिवसाला फोन करणार, आरोग्याची काळजी घेणार, महिन्यातुन एकदा सगळे त्यांना भेटायला पुण्याला येणार अशा किरकोळ अटी कबुल करुन हा करोडपती म्हातारा आध्यात्माचे वेड घेवून, गरीबांची स्वतःच्या हाताने सेवा करायला पुण्यात आला. पैसे देवून, दानधर्म करुन पुण्य मिळेल पण खुदा मिळणार नाही. त्यामुळे स्वतःच्या हाताने गरीबांना खावू घालायला हा प्रसिध्द शेफ पुण्याच्या एका उपनगरात येवून राहीला होता. कष्टकरी मजुरांना पौष्टीक आहार मिळावा म्हणुन बिर्याणीत स्वखर्चाने ड्रायफ्रुट, साजुक तुप घालून हंड्या शिजवत होता. फुकटची सवय लागु नये म्हणून साठ रुपये घेत होता. जमा होणारा गल्ला दर शुक्रवारी मदरशात नेवून देत होता. रोज सकाळी दोन तास मदरशात जावून मुलांना आलिफ, बे, पे शिकवत होता. आणि असा हा करोडपती वेडा अवलिया मला आपला हबीब समजत होता. जीवलग समजत होता. माझ्या बायकोला स्वतःची दुसरी मुलगी समजत होता. “बेटा दुनिया घुम चुका हुं. इन्सान पहचाननेमें ये रसुल कभी गफलत नही कर सकता” म्हणत या रसुलचाचाने पहिल्या भेटीत, काही मिनिटांच्या ओळखीवर त्यांच्या ‘आपल्या’ माणसांच्या यादीत माझे नाव टाकले होते.

मी गेले आठवडाभर मुद्दाम अल-अझीजकडे फिरकलो नव्हतो. मधे दोनदा चाचांचे फोन येवून गेले पण मी बायकोच्या हातात मोबाईल देवून टाळायला सांगीतले होते. माझ्या विचारांचा चांगलाच गोंधळ झाला होता. चाचांना भेटल्या शिवाय करमतही नव्हते. दोन दिवस सगळी कामे बायकोवर ढकलून मी दोन दिवस गावी जावून आलो पण अस्वस्थता काही कमी होत नव्हती. कितीही महत्वाचे काम असले तरी मी हट्टाने शनिवार-रविवार सुट्टी घेतोच. पण आज शनिवार असुनही घरी काही बसवेना. बालगंधर्वला एखादे नाटक पहावे असा विचार केला तर तेथेही कसला तरी लावणीचा आणि नंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. टिव्हीसमोर बसुन नुसतेच चॅनेल बदलत बसलो होतो.
बायकोने विचारले “चाचांकडे जाणार आहेस ना आज तू? जरा उशीरा जा. मी दुपारी बासुंदी करणार आहे. घेवून जा चाचांसाठी”
“मी नाही जाणार चाचांकडे आज”
बायको आश्चर्याने म्हणाली “का? काय झालं? आठ दिवस पहातेय, चाचांकडे फिरकला नाहीस. त्यांनी फोन केले तर बोलायचं टाळलस. भांडला का त्यांच्याबरोबर देखील?”
मी करवादुन म्हणालो “त्यांच्याबरोबर सुध्दा म्हणजे काय? मी काय दिसला कुणी की भांड त्याच्याबरोब असं करतो का? काहीही काय बोलतेस!”
माझ्या हातातला रिमोट ओढुन घेत बायको म्हणाली “काहीही काय म्हणजे काय? तुझा एखादा असा मित्र दाखव मला ज्याच्याबरोबर तु सलग चाळीस दिवस भांडला नाहीएस. चाचा मित्र असले म्हणून काय झाले, त्यांचे वय काय? अधिकार काय? काही विचारात घेशील की नाही. तुला जायचे नसेल तर नको जाऊस. मी जाईन दुपारी बासुंदी घेवून. पण मला तु कशावरुन भांडला हेतर कळायला हवे की नको? त्यांनी जर काही विचारलं तर मी काय बोलू चाचांबरोबर?”
मी तिला हाताला धरुन सोफ्यावर बसवत म्हणालो “मी काही भांडलो वगैरे नाहीए चाचांबरोबर. तु म्हणालीस तसे त्यांचा अधिकार लक्षात घेवूनच मी अल-अझीजवर जायचं टाळतो आहे. मी चाचांबरोबर भांडु शकेन का कधी?”
बायकोला मी काय म्हणतोय ते लक्षात येईना. तिला आणखी गोंधळात न टाकता मी म्हणालो “ते जाऊदे. तुला ते कँपमधले हॉटेल माहितीए का? त्यांची मोठी चेन आहे बघ”
बायको एकदम उत्साहात म्हणाली “अरे ते कुणाला माहित नाही. त्यांची काही ऑर्डर वगैरे मिळाली की काय चाचांना? मग तर भारीच काम होईल. पण चाचा करतील का काम त्यांच्यासाठी?”
बायकोचे डोके कुठे चालेल ते सांगता येत नाही. तिला गप्प करत मी म्हणालो “पुर्ण ऐकुन घेणार आहेस का? तर त्या रेस्टॉरंटची भारतातच नाही तर सात देशात हॉटेल्स आहेत”
वैतागुन बायको म्हणाली “तु सांगणार आहेस का काय ते? असं गोल गोल फिरवत का बसलायेस? तु का जात नाहीएस अल-अझीजवर ते सांग. मी उद्या चाचांना जेवायला बोलवायचा विचार करत होते आणि तु हा असा भलताच घोळ घालुन ठेवलाय”
मी वैतागुन म्हणालो “अगदी गप्प बस. बोल म्हटल्याशिवाय अजिबात मध्ये बोलु नकोस”
“बरं” म्हणत बायकोने सोफ्यावर मांडी घातली आणि ‘कर तुला काय शहानपणा करायचाय ते’ असा चेहरा केला.
मी पुन्हा शब्द जुळवत म्हणालो “तर आपले चाचा त्या हॉटेल चेनचे मालक आहेत. ज्याला आपण चाचांचा नोकर समजतो, तो अस्लम चाचांचा दुरचा नातेवाईक आहे. त्यांच्याकडेच लहानचा मोठा झालाय. त्याचीही मुंबईत दोन मोठी रेस्टॉरंटस् आहेत. या हॉटलच्या व्यवसायासाठी चाचा जगभर फिरत असतात. अत्यंत नावाजलेले शेफ आहेत ते. तुला अगदी हाताला धरुन त्यांनी कांदा कापण्यापासुन बिर्याणी कशी करायची, कोर्मा कसा करायचा शिकवले पण त्या चाचांची भेट घ्यायला देशोदेशीचे शेफ महिनाभर अगोदर अपॉईंटमेंट घेतात. गावाकडे शेकडो एकर जमीन आहे त्यांची. एक मुलगा आहे त्यांना. तो आणि त्याची बायको हा सगळा व्याप सांभाळतायेत. एक मुलगी आहे, तिचे लग्न झालेय. करोडपती आहेत. आता बोल तुला काय बोलायचे आहे ते”
बायको डोळे विस्फारुन सगळं ऐकत होती. त्या रात्री चाचांनी जे मला सांगीतले ते सर्व मी तिला थोडक्यात सांगीतले. चाचा पुण्यात कशासाठी आलेत, अस्लम का सोबत आलाय, ते सर्व काही मी बायकोला सांगुन टाकले. सगळं ऐकुन बायकोचे डोळे विस्फारले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झर झर बदलत होते. मी तिला हलवले तेंव्हा कुठे ती भानावर आली. तिने चटकन मोबाईल काढून गुगलवर त्या हॉटेलची माहिती काढली. त्या ओनरची माहिती काढली. चाचांचे अनेक नामांकित लोकांबरोबर फोटो होते. वेगवेगळ्या समारंभांचे, हॉटेल्सच्या ओपनींगचे, देशविदेशातील अनेक फोटो होते. चाचांच्या काही मुलाखती होत्या. मुंबईत त्यांनी चालवलेल्या वृध्दाश्रमांची माहिती होती. हॉस्पिटलची माहिती होती. त्यांच्या कुटुंबियांचे फोटो होते. बायकोसारखे माझ्या लक्षातच आले नव्हते चाचांचे नाव गुगल करायचे. त्यामुळे मीही ते सर्व प्रथमच पहात होतो. पुण्यातही चाचांच्या रेस्टॉची एक ब्रँच होती. त्याचेही फोटो होते.
बायको म्हणाली “कमाल आहे चाचांची. आपल्याला काहीसुध्दा बोलले नाहीत कधी. आणि वागण्या बोलण्यातुन तर काहीच समजत नाही. त्या अस्लमला तर तु खुशाल कामे सांगतो. तो बिचारा कितीवेळा बिर्याणी पोहचवून गेलाय आपल्याकडे”
मी बायकोकडे पहात विचारले “कळाले मी का जात नाही अल-अझीजवर ते? अग ते कुठे, आपण कुठे. तु तर त्यांना उद्या जेवायला बोलवायचे म्हणतेस, त्यांचे घर पाहिले तर वेडी होशील तू. प्रेसिडीओमध्ये अगदी लक्झरी, थ्री बिएचके डुप्लेक्स फ्लॅट आहे त्यांचा”
बायको सोफ्यावरुन एकदम उठली आणि चकीत होत म्हणाली “काय सांगतोस. खरच की काय!”
मग आम्ही दोघेही काहीही न बोलता म्युट केलेल्या टिव्हीकडे पहात राहीलो.
काही वेळाने बायको उठली आणि किचनमध्ये जाताना ठाम आवाजात म्हणाली “ते काहीही असुदे. माझ्यासाठी ते रसुलचाचा आहेत बाकी मला काही माहित नाही आणि घेणं देणंही नाही मला कसलं. मी उद्या त्यांना जेवायला बोलावणार म्हणजे बोलावणार. असतील ते मोठे बिझनेसमन, माझ्यासाठी चाचाच आहेत ते नेहमीचे”
बायकोचे एक बरे आहे. ती पटकन निर्णय घेते आणि मनावरचे ओझे क्षणात उतरवून ठेवते. मला काही ते जमत नाही. मी टिव्ही बंद केला आणि ‘काय करायचेय तिला ते करुदे’ म्हणत इतिहासाचे एक जड पुस्तक काढून बेडमध्ये वाचत पडलो. पुस्तक वाचता वाचता कधीतरी माझा डोळा लागला.

