पुरुष - लिंग व वृषणाचे यशस्वी प्रत्यारोपण

Submitted by कुमार१ on 24 March, 2019 - 21:07

सन १९०६ मध्ये जगातले पाहिले मानवी प्रत्यारोपण झाले आणि ते डोळ्याच्या corneaचे होते. त्यानंतर या शास्त्रात प्रगती होत टप्प्याटप्प्याने गेल्या शतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. आज हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत.

हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो. अशा या जिवंत ‘जखमी’ अवस्थेत आयुष्य कंठणे किती वेदनादायक असते याची कल्पनाच केलेली बरी.

त्यामुळे या महत्वाच्या अवयवाचे देखील प्रत्यारोपण करता येईल का यावर गेली दोन दशके वैद्यकविश्वात प्रयत्न चालू आहेत.
जगातील पाहिले यशस्वी पुरुष लिंग प्रत्यारोपण २०१४मध्ये द. आफ्रिकेत झाले होते. त्यापुढची प्रस्तावित पायरी होती ती म्हणजे लिंग अधिक वृषण यांचे एकत्रित प्रत्यारोपण करणे.

गेल्या वर्षी २६/३/२०१८ रोजी अशा एका भगीरथ प्रयत्नाला यश आले. त्याची बातमी आपल्यातील काहींनी वृत्तमाध्यमात कदाचित वाचलीही असेल. या महत्वाच्या घटनेच्या वर्षपूर्ती निमित्त सामान्यजनांच्या माहितीसाठी त्याचा वृतांत सादर करतो.

अमेरिकेतील बाल्टीमोर येथील Johns Hopkins Hospital मध्ये केलेली ही शस्त्रक्रिया आहे.

अफगाणिस्तानात तैनात केलेला एक सैनिक हा या घटनेतील रुग्ण आहे. त्याचा एका अत्याधुनिक स्फोटक उपकरणाशी संपर्क येऊन तो जखमी झाला होता. त्यात त्याचा जननेन्द्रियाचा भाग नष्ट झाला होता. संबंधित डॉक्टरांनी या प्रत्यारोपणाची शक्यता आजमावली होती. आता ते एखाद्या मृत दात्याची वाट पाहत होते.

अखेर २६/३/२०१८ रोजी असा दाता मिळाला. त्याची व रुग्णाची अनेक निकषांवर 'जुळणी' झाली. मग त्याच्या शरीरातून शिस्न (penis), वृषण(scrotum) आणि पोटाच्या त्वचेचा काही भाग काढण्यात आला. नंतर वृषणातून अंडाशये( testes) काढून टाकण्यात आली. मग शिस्न आणि अंडाशय-विरहित वृषण यांचे प्रत्यारोपण रुग्णावर केले गेले. ९ सुघटन शल्यविशारद आणि २ मूत्रशल्यविशारद यांच्या १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर हे काम यशस्वी झाले. सर्व डॉक्टरांनी हे काम विनामूल्य केले. मोठ्या अवयवांच्या प्रत्यारोपणाशी तुलना करता ही अतिसूक्ष्म प्रकारची नाजूक शस्त्रक्रिया आहे. ती यशस्वी केल्याबद्दल संबंधित चमू खचितच अभिनंदनास पात्र आहे. वैद्यकविश्वातील एक अभूतपूर्व अशी ही घटना आहे.
हा पहा तो डॉक्टरांचा यशस्वी चमू:

