Mi vs Csk आणि आम्ही.....
डोन्ट एक सिरीयसली ........
हे जग फारच निर्दय आहे . आम्हास ज्या गोष्टी येत नाहीत , त्या विपुल प्रमाणात या ठिकाणी आम्हाला आढळतात . चेंडू आणि फळी ही गोष्ट त्यापैकीच एक आहे . काल आम्ही पारावरती आमच्या मित्रमंडळींमध्ये गप्पा गोष्टी करत असताना चेंडूफळीच्या एका फेरी विषयी चर्चा निघाली . त्यावेळी विविध संघ व संघाचे कर्णधार आणि त्यांच्या नातेवाईकांचा उद्धार होत असताना आम्हाला ऐकावयाला लागले . पण ते संघ संघाचे कर्णधार व त्यांचे नातेवाईक आम्हास माहीत नसल्याने आम्हाला त्यांच्या बद्दल माहिती करून घ्यावी असे वाटले . म्हणून आम्ही आमच्या फार जवळच्या व जिवलग मित्राला विचारले असता तो वसकन आमच्या अंगावर आला आमच्या सामान्य ज्ञानाचे वाभाडे काढून गावाला नसलेल्या वेशीवरती नेऊन टांगले . त्यामुळे आमच्या काळजात इतकी घरे पडले की डॉक्टर ही त्याचे ऑपरेशन करू शकला नाही . मात्र आम्ही wolverine सारखे स्वतःला हिल करून घेतले व पुन्हा निर्लज्जासारखे तो प्रश्न एका लांबच्या मित्रास विचारला......
त्यावेळी आम्हास ज्ञात झाले की आजच्या जगतामध्ये चेंडू व फळी या खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे . या अनन्यसाधारण महत्त्वाच्या खेळात अनन्यसाधारण पैसे मिळवणारे लोक असतात . त्या अनन्यसाधारण लोकांनी खेळाडूंना चक्क पैसे देऊन विकत घेतलेलं असतं । हे असे विकत घेतलेले खेळाडू त्यांच्या त्यांच्या मालकासाठी खेळत असतात व मालकांसाठी खेळणारे खेळाडू बघण्यासाठी हे सर्व लोक गर्दी करत असतात . आम्हास हे फारच मनोरंजक वाटले . आम्ही याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याचे ठरविले . त्यावेळी आम्हाला कळलं ही चर्चा कधीही कुठे आणि कशीही होऊ शकते. ज्यावेळी दोन माणसे बसतात व त्यांचे निरनिराळे संघ असतात त्यावेळी ते चर्चा करायला सुरुवात करतात चर्चा करताना च झ फ भ अक्षरावरून सुरू होणाऱ्या शब्दांचे महत्त्व अनन्यसाधारण असते ......
पण काही कारणासाठी आम्ही आम्हाला काहीच नसलेल्या कामात व्यस्त होतो . सकाळी उठणे जेवण करणे . थोडे फिरून झोपणे . नंतर उठणे . जेवण करणे . थोडे फिरवून झोपणे. अशा दिनक्रमात व्यस्त असल्याने दोनेक दिवस आम्हाला अशी चर्चा ऐकण्याचा मौका मिळाला नाही . पण सहजासहजी सोडतो अशातले आम्ही नसल्याने , अशी चर्चा ऐकण्याचे ठरवूनच आज घराबाहेर पडलो . गल्ली बोळ नाके चौक सर्वकाही फिरलो . पण लोक चर्चा करायला तयार नव्हते शेवटी कंटाळा येऊन घरी येऊन बसलो . आमचा मोबाईल आम्ही तपासण्यास सुरुवात केली . ज्यावेळी व्हाट्सअप मेसेंजर आम्ही उघडला त्यावेळी आमच्या काही संघाचे नाव बदलून काही विचित्र इंग्रजी अक्षरे टाकली होती.....
