द चेक

Submitted by सखा on 25 March, 2019 - 11:50

अरबस्तानातील जातिवन्त उंटांनी देखील 'क्या बात है' असे म्हणावी अशी बोकलवाडीची ती रखरखीत दुपार. सेंट परशु महाविद्यालयातला तो आमचा सातवी ड चा कळकट्ट वर्ग आणि डोक्यावर डग मारत फिरणारा जुना पुराणा सिलिंग फॅन. मध्येच फॅनने कर कट्टक कर कट्टक असा आर्त आवाज केला आता मरतय हे मरतुकडं म्हणून वर पाहिलं तर मेलेल्या पेशन्टने, गचमन आंग झटकावं अन पुन्हा फ़क्कक-कन श्वास घ्यावा तसा पुन्हा पंखा सुरु झाला आणि डग मारू लागला. समस्त पशुपक्षी आणि विद्यार्थ्यांच्या घशाला कोरड पडलेली तरी बरं आमच्यासारख्या दांडगट विद्यार्थ्यांनी इतर बारक्या विद्यार्थ्यांच्या वॉटर बॉटल मधलं पाणी पिऊन टाकल्यामुळे आमची तरी अवस्था जरा बरी, बाकीची सभ्य पोरं तर फारच भकास झालेले. आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्यानं शाळेच्या पाण्याच्या टाकीत पण खडखडाट होता. त्यातली बेडकं पण आता पळून गेली होती अशा त्या दुपारी मी माझ्या बाक बंधू मित्राला, ढोरे पाटलाला म्हंटल
"ढोरया मायला हे पंख्याचा प्राचीन धूड खाली पडलं तर बे? चार पाच मुंड्या तर उडवतय बघ"
त्यावर ढोरर्या जबरदस्त हसला तेव्हा मी म्हंटल "आबे सिरीयस घे लेका, खरंच म्हणतोय मी" त्यावर ढोरया म्हणाला "आबे ते गरा गरा फिरायलय, पडताना ते हेलिकॉप्टर सारखं पुढे जातंय आपल्या अंगावर येत नाही"
"काय बोलतो" मी आश्चर्याने म्हंटले
"मग सायन्स आहे ते" ढोरया वैज्ञानिकाच्या गांभीर्याने म्हणाला
"आबे पण पुढे गेले तर तिथे मास्तर..." मी
"हो तेच तर ... अशोक मास्तरचंच मुंडकं उडवतंय बघ" ढोरे पाटील शांतपणे बोलले
आता मात्र मला त्या कल्पनेनेच फारच हसू आले. मला बिना मुडक्याचे खवचट अशोक मास्तर हातवारे करत शिकवत आहेत असे मजेशीर चित्र डोळ्यासमोर आले आणि मी अजूनच जोरात हसायला आणि वर्गात अशोक सर यायला एकच गाठ पडली. मला असे राक्षसी हसताना पाहून त्यांना नेहमीप्रमाणेच फारच राग आला. नेहमी प्रमाणे त्या खविस मास्तरचे दोन चार जालीम गुद्दे खाल्ल्यावर मात्र मला खरे बोलण्या शिवाय गत्यंतर नव्हते. मग मी त्यांना थोडक्यात ष्टोरी सांगितली
- सिलिंग फॅन - करकर - तो पडला - त्यांचे म्हणजेच अशोक सरची मुंडी कट झाली - नुसतेच धड शिकवते वगैरे माझे हसण्याचे कारण सांगितले. ष्टोरी ऐकल्या बरोबर मास्तर क्रमाक्रमाने रागाने लाली लाल झाले आणि मग मरेस्तोवर मार खाऊन पाठ चोळत जेव्हा मी बाकावर खाली बसलो तशी मनात प्रार्थना केली "हे वायू आणि पंखा देवते या डोक्यावरच्या सिलिंग फॅन ने एका - बेक्कार गाढव रेमटेकडे नालायक - असे आम्हा विद्यार्थ्यांना कायम म्हणणाऱ्या आणि मला बदडणाऱ्या अशोक मास्तरांचे मुडके उडून दाबे हेडमा स्तरच्या मांडीत जाऊन पडू देत." मी पुराणात अशा मुंडके उडवण्याच्या कथा वाचल्या होत्या.
