Odd Man Out (भाग २२)

Submitted by nimita on 5 April, 2019 - 20:23

दुसऱ्या दिवशी नम्रता वेळेच्या थोडी आधीच क्लास मधून बाहेर आली. 'कधी एकदा संग्रामला भेटते आणि त्याला माझा होकार सांगते' असं झालं होतं तिला. संग्राम तिची वाटच बघत होता. आज नम्रता तिचा निर्णय सांगणार होती. तसं पाहता आज परत भेटायला बोलावून तिनी indirectly तिचा होकार कालच दिला होता. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार होतं इतकंच.

पण त्याआधी तिला काही गोष्टी स्पष्ट करून सांगणं आवश्यक होतं. 'कालच्या भेटीतच तिला या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला हवी होती , पण तिला समोर बघितलं आणि मी सगळं काही विसरलो... जे जे बोलायचं ठरवून आलो होतो, त्यातलं कितीतरी मनातच राहिलं,' संग्रामच्या मनात सकाळपासून विचारांचं द्वंद्व चालू होतं. ' पण आज मात्र तिला सगळं काही स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे.....पण वस्तुस्थिती समजल्यानंतर जर तिनी नकार दिला तर?' या नुसत्या विचारानीच संग्राम अस्वस्थ होत होता. 'त्यापेक्षा आत्ता काहीच नको सांगायला..लग्नानंतर हळूहळू कळेलच की तिला सगळं...पण मग ही तर शुद्ध फसवणूक झाली....नाही नाही, नम्रताला असं अंधारात ठेवणं नाही जमणार मला ! त्यापेक्षा मनातलं सगळं आज बोलून टाकतो तिच्याशी. त्यानंतर ती जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल!!'

संग्रामचा निर्णय झाला होता..आणि म्हणूनच तो आतुरतेनी नम्रताची वाट बघत तिच्या क्लास च्या बाहेर थांबला होता. तिला बाहेर आलेली बघताच संग्राम पुढे झाला. तिची नजर त्यालाच शोधत होती. तो दिसताच तिच्या चेहेऱ्यावर हसू फुललं.पण संग्राम मात्र जरा गंभीर दिसत होता. नम्रताच्या हृदयाचा ठोका चुकला..' यानी आपला विचार तर बदलला नसेल ना?'तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...तिनी मनोमन तळ्यातल्या गणपतीला हात जोडून प्रार्थना केली,' देवा, प्लीज असलं काही नसू दे...'

आपापल्या मनाला समजावत, धीर देत दोघं समोरच्या कॅफे मधे शिरले. आदल्या दिवशी प्रमाणेच आजही संग्रामनी नम्रताची खुर्ची मागे ओढून तिला बसायला मदत केली. 'हं, an officer and a gentleman !!!' त्याच्यावर अजूनच फिदा होत नम्रता मनात म्हणाली.

काही क्षण शांततेत गेले..कशी आणि कुठून सुरुवात करावी याच विचारात दोघंही होते. सकाळपासून संग्रामला भेटायला, त्याला आपला होकार सांगायला आतुरलेली नम्रता आता अचानक गप्प होती. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. पण शेवटी सगळा धीर एकवटून तिनी बोलायला सुरुवात केली.."तुला माझा निर्णय ऐकायचा आहे ना ? मी..." ती पुढे काही बोलणार इतक्यात संग्रामनी तिला मधेच थांबवलं आणि म्हणाला," त्याआधी मला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता मी जे काही बोलणार आहे ते सगळं तू प्लीज नीट ऐकून घे, त्यावर पुन्हा एकदा विचार कर आणि मग काय ते ठरव."

