प्रलय-०२

Submitted by शुभम् on 23 March, 2019 - 00:37

प्रलय-०२

भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात सापडला होता . त्या सैनिक पथकाचा प्रमुख , अधीरत होता , तो म्हणाला " भिल्वावा आता तुझा खेळ संपला , उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......

" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?

" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे.....

" अरे अधिरथ तुझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे का...? तुला माहित नाही का काळी भिंत पडली तर काय होईल ....? अरे प्रधानजी खरच राज्याचे सेवक आहेत आणि तू ही हो.....

" राज्याचे सेवक राजाच्या आज्ञेबाहेर नसतात . राजाच्या आज्ञा विरुद्ध जर कोणी वागत असेल तर तो देशद्रोही असतो......

" अधिरथ राजाचे काम आहे राज्याची सेवा करणे जर राजाचा निर्णय चुकीचा असेल तर त्या निर्णयाची साथ न देता त्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं हेच राज्याच्या खऱ्या सेवकाचा काम असतं.......

" तू मला देशसेवेचा धडा शिकवू नकोस भिल्लवा . मला माहितीये काय करायचं आणि काय नाही ते , गुमान तुझी तलवार आमच्या स्वाधीन करून गपचूप आमच्याबरोबर चल.....

" ते शक्य नाही.....

" तू माझ्या विरुद्ध लढणार , फुकट मरशील भिल्लवा , गुमान चला आमच्याबरोबर......

भिल्लवाने म्यानातून त्याची तलवार काढली त्याबरोबर त्याच्या भोवती उभे असलेले आठ ही सैनिक भाले सरसावून पुढे झाले . त्या सैनिकांना बाजूला सारत अधिरथ पुढे आला .

" ये रा* बाहेर हो गपचूप , तू एका देशद्रोह्याला तुझ्या वेश्यालयात लपवून ठेवले , नाही तुझा धंदा बंद केला तर नावाचा अधिरत नाही

" जा रे जा तुझ्यासारखे छप्पन्न येऊन गेले या सरोजचा एक केसही कोण वाकड करू शकले नाही अजून.....

" आता सारे काही होईल पण पहिल्यांदा भिल्लव मग बाकीचे , हो बाजूला गपचुप.....

सरोज बाजूला सरली . त्याबरोबर अधिरथ ने भिल्लवावर तलवारीचा वार केला . त्यांचे द्वंद्व चालू झाले . अधिरत हा कसेही केले तरी कसलेला सैनिक होता , आणि तलवारबाजीत त्या संपूर्ण राज्यात त्याचा हात धरू शकेल असा कोणीही तलवारबाज नव्हता . त्यामुळे भिल्लवाचा निभाव लागणे शक्य नव्हते , याची जाणीव सरोजला ही होती . सरोजनी बाजूला जाता जाता नेहमी तिच्या जवळ बाळगीत असलेला छोटे दोन खंजीर काढले व भाला घेऊन सरसावलेल्या सैनिकांवरती चपळतेने वार केला . दोन सैनिकांच्या गळ्यात तिने दोन खंजीर खुपसले व क्षणात ते दोन सैनिक जागीच ठार झाले . मग बाकीचे सैनिक ही एक एक करत तिच्या वरती चालून येऊ लागले . तिकडे अधिरथ भिल्लवाला भारी पडत होता . मात्र सरोज या सहा सैनिकांना भारी पडत होती . एकापाठोपाठ एक तिने सहाच्या सहा सैनिकांना मारून टाकले . अधिरथ इकडे भिल्लवाला मारण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या हातावरती चाकू फेकून त्याला निशस्त्र केले . निशस्त्र केल्याबरोबर भिल्लवाने त्याच्या गळ्यावर तलवार ठेवत त्याचे दोन्ही हात बांधून , त्याला एका खांबाला बांधून टाकले....

" बेइमानीने लढलास तू भिल्लवा .....

" फार बोलतो नाही हा अधिरथ.... बाजूला पडलेले एक कापड घेऊन त्या कापडाने अधिरतचे तोंड बांधून टाकले व सरोजकडे वळत तो म्हणाला

" बापरे सरोज काय भयानक खंजीर चालवतेस तू ...कधी पाहीलच नाही मी.....

" तू अजून बऱ्याच गोष्टी पाहिल्या नाहीत.....