दुपारी कधी तरी बायकोने मला जोरजोरात हलवून उठवले.
“तुला किती वेळा सांगितलय की झोपलेल्या माणसाला हलवुन उठवू नये म्हणून. हाक मारता येत नाही का?” मी कुरबुरतच उठलो.
बायको माझ्या हातात घाईघाईने टॉवेल कोंबत म्हणाली “हळु बोल आणि नंतर चिड, अगोदर फ्रेश हो पटकन. बाहेर चाचा आलेत”
माझा आळस कुठल्या कुठे पळाला. “काय? चाचा येथे आलेत?” म्हणत मी बाथरुमकडे पळालो. कसेबसे फ्रेश होवून मी कुर्ता पायजमा चढवला आणि हॉलमध्ये आलो. कसलेसे मासिक चाळत चाचा सोफ्यावर बसले होते.
“आदाब चाचा! या या! अरे असे कसे अचानक आलात गरीबाच्या घरी? काही फोन नाही, काही नाही. बसा बसा ना” मी काय बोलत होतो तेच मला समजत नव्हते.
चाचा माझ्याकडे रोखुन पहात म्हणाले “या या काय करतोस, मी येवून दहा मिनिटे झाली. और बैठो क्या, कबसे बैठा हु यहाँ. साहब आराम फर्मा रहे थे. फोन करके आता तो तु सौ फिसदी भागता यहाँ से”
मला काय बोलावे तेच समजत नव्हते. बायको किचनमधुन बाहेर कान देवून होती.
चाचांनी मोठ्या आवाजात सांगीतले “बेटा मैं कॉफी पिऊंगा. मिठी और बगैर दुध की”
बायकोने आतुनच आवाज दिला “जी चाचा. अभी लाती हूं”
मी नुसताच वेंधळ्यासारखा इकडे तिकडे बघत चाचांसमोर बसलो होतो. खरे तर त्यांच्यापुढे बसायलाही मला आता संकोच वाटत होता. चाचांच्या हे सगळं लक्षात येत असणार.
माझ्याकडे पहात चाचा गंभीरपणे म्हणाले “अप्पा, तु अब सिर्फ सुनेगा, बगैरे टोके सुनेगा”
मी मान हलवत “जी” म्हणालो.
चाचा जरा वेळ गंभीर चेहरा करुन बसुन राहीले मग खसा खाकरुन बोलायला सुरवात करणार तोच बायको आतुन कॉफी घेवून आली. मला जरा बरे वाटले. मला चाचा जे काही बोलणार होते ते ऐकायचच नव्हते. शक्य असते तर मी तेथुन उठुन पळून गेलो असतो. चाचा बरोबर म्हणाले होते, जर ते फोन करुन आले असते तर मी नक्कीच त्यांना घरी सापडलो नसतो. बायकोने एक मग त्यांच्या हातात दिला व एक माझ्या हातात द्यायला लागली. ते पाहुन चाचा म्हणाले “ना बेटा, उसे मत दो कॉफी. अौर तुभी बैठ यहाँ मेरे सामने. काम होते रहेंगे”
बायकोने न कळत माझ्या पुढे केलेला मग मागे घेतला, मीही पुढे केलेला हात मागे घेत निमुट बसुन राहीलो. बायकोही माझ्या शेजारीच गोंधळून बसली.
चाचांनी कॉफीचा एक घोट घेतला आणि मग सेंटरटेबलवर ठेवत म्हणाले “अप्पा, दो महिने पहिले तु अल-अझीजपर आया था, मेरे बारेमे जहन मे गलत तखय्युल ले कर. जब मुझे देखा तो खुद पे गुस्सा हो गया था. याद है? और आज भी उसी गलत तखय्युल की वजहसे तुमने अपना दिल छोटा कर लिया. इत्तीफाकसे मिले दोस्ती के नायाब गौहर को नजरअंदाज करके तुने मेरे जर ओ माल को जेहनमे बिठा लिया. अल-अझीज का राब्ता बंद कर दिया, ये कहा का करीना है बेटा? मेरे उम्र और दोस्ती का लिहाज करने के जगह तुने मेरी माली हालत का लिहाज कर लिया, ये कैसा करीना है दोस्ती का अप्पा? अच्छे इन्सानसे दोस्ती होना तो अल्लाह की नेमत होती है. तुझे क्या लगा, चाचा मिले, दो चार दिन सलाम दुवा करेंगे और अपने अपने रास्ते चले जाएंगे? महिने दो महिने की रफाकत थी क्या हमारी सिर्फ? तु दोस्ती के असरार समझही नही पाया बेटा. इस मुकद्दस रिश्ते को समजते तो राब्ता बंद ना करते. खुद परेशान होकर मुझे इज्तीराब अता ना करते. किसी को किसीकी दरकार नही होती, ना कोई किसी का मौकुफ होता है सिवाय अल्लाह और दोस्त के, इस अदनासे बात से भी तु वाकीफ नही अप्पा? इतनी मुख्तसरसी जींदगी होती है इन्सान की, उसमेसे मैंने तुझे चंद वाकये क्या बताये तु उसी फानी चिजो को दिमाग मे ले बैठा? राबीया और मन्सुर की बाते करने वाला तु इतना नादान कबसे हो गया बेटा? मेरे बहु के हाथ मे फोन देकर टालता रहा मुझे, अप्पा अरे ऐसे उज्रसे जींदगी बसर नही होती कभी. सच्चे रिश्तोंमे उज्रके लिए जगह नही होती. प्यार और माल बिलकुल मुख्तलिफ बाते है अप्पा. जर और प्यार एक दुसरे से कोई वाबस्ता नही रखते. एक वक्त आता है आदमी के जींदगीमे जब सब मयस्सर होता है फिर भी कुछ नही होता. तुने जिस करीनेसे राब्ता बंद कर दिया है ना अप्पा ये बेरुखी रुह के लिए अच्छी नही होती. देख, तुने जो गलती पहले दिन की थी और आज कर रहा है, ये पाक दिल का आदमी ही कर सकता है. फिर भी अगर तुलुए शम्स अगर तेरे जहनसे ये गलत तखय्युलकी तिरगी नही हटती तो समज अल्लाह ही पासबान है तेरा. ये कुरबत और नवाजीश ठुकरा मत पागल की तरह बेटा. मैंने हयातमे कभी फिक्रे फर्दा नही की अप्पा सिर्फ फिक्रे यार की है इसलीए तेरे चौखटपे खडा हुं. जीतना जियादा सोचेगा, उतना यारसे दुर होते जाएगा. मै चलता हूं. शाम को तु हाजीर होगा अल-अझीजपे. समजा? अगर तेरे दिदार नही होते मुझे तो कल फिर आवूंगा इसी चौखटपर, आतेही रहुंगा. तुझे ना सही, मुझे दरकार है तेरी. देखू कबतक इस बुढेको तंग करता है तू”
कॉफी तशीच ठेवून चाचा उठले. माझ्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते. पण चाचांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि बायकोला म्हणाले “चलता हुं बेटा. तरी कॉफी उधार रही मुझपर. घरमे दही होगा तो जरा शहद मिलाकर खिला अप्पाको. उसे जरुरत है उसकी. चाय कॉफी मत देना उसे दो घंटेतक”
चाचांनी दाराबाहेर काढलेली मोजडी पायात चढवली. बायको घाईने दाराजवळ जात म्हणाली “काय झालय चाचा तुमच्या दोघांमध्ये? अप्पा काही बोलला का? त्याच्या मनात नसते हो काही, वेडा आहे जरासा इतकच”
चाचा हसत म्हणाले “हां पागल है जरासा. जानता हुं. कुछ नही हुआ, बस थोडी गफलत हुई है उसकी. तु जानकर क्या करेगी बेटा. जियादा इल्म प्यारके लिए अच्छा नही होता”
बायको काकुळतीला येवून म्हणाली “चाचा हिंदीत बोला ना प्लिज. आणि एक विचारु का?”
चाचा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले “तु जियादा मत सोच बेटी. सब कुछ ठिक है. पुछ क्या पुछना चाहती है?”
बायकोने सगळा धिर एकवटून चाचांना विचारले “चाचा, उद्या आमच्याकडे जेवायला याल?”
चाचा जोरात हसत म्हणाले “कितने दिनसे इस दावतका मुंतजीर हूं मै, लेकीन तुन मिया बिबी मुझे बुलातेही नही. मी जरुर येईन बेटा जेवायला. लेकीन मेरी एक शर्त है. दस्तरखान तुम्हारा, पकवान मेरा. अगर मंजुर हो तो कल मै जरुर आवूंगा”
अस्वस्थ होत बायको म्हणाली “असं कसं चालेल चाचा? मी काही तरी बनवून ठेवते ना”
चाचा म्हणाले “ठिके बेटा, दही जमाके रख, बैंगन लाके रख. कल मै तुझे बाबा गनुश बनाना सिखाऊंगा. यही बनायेंगे, और यही दावत करेंगे. मैभी कल इराकी कुझी लेके आऊंगा. तुझे पसंद आएगी डिश”
चाचा गेले. मीही डोळे पुसुन, तोंड वगैरे धुवून बेडमध्ये येवून बसलो. बायको येवून म्हणाली “काय म्हणत होते रे चाचा इतक्या वेळ? मला शब्द समजला नाही. चेहऱ्यावरुन तर शांत दिसत होते. असं काय बोलले की तु लहान मुलासारखा रडायला लागला चक्क. मला किती दडपन आलं होतं माहितीए का? बरं निदान ते जाताना काय म्हणाले मला ते तरी सांग”
रडल्यामुळे असेल किंवा चाचांनी माझ्या डोक्यातली जळमटे झटकल्यामुळे असेल पण मला आता अगदी हलके वाटत होते. मी बायकोला म्हणालो “अगं ते म्हणत होते की इल्म म्हणजे ज्ञान किंवा माहिती ही प्रेमाला घातक असते. मग ते प्रेम मित्रावरचे असो, बायकोवरचे असो अथवा इश्वरावरचे असो”
“छे असं कसं काहीही सांगतील चाचा. तुला सांगायचे नसेल तर नको सांगु”
“अगं खरच. आता बघ, ती १०१४ मधली भाभी मला खूप आवडते हे तुला माहीत आहे का?”
बायकोने नाही म्हणून मान डोलावली.
मी हसत म्हणालो “म्हणजे ती मला आवडते याचे ज्ञान तुला नाही म्हणून काही त्रास पण नाही. पण आता तुला माहीत आहे ती भाभी मला खुप आवडते तर तु काय करशील?”
बायकोला जरा उशीरा गम्मत कळाली. ती हसत म्हणाली “मी तिचा खुन करेन. अन ध्यानात ठेव, प्रेमात इल्म पाहिजेच पाहिजे. आणि तो इल्म बायकांना उपजत असतो हे ध्यानात ठेव. भाभीचे नाव तर काढ मग तुला सांगते”

