काही नवे ग्रह

Submitted by shriramb on 16 March, 2019 - 05:01

काही नवे ग्रह ( भाग १)
आपल्या सर्वांचे लाडके लेखक श्री पु ल देशपांडे यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी "काही नवे ग्रहयोग" हा लेख लिहुन "विनोदी ज्योतिष शास्त्रात" मोलाची भर घातली होती. त्यांच्या स्मृतीला वंदन करून आज आम्ही काही नव्या ग्रहयोगांची नव्हे, तर नव्या ग्रहांची भर घालणार आहोत. या ग्रहांचा ज्योतिष शास्त्राशी किंवा खगोल शास्त्राशी काहीही संबंध नाही हे आधीच उघड केलेले बरे, म्हणजे वाचकांचा भलताच ग्रह होणार नाही. अंतरिक्षातील गोष्टींच्या वेधातून नव्हे, तर अवतीभवती चाललेल्या घटनांच्या निरीक्षणातून ह्या ग्रहांचा शोध लागलेला आहे. तर आम्ही शोधुन काढलेल्या काही नव्या ग्रहांचा हा थोडक्यात परिचय-

१. राहु(ल) - प्राचीन काळी या ग्रहाचे नाव "राहू" असे होते. कालमानाप्रमाणे बदलत जाऊन तो आता 'राहुल' या नावाने ओळखला जातो. "राहू" हा ग्रह भयंकर अनिष्ट आणि घातक म्हणून ओळखला जाई. आजच्या युगातला 'राहुल' हा सकृतदर्शनी एक निरागस भोळा-भाबडा ग्रह आहे. पण आतुन तो तितकाच घातक आहे. किंबहुना त्याच्या भोळेपणामुळेच तो जास्त घातक ठरतो. हे बऱ्याच लोकांच्या ध्यानात येत नाही. त्यामुळे ते स्वतः या ग्रहाच्या वाटेला जातात आणि स्वतःची वाट लावुन घेतात.
या ग्रहाच्या अंमलाखाली असलेले लोक पटकन ओळखता येतात. सामान्यतः ते 'पप्पू' या प्रातिनिधिक नावाने ओळखले जातात. एखादा साधा प्रश्न तुम्ही जर त्यांना विचारला, तर आधी त्यांना तो प्रश्न कळत नाही, आणि मग त्यांनी दिलेले उत्तर तुम्हाला कळत नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर विचारलं की, "भारतातील गरीबी कमी करण्यासाठी काय करायला हवं?" तर ते म्हणतील "गरीबी ही एक मनाची अवस्था आहे.." तुम्ही निरुत्तर! तुम्ही जर विचारलं की, "महागाई कशी कमी करता येईल?" तर ते सांगतील की त्यासाठी "स्त्रियांच्या सशक्तीकरणाची गरज आहे.." तुम्ही पुन्हा निरुत्तर! अशा तऱ्हेने जर तुम्ही जर चर्चा सुरु ठेवली तर थोड्याच वेळात तुम्ही पूर्णपणे चक्रावून जाल.
या ग्रहाचे अजून एक लक्षण म्हणजे समजूतीत असणारा आणि बोलताना होणारा गोंधळ. कोणी जर यांना सांगितले की "मला दोन मुले आहेत", तर त्यावर हे विचारतील की, "म्हणजे तुमचे लग्न झाले आहे का?". ऐश्वर्या राय ही सत्यजित राय यांची कन्या आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. एक्सेल ही एक मोठी परदेशी कंपनी असून मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि सर्फ एक्सेल ही त्यांची प्रसिद्ध उत्पादने आहेत असे त्यांना कोणीतरी सांगितलेले असते. विमानात कारसारखेच सीट बेल्ट असतात, पण एअरब्यागज् का नसतात असा त्यांना नेहमी प्रश्न पडतो. एखाद्या ऐतिहासिक गोष्टीवर चर्चा करताना "शिवाजी आणि संभाजी या भावांनी पानिपतच्या लढाईत अकबराचा पराभव केला होता" असे ते खुश्शाल ठोकुन देतात. बटाट्यांपासून सोने बनवणे, कांद्यापासून चांदी बनवणे आणि टोमॅटोपासून हिरे बनवणे अशा त्यांच्या महत्वाकांक्षा असतात. राफेलचे ऑफसेट काँट्रॅक्ट हे काय प्रकरण आहे, याची चौकशी करायला या लोकांपैकी एकजण नाक्यावरच्या 'शांतादुर्गा ऑफसेट प्रिंटींग प्रेस'मध्ये गेला होता असे कळते.
एखाद्या गोष्टीबद्दल कसलीही माहीती नसली तरी त्यावर उगाच टीका करणे, सरकारी योजनांबद्दल खोटा अपप्रचार करणे, प्रसिद्धीसाठी उगाच कधीतरी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जेवायला जाणे किंवा बँकेच्या रांगेत उभे राहणे अशा प्रकारच्या गोष्टी ही माणसे नेहमी करत असतात. पण त्यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळायच्या ऐवजी लोकांकडून करमणूकीबद्दल धन्यवादच जास्त मिळतात. एकूणच या ग्रहाचे "करमणूक मूल्य" प्रचंड मोठे असते. (या लोकांच्या भाषणावर 'करमणूक कर' लादल्यास भारताला 'जीएसटी'ची गरज नाही असे एका अर्थतज्ञाने सुचवले होते.)
या लोकांचे विवाहस्थान नेहमी दूषित असते. त्यात यांच्या माता-भगिनी "बहुमत दो" असा प्रचार करीत असतात, पण लोकांना ते "बहू मत दो" असे वाटते.. त्यामुळे ना मत मिळते, ना "बहू". कधीकधी मात्र हा ग्रह वक्री जातो आणि त्याला थोडीफार उपरती होते. मग हे लोक कधी सगळे सोडून परदेशी निघून जातात, कधी पबमध्ये जाऊन धडकतात, कधी जानवे घालून शंकराच्या मंदिरात जाऊन धडकतात, तर कधी म्हणतात की आता 'गीते'चा अभ्यास करायचा आहे. (या ग्रहाच्या अंमलाखालील एका माणसाने एकदा गीतेचे पुस्तक उघडले होते, पण त्यातला पहिलाच श्लोक "संजय उवाच" पाहून ते पटकन बंद केले अशी एक वदंता आहे. असो.)
पण ती उपरती फार काळ टिकत नाही आणि हा ग्रह लवकरच मार्गी येतो. आणि मग पुन्हा ती करमणूक सुरू होते..

-श्रीराम बर्वे

(क्रमशः)

Group content visibility: 
Use group defaults

राहू(न)... राहू(ल) असे वाटते की भारताच्या राजकारणाशी ह्या ग्रहाचा गूढ संबंध आहे. Wink

जसे ब्रिटीशांना आपण हाकलले तसे ह्या दूषित ग्रहमंडळीना देखील देशाच्या कुंडली तुन हाकलन्याची वेळ आली आहे.

एप्रिल-मे मध्ये एक होम आयोजित केला आहे, सर्वांनी मिळून ह्या ग्रहाची चला त्यात आहुती देऊ यात.

काय म्हणणे सर्वांचे?