मला गवसलेले गीत-रामायण

Submitted by अमितव on 26 February, 2019 - 20:31

मला गवसलेले रामायण!

रामनवमीला ‘राम जन्माला ग सखी राम जन्माला’ हे दरवर्षी रेडिओवर ऐकलेलं गाणं ही बहुदा गीत रामायण या प्रकाराशी माझी झालेली पहिली ओळख. ते गाणं ऐकलं की चैत्रमासातले गंधयुक्त तरीही उष्ण वारे, आणि दोन प्रहरी क्षणभर थांबलेल्या सूर्याची लाही माझ्या अंतर्मनाला आजही जाणवते. खराखुरा राम त्रेता युगात जेव्हा जन्माला असेल तेव्हा नक्की काय झालं असेल याचं काय बहारदार वर्णन गदिमांनी केलंय! उष्णतेने कोमेजलेल्या... नाही नाही, ‘पेंगुळलेल्या’ कळ्यांना ही बातमी वाऱ्याने सांगितली आणि त्या ‘काय काय’ करत लाजत लगोलग पुन्हा उमलल्या, नगरजनांचे जथे गात नाचत चालू लागले, हर्षोल्हासात कोणी फुले, आभूषणे उधळली आणि सारा आसमंत वीणा(रव), कर्णे इतर वाद्यांच्या आवाजत आणि हास्य कल्लोळात बुडून गेला. आणि ही चराचर सृष्टी आनंदात बघून चैत्रात हक्काचं आनंदगान करणारी एक बिचारी कोकीळ मात्र आपला स्वर हरवून गोंधळलीच. हे चित्र आपल्या मनावरच इतकं कोरलं गेलंय की खऱ्याखुर्‍या दाशरथी रामालाही जरी यातलं काही कमी जास्त घडलं असेलच, तरी त्यावर विश्वास बसणार नाही.

वय वाढू लागलं तसं नंतर शाळेत किंवा गुरुपौर्णिमेला ग्रुप मध्ये बसवलेलं 'सेतू बांधा रे सागरी' आणि नंतर जोशात 'सियावर राम चंद्र की जय!' अशी केलेली वानर गर्जना किंवा 'नकोस नौके परत फिरू ग' मधलं 'जय गंगे जय भागिरथी जयजय राम दाशरथी' हा दिलेला कोरस, आणि मग त्यातल्या 'सेतू बंधने जोडून ओढा समीप लंका पुरी' अशा कळू लागलेल्या बारिक बारिक गमती!

सुरुवातीला कुशलव रामायण गाती, घे हे पायसदान, राम जन्माला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे, सूड घे त्याचा लंकापती आणि गा बाळांनो श्री रामायण यात रामायणाची सीमित असलेली गोष्ट, नंतर दरवर्षी रामनवमीला लागून असलेल्या वीकांताला धननदादा (धनंजय भोसेकर) संपूर्ण गीत रामायण डोंबिवलीत सादर करू लागला तेव्हा गदिमांनी लिहिलेली आणि सुधीर फडक्यांनी संगीत दिलेली ५६ च्या ५६ गाणी माहीतच नाही तर शेजारीच अहोरात्र चालणाऱ्या प्रॅक्टिसमुळे सगळ्या कडव्यांसकट हळूहळू तोंडपाठ झाली.

एका राजाच्या, त्यात त्रेतायुगात जन्मल्यामुळे सगळं अतीव गोडगोड असलेल्या रामाच्या अख्ख्या गोष्टीत राम सीतेचा त्याग करतो, फेक न्यूज मुळे ट्रोल झालेल्या सीतेचा त्याग करतो, हीच काय ती एकमेव क्लायमॅक्स घटना. बाकी वनवासात जा म्हटल्यावर वनवासात गेलेला, बायकोचे अपहरण झाल्यावरही कूल राहून शांतपणे सैन्य जमवून युद्ध केलेला, त्यातही चाक चिखलात गेलं की मार, नाम साधर्म्याचा फिशिंग अ‍ॅटॅक करुन मार (याचं पेटंट घ्यायला माशेलकरांना सांगा. महाभारतात पहिला फिशिंग अ‍ॅटॅक झाला म्हणावं Wink ), लाईट स्विच ऑफ करुन दोन चार जीव घे असलं काही म्हटल्या काही न करता युद्ध केलेल्या रामाच्या गोष्टीत काही नविन शोधायला, नवं इंटरप्रिटेशन करायला फारसा वाव नसावाच. पण गदिमांनी त्यातही प्रेमाच्या, त्यागाच्या, विरहाच्या आणि क्रोधाच्याही विविध छटा किती सहज दाखवल्या आहेत हे आज प्रकर्षाने जाणवतं.