संग्रामचं हे असलं बोलणं ऐकून तर नम्रताचं टेन्शन अजूनच वाढलं. ती जीवाचे कान करून ऐकायला लागली. संग्राम सांगत होता," तुला तर माहितीच आहे की मी आर्मी मधे आहे. मिलिटरी लाईफ हे खूप टफ असतं...फक्त सैनिकांसाठीच नाही तर त्यांच्या परिवारांसाठी सुद्धा.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे - आमच्या आयुष्याची काही शाश्वती नसते," त्याला मधेच थांबवत नम्रता म्हणाली," ती तर माझ्या आयुष्याची सुद्धा नाहीये...in fact या जगात कोणाच्याच आयुष्याची शाश्वती नसते. त्यामुळे हा मुद्दा माझ्यासाठी नगण्य आहे..." नम्रताचं इतकं स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणं ऐकून संग्राम मनात आत कुठेतरी सुखावला...या एका बाबतीत पारडं त्याच्याकडे झुकलं होतं. पण तरीही अजून बरेच मुद्दे होते, त्यामुळे त्यानी पुढे बोलायला सुरुवात केली,"नोकरीच्या निमित्तानी आम्हांला दर दोन तीन वर्षांनंतर आपलं बिऱ्हाड हलवावं लागतं. त्यामुळे तुला जर एखादी नोकरी किंवा करियर करायचं असेल तर तुला ते नाही करता येणार. " नम्रताकडे उत्तराच्या अपेक्षेनी बघत संग्राम बोलायचा थांबला. काही क्षण विचार करून नम्रता म्हणाली,"हं, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण माझी आजी नेहेमी म्हणते- जर आपली नियत साफ असेल ना तर देव कुठल्या ना कुठल्या रुपात येऊन आपल्याला मार्ग दाखवतोच!- आणि आपली नियत तर १००% साफ आहे..त्यामुळे यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. So , not to worry."

तिचं हे बोलणं ऐकून संग्रामची एक मोठी काळजी दूर झाली होती. आपल्यामुळे नम्रताला कोणत्याही प्रकारचं compromise करावं लागू नये हीच इच्छा होती त्याची...पण तिनी किती सोप्या आणि सरळ शब्दांत त्याची ही काळजी पण दूर केली होती.हळूहळू संग्रामचा धीर वाढत होता. आता त्यानी पुढचा मुद्दा मांडायचं ठरवलं.." आम्हां मिलिटरी वाल्यांचा पगार इतर कॉर्पोरेट आणि MNC वाल्या लोकांच्या तुलनेत कमी असतो. तुला आत्ता तुझ्या बाबांच्या घरी ज्या सुखसोयी मिळतायत त्या मी सध्या नाही देऊ शकणार तुला कदाचित. पण माझ्याशी लग्न केल्याचा तुला कधीच पश्चात्ताप होणार नाही एवढी गॅरंटी मात्र मी देऊ शकतो !"

संग्रामचं बोलणं संपल्यानंतरही काही क्षण नम्रता काहीच न बोलता एकटक त्याच्याकडे बघत राहिली.तिला अशी गप्प बसलेली बघून संग्राम म्हणाला," प्लीज काहीतरी बोल ना! अशी गप्प नको बसू यार...टेन्शन येतंय मला.." भारावलेल्या स्वरांत नम्रता म्हणाली," तू किती विचार केलायस माझ्याबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल! असं असताना मला पश्चात्ताप करायची गरजच काय ? आणि तू जे सुखसोयी वगैरे म्हणालास ना....तुझी बेसिक comparison च चुकतीये....म्हणजे बघ ना- माझ्या आई बाबांच्या घरी आत्ता ज्या सुखसोयी आहेत त्या त्यांनी दोघांनी मिळून गेल्या कित्येक वर्षांच्या मेहेनतीतून उभ्या केल्या आहेत ....I am sure तेवढ्या वर्षांनंतर आपल्या घरात पण एवढ्याच - कदाचित- याही पेक्षा जास्त सुखसोयी असतील. आणि पगाराचं म्हणशील तर एका आर्मी ऑफिसरची बायको म्हणवून घेण्यात मला जे समाधान, जो अभिमान वाटेल तो माझ्यासाठी पैशांपेक्षा जास्त मौल्यवान आहे."

नम्रताची इतकी क्लिअर thought process बघून संग्राम खरंच खूप इम्प्रेस झाला होता.

"अजून एक महत्वाची गोष्ट आहे नम्रता," संग्राम तिला म्हणाला खरा, पण आधीसारखंच या बाबतीतही तिच्याकडे एखादं समर्पक उत्तर तयार असेल याची त्याला खात्री होती..

"आम्हां आर्मीवाल्यांना अधून मधून फील्ड पोस्टिंग वर जावं लागतं..सलग दोन तीन वर्षं ! आणि तेवढ्या काळात आमच्या परिवाराला आमच्याबरोबर राहायची परवानगी नसते. त्यांना वेगळं राहावं लागतं. अशा वेळी तुला एकटीला सगळं घर मॅनेज करावं लागेल..."

