मनमोकळं-१

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काही काही माणसं बघताक्षणीच आपल्याला अवडत नाहीत. ती माझ्यासाठी तशापैकीच एक होती.
तसा खरंतर आमचा काहीच संबंध नव्हता. आमच्या कंपनीच्याच कमर्शियल कॅंपसमधे इतर काही छोट्या
कंपन्या आहेत. तिथल्याच एखाद्या कंपनीत असावी ती. बहुधा रेडीमेड ड्रेस तयार करणार्‍या एखाद्या कंपनीत.
एकूण लूक भारतीयच असायचा. खरंतर त्या लुकमधे बायका अगदी गोड दिसतात.
सैल वेणी, साडी किंवा पंजाबी ड्रेस, मोठी टिकली, बांगड्या आणि पिवळ्या सोन्याचे मोजके दागिने, कधीमधी गजरे.
पण भारतीय वेषातही अगदी भडक रहायची ती.
मोठ्या गडद फुलांचे पंजाबी ड्रेस हे एक वेळ ठीक आहे. पण त्यावर मॅचिंग तशाच गडद रंगाचे दागिने.
अगदी केशरी ड्रेस असेल तर केशरी कानातली, बांगड्या. शिवाय एकदम फ्लॅशी चपला.
आणि वेषभूषाही एकवेळ चालून जाते जर वागण्यात गोडवा असेल तर. पण तोही मिसिंगच होता.
एकूणच तिची पर्सनॅलिटी अंगावर येणारी होती. जेवणानंतर आम्ही राऊंड घेताना ती तिच्या ग्रूपमधे नेहमी दिसायची.
मी तिला कायम कपडे, कॉस्मेटिक्स, गॉसिपिंग, आपल्याला न परवडणार्‍या पण हव्या असणार्‍या गोष्टी स्वस्तात कुठे मिळतील
इत्यादी विषयांवर मोठ्या आवाजात चर्चा करतानाच पाहिलं होतं.
आता खरंतर इतक्या बारकाईने मी तिचं निरीक्षण करत असेन हे मला जाणवण्याइतकीही ती माझ्या खिजगणतीत नव्हती.
अशी बरीच माणसं आपण नोट करतो येताजाता. त्यांच्याशी कधी बोलायचीही वेळ येत नाही. पण त्यादिवशी आली.
आमच्या इथे हायवेच्या कॉर्नरवरून रिक्शा पकडून जाणं हे एक दिव्य असतं. त्यामुळे बरेच लोक रिक्शा शेअर करतात.
मला तो प्रकार फारसा आवडत नाही म्हणून मी हातात वेळ ठेवून निघायचे आणि स्वतंत्र रिक्शाची वाट पहायचे.
एकदा मी रिक्शात बसले तेवढ्यात ती घाईने आली आणि रिक्शात डोकावून विचारायला लागली " अमूक अमूक आर्केड? "
मी म्हटलं सॉरी. आणि रिक्शावाल्याला जायला सांगितलं. " प्लीज माझा लेटमार्क होईल. अर्ध्या दिवसाची रजा लागेल. "
वाक्यात आर्जव होते पण आवाजात नव्हते. पण अगदी मला रिक्शात अनोळखी लोकांबरोबर बसायला आवडत नाही या कारणासाठी कुणाचा अर्ध्या दिवसाचा पगार बुडावा इतकी मी दुष्ट नव्हते.
मी नाईलाजानं तिला आत बसायची खूण केली. तिनं लगेच आभार मानून मोठ्या आवाजात पुढचं बोलायला सुरू केलंही.
आपण जसे आहोत त्याबद्दल एक प्रकारची लाज वाटणारी आणि आपण दिसतोय त्यापेक्षा बरे आहोत हे दाखवायचा सतत प्रयत्न करत रहाणारी माणसं असतात तशी ती बोलत होती. " काल रात्री सिडी आणली होती ना त्या मूव्हीची. "
मोठ्या अभिमानानं तिनं कुठल्यातरी नवीन शारुखपटाचं नाव घेतलं. " मग सगळाच उशीर झाला. "
एकतर मी रिक्शात बसल्याक्षणी ठणाठणा गाणं गळत असलेला तो एफेमचा नळ बंद करायला लावला होता.
पण आता या बोलण्यापुढं इलाज नव्हता.
" मी बघते तुम्हाला नेहमी. तुम्ही या कंपनीत आहात ना? " ती आदरानं म्हणाली.
" मूळ मुंबईच्याच का? " आता मी वैतागले होते. माझी उत्तरं एकाक्षरी होती याचं तिला काही नव्हतं.
एकदा नाईलाजानं सहन करायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी खुपायला लागतात. त्यातून हिच्याकडं त्या भरपूर होत्याच.
