परित्यक्ता (शत शब्द कथा)

Submitted by सेन्साय on 7 March, 2019 - 01:35

निवडणूक जवळ येऊ लागली तसे खंडाळा पंचक्रोशित विविध सामाजिक कार्यक्रमाचेही पडघम वाजू लागले. विरोधी पार्टीला शह देण्यासाठी संपतराव कसून कामाला लागलेले होते आणि ८ मार्चच्या दिवशी जिल्ह्यातील महिलाश्रमातील विवाहयोग्य अश्या सगळ्याजणींचा पार्टीतर्फे सामूहिक विवाह कार्यक्रम राबवला जाणार होता.

लग्न घटिका जवळ येवू लागली तशी पक्षीय जाहिरातबाजीला ऊत आला. साड़ी वाटप अन् टोप्या .... काहीकाही कसर शिल्लक ठेवली नाही. मांडवात सगळीकडे नात्याचा बाजार रंगला. सगळी तयारी पूर्ण झाली अन् लाउडस्पीकरवरील मंगलाष्टकाच्या आवाजालाही छेदत एक आरोळी मांडवात घुमली.

"मला हां नवरा मान्य नाही.
मी हे लग्न करणार नाही."

पार्टीच्या गुंडानीच नागवलेल्या स्त्रीने परित्यक्तेचे आवरण झिडकारत पुरुषांच्या समाजात आज ताठ मानेने एका पुरुषाला नाकारले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users