संग्रामच्या प्रश्नांमागची त्याची काळजी, त्याच्या जीवाची होणारी तगमग नम्रताला जाणवत होती. पण या सगळ्यातून दिसणारा त्याचा प्रामाणिकपणा तिला सगळ्यात जास्त भावला होता.

त्याच्या शेवटच्या प्रश्नावर प्रतिप्रश्न विचारत नम्रता म्हणाली," माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुझ्या फील्ड पोस्टिंगच्या त्या दोन तीन वर्षांत तू पण तर तुझ्या परिवारापासून लांब राहशील ना! तोही एकटा!!! का बरं?" तिच्या या प्रश्नावर नाराज होत संग्राम म्हणाला," का म्हणजे? देशासाठी, त्याच्या रक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करायची तयारी असते आमची! For a soldier - Nation comes first-always and forever ." हे बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर दिसणारं देशप्रेम बघून नम्रताचा ऊर त्याच्या बद्दलच्या अभिमानानी भरून आला...तिला संग्रामच्या रुपात शिवबाचा मावळाच दिसत होता जणूकाही ....

त्याचंच उत्तर त्याच्यावर उलटवत ती म्हणाली,"जर एक सैनिक देशासाठी एकटा राहू शकतो तर मग त्याचा परिवार का बरं नाही राहू शकणार? हमारा देशप्रेम आपके देशप्रेम से कम है क्या?" हे म्हणतानाचा तिचा एकंदर आविर्भाव बघून संग्राम अगदी मनापासून हसला...मघापासून गंभीर असलेल्या संग्रामला असं मनमोकळं हसताना बघून नम्रताला देखील हायसं वाटलं. आपला मुद्दा पटवून देत ती पुढे म्हणाली,"आपल्या छोट्याशा शिवबाला मोठेपणी 'छत्रपति शिवाजी महाराज ' बनवणाऱ्या जिजाऊ पण तर एकट्याच होत्या ना...आपल्या नवऱ्यापासून दूर, समोर आलेल्या प्रत्येक संकटाशी एकाकी झुंज देत !! "

तिच्या उत्तरानी भारावून जात संग्राम म्हणाला," एखादी अवघड गोष्ट पण किती सहजपणे समजावून सांगतेस तू! तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयारच असतं का?"

त्याचा हा प्रश्न ऐकून नम्रता खुदकन हसली आणि म्हणाली," तुला पण असंच वाटतं का? अरे, माझी आजी पण हेच म्हणते नेहेमी....तिच्या मते मी वकीलच व्हायला हवं होतं.तिला जर कारण विचारलं तर म्हणते-' समोरच्याला त्याच्याच शब्दांत पकडून गप्प कसं करायचं ते बरोबर जमतं तुला!'

आजीबद्दल बोलताना नम्रताच्या डोळ्यांतली चमक बघून संग्राम म्हणाला,"भेटायलाच पाहिजे एकदा तुझ्या आजीला. आजीचा आणि तुझा इमोशनल बॉण्ड खूप स्ट्रॉंग आहे हे लक्षात आलंय माझ्या." नम्रताची गंमत करत तो पुढे म्हणाला,"का कोण जाणे पण I am feeling a bit jealous now. मला सॉलिड कॉम्पिटिशन आहे असं दिसतंय ."

"ए, काहीतरीच काय? आजी बरोबर कसली कॉम्पिटिशन? हां, पण आमच्या दोघींचं नातं एकदम मस्त आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे..मी तिला सगळं सांगते ."

"अरे बापरे ! सगळं ? म्हणजे हे पण ?" संग्रामनी हातानी त्या दोघांकडे इशारा करत विचारलं. त्याच्या प्रश्नाचा अर्थ लक्षात आल्यावर नम्रता लाजून अर्धी झाली. "काहीही काय? सगळ्या गोष्टी जगजाहीर नसतात करायच्या.." संग्रामच्या डोळ्यांत अडकलेली आपली नजर सोडवून घेत नम्रता म्हणाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमीप्रमाणे मस्त भाग, लौकर येऊ दे पुढचा भाग. शुभेच्छा...!
आणि नूतनवर्षाभिनंदन !!!
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।