तो भांगेत भरलेला गडद सिंदूर, लाल(?) लिप्स्टिक, बारीक कोरलेल्या भुवया आणि सगळ्यात जास्त म्हणजे बोलत असताना सतत चेहर्‍यावर पसरलेलं एक अघळपघळ हसू. कधी एकदा ऑफिस येतंय असं होऊन गेलं मला. तेवढ्यात तिनं पर्स उघडली आणि आतून एक चीप स्टोन्सचा नेकलेस सेट बाहेर काढून समोर धरला. म्हणाली " कसाय? "
आता काय बोलणार? " चांगला आहे. "
" फक्त सत्तर रुपये. हवाय? " मी मानेनंच नको म्हटलं.
" मी हा साईड बिझनेस करते. तेवढीच भर. मुंबईत किती पैसा लागतो बाहेरच्यांना कधी समजतच नाही. खड्यांचे सेट, सेंटच्या बाटल्या, लिप्स्टिक्स. खूप व्हरायटी आहे. आज उशीर झाला म्हणूण आणला नाहीये माल. उद्या दाखवेन. "
आता मात्र निकराचा प्रतिकार करायची वेळ आली होती. मी तिला हे फारसं वापरत नसल्याचं आणि नुकतीच माझी
खरेदी झाली असल्याचं सांगितलं.
" कुठं घेता तुम्ही कॉस्मेटीक्स? घाटकोपरला? "
" नाही. बहुतेकदा मी बाहेरून आणते अमेरिकेला गेले की नाहीतर शॉपर्स स्टॉपमधे. " ती एकदम गप्प झाली.
खरंतर नाहीच्या पुढचं वाक्य टाळू शकले असते. पण ते मी शो ऑफसाठी म्हटलं नव्हतं. उद्या लंच टाईमला तिनं व्हिटीच्या फूटपाथवरच्या विक्रेत्यासारखी तिची पोतडी उघडलेली मला नको होती.
एखाद मिनिटात नॉर्मल होऊन ती पुन्हा ध्रुपदावर आली. पर्समधून मोबाईल काढला. त्यावेळी मोबाईल्स फारसे कॉमन नव्हते. आणि इनकमिंगला पण पैसे पडायचे. एकूण खर्चिकच प्रकार होता तो तेंव्हा. मी बघत राहिले.
" तुमच्याकडं कुठलं मॉडेल आहे? " तिनं विचारलं.
" नाहीये माझ्याकडे. " खरंतर परवाच वाढदिवसाला ' त्या ' ने गिफ्ट दिला होता.
पण ते पिल्लू संभाळायला नको म्हणून मी अजून त्यात कार्ड वगैरे पण टाकलं नव्हतं.
मी विचार करत होते. ही कुठल्यातरी झोपडपट्टीत किंवा फारतर एखाद्या जुन्या चाळीत रहाणारी, साधारण दहावीपर्यंत शिकलेली, लोअर मिडलक्लासमधली आणि तसल्याच एखाद्या कंपनीत काम करणारी बाई. आत्ता जगायला किती पैसा लागतो हे बोलत होती. आणि मोबाईल! किती हौस असते माणसाला? अगदी ऋण काढून सण म्हणतात तसा मोबाईल घेतला असणार तिनं. काय गरज आहे नाहीतर मोबाईलची?
एव्हाना ऑफिस आलं होतं. मी रिक्शावाल्याला पैसे दिले. तिने बरोबर अर्धे पुढे केले. मी म्हटलं " असू दे. "
" का? " तिनं विचारलं. मी मुकाट्यानं पैसे घेतले.
लंचमधे फिरताना मी मैत्रिणीना ही गोष्ट सांगितली. आता ती दिसली की मैत्रिणी ती बघ तुझी मोबाईलवाली मैत्रीण
म्हणायच्या. ती पण न चुकता मोठ्ठे स्माईल द्यायची.
पुढच्याच आठवड्यात लंचब्रेक मधे ती परत दिसली. फोनवर बोलत होती. आम्ही मैत्रिणींनी एकमेकींकडं पाहिलं.
तिचं मात्र लक्ष नव्हतं. खूप घाईनं ती निघाली होती. पास होताना तिचं बोलणं ऐकू आलं. अगदी अजिजीनं म्हणत होती.
" हो हो वैनी. मी निघालीच आहे. थोडा वेळ बघा ना त्याच्याकडं. मी येतेच. एक तासात पोचते.
त्याला द्या फोन जरा. राज बेटा, आलेच हं मी. आपण लगेच डॉक्टरकडं जाऊ. तू लग्गेच बरा होणार.
अरे दुखणारच ना थोडं बेटा. हो हो. पांघरूण घे अजून एक. " आवाजातलं टेन्शन लपवत मार्दव आणत ती बोलत होती
तिचे नाही पण माझे डोळे पाण्यानं भरले होते. तिच्याइतकी मोबाईलची गरज कुणाला होती?

