सौदी अरेबियन बाईट्स (संपूर्ण)

Submitted by राजेश्री on 23 March, 2019 - 01:38

#सातारा_डायरी
सौदी अरेबियन बाईट्स(१)
प्रवासात जगातल्या कानाकोपर्यातील बातम्या कळतात.प्रवासात माणसे कळतात,एका विशिष्ट सेवेतील लोकांच्या अडीअडचणी समजतात... आपण नाही सोडवू शकत त्या समस्या पण आपल्या समस्या यापुढे फार किरकोळ आहेत ही होणारी जाणीव आपली जगण्याची सकारात्मकता वाढविते.
काल ट्रॅव्हलसच्या केबिन मध्ये ड्रायव्हर आणि दुसरी ड्रायव्हर व्यक्तीचा संवाद कानावर पडत होता.ड्रायव्हर म्हणून नोकरी करायला एजंट मार्फत सौदी अरेबियात गेलेल्या तरुणाची चित्तरकथा त्याच्याच तोंडून सांगते...
त्याची गोष्ट आधीच्या प्रवासात अर्धी सांगून झाली होती...पण पुढच ऐकताना हे लक्षात आलं की तो एजंट मार्फत सौदी अरेबिया ला गेला होता आणि तिथे व्हिसा नसल्याने कोणत्याही क्षणी तिथले पोलीस पकडून तुरुंगात टाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तो सांगू लागला...तो एजंट आता त्याला सौदी मधून भारतात पाठवायच्या हालचाली करीत होता...त्याने दिलेले अडीच लाख रुपये परत द्यायचे नाव त्याने काढले नाहीच..उलट आता पैसे गेले तर गेले आयुष्यभर सौदी अरेबियाच्या तुरुंगात खितपत पडायची वेळ येऊन ठेपली होती...मी माझ्या नशिबाला दोष दिला..जे जे समोर येईल त्याला तोंड द्यायचे ठरवले...दुसरा पर्याय नव्हताच...मग एजंट ने त्याच्या हातात कसले आयकार्ड दिले आणि कुणी अडवले तर दाखवायला सांगितले.मी म्हंटल यावर माझं नाव नाही काय नाही हे दाखवून माझ्याबद्दल दुसरीच शंका आली तर काय करायचं.तो काही न बोलता माझ्या हातावर अडीचशे रुपये टेकऊन निघून गेला.मला एजंट ने बसवलेली गाडी चालू झाली माझ्यासोबत भारतातील तामिळनाडू,चेन्नई,बांग्लादेश,म्यानमार देशातील चारजण होते.आम्ही पाच जण नशीब काढायला सौदी अरेबियात आलो होतो आणि आता पुरते अडकलो होतो कारण त्याचवेळी नेमकी पोलिसांची व्हिसा नसणाऱ्या लोकांना पकडून जेल मध्ये टाकण्याची मोहीम सुरू झाली होती. आम्ही एजंट मार्फत आलो असल्याने असही काही घडू शकत आम्हाला कल्पना नव्हती.कर्माची फळे म्हणून आम्ही मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो होतो.त्या गाडीत चेकर आला काही माणसांना पकडले.मी माझं एजंटने दिलेले ओळखपत्र दाखवले.ते बघून मला परत केले.मी सुटकेचा निश्वास टाकला.त्या गाडीतून दुसऱ्या दिवशी एका आम्हाला माणसाने एका घरात नेऊन बसवलं आणि मी सांगेपर्यंत बाहेर पडायचे नाही अस सांगितलं. आम्ही पाचजण स्वतःकडील पैसे शिल्लक राहावेत म्हणून पाच दिवस फक्त एक ताट पाचजनात जेवत होतो...सगळ्यांकडचे पैसे संपले शेवटी फक्त पाणी पिऊन दोन दिवस काढले.एका माणसाने त्याच्याजवळचा फोन विकायचा ठरवला आम्ही फोन घेवून खूप फिरलो पण फोन विकला गेला नाही.चार दिवस आम्ही उपाशी पोटी झोपलो.एका माणसाच्या मित्राने एजंटला घायला अडीचहजार रुपये त्याला दिले.तो आम्हा चौघांना म्हणाला चला जेवायला जाऊया आम्ही म्हणालो तुला एजंट ला द्यायला कमी पडतील तू तरी जा पैसे आहेत तर तुझ्या घरी तो म्हणाला ती काय करायचं पुन्हा ठरवू आधी जेऊया...आम्ही त्यादिवशी एकूण पाच दिवसांनी पोटभर जेवण केले.आता त्याच्याकडे फक्त दोन हजार रुपये राहिले.एजंट आला त्याला त्याने ते दोन हजार दिले...त्याने वर त्याला दोनशे मागितले..तो म्हणाला नाहीत.मग त्याने ते पैसे त्याला परत देत तुझं काम होणार नाही म्हणाला...
एवढं सांगून झालं ऐकणारा ड्रायव्हर तो सांगेल तस ह ह असे हुंकार भरत होता..उंब्रज ला रस्त्यावर जाम ट्रॅफिक लागलं.सगळीकडे हॉर्न,गोंगाट मी मनात विचार केला की आता काही आपल्याला पुढची घडामोडी ऐकायला मिळणार नाही.पुढं काय झालं सांगा अस कसं म्हणायचं...आमची गाडी पुढं गेली.बस ला मागून कुणी धडकल अस त्यो सौदी अरेबियन बाईटस सांगणारा व्यक्ती म्हणाला...पोलीस गाडी होती तिथे...गर्दी पांगवत होते...हळूहळू का होईना आमची गाडी मार्गाला लागली आता मी ती गोष्ट मार्गी लागावी या विचारात होते...
सौदी अरेबिया वरून परत आलेला माणूस माझ्या समोर बसुन त्याची चित्तथरारक कथा ऐकवितो आहे हे मला अनाकलनीय आश्चर्यकारक वाटत होतं..विचार केला आता या व्यक्तीला माहीत पण नाही की आपण एखाद्या लिवत्या व्यक्तीसमोर ही कथा सांगतोय...ही कथा शब्दबद्ध होईल त्याच्या ध्यानीही नव्हती...माझे कान पुढचा भाग ऐकायला आसुसले होते जसे तुमचे पुढचा भाग वाचायला आसुसतील..
(२)
गाडी मार्गी लागली....पण उंब्रजच्या स्टॉपवर एक व्यक्ती चढली... किती पैसे घेणार वैगेरे ठरले... त्या व्यक्तीला जायचं होतं कोल्हापूरला....आल्या आल्या त्या व्यक्तीने एक मोलाचे काम केले होते म्हणजे उंब्रजवर उतरणाऱ्याने पाचशे रुपयांची नोट काढून स्वतःमधील ग्रे शेड दाखवून दिली होती....ड्रायव्हर लय अडाणी बोलणाऱ्यातल हुत...मी तर तवा कुठं शुद्ध बोलत असतोय...पण त्याच्या बोलण्यात काय राव...आता झाली का पंचायत...असे शब्द होते...मग मी विचार केला आपण अशी हळहळ उद्विग्नता व्यक्त करताना ओ माय गॉड सारखे शब्द का वापर करतो काही कळायला मार्ग नाहीये...किंवा मग काही पटलं नाय की रिअली रियली म्हणून स्वतःमधील इंग्रजाळलेली रियालिटी का दाखवून देतोय काय ठाव नाही पण अभावितपणे आयला सारखे शब्द चारचौघांत उठून जरी दिसत असले तरी ते शोभून दिसत नाहीत हे मात्र खरं...तर मंडळी विषयांतर फार होतंय माझ्या मूळ विषयाकडे मी वळते...विषय असा होता की उंब्रज वर उतरणाऱ्याने पाचशेची नोट काढली आता त्याला त्याचे अमके इतके पैसे घेऊन त्याचे राहिलेले तमके इतके पैसे परत करायला आमसनी सर्वाना म्हणाले पैसे काढा.... ही वसुली करायला आलेल्या वसुलीदारासारखं काही लोकांना वाटल...कधी कधी मला वाटत काही लोकांना आपल्या खिशातले पैसे लवकर सोडवत नाहीत म्हणजे नाहीतच...तिकीट तर काढावेच लागते पण हुत काय माहितेका पैसे काढा अस म्हंटल की ढिम्म बसून राहतात जस पाकिटात ती नोट आणि तास अर्धा तास राहिली तर त्यावर व्याज मिळत असल्यासारखी ते लवकर खिशातून बाहेर काढतच नाहीत...असो असतो एखाद्याचा तसा स्वभाव... मग ना तो उंब्रज मध्ये चढलेला माणूस होता त्याने तत्परतेने आपल्या पाकिटातून पाचशे रुपये एवढ्या पन्ना पन्नास च्या नोटा दिल्या ड्रायव्हरने त्याच्याकडे कृत्य कृत्य होऊन बघतात तस बघितलं..एवढं बघायला त्याने एवढा वेळ लावला की अचानक त्याला ओव्हरटेक करून चाललेल्या गाडीकडे त्याच लक्ष नाय... अचानक साईड ला गाडी घेऊन आमचा कंबर आणि मानेचा व्यायाम त्याने घडविला...ताण दोन्ही साईडला समसमान हवा असा विचार करून अलीकडे कठडा बघून पुन्हा पलीकडे स्टेअरिंग ओढल...कुणामुळे कधी काय होईल सांगता येत नाही...मी मनात त्या मी सुट्ट पैसे देणाऱ्याच्या अशी स्वतःच जागेवर तयार केलेली सौम्य शिवी मनात दिली....आणि मनात शिवी देता देता त्याला त्या शिवीची थोडी का होईना जाणीव व्हावी म्हणून त्याच्याकडे रागाने बघून घेतले...