दशरथ आणि कौसल्या यांच्यात कसं नातं असेल? त्यांना मुल होतं नाहीये म्हणून कौसल्या दु:ख्खी-कष्टी आहे तिच्या मनात 'मूर्त जन्मते पाषाणातुन, कौसल्या का हीन शिळेहुन' आणि 'गगन आम्हाहुन वृद्ध नाही का? त्यात जन्मती किती तारका' असे विचार येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर दशरथ 'उदास का तू? आवर वेडे, नयनातील पाणी. लाडके कौसल्ये राणी' असं म्हटल्यावर तो दशरथ हाडामासाचा होउनच येतो.

राम लक्ष्मणादी भावंडे जन्मल्यावर ती कशी वाढताहेत याचं आईच्या परीप्रेक्ष्यातून केलेलं वर्णन ही अपार सुंदर आहे. सावळा गं रामचंद्र, माझ्या हातांनी जेवतो' यात 'माझ्या' ला केलेला खालच्या स्वराचा स्पर्श आणि त्यातुन निर्माण होणारी आपले पणाची, नव्हे काहीश्या स्वामित्त्वाची भावना तर निव्वळ अप्रतीम.

हेच गदिमा क्रोधाने भरलेलीही गाणी लिहिताना मात्र अजिबात हात आखडता घेत नाहीत. 'वर ही नव्हे वचन नव्हे, कैकयीला राज्य हवे, विषयधुंद राजा तर तिजसी मानतो, असे जहरी बोल लक्ष्मण आपल्या आई वडिलांना लावतो. तर आपल्या आईने आपल्याला राज्य मिळावे म्हणून रामाला वनवासाला पाठवले समजल्यावर 'माता न तू वैरिणी' म्हणत 'शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छिसी वाढ' म्हणत 'निपुत्रिके तू मिरव लेवूनी वैधव्याचा साज' म्हणायला भरत कमी करत नाही. पण लगेचच या तृषार्थ खड्गाचा मला तुझ्यावर वार करायचा आहे पण 'श्रीरामाची माय परि तू कसा करू मी वार' ही वेदना ही बोलून दाखवतो. हाच क्रोध शूर्पणखेच्या तोंडी मात्र एकदम तिरकस बाणातून सुटतो. बंधू रावणाला त्याच्या सामर्थ्याची जाणिव करुन देताना रामाने काय काय केलंय आणि तू रामाशी का लढलं पाहिजेस, का सूड घेतला पाहिजेस सांगताना 'तुझ्याच राज्यी तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर. सचिवासंगे बैस येथ तू स्वस्थ जोडूनी कर' ..'सहस्र चौदा राक्षस मेले हे का तुज भूषण? ' अशा अगदी सोप्या ओळीतुन गदिमा कथा पुढे नेतात. यात सगळ्यात भावतं ते अर्थगर्भ आणि सहज समजणारं काव्य.

वरचं 'माता न तू वैरिणी' नंतर लगेचच येणार्‍या 'पराधीन आहे जगती' गाण्यातील ओळी एकदम शाळेत निबंधात घालण्याजोग्या. 'सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत', 'वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा', 'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ', 'काय शोक करिसी वेड्या स्वप्निच्या फळांचा' , 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा', 'अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात'. असलं काहीबाही निबंधात लिहिलं की त्या काळी दोन मार्क जास्त मिळायचे म्हणे!

राम-सीतेतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ते चिरकालिन विरह वर्णन करताना तर गदिमांची लेखणी थांबत नाही.
ज्या चरणांच्या लाभासाठी,
दडले होते धरणी पोटी
त्या चरणांचा विरह शेवटी
काय दिव्य हे मला सांगता!