तिकडे मला मारून झाल्यावर मास्तर फळा साफ करत असताना मी हळूच ढोरे पाटला कडे वळून कुजबुजलो
"ढोऱ्या याला म्हणतात सच्चा मित्र साल्या एवढा मार खाल्ला पण ही मुंडके निर्मूलनाची आयडीया तुझी होती असं मास्तरला कळू दिले नाही लक्षात ठेव."
ढोऱ्याने देखील पेन खाली पडण्याचा बहाणा करत बाका खाली माझे पाय शिवले आणि म्हणाला "मानलं गुरु धन्यवाद देतो नै तर आज माझ्या बी पाठीचा बुकण्या पडत होता."
"लेका फुकट नाय समाज सेवा करत आपण बदल्यात काय देशील?" मी
"गोप्या उद्या तुझ्यासाठी माझ्या शेतातल्या गाभुळलेल्या चिंचा आणतो."
मी म्हटले "आरे फोकलीच्या का तुझ्या जागी मी असतो तर चिंचा सोबत बोरं, जांभळ पण आणले असते आणि हो पेरू सुद्धा!"
ढोऱ्याने निमूट पणे मान हलवली. इकडे फळा पुसून झाल्यावर खुर्चीत शांतपणे पाय हलवत बसलेले मास्तर म्हणाले "तर मुलांनो आज आपण शिकणार आहोत भूगोल,
भूगोल आपल्या सर्वच विषयात सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच बरोबर अत्यंत अवघड त्यामुळे भूगोल शिकवणारे शिक्षक हे नेहमीच अपवादाने आढळतात तसेच ते काय असतात?"
"महानssss" सगळा वर्ग बोंबलला
"शाब्बास!" मास्तर
"पण सर भूमिती सुद्धा सर्वात अवघड विषय आहे ना?" मी
"मुर्खा कोण म्हणते असे?" मास्तर
"भूमितीचे बोकडे सर म्हणतात सर" मी बाणेदारपणे म्हणालो
"तो मूर्ख माणूस... अरे भूगोलाच्या भू मध्ये आणि भूमितीच्या भू मध्ये.. जमीन-अस्मानाचे अंतर आहे. अरे तीन सरळ काड्या एकत्र आणून त्रिकोण बनवायला काही अक्कल लागत नाही मात्र एखाद्या देशाचा नकाशा काढून दाखवा म्हणाव त्या मूर्ख बोकडाला म्हणजे मग त्याला भूमिती श्रेष्ठ की भूगोल श्रेष्ठ हे कळेल.
म्हणे भूमिती सर्वात अवघड विषय...याक थू.." असं म्हणत अशोक सरांनी खिडकीतून बाहेर एक पिंक टाकली. खालून कोणाचं तरी शिव्या दिल्याचा आवाज आला पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत अशोक सर पुढे म्हणाले तर "मूर्ख मुलांनो ऐका आज आपण भूगोलात शिकणार आहोत नायगराचा धबधबा..."
"सर आज नयन बाई आल्या नाहीत." नको ती माहिती अचानक पुरवणारे काही लोक समाजात असतात ना तसा आमच्या वर्गात एक नमुना होता. अरे विषय काय हा बोलतोय काय असा माझ्या मनात विचार पण आला मात्र मास्तर एकदमच चमकून म्हणाले
"काय?? का बरं नाही आल्या?"
"त्यांचा भूगोल जरा बिघडला आहे" एक इब्लिस पोरग
"काय काय झालं प्रेग्नंट वगैरे आहेत की काय?" मास्तर एकदम घाबरून म्हणाले
"नाही सर त्यांचा अजून लग्न पण नाही झाल" मी माहिती पुरवली मला वर्गात सर्वात जास्त जनरल नॉलेज होत हे तुमच्या लक्षात आले असेलच.
"अरे मूर्ख गोप्या ते चांगलंच ठाऊक आहे मला, पण भूगोल बिघडला हा वाक्प्रचार कधी वापरायचा हे तुम्हा मुर्खांना कळतं का?"
"सॉरी सर" इब्लिस पोरग
"काय झालं थोडक्यात सांगा" सर जरा अधिरच वाटले
"सर नयन बाईला काल दुपारी दाबे सरांच्या गाडीखाली झोपलेली कुत्री चावली" ढोऱ्या
"आ?? कुत्री?? अरे दाबे सरांच्या गाडी खाली झोपलेली कुत्री नयन बाईला चावायला नयन बाई काय दाबे सरांच्या गाडीखाली गेल्या का?" इती मास्तर.