या सगळ्या गदारोळात अरेबियन बाईट्स वाला आपली गोष्ट पुढे सांगेल का हा विचार माझ्या मनात डोकावला....माझ्या मनात विचार आला त्या गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला याच्या अरेबियन कथेचे काही एक सोयरसुतक नाहीये त्यो फक्त त्याच्या मनाला बर वाटावे म्हणून ह ह असे हुंकार सोडतोय दुसर काय नाय...शिवाय पाचशे ची मोड देणाऱ्याने या साऱ्या वातावरणात नवा मोड आणला होता...आता काय पुढं काय झालं असेल तो सुटला जरूर आहे नाहीतर काय त्यो माझ्या पुढ्यात कसा बसून असता हा विचार मनात डोकावल्यावर मला माझ्याच हुशारी आणि दुरदृष्टिकोनाबद्दल कृत कृत का काय अस झालं...
तोपर्यंत एक वेगळीच गंमत झाली उंब्रजच्या पुढं आलो आणि हायवेवर एका माणसाने हात केला ड्रायव्हरने हातानेच कूट विचारलं पण खालच्या माणसाने काय सांगितलं नाय का काय नाय...शिवाय त्या शान्या ड्रायव्हरने गाडी त्याच्याजवळ उभी न करता जवळजवळ 200 मीटर पुढं आणली ती खालच बिचार ऊरफुटेस्तोवर पळत आलं आणि म्हणाल कराड...ड्रायव्हर म्हणाला 20 रुपये...खालचा म्हणाला एसटीला पण तेवढं घेत नाहीत...त्यांचा सौदा काही ठरेना... ड्रायव्हर त्याला म्हणाला असपन कराड कितीस राहिलंय जा पळत असाच...सर्वाना हा जोक वाटला सर्वांनी हासून घेतले... मला बिचाऱ्या त्या पळावे लागलेल्या माणसाचे वाईट वाटले...पण करणार काय इलाज नव्हता...तोपर्यंत एक तिसरीच गोष्ट घडली...ज्या माणसाला कोल्हापूरला जायचं हुत त्यो माणूस घाईला येऊन म्हणाला हे बघा दहा दहा रुपयांसाठी अशी दहा ठिकाणी गाडी थांबवणार असाल तर मला उतरा त्याने हे म्हणायचा अवकाश ड्रायव्हरने गाडी कडेला घेतली आणि म्हणाला दहा रुपये द्या आन उतरा...त्यो माणूस म्हणाला गप्प चल की भरभर सारख थांबून कधी पोचणार मग कोल्हापूरला,आमाला काय काम हायती का नाय... ड्रायव्हर म्हणला काम सगळ्यासनी हायती..आमचं पॉट यावर चालतंय तुमच्यावानी आमचं नाय सिटा आल्या तर पैसे येतील आता काय गाडी मोकळी पळवू काय मग..
झालं ती सौदी अरेबियन बाईट्सचा पुढचा भाग ऐकायला मिळायची शक्यता धूसर होत गेली...
(३)
आलो तर तुमचा....
गाडी म्हणावी तशी फास्ट नव्हती टोल नाका जवळ आला की असच होत.हायवेवर आमच्या गाडीला हात करून गाडीत यायला इच्छुक असलेल्या लोकांना घ्यायचे की नाही या द्विधा मनस्थितीत असणारा ड्रायव्हर गाडी न थांबवता कुठं अस विचारत होता आणि गाडी न थांबवता पुढं आल्यावर म्हणत होता...आर ही माणसं बोलत नाहीत देवांन तोंड दिलंय का नाय त्यासनी का आपला हात केला आन आम्हाला कळणार आहे त्यांनला कुठं जायचंय ते.. असं कस हुयील.तो एकटाच बडबडत होता... बऱ्यापैकी गाडीत सगळे आपआपल्या नादात हुते कोल्हापूरवाला त्याच्या मोबाईल मध्ये गुंग...नवीन सीट न घेतल्याने गाडीत काही नवीन घडामोडी घडली नव्हती त्यामुळे माझ्या आशा पल्लवित झाल्या की अरेबियन बाईट्स बद्दल तो ड्रायव्हर काही सांगेल.आमची गाडी तासवडे तोल नाक्याजवळ आली आणि टोल नाक्यावर लांबच्या लांब रांगा लागल्या...तो सौदी अरेबियन वाला अनाहूतपणे बोलला सौदी अरेबिया मध्ये अशी गर्दी वैगेरे काही भानगड नाही...प्रत्येक ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी याची सगळी उपाययोजना केलेली असायची..सगळी सेवा तत्पर आणि सगळ्या लेन वर कोण किती स्पीड नि जायचे हे ठरलेले 100 वाली लेन असेल तर 100च्या स्पीड नीच जायचे..६०चा स्पीड असलेला रस्ता निवडला की त्याच वेगात जायचे तिथे वाढवू पण शकत नाही आणि कमीही नाही.
मग गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणाला 200 रुपये कमी असणार्याचे पुढं काय झालं...तर तो म्हणाला कुठलं काय त्या एजंटने लगेच आम्ही लपून बसलेली जागा पोलिसांना सांगितली आणि आम्हा पाचजनांना पोलीस येऊन तिथे तुरुंगात घेवून गेले.खूप चौकश्या सुरू झाल्या...आम्ही तीन दिवस उपाशीच होतो तुरुंगात गेल्यावर आम्हाला खायला उग्र वास असलेले जेवण खायला दिले..त्या वासानेच आम्हाला मळमळू लागलं आम्ही तिथे फक्त पाणी पिऊन झोपी गेलो...
गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणाला ही सगळं घरी कधी कळलं...तर तो अरेबियन बाईट्स वाला म्हणाला...दोन दिवसांपूर्वी 2000 रुपये असलेल्या मित्राने मला जेवायला पैसे दिले होते मी न जेवता त्या पैशात फोन करायचा ठरवला... घरी फोन केला आणि इथे कशी परिस्थिती घडलीय थोडक्यात सांगितलं... आमच्या घरात सगळी रडारड सुरू...आई आणि बायकोला म्हणालो आलो तर तुमचा...नायतर विसरून जावा मला सुखान जगा... असही वर गेल्यावर कुणी माघारी येत नाय ...मी या जगात नाही अस समजा... मी परत यायचे पूर्ण प्रयत्न करेन पण वेळ अशी आहे की पोलीस येऊन आम्हाला कधीही तुरुंगात टाकतील.. मी फोन ठेवला पैसे जास्त झाले होते तो फोनवाला माणूस माझ्यासोबत भांडत होता मी त्याला बोललो नाहीत तर कुठलं देऊ...पुन्हा पंधरा मिनिटं झाली असतील तिथला फोन वाजला मी फोनजवळच होतो मला माझाच फोन असणार अस वाटलं मी झपकन उचलला तर फोन वर माझे सासरे बोलत होते...मला म्हणाले जावईबापू मी तुम्हाला जाऊ नका इथं मिळल ती भाकर खाऊन समाधानाने रहावा म्हंटल हुत तुम्ही तुमच्या चुलत्याचा कित्ता गिरवायला गेला...बक्कळ पैसा कमवायला गेला...आणि काय करून बसलासा... आमच्या जीवाला घोर लावलासा...मी फक्त ऐकत होतो मी काहीच बोलू शकत नव्हतो...मी त्यांना पण तेच सांगितलं आलो तर तुमचा....एवढ बोललो फोन ठेवला आणि तिथून बाहेर पडलो...मग त्यो ड्रायव्हर बोलला तुमचा चुलता हुता काय सौदी अरेबियात ...यावर तो ड्रायव्हर म्हणाला हो त्यानेच मला सांगितलं आमचा चुलता लय श्रीमंत झाला तिथं जाऊन...आधी लोकांना माहीत नव्हतं तिथलं दहा रुपये ती इथले १०० रुपये होतात ते...शिवाय आधी तिथं कुणी शाळा शिकल नव्हत... पैसे मोजायला येत नव्हते खिशात हात घालायचा की मुठीत मावतील तेवढं पैसे भाडं म्हणून द्यायचे...आता तिथं सगळीकडे यूनिव्हरसिटी झाल्या मोठ्या मोठ्या....एवढी मोठी विद्यापीठ की इकडच्या गेट मे गाडी आत घातली की दुसऱ्या गेट न बाहेर पडायला तास ,दोन तास लागायचं... शिक्षणाने माणसे शहाणी झाली पैसे मोजून द्यायला लागली...आपला इथला दर, दुसऱ्या देशाचा चलनाचा दर वेगळा असतो हे माणसांना कळायला लागलं...मी मनात विचार करीत होते शिक्षणाने कोण शहाण झालं तर त्याचा दूरगामी परिणाम कसा कुणावर होईल सांगता येत नाहीच...असो... कालाय तस्मई नम:......
