साधना - १

Submitted by प्राचीन on 8 March, 2019 - 04:12

“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत:॥“ ( गीता - ७.३)
अर्थ - हजारांत एखादाच माझ्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतो व तशा प्रयत्न करणार्‍यांमध्ये एखाद्यालाच माझ्या स्वरुपाचं ज्ञान होतं.
इतर प्राण्यांच्यापेक्षा माणसाकडे तर्कबुद्धी असल्याने तो कार्यकारणसंबंधांची चिकित्सा करू शकतो. ही चिकित्सा सुरू झाली म्हणजे माणूस – हे दृश्य जगत्, सृष्टी, जलचर,भूचर, इ. कोणी निर्माण केले, तसेच ऐहिक व्यवहारातही कोणीतरी नियंता असला पाहिजे, असा विचार करू लागतो. अशी माणसे ज्या व जेथील समाजामधील असतात, त्या - त्या समाजाप्रमाणे काही प्रमेये तेथील मानवधर्माची प्रमुख अंगे बनत जातात.
आर्य म्हणून संबोधिल्या जाणार्‍या लोकांमधे असणार्‍या विचारवंतांनी म्हणजेच ऋषींनी ह्यावर अधिक विचार करुन ते तत्वज्ञानरूपाने ग्रथित केले. आद्य शंकराचार्यांनी वेदान्त सूत्रांवरील आपल्या भाष्यात संक्षिप्त रुपाने याच तत्वज्ञानाचा सारांश दिलेला आहे. तत्वमसि।, सोऽहम्।,आत्मानं विदधि। हे त्यांच्या महावाक्यांचे समानार्थी उद्गार. ही वचने म्हणजे अध्यात्माचे मूलभूत ज्ञान.
या सर्व दृश्य-अदृश्य विश्वाचा नियंता परमात्मा असून पिंड (जीव) हा त्याचा अंश आहे. मनुष्य हे परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे.या परमात्म तत्त्वाला ऋषी/ विचारवंतांनी ब्रह्म,कैवल्य,निर्वाण, cosmic consciousness, infinite spirit इ. नावांनी संबोधिले आहे. असे हे परमतत्त्व सत्चिदानंदस्वरुपी, सदैव जाणिवेने पूर्ण व दिव्यानंदाने परिप्लुत असे आहे. परमतत्त्व ही ऊर्जा मानली, तर ती अवस्थित (potential) अशीही असते व कार्यान्वित (kinetic) शीदेखील असते. पहिल्या अवस्थेत ती सत् तर दुसर्‍या अवस्थेत चित् रूपी असते. जीवात्मा म्हणजे पंचमहाभूतात्मक देहामध्ये अंशीभूत रूपाने वास करीत असलेला परमात्मा. परमात्मा ही अत्युच्च ऊर्जा असली तर जीव ही त्याची एक शलाका आहे, स्पंदन आहे. ख्रिस्ताने त्यास परमपिता हे याच अर्थाने म्हटलेले आहे.परमेश्वराच्या मातृ - पितृ रूपाची मानवाला अधिक ओळख असल्याने त्याचे संकटकाळी सहज स्मरण होते. विशेषत: मृत्यूच्या वेळी ! कारण मृत्यूनंतर कुठे जायचे आहे, याचा तर्क करता येत नसल्याने त्याला अगतिकपणे ईश्वराचे स्मरण होते.
या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी परमतत्त्वाची स्पंदने पसरली व जो ध्वनि निर्माण झाला, तोच ॐ कार होय ! म्हणून परमात्म्याचा मुख्य वाचक शब्द ॐकार आहे.
“ॐ इति ब्रह्म । ॐ इति इदम् सर्वम्।“ ( तैत. उप. 1/8/1)
या गुणगुणण्यासारख्या शब्दातून स्फोटाद्वारे सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते बाहेर पडली. जशी उत्पत्ती तसेच विसर्जन या न्यायाने, अज्ञाताकडून आलेल्या आपल्या जीवाला परत अज्ञाताकडे जायचे आहे. हा जो विधिसंकेत आहे, तोच साधनेचे उद्दिष्ट होय. साधना म्हणजे बुद्धिपुरस्सर, शुद्ध जाणीव ठेवून हा परतीचा प्रवास करण्याची तयारी. हा प्रवास करीत असताना शेष कर्म नष्ट करणे, परमात्मस्वरूपाशी भक्तिभावपूर्वक तल्लीन होणे, अनासक्त बुदधीने कर्तव्ये करणे, इ.चा अंतर्भाव साधनेत होतो.
खालील प्रार्थनेत ह्या उद्दिष्टाचे व्यक्त स्वरूप आहे –
