पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३१. मिस मेरी (१९५७)

Submitted by स्वप्ना_राज on 24 March, 2019 - 13:53

mary1.jpg

ओ रातके मुसाफिर चंदा जरा बता दे
मेरा कुसूर क्या है तू फैसला सुना दे

गोल्डन एरातल्या गाण्यांची आवड असलेल्या आपल्यापैकी कित्येकांनी हे सुमधुर गाणं पाहिलं किंवा किमानपक्षी ऐकलं तरी नक्कीच असेल. रात्रीची शांत वेळ. घराभोवतालची एक छानशी बाग. त्या बागेत गाणारं तरुण जोडपं. गाण्यात लाडिक तक्रार, खट्याळपणा, प्रेमाची हलकीशी सुरुवात. चित्रपटाचं नाव मात्र ‘मिस मेरी’. अरेच्चा! हे जोडपं तर हिंदू दिसतंय. मग ही मिस मेरी कोण बरं? कही ये ‘पती, पत्नी और वो’ वाला मामला तो नही? दर वेळी हे गाणं पाहताना हा प्रश्न डोक्यात यायचा. मग म्हटलं चित्रपट बघून टाकू. उत्तर मिळेलच. चला तर मग.....तुम्हालाही मिस मेरीची ओळख करून देते.

चित्रपटाच्या सुरुवातीला दिसते एक पाटी – श्री लक्ष्मी विदयालय. रायसाहेब नावाच्या श्रीमंत व्यक्तीने आपल्या १६ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीच्या, लक्ष्मीच्या, स्मरणार्थ काढलेलं हे प्रायमरी स्कूल आता त्याच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे एक समारंभ आयोजित करण्यात आलेला असतो. त्यात भाषण करताना रायसाहेब हे स्कूल आता मिडल स्कूल होणार असल्याची शुभवार्ता उपस्थितांना देतात. हे स्कूल नीट चालवता यावं म्हणून ते लवकरच शिक्षकांची नेमणूक करायला वर्तमानपत्रात एक जाहिरात द्यायचीसुध्दा घोषणा करतात. अट एकच - फक्त बी. ए. झालेल्या जोडप्यांनीच अर्ज करावा. रायसाहेब घरी जातात तेव्हा राजूने एक तरुणी आणि एक वृद्ध माणूस घरी आणलेला असतो. हा राजू रायसाहेबांच्या एका मित्राचा मुलगा असतो. लहानपणापासून त्यांच्याच घरी वाढलेला असतो. तो स्वत:ला मोठा डिटेक्टीव्ह समजत असतो आणि लक्ष्मीला शोधायची जबाबदारी त्याने आपल्यावर घेतलेली असते. लक्ष्मीच्या डाव्या पावलावर एक मोठा तीळ असतो. पण राजूने जी तरुणी शोधून आणलेली असते तिच्या उजव्या पावलावर तीळ असतो. लक्ष्मी हरवते तेव्हा तिच्या गळ्यात हिंदू देवतांचे फोटो असलेलं एक लॉकेट असतं. रायसाहेबांची पत्नी ह्या तरुणीकडे असलेलं लॉकेट तपासते. पण ते निराळं असतं. अर्थात ती तरुणी लक्ष्मी नसते. रायसाहेब आणि त्यांची पत्नी थोडे निराश जरूर होतात पण लक्ष्मी एक ना एक दिवस परत येईल ह्यावर त्यांचा विश्वास असतो.