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चाचा आले. अस्लमने त्यांची मोठी कॅनव्हासची बॅग आणुन ठेवली आणि तो अल-अझीजकडे परतला. मग बायकोचे आणि चाचांचे किचनमध्ये काय काय प्रयोग सुरु झाले. तो नावाजलेला म्हातारा शेफ माझ्या बायकोला काय काय शिकवत होता. दोघांनीही माझ्याकडे चक्क दुर्लक्ष केले होते. तरीही मी आपला किचनमध्ये त्यांच्यात लुडबुड करत होतो. बायकोने तर एकदा हटकले व सांगीतले “तु जावून बस बरं बाहेर, टिव्ही पहा. स्वयंपाक झाल्यावर सांगते”
तरीही मी कॅमेरा काढून दोघांचे, चाचांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत होतो. मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होतो. दोघेही हसत नव्हते तरी मधे मधे पाचकळ विनोद करत होतो. रात्री साडेसातवाजेपर्यंत अस्लम ‘कुझी’ची हांडी देवून गेला. चाचांनी वेगळेच दिसणारे रोटीसारखे ब्रेड बनवले होते. बाबा गनुश बनवले होते. घरात बसायच्या ऐवजी आम्ही ओपन टेरेसमध्ये चादर अंथरली. मी आणि बायकोने चाचा सांगतील तशा डिश मांडुन ठेवल्या. चार पाच मेणबत्त्याही पेटवल्या. बायकोने सगळ्यांना वाढले. चाचांनी प्रार्थना पुटपुटली आणि आमची जेवणे सुरु झाली. ती एक तासभर रंगलेली महफिलच होती. आम्ही हसत होतो, एकमेकांना वाढत होतो, खात होतो. आनंदाला जणू उधान आले होते. ती तिघांनीच केलेली, आंतरराष्ट्रीय पाककृती असलेली जेवणाची पंगत मी कधीच विसरणार नाही. जेवणे उरकल्यावर मी आणि बायकोने सगळे आवरले आणि तेथेच कॉफीचे मग घेवून आम्ही पुन्हा गप्पा मारत बसलो. आमची ती गप्पांची मैफील अस्लम अल-अझीज बंद करुन आल्यावरच मोडली.

