साधना (प्रस्तावना)

Submitted by प्राचीन on 8 March, 2019 - 04:16

नमस्कार मंडळी.
माझ्या परिचयातील एका ज्येष्ठ व्यक्तीने केलेली काही टिपणे, त्यांच्या निधनानंतर माझ्या हाती देताना त्यांच्या पत्नीने खंत व्यक्त केली की, त्यांचा हा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचला असता तर बरे झाले असते. त्यांमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि नोंदी असे स्वरूप आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे येते. प्रस्तुत लेख हा त्या टिपणांचं संकलनात्मक रूप आहे, याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे त्यामधील मते वा उल्लेख माझे व्यक्तिगत व अभ्यासपूर्ण असे नसून केवळ उद्धृत केलेले आहेत.
मायबोली हे विचारांना व्यक्त करण्याचे योग्य व सुलभ माध्यम असल्याने केलेला हा एक प्रयत्न.
साधना
मनुष्य केवळ पशू नसून सर्व प्राणिमात्रांपेक्षा अधिक अशा, ईश्वरांशाचा धनी आहे.आत्म्यास त्याच्या मूळ स्थानाकडे- ईश्वराप्रति - नेण्याकरिता साधनेची गरज आहे.
समर्थ रामदास म्हणतात,
“नाना सुकृतांचे फळ। तो हा नरदेह केवळ।
त्याहिमध्ये भाग्य सफळ। तरीच सन्मार्ग लागे॥ “
(दासबोध, दशक २,समास ४)
शरीर व मन यांचा विकास घडवून आणण्यासाठीदेखील साधना उपयुक्त ठरते. थोडक्यात सांगावयाचे तर शरीर व मन यांचे व्यापार नियमबद्ध करण्याचे शिक्षण म्हणजे साधना होय.
साधनेचे अनेक मार्ग असले तरी सर्व मार्ग एकाच ध्येयाप्रत जातात. आपल्याला अनुकूल अशा मार्गाचे पुरेसे विवेचन करणारे ग्रंथ पाहून वा त्या मार्गातील जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल सुरू करावी. साधनेत प्रतिपादित विषयाला प्राचीन, प्रमाणभूत ग्रंथाचा आधार असावा. आपले जे ग्रंथ गुरुपरंपरेने पठणाद्वारे टिकून राहिले आहेत, त्यांचा परिचय प्रो.मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने करून दिलेला आहे (Sacred books of the East). केवळ भाविक दृष्टिकोनातून विचार न करता, विज्ञानाशी प्रामाणिक राहून वाचकांनी अशा ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.सनातनी वाटले तरी कोणत्याही आचार विचारांचा, अशास्त्रीय असल्याचे सिद्ध झाल्याखेरीज पूर्णपणे त्याग करू नये. कालबाह्य गोष्टी व आचार- विचार हे आपोआप काळाच्या प्रभावाने नष्ट होत असतात. पण कालप्रभावास पुरून उरलेल्या आचारधर्माचा कोणत्याही बाह्य प्रभावाकरिता त्याग करणे उचित नाही !
श्रीमद्भागवतातील एकादश स्कंधातील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास केलेला उपदेश –
“प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणा:।
समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात्॥
आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषत:।
यत् प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयो स: अनुविन्दते॥ “
अर्थ – साधारणपणे मनुष्यप्राणी विचक्षण असतो; परंपरागत चालत आलेल्या सिद्धान्ताबद्दल साशंक असतो. पण स्वत:च्याच प्रयत्नाने तो अशुभ व हानिकारक प्रसंगातून आपल्या स्वत:स निभावून नेतो.या कामी त्याच्या ठिकाणी असलेली परमात्म्याची अंशमात्र अशी सद्सद्विवेकबुद्धी त्यास मार्गदर्शन करते ; त्याची गुरू बनते व त्या बुद्धीकरवी अशा बिकट प्रसंगी तो आपले स्वत:चे अनुमान काढतो. ते अनुमान व त्यास मिळालेला प्रत्यक्ष अनुभव या दोन गोष्टींनी तो श्रेयस् प्राप्त करून घेतो.
साधनेची आवश्यकता
जीवनातील दु:ख, क्लेश, मानसिक अशांती यांचा अनुभव घेतल्यावर मानवी मन इहवादापलीकडे विचार करू लागते. “यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत:।“ (गीता ६.२२)
अखंड सुखाचा व शांतीचा लाभ करवून घेणे अवश्य ठरते व मन अंतर्मुख केल्यानेच हे साधते. शरीराव्यतिरिक्त मन व आत्मा यांची ओळख करून घेणे म्हणजेच अंतर्मुख होणे होय. ही प्रक्रिया म्हणजेच साधना. निज स्वरुपाचे ज्ञान करवून देण्याचे कार्य साधनेमुळे शक्य होते.हे ज्ञान झाले म्हणजे शरीराविषयीचे ममत्व नाहीसे होते; मनाची एकाग्रता वाढते - जी ऐहिक व्यवहारात उपयोगी पडते. ऐहिक कर्मात कौशल्य दाखवणे म्हणजे एक प्रकारची योगसाधनाच होय.
एकदा साधनेची आवश्यकता पटली की त्याकरिता वेळही काढला जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संसारात चरितार्थासाठी आपण जे कर्म करीत असतो, ते सगळे शेष कर्म नाहीसे करण्याचा एक प्रकार होय. जगातील सारे व्यवहार हे भूतकाळातून नाहीसे करणार्‍या व भविष्यकाळात नवीनपणे निर्माण करणार्‍या ऋणानुबंधांचे असतात. जीवात्म्याच्या अमरपंथाच्या यात्रेची शिदोरी म्हणजे साधना; तीच परलोकी कामास येते.ती ह्या जन्मी जेवढी विकसित झाली असेल,तेवढी पुढील जन्मी बरोबर येते. त्याबरोबरच शेष कर्मांचे गाठोडे कमी कमी होत जाते.
साधना करू लागताच साधकास हळुहळू नित्याच्या जीवनात नवीन अनुभव येऊ लागतात. आत्मविश्वास वाढतो, धैर्य उत्पन्न होते. कोणतीही आपत्ती तो धीरगंभीरपणे सहन करू शकतो; तसेच सुखाच्या प्रसंगी हुरळूनही जात नाही. त्याची ग्रहणशक्ती वाढते. मृत्यूचे भय वाटत नाही.परमात्म्याचा अंश असलेली, जीवात्म्यात वास करत असलेली विवेकबुद्धी त्याला अचूक मार्गदर्शन करत असते. कोणत्याही परिस्थितीत परमात्मा त्याची उपेक्षा करीत नाही. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ह्या प्रवासाला दीर्घ काळ लागत असला तरी साधनेमुळे तो कमी होऊ शकतो. ( क्रमश:)

Group content visibility: 
Use group defaults