मग आपल्याला दिसते गाणं गाणारी एक तरुणी. तिच्याजवळ बसलेल्या दुसर्या एका तरुणीला गाणं शिकवता शिकवता ती पावलांनी ताल धरते तेव्हा तिच्या डाव्या पावलावर असलेला तीळ आपल्याला स्पष्ट दिसतो. ही आपली मिस मेरी बरं का. गाणं संपतं तेव्हा त्या शिकणाऱ्या मुलीचे, किरणचे, वडील मेरीला सांगतात की त्यांची बदली झाल्याने त्यांना शिकवणी सुरु ठेवता येणं अशक्य आहे. ते झाल्या दिवसांचा पगार देऊन मेरीला आपल्या मित्राच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळावी म्हणून शिफारसपत्रही देतात. एव्हढ्यात तिथे एक तरुण येतो. तो किरणच्या भावाला शिकवायला येत असतो. हा अरुण. त्यालाही किरणचे वडील त्याच ऑफिससाठी शिफारसपत्र देतात. पण एव्हढं करूनही मेरी आणि अरुण दोघांनाही तिथे नोकरी काही मिळत नाही.

मेरीला खरं तर नोकरीची खूप गरज असते. तिचे वडील जॉन नामक व्यक्तीचे ४०० रुपये देणं लागत असतात आणि जॉन त्यासाठी खूप तगादा लावत असतो. तो आपलं मेरीवर प्रेम असल्याचं सांगून तिच्याशी लग्न करायचा प्रस्ताव मेरीच्या वडिलांसमोर मांडतो. ह्या लग्नाला मेरीचा विरोध असतोच वर तिचे वडीलही तिच्या संमतीशिवाय मी तिचं लग्न लावून देऊ शकत नाही असं जॉनला खडसावून सांगतात. त्यामुळे भडकलेला जॉन पैसे मिळाले नाहीत तर कोर्ट केस करून मेरीच्या घरातल्या वस्तू लिलावात काढायची धमकी देतो. संतापलेली मेरी त्याला हाकलून लावते. ती वडिलांना त्यांच्या घरी असलेलं एक लॉकेट विकून पैसे जमवायला सांगते. एका ख्रिश्चन घरात हिंदू देवतांचे फोटो असलेलं लॉकेट ठेवून काय करायचं असा तिचा सवाल असतो. पण तिचे वडील त्याला ठाम नकार देतात.

इथे नोकरीच्या शोधात असलेला अरुण रायसाहेबांनी दिलेली जाहिरात पाहतो. अर्थात त्यात लग्न झालेलं जोडपं हवं असल्याने तो ही अट पूर्ण करू शकणार नसतो. पण मग मेरीला पाहिल्यावर त्याला एक कल्पना सुचते. तीही बी. ए. पास असते. तो तिला आपलं दोघांचं लग्न झालं असल्याची बतावणी करून ती नोकरी मिळवायची असं सुचवतो. आधी तर मेरी त्याला साफ उडवूनच लावते. पण मेरीच्या मागे तिथे आलेला जॉन कर्जफेड किंवा लग्न एव्हढे दोनच मार्ग तिच्यापुढे असल्याचं स्पष्ट करतो.अरुण त्याला दोन महिने थांबायला कसाबसा राजी करतो. मेरी अजूनही हे नाटक करायला पूर्णपणे तयार नसते. ती घरी जाऊन आईवडिलांना '२५० रुपये पगाराची एक नोकरी आहे पण घरापासून २०० मैल दूर राहावं लागेल' हे सांगून २ महिने ती नोकरी करायची परवानगी मागते. कर्ज फिटलं की ती नोकरी सोडणार असते. तिचे आईवडील परवानगी देतात. मेरी तयार होताच अरुण दोघांच्या नावे नोकरीसाठी अर्ज करतो. त्यांचं पत्र मिळताच रायसाहेब काही मुलाखत न घेताच लगेच कामावर रुजू व्हायचं पत्र त्याला पाठवून देतात (गेले ते दिन गेले!). त्यांचं लग्न झालंय आणि दोघे बी.ए. आहेत एव्हढी गोष्ट त्यांच्यासाठी पुरेशी असते.