दिवस सरले, महिने गेले. एकदा आई बाबा आले होते, त्यांचीही ओळख चाचांबरोबर करुन दिली. वडील सुफी पंथाचे चांगले जाणकार असल्याने त्यांच्या गप्पा खुप रंगल्या. आमच्यासारखेच बाबाही चाचांचे दिवाने झाले. आणि एक दिवस कामावर असताना अस्लमच फोन आला की चाचांनी दोघांनाही बोलावले आहे. अल-अझीजवर नाही तर घरी यायला सांगीतलय. अस्लमने काहीही डिटेल्स दिले नव्हते. ही वेळ चाचा घरी असण्याची नव्हती त्यामुळे जरा काळजी वाटली. बायकोला आवरायला सांगीतले आणि अर्ध्या तासात आम्ही ऑफीस सोडले. पस्तीस चाळीस मिनिटे लागले असतील चाचांच्या घरी पोहचायला. एवढ्या वेळात मी अनेक चांगले वाईट विचार केले. वाईटच जास्त. “विचार करुन काळजी वाढवू नकोस उगाच” या बायकोच्या म्हणन्याचा फारसा परिणाम झाला नाही. मी गाडी पार्क केली आणि घाईने लिफ्ट गाठली. बायको मागुन येतेय याचेही मला भान राहीले नाही. मी चाचांच्या फ्लोअरचे बटन दाबले. चाचांच्या फ्लॅटचे दार उघडेच होते. मला अजुनच टेन्शन आले. मी चिंतातुर चेहऱ्यानेचे घरात घुसलो. समोरच्या सोफ्यावर चाचा बसले होते. शेजारीच सुटाबुटातील एक रुबाबदार व्यक्ती बसली होती. माझ्यापेक्षा तिन चार वर्षांनी मोठी असावी. बाजुला हिजाब घातलेली पण परदा डोक्यावरुन मागे टाकलेली गोरीपान देखणी स्त्री उभी होती. दाराच्या जवळ जड बॅगा भरुन ठेवलेल्या दिसत होत्या. अस्लम त्या खाली हलवायच्या तयारीत होता.
माझ्या चेहऱ्याकडे पाहुन चाचा म्हणाले “या अस्लमला सांगीतले होते व्यवस्थित फोन करायला लेकीन उसने दो लब्ज कहकर फोन रखा होगा. अपने वजहसे कोई परेशान होता है तो अपने बला से. आवो अप्पा. परेशानी की कोई बात नही है. बहुला नाही आणलेस का?”
तिला न घेताच मी लिफ्टने वर आलो होतो त्यामुळे मी जरा ओशाळून हसलो इतक्यात बायको आली.
चाचा हसुन म्हणाले “तुझे निचेही छोडके भागा ना ये? मुश्कील है बेटा”
मी सोफ्यावर बसत म्हणालो “काय चाचा, किती घाबरवता? ऑफीस तसेच सोडुन आलोय आम्ही दोघे”
चाचांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीची ओळख करुन दिली “अप्पा, ये है मेरा बेटा, मोहसीन. और ये मेरी बहु रझीया” हे सांगताना चाचांच्या आवाजातुन कौतुक अगदी ओसंडुन वहात होते. मी वाकून त्यांच्या मुलाला हस्तोदलन करण्यासाठी हात पुढे केला पण तो उठुन उभा राहीला आणि त्याने हात पसरले. मीही मग उठुन त्याला मिठी मारली. खांदे बदलत मोहसीन अगदी मनापासुन भेटला. त्याच्या स्पर्शातुन आपुलकी जाणवत होती. मिठी मारुन झाल्यावर त्याने माझे दोन्ही दंड हातात धरले आणि माझ्या चेहऱ्याकडे बारकाइने पाहीले. त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि ओठांवर हसु.
माझे दोन्ही खांदे हलवत तो म्हणाला “अप्पा, एक साल हम बस तुम्हारीही तारीफ सुनते आए है. अब्बू दस मिनिट के लिए फोन करते थे और उसमे आठ मिनिट बस तुम्हाराही जिक्र होता था. खुप खुप शुक्रीया अप्पा! माझ्या वडीलांची खुप काळजी घेतलीत तु आणि भाभींनी”
चाचांच्या सुनेनेही बायकोला मिठी मारली होती. त्या दोघींच्याही डोळ्यात पाणी होते. चाचा आमच्याकडे अतिशय अभिमानाने पहात हसत होते. त्यांचेही डोळे भरुन आले होते. आम्ही पुन्हा सोफ्यावर बसलो. रझीया बायकोला घेवून आत गेली. अस्लमची एक फेरी झाली होती. तो बाकीच्या बॅग न्यायला पुन्हा वर आला होता. मोहसीनला, रझीयादिदीला भेटुन मला फार बरे वाटले होते. ते दोघेही दर महिन्याला यायचे पण त्यांची आणि चाचांची भेट त्यांच्या हॉटेलवरच व्हायची, त्यामुळे वर्षभरात भेटीचा योग आला नव्हता.
मी चाचांना विचारले “चाचा अगोदर नाही का सांगायचे? आम्ही परस्पर ऑफीसमधुनच इकडे आलो. असुद्या, आज संध्याकाळी जेवायला माझ्याकडे यायचे सगळ्यांनी. नो अल-अझीज, नो कँपमधले हॉटेल”
चाचांचा चेहरा पडला. मोहसीन माझी नजर चोरत इकडे तिकडे पहायला लागला. अस्लमने पटकन दोन बॅग उचलल्या आणि तो बाहेर पडला. चाचा म्हणाले “अप्पा, आज मै मुंबई जा रहा हुं. अपना अल-अझीज कलसे नही खुलेगा. अॅग्रीमेंट आजही के दिन तक था. ना तो वो अॅग्रीमेंट बढा रहा है ना ये मोहसीन मुझे यहा रहने दे रहा है. मै तुझे पहलेही बोलनेवाला था पर हिम्मत नही जुटा पाया”
मला समजेनाच चाचा काय बोलत आहेत ते. अल-अझीज बंद म्हणजे काय? आणि लगेच काय कारण आहे मुंबइला जायचे? मी हे लक्षातच घ्यायला तयार नव्हतो की चाचांचे सगळे कुटूंब मुंबईत होते. व्यवसाय मुंबईत होता. ते तर वर्षभरासाठीच पुण्यात आले होते. आमची ओळखही जेमतेम वर्षभराची तर होती.
