फ्रेंच फ्राईज - शस्त्रिबुवांचे बासरीवादन -एक

Submitted by मकरंद गोडबोले on 19 February, 2019 - 10:17

एक मोठा स्फोट झाला, आणि शास्त्रिबुवा ताड्कन उठून बसले. फ्रेंच फ्राईजमधे रहायला आल्यापासून शास्त्रिबुवांना अशीच जाग यायची. एक मोठा स्फोट व्हायचा, आणि शास्त्रिबुवा ताड्कन जागे व्हायचे. आणि मग जोरात कर्कश्श किंचाळ्या येत रहायच्या. काही सेकंदात ते बंद व्हायचे. मग शास्त्रिबुवा दात घासायला लागायचे. आणि दात घासून ते कमोडवर टेकले रे टेकले, की परत तो मोठा स्फोट व्हायचा. बसलेले बुवा घाबरून उठायचे, मग परत त्या कर्कश्श किंचाळ्या. त्या ऐकत ऐकत शास्त्रिबुवा परत टेकले, की अचानक तो आवाज बंद व्हायचा. हे असे आपल्याशी कोण का खेळतोय, हे त्यांना काही कळत नव्हते. एकदा त्यांनी तो स्फोट झाल्यावर, ताड्कन, थेट दारापाशी स्प्रिंट मारली, आणि दाणकन दार उघडले. तर समोर कुणीच दिसेना. असे चारपाचवेळा तरी झाले. मग एकदा त्यांळनी तिथेच ठाण मांडले, आणि वाट बघू लागले. तरी काही नाही. थोड्यावेळानी वाॅचमन, टेरेसवरून, सोलरची कळ चालू करून डुलत डुलत खाली आला. रोज रात्री तो सोलरची कळ बंद करायचा, आणि सकाळी चालू करायचा. रात्री ती बंद का करायची, हा वेगळा मुद्दा, ती वेगळी गोष्ट आहे. मग त्यानी वाॅचमनला विचारले, की रोज सकाळी हा स्फोट का करतोस म्हणून. त्यानी घाबरून हात पुढे करून, मळलेली तंबाखू दाखवली. मी फक्त एवढीच खातो म्हणला. त्याला ते स्फोटाचे काही ठाऊक नाही म्हणाला. त्यांनाही ते पटले. वाॅचमन काही स्फोट करणार नाही. तो एकवेळ तंबाखू खाईल, पण तो स्फोट कशाला करेल. या विचारात, त्यांना आपल्या हातात आपोआप, पिशवी कशी आली, हे त्यांना कळेना. तर ती पिशवी वहिनिंनी, दूध आणायला दिली आहे, हे वाॅचमननी सांगितले. मग त्यांनी खाली जायला, उदवाहकाची कळ दाबली. आणि त्याचे दार उघडल्यावर परत तस्साच स्फोट झाला. आणि तो कर्कश्श आवाजसुद्धा.
हे आपल्या फ्रेंच फ्राईजच्या लिफ्टमधे, सतत वाजणारे संगीत हे त्यांना आता कळले. पहाट असल्यामुळे तो आवाज जरा जास्तच जोरात येत होता. दार उघडल्यावर अचानक ते मोठे संगीत स्फोटासारखे उदवाहकाच्या दारातून तणतणत बाहेर पडायचे, आणि शास्त्रिबुवांच्या नाजूक कानाच्या पडद्यावर आदळायचे. पहिला आवाज वाॅचमन सोलर चालू करायला बुवांच्या मजल्यावर पोचला, आणि उदवाहकाचे दार उघडले की यायचा. आणि दुसरा, तो, सोलर कळ चालू करून परत खाली जाताना, उदवाहकाचे दार उघडले की यायचा. यामधला कालावधी शास्त्रिबुवांच्या दोन विधिंमधल्या वेळेइतका असायचा, हा निव्वळ योगायोग.
हे खरेतर संगीत म्हणायच्या लायकिचे नाही. ते एकवेळ मुजिक या नावाखाली खपले असते. अर्थात त्याला संगीत म्हणा किंवा मुजिक म्हणा, त्याच्या त्रास हा जितका त्या घाणेरड्या धुनचा होता, तितकाच तिच्या मोठ्या आवाजाचा होता. एकवेळ ते संगीत परवडले असते, पण तो भसाडा आवाज ऐकणे हे अवघड होते. शास्त्रिबुवांचे लहानपण ऐन गावात गेले होते. लहानपण काय, इथे यायच्या आधिच सगळे जीवन, त्यांचे गावातच गेले होते. त्यामुळे त्यांना सकाळी जाग यायची ती अजान नी. रोज सकाळी तो अजान सुरु झाला की ते जागे व्हायचे. नंतर शहरातला आवाज वाढला, आणि तो अजान ऐकू येईनासा झाला. त्यानंतर थेट हे, आता हे लिफ्टचे संगीत. काही गाड्यांना रिव्हर्स हाॅर्न नावाचा महाभयंकर प्रकार असतो. एकदम तस्साच होता हा लिफ्टचा आवाज. कलपकाकांनी जेव्हा तो आवाज पहिल्यांदा ऐकला, तेव्हा भीमसेनचा आलाप ऐकल्याच्या थाटात मान हलवत, डोळे मिटून ते म्हणाले होते, "कम सप्टेंबर".