यथावकाश मेरी, अरुण आणि अरुणला भेटलेला नकदू नावाचा एक अवलिया असे तिघे रायसाहेब राहत असलेल्या शहरात दाखल होतात. आल्यापासूनच रायसाहेब आणि त्यांची पत्नी मेरी आणि अरुणला अगदी आपल्या घरातल्यासारखं वागवतात. मेरीला ते जणू आपली हरवलेली मुलगीच समजायला लागतात. अरुणची पत्नी असल्याचं नाटक करत असल्याने मेरीला कुंकू, सिंदूर, साडी, मंगळसूत्र वगैरे साज चढवावा लागतो. त्यामुळे ती अगदी त्रासून जाते. त्यात रायसाहेब आणि त्यांची पत्नी दोघांच्या अगत्य आणि सलगीने तिच्या वैतागात आणखी भर पडते. आपण इथे शाळेचं काम करायला आलोय मग ह्यांच्याशी जास्त ओळखदेख का वाढवायची असा तिचा रोकडा सवाल असतो. तसंच ह्या भल्या माणसांशी काही का कारण असेना पण आपण खोटं बोलतोय ही टोच असतेच. एकीकडे रायसाहेब आणि दुसरीकडे मेरी ह्या कात्रीत अडकून बिचारा अरुण मात्र पुरता बेजार होऊन जातो.

mary2.jpg

राजू नकदूला अरुण आणि मेरीच्या लग्नाबद्दल खोदूनखोदून विचारतो. पण नकदू अगदी ‘पोचलेली’ असामी असल्याने तो राजूला यथास्थित गुंडाळत राहतो. पहिल्या महिन्याचा दोघांचाही पगार रायसाहेब मेरीकडेच देतात. अरुण ‘सध्या मला पैश्याची गरज नाही’ असं सांगून मेरीला ते सगळे पैसे कर्ज फेडायला वापरून टाक असं सांगतो. तिच्या वडिलांना तशी मनीऑर्डरसुध्दा तो करतो. मेरीचे वडील ते पैसे जॉनच्या तोंडावर मारून आपली प्रॉमिसरी नोट त्याच्याकडून परत घेतात.

मेरी हळूहळू सरळ स्वभावाच्या अरुणच्या प्रेमात पडायला लागते. पण रायसाहेबांची धाकटी मुलगी सीता अरुणशी जरा जास्तच लाडीकपणे वागतेय असा तिला संशय असतो. कर्ज फिटल्याने आपलं मेरीशी लग्न होणार नाही म्हणून कावलेला जॉन तिच्या आईवडिलांच्या घरातून ती प्रॉमिसरी नोट आणि लॉकेट दोन्ही चोरतो. आणि मग.....

आणि मग दोनच प्रश्न उरतात. पहिला, मेरी हीच आपली हरवलेली मुलगी आहे हे रायसाहेबांना कसं कळतं? आणि दुसरा, अरुण आणि मेरीचं लग्न होतं का? त्यांची उत्तरं शोधायला राजा विक्रमादित्याला बोलवायची गरज नाही की लाईफलाईन वापरायची गरज नाही. तुम्ही आम्ही सगळे कम्प्युटरजीला सांगून थेट उत्तर लॉक करू शकतो. पण कधीकधी अगदी अनादिअनंत कालापासून माहित असलेली उत्तरं मिळतात कशी ते पाहणंदेखील मनोरंजक असू शकतं, नाही का? तेव्हा तुम्हाला एखादा हलकाफुलका रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल किंवा मीनाकुमारीचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्की पहा. उत्तरार्धात थोडा लांबत जातो खरा. पण फास्ट फॉरवर्डचं बटन आहे की आपल्याजवळ. मी ते अध्येमध्ये वापरलं. तुम्हीही वापरू शकता. Happy