(४)
ड्रायव्हरने पुढं विचारलं,तुरुंगात लय मारलं काय तुमास्नी....यावर अरेबियन बाईट्स वाला एकदम शांत झाला....म्हणाला प्रत्येकवेळी जसा जेलर येईल आणि चौकशीला आपण कशी उत्तर देईल त्यावर सार अवलंबून होत.आमच्या आधीपासून तुरुंगात असणाऱ्या लोकांसोबत आमचं बोलणं व्हायचं आणि मग लक्ष्यात आलं काही लोक तर वीस वीस वर्षे झालं तुरुंगात आहेत.मला माझी भारतात परतण्याची आशा धूसर वाटू लागली.एक एक दिवस जाईल तसा दिवस उगवताना काहीतरी चांगलं घडेल आपला बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होईल अस वाटायचं दिवस मावळला की रात्र अंगावर यायची. खायला व्यवस्थित नाही..रात्री मच्छर चावून चावून अंगावर पुरळ उठले होते...मी जे लोक आधीपासून तुरुंगात आहेत यांच्याशी बोलून तिथला सगळा अंदाज घेत होतो...एक ब्रह्मदेशवाला होता...वर्षातून एकदा सगळ्या कैद्यांची ओळ्खपरेड होते प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी होते आणि त्यात आपण कोणत्या देशाचे आहे हे पटवून द्यायचे असते...त्यांची तशी खात्री पटावी लागते.मग मी त्या माणसाला म्हणालो तुम्ही का गेला नाही मग इतके वर्षे तर तो म्हणाला आमचा देश आम्हाला जवळ करीत नाही एकदा देशातून बाहेर पडलं की आम्हाला पुन्हा ओळख रहात नाहीच.तो ब्रह्मदेशातील होता.एक म्यानमार चा होता त्याचीही तीच हालत... मी तुरुंगात होतो त्याला एकूण पाच दिवस झाले आणि माझ्या नशिबाने तुरुंगात ओळख परेड होऊन त्या त्या देशात पाठविण्यासाठी चौकशी सुरू झाली....हजार च्या वर कैदी होते तिथे एका एकाला आत बोलावून चौकशी सुरू होती..मला विचारलं तू कोणत्या देशातील आहेस?मी म्हणालो भारत...यावर माझं नाव विचारलं,गाव विचारलं,इथे कधी आणि कशासाठी आणि कसे आलास असे विचारलं मी जी आहेत ती उत्तरे देत होतो...माझ्याकडे माझी ओळख पटवून द्यावी अस काहीही नव्हतं..ओळखपत्र नव्हतं....त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी आधारकार्ड ,बोटाचे ठसे अस काही नव्हतं..आपण सांगितलं आणि त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला तर ठीक नाहीतर दुसरा कोणताही मार्ग नव्हता आपले नागरिकत्व सिद्ध करण्याचा...
तो अरेबियन वाला सांगताना त्या त्या प्रसंगानुरूप त्याचा चेहेरा करीत होता... शेकडो मैल दूर उज्वल भविष्याच्या आशेपायी अंधारात खितपत पडून सहन कराव्या लागणाऱ्या मरणयातना त्याच्या चेहेऱ्यावर साफ दिसत होत्या...एखादा कसलेला अभिनेता आपल्या चेहेऱ्यावर हे भाव आणू शकणार नाही असे भाव होते त्याच्या चेहेऱ्यावर...डोळ्यात खिन्नता...शून्यातून बाहेर येण्याचा प्रवास उलघडत असताना त्याने सोसलेल्या मरणकळा त्याच्या उसास्यातून व्यक्त होत होत्या...तो कुणाचे मनोरंजन करावे म्हणून हे सांगत नव्हता...तो कुणी आपली कथा, आपली ही व्यथा ऐकून घेत आहे या जाणिवेने हे सगळं सांगत होता...मी कसलेल्या अभिनेत्रीप्रमाणे हे ऐकत असूनही माझा चेहेरा निर्विकार ठेऊन त्याच्या हालचाली टिपत होते...बाकीचे जे लोक होते ह ह असे हुंकार भरणारा ड्रायव्हर वगळता ते सारे आपल्या आपल्या नादात होते...तू तिकडे सौदी अरेबियाला जा नायतर कुठबी जा... आम्हाला मात्र आमच्या घरी जायचंय अशीच त्यांची मानसिकता होती.
तो आता पुढे सांगू लागला की माझी चौकशी सुरू होती आणि त्यांनी मला कोणत्या गावचा आहेस असं विचारलं मी म्हणालो कोल्हापूर....
कोल्हापूर असा खालून आवाज आला...टोल नाका संपला आणि कोल्हापूरसाठी गाडीला हात करणाऱ्या व्यक्तीला गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली... किती घेणार या प्रश्नावर ड्रायव्हर म्हणाला शंभर तर खालच्याने परवडत नाय.. जाऊंदे असा हात केला ...मग ड्रायव्हर म्हणाला बर८० रुपये द्या या बसा... बस साठी टोल नाका ते कराड वीस रुपये तिकीट नंतर कराड ते पेठनाका ४० रुपये तिकीट आणि पेठनाका ते कोल्हापूर ६०रुपये तिकीट होतं त्या दोघांचा सौदा ८० रुपये मध्ये ठरला..ती व्यक्ती गाडीत येऊन बसली...स्वतःची बॅग समोर टाकली....निवांत फोनमध्ये बघत बसली...मला त्या अरेबियन वाल्याच्या चौकशी बद्दल ऐकण्याची उत्सुकता होती...तो मनातल्या मनात तिथे जाऊन पोहचल्यासारखा दिसत होता..पुढं काय झालं सांगा....अस मला प्रकर्षाने म्हणू वाटलं मी हे म्हणायला तोंड उघडणार तोपर्यंत ड्रायव्हर त्या टोलनाक्यावर बसलेल्या व्यक्तीला म्हणाला कंपनीत काम करताय काय... तो माणूस म्हणाला हो आमची वजन वाढविणे,कमी करणे याबद्दल सल्ला आणि औषधे पुरविणारी कंपनी आहे.त्यो म्हणाला तुमच्या सॅक वरून मी ओळखल...त्याने सुनिल आणि कायतरी पुढे आडनाव सांगितले आणि म्हणाला त्याला ओळखता का? तर तो आदरपूर्वक म्हणाला तुम्ही त्यांना कस ओळखता यावर तो ड्रायव्हर म्हणाला तो माझा भाऊ..त्यो सुनिल आणि मी अनिल...यावर त्या टोलनाक्यावर चढलेल्या व्यक्तीला आश्चर्य वाटले म्हणाला ,सुनिल तुमचा भाऊ खरच का?तुमच्या भावाचा या महिन्याचा बोनस किती माहितेका...यावर तो ड्रायव्हर म्हणाला वर्ष दोन वर्षे झालं आमच्या दोघात भाषण नाय कसल...त्यो माझ्याशी बोलत नाय म्हणून मी बी त्याच्यासंगठ बोलत नाय...एवढं बोलणं झाल्यावर त्या टोलनाकावाल्याला पुढं काय बोलावे कळेना गाडीत पुन्हा शांतता पसरली...ड्रायव्हर आपल्या भावाचा विषय निघून दुखवल्याने शांत,अरेबियन वाला या दोघांचा संवाद ऐकून शांत, कोल्हापूरवाला मोबाईलमध्ये डोकावून शांत...गाडीने अनाहूतपणे वेग पकडला तो अनिल मनातल्या मनात सुनिल ला शिव्या नक्कीच देत होता कारण.... कारण नसताना तो पुढच्या वाहनांना ओव्हरटेक करून केबिन मधून हातवारे करून आज शिकायलायस काय र गाडी म्हणून त्यांच्यावर चिडत होता... मला वाटू लागलं अरेबियन बाईट्स आता मागे पडले निदान त्या अनिल सुनील चा किस्सा तर ऐकायला मिळाला असता पण आता त्यो बी नाय....
(५)

