एका गोष्टिची गोष्ट

Submitted by मकरंद गोडबोले on 24 March, 2019 - 22:09

ऑफिसच्या कामाची दगदग, खरेतर दगदग कामाची होत नाही, काम आवडिचेच असते, दगदग होते ती माणसा माणसामधल्या ताण तणावांची, गैरसमजुतिच्या धाग्यांनी विणल्या गेलेल्या कोळीष्टकांची. एखादाच प्रसंग असा असतो, जो ही जळमट काढून लख्ख करतो, या कोळिष्टकांच्यामधे लपलेले, मूळ प्रेमाचे धागे उजळून टाकतो. असे काही क्षण संपूर्ण मन स्वच्छ करुन टाकतात.
अशाच एका दगदगत्या ऑफिसमधून घरी आल्यावर पोरानी मोट्ठा आवाज काढून , “बाबा गोष्ट” केले. त्याचा ऑफिस दगदग याच्याशी काडिमात्र संबंध नव्हता. त्याला बाबा दिवसभर फसवून कुठेतरी जातो, आणि तरी संध्याकाळी आल्यावर चिडचिड करतो, एवढेच माहित होते. त्यामुळे आता गोष्ट आलिच.
तर अशी याच्या गोष्टिची तयारी करताना, पुर्विच्या सांगितलेल्या, न सांगितलेल्या अनेक गोष्टी मनात येउन गेल्या. पंचतंत्र, स्वतंत्र व ईतर अनेक, अगदी ईसाप, साप वगैरेपर्यंत. यातल्या सगळ्या गोष्टीत मला माझ्याच ऑफिसचे प्रतिबिंब दिसत होते. सिंहाचा कावेबाजपणा न ओळखणारे, कामाला हुषार बैल, करचक, टरभक वगैरे नावाचे कोल्हे, कपटी साप, मगरीला हृदय देणारी माकडे, सगळेच आमच्या कार्यालयात होते. यातले काहिही सांगायला लागले, की मला माझ्या त्या कार्यालयीन व्यक्तिंची प्रकर्षाने जाणिव व्हायची. त्यामुळे म्हटले की त्या गोष्टी नकोच. उगाच स्वतःला कितिवेळा कामाला हुषार बैल म्हणवून समजूत घालून घेणार? मग म्हटले की परिकथाच सांगावी. पण त्या ईतक्यांदा झाल्या होत्या की गोष्ट सांगायला सुरुवात झाली की पुढची लगेच त्याच्याच तोंडून यायची. त्या आता नीरस वाटायला लागल्या होत्या.
काय कमाल आहे नाही. आयुष्याचा रोजमेळ झाला, की त्याचा कंटाळा घालवायला म्हणून परिकथा. ईथे त्यांचाच रोजमेळ झालाय. त्यामुळे मग कथानकाच्या मसाल्याचा जमाखर्च सुरू झाला, आणि दैनंदिन हा दीनवाणा प्रकार खर्ची टाकून नाविन्य जमा करत, मी चक्क कथानक तयार करायला लागलो.
आटपाट नगर नेहमिचेच, पण त्यात कायम आवडती आणि नावडती राणी असायची. आत्ताआत्ताच मुलाच्या शाळेतून त्याला अशा लिंगभेदी (सेक्शुयल डिस्क्रिमिनेशनला नाही सुचला दुसरा शब्द) गोष्टी सांगू नयेत अशी नर्म ताकीद आली होती. त्यामुळे त्यांची वाट लागली. खरेतर आटपाट नगराच्या ऐवजी जातपात नगर म्हटले, तर निदान ती सत्य गोष्ट तरी होईल. पण त्याला तर पूर्णविराम मागेच मिळालाय. कोल्हापूर नको, परत तेच पंचतंत्रातले कोल्हे लांडगे. मग परत सकारात्मक विचाराची सरशी झाली, आणि मी सुरूवात केली, “एक मानवनगर नावाचे गाव होते.”