मी म्हणालो “अॅग्रीमेंट वाढवत नाही म्हणजे काय? आपण चांगले मोठे दुकान विकत घेवू हवं तर. आणि मोठे अल-अझीज सुरु करु” एका हॉटेल व्यवसायात मुरलेल्या माणसाला मी हॉटेल सुरु करायचा सल्ला देत होतो. मुळात मला काही सुचतच नव्हते.
मोहसीनकडे पहात मी म्हणालो “आम्ही आहोत ना मोहसीनभाई येथे, मग चाचांची काय काळजी आहे? असं कसं तुम्ही अचानक येता आणि त्यांना घेवून जातो म्हणता? ये तो गलत बात है”
आता मोहसीनलाही काय बोलावे ते सुचेना आणि चाचांनाही. ते दोघे एकमेकांकडे आणि मग माझ्याकडे पहात राहीले. मी बायकोला आवाज देत बाहेर बोलावले. दोघीही बाहेर आल्या. बायकोचा चेहरा उतरला होता. बहुतेक रझीयादिदीने तिला कल्पना दिली असावी. मी म्हणालो “हे बघ काय म्हणतायेत. चाचांना घेवून जायला आलेत म्हणे. तुच सांग आता”
बायको व्यवहारी, मी बावळट. तिलाही समजेना माझी कशी समजुत काढावी ते. तिनेही चाचांकडे हताश होवून पाहीले. त्या हॉलमध्ये 'चाचांचे जाने’ हा मसला न रहाता ‘मला कसे समजुन सांगावे’ हा नविनच मसला उभा राहीला.
शेवटी सगळ्यांना डोळ्याने खुणावत चाचा मला बेडरुममध्ये घेवून गेले. अर्धा तास चाचांनी माझी अक्षरशः लहान मुलासारखी समजुत काढली. मुंबईवरुन पुण्याला येताना मोहसीनच्या काही अटी मान्य करुन आले होते आता मला काही अटी कबुल करत होते. दर पंधरा दिवसांनी मी पुण्यात येईन, पंधरा दिवसांनी तुम्ही दोघे मुंबइला यायचे. अल-अझीजची आठवण म्हणून त्याच नावाने लवकरच पुण्यात एक रेस्टॉरंट सुरु करु, दर दोन दिवसाला न चुकता तुला फोन करत जाईन, मुंबई काय, फक्त तिन तासांचा तर प्रवास आहे वगैरे वगैरे. हे सगळे मला जितके जड जात होते त्यापेक्षा जास्त जड चाचांना जात होते पण मी विचारच करायला तयार नव्हतो त्यांचा. शेवटी मी कसाबसा कबुल झालो. “हसते हुए बाहर चल अब” या चाचांच्या सुचनेमुळे मी हसत त्यांच्या बरोबर बाहेर आलो तेंव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. चाचांनी सुनेकडे पाहुन खुणावले तेव्हा तिने दोन बॉक्स काढून चाचांच्या हातात दिले.
चाचांनी बायकोला पुढे बोलवून तिच्या हातात एक बॉक्स देत म्हणाले “एक लफ्ज कहे बगैर अभी पहनके दिखा”
बायकोनेही मोठया कौतुकाने बॉक्स उघडला मात्र लगेच सोफ्यावर ठेवून ती मागे सरकली. चाचांना बहुतेक अंदाज होताच. “देख बेटा, मै आज जा रहा हू. तु अगर मुझे नाराज करोगी तो मै फिर कभी पुना नही आवूंगा. रझीया उसे पहना दे”
रझीयादिदीने बॉक्समधल्या सोन्याच्या बांगड्या बायकोच्या हातात घातल्या आणि कानातलेही व्यवस्थित घालून दिले.
बायकोच्या डोळ्यातले पाणी पाहुन चाचा म्हणाले “ये रझीया गहने नही देता हूं इस लिए रोती है और पगली तुझे मिले है इसलिए रो रही है? कंगन देखके तुझे मेरी याद आयेगी. रोज पहनना”
माझ्याकडे वळून चाचा म्हणाले “तुझे क्या दु अप्पा मै? तुनेही आजतक इतना भरभरके दिया है मुझे की मै क्या कहू? अब चुपचाप जो दे रहा हूं उसे ले. तेरा रोजका पागलपण आज मै बर्दाश्त नही करुंगा. आ, मेरे सामने आ”
मी चाचांपुढे सोफ्यासमोर गुडघ्यावर बसलो. चाचांनी प्रथम त्यांच्या बोटातला फिरोज काढला आणि बॉक्समधल्या चेनमध्ये गुंफला आणि माझ्या गळ्यात घालत म्हणाले “ये फिरोज मेरे वालीद का है अप्पा. ये मोहसीन को नसिब होना था लेकीन अल्लाह की मर्जी है. इसे प्लॅटेनिअमसे निकालकर बादमे सोनेमे बनाकर गलेमे पहनना”
मी मोहसीनकडे पाहिले. त्याने खांदे उचलुन म्हटले “क्या करे भाई, अब्बु ऐसेही कारोबार करते है. किस्मतवाले हो”
मी ती अंगठी कुरवाळली आणि चाचांचा हात घट्ट दाबुन धरला. जरा वेळ आम्ही हे ते आवरण्यात वेळ घालवला. निघायची वेळ झाली. अस्लमने सगळे खाली गेल्यावर फ्लॅटला कुलूप लावले. मोहसीन अस्लमसोबत त्याच्या गाडीत बसला. त्याला हैद्राबादला रात्री महत्वाची मिटिंग होती. अस्लम त्याला एअरपोर्टवर सोडून मुंबईला जाणार होता. त्याने आणलेली लांबलचक मर्सिडीझ चाचा घेऊन जाणार होते. रझीया चाचांबरोबर जाणार होती. निरोप रेंगाळला की मला त्रास होतो त्यामुळे मी सगळ्यांनाच घाई केली. मी चाचांना पुन्हा एकदा मिठी मारली. अगदी जीवलग मैत्रीण असावी तशी रझीयानेही बायकोला घट्ट मिठी मारली. अस्लमने गाडी बाहेर काढली, त्याच्यामागे मीही निघालो. आमच्या मागे चाचा निघाले. पाच मिनिटात आम्ही मेन रोडला आलो. मी क्षणभर गाडी स्लो केली. आम्ही दोघांनीही हात बाहेर काढून हलवले. कुणी प्रतिसाद दिलाय की नाही हे न पहाता मी घराच्या दिशेने गाडी वळवली. चाचा आणि अस्लमच्या कार पुणे स्टेशनकडे वळाल्या. मला चाचांनी सांगीतलेला शेर आठवत होता
बंदगीके मजे, बंदानवाजी का लुत्फ
जा उस बंदे से जाकर पुछ, जो बंदे का बंदा हो गया।