ट्रान्समध्ये जाऊन गाडी वेगाने चालविणारा ड्रायव्हर अनिल नंतर आपल्या मनाने भानावर आला.असा थोडा वेळ गेला आणि मग त्याने त्या टोलनाकावाल्याला विचारलं किती पगार मिळाला माझ्या भावाला तुमाला हाय काय ठाव ...तर तो टोलनाकावाला उत्तरला एक लाख चाळीस हजार...आणि त्याच कामच इतकं चांगलं आहे की पुढच्या महिन्यात तो सहज दोन अडीच लाखावर जातोय बघा...हे ऐकून मी तर हैराणच झाले.मला विचारू वाटत होतं की कोणती नोकरी करतोय तो...पण थोडी कड काढली तर कळून जाईल अस वाटलं...आपल्या भावाचा पगार ऐकून अनिल थोडा वेळ शांत झाला मग म्हणाला चांगलं हाय की...मी राहिलो माग निदान त्यो तरी प्रगती करतूय ही चांगली गोष्ट आहे..हे लिहिताना माझ्या डोक्यात विचार आला लहान भाऊ असणं आणि नाव अनिल असणं,आणि प्रगतीत मोठ्या भावाच्या मागे राहणं यात काही विशेष सख्य असलं पाहिजे कारण आजच बातम्यात मुकेश अंबानीचा लहान भाऊ अनिल अंबानी यांच्याबद्दल वाचलं होतं..की अनिल अंबानीच्या संकट काळात त्यांचा मोठा भाऊ धावून गेला म्हणून..असो आता माझ्या लक्षात आलंय सारख सारख विषयांतर करणे योग्य नसते ते.
मग अनिल ड्रायव्हर त्या टोलनाकावाल्याला सांगू लागला...तुमाला बोललो कनाय मी दोन वर्षे झालं आमच्यात भाषण नाय...आई वडील माझ्यासोबतच राहत्यात...एक लाख चाळीस हजार पगार म्हणालासा नव्ह...आमच्या रानात बोर काढायची हुती ८० हजार रुपये खर्च हुता... वडीलांकरवी पैसे मागितले तर मला फोन करून सांगतूय काय आसल ती तुझं तू बघ रानातल ,माझ्याकडे पैसे नाईत...मी कर्ज काढून घातलं पैसे काम थांबत नाहीत आणि ही दिवस बी रहात नाहीत...खाऊन पिऊन सुखी आहे मी...पैसा पैसा करून काय करायचंय.माणुसकी आसल तर त्या पैशाला किंमत हाय..आपलं नशीब तस लय वाईट..म्हणत त्या अरेबियन वाल्याला म्हणाला तुमी सौदी अरेबिया च सांगत हुता कनाय लय लांब कशाला मी तुमाला माझा चेन्नई चा किस्सा सांगतो...एका कंपनीत पाच ड्रायव्हर पायजे हुत,मी त्या माणसाला म्हंटल आमी दोघे आहे माझा मित्र हुता एक माझ्यापेक्षा लहान.. त्यो आणि मी जायचं ठरवलं मी चेन्नईच घरात सांगितलं बायकोने ह्यो म्हणूंन योट घातला सांगतो मला जाऊनच दिले नाय,फासच लावून घेतो..निघूनच जातो..बायकोमुळे मी गेलो नाही त्यो पोरगा गेला तर माझ्या बायकोचा पुन्हा घरात दंगा त्या लोकाच्या पोराला काय झालं तर काय करणार ,तुम्हाला सांगतो,त्यो दुसरा पोरगा चेन्नईला गेला पाच वर्षात त्यानं गावात दहा लाखाचा बंगला बांधला दोन गाड्या घेतल्या ,इकड मी माझी कंपनी पगार वाढवना म्हणून नोकरी सोडली त्याने लगेच परत येऊन माझ्या जाग्यावर लागला...त्यो नसता तर कंपनी वाले नाक घासत माझ्या पाया पडायला आले असते.माझा पगार वाढला असता.तर ज्याला मी मार्गाला लावला त्याने मला आयुष्यातून उठवल.लोकांना आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव नसत्या आन काय नाय.त्याच हे सांगून झालं अरेबियनवाला टोलनाकावाल्याला म्हंटला पैसे काढा त्याने १०० ची नोट दिली...मगाशी त्यांचे ८० रुपये ठरले होते पण अनिल ड्रायव्हर उत्तरला यांचे पन्नास घ्या...माझ्या भावाचा मित्र हायत,झालं इथंच त्याने हक्काचे तीस रुपये मिळणार तर त्यावर भावनिक होऊन पाणी सोडलं... अशी भावनिक आणि आपल्या निर्णयावर ठाम नसणारी माणस आयुष्यात फारशी प्रगती करू शकत नाहीत...सुनील आणि अनिल दोन भाऊ...माझ्यासमोर अनिल बसला होता...काटकुळा ,गालफाड आत गेलेला,अस्वस्थ,चिडका,शीघ्रकोपी अशी माणसं कायम मग आपल्या हातातून सुटलेल्या संधीबाबत बोलत राहतात..पण प्रेमळ असतात अशी माणस म्हणून तर त्याचे आई वडील त्याच्यासोबत रहात होते,मग कष्ट मात्र त्यांच्या पाचवीला पुजलेले असतात. पण वाईट वाटत होतं मला त्याचे मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला खरंतर मदत केली पाहिजे होती...पैसा पैसा करून काय करणार... अडीनडीला पैसे धाऊन येतात पण भावनिक आधार द्यायला नातीच तर उपयोगी पडतात...ही सुनील अनिल स्टोरी ऐकता ऐकता कराड जवळ आल मला सौदी अरेबिया वाल्याला पटपट सांगून टाका पुढं काय झालं असं विचारू वाटत हुत...त्याचा फोन नंबर घेऊयात का उतरताना असाही विचार मनात डोकावला....चौकशी वेळी त्याने आपल्या गावचे नाव कोल्हापूर सांगितले होते कराड आलं तरी त्याची गाडी तिथून पुढं गेली नव्हती...माझ्या मनात कारण नसताना कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या सासरी त्यांच्या ग पैंजनाचा नाद येतूया दुहेरी हे गाणं वाजत हुत...
(६)