" सरोज चल लवकर आपल्याला कसेही करून प्रधानजींना सोडवलंचच पाहिजे.....
" थांब जरा मी मागच्या खोलीत जाऊन सगळ्यांना सांगते मी चालले आहे ते ...मगाशी म्हणलं होतं ना मी ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी माझं नुकसानच होतं....
सरोज एक पंचविशीतली तरुणी होती . दिसायला अतिशय सुंदर , कोणताही पुरुष सहजपणे तिच्याकडे आकर्षित व्हावा इतकी . त्याबरोबरच ती अनेक कलांमध्ये पटाईत होती .

महाराजांनी सेनापतीला त्यांच्या वैयक्तिक कक्षात बोलावले होते . "सेनापती आपली सेना काळ्या भिंतीकडे कधी रवाना होणार आहे ....? लवकरात लवकर ती भिंत पाडून टाका .....

" महाराज सेना सकाळीच रवाना झालेल्या आहेत , पण तुमचा विचार नक्की आहे का...? काळ्या भिंतीबद्दल मीही बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत . महाराज सर्व जाणकार लोक म्हणताहेत भिंत पाडणं बरोबर नाही.....

" मग त्या सर्व जाणकार लोकांनाही उद्या प्रधानजी बरोबर फाशी देऊन टाकायची का...? , माझा निर्णय झालाय सेनापतीजी , मला शिकवू नका राज्यकारभार कसा करायचा ते......

" जी महाराज , माफी असावी ..." असं म्हणत सेनापती बाहेर निघून गेले

तो लुकड्या शरीरयष्टीचा , खोबणीत खोल गेलेले डोळे , अर्धवट टक्कल आणि अर्धवट लांब वाढलेले केस , हातात सदानकदा ते सुवर्णपात्र व त्यात त्याची विशिष्ट मदिरा , चेहऱ्यावरती नेहमी त्रासिक भाव ....या महाराजाला पाहून पाहून मंत्रीगणही त्याच्या वागण्याला मनातल्या मनात वैतागले होते...

" आता प्रलय येणार , हाss हाss हाss
सगळ्यांना बुडवून नेणार , हाs हाs हाs
आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार
आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार.......

काळ्या भिंतीपासून मैल दीड मैलावर असलेल्या एकमेव घराबाहेर उभा असलेला , विक्षिप्त कपडे घातलेला आणि विक्षिप्त दिसणारा , म्हातारा माणूस असं गोल गोल फिरत ओरडत होता . ओरडत ओरडतच त्याने अंगावरती असलेले कपडे काढून दिले व त्याच्या घरासमोर असलेल्या गढूळ पाण्याने भरलेल्या डबक्यात उडी मारली . घरातून एक सुंदर तरुणी बाहेर आली .

" बाबा हे काय करताय तुम्ही , निघा बर बाहेर ....किती वेळा सांगितले मी तुम्हाला असं बाहेर फिरत जाऊ नका म्हणून......

" अग माझ्या शान्या बाळा तू पण या काळ या भिंती पासून लांब जा , नाहीतर प्रलय येइल आणि तुला पण घेऊन जाइल , लवकर जा , लवकर जा ....नाहीतर प्रलय येईल आणि आपल्याला पण घेऊन जाईल.....

" बाबा वर या बरं . तुमची काढा घेण्याची वेळ झालीय उगाच काही बरळू नका , त्या डबक्यातून बाहेर या.....

ती तरुणी खरच सुंदर होती . वडिलांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या हाताला धरून ओढायचा प्रयत्न करत होती . पण वडील तिच्या हातून निसटून त्या गढूळ पाण्यात डुबक्या मारण्यातच व्यस्त होते . ते खाली बुडत होते आणि खालचा चिखल घेऊन स्वतःच्या अंगाला फासत होते. तरीही ती मुलगी प्रयत्न करीतच होती . पण वडील काही तिच्या हाताला येत नव्हते . तिच्या त्या चेहऱ्यावरती जरा त्रासिकपणाचा भाव आला होता.

" मी मदत केली तर चालेल का ...? अचानक आलेल्या आवाजाने ती तरुणी जरा दचकलीच

घोड्यावरती बसलेला , खांद्यापर्यंत लांब केस असलेला , कमरेला तलवार नि खंजीर असलेला , अंगावरती चिलखत आणि डोक्यावरती टोप , असलेला तो नक्कीच कुणीतरी योद्धा होता.....