चित्रपटाच्या पात्रयोजनेबद्दल लिहिण्याआधी थोडंसं त्याच्या इतिहासाविषयी. मूळ चित्रपट होता १९५५ सालचा तेलुगुतला मिस्साम्मा. त्याची नंतरची आवृत्ती तामिळमधला मिस्सीअम्मा. १९५७ च्या ‘मिस मेरी’ चं स्क्रिप्ट दोन बंगाली कादंबर्यावरून तयार केलं गेलं होतं – एक होती टागोरांची 'मनमोयी गर्ल्स स्कूल' आणि दुसरी शरदिंदू बंडोपाध्याय ह्यांची 'डिटेक्टीव्ह'. विकिपीडीयावर हरगोबिंद दुग्गल ह्यांचंही नाव लेखक म्हणून आहे पण त्यांचं नक्की योगदान काय ह्याचा मला नीट उलगडा झाला नाही. कदाचित पटकथालेखक असतील. तिन्ही चित्रपट एल. व्ही. प्रसाद ह्यांनी दिग्दर्शित केले होते. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत बरीचशी दाक्षिणात्य नावं दिसतात ती कदाचित ह्यामुळेच.

mary3.jpg

तामिळ आणि तेलुगु चित्रपटात सावित्री नावाच्या दाक्षिणात्य नटीने (ही जेमिनी गणेशन ह्यांची एक पत्नी) केलेली मुख्य भूमिका हिंदीत मीनाकुमारीच्या वाट्याला आलेली आहे. 'ट्रॅजेडी क्कीन' म्हणून नंतर प्रसिध्द झालेल्या ह्या नटीने ज्या काही मोजक्या (आझाद, मेमसाहिब, कोहिनूर) हलक्याफुलक्या चितपटांत काम केलं त्यात ह्याही चित्रपटाचा समावेश होतो. मीना ह्यात अक्षरश: एखाद्या बाहुलीसारखी गोड दिसलेली आहे. विशेषत: अरुणची पत्नी म्हणून जेव्हा ती साडी, गजरा, कुंकू आणि केसांचा लांब शेपटा ह्या रुपात दिसते तेव्हा अगदी तिची दृष्ट काढावीशी वाटते. पण मला अभिनयातलं काहीही कळत नाही हे मान्य करून मी म्हणेन की निदान मला तरी तिचा अभिनय थोडा लाऊड वाटला. एक तर ती अरुणसोबत नोकरी करायला येते तेव्हा जरुरीपेक्षा जास्तच वैतागलेली दाखवली आहे. कदाचित तिला खमकी किंवा खंबीर वगैरे दाखवायचा कथानकाचा हेतू असावा. पण तो फसल्यामुळे ती अतिशय आगाऊ वाटते. दुसरं असं की विनोदी भूमिका म्हणजे डोळे मोठ्ठे मोठ्ठे करून पापण्या फडकावत राहायच्या अशी काहीशी तिची समजूत असावी असं वाटतं कारण आधी क्युट वाटलेली तिची ही अदा पुढेपुढे जाम कंटाळवाणी वाटू लागते. थोडी नाटकीसुध्दा वाटते. त्यामानाने अरुण झालेले जेमिनी गणेशन (आपल्या रेखाचे पिताश्री) बराच सहज अभिनय करतात. नोकरी नसलेल्या तरुणाची असहायता, धीर न सोडता त्यातून मार्ग काढायची त्याची वृत्ती, गरिबीतही शाबूत असलेली विनोदबुद्धी, साधासरळ स्वभाव, मेरीच्या आक्रस्ताळेपणामुळे निर्माण झालेले प्रसंग हाताळताना उडालेली तिरपीट असे अरुणच्या व्यक्तिरेखेचे सगळे पैलू त्यांनी यथास्थित दाखवलेत. हा त्यांचा हिंदीतला पहिलाच चित्रपट. त्यांचा आवाज डब केला होता का ते माहित नाही. पण तसं नसेल तर त्यांच्या हिंदी उच्चारात सहज जाणवण्याइतके दोष अजिबात नाहीत.