मग बिचाऱ्या मास्तर ला विविध मुलांनी जी माहिती पुरवली त्यावरून त्यांच्या मनात जे विचार आले आणि माहितीचे आकलन झाले ते असे:
'काल नयन बाईंची दुपारी चार वाजता चप्पल तुटली आणि लगेच ती संधी साधून सरांचा शत्रू आणि तो भूमितीचा बोक्या बोकडे त्यांना म्हणाला की मॅडम मी तुम्हाला मोटरसायकलवर घरापर्यंत सोडतो. मग बिचाऱ्या मॅडम त्यांच्यामागे बसल्या. नुसत्या मागेच बसला नाही तर आधारासाठी त्यांनी बोकडाच्या खांद्यावरती आपला कोमल हात देखील ठेवला. तो बदमाश बोकड्या मोटरसायकल सुरू करून निघणार इतक्यात दाबे सर कुठून तरी पळत आले आणि बोकडेला म्हणाले "अहो बाईची चप्पल तुटली आहे तेव्हा त्यांना मी गाडीत नेऊन सोडतो" बिचाऱ्या नयन बाई, लोचट हेडमास्तरच ,म्हणजे बॉस, स्वतः चला म्हणतोय म्हटल्यावर बोलणार तरी काय? गेल्या त्या बिचार्या दाबेच्या गाडीच्या जवळ आणि उन्हाच्या दहात गाडीखाली निवांत झोपलेली ती कुत्री एकदम खवळून बाईंच्या सुकोमल पायाला कचकन चावली. चावली याबद्दल काही नाही पण बाईंना आधार देत गाडी ठेवायला तो बोक्या बोकडे आणि हे दाबे सर पुढे होते म्हणे. अरेरे कुठून आपण काल दुपारीच बुट्टी मारून घरी गेलो आणि अशी अबलेस मदत करण्याची आणि अर्थात नयन बाईंशी जवळीक साधण्याची सुरेख संधी गमावली. म्हणजे आता बघा त्या बोकड्या बद्दल बाईंच्या मनात नक्कीच सॉफ्ट करणार असणार. हरे हरे देवा आता पुन्हा कधी यांची चप्पल तुटावी, कुत्रे चावावे आणि आपल्याला ही अशी अमूल्य मदत करण्याची संधी मिळावी, साला आपलं नशीबच खराब!"
सर असे गपगार बेडकी सारखे बसल्यावर मी हळूच उठून सावधपणे म्हणालो "सर आज भूगोल नाही शिकवणार का?"
त्यावर अशोक सर ओरडून म्हणाले "मुर्खा तिकडे आपल्या लाडक्या चित्रकलेच्या नयन बाईंना कुत्र चावलं. आपल्याला शोक सभा घ्यायला हवी ते तर राहिला बाजूलाच ते सोडून तू मूर्खासारखे भूगोल शिकायचं म्हणतो ते काही नाही आज दुपारी या तासाला चित्रकलेच्या नयन बाईंच्या पावन स्मृतीला वंदन करून आपण चित्र काढूया"
"कुठलं चित्र काढायचं सर?" दोन चार मुलांनी विचारलं
अशोक सरांनी डोकं खाजवलं मग म्हणाले "कुठलेही काढा माझं डोकं खाऊ नका"
असं म्हणून ते शून्यात डोळे लावून खिडकीबाहेर बघत बसले. मग काय विचारता चित्रकलेचा तास म्हणजे आमचा अत्यंत आवडता तास आम्ही सगळ्यांनी पटापट चित्रकलेचे साहित्य कडून सर म्हणाले तसं आम्ही नयन बाईंच्या पावन स्मृतीस वंदन करून चित्र काढली.
तासाचा टोल पडला तसे अशोक सर वर्गाच्या बाहेर पडले आणि मी देखील मी काढलेले चित्र घेऊन लोचटा सारखा त्यांच्या मागे गेलो.
"सर सर"
"काय बे गोप्या?
मी सरांना अगदी विनम्रपणे म्हणालो "सर बघा तर मी काय काढले."
मग एक दीर्घ उसासा सोडून त्यांनी माझे चित्र बघितलं आणि त्यांची कानशिले टमाट्या सारखी रागाने लाल झाली ते मला दात विचकत म्हणाले "मुर्खा हे काय आहे."