म्हणणारी, आणि 'जाया-पती का दोन मानिता' म्हणणारी सीता, लगेच सत्य परिस्थितीच्या आकलनाने भरताचे 'दास्य का करु कारण नसता' हे ही सांगते. सुवर्णमृगाची शिकार करायला रामाला उद्युक्त करताना त्या मृगाच्या कातड्याची मी चोळी शिवेन आणि मग 'करितील कैकयी भरत आपुला हेवा' आणि साक्षात रामाला 'त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल' असं गाजर दाखवायला ही सीता कमी करत नाही. त्याच सीतेचे अपहरण झाल्यावर राम सैरभैर होऊन कदंबाला जरा पाय उंचावून ती नदी किनारी दिसत्येय का? अशोकाच्या पल्लव- शाखा कंपित झाल्यावर त्याला काही अशुभ स्वप्न तर पडले न्हवते ना? असं विचारतो. आणि शेवटी अगदीच हताश होऊन
'घातावर आघात आपदा
निष्प्रभ अवघी शौर्य संपदा'
म्हणतो.
पण सीतेचा शोध अखंड चालू ठेवत फुलांच्या सुगंधाने 'ही तिच्या वेणी तिल फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले' लगेच ओळखतो.

तिकडे अपहरण झालेल्या सीतेची अवस्था तर आणखी बिकट झालेली. कधी एकदा राम रावणाचा वध करतील ही मनोमन इच्छा, पण अंतर्मनात वेगळेच द्वंद्व.
का विपत्काली ये मोह तयांच्या चित्ती
पुसटली नाही ना सितेवरची प्रीती!

या सगळ्यावर पतीपत्नीतील नात्यांचा कहर म्हणजे 'लीनते चारुते सीते' हे गाणं. हे प्रत्येकवेळी ऐकलं की आजीच्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा, हीच माझी या गाण्याची पहिली आठवण. त्याची शांत, एकेक शब्द आळवीत लावलेली अर्थगर्भी चाल आणि तितकेच आर्जवी शब्द.
हे तुझ्या मुळे गे झाले
तुजसाठी नाही केले
मी कलंक माझे धुतले
आणि
जी रूग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्याते कैसा
मनि संशय अपघाताचा ... मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते
!!! काय सामर्थ्य आहे शब्दांचे.

आणखी एक आवडतं गाणं सांगतो आणि मग थांबतो. रामायणातील विविध प्रसंगात एक घटना घडलेली असते आणि त्यावर गदिमा आपल्या शब्द सामर्थ्याने गीत रचतात. पण युद्धभूमी वर चालू असलेल्या संहाराचे गाणे आणि त्याला बाबूजीनी दिलेली चाल आणि दोन कडवी जोडणारे मधले संगीत संयोजकाचे पीसेस.
नाचत थय थय खिंकाळती हय
गजगर्जित करी नाद समन्वय
भीषणता ती जणू नादमय...
युद्ध काल पण गदिमांनी पोएट फ्रेंडली करुन टाकलाय.
किंवा
हाणा मारा ठोका तोडा
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषिकांचे
म्हणतानाच 'मरणाहुन ही शौर्य भयंकर' हे सांगायला गदिमा विसरत नाहीत.

कुश- लव रामायण गाती म्हणून सुरु केलेल्या गीत रामायणाचा शेवट 'गा बाळांनो श्री रामायणाने' करुन गदिमा एक वर्तुळ पूर्ण करतात. ह्या भैरवीतुन वाल्मिकींचा तोंडून गाणं कसं गा, काय करु नका, काय तत्व पाळा हे फार रसाळ पणे सांगतात.

गीत रामायण कसं घडलं, त्याचे शब्द, लावलेल्या चाली, मूळ आकाशवाणीवर खुद्द लता मंगेशकर, माणिक वर्मां आदींनी लगोलग त्याला दिलेले स्वर हे मी फक्त पुस्तकात वाचलं आहे. नाही म्हणायला मूळ गाणी आजोबांनी त्याकाळी रेकोर्ड करून ठवलेली ऐकली आहेत. पण ह्या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टीहुनही गीत रामायण मला जवळचं वाटायचं नक्की कारण त्या गाण्यांतून लहानपणीचे आठवणारे दिवस, घरी पेटीवर बडवलेल्या काही ओळी असं काही असावं?का...
सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी
यज्ञमंडपी आल्या उतरुनी

.. असं काही काव्यात्म असावं कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम सुंदर लिहिलंय !