आता कलपकाकांना, भारतीय संगिताच्या बाहेरचे हे एवढे एकच नाव ठाऊक होते. ते सुद्धा एका सर्कशीत, ती धुन वाजवल्यानंतर तिचे नाव सांगितले होते म्हणून. त्यानंतर काहीही अगम्य वाजायला लागले, की ते अगदी असेच मान हलवून, डोळे बंद करून म्हणायचे, "कम सप्टेंबर". सवाईला लोकं असेच दाद देतात, हे त्यांनी नीट बघून ठेवले होते. नाही म्हणायला, मागे त्यांच्या मुलानी त्यांना एकदा त्यांना काही विलायती गाणी ऐकवली होती. त्यांना भीमसेनची गाणी जितकी कळायची, किंवा नाही कळायची, तितकिच ही कळली, किंवा नाही कळली. त्यामुळे ती आपल्याला आवडली असावी, असा त्यांचा कयास. "कोण गातंय रे?" त्यांनी विचारले. "कोण काय बाबा, हा आबा नावाचा ग्रुप आहे" मुलानी सांगितले. त्यांना ग्रुपनी गातात हे काही माहीत नव्हते. एकटा गायक, किंवा जुगलबंदी, हे दोनच प्रकार त्यांना माहीत असावे. त्यामुळे ही जुगलबंदी असावी, असे त्यांना वाटले. त्यात त्यांना आबा हे नाव ऐकल्यावर एकदम गहिवरून आले. विलायती संगितात हा भारतीय माणूस, हा आबा, कुठे पोचला याचे त्यांना फार कौतुक वाटले. त्यामुळे काही विलायती मानवी आवाज आला, की आबासाहेब, आणि नुसती वाद्ये वाजली, तर कम सप्टेंबर हे त्यांना नक्की ठाऊक होते.
तर, हे कम सप्टेंबर, लोकांच्या कानावर जास्तच अत्याचार करत आहे, असे ठरवून शास्त्रिबुवांनी बासरी शिकायचे ठरवले. नाहीतरी ती या कम सप्टेंबरपेक्षा कमीच असेल याची त्यांना खात्री होती. अर्थात खरे कारण हे नव्हते. पण हे सांगायला बरे होते. म्हणजे झाले काय, की शास्त्रिबुवांच्या बॅचचे गेटटुगेदर झाले, त्यात सगळे जण काही ना काही इंटरेस्टिंग करत होते. एकानी तर चक्क माउथआॅर्गन वाजवून दाखवला. एकानी तबल्यावर साथ दिली. हे बघून, आपले आत्तापर्यंतचे आयुष्य अगदीच असुरी गेले, याची त्यांना खंत वाटली. त्यात काहीतरी सूर सापडण्यासाठी त्यांना अचानक सुरसुरी आली. आणि मित्र आईसक्रिम खात असताना, हळूच त्याचा माउथआॅर्गन घेउन त्यांनी त्याच्यात एक प्रेमाने फुंकर मारून बघितली. तर त्याच्यातून टस नाही ना मस नाही. मग जरा जोरात वाजवून बघितली, तर लहानपणी पानाची पिपाणी वाजायची तसे काहिसे वाजले. हातातले वाद्य गळून पडणार होते. ते कसेबसे खाली ठेवून त्यांनी तिथून काढता पण घेतला. पण आयुष्य सुरात आणायचा त्यांचा निश्चय काही ढळला नाही.
आपल्या आयुष्याला हा सूर नक्की कशामुळे मिळेल, हे मात्र त्यांना कळत नव्हते. तसे त्यांना येत सगळेच होते. पण प्रश्न तत्वाचा होता. सतारिच्या तारा कोल्ह्याच्या आतड्यापासून करतात असे त्यांनी ऐकले होते. तसेच, एका सतारवादक मित्राची वाजवणारी बोटे बघितल्यावर, सतार शिकताना, बोटांना अशी चीर पडते, हे बघितल्यावर, सतार शिकायची नाही हे त्यांनी पक्के केले होते. व्हायोलीनच्या तारा छेडताना, त्याच्या तारा घोड्याच्या शेपटापासून करतात, हे कळल्यावर त्यांनी व्हायोलीन सोडले होते. तबला तर कातड्यापासूनच केला जातो, म्हणून त्यांना ते नको होते. त्यातल्या त्यात बासरी हे एकच वाद्य पूर्णपणे शाकाहारी होते. तसेच ते शिकताना, काहीच शारिरीक, किंवा मानसिक त्रास होणार नाही याची त्यांना पक्की खात्री होती. वर तिचे एक छोटे स्वरूप त्यांच्या घरीच होते, कुणाचे तरी विसरलेले. त्यामुळे त्यांना ती फक्त उचलून तोंडाला लावायची होती. इतकेच. मग काय, त्यांनी उचलली बासरी आणि लावली तोंडाला.