मी म्हणालो "सर नीट बघा हे तुमचेच चित्र आहे!"
"माझे चित्र??" मास्तर आश्चर्याने ओरडले
"होच मुळी, हा तुटलेला दिसतो तो पंखा हा माणूस म्हणजे तुम्ही"
"हा ढेरपोट्या मी? आर पण यांचे मुडके कुठाय?" मास्तर
"तुमचे मुडके या पंख्याने उडवले आहे. आणि हे मानेभोवती लाल लाल ते तुमचे रक्त. आणि पलीकडे धोका आणि हाडूक ४४० वोल्ट्स लिहून काढली ती तुमचीच कवटी"
"माझीच?? वा वा छान गोपेश कुमार तरी मी म्हंटल होतं कुठलेही चित्र काढा मात्र माझं डोकं खाऊ नका.... आणि तुम्ही नेमके तेच खाल्ले" मास्तर
"हो सर मी अगदी प्रयत्नपूर्वक हे चित्र काढले आहे कसं वाटलं?" मी
"वा छान म्हणजे माझ्या मर्डरच चित्र काढून पुन्हा त्याला मीच अभिप्राय द्यायचा ... हा घे अभिप्राय.. थांब जल्लादा तुला दाबे सरा कडूनच रट्टेच खाऊ घालतो"
असं म्हणत बोंबलत वेड्या माकडासारखं अशोक सर माझ्या हाताला धरून दुसऱ्या हातात ते चित्र फडकावीत फरफटत दाबे सरांच्या खोलीत घेऊन गेले.
दाबे सरांच्या खोलीमध्ये जाताच अशोक सर एकदमच थंड पडले कारण तिथे दोन परदेशी बहुदा नेपाळी दिसणारे पाहुणे आधीच बसले होते. अशोक सरांना आणि मला पाहून परिस्थिती ओळखत दाबे सर हेडमास्तरच्या चतुराईने कधी नव्हे तो म्हणाले
"या या अशोक सर पहा आपल्याकडे जपानी पाहुणे आले आहेत."
मग हळूच उठत अशोक सरांना बाजूला घेत दबक्या आवाजात म्हणाले "बोंबलायला आपल्याला मराठी शिवाय दुसरे काही बोलता येत नाही त्यामुळे खाणाखुणांनी बोलण चालले आहे."
त्यातही अशोक सर त्या जपान्यांना नीट न्याहाळून म्हणाले "सर सावध मला हे जपानी वाटतच नाहीत. आपल्याकडे लोकरीचे कपडे विकणारे नेपाळी वाटतात."
"मुर्खासारखं बडबडू नका चेअरमन साहेबांचे पाहुणे आहेत." दाबे सर वसकले "त्यांनीच शाळा बघायला पाठवलय.. पण बोंबलायला काय दाखवणार इथे शाळेत??"
"हो ते पण आहे म्हणा" अशोक सरांनी अनुमोदन दिले.
नेमके यांचं काय खुसुर फुसूर चाललंय याचा त्या जपानी पाहुण्यांना काही अर्थबोध होईना म्हणून त्यांनी प्रश्नार्थक दाबे सरांकडे पाहिलं तेव्हा दाबे सर उदात्त हसत म्हणाले "हे माणूस इज ड्रॉईंग टीचर अँड धिस गोप्या इज विद्यार्थी ऑफ हिज"
"अहो सर पण मी भूगोलाचा शिक्षक... नयन बाई चित्रकलेच्या ..." अशोक सरांचा अभिमान उफाळून आला
"गप्प बसाहो ह्या जपानी लोकांना काय करायचंय? तुम्ही काय शिकवता ते? आता चित्र आणलंय वाटतं ना गोप्यानी काढलेले मग दाखवा ते त्यांना" दाबे
"नको सर तुमच्या पाया पडतो पण हे चित्र याना दाखवू नका" अशोकसर
"का बर?" मास्तर
"अहो का काय? या पोट्ट्याला खरं म्हणजे तुमच्याकडे रट्टे द्यायला आणलं होतं"
"रट्टे द्यायला?"
"हो काय हे भयंकर चित्र काढलाय"
"म्हणजे?"