मधे आठ दहा दिवस गेले. मला अजुनही चाचांशिवाय करमत नव्हते. एके संध्याकाळी घरी आलो. गेटवर गाडी थांबवून गोविंदची चौकशी करत होतो तेंव्हा दिसले की अल-अझीजसमोर एक टेंपो थांबला होता. दोन मानसे वरचा बोर्ड उतरवत होती. मी गाडी गेटवरच सोडून धावलो. वर चढलेल्या माणसांना दरडावून खाली उतरवले. टेंपोत अल-अझीजचे सगळे सामान भरले होते.
मी ओरडलो “किसको पुछ के बोर्ड उतार रहे हो? हटो यहाँ से”
बायकोही धावत आली. तिने चौकशी करायचा प्रयत्न केला पण मी त्या दोघांनाही तेथुन जायला भाग पाडले. त्यातल्या एकाने टेंपो सुरु केला. दुसऱ्याने कुणाला तरी फोन केला आणि काही वेळ बोलुन मग अत्यंत केविलवाना चेहरा करत माझ्या हातात दिला.
मी हॅलो म्हणताच समोरुन आवाज आला “सलाम भाईजान, अस्लम बोल रहा हुं. वो दुकान किसी और का है, बोर्ड तो उतारनाही पडेगा. अपनेही लोग है वो. चावल की बोरीयाँ भेजी है रसुलचाचाने, उसमे अल-अझीजकी बोरीया मिलाकर आपके नाम के सदके बटेंगे. ये कहने के लिए फोन किया था दो बार मैने लेकीन आपने फोन रिसिव्ह नही किया. फिर आरामसे बात करते है भाईजान. अभी जाने दो उन लोगोंको. अल्लाह हाफीज”
काय करावे या चाचांना? माझ्या भल्यासाठी, माझ्या नावाने मुंबईतुन सदके वाटत होते. त्या दोघांनीही तो लांबलचक बोर्ड काढला. टेंपोत उभा करुन ठेवला आणि पहाता पहाता टेंपो ट्रॅफीक मध्ये हरवून गेला. मला टेंपो दिसत नव्हता पण सगळ्या ट्रॅफीकमधुनही वर आलेला तो बोर्ड आणि त्यावरची काही अक्षरे दिसत होती. हळू हळू अल-अझीज माझ्या नजरेसमोरुन नाहीसे झाले. हा बोर्ड पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आला होता तेंव्हाही काळजात आग पेटली होती आणि आता जात होता तरी काळजात आग पेटली होती.
आकर भी तडपाते है वो, जाकर भी तडपाते है।
---------------------------------
अल-अझीज: अल्लाहच्या ९९ नावांपैकी एक. स्ययंपुर्ण, शक्तिशाली असलेला इश्वर (मुळ शब्द ‘अल्‌-अज़ीज़’ असा आहे. मी उच्चारासाठी अल-अझीज असा घेतला आहे)
जहन: मन
तखय्युल: कल्पना, विचार
गौहर: मोती
जर: सोने, माल: संपत्ती
राब्ता: जाणे येणे, संपर्कात राहणे
करीना: पध्दत
अल्लाह की नेमत: इश्वराचे देने
रफाकत: साथसंगत
असरार: मर्म किंवा रहस्य
मुकद्दस: पवित्र, निर्मळ
इज्तीराब: मनाची अस्वस्थता
दरकार: आवश्यकता, गरज
मौकुफ: अवलंबून असणे
अदना: क्षुल्लक
मुख्तसर: अत्यंत लहान
फानी: अनित्य, नश्वर
उज्र: निमित्त, बहाने
मुख्तलिफ: भिन्न, वेगवेगळे
वाबस्ता: संबंध
मयस्सर: उपलब्ध असणे
तुलुअ: उदय, शम्स: सुर्य, तुलुए शम्स: सुर्योदय
तिरगी: अंधकार, अंधार
पासबान: संरक्षण करणारा
कुरबत: प्रिय व्यक्तिचे जवळ असणे, जवळीक
नवाजीश: कृपा
हयात: आयुष्य
फिक्र-ए-फर्दा: उद्याची काळजी, फिक्र-ए-यार: मित्राची काळजी
इल्म: ज्ञान
(काही चुक भुल असेल तर जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशपथ!!! असं कसं लिहवत तुम्हाला.
आयुष्यात अशी माणसे मलाच का कधी भेटली नाहीत, याची खंत आज पुन्हा जागी केली...
दंडवत!!!