मुलाची नजर एकदम लख्ख झाली. हे नविन आहे हे त्याला कळत होते. “कुठे आहे रे बाबा? हे मानवनगर” प्रश्न. सेमिनारमधे सगळे प्रश्न हे प्रश्नोत्तराच्या वेळी घेता येतात. इथे ही मुभा नाही. उत्तर लगेच गेले पाहिजे, नाहितर “आमच्या बाबाला ना….” अशी सार्वजनिक लाज निघते. “दानवनगरच्या वरच्या बाजूला आणि सुरापुराच्या खालच्या अंगाला” “बाबा वर म्हंजे असं?” टाचा उंचावून, मान लांब करून, हात उंच करून पंजा डोक्यावर आडवा करत त्याने विचारले. हे गमतिशिर दृष्य बघून मी हसणे दाबत म्हटले, “नाही रे बाबा, म्हणजे तुझी आजी रहाते ना ते खालच्या अंगाला, आणि काका रहातो ते वरच्या अंगाला” त्याला कळल्यासारखे वाटले, म्हणून पुढे गेलो. “या मानवनगरीत एक गरीब ब्राह्मण…” “बाबा प्रत्येक गोष्टितला ब्राह्मण गरीब का असतो?”
हे मला अजिबात माहित नाही. का बरे असे असावे? गोष्टीत श्रिमंत ब्राह्मण असायला काय हरकत आहे? पण ऐकले नाही हे मात्र खरे. आणि जिथे ऐकले ते मंबाजी सारखे व्हिलनवाले निघाले. त्याच्या शंका माझ्या गोष्टीचे बहुतेक कल्याण करणार असे दिसतेय. ही मात्र कोपऱ्यातून पदरात हसत ऐकतेय सगळे. “अरे ऐकरे, मी गरीब ब्राह्मण अजिबात म्हणत नव्हतो, मी म्हणत होतो, की या मानवनगरीत एक तुझ्यासारखा मुलगा रहातो, तो या गरीब ब्राह्मणाचा मुलगा असतो. कल्याण त्याचे नाव” “बाबा, मला कल्याण आणि रामदास स्वामिंची गोष्ट माहित्ये? ती नको”
आयला हे अवघड होत चाललेय. माझ्या गोष्टिच्या सरळ वाटेवर, पुर्वीच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अडथळे बनून उभ्या ठाकल्यात. मला अचानक आज गोष्टिचे काम माझ्यावर का आलंय याचा उलगडा व्हायला लागला. या अडथळ्यांमुळे आटपाट नगराचे झाले होते, मानवनगर, गरिब ब्राह्मणाच्या ऐवजी गोष्ट घसरली त्याच्या मुलावर, आता हा कल्याण रामदास स्वामिेचा असून चालणार नव्हता. “अरे तो नाही, हा दुसरा कल्याण. हा कल्याण मुळीच हुशार बिषार नव्हता, सदगुणी तर नव्हताच नव्हता, हा अत्यंत आळशी होता” हा कल्याण माझ्या गोष्टिचे कल्याण करणार एकंदरीत, असे वाटतेय.
हिला तशी एकही गोष्ट माहित नाही असे नाही. ती विसरते ईतकेच. मग मी एखाद्या नव्या गोष्टिची सुरुवात केली, की तिला ती आठवते, आणि मग ती, ती गोष्ट हातात घेउन त्याला मसाला लावून लावून संपवते. पण आज काही तिला अजून या गोष्टिचे गम्य लागेना. त्यामुळे तिसुद्धा कान देउन ऐकत होती. या गोष्टिचे गम्य तिला काय, मलाही अजून उमगत नव्हते. माझी अवस्था संहितेशिवाय रंगमंचावर ढकललेल्या कलाकारासारखी झाली होती. मुलाचे डोळे मोठे होउन ती गोष्ट माझ्या डोळ्यात शोधत होते, आणि मी अंधारात चाचपडत तीच गोष्ट शोधत होतो. मला सापडलेल्या प्रत्येक गोष्टिसमोर मीच मागे सांगितलेली प्रत्येक गोष्ट अडथळा बनून येत होती. असा ठेचकाळत माझ्या गोष्टिचा प्रवास चालू होता. त्यातून हा कल्याण आळशी झाल्यावर हिच्या कपाळावर जरा आठ्याच उमटल्या. मुलगा मात्र हुषार झाला. त्याला हे काहितरी नविन येतंय याचा सुगावा लागला होता. तरी त्याने डोळे मोठे करून विचारलेच, "म्हणजे हा वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला तसा मोठेपणी चांगला होणार का?"