कराड ते इस्लामपूर केवळ अर्धा ते पाऊण तासाचे अंतर मला कधी नव्हे ते इस्लामपूर जवळ येऊ नये असं वाटत होतं.आता काय गाडी पुढं पुढं जात राहणार ना...ती रिव्हर्स थोडीच होणार होती...कराडला उतरणारी दोन माणसे म्हणाली गाडी खालतीकडंन घ्या ..एरवी मीच बोललो असतो अय खालतीकडन नाय आन काय नाय जावा चालत...पण तिथे आपल्याला पंधरा मिनिटे जादा मिळतील अस वाटलं...पण झालं उलटंच माझं वाक्य ड्रायव्हरने पूर्ण केलं म्हणाला उतरा हिथच...ड्रायव्हर लोक एवढं बोलून थांबत नस्त्यात वर म्हणाला नायतर चला कोल्हापूरला फुकट नेतो... ती उतरणार माणूस लयच भंजाळून गेला म्हणला,काय राव आता पैसच देत नाय आन काय नाय, काय कर्तुयास ती कर जा.. इथं मला शांत बसवलं नाही मी लगेच म्हणाले एक मिनिटं ....ठरलेले पैसे द्यायचे आणि मग उतरायचे... मोठ्या गाड्या खालून जात नाहीत नेहेमी वर थांबतात...त्या दोन माणसांना माझं बोलणे अनपेक्षित होते...त्यांनी गपगुमान पैसे काढून दिले.. ड्रायव्हर मला म्हणाला बघा ताई कशी कशी माणस असत्यात बघा...मी म्हणाले राग आलेल्या माणसाला आपण जास्त राग देऊन अनर्थ कशाला ओढवून द्यायचा...त्याला व्यवस्थित शांतपणे समजावून सांगायचे त्याला ते पटलं त्यामुळे तो शांत बसला... आणि अरेबियन वाला अचानक म्हणाला...मी त्या चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मी कोल्हापूरचा आहे असं सांगितलं आणि त्याने मला कोल्हापूरच्या काही खाणाखुणा विचारल्या, प्रसिद्ध ठिकाण विचारल...मी दोन चार गावाची नाव,अंबाबाई मंदिर, पन्हाळा,झालंस तर शिवाजी विद्यापीठ हे पण सांगितलं...शिवाजी विद्यापीठ म्हंटल्यावर मला अभिमान दाटून आला...तो अरेबियन वाला सांगत होता,मग त्याने कागदपत्रांवर कसले शिक्के मारले आणि माझी सुटका व्हायला काही हरकत नाही म्हणूंन सांगितलं...मला तर यावर विश्वासच बसला नाही..त्या दिवशी १५० जणांची चौकशी झाली त्यात बाहेर पडणारा मी एकटा होतो...
भारतीय दूतावासाकडून म्हणजी सरकारकडून विमानाच्या तिकिटाचे पैसे भरतात...परत पाठविण्याच्या दिवशी भारतात येणाऱ्या कोणत्या विमानात मोकळ्या शिटा हायेत बघून घेत होते...मला दिल्लीला जाणारे विमानात बसवल...दिल्लीत उतरल की घरी आपलआपून जायचं.. मला विश्वासच वाटत नव्हता की मी भारतात एवढ्या लवकर म्हणजे पंधरा दिवसाच्या आत यायला लागलोय.. दिल्लीत उतरलो...टेलिफोन बुथकडे धावत गेलो...घरी फोन करून दिल्लीत आल्याचे सांगितलं...आमच्या घरी हे ऐकून पण रडारड सुरू झाली आईला म्हणालो आय रडत्यास कशापायी तर आय म्हणाली हसायचं हुत र पोरा... परं लय आनंदून आल्यान मला रडूच यायला लागलंय... ये बाबा तुझ्या वाटकड डोळे लावून बसलोय बाबा आम्ही...मी फोन ठेवला...ती बूथवाली मला म्हणाली पैसे द्या...मी त्या मॅडम ना म्हंटल उभा रहावा जरा मॅडम,तिला काहीच सुचेना...मी पुन्हा म्हंटल जरा उभा रहावा... आणि माझ्याकडे बघा...माझी कपडे मळकट आहेत,दाढी वाढलीय त्यामुळे मी चोर,लुच्छा,lafanga माणूस वाटतोय का तुमास्नी...मी ही काय आताच सौदी अरेबियाच्या तुरुंगातून आलोया...नोकरी करायला गेलो होतो...लय व्यापातून आताच भारतात परतलोय...माझ्याकडे पैसे नाहीत, मी हाय कोल्हापूरचा तुम्हीच मला माझ्या गावाकड जायला पैसे द्या...हे ऐकून त्या मॅडम नि तिथल्या ओळखीच्या लोकांना सांगून मला साडेपाचशे रुपये गोळा करून दिले...मी ट्रेन कधी जातेय बघायला रेल्वे स्टेशनकडे गेलो...तिकीट काढलं मुंबईला जाणारी ट्रेन पाचच मिनिटात हलणार होती मी पळतच फलाट गाठलं...ती ट्रेन अजून यायची होती...असाच एक महाराष्ट्रातला माणूस भेटला त्याला मी चेहेऱ्यावरून महाराष्ट्रातला वाटलो त्याने मला विचारलं कुठून आला मी म्हंटल सौदी अरेबियावरून आताच आलो...त्याला काय ती पटेना..मग मी त्याला माझी अरेबियन कथा थोडक्यात सांगितली त्यानं तर मला कडकडून मिठीच मारली...मला म्हणाला नशीबवान आहेस...तुम्हाला सांगतो त्यानं मुंबईत येईपर्यंतचा सगळा खर्च त्यानं केला ...मुंबईत आल्यावर माझ्या पैशाने चहा तेवढा घेऊ म्हणाला...त्याचा पत्ता दिला माझा फोन नंबर घेतला आणि तो मला कोल्हापूरच्या गाडीत बसवून निघून गेला...बसमधून कोल्हापुरात पाऊल ठेवलं..पटलंच नाही...खाली वाकून तिथंच साष्टांग नमस्कार घातला...सासरेबूआ मला स्टँड वर न्यायला आले हुते...घरी पोचलो सगळ्यांनी गळ्यात पडून पोटभर रडून घेतलं...मग कुणी काय तर विनोद केला मग हसण्याचा एकच गलका उठला...तुम्हाला सांगतो घरी गेलो,अंघोळ केली,जेवलो...ड्रायव्हर म्हणाला जेवान आवडीच आसल ना राव...तर अरेबियन वाला म्हणाला आवडबीवड सौदी अरेबियात संपली... समोर आलेल्या प्रत्येक भाकरीच्या तुकड्याबद्दल मला कणव वाटत होती...आजूनबी वाटती... अनिल ड्रायव्हर म्हणाला मग...सौदी अरेबियनवाला म्हणाला मग कुठं काय घरी जेवल्यावर जी झोपलो मला दोन दिवस डोळा उघडला नव्हता...सौदी अरेबियात पंधरा दिवस माझ्या डोळ्याला डोळा नव्हता...