सुंदर उतरलेय चित्र. ऋणानुबंध कुणाशी का व कसे जुळतात हे सांगणे अवघड आहे.

एवढे दीर्घलेखन कसे काय जमते बुवा?? जबरी पेशन्स आहे.

किती उशीरा लिहिलीत तुम्ही? इतकं भारी लपवूनच ठेवलं होतं वाटते इतके दिवस. तुमच्या भात्यातील बाण सॉरी खाणीतील रत्ने लवकर लवकर बाहेर काढा. सुंदर अप्रतिम.

अरे देवा !!!!!!
कसं आणि काय लिहायचं आम्ही आता यावर???
अप्रतिम हा शब्दही कमी पडेल या लेखासाठी... कित्ती सुंदर असावं आणि लिहावं एखाद्याने...
रसुलचाचांच्या तर प्रेमातच पडले मी...
अतिशय सुंदर सुंदर आणि सुंदर...
एखाद्या सुंदर मोरपिसासारखा हळुवारपणे हृदयात जपून ठेवावा असाच हा लेख!!!
खरंच दंडवत!!
मस्त मस्त मस्त Happy Happy Happy

काय लिहिलंत हो!
खरंच सांगू,आज तुमचा खूप हेवा वाटला.अशी माणसांची श्रीमंती मिळायला/लाभायला कर्तृत्वाबरोबर नशीब लागते.खूप छान वाटले वाचून!आता इतक्यात दुसरं काही वाचूच शकणार नाही.खूप छान!

काय लिहिलंत हो!
खरंच सांगू,आज तुमचा खूप हेवा वाटला.अशी माणसांची श्रीमंती मिळायला/लाभायला कर्तृत्वाबरोबर नशीब लागते.खूप छान वाटले वाचून!+ १११११११११

अरे देवा !!!!!!
कसं आणि काय लिहायचं आम्ही आता यावर???
अप्रतिम हा शब्दही कमी पडेल या लेखासाठी... कित्ती सुंदर असावं आणि लिहावं एखाद्याने...
रसुलचाचांच्या तर प्रेमातच पडले मी...
अतिशय सुंदर सुंदर आणि सुंदर...
एखाद्या सुंदर मोरपिसासारखा हळुवारपणे हृदयात जपून ठेवावा असाच हा लेख!!!
खरंच दंडवत!!
मस्त मस्त मस्त ☺️☺️☺️>>>>१११११११११११

हुश्शा... आत्ता श्वास घेतला मी शेवटी... अक्षरशः एका दमात वाचला. सोडवतच नव्हतं वाचन. काय लिहिलंय तुम्ही... सॉल्लिड!
रसूलचाचाच्या बिर्याणीसारखाच मस्त मुरलेला लेख.
तुम्हाला माणसंही अशी भेटली की त्यांच्यावर लेख लिहावे. भाग्यवान आहात. रसूलचाचांच्या फॅमिलीचे निर्व्याज प्रेम किती छान !