आम्हाला वाटलं मोबाईलवरती काही लोड आला असावा । वास्तविक पाहता मोबाईल वरती कोणत्याही प्रकारचं वजन आम्ही ठेवत नाही , पण लोक सदैव म्हणतात मोबाईल वरती लोड आल्यानंतर मोबाईल रिफ्रेश करा . म्हणून आम्ही रिफ्रेश केला . रिफ्रेश करतानाही आम्ही कोणत्याही प्रकारचे पाणी वापरत नाही . उगाच मोबाईलला त्रास नको . अन्यथा आम्हालाही रिफ्रेश व्हायला मुळीच आवडत नाही . त्यामुळे आमच्या मोबाईलाही आम्ही रिफ्रेश करताना बिन पाण्याचे रिफ्रेश करतो . ज्यावेळी आमचा मोबाईल रिफ्रेश केला त्यावेळी आमच्या संघाचे नाव पुन्हा एकदा बदलले होते आणि यावेळी भलतीच इंग्रजी अक्षरे आली होती . आम्हालाही कळत नव्हते हे काय चालले होते . त्याच वेळी त्या ठिकाणाहून आमचा एक जवळचा मित्र चालला होता . मागच्या वेळी जेव्हा जवळच्या मित्राला विचारले असता त्याने आमचे वाभाडे काढले होते . त्यामुळे यावेळी आम्ही सावधगिरी घेतली . प्रथम त्याला बोलून त्याचा भलताच पाहुणचार केला . पाहुणचार केल्यानंतर तो खुष झाला . त्यावेळी आम्ही त्याच्या मुळावरच घाव घातला . वास्तविक पाहता तो झाड वगैरे नाही , आणि त्याला मुळही नाहीत . पण आम्ही घाव घातला आणि घालायला कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही .
त्यावेळी आम्हास कळाले की ही इंग्रजी अक्षरे दुसरी तिसरी काही नसून ते चक्क त्या संघाची नावे होती . जे संघ अनन्यसाधारण पैसे असलेल्या लोकांनी बनवले होते व ते संघ चेंडू फळी खेळत होते. आम्हास हे कळेना की आम्ही काही काळापूर्वी बनवलेल्या व्हाट्सअप मधील संघांचे नाव बदलून चेंडू व फळी खेळणाऱ्या संघांवर ती का ठेवले जात होते .....? जेव्हा आम्ही त्या संघांच्या आत जाऊन बघितले तेव्हा चेंडू फळी खेळणाऱ्या संघात बाबत चर्चा चालू होती . त्या चर्चेमध्ये सर्व प्रकारच्या अपशब्दांचा वापर चालला होता . आम्हाला तो आमच्या इज्जतीचा अपमान वाटला . त्यामुळे आम्ही सर्वांना खरीखोटी ऐकवायला कमी केली नाही . मात्र त्याच वेळी चेंडूफळी खेळणाऱ्या संघांचे पंखे आपला संघ दुसऱ्या संघाच्या पित्यासमान कसा आहे हे दाखवायला लागले......
या सर्व गोंधळात इंग्रजीचा एक अक्षरी माहीत नसलेल्या आम्हाला मात्र या सर्व गोंधळामुळे आम्हाला चक्क पाच अक्षरे माहीत झाली ती म्हणजे....
M I C S K
ह्या पाच अक्षरी याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आम्ही हा लेखनाचा खटाटोप केलेला आहे . या पाच अक्षरातील पहिली दोन अक्षरे एका संघाचे नाव बनवतात व उरलेली तीन अक्षरी दुसऱ्या संघाचे नाव बनवतात . या दोन संघाविषयी आम्ही बराच अभ्यास केला बऱ्याचशा चर्चेअंती काही निष्कर्ष काढले . ते निष्कर्ष भावी पिढ्यांसाठी उपयोगी आहेत म्हणून आम्ही ते लिहून ठेवीत आहोत....
१ या दोन्ही संघांचे कर्णधार दोन माणसे आहेत . ती दोन माणसे अशी आहेत की ज्यांचे सर्वत्र खूप सारे पंखे आहेत . त्यांचे पंख हे नेहमी त्यांची वाहवा करतात... त्यामुळे ज्या ठिकाणी या दोन माणसांचे पंखे भेटतात त्या ठिकाणी चर्चेला सुरूवात होते
२ चर्चा करताना या दोन माणसांच्या पंख्यांना कशाचेही भान राहत नाही . स्थळकाळाचे भान विसरून चर्चा करणारे लोक जर त्यांच्या त्यांच्या विषयांचा अभ्यास करता झाले तर हे जग आज पर्यंत मंगळावर ती नक्कीच गेले असते
३ या चर्चेअंती एकच निष्कर्ष निघतो ते म्हणजे दोन्ही संघ एकमेकांचे पित्यासमान असतात
या तिसऱ्या निष्कर्षावरून आम्हास एक इंग्रजी मध्ये म्हणतात तो पॅराडॉक्स सापडलेला आहे.....
तूर्तास ग्रँडफादर पॅराडॉक्स सगळ्यांना माहीत आहे . मात्र आम्ही फादर पॅराडॉक्स शोधून काढलेला आहे....
या फादर पॅराडॉक्स च्या नियमानुसार
" ज्या वेळी वरील दोन संघाचे समर्थक एकत्र येतात त्यावेळी ते दोन्ही संघ एकमेकांचे पिता होतात......"