मुलाची गोष्टिचे भविष्य जोखण्याची ताकद वाखाणण्यासारखी होती. कुठलिही गोष्ट कुठे जाउ शकते हे तो फारच जास्त वेगात ओळखत होता. सांगणाऱ्याच्या म्हणजे माझ्या डोक्यात यायच्या आत त्याच्या डोक्यात गोष्टिचा शेवट कुठे जाऊ शकतो हे येत होते. “नाही रे हा कल्याण काही तसला नव्हता, हा साधासुधा तुझ्या माझ्यासारखा कल्याण. एकदा तर काय झाले माहित्ये का? त्याला मारामारी केली म्हणून शाळेतून हाकलून दिले!" “श्शी कसले आदर्श ठेवताय?” आता गोष्टिवर ही दुसरी चढाई. आत्तापर्यंत समोरासमोर लढाई चालू होती, आता हे संस्कार वगैरेचा गनिमी कावा पण सुरू झाला. मी आपला त्याला गोष्टीत रस यावा म्हणून प्रयत्न करत होतो, तर हे दोघेही त्या बिचाऱ्या गोष्टीचा पदोपदी खून करत होते. आता कल्याण गुणी आणि रामदास स्वामिंचा नको तर तो थोडाफार अवगुणी असणार ना? त्यात संस्कार कुठून आले. आणि या गोष्टीला जमायला जरा अवसर तरी द्या? प्रत्येक वाक्याला तिला ढकलून कसे चालेल. पण यालाच तर कीस लागणे म्हणतात. यांनी सरळ ऐकून घेतले तर मग कसा लागणार तो कीस.
"त्यात मुख्याध्यापकांनी कल्याणच्या घरी फोन करून…….."
हात लांब करून, विमान होत गिरक्या घेत मुलगा म्हणाला, "गरीब ब्राह्मणाच्या घरी कुठला फोन?" हा याचा विजयनाच. कुठल्यातरी क्रिकेटच्या खेळात बघून शिकला. तेव्हापासून याला तो बरोबर आणि समोरचा खोटा पडतोय असे कळले की हा नाच होतो. मुलगा असला म्हणून काय, बापाच्या चुका काढायचा त्याला तर जन्मजात हक्क आहे. मग नाच झाल्यावर अत्यंत आनंदानी तो माझ्याकडे बघत होता. "मोदींनी नविन योजना काढली आहे ना, गरिबांची खाती काढायची. त्याच्यासाठी स्वस्तातला घेतला त्याच्या बाबांनी." "अहो पण कल्याणच्या काळी कुठे मोबाईल होते?", इती ही. "त्या काळी मोदींची योजना तरी कुठे होती. मी सांगितले ना हा वेगळा कल्याण आहे". हिच्या भाळी आठ्या. परत एकदा कुठले संस्कारच्या सारखाच भाव. हे फार छान आहे. स्वतःकडच्या गोष्टी संपल्या की, नव्या गोष्टीसाठी बाबा, आणि ती नवी गोष्ट जुन्या मानकांच्या पलिकडे गेली का आठ्या…
"तर मुख्याध्यापकांनी कल्याणच्या घरी फोन करून त्याच्या वडिलांना कल्पना दिली का कल्याणला आज शाळेतून हाकलून दिलाय म्हणून." मी थोडा अंदाज घेतला. तर कुणी काही बोलायच्या मनस्थितित नव्हते. मग पुढे सांगायला लागलो. "तसा कल्याण शाळेतून हाकलून दिलय म्हणून खूष होता. आता माळावर खेळून घरी गेले तरी चालणार होते. त्यामुळे तो माळावर खेळायला गेला. तिथे मनसोक्त खेळून मग घरी आला". "असं चालतंऽऽऽ"
