नवसुंदरी

Submitted by अतुलअस्मिता on 30 March, 2019 - 20:20

नवसुंदरी:

म्हातारीच्या स्वप्नामध्ये
आली एक काळी परी
ठेंगणी ठुसकी कुबडी देखणी
भासली तिची सूनच खरी

डोक्यावरती केस तोकडे
उनाड वात्तड ताठ्ठ उभे
अंगावरती कपडे थोडके
ठिगळ फाटके चोहीकडे

कानापेक्षाही लांब होते
तिच्या कानातील कानातले
जणू टोले ठोकत होते
लोलक, शोभिवन्त घड्याळातले

कानामधल्या तारांमध्ये सुरेल
गाणे डोलत होते
ओठांचा चंबू मानेचा तंबू
तालावरती नाचत होते

गोंदला होता एक छोटा
मोर डाव्या गालावरती
नक्षी सुबक कोळी जाळ्याची
कोरली होती कपाळावरती

नेत्रावरती अंजन कैसे
चिखलगोळे गोल गोल
विहिरीच्या तळास जैसे
पाणी दिसे खूप खोल

दातांमधल्या सुळक्यामध्ये
लबाड ओठ लपला होता
रेडियमच्या लेपामध्ये
एक काजवा चमकत होता

आपडी थापडी गुळाची पापडी
खप्पड गालाची खुळचट बापडी
आदळी आपटी पायाची जोडी
थप्पड व्यासाची धम्मक वडी

स्वप्नातली देखणी परी
मोठी होऊन बदले खरी
डोळे मिटून झोपले तरी
दर्शन देई मज नवसुंदरी!

©अतुल चौधरी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users