नकदूची भूमिका चरित्र अभिनेता ओमप्रकाशने नेहमीच्या लोभसपणे साकारली आहे. ज्याला street-smartness म्हणतो तो पुरेपूर अंगात भिनलेला हा नकदू राजूच्या सगळ्या चौकश्यांना पुरून उरतो. अरुण आणि मेरीच्या सोबत त्याला पाहताना खूप मस्त वाटतं. राजू झालेला किशोरकुमार मात्र अगदी डोक्यात गेला माझ्या (आणि मी ‘चलतीका नाम गाडी’ फक्त त्याच्यासाठी कितीही वेळा पाहू शकते). खरं तर ह्या व्यक्तिरेखेची अजिबात गरज नव्हती. ती नसती तर चित्रपट अधिक आटोपशीर झाला असता. उत्तरार्धात किशोरच्या सीन्सच्या वेळेस अक्षरश: फास्ट फॉरवर्ड करून मी चित्रपट पाहिला. Sad रायसाहेबांच्या धाकट्या मुलीची, सीताची, भूमिका जमुना ह्या दाक्षिणात्य नटीने केली आहे. ती तिन्ही चित्रपटात होती असं विकिपीडिया सांगतो. पण मला तिची भूमिकाही अनावश्यक वाटली. अचला सचदेव (रायसाहेबांची पत्नी), शिवराज (मेरीचे मानलेले वडील), जगदीश सेठी (रायसाहेब) आणि मारुती (राजूचा असिस्टन्ट) इतर भूमिकांत आहेत.

गाणी ही ह्या चित्रपटाची जमेची बाजू ठरावी. संगीत हेमंतकुमारचं, शब्द राजेंद्र कृष्ण ह्यांचे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं 'ओ रातके मुसाफिर' मला त्याच्या चित्रीकरणासाठीसुध्दा खूप आवडतं. विशेषत: स्टुडीओमधली ती बाग, मीनाचा गेटअप, दोघांचे हावभाव सर्वच अप्रतिम जमून आलंय. ह्या गाण्याव्यतिरिक्त ब्रिंदाबनका किशन कन्हैय्या, सखी री सुन बोले पपीहा उस पार (आशा - लता), सो गया सारा जहां आणि ये मर्द बडे दिलसर्द खास वाटली. विकिपीडियानुसार किशोरने गायलेलं ‘गाना ना आया’ संगीताच्या अनेक तऱ्हाचं मिश्रण आहे. पण किशोर तोवर असह्य झाला असल्याने मी ते फॉरवर्ड केलं होतं.

आधी लिहिल्याप्रमाणे चित्रपट उत्तरार्धात थोडा लांबत जातो. कारण कथानकाचा जीव मुळातच छोटा आहे. तरी पण ख्रिश्चन मेरीला हिंदू विवाहिता म्हणून नाटक करावं लागतं ह्या कल्पनेत अनेक शक्यता दडलेल्या आहेत ज्या explore केल्या गेल्या नाहीत. ह्यामागे कुठला धर्म दुखावला जाईल ही भीती नसावी कारण एका प्रसंगात मेरी चक्क ‘क्या क्या रस्मे होती है इन लोगोंमें’ असं काहीसं वैतागून म्हणते. त्याऐवजी सीता अरुणवर खुश आहे असा गैरसमज होऊन मेरीचा जळफळाट होतो हा ट्रॅक उगा घुसडल्यासारखा वाटतो. लक्ष्मीचा लहानपणचा फोटो पाहता आपलं नावगाव, पत्ता इतकं सांगण्याइतपत ती हरवते तेव्हा मोठी असावी असं वाटतं. तो फोटो पाहूनही मेरीला आपण लहानपणी असे दिसत होतो हे आठवत नाही की घर, आईवडील ओळखीचे वाटत नाहीत हे मान्य करायला थोडं कठीण जातं. रायसाहेब आणि त्यांची पत्नी अरुण-मेरीला आपुलकीने वागवतात हे मान्य करूनही त्यांची सलगी ‘अति’ ह्या सदरात मोडते. त्यावर मेरीची प्रतिक्रियाही जवळपास प्रत्येक वेळी उध्दट वाटते. जॉन मेरीच्या आईवडिलांच्या घरातून लॉकेट आणि प्रॉमिसरी नोट अगदी सहजतेने चोरतो. आणि पूर्ण चित्रपट पाहूनही मला लक्ष्मी कुठे आणि कशी हरवली होती ते कळलंच नाही. अर्थात काही वेळा संवाद नीट ऐकू येत नव्हते आणि रिवाईन्ड करून पाहायचा उत्साह नव्हता. ह्या भानगडीत मिस झालं असेलही.