"नाही चालत, अजिबात चालत नाही, पण गधड्या तरी तूही करतोसच ना?" संस्कारांचा विषय स्वतःच्या हातातून न घालवता ही पटकन म्हणाली. "आणि मग खातोस बोलणी…." माझ्याकडे कटाक्ष टाकत ती म्हणाली. लग्नाला दोन वर्ष झाली की बायको नवऱ्याकडे टाकणारे कटाक्ष हे प्रेमळ नयनबाण नसतात. ती संपूर्ण प्रगत झालेली वेगळी अर्वाच्च्य शिवीगाळ असलेली भाषा असते. तिच्या कटाक्षाने, संस्कारदक्षतेने आणि त्या आधी, तू पण खातोसच ना बोलणी, या गर्भितार्थाने भरलेल्या वाग्बाणाने, माझा कल्याणला फोडून काढण्याचा पर्याय संपला होता. त्यामुळे आता, " नाही रे, पण त्याचे बाबा अतिशय समजुतदार आणि धिराचे होते, म्हणून त्यांनी कल्याणला मारले नाही, तर जवळ बसवून त्याच्याशी ते प्रेमाने बोलले" गोष्टित हे असे प्रेमळ सर्वार्थाने काल्पनिक खोटे बाबा चालतात.
मुलानी एक साळसूद प्रश्न केला," असे बाबा प्रत्यक्षात असतात का हो?" आमचे नाते कसे आहे हे तुम्हाला कळले असेलच. पण तरी मीही इतका काही ओरडत नाही. मारत तर मुळीच नाही. ही दोन्ही कामे हिच्या राखीव कुरणातली. तरी बोलताना, "बाबा फार कडक आहेत, ओरडतील" अशा नावाच्या वापराने, मुलाला तसे वाटत मात्र रहाते. याचे उत्तर देणे काही मला संयुक्तिक वाटेना. खरेतर ते संयुक्तिक वगैरे काही नाही, सुचले नाही हे खरे. त्यावर हिने मात्र लगेच संधिचा फायदा घेउन, “हो असतात हो, असेही असतात” असे, एक वाग्बाण आणि नयनकटाक्ष असे दोन तीर एका धनुष्याने मारले.
मला मात्र हे कळत नव्हते की, ही या दोघांना नको असलेली गोष्ट मी इतक्या मनापासून का सांगतोय? आणि यांना ही गोष्ट इतकी आवडत नाही तरी मी ती सांगायला का हवी आहे. पण काही काही गोष्टी समोरच्याला कायम खाली दाखवता येते या आनंदासाठीच असतात. नाहितरी अपमान करायला नवरा आणि बाबा या खात्रिच्या जागा आहेत.
“तर बाबांनी कल्याणला समोर बसवून विचारले, की बाळ कल्याण तु मला खरे खरे सांग, तू का बरे अशी मारामारी केलिस?” आता मी शामच्या आईत घुसलो होतो, म्हणजे त्या गोष्टित. आणि मला खरेतर असे अजिबात वाटत नाही, की इतक्या साळसूदपणे विचारल्यावर कुठलाही योग्य पद्धतिने वांड असलेला मुलगा सरळ उत्तर देईल. तरी ही गोष्ट होती त्यामुळे इथे हे चालू शकते. “बाबा मी काही चुकिचे केलेले नाही. तो गंप्या, ठमीला त्रास देत होता. त्याला मी हे तू चुकिचे करतोयस म्हणून सांगितले, तर त्यानेच मारामारिला सुरुवात केली.” वा. माझे डोके बरोबर चालायला लागले होते. कल्याण आता रासदासांचा नव्हता, तो वाल्याचा वाल्मिकी होणार नव्हता, तर तो वाल्या आणि वाल्मिकी हे दोन्ही एकाच वेळी होता. ही धमाल फारच छान होती. वरती हिच्या संस्कारांची मी पद्धतशीर वाट लावली, ती वेगळिच.