सुखांत असल्याने मलाही छान वाटत होतं...कासेगाव आलं होतं...अनिल ड्रायव्हर त्या सौदी अरेबियन वाल्याला विचारत हुता तुमच्याबरोबर कोल्हापूरचा एक मित्र हुता नवं त्याच काय झालं...सौदी अरेबियन वाला म्हणाला त्याच नशीब माझ्यासारख जोरावर नव्हतं...मीच अभावितपणे म्हंटल का?....तर तो म्हणाला सांगतो....
(७)
अरेबियन वाल्यासमवेत सौदी अरेबियाला त्याचा मित्रही गेला होता हे आधी सांगितलेल्या अर्ध्या भागात आले असले पाहिजे मी स्वतःच विचारले तुमच्या मित्राचे काय झाले मग...मी त्या सौदी अरेबियावाल्याला विचारलेल्या प्रश्नामुळे त्याची कथा आपण पण ऐकत होतो हे समजून त्याला आपली कथा सांगण्याचे चीज झाल्यासारखे वाटले...मला म्हणाले मॅडम,मी आणि माझा मित्र गेलो होतो..पण तो तिकडे लांब हुता... ज्यावेळी पोलिसांची धरपकड सुरू झाली तेंव्हा मी अस अस भारतात परतायच्या विचारात आहे तू पण येतोस का हिकडं आपण मिळुन काही हालचाली करू आणि जाऊ आपल्या आपल्या देशात अस त्याला बोललो...पण त्याला वाटलं की तिथली परिस्थिती निवळेल...त्याला मी म्हणालो माझ्याकडे पैसे नाहीत आता तुला फोन पण करता येणार नाही आता मी भारतात जाईन बघ...तू पण ये माघारी आता आपली भेट भारतातच होईल...तो तेंव्हा निश्चिंत होता..त्याने ती परिस्थिती गांभीर्याने घेतली नव्हती..मग पुढ काय जरा पटपट सांगता का आता कासेगाव आलंय मी पेठनाक्यावर उतरणार आहे मी लगेच सांगून टाकलं..मग तो भरभर बोलू लागला...अनिल ड्रायव्हरने गाडीचा वेग जरा कमी करून त्याची कथा पूर्ण व्हायला वाव दिला...हे मला सचिनचे शतक पूर्ण व्हायला आलेय ,आणि रनांचे टार्गेट पण पूर्ण व्हायला आलेय म्हणून गांगुली त्याला जास्तीतजास्त स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात असल्यासारख वाटत होतं...अरेबियनवाला म्हणाला मी पंधरा दिवसात परत आलो आणि माझा मित्र नंतर तिथे लगेच सापडून चार वर्षे जेलमध्ये सडत होता...मी विचारलं तो पण भारतातला होता शिवाय कोल्हापूरचाच मग त्याला का लगेच सोडले नाही...त्यावर तो म्हणाला झालं असं की मी सुटून आलो त्या दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राला पकडून तुरुंगात घातले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुरुंगात दोन गटात मारामारी झाली आणि त्यात एका माणसाचा जीव गेला...झालं तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची उलटतपासणी सुरू झाली...रात्री आम्ही तोंडातून ब्र काढायचा नाही म्हणून तुरुंगातील दादा मंडळी मारायचे आणि सकाळी तो माणूस कसा मेला याची चौकशी करायला आम्हाला बोलायला भाग पाडायला पोलीस मारायचे...चार वर्षे हे चालले पोलीस चार वर्ष तपास करीत होती मग चार वर्षांनी न्यायालयाने ही फाईल क्लोज करण्याला संमती दिली तेंव्हा कुठे त्याचा भारतात परत यायचा मार्ग मोकळा झाला...अनिल ड्रायव्हर म्हणला तुम्हाला कसं कळलं...तो म्हंटला मीच फोन केला होता घराकडे त्याच्या...कधी येईल काळजीपोटी अधेमधे करीत होतोच.. एकदिवस त्यानेच उचलला फोन या म्हणाला भेटायला आलोय भारतात...
भेटायला गेल्यावर त्यानेच सगळं सांगितलं ...त्याला विमानाने सोडला मुंबईत.. पण कसली शुद्ध राहिली नव्हती...आपण कोण आहे काय करतो याची...रस्त्याने भटकत होता..मुंबईत त्यांच्या पाव्हण्याने बघितलं त्याच्या घरी सांगितलं...मी विचार केला...तीच जर त्याला दिल्लीत सोडला असता तर आयुष्यभर असाच भटकला असता.त्याला गाडीत घालून मुंबईच्या पाहुण्यांच्यात नेला त्याच्या बापाने त्याला बघितलं आणि मारायलाच सुरवात केली कारण काय तर मी किती लवकर आलो आणि तो का सडत हुता तिथं...मग त्याला अंघोळ घातली चार दिवस गोळ्या औषध करून त्याला माणसात आणला मग कोल्हापूरला परत आणला...
मी तर हे ऐकून आश्चर्यचकित झाले...विचार केला नशीब नशीब म्हणतात ते शेवटी हेच....पण नशिबाची पण सारखी परीक्षा घेऊ नये...आपली प्रगती करायला धोका पत्करू नये असे नाही पण अखंड सावध राहावे...शेवटी आपल्या गावाकडं राहून ,आपल्या माणसांच्यात आनंदाने जगणे म्हणजे पण सुखच असते...शेवटी सुख समाधान मानण्यावर असते...त्याचा काका श्रीमंत झाला म्हणून तो गेला...पण त्याचा मित्र चार वर्षे तुरुंगात राहिल्यावर आपणच नशीबवान म्हणण्याची वेळ अरेबियनवाल्यावर आली...
पेठनाका आला आणि मी या विचारातच गाडीतून उतरले की माझ्या सातारा डायरीच्या पाच पानांची तर आज सोय झालीच...कुणाचं काय तर कुणाचं काय.(समाप्त)
©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
Thank you dear all for reading....
Regards...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या प्रवासात मी हजर असल्याचा फिल आला. माझेही कान असेच टवकारलेले असतात. बऱ्याच वेळेस मी मध्ये पडून संभाषणाचा ताबा घेत असे. पण अलीकडे मी आवरतो स्वत:ला.
ब्रह्मदेश नि म्यानमार एकच ना. चार वर्षे कोल्हापुरात काढली. उंब्रज ला राहिलो आहे. कोल्हापूर लै आवडीचं गाव आहे माझं.