आपण ज्यांना आपले आई-वडील समजत होतो ते खरं तर आपले जन्मदाते आईवडील नाहीत हे कळल्यावर कुठल्याही व्यक्तीची किती कुतरओढ होईल. पण इथे त्याचं नामोनिशाण दिसत नाही कारण हे सत्य उजेडात येईतो चित्रपट संपतो. त्यामुळे मेरी हे सत्य शेवटच्या पाच-दहा मिनिटांत सहज स्वीकारताना दिसते. रायसाहेबांनाही आपल्या हिंदू मुलीला ख्रिश्चन म्हणून वाढवलं गेलं ह्याचं काहीच वाटलेलं दिसत नाही. मग मेरीची व्यक्तिरेखा ख्रिश्चन करण्यामागचं कारण कळत नाही. ह्यातून सर्वधर्मसमभाव सूचित करायचा असेल तर तेही आधी म्हटल्याप्रमाणे स्पष्ट दाखवलं गेलेलं नाही. कधीकाळी त्या दोन बंगाली कादंबऱ्या वाचायला मिळाल्याच तर ह्याचा उलगडा होईल अशी आशा आहे.

असो. एकंदरीत मिस मेरीला भेटून मला तरी आनंद झाला. तुमचं काय? भेटताय का तिला?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेस, नेहमी प्रमाणेच..

मी हल्लीच म्हणजे गेल्या वर्षी पाहिलाय हा चित्रपट. मला आवडलेला. किशोर हिरो असेल असे वाटले होते पण... बाकी चित्रपट आता बऱ्यापैकी विसरलेय.

मीना कुमारी खूप गोड दिसते. वय खूप कमी आहे पण आकार मात्र वयाला साजेसा नाही Happy Happy उगीच ट्रजेडी क्वीन झाली असे मला आझाद पाहून मत झाले होते, हा पाहून अजून भर पडली.

छान

हरवाहरवी हा हिंदी चित्रपटांचा प्राण होता . आता आधार कार्डवरील बायोमेट्रिक वरून फारसे न बोलणार्या मुलांची घरेही पोलीस लगेच शोधतात म्हणे

छान लिहलंय.
चित्रपट पाहिला नाही. आणि यातलं एकही गाणं बघितल्यासारखं वाटत नाहीय. ओ रात के मुसाफिर ऐकलं आहे. बाकीची आठवत नाहीत.
रेखाचे वडील आहेत होय ते!
मीनाकुमारी त्याकाळात खूप छान दिसायची. परिनिता पाहिला आहे त्यातपण फार गोड वाटते. बैजू बावरा चित्रपट पाहिला नाही पण गाणी पाहिली आहेत त्यातपण मस्त दिसते

वाचताना अगदी माझ्या मनातलंच लिहिलंय असं वाटत होतं.

यातली गाणी खूप आवडती आहेत, म्हणून जेंव्हा दुकानात dvd मिळाली तेंव्हा लगेच घेउन आलो होतो. मीनाकुमारी आणि किशोरकुमार असल्यावर सिनेमा आवडेलच याची खात्री होती. पण अर्धा तास झाल्यावर माझा धीर खचला आणि उरलेला सिनेमा फास्ट फॉरवर्डच्या जोरावर निभाऊन नेला. खरं तर बघितलाही नसता पण ती सुंदर गाणी पडद्यावर कशी दिसतात त्याची उत्सुकता होती, पण त्यातही जास्तीकरून निराशाच पदरी पडली.