Penile-Transplant-Team_DSC8054-100pc.jpg

प्रत्यारोपण केलेल्या या रुग्णाला त्याची मूत्र आणि लैंगिक कार्ये ही जवळपास ‘नॉर्मल’ प्रकारे करता येतील असा विश्वास त्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अर्थात लैंगिक उद्दीपन होण्यासाठी रुग्णास testosterone हे पुरुष हॉर्मोन बाहेरून द्यावे लागेल.वरील घटनेत दात्याची अंडाशये काढून टाकण्यामागे एक कारण आहे. समजा पुढेमागे प्रस्तुत रुग्ण लैंगिकदृष्ट्या कार्यरत झाला,आणि दुसऱ्या व्यक्तीचे अंडाशय त्याच्यात असेल, तर त्याला अपत्यप्राप्तीची संधी राहील.अशा वेळेस त्याच्या अपत्याचे बीज हे त्याच्या दात्यापासून मिळालेले असेल. त्यातून नैतिक प्रश्न उपस्थित होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली गेली. अर्थात या प्रकारात बरेच जर..तर.. उपस्थित होतील. निदान रुग्णास मूत्रविसर्जन आणि लैंगिक ताठरता प्राप्त झाली तरीही हे मोठे यश असेल.

शस्त्रक्रियेपूर्वी मोठ्या धक्क्याने ग्रासलेला हा रुग्ण निराश झालेला होता. शस्त्रक्रियेने केलेल्या या किमयेनंतरचा त्याचा आनंद काय वर्णावा? “Now, I am OK”, हे त्याचे उद्गार किती बोलके आहेत.

तेव्हा या डॉक्टरांच्या चमूचे जगभरातून अभिनंदन झालेले आहे. एक डॉक्टर म्हणून मलाही त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन यापुढे वैद्यकविश्वात याबाबतच्या शस्त्रक्रिया अधिक जोमाने केल्या जातील.
**

या घटनेला आता वर्ष झाले. तेव्हा संबंधित रुग्णाच्या पुढील प्रगतीबद्दल आपल्याला स्वाभाविक उत्सुकता आहे. पण त्याचा तपशील रुग्णाची गुप्तता जपण्यासाठी जाहीर केलेला दिसत नाही. निदान माझ्या तरी वाचनात नाही.

आता भविष्यात अशा प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी मृत दात्याच्या अवयवाऐवजी त्रिमितीय कृत्रिम इंद्रिय ( 3D design organ) तयार करता येईल का, यावर संशोधकांमध्ये विचारविनिमय चालू झाला आहे. रुग्णहितासंबंधीच्या अशा सर्व संशोधनांचे मी स्वागत करतो आणि संशोधकांना सुयश चिंतितो.
**************************
( पूर्वप्रसिद्धी : मिपा संस्थळ आणि ‘मिशी’ हा फेसबुक उपक्रम. काही सुधारणांसह इथे प्र.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.बराच किचकट प्रकार असेल.3डी प्रिंटिंग ला आर्टिफिशियल लिम्ब मध्ये चांगले भविष्य आहे.बहुधा भविष्यात 3डी प्रिंटेड हार्ट आणि लिव्हर पण बनेल.

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार.

लेखात उल्लेखिलेल्या त्रिमितीय कृत्रिम इंद्रियाबद्दल मला काही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यातल्या अभियांत्रिकीचा भाग इथल्या कोणी सांगितल्यास वाचायला आवडेल.

वैज्ञानिकांचे तहेदिलसे अभिनंदन!

अर्थात लैंगिक उद्दीपन होण्यासाठी रुग्णास testosterone हे पुरुष हॉर्मोन बाहेरून द्यावे लागेल.वरील घटनेत दात्याची अंडाशये काढून टाकण्यामागे एक कारण आहे. समजा पुढेमागे प्रस्तुत रुग्ण लैंगिकदृष्ट्या कार्यरत झाला,आणि दुसऱ्या व्यक्तीचे अंडाशय त्याच्यात असेल, तर त्याला अपत्यप्राप्तीची संधी राहील.अशा वेळेस त्याच्या अपत्याचे बीज हे त्याच्या दात्यापासून मिळालेले असेल. त्यातून नैतिक प्रश्न उपस्थित होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली गेली. अर्थात या प्रकारात बरेच जर..तर.. उपस्थित होतील. >>> हे एवढे हजम झाले नाही. ज्याने संबंध ठेवले तोच वालिद असेल ना? आणि 'दाता' जर मेडिकल एथिक्स नुसार गुप्त ठेवला गेला असेल तर हा नैतिकतेचा प्रश्न येईलच का?