स्वयंवर झाले सीतेचे, पराधिन आहे जगती, कुशलव रामायण गाती अशी ठराविकच गाणी माझी पुन्हापुन्हा ऐकली जातात पण कोणतंही गाणं ऐकलं तरी गदिमांची प्रतिभा, त्यांना आधुनिक वाल्मिकी का म्हणतात हे सर्व नीटच कळतं. सुधीर फडके हे अजून एक संगीतातील आश्चर्य.

गीतरामायणाचा पंखा नसलो तरी लेख मात्र आवडला.

लाईट स्विच ऑफ करुन दोन चार जीव घे >>> Rofl अवकाशाच्या मेघडंबरीतील सूर्याला लाईटचा शीरा देणार्‍या तुझ्या प्रतिभेला सलाम असे दवणेकाका म्हणतील. Wink

खुप सुरेख लिहिलय. कॅसेटचे कित्येक सेट खराब केले त्यावेळी. कॅसेट्सची एमपी3 करता यायला लागली तेंव्हा प्रथम गीत रामायणाची केली होती. जुन्या आठवणी जागवल्या अगदी.

रेणुकास्वरूप शाळेतले बाबूजींचे , पेटी मांडीवर घेतलेली , बाह्या दंडा पर्यंत दुमडून सरसावलेल्या , जोश - आनंद - दु:ख - प्रेम - भक्ती-विरह .. आदी नवरसांच्या जाणीवेची अनुभूती करून देणारा स्निग्ध शब्द- स्वर...आणि भारून गेलेले श्रोते आणि आसमंत...हीच प्रतिमा उभीआहे मनात आजही !

अमित तुमचं आयुश्य गदिमा-बाबूजींच्या रामरंगात रंगून गेलेय . त्याचे असे जादूइ कवडसे आम्हा वाचकांच्या मनांवर टाकून हरखून सोडलेत !

अमित सुरेख लिहिले आहेस,
नेहमीच्या क्लिशे गोष्टी टाळल्यास त्यामुळे अगदी fresh वाटते आहे.

संपूर्ण लेख वाचून मी माझ्याच मनातलं वाचतेय की काय असं झालं!! शाळेत असताना मला गीतरामायणाचं वेड लागलं होतं. कुठल्याही गाण्याच्या स्पर्धेत गीतरामयणाचीच गाणी पाठ करून म्हणणं, प्रत्यक्ष सुधीर फडक्यांना पत्र लिहिणं, त्यांचा गीतरामायणाचा लाईव्ह कार्यक्रम बघायला जाणं वगैरे. राम हा माझा "आवडता देव" होता तेव्हा Happy
आता जेंव्हा ती गाणी ऐकते तेव्हा त्यातलं सौंदर्य फार प्रकर्षाने जाणवतं. शब्द, चाली, आवाज. सगळंच सुंदर!

एकदम शाळेच्या दिवसात घेऊन गेला लेख. आमच्या शाळेत शाळा सुरु व्हायच्या आधी आणि मधली सुट्टी संपायच्या आधी पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टम वर मराठी गाण्यांची रेकॉर्ड लावत असत. शाळेच्या जवळ येतायेता गाणं ऐकू आलं की पावलं आपोआप पटापट पळायची. अनेक मुलांना अनेक वर्षे गीत रामायणातील गाण्याच्या आधीचे निवेदन शाळेचे मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक सांगतात असे वाटत असे.

सुधीर फडक्यांच्या आवाजातच ऐकली आहेत ही गाणी कायम. त्यांचे उच्चार म्हणजे सुस्पष्ट आणि शुद्ध उच्च्चारांचे गोल्ड स्टँडर्ड.

९० च्या दशकात त्यांचा एक कार्यक्रम न्यू जर्सी मधे झाला होता. उगा का काळीज माझे उले गाणे ऐकल्यावर मुंबैकर पण अमराठी मित्र मैत्रिणींचे पण डोळे पाणावले होते.

गदिमांचे शब्दांवरचे प्रभुत्व अगदी प्रत्येक गाण्यातून दिसते. रोजच्या वापरात प्रचलित नसलेले कित्येक शब्द त्यांनी सहज आणि चपखल वापरलेत.