“असतो मा सद् गमय।तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा ऽमृतं गमय।“ ( बृहदारण्यकोपनिषद् 1/3/28)
अर्थ - असत् पासून मला सत् प्रति ने. अंधारातून प्रकाशाकडे ने; मृत्यूपासून अमरत्वाकडे ने.
सर्वसामान्य माणसाची प्रार्थनादेखील सुख,शांती, सुरक्षितता, आरोग्य याकरिताच असते.मात्र पूर्णत्वाकडे –ईश्वराकडे गेल्याशिवाय ही शाश्वतता मिळत नाही, त्यामुळे हे पूर्णत्व प्राप्त करणे हेच जीवाचे ध्येय ठरते.
ऋग्वेदामध्ये अशाच विचारांची द्योतक अशी एक प्रार्थना आहे –
“यत्र ज्योतिरजस्त्रं यस्मिंल्लोके स्वहितम्।
तस्मिन् मां धेहि पवमानामृते लोके अक्षिते॥
यत्रानंदाश्च मोदाश्च मुद: प्रमुद: आसते।
कामस्य यत्राप्ता: कामास्तत्र ममामृतं कृधि ।“ (ऋ. 9/113/7-11)
अर्थ - हे पावन करणार्‍या देवांनो, मला त्या लोकांमध्ये दिव्य स्वरूपात ठेवा की जेथे सदैव प्रकाशच प्रकाश भासमान आहे. जेथे अंधारातून प्रकाशाकडे गति नाही, तर एका प्रकाशातून पूर्णतर अशा प्रकाशाकडेच गति आहे; जेथे दु:खातून सुखाकडे गती नाही, तर एका आनंदातून पूर्णतर अशा आनंदाकडेच गती आहे. जेथे मृत्यूकडून अमरत्वाकडे गती नाही, तर सदैव अमरत्वच विद्यमान आहे, जेथे सर्वोच्च ध्येय सदैव प्राप्त झालेले आहे.
आणि हे सर्वोच्च ध्येय म्हणजे मोक्ष किंवा मुक्ति; कैवल्य, निर्वाण, अपरोक्षानुभूति; साक्षात्कार. हेच आध्यात्मिक जीवनाचे पर्यवसान. ह्यानेच श्रेयस् ची प्राप्ती होते. हे शोधायला साधना करायला हवी
भगवान बुद्धाने म्हटले आहे ,
“कोणत्याही माणसाने आपल्या अंतर्यामातून उठणार्‍या सत्प्रेरणेला तुच्छ समजू नये; आणि असे म्हणू नये की मला निर्वाणाची प्राप्ती होणार नाही. पाण्याचे लहान लहान थेंब पडूनच घडा भरला जातो. माणसाने थोडे थोडे पुण्य गोळा करीत गेले तरी तो तो शेवटी निर्वाणाप्रतच जातो.”
हा प्रवास जन्मोजन्मी सुरूच असतो. चरितार्थ व आत्मविकास यांमध्ये समतोल राखून जर कर्तव्यकर्म केले तर ती एक प्रकारची साधनाच होईल. सारांश, सर्व साधनांचे उद्दिष्ट म्हणजे दु:खाची, क्लेशाची कायमची निवृत्ती करणे व कालसापेक्ष अशा दिव्य आनंदाची प्राप्ती करून घेणे हे होय.
“यद्गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमं मम।“ (गीता 15/6) (क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख, मुद्देसूद मांडलं आहे.

अमरत्व आणि मोक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात, अमरत्व किंवा मोक्ष हे अंतिम ठिकाण नसून, ही एक अवस्था आहे, मनुष्य नाही तर मनुष्याचा आत्मा हे परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे, त्यामुळे मोक्ष मिळणे म्हणजेच त्या परमात्म्याचा भाग होणे आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे.

मोक्षप्राप्ती नियमित साधनेतून मिळते, पण मला भक्ती आणि साधना यातला फरक जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद चैतन्य.. तुमच्या नावातच चैतन्य असल्याने पुढील मालिकेत तुमचा उल्लेख अपरिहार्य आहे

तुमच्या नावातच चैतन्य असल्याने पुढील मालिकेत तुमचा उल्लेख अपरिहार्य आहे<<<
Proud

देव, परमात्मा, साधना, मोक्ष, थोतांड वगैरे वगैरे..
काही लोकांचं पोट भरण्यासाठीचं कायमस्वरूपी साधन म्हणजे साधनारूपी देखावा.

छान आहे लेख !
पुभाप्र Happy

भक्ती आणि साधना यांतला फरक जाणून घ्यायला आवडेल>>>
भक्ती हे साधनेचंच एक अंग म्हणता येईल ! ? Happy