वरील सर्व नवीन प्रतिसादाकांचे मनापासून आभार.
युनुस,
'दाता' जर मेडिकल एथिक्स नुसार गुप्त ठेवला गेला असेल तर हा नैतिकतेचा प्रश्न येईलच का? >>>

वरवर पाहता आपल्याला तसे वाटते. पण जीवशास्त्रीयदृष्ट्या ‘तो’ दाताच वडील ठरतो. या डॉक्टरांच्या चमूने तिथल्या bioethicists ची चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. हे असे प्रश्न अमेरिकादी पाश्चिमात्य देशांत गुंतागुंतीचे असतात. या शस्त्रक्रियेचा उद्देश त्या सैनिकाला इंद्रिय देणे इतकाच होता. कालांतराने समजा दात्याचे गुपित फुटले ..... त्याच्या वारस/ संपत्तीचे प्रश्न उभे राहिले.... असे बरेच ‘जर तर’ विचारात घेत असावेत, असा माझा अंदाज.

वरील सर्वांचे आभार !
ॲमी,
लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष बनायचे असेल तर काय करतात?>>>>>>

३ गोष्टी लागतात:
१. मूळच्या बाईची शिस्निका तिला पुरुष हॉर्मोन देऊन मोठी करायची.
२. शरीरातील अन्य भागाच्या ठिकाणची त्वचा.
३. कृत्रिम लांब वस्तू.

बाह्य, अंतर्गत शरीराने पूर्णपणे स्त्री आहे पण मनातून पुरुष आहे अशा स्त्रीला लिंगबदल करायचा असेल तर जे करतात तेच या पुरुषाला करू शकले नसते का?

तसे केलेल्या पुरुषात आणि या प्रत्यारोपण केलेल्या पुरुषात काय फरक असणार आहे?

मला असे वाटते की…
जर दाता सहज उपलब्ध झाला तर मग रुग्णास एक अस्सल मानवी अवयव मिळतो. त्याची तुलना कृत्रिम prosthesis शी कशी होईल ?
नैसर्गिक हे कृत्रिम पेक्षा कधीही श्रेष्ठच.
….
आता उठसूठ असा दाता मिळणे सोपे नाही. म्हणून कृत्रिम पर्याय ही तडजोड राहील.

कुमार सर अ‍ॅमीचा जो प्रश्न आहे तशी शस्त्रक्रिया खूप वर्षांपूर्वी ससून मधे झालेली आहे.
ग्रामीण भागातल्या गरीब परिस्थितीतल्या एका कुटुंबातल्या एका मुलीला आपण मुलगा आहोत असे वाटत होते. गावाकडे करायचे इलाज झाल्यावर त्यांनी ससूनला आणले. त्यांनी चेक केले तेव्हां हा मुलगाच असल्याचे त्यांना आढळले. पण त्या मुलाचे शिस्न आतल्या बाजूला होत आणि लघवीसाठी योनीप्रमाणे जागा होती. अशी केस दुर्मिळात दुर्मिळ असते.

या केस मधे लिंगबदल झाला असे म्हणता येणार नाही असे त्या वेळी ससूनचे डीन म्हणाले होते. शस्त्रक्रिया साधारण तशीच होती. शिस्न बाहेर ओढून काढणे आणि इतर काही करावे लागले असेल ते (डिटेल्स माहीत नाहीत, वाचले असतील तरी लक्षात नाहीत) केले असेल.

या केस मधे त्या मुलीला (?) जी जाणीव होत होती ती खरीखुरी होती.

