पुरुष - लिंग व वृषणाचे यशस्वी प्रत्यारोपण

Submitted by हेमंतकुमार on 24 March, 2019 - 21:07

सन १९०६ मध्ये जगातले पाहिले मानवी प्रत्यारोपण झाले आणि ते डोळ्याच्या corneaचे होते. त्यानंतर या शास्त्रात प्रगती होत टप्प्याटप्प्याने गेल्या शतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. आज हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत.

हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो. अशा या जिवंत ‘जखमी’ अवस्थेत आयुष्य कंठणे किती वेदनादायक असते याची कल्पनाच केलेली बरी.

त्यामुळे या महत्वाच्या अवयवाचे देखील प्रत्यारोपण करता येईल का यावर गेली दोन दशके वैद्यकविश्वात प्रयत्न चालू आहेत.
जगातील पाहिले यशस्वी पुरुष लिंग प्रत्यारोपण २०१४मध्ये द. आफ्रिकेत झाले होते. त्यापुढची प्रस्तावित पायरी होती ती म्हणजे लिंग अधिक वृषण यांचे एकत्रित प्रत्यारोपण करणे.

गेल्या वर्षी २६/३/२०१८ रोजी अशा एका भगीरथ प्रयत्नाला यश आले. त्याची बातमी आपल्यातील काहींनी वृत्तमाध्यमात कदाचित वाचलीही असेल. या महत्वाच्या घटनेच्या वर्षपूर्ती निमित्त सामान्यजनांच्या माहितीसाठी त्याचा वृतांत सादर करतो.

अमेरिकेतील बाल्टीमोर येथील Johns Hopkins Hospital मध्ये केलेली ही शस्त्रक्रिया आहे.

अफगाणिस्तानात तैनात केलेला एक सैनिक हा या घटनेतील रुग्ण आहे. त्याचा एका अत्याधुनिक स्फोटक उपकरणाशी संपर्क येऊन तो जखमी झाला होता. त्यात त्याचा जननेन्द्रियाचा भाग नष्ट झाला होता. संबंधित डॉक्टरांनी या प्रत्यारोपणाची शक्यता आजमावली होती. आता ते एखाद्या मृत दात्याची वाट पाहत होते.

अखेर २६/३/२०१८ रोजी असा दाता मिळाला. त्याची व रुग्णाची अनेक निकषांवर 'जुळणी' झाली. मग त्याच्या शरीरातून शिस्न (penis), वृषण(scrotum) आणि पोटाच्या त्वचेचा काही भाग काढण्यात आला. नंतर वृषणातून अंडाशये( testes) काढून टाकण्यात आली. मग शिस्न आणि अंडाशय-विरहित वृषण यांचे प्रत्यारोपण रुग्णावर केले गेले. ९ सुघटन शल्यविशारद आणि २ मूत्रशल्यविशारद यांच्या १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर हे काम यशस्वी झाले. सर्व डॉक्टरांनी हे काम विनामूल्य केले. मोठ्या अवयवांच्या प्रत्यारोपणाशी तुलना करता ही अतिसूक्ष्म प्रकारची नाजूक शस्त्रक्रिया आहे. ती यशस्वी केल्याबद्दल संबंधित चमू खचितच अभिनंदनास पात्र आहे. वैद्यकविश्वातील एक अभूतपूर्व अशी ही घटना आहे.
हा पहा तो डॉक्टरांचा यशस्वी चमू:

Penile-Transplant-Team_DSC8054-100pc.jpg

प्रत्यारोपण केलेल्या या रुग्णाला त्याची मूत्र आणि लैंगिक कार्ये ही जवळपास ‘नॉर्मल’ प्रकारे करता येतील असा विश्वास त्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अर्थात लैंगिक उद्दीपन होण्यासाठी रुग्णास testosterone हे पुरुष हॉर्मोन बाहेरून द्यावे लागेल.वरील घटनेत दात्याची अंडाशये काढून टाकण्यामागे एक कारण आहे. समजा पुढेमागे प्रस्तुत रुग्ण लैंगिकदृष्ट्या कार्यरत झाला,आणि दुसऱ्या व्यक्तीचे अंडाशय त्याच्यात असेल, तर त्याला अपत्यप्राप्तीची संधी राहील.अशा वेळेस त्याच्या अपत्याचे बीज हे त्याच्या दात्यापासून मिळालेले असेल. त्यातून नैतिक प्रश्न उपस्थित होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली गेली. अर्थात या प्रकारात बरेच जर..तर.. उपस्थित होतील. निदान रुग्णास मूत्रविसर्जन आणि लैंगिक ताठरता प्राप्त झाली तरीही हे मोठे यश असेल.