वा! मस्त लिहिलं आहेस, अमित. फारच भावलं. गीत-रामायणाशी लहानपणीच्या इतक्या आठवणी जोडलेल्या आहेत. माझी आई फार आवडीनं ऐकायची आणि गुणगुणायची यातली गाणी. मी पण बरेचदा वीकेंडला सकाळीच गीत-रामायण लावून ठेवते.

सुंदर लिहिलंय.
यंदाच्या एका दिवाळी अंकात गीतरामायणाच्या आठवणींचा ओव्हरडोस झाल्यावरही हा लेख आवडला.
मध्येच मॉडर्न लँग्वेजचा ट्विस्ट मजेशीर वाटला.

गीतरामायणाचा पंखा नसलो तरी लेख मात्र आवडला.
सुंदर लिहिलंय.
मध्येच मॉडर्न लँग्वेजचा ट्विस्ट मजेशीर वाटला. +१

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. Happy
गीत रामायणाबद्दल अनेकांनी लिहून ठेवलं आहे, ते कसं लिहिलं, आयत्यावेळी संगीत कसं दिलं हे सगळं रोचक आहेच, पण त्या निर्मिती प्रक्रियेशी प्रत्यक्ष काहीही संबंध नसताना ही ते आपलं वाटण्याचं महत्त्वाचं कारण त्याची उच्च निर्मितीमूल्ये हे जितकं आहे तितकंच, कदाचित काकणभर जास्तच त्याच्याशी निगडीत आठवणी आहेत असं मला प्रकर्षाने जाणवतं.

मराठी दिनानिमित्त संयोजक मंडळाने विचारलं आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी रामाला जागून लेख वेळेत पूर्ण झाला. सिम्बाने विचारलं नसतं तर उपक्रम जाहीत झाल्यावर यावर 'लिहिलं पाहिजे' असा उत्साही विचार करून आळसात काही ना काही सबब शोधून मी लेख पूर्ण केला नसता याची मला खात्री आहे.
लेख लिहिण्याच्या प्रक्रियेत मला पूर्वीचे दिवस आठवले, परत एकदा सगळी गाणी वाचून मध्येच एखाद्या कडव्याची चाल गुणगुणताना बरोबर न वाटल्याने मधून मधून परत ऐकून मजा आली. लेख जसा झालाय तसा झालाय पण लिहिताना मला मजा आली त्याबद्दल संयोजकांचे आभार.

अरे किती सुंदर लिहिलं आहेस! हा धागा का बरं नाही वाचला गेला आधी? वरती काढल्याबद्दल आभार, हर्पेन.

पुन्हा वाचतानाही आवडला लेख, अमित.
आपण मध्यंतरी आठवण काढलेलं लताने गायलेलं 'मज सांग लक्ष्मणा' ऐकते पुन्हा आता या निमित्ताने. Happy

ही गाणी ऐकतांना गदिमांची शब्दसंपदा किती विपुल होती हे जाणवतं.
उदाहरणार्थ 'गिळी तमिस्त्रा जेथे वरुणा' किंवा 'सोड झणि कार्मुका, सोड रे सायका' यांतले ठळक शब्द या गीतांमुळे समजले मला.

मी बऱ्याचदा मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे आणि या इथे लक्ष्मणा बांध कुटी यांची चाल अदलाबदल करतो. थोडी ओढाताण होते, पण आपली चाल सदैव तिरकी - उंटासारखी.

किती सुंदर लिहिलंय!
लहानपणी गाण्यांचा नीट अर्थ न कळता मोठमोठ्याने गाणी गात बसायचो. राम नवमीच्या आधी काही दिवस रोज रेडीओवर गाणी लागत असत. घरी कॅसेट असल्या तरीही ती गाणी वेळ लक्षात ठेवून रेडिओवरच ऐकायचो.

वा, मस्त लिहिलयस. मी मिसलेलं.
मीही प्रथम ऐकताना बरीच लहान होते. अन नंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्यात ऐकलं. त्या मुळे अनेक ठिकाणी रिलेट होत गेलं तुझं लिखाण. थँक्यु
गीतरामायण फार आवडतं. काव्य, संगीत, गाणारे सगळे कलाकार, वादक, तो माहौल, सगळच जुळून आलेलं अद्भूत आहे. आणि ते ज्या वेगात, (आवेगात खरं तर) केलं गेलं, हॅटस ऑफ टु देम ___/\___

Pages