बाह्य, अंतर्गत शरीराने पूर्णपणे स्त्री आहे पण मनातून पुरुष आहे अशा स्त्रीला लिंगबदल करायचा असेल तर जे करतात तेच या पुरुषाला करू शकले नसते का?
>>> त्या स्त्रीचे लिंग शाबूत आहे, तर या पुरुषाचे नाहीये हा फरक असावा ज्यामुळे त्याला दुसऱ्या अवयवाची गरज पडली.

किरणुद्दीन, धन्यवाद व सहमती.

लिंगबदल हा पुरुष व स्त्री या दरम्यान दोन्ही प्रकारे केला जातो. त्या संदर्भातले एक वाक्य मजेदार आहे:
It's easier to dig a hole than build a pole !
मानव,
अगदी बरोबर.

आता मी अजूनच कंफ्युज झालेय.

एक बाई आहे तिला योनी आहे, गर्भाशय नलिका आहे, गर्भाशय आहे आणि किडनीला जोडणारी नलिका आहे, ते बाहेर पडायला वेगळे (योनीच्या वर) छिद्र आहे. <-- ही सगळी सिस्टम बदलून तिला शिश्न, वृषण, त्याला जोडणारी नलिका, किडनीला जोडणारी नलिका (हे परत शिश्नामधूनच बाहेर पडणार) ही सगळी नवीन सिस्टम लावावी लागणार आहे.

∆ हे आतापर्यंत केलं जात होतंच.

मग लेखातल्या ऑपरेशनचा असा काय वेगळा अडवांटेज आहे? दुसऱ्या एका व्यक्तीचे अवयव लावण्यापेक्षा कृत्रिम पर्यायच लावणे आणि सूट होणे जास्त सोपे असेल ना?
===

किरणुद्दीन यांनी सांगितलेली केस जेनायटल डिफेक्टची आहे. पण त्यातदेखील ऑपरेशन करून पूर्ण पुरुष केले आहेच त्या मुलीला.

नैसर्गिक अवयव मिळण्याची मजा काही वेगळीच आहे ! विशेषतः प्रस्तुत इंद्रियाचे बाबतीत तर नक्कीच.
समजा, हा रुग्ण लैंगिकदृष्ट्या कार्यरत झाला तर त्याला मिळणारे सुख हे स्वर्गीय असेल यात शंका नाही.
कृत्रिम दांड्याने असे सुख कितपत मिळते याचा अनुभव नाही ☺️ ,
आणि ऐकीव माहितीही नाही.

पण केवळ 'सुखासाठी' त्या परक्याचा रक्तगट, डीएनए, अजून कायकाय जुळणे न जुळणे, ओप्रेशनमधली रिस्क वाढणे वगैरे खटाटोप होत नाही का?

** पण केवळ 'सुखासाठी’>>>>

अबब ! हा ‘केवळ’ शब्द नाही पटला हो !
या तरुणासाठी या सुखाची किंमत अमूल्य आहे.

… म्हाताऱ्या रुग्णांत जेव्हा फक्त लघवी बाहेर टाकणे हाच मुद्दा असेल तेव्हा एखादी नळी पुरे झाली. ☺️
असो, या मुद्दयावर मी थांबतो.
चर्चा छान चालू आहे हे वे सा न ल.

हे माहीत नव्हते.... कौतुक आहे खरेच !!

दुसऱ्या एका व्यक्तीचे अवयव लावण्यापेक्षा कृत्रिम पर्यायच लावणे आणि सूट होणे जास्त सोपे असेल ना?
>>>>@अ‍ॅमी, ----- रक्तातील दूषितद्रव्ये बाहेर टाकणे ही गरज डायलिसिस मशीन भागवत असले तरी मूत्रपिंडरोपण करून घेतातच ना रूग्ण. एखादी गोष्ट गरज म्हणून पार पाडणे आणि काही कारणाने गेलेली नैसर्गिक क्षमता परत मिळवणे यातून रूग्णला मिळणारे मानसिक समाधान यासाठी सारा व्याप.
आणि हे व्यक्तीसापेक्ष असेल ना (उदा -- निपुत्रिक रहायचे की दत्तक घ्यायचे की यातायात करून आयव्हीएफ करायचे.)