शस्त्रक्रियेपूर्वी मोठ्या धक्क्याने ग्रासलेला हा रुग्ण निराश झालेला होता. शस्त्रक्रियेने केलेल्या या किमयेनंतरचा त्याचा आनंद काय वर्णावा? “Now, I am OK”, हे त्याचे उद्गार किती बोलके आहेत.

तेव्हा या डॉक्टरांच्या चमूचे जगभरातून अभिनंदन झालेले आहे. एक डॉक्टर म्हणून मलाही त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन यापुढे वैद्यकविश्वात याबाबतच्या शस्त्रक्रिया अधिक जोमाने केल्या जातील.
**

या घटनेला आता वर्ष झाले. तेव्हा संबंधित रुग्णाच्या पुढील प्रगतीबद्दल आपल्याला स्वाभाविक उत्सुकता आहे. पण त्याचा तपशील रुग्णाची गुप्तता जपण्यासाठी जाहीर केलेला दिसत नाही. निदान माझ्या तरी वाचनात नाही.

आता भविष्यात अशा प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी मृत दात्याच्या अवयवाऐवजी त्रिमितीय कृत्रिम इंद्रिय ( 3D design organ) तयार करता येईल का, यावर संशोधकांमध्ये विचारविनिमय चालू झाला आहे. रुग्णहितासंबंधीच्या अशा सर्व संशोधनांचे मी स्वागत करतो आणि संशोधकांना सुयश चिंतितो.
**************************
( पूर्वप्रसिद्धी : मिपा संस्थळ आणि ‘मिशी’ हा फेसबुक उपक्रम. काही सुधारणांसह इथे प्र.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंडाशय काढली आहेत म्हणजे स्खलनाच्यावेळी फक्त सेमिनल फ्लुईड जे मी एकले आहे की prostrate ग्रंथीत तयार होते तेच बाहेर पडेल ना? या रुग्णाला स्खलनाचा आनंद मिळेल का?

केशव,
तुमच्या प्रश्नाचे खात्रीने उत्तर या अभ्यासशाखेतील तज्ञच देऊ शकेल. या घटनेत बरेच जर..तर ..आहेत. हा एक प्रयोग आहे.

१. रुग्णास बाहेरून हॉर्मोन द्यायचे आहे. ते त्याचे शरीर कितपत स्वीकारते ते बघावे लागेल.
२. तूर्त ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे एवढीच माहिती जाहीर झाली आहे.
३. पुढील प्रगती जर जालावर प्रसिद्ध झाली तरच आपल्याला अधिक काही समजेल.

हा धागा वाचल्यापासून एक प्रश्न मनात सतत येतोय.

बऱ्याच वर्षांपूर्वी बॉबीट केस झाली होती, त्यात बायकोने रागाने नवऱ्याचे लिंग कापले व डॉक्टरांनी ते परत बसवून दिले.

त्या शस्त्रक्रियेत व वरील सैनिकवरच्या शस्त्रक्रियेत फरक इतकाच ना बॉबीटला त्याचेच लिंग मिळाले असल्याने सखोल मॅचिंग व त्यानंतरची अवयव नाकारले जाण्याची भीती नव्हती?

पुरुष लिंग ताठरण्यासाठी खूप मोठा रक्ताचा दाब आवश्यक असतो काहिसं हायड्रॉलिक सारखं कार्य चालत असावं. म्हणुन या प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत कठीण आहे व नैसर्गिक रित्या होणारं कार्य व प्रत्यारोपित लिंगाचं कार्य समान असेल असे नाही.
परंतु पुरुषांच्या आत्मसन्मानासाठी लिंग कार्यक्षम असणं मनोविज्ञानाशी जोडलेले असते. संजय गांधी च्या सांगण्यावरून पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या होत्या. यात काही लोकांनी लग्न न झालेल्या काही पुरुषांच्याही नसबंदी घडवून आणल्या. अशा पुरुषांना वेड लागल्याचं वाचलेलं आठवले.