घोड्यावरून खाली उतरत त्याने त्याचा टोप काढून बाजुला ठेवला , वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर त्याचे काळे कुळकुळीत केस हवेत उडाले क्षणभरासाठी का असेना ती तरुणी त्याच्याकडे पाहतच राहिली.... त्यांची नजरानजर झाली . त्याच्या नजरेत तिच्याबद्दल आदर होता नि कोपऱ्यात कुठेतरी प्रेम होतं आणि तिच्या नजरेत त्याच्याबद्दल निवळ कुतूहल होतं . त्याच्या बरोबर असलेला दोर त्याने घेतला व एक गाठ मारत गोल फिरवून तिच्या वडिलांभोवती फेकला व एका झटक्यात ओढून त्याने तिच्या वडिलांना बाहेर काढले...

" मी तुमची आभारी आहे , थोडावेळ थांबून तुम्ही आमचा पाहुणचार का घेत नाही ...? संध्याकाळची वेळ झाली आहे तुम्ही जेवण करून तुमच्या पुढच्या प्रवासाला निघू शकता.....

" नाही पुन्हा कधीतरी मला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे.....

" पश्चिमेकडचे प्रवास फार दिवस चालत नाहीत . तुम्ही योद्धा दिसत आहात . भले तुम्ही योद्धा असा, पश्चिमेकडे जाऊ नका त्या काळ्या भिंतीपलिकडे जे काही आहे , ते सगळ्याला वरचढ आहे .....

" तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे..... तुम्हाला कसं कळलं की मी काळ्या भिंतीपलीकडे चाललोय ते.....?

" माझी नजर आणि आठवणीही तीक्ष्ण आहेत . काही वर्षांपूर्वी एक म्हातारा साधू , साधू म्हणता येणार नाही त्याला . इतर म्हाताऱ्या माणसाला सारखा असतो तसाच म्हातारा या ठिकाणाहून गेला . जाताना मला त्याने एक थैली दिली . काहीतरी होतं त्यात . दुसरी एक थैली दिली, त्यात सोन्याच्या मुद्रा होत्या . तो मला म्हणाला काही वर्षानंतर या ठिकाणाहून चिलखत घातलेला , कमरेला तलवार व खंजीर असलेला , डोक्यावरती टोप असलेला , खांद्यापर्यंत लांब काळे कुळकुळीत केस असलेला , घोड्यावरती स्वार होऊन एक योद्धा येईल . तो स्वतःहून तुला त्याची मदत देऊ करेल , त्या योद्ध्याला त्याने ती थैली द्यायला सांगितली होती......

ती तरुणी तिच्या वडिलांना एका बाजूला बसवत , आत गेली व काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली पांढरी व धूळ बसून मळकट झालेली थैली तिने आणून त्या तरुणाच्या हातात सुपूर्त केली.....

" हा माझा हक्क नाही , पण मी विचारू शकते का , कि या थैली मध्ये काय आहे.....

त्या तरुणाने थैलीची गाठ सोडत तिला त्यात असलेल्या काळ्या पांढऱ्या बिया दाखवल्या व म्हणाला " तुझे बाबा बरोबर बोलत आहेत , तुम्हाला काळ्या भिंतींपासून दूर जावंच लागणार आहे .

तो आयुष्यमान होता . काळी भिंत पाडल्यानंतर जे काही संकट येणार होतं . त्या संकटापासून रक्षण करण्यासाठी जे काही करावे लागणार होतं ते करण्याची शपथ त्याने व त्याच्या साथीदारांनी घेतली होती.

क्रमःश .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय Happy

त्याच्या घरासमोर असलेल्या गढूळ पाण्याने भरलेल्या डबक्यात उडी मारली . आतून एक सुंदर तरुणी बाहेर आली . >> आतून ऐवजी घरातून करावे. ते डबक्यातून बाहेर आली असे वाटतेय Happy

केलाय बदल .......
डबक्यातून नाही आली बर का बाहेर ती.....

वाचतेय.
एवढे ..... सतत नाही दिलेत तरी चालेल.

मग त्या सर्व जाणकार लोकांनाही उद्या प्रधानजी बरोबर फाशी देऊन टाकायची का...? , माझा निर्णय झालाय प्रधानजी , मला शिकवू नका राज्यकारभार कसा करायचा ते......>>>>>>>सेनापतीजी हव्ये इथे