वरकरणी साम्य वाटले तरी लिंगबदल शस्त्रक्रिया आणि हे रोपण वेगळे असावे. सारा चमू २०१३ पासून यासाठी अभ्यास, मृतदेहांवर प्रयोग करणे इत्यादि करत होता असे Johns Hopkins च्या बातमीत म्हटले आहे. आणि तेही लिंगबदलासाठी ही कृती इतक्यात वापरण्याचा मानस नाही असे म्हणतायत.

यासंबंधी बाकी लेख / माहिती वाचली तर कायदा, नैतिकता, निसर्गाच्या कौशल्यांना गवसणी घालण्याचे मानवी प्रयत्न यशस्वी होण्या / न होण्याची शक्यता असे अनेक पैलू याला आहेत.

कारवी,
वरकरणी साम्य वाटले तरी लिंगबदल शस्त्रक्रिया आणि हे रोपण वेगळे असावे. >>>> + 10000
अगदी बरोबर !
स्वतःहून लिंगबदल ही हौसेची गोष्ट आहे. या घटनेत रुग्णाला त्याचा स्व- सन्मान परत मिळवून देणे हे खरे ध्येय आहे. त्यासाठीच हा चमू इतके झटला आहे.

लिंग बदल ही हौस, इकडे केला तो पुरुषार्थ आणि स्वसन्मान परत मिळविण्याचा अट्टाहास आणि हेच खरे ध्येय!!
तुम्ही या शस्त्रक्रियेत प्रत्यक्ष सामील नसाल तर तुमची (बुरसटलेली) मतं कुणावर लादू नका. त्रयस्थ वार्ताहरासारखं लिहा किंवा 'हे माझं मत आहे, हे ऑपरेशन करणाऱ्याचे नाही' हे लाऊड आणि क्लिअर लिहा.

कुमार तुम्ही फेसबुकवरचे मिशी का ?
लिंगबदल करण्यासाठी अमेरिकेत कडक कायदे आहेत. ही तत्कालीक फेज असेल तर निघून जाते किंवा कसे यासाठी रुग्णाला (?) बरीच वर्षे परवानगी मिळवण्यात लागतात. जर त्याची केस जेन्युईन (वर दिलेल्या डिफेक्ट प्रमाणे) असेल तर आणि तरच तत्काळ परवानग्या मिळतात. यावर उपाय म्हणून हे लोक आहिस्यायी देशात (थायलंड, फिलिपिन्स इत्यादी) जाऊन शस्त्रक्रिया करून घेतात. तिथे तीन वर्षातच मंजुरी मिळते. थोडक्यात आपण ज्या लिंगाचे म्हणून जन्म घेतलाय तसे नाही आहोत असे वाटणे ही फेज किती काळ असावी यातही वेगवेगळे नियम दिसतात.
या फाट्याला इथे पूर्णविराम.

रोपण हा वेगळा प्रकार आहे याबाबत सहमत. विषयांतर बरेच झाले..

धन्यवाद डॉक्टरसाहेब या प्रोसिजरच्या माहितीबद्दल. वर प्रॉस्थेटिक्सचा उल्लेख आलेला आहे, त्या अनुषंगाने स्टेमसेल एंजिनियरिंगचा वापर लॅबमध्ये ह्युमन ऑरगन्स डेवलप करण्याच्या उद्देशाने होत असलेले प्रयोग अचंबनीय आहेत...

अमितव, आभार.

किरण, नाही हो. मिशी हे त्या उपक्रमाचे नाव असून त्याच्या संयोजकांनी माझा हा लेख मागवला होता.
बाकी माझा त्या नावाशी काही संबंध नाही.

राज, पूरक माहितीबद्दल धन्यवाद !
… चर्चेत सहभागी सर्वांचेच आभार.

Pages