नियमाला अपवाद म्हणून मीनाकुमारी किती वाईट अभिनय करू शकते म्हणून या चित्रपटाकडे बोट दाखवता येइल. पण त्या काळात काही दिग्दर्शकांवर साचेबंद (याला stylized) अभिनयाचा पगडा होता. त्यात परत दाक्षिणात्य सिनेमा - त्यामुळे लाऊड अभिनयाला पर्याय नसावा. आपल्याकडेही साचेबंद अभिनय होताच - नेहमीची रंजना आणि चानीतली रंजना बघितल्यावर व्ही. शांताराम कसा अभिनय (?) करवून घ्यायचे ते समजते.

थोडक्यात 'ओ रात के मुसाफीर' एवढे एक गाणे वगळता हा सिनेमा 'बघ'वत नाही. गाणी मात्र कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही. तुझ्या यादीत नसलेले 'पहले पैसा फिर भगवान' हे पण खूप सुंदर आहे.

स्वप्ना, मस्त नेहमीप्रमाणे ... मीनाकुमारी चे बहुतेक सिनेमे रुमाल नॅपकिन असतात आणि अतिशय जड आवाजात बोलते. पण ह्यात ती खूप गोड दिसली आहे आणि गाण्यांमुळे गोडवा अधिक वाढला आहे. ​

मिस मेरी नाव लक्षात होतं, सिनेमा आणि गाण्यांची सांगड डोक्यात घट्ट झाली नव्हती. यापुढे कदाचित होईल.
सो गया सारा जमाना, आता मुद्दाम पाहिलं.
साउथचा सिनेमा असल्याने की काय, कपडे एकदम झगमगीत आहेत.

आपला धर्म, आईवडील हे वेगळेच कोणीतरी आहेत, हे कळल्यावर धक्का बिक्का बसत नाही, हे निरीक्षण आवडलं.
वाचकांना चित्रपट पाहायला उद्युक्त करणे हा लेखाचा उद्देश असला तरी फक्त वरवरचं न लिहिता खोलात शिरून गोष्टी समजवून घेण्याचा प्रयत्न आवडला.

लॉस्ट & फाउंड, लॉकेटचा फॉर्म्युला सुद्धा इतका जुना असल्याचं कळलं.

असो. एकंदरीत मिस मेरीला भेटून मला तरी आनंद झाला. तुमचं काय? भेटताय का तिला?..... आज च डाउनलोड करून बघणार आहे. कसा वाटला ते सांगतो

साधना, BLACKCAT, अ‍ॅमी, माधव, सरि, भरत, pravintherider धन्यवाद!

साधना, बारीक आहे की ग ती ह्या चित्रपटात.

>>नेहमीची रंजना आणि चानीतली रंजना बघितल्यावर व्ही. शांताराम कसा अभिनय (?) करवून घ्यायचे ते समजते.
अगदी अगदी. एकदा आम्ही टीव्हीवर जुनी मराठी गाणी कुठल्याश्या चॅनेलवर लागली म्हणून उत्सुकतेने बघत होतो. आधी रंजनाचं 'असला नवरा नको ग बाई' हे गाणं लागलं. आणि मग चानीतलं 'तो एक राजपुत्र'. माझा भाऊ म्हणाला त्या आधीच्या गाण्यात नॉर्मल अ‍ॅक्टींग करत होती की ही, आता एकदम काय झालं Happy

pravintherider , किल्ली....नक्की सांगा कसा वाटला ते Happy

छान लिहीले आहेस, नेहमीप्रमाणे Happy
हा लेख वाचल्यापासून मी तेच गाण (ओ रातके मुसाफिर चंदा जरा बता दे) गुणगुणत आहे Happy
हा चित्रपट बघावा लागणार आता Happy

एकदा बघावा असा तरी नक्की होता. तुम्ही ही लेखमाला चालू केल्या पासुन खुप जुने मूवी बघितले आहेत जे कदाचीत मी बघितले नसते. या चित्रपटात शेवट जरा जास्त च लांबवला आहे पन तो काळ बघता ठीक वाटतं. डाउनलोड करून बघितला छान quality होती.

छान चित्रपट आढावा!
मूळ चित्रपट होता १९५५ सालचा तेलुगुतला मिस्साम्मा.>>>>>>> हा पाहिलाय इतक्यात.