लहानपणी चुल चालू करायला मारलेली फुंकर कामी आली. आणि बासरिच्या मुखातून फुंक जाउन, ती पलिकडच्या बाजूने बाहेर आली. बुवांच्या हाताला एक सुखद वारा लागला. त्यांना याचा फार आनंद झाला. तशी आवाज येत नाही याची खंतही वाटत होतीच. पण तो आज ना उद्या येईल, याची त्यांना खात्री होती. पण सकाळी भाजी घेउन नानाकाका नेहमीप्रमाणे चहा प्यायला घरी आले, तेव्हा हातात बासरी बघून, त्यांनी थेट बायकोला फोन लावून, गॅसलाईन बंद पडली असे सांगितले. वर तुमचे झाले की चूल, आणि फुंकणी दोन्ही घरी पाठवून द्या असे ठासून सांगितले पण. रोजचा चहा, आणि कधिकधिचे हे असे उपकार, हा आपला भाजीसिद्ध हक्क आहे, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे ते मागताना स्वरात आर्जव नसायचे, तर आज्ञा असायची. हे सांगून ते निघून गेले.
तेव्हापासून कुणी आले, की शास्त्रिबुवा बासरी लपवायला लागले. नाहीतर आपल्याला बिगरसबसिडिचा गॅस परवडत नसून, ते पैसे वाचवायला आपण चूल वापरतो असे लोकांना वाटेल, याची त्यांना योग्य भिती होती. खरेतर त्यांना वाटत होते की बासरीत फुंकर मारली, की ती वाजते, आणि सपासपा बोटे फिरवली की गाणे वाजते, अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा होती. साधारण दोन तीन दिवस गेल्यावर ही अपेक्षा पूर्ण होत नाही हे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी एकदम चिडून जोरात, सगळा जीव एकवटून त्या बासरीत फुंकर मारली. आणि मग अचानक बऱ्याच गोष्टी झाल्या.
सगळ्यात आधी पिंकिच्या आईचे आरसाध्यान भंगले, आणि जागे होउन, हे काय वाजले म्हणून तिनी इकडे तिकडे बघितले. नीलकमल मधल्या वहिदा सारखी ती त्या कर्कश्श शिट्टिच्या दिशेनी खेचत गेली. फ्रेंच फ्राईजमधल्या कमित कमी दहा बारा घरात तरी बायकांनी कुकरच्या खालचा गॅस बंद केला. अगदी शास्त्रिबुवांच्या हिनी सुद्धा. टीनाचा कानातून सूक्ष्मकर्णे खाली पडले आणि तिला जगाचा खरा आवाज ऐकू आला. नानाकाका तावरेकाकांच्या घरात एक जाॅनी वाॅकर लावत असलेल्या पेल्यानी टिपाॅयवरून उडी मारून आत्महत्या केली. तावरेकाकांच्या पेल्यानी तर त्यांच्या हातातच जीव दिला. वाॅचमनने पळत जाउन फायर अलार्म बंद केला. अर्थात तो बंदच होता. म्हणजे त्याला तो बंद कसा होता, आणि बंदच होता, तर मग आत्ता काय वाजले, हे कळेना. शास्त्रिबुवांच्या कानठळ्या बसल्या, आणि त्यांना काहीच ऐकू येईना. पण हळूहळू सगळ्यांना हे कळले की आवाज, शास्त्रिबुवांच्या घरातून आला आहे. त्यामुळे सगळे बुवांच्या घरी आले. आणि त्यांच्या हातात त्यांना बासरी दिसली. त्यामुळे एकदम सगळ्या फ्रेंच फ्राईजला अचानक शास्त्रिबुवांचा हा नवा उद्योग कळला. आणि तो हळूहळू चेष्टेचा विषय होउ लागला. ज्याची शास्त्रिबुवांना भिती होती तेच झाले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा:

आबा
>>
Lol

मस्त लिहिलंय.
आईच्या बिल्डिंग च्या लिफ्ट ची आठवण आली.इतर जगातल्या लिफ्ट एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जात असताना किंवा दार उघडे असताना म्युझिक वाजवतात.ही लिफ्ट थांबलेली असताना म्युझिक वाजवते. मग हे लोक झोपताना पार्किंग मध्ये जाऊन तिथे लिफ्ट बोलावून जिन्याने वर येतात रात्रभर म्युझिक आपल्या मजल्यावर नको म्हणून (केनी जी ला आपली धून अशी प्रत्येक लिफ्ट मध्ये वाजणार माहीत असतं तर बिचाऱ्याने वाजवलीच नसती ती. ☺️☺️)

मस्त लिहिलय!
अगदी सही पंचेस...
केनी जी ला आपली धून अशी प्रत्येक लिफ्