आता घरोघरी ठंडाई

Submitted by प्राचीन on 21 March, 2019 - 00:53

मंडळी, नमस्कार आणि रंगोत्सवाच्या शुभेच्छा.
परवा किराणा सामानाच्या दुकानात गेले असता एका स्त्रीने पाव किलो मगज मागितला दुकानदाराकडे, तेव्हा त्याने तेवढा माल नाहीये असं सांगितलं. मी तेथेच असल्यामुळे संभाषण कानांवर पडलं,त्यावरून तिला तेवढया प्रमाणात मगज हा ठंडाई बनविण्यासाठी हवा होता, हे कळलं. मागच्या वर्षी मी गुरुजींची ठंडाई चाखून बघितली होती, पण त्यामधील मिर्‍याचा स्वाद किंचित पुढे आल्यासारखा वाटल्याने तितकीशी आवडली नव्हती. पूर्वी पाहिलेल्या काही हिंदी सीरियलस् चा हँगओव्हर असेल कदाचित; किंवा भोवतालच्या मराठी कुटुंबांत हा पदार्थ कधीच केलेला पाहिला नसल्यामुळे असेल; पण त्याक्षणी मनाने उचल खाल्ली की ह्या वर्षी करूनच बघूया ठंडाई प्रकरण (अर्थात भांगविरहित).
पहिला मोहरा मा.बो.कडे वळवला साहजिकपणे, तेव्हा खालील पाककृती मिळाली.
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/81375.html?1147347133
पण पुढे दिनेशदांच्या धाग्यावर अडखळायला झालं. पाककृती दिसत नव्हती. प्रतिक्रिया फक्त दिसत होत्या. तूनळीवरील काही प्रकारच्या ठंडाई सुद्धा पाहिल्या. मग चुकला फकीर शेवटी आपल्या मशिदीत , म्हणजे मा.बो.वर परतला नि एकदाची काही बदल करून ठंडाई तयार केली व जीव थंडावला. त्यामुळे रूढार्थाने ही काही पाककृती नाही. फक्त अनुभवांची देवाण-घेवाण आहे.
केलेला बदल म्हणजे साखरेचा पाक न करता दुधातच साखर विरघळू दिली; मिरीचा स्वाद आवडत नसल्याने नावालाच वापरली; सजावटीकरिता सुका मेवा वापरतात, पण त्याऐवजी मध व केशर वापरले,इ.
तर तुमचे ठंडाईचे थंड अनुभव, प्रचि. वा पाककृती इथे दिल्यात तर ठंडाई रंगरसिली होईल ! आणि एक महत्त्वाची शंका म्हणजे केवळ बडिशेप वापरतात म्हणून ह्या प्रकाराला ठंडाई म्हणतात की अजून काही कारण आहे? (इतर घटक बदाम,काजू वगैरे तर उष्ण असतात ना – इति माझं निरागस ज्ञान )
स्त्रोत – मा.बो. वरील पाककृती; तूनळी
आणि स्वेच्छानुरूप बदल.

तयारी
21.3.19 Thandai (4).jpg

थंडावणारी ठंडाई
21.3.19 Thandai (1).jpg21.3.19 Thandai (1).jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटच्या अवकृपेमुळे प्रचि दोनदा टाकले गेले आहेत व तयारीचा प्रचि संपादनमध्ये जाऊनही टाकता येत नाही Uhoh

लहानपणी अजिबात न आवडणारा प्रकार, आता फार आवडू लागलाय,
अर्थात आमची मजल केवळ गुरुजी थंडाई सिरप आणून दुधात घालणे इतकीच आहे, होळीच्या आसपास आणलेली बाटली 9 10 महिने पुरते.
पण त्यांनी सांगितलेल्या quantity पेक्षा बरेच कमी सिरप घालावे, नाहि तर खूप गोड आणि जास्त मिरे असे फीलिंग येते.

हॅपी होळी,

थंडाईत भांग नसेल तर मजा नाही. नशा व्हावी इतकी नाही पण लहानशी गोळी असावीच थंडाईत. चार मिरे कमी टाकले तरी चालेल. खसखस भरपुर असावी. (उकळत्या पाण्यातून काढलेली) मगज नसला तरी चालेल, काजू असतातच. (चार काजू सहाणेवर सावकाश उगाळून ती पेस्ट घ्यावी)

बाकी एखाद्या गोष्टीची चव ‘पुढे गेली’ ‘मागे आली’ या सारखा शब्दप्रयोग फार दिवसांनी वाचला.

खरं तर पा. कृ. ची लिंक वर लेखात दिलेली आहेच. आणि संपादन केले जात नाहीये त्यामुळे प्रतिसादात तथाकथित पा. कृ देत आहे
हे वापरून साधारणपणे दोन मोठे कप अथवा मग भरून पेय तयार झालं.
साहित्य - बदाम व काजू प्रत्येकी आठ-"दहा नग,
खसखस पाव वाटी,
मगज (भोपळा वा काकडी) पन्नास ग्रॅम
साय काढून घेतलेले दूध तीनशे मिली. (पातेल्याच्या
प्रमाणात घेतले)
दोन तीन हिरवे वेलदोडे, एक मिरे, गोडवा जितका हवा
तितकी साखर (मी सहा चहाचे चमचे घेतली)
सजावटीसाठी मध चमचा भर व चार पाच केसरकाड्या
कृती - साधारणपणे पाच ते सहा तास बदाम, काजू, मगज व खसखस साध्या पाण्यात भिजवून ठेवले. नंतर पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. वेलदोडे सोलून त्यातील दाणे व मिरे घालून गुळगुळीत वाटून घेतले. दुधाला एक उकळी आणून कोमट करून मग साखर घातली. दुधात साखर विरघळल्यावर वरील मिश्रण गाळून साका दुधात घातला. गाळण्यासाठी मी तूप गाळतो ती गाळणी वापरली पण मलमलच्या कपड्यातून सुद्धा गाळता येईल. मग काय हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं.
ठंडाई थंडावली की मग सर्व्ह करताना केसरकाड्या व मध वापरले. बर्फ ऐच्छिक.

गाळण्यासाठी मी तूप गाळतो ती गाळणी वापरली पण मलमलच्या कपड्यातून सुद्धा गाळता येईल.>>>>> वाटलेले बदाम आणि मगज हे सुद्धा गाळणीत राहिल का? रेसिपी मस्त आहे.

ह्या प्रकाराला ठंडाई म्हणतात की अजून काही कारण आहे? (इतर घटक बदाम,काजू वगैरे तर उष्ण असतात ना>>>> जीवाला/आत्म्याला थंड थंड वाटत असावे कदाचित.