प्रतिसाद काय द्यावा, या ऐवजी वेगळीच समस्या उभी राहिलीय माझ्यासमोर.. काहीतरी वाचल्याशिवाय, माझं मन लागत नाही आणि आता हे वाचल्यानंतर पुन्हा काहीच चांगले वाटणार नाही... झोपेचं खोबरं झालं माझ्या, पण सत्कारणी लागली झोप.. विस्कळीत आहे खरा प्रतिसाद, पण सैरभैर इतका झालोय की काय लिहावं कळत नाही, आणि लेखन आवडलंय हे देखील तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे...

मी पूर्वी एक दोनदा म्हटलेलो की तुम्हाला भेटायचं आहे, पण आता जरा कठीण वाटतंय.. इतक्या जिंदादील लोकांच्या सान्निध्यात राहिलेले तुम्ही, आणि शिफ्टच्या चाकावर फिरणारे चाकरमानी आम्ही.. कसा मेळ बसायचा? आजवर पाटील कधीच स्वतःला कमी समजले नव्हते कोणत्याच बाबतीत, पण आज खऱ्या अर्थाने खुजे ठरले आहेत... दंडवत घ्या शालीजी! (इथं अप्पा लिहिणार होतो खरंतर, पण हात आवरला)

जबरी नशीब आहे शाली तुमचे, तुम्हाला मस्त मस्त पदार्थ बनवणारे/खायला देणारे लोक भेटतात.
बाबा गणुश बरोबर पिटा ब्रेड होता का?

क्या बात है!! सुंदर!
मधलं ऊर्दू डोक्यावरून वाहून गेलं. भावार्थ समजला तरी सौंदर्याचा आस्वाद घेता आला नाही Sad
जमलं तर मराठीत किंवा साध्या हिंदीत लिहा रसूलचाचा काय म्हणाले ते.
कुठलाच साचेबद्धपणा किंवा संकुचितपणा आणायचा नाहीये, पण खानदानी मुस्लिम व्यक्तींची जी शान असते, ती काही वेगळीच असते.

वाचताना Frederick Forsyth ची गोष्ट वाचतोय असे वाटले. पण सॉरी, कथा काल्पनिक आहे हे पटकन लक्षात आले.

खूपच सुंदर लिहिता तुम्ही. प्रतिसाद देणं नीट जमत नाही, पण तुमचं लिखाण नेहमीच काही तरी सुंदर अनुभवल्याचा आनंद देऊन जातं...

शाली,
जगात सगळ्यात भाग्यवान माणूस तोच असतो, जो अश्या नितांत सुंदर, निर्मळ, निष्कपटी "मरासिम" मध्ये गुन्ततो. किती नानाविध माणसे तुम्हाला भेटली आहेत, आणि आम्ही पण तितकेच भाग्य"शाली" की तुमच्या लिखाणातून आम्हाला हे तुमचे गणगोत भेटते आहे.
तुमचे आभार !! रसुल चाचांना कुर्निसात Happy

- प्रसन्न

“अगं ते म्हणत होते की इल्म म्हणजे ज्ञान किंवा माहिती ही प्रेमाला घातक असते. मग ते प्रेम मित्रावरचे असो, बायकोवरचे असो अथवा इश्वरावरचे असो” >>>>> ते तुकोबा सारखे सारखे विठ्ठलाला विनवायचे की तू मला नेणताच ठेव रे, त्यातच खरे सुख, खरा आनंद आहे....
यावर मी कितीदा विचार केलेला पण इथे आता एका क्षणात उलगडा झाला.... Happy

________/\_______

वाहवा! अप्रतिम.
तुमच्या सगळ्या सगळ्या लिखाणतलं हे फारच भावलं.

खूपच सुंदर लिहिता तुम्ही. प्रतिसाद देणं नीट जमत नाही, पण तुमचं लिखाण नेहमीच काही तरी सुंदर अनुभवल्याचा आनंद देऊन जातं...>>>>+११११

अज्ञातवासी, बब्बन सगळ्यांनाचा आयुष्यात अशी हिऱ्यासारखी माणसे भेटतात, आपण प्रतिसाद देत नाही त्यांना किंवा लक्ष देत नाही. आपल्या कामातुन जरा फुरसत काढली की अशी असंख्य माणसे आजुबाजुला दिसतात.

च्रप्स, आपण आरशासारखे असतो. आपण जसे आहोत, तशीच माणसे आपल्याला दिसतात, भेटतात. दुर कशाला, येथे मायबोलीवर सुध्दा मला अशा व्यक्ति भेटल्यात की मी कधीही जावून "मला हे खावसं वाटतय" असं हक्काने आणि हट्टाने म्हणू शकतो. म्हणतो देखील Happy

वावे, उर्दु शब्दांचे अर्थ लेखाखाली दिले आहेत आता. तरीही तो पॅराग्राफ हिंदीत लिहावा असं वाटत असेल तुम्हाला तर मी बदल करेन.

वाह! क्या बात है !!
अप्पा, अरे कसला भारी आहेस तू . कसला अफाट लोकसंग्रह तुझा. दंडवत घ्यावा. तुला आणि वैशाली ला आता भेटलेच पाहिजे
रसूल चाचांचे वर्णन वाचुन मी हि त्यांच्या प्रेमात पडले. कसले सुरेख वर्णन केले आहेस.
खरंच नशिबवान आहेस.

सगळे काम बाजूला ठेवून एका दमात लेख वाचुन काढला. दरवेळी डोळ्यातून
पाणी काढतोस आणि डेस्क वर कुणी आले कि पंचाईत होते. Happy

Pages