मी दोघांकडे बघितले. तर हिचे हातातले काम बाजूला पडले होते, आणि मुलाचे प्रश्न कमी येत होते. ही गोष्ट त्यांच्या अपेक्षांच्या आजुबाजूला फिरत होती, तरी वेगळी होती. पण त्याचा वेगळेपणा टिकवून ठेवणे हे फार अवघड जाणार होते. “पण तरी गंप्याला शिक्षा द्यायची जबाबदारी तुझ्यावर तर नाही ना? ती मुख्याध्यापकांनी द्यायला पाहिजे. हो की नाही?” कल्याणचे बाबा त्याला म्हणाले.
“प्रश्न शिक्षेचा नाहिच आहे बाबा. मारामारीचा आहे, जी त्यानी चालू केली होती. मी संपवली. यात तो, ठमी आणि मी यांच्याशिवाय अजून कोणी नव्हतो. ते आमच्यात सुरू झाले आणि आमच्यात संपले. मुख्याध्यापक काय करणार होते. त्यांनी गंप्याला फक्त दम दिला असता. त्यानी गंप्या थांबला असता का? मग त्या दमाचा काय उपयोग." "हो बाबा हे आमच्या शाळेत पण झाले आहे. त्या रमेशला मुख्याध्यापकांनी कितितरीवेळा दम दिलाय. आता त्यालाही माहित झाले आहे कि ते दम देण्याशिवाय काहिच करत नाहीत. त्यामुळे तो थांबतच नाही, उलट उत आल्यासारखे वागत असतो."
"गोष्ट थांबवा तुमची, कुठे चालल्ये, मारामारी काय बडवा बडवी काय? हे संस्कार करायच्येत का मनावर?" परत संस्कार आडवे येत होते.
"याला काय अर्थ आहे. तुम्हाला युद्ध चालते, मग मारामारी का नाही? तेही एक प्रकारचे युद्धच की."
"तुम्ही आता काहिही अर्थ काढू नका. मला वाद नकोय गोष्ट थांबवा" ओठांचा चंबू करून मुलगा म्हणाला, "येवढी एक गोष्ट तरी आमच्या खऱ्या शाळेसारखी चालली होती, तर तीच बंद करून टाकली. काय ग आयडे तू पण जरा तरी ऐकूदे की"
"बघ मी त्याला वास्तववादी गोष्ट सांगतोय, आणि तुला ती नकोय"
"अहो पण परिकथा सांगा ना, तिच्यात काय बिघडले"
"तो मोठा होतोय. त्याला ऐकायच्ये का परिकथा आता? आणि त्या सांगितल्या तर तो तिथेच राहील, परिकथेत. वास्तववादी ऐकूनच त्याला जगायचे कसे ते कळणार आहे"
"हे असं मारामारी करत?"
"जगायला जर मारामारी लागली तर ती करता यायला पाहिजे ना? त्याला कराटेला का घातलंय. उपोषण करायला?"
"गांधींवर घसरायचे कारण नाही. या वास्तववाद जगात तरी असे असते का? आपली जबाबदारी फक्त तक्रारिची आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापकांनी बघावे काय ते"
"म्हणजे बरेच की. त्यांच्यावर जबाबदारी टाकली की आपण मोकळे, आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली नाही की ते मोकळे. शेवटी निकाल काही नाही, बदल काही नाही"
"म्हणजे काय?"
"म्हणजे असं की त्यांच्याकडे तक्रार करून आपण मोकळे की आपण आपले काम केलेय. आता न्याय द्यायची जबाबदारी त्यांच्यावर आहे म्हणून. आणि ते असा विचार करतात की कुणाचा शब्द पाळायचा. दोघांपैकी नक्की खोटे कोण बोलतेय. मग मधला मार्ग म्हणून ते दोघांना थोडाथोडा दम देउन पुढे जातात किंवा काही तात्पुरता उपाय करतात. यात अन्याय ज्याच्यावर झालाय त्याला कळत की आपल्याला न्याय मिळणार नाही. ते एकवेळ चालेल, पण ज्यानी अन्याय केलाय त्याला हे नक्की कळते की आपल्याला काही होत नाही. ते चालत नाही. त्यानी त्याचे अन्याय करणे वाढते."
"मग काय करायचे मारामारी? हे मला चालणार नाही. गोष्ट थांबवा."
आता तिचा निग्रह वाढत चालला होता. गोष्ट पूर्ण होण्याचे सगळे मार्ग बंद पडत होते.
शेवटी मी, "त्या कल्याणचा एकच प्रश्न आहे, आणि त्याचे उत्तर कुणाला देता येत नाहिये. ते तू दे, मी गोष्ट संपवतो"
"कुठला प्रश्न" ती जाळ्यात अडकली.
"न्याय देणे जर तुमच्या हातात असेल तर कुणावर, कधीच अन्याय होउ नये याची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला हवी. ही जबाबदारी न घेता नुसता न्याय देण्याच्या अधिकार हातात असेल तर न्याय देतोय याचा माज चढायला वेळ लागत नाही, आणि मूळ काम अन्याय होउ नये याचा विसर पडतो. अशा वेळी काय करायचे?" तिला अगदिच पटत नव्हते असे नाही.
"हे कल्याण बोलतोय का तुम्ही बोलतात?"
"माझ्या तोंडून आले असले तरी मुद्दा कल्याणचाच आहे. आणि खरेतर कल्याण नाही, कल्याण प्रातिनिधिक आहे. हा प्रश्न आजचा प्रत्येक माणूस विचारतोय. पुराव्याअभावी सोडले गेलेले अनेक गुन्हेगार, किंवा पुरावा असून पकडले न गेलेले अनेक गुन्हेगार, आपल्या न्यायव्यवस्थेशी खेळत आहेत, मन मानेल तसे, आणि त्यामुळे सामान्यांचा जवळपास हा विश्वास आहे की त्यांना न्याय मिळणार नाही. सगळे न्यायाधीश हे त्या मुख्याध्यापकांसारखेच वागतात. मग हे रमेश बळावत जातात. न्याय द्यायची जबाबदारी कायद्याची असेल, तर न्याय झाला नाही याला ही कायदाच जबाबदार ना. मग न्याय मिळतच नसेल, तर तो कधितरी जनता आपल्या हातानी देणारच ना? किती दिवस ते हा न्यायसंस्थेचा अन्याय सहन करतील? आहे का उत्तर? हे कल्याणला जरा आधी समजले इतकाच फरक."
तिनी थोडा विचार केला. मनात आता आपला मुलगा अशी मारामारी करेल का, ही भिती होतीच. पण आत्ता तरी तिला त्यानी ती तशी करावी का हे कळत नव्हते. मग थोडावेळानी ती हसत हसत उत्तर नाही म्हणून म्हणाली. वर "चहा करू?" अशी स्पेशल मांडवली करण्यात आली. मला आता उद्या मुलाला रमेशला ठोकून काढू नको, हे कसे सांगायचे असा प्रश्न पडला. खरेतर, ….. जाउंदे. काढूदे की ठोकून. काढेल का खरेच. का येईल न ठोकताच परत? इथेच तर ठरेल ना माझा बाळ्या कसा आहे ते.
पण माझा बाळ्या त्या हाणामारी करणाऱ्या कल्याणची स्वप्ने बघत, मस्त झोपी गेला होता, आणि बिचाऱ्या कल्याणची गोष्ट साठा उत्तरी का काय तिथे न पोचताच निष्फळ अपूर्ण राहिल्ये. गोष्टित आणि प्रत्यक्षातसुद्धा.

Group content visibility: 
Use group defaults

काय सुंदर लिहिले आहे! फ्रेंच फ्राईजपेक्षा अगदी वेगळी कथा आहे ही. पण तितकीच वेधक..
"न्याय देणे जर तुमच्या हातात असेल तर कुणावर, कधीच अन्याय होउ नये याची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला हवी. ही जबाबदारी न घेता नुसता न्याय देण्याच्या अधिकार हातात असेल तर न्याय देतोय याचा माज चढायला वेळ लागत नाही, आणि मूळ काम अन्याय होउ नये याचा विसर पडतो. अशा वेळी काय करायचे?"
पटलंच!