"वर्गातला पंखा पडून माझी मुंडी कट झाली असं चित्र काढलंय यांनी" अशोकसर
"मुंडी कट ... तुमची ..अरे वा बघू बघू काय चित्र काढले" दाबे मास्तरांनी मोठ्या कौतुकाने माझ्या हातातून चित्र ओढून घेतले आणि चित्र उलट सुलट करून पाहिलं मग ते खदाखदा हसले आणि म्हणाले "अरे वा तुमचं मुंडकं फारच मस्त काढले आहे कवटी ४४० वोल्ट्स खतरा ... हाहाहाहा ... पौराणिक चित्र वाटतं शाब्बास बर का गोप्या"
हेडमास्तर एका मुलाच्या चित्राचं कौतुक करीत आहेत हे त्या जपानी पाहुण्यांना कळलं मग त्यांनी देखील मोठ्या कुतूहलाने माझा चित्र पाहिलं मग त्या जपानी बाईची आणि माणसाची आपापसात काहीतरी नजरानजर झाली त्यांनी मग मला खाणाखुणांनी विचारलं की "हे तू काढलेस का?" मी मान हलवली. मग बहुदा ते जपानी भाषेत खूप छान वगैरे मला म्हणाले असावेत पण मला काही कळलं नाही पण मग ते दाबे सरांकडे वळून काहीतरी बोलले त्याचा बोध दाबेना नाही झाला नाही, तरी मग काही तरी बोलायचे म्हणून दाबे "येस येस येस येस" असे म्हणाले आणि मग ते अशोक सरांकडे वळून काही तरी म्हणाले पण अशोक सरांनी त्याचा बोध झाला नाही अशोक सर म्हणाले की "हौ ना पोरांनी चित्रमे मेरी फॅन से मुंडी काटी"
जपानी पाहुण्यांनी माना हलवल्या त्यांना "मुंडी" हा शब्द लक्षात राहिला ते दोघेही अशोक सरला "मुंडी मुंडी" म्हणाले.
त्या वर अशोक सर पण लहान मुलाने कम्प्लेंट करावी तसे "येस मुंडी कट मुंडी कट" म्हणाले.
अशोक सरांचे हातवारे बघून ती दोघे पण जपानी लोक खूप हसली आणि मला प्रेमाने जवळ घेत त्या जपानी बाईने माझ्या चित्रावर बोट ठेवत मला एक पेन दिले आणि म्हणाली "नामायवा..." मग मी अंदाज बांधून मस्त मराठीत 'गोपेश कुमार' अशी सही केली. तस त्या प्रेमळ जपानी बाईने जपानी मध्ये बोलत एक चेक बुक काढून त्याच्या वरती ऐक आकडा टाकला आणि सही करून मला तो चेक दिला. मी सवयीने नो नो म्हणत लोचटपणे घेऊन टाकला.
मी चेक खिशात ठेवणार तेव्हड्यात दुष्ट अशोक सरांनी खसकन माझया हातातील चेक ओढून पाहिला आणि ते आश्चर्याने ओरडले "काय???? पाच लाख रुपये, माझ्या मर्डरच्या चित्राला?"
पाच लाखाचा आकडा एकदाच मी तो चेक पटकन अशोक सरांच्या हातातून खसकन ओढून माझ्या चड्डीच्या खिशात टाकला व घराकडे रॉकेट सारखा सुसाट पळत सुटलो आणि अशोकसर माझ्या मागे मला पकडायला ओरडत शिव्या घालीत वेड्या माकडा सारखे पळू लागले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Lol

चांगले लिहिलंय
तुम्ही नेहेमीच चांगले लिहिता, लिहित रहा.

"अरबस्तानातील जातिवन्त उंटांनी देखील 'क्या बात है' असे म्हणावी अशी बोकलवाडीची ती रखरखीत दुपार."..}}} हा ...हा ...हा ...हा .ख..त ..र.. ना क..

मस्त! Lol
फक्त ते..... सेंट परशु महाविद्यालयातला तो आमचा सातवी ड चा कळकट्ट वर्ग ......सातवीचा वर्ग असल्याने महाविद्यालय नको म्हणायला......
ह्ये गोपा बेणं चांगलंच वस्ताद दिसतंय................!

हा हा ...एकदम जबरा...

डग मारणारा पंखा ...गोप्या ...मास्तर...ढोऱ्याने देखील पेन खाली पडण्याचा बहाणा करत बाका खाली माझे पाय शिवले ... सगळे डोळ्यासमोर उभे राहिले..