साधना,
बॉबीटला त्याचेच लिंग मिळाले असल्याने सखोल मॅचिंग व त्यानंतरची अवयव नाकारले जाण्याची भीती नव्हती? >>>> बरोबर.
शशिराम,
मनोवैज्ञानिक मुद्द्याशी सहमत.

डॉक्टर, ही शस्त्रक्रिया खूप किचकट आणि गुंतागुंतीची असणार. सर्रास होण्यासाठी मोठा कालावधी जावा लागेल ना ?
कारण ब-याच गोष्टी चेतासंस्थेशी जुडलेल्या देखील असतील यात. अगदी सूक्ष्म अशा शिरा (नलिका) कशा जोडल्या जाणार ?

सर्रास होण्यासाठी मोठा कालावधी जावा लागेल ना ?>>>होय , नक्की च.
ही अतिसूक्ष्म प्रकारची शस्त्रक्रिया असल्याने मलाही त्यातील विशेष माहिती नाही.
आधीच्या रुग्णांची प्रगती पाहूनच पुढची रूपरेषा ठरेल.

नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण लेख.
वरील डॉक्टरांच्या टीमचंही मन:पूर्वक अभिनंदन..!

>>>>>असा दाता मिळाला. त्याची व रुग्णाची अनेक निकषांवर 'जुळणी' झाली.>>>>>
याचे निकष कोणते ते स्पष्ट करणार का डॉक्टर ?

साद, धन्यवाद.

अशा जुळणीचे निकष बरेच असतात. फार खोलात न शिरता लिहितो. साधारण त्यांची ४ गटात विभागणी होते:
१. वय: फार वयस्कर दाता नको.
२. दोघांच्या त्वचेची अवस्था (tone)
३. Immunological निकष : यांचा संबंध नवा अवयव रुग्णाने स्वीकारण्याशी असतो.
४. विषाणू-बाधा नसल्याची खात्री देणाऱ्या चाचण्या.

तिकडे वाचला होता लेख आता परत नवीन रूपात वाचला. उत्तम.
पण हा सगळा खटाटोप 'कामी' आला की नाही ते मात्र स्पष्ट झाले नाही.

अनिंद्य, धन्यवाद.
अहो, नाही ना त्या रुग्णालयाने त्यांच्या संस्थळावर काही जाहीर केले अजून.
मी लक्ष ठेवून आहे.

या लेखातील रुग्णाची प्रगती जाहीर न केल्याने समजलेली नाही. पण, अन्य एकाचे बाबतीत त्याचा पूर्ण वृत्तांत (प्रगतीसह) उपलब्ध आहे. सर्वांनाच तो रोचक वाटेल म्हणून सादर करतो.

१. या रुग्णाने वयाच्या १८व्या वर्षी सुंता केली.
२. ती शस्त्रक्रिया नीट न झाल्याने त्याला लिंगाचा gangrene झाला. पुढे लिंग कामातून गेले व काढावे लागले.

३. आता तो २१ वर्षांचा झाला. एके दिवशी त्याला ३६ वर्षीय मृतमेंदू दाता मिळाला.
४. आता त्याच्यावर रोपण शस्त्रक्रिया झाली. फक्त लिंगच बसवले. वृषण त्याचे स्वतःचे होतेच.

५. त्यानंतर अवघ्या ३ आठवड्यात त्याला पहिली ताठरता जाणवली. तो त्याने इतका खूश झाला की त्याने चक्क त्या स्थितीतील फोटो काढून डॉक्टरांना दाखवला !!
६. चौथ्या आठवड्यात त्याला घरी पाठवले गेले.

७. ५व्या आठवड्यात त्याने समागम केला.
८. रोपणाला २ वर्षे पूर्णे झाल्यावर स्थिती : तो आता नियमित लैंगिक सुख घेत आहे. स्खलन आणि उत्कटबिंदूचा आनंद त्याला व्यवस्थित मिळत आहे.

( American council on science & health मधून साभार !)

Pages