त्या प्रवासात मी हजर असल्याचा फिल आला. माझेही कान असेच टवकारलेले असतात. बऱ्याच वेळेस मी मध्ये पडून संभाषणाचा ताबा घेत असे. पण अलीकडे मी आवरतो स्वत:ला.
ब्रह्मदेश नि म्यानमार एकच ना. चार वर्षे कोल्हापुरात काढली. उंब्रज ला राहिलो आहे. कोल्हापूर लै आवडीचं गाव आहे माझं.>>>>>>>>>>>>अरे वा मग इथले वडाप वैगेरे चांगलेच परिचयाचे असणार तुमच्या

तो ब्रह्मदेशातील होता.एक म्यानमार चा होता त्याचीही तीच हालत... मी तुरुंगात होतो त्याला एकूण पाच
अर्थात कहाणी सांगणाराला हे ठाऊक नसेल. किंवा टंकताना गल्लत झाली असेल असे वाटते.
पंचवीस वर्षांपूर्वी वडाप येवढं नव्हतं बघा.

चांगली सुरुवात केली होतीत.२ नंतर ६ वे पान वाचलं.अवांतर म्हणजे फारच झाले.>>>>>>>>धन्यवाद देवकिजी
मला वाटत हे एकदम टाकल्याने आपल्याला अस जाणवलं असेल असो आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

चांगला प्रयत्न..आवडली तुमच्या डायरीतली पाने...

पुण्यावरून कोल्हापुरला जाणार्या प्रायवेट बसमधून कित्येकदा प्रवास केलाय..
त्यामुळे संपूर्ण रस्ता परिचयाचा आहे....इस्लामपुर, पेठ नाका, कराड सांगली फाटा, वैगेरे वैगेरे. त्यामुळे कथा वाचताना प्रत्यक्ष तिथे हजर असल्याचा फिल आला...

छान लिहलंय.
सौदीतल्या थरारक, सुखद, दुःखद भूतकाळातील आठवणी + कोल्हापूर प्रवासातल्या वर्तमानकाळातील हलक्याफुलक्या गमतीजमती <-- हे रोचक कॉम्बो आहे.

छान लिहिलंय.
मधे मधे पॅराग्राफ, अवतरण चिन्हं वापरत चला.

लिखाण छान... लिहित रहा.
मला पण प्रवासात असल्यासारखे झाले.
नेहमीचा रूट आहे तो. त्या रुटला खुप वेळा प्रवास केला आहे.
माझे पण प्रवासात असल्या लोक्कांकडे लक्ष्य असते.
त्यांचा संसार थोड्याश्या उत्पन्नावरती कसे चालवित असतील हा प्रश्न नेहमी मला पडतो.
असो.. पण हे लोक कायमचे खुश मला तरी दिसतात.

चांगलं लिहिलं आहे. शैली आवडली. लेखातले सगळे थांबे आणि थोडेफार सौदी अरेबिया हे ओळखीचे असल्याने अजून रिलेट करता आले.
(तसेच, स्पष्ट सांगायचे तर एक दोन ठिकाणी खटकले - उदा. डायरीच्या पाच पानांची तर आज सोय झालीच. )

कार्यालयीन कामासाठी सौदी अरेबियाला अनेकदा फेर्‍या व्हायच्या. तेंव्हा काही ड्रायव्हरांकडून अश्या हकीकती त्यांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या. त्यांची अशी कोंडलेली अवस्था बघून फार वाईट वाटायचे. एकदा मध्यरात्रीच्या फ्लाईटच्या 'एअरपोर्ट पिकअप'ला आलेला ड्रायव्हर रत्नागिरीचा निघाला. घरच्या अनेकविध आर्थिक अडचणी सुटतील अशी आशा धरून एका दलालामार्फत कसल्याश्या मोठ्या दुकानात मदतनिसाची नोकरी करण्यासाठी म्हणून इथे आला. त्या आधी त्याचा मावसभाऊही इकडे आला होता. पण दोन महिन्यांतच दलालाने त्याचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करून दुसर्‍याच ठिकाणी ठरलेल्याच्या निम्म्या पगारात काम करायला भाग पाडले. नंतर तिथल्या कायद्यात झालेल्या बदलामुळे तेही काम गेले. दलालाने 'कागदपत्रे परत हवी असल्यास अमुक अमुक रक्कम दे,' अशी मागणी केली. याच्याकडे कपड्यांच्या जोडाशिवाय दुसरे काहीच नाही. सुदैवाने याला ड्रायव्हिंग येत होते. मग बर्‍याच खटपटी करून एका टॅक्सी कंपनीत तुटपुंज्या पगारावर काम करायला मिळाले. जोवर काही मार्ग सापडत नाही तोपर्यंत त्या पगारातून पैसे जमा करून पासपोर्ट परत मिळवायचा, हेच त्याच्या हातात राहिले होते. हात बांधल्यासारखे त्याचे झाले होते. तिथली (भारतातली घरातली) आर्थिक कोंडी फोडण्यासाठी इकडे आलो आणि इथे त्याहून भयानक कोंडीत सापडलो, असे म्हणाला. टॅक्सीत बसल्यावर तो भारतीय दिसतोय हे बघून मी बोलायला सुरुवात केली होती. मीही महाराष्ट्रातूनच आलोय आणि मराठी आहे, हे ऐकल्यावर त्याने भावनावेग न आवरून भडाभडा हे सांगायला सुरुवात केली. उतरताना मी त्याला थोडे भारतीय रुपये दिले, मला त्यावेळी तितकेच शक्य होते. ते त्याला किती उपयोगी पडले असतील कुणास ठाऊक!

दुसरा एक असाच चक्क बोरिवलीचा मराठी माणूस भेटला. अगदी पिचून गेला होता. कुठून इथे आलो आणि या दुष्टचक्रात पडलो असे त्याचे झाले होते. त्याने त्याचा मोबाईल नंबर वगैरे आम्हाला दिला आणि कधीही टॅक्सी लागली तर मला फोन करा म्हणाला. पुढच्या खेपेत गेल्यावर त्याला फोन केला तर लागला नाही. नेहमीप्रमाणे त्या टॅक्सी कंपनीची टॅक्सी बुक केली. हा जो ड्रायव्हर आला होता, तो निघाला केरळचा. त्याला बोरिवलीकराबद्दल विचारले तर तो म्हणाला - सर वो इंडिया भाग गया! [मी: वो कैसे?] वो बहरीन एक भाडा ले के गया और उधर पे कुछ तो जुगाड किया. टॅक्सी बहरीन एअरपोर्ट के बाहर ही छोड दिया और उधर से इंडिया भाग गया. (म्हटले - सुटला बिचारा!)

हिंदू लोकांना या देशात अशी वागणूक मिळण्यास धार्मिक कारण असावे असे वाटते. काफिर लोकांना असे वागवण्यासाठी काही जण धर्माचे पालन समजत असावेत.
पाकिस्तानात लहान मुलांच्या शाळेत हल्ला करून अतिरेक्यांनी मुले मारली होती तेव्हा मुलांच्या आया हमारे बेकसूर बच्चोंको क्यो मारा. जाकर हिंदूओंको मारते असा विलाप करीत होत्या.

छान लिहिलंय.
मधे मधे पॅराग्राफ, अवतरण चिन्हं वापरत चला.>>>>>>>>सस्मित नक्कीच वापरत जाईन