विषय: 
प्रकार: 

गोष्ट वाचताना मलाही ही स्त्री खुपायला लागली होती, पण शेवट वाचताना एकदम खाडकन चित्रच बदलल! खूप सुरेख. आणि बाकी वेळी स्त्री कशीही असली तरी आईपणा निभवायला लागली की वेगळीच होते, नाही?

खूप छान लिहिलयस गं .. अजुन भरपूर लिही..

मित्रा मस्तच लिहिलयस, अगदी मनमोकळं.
छोटे प्रसंग खुलवायची छान हातोटी आहे तुझ्यात, लिहित रहा.

कधी कधी आपल फर्स्ट इम्प्रेशन चुकीच असत ते अस. Happy
चांगल लिहिल आहे.
मलाही त्या बाईचा राग येत होता हळु हळु पण नंतर एकदम तिच्याविषयी सहानुभुती वाटली

facevalue! किती जोखतो आणि किती जपतो! आतलं माणूस वेगळच नाही?
मित्रा, कसे बारकावे टिपलेयस.
**एकदा नाईलाजानं सहन करायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी खुपायला लागत****
***आपण जसे आहोत त्याबद्दल एक प्रकारची लाज वाटणारी आणि आपण दिसतोय त्यापेक्षा बरे आहोत हे दाखवायचा सतत प्रयत्न करत रहाणारी माणसं असतात तशी ती बोलत होत****

निरिक्षण किती अचूक आणि चपखल शब्द. खूप लिही... मस्त लिहितेस!

मित्रा, किती अचूक निरिक्षण आणि किती छान उतरवलं आहेस.....!
बरेचदा असं होतं....... काही काही व्यक्ती उगाचंच आपल्याला नकोशा होतात. पण असा एखादा कंगोरा आपलं मत बदलवण्यास भाग पाडतो.
तुझं लिखाण नेहमीच भुरळ पाडतं गं..... !

छान आहे मनमोकळं,
पण अस होतं बरेचदा, माणसाना आपण टाळतो, आपल्याला आवडत नाहीत काही प्रकारची माणसं
पण असा एखादा प्रसंग आपली मतं बदलायला लावतो.

संघमित्रा, दोघींच्याही व्यक्तीरेखा छान उतरवल्या आहेस. तिच्या स्वभावातल्या भपक्याचा बाज आणि हिच्या स्वभावातला काहीसा 'स्नॉबीश' पणा.

तुम्ही आवडीने वाचताय आणि कळवताय हे खूप इन्स्पायरींग आहे. मी लिहीत राहीनच तुम्हीही लिहीत आणि वाचत रहा.

संघमित्रा,
बर्‍याच दिवसांनी माबोवर बघितलं.. मी काही कथा आणि लेख वाचले होते... मनकोलाज इ.(आठवणारा आणि आवडणारा...) आज पुन्हा जुन्या कथा बघून रंगीबेरंगीवर डोकावले. मनमोकळं वाचायला घेतलं... दाद ला मोदक... अचूक निरीक्षण... आणि शेवटची ओळ वाचून माझ्याही डोळ्यात धुकं दाटल्यासारखं वाटलं... सुंदर आणि सहज ओघवती शैली आहे. खूप आवडली मला... पुढचे भाग वाचून काढते पटापट!

-----------------------------------------------------------------------------
स्वप्नातल्या कळ्यांनो उअमलू नकाच केव्हा...
गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा

वर्णन खुपच छान....................
शेवट वाचताना टचकन..... डोळ्यात पाणी आलं.

किती अचूक निरिक्षण आणि ते मोजक्या शब्दात मांडण्याची कला तर खासच्..
आपण कित्येकदा असं लोकांना चुकीच्या साच्यात बसवतो नं..

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो माझ्या लेखांना रिजुवेनेट केल्याबद्दल. हे पहिलं मनमोकळं. आणि हे ही कबूल करून टाकते की हा असाच्या असा खरा अनुभव नाही. अशी माणसं आपल्याला भेटतात नेहमी आणि लग्गेच "आवडत नाहीत" च्या लिस्ट मधे जातात. मी विचार करायचे की ती माणसं कितीही इरिटेटिंग असली तरी त्यांच्या जवळच्यांसाठी ती छानच असणार. आणि विशिष्ट परिस्थितीत तीही खूप सुंदर आणि प्रेमळ होत असणार. म्हणून लिहीलं होतं. Happy

आई गं Sad

आपण नकळत किती लोकांना जज करत असतो. असं काही कळलं की लाज वाटते स्वतः ची.

माझ्या ऑ फीस मध्ये एक अशीच अघळ पघळ मुलगी आहे, आम्ही तिला राखी सावंत म्हणायचो. कालच कळलं वीडो आहे. ८ वर्षाचा मुलगा आहे, सगळं एकटीने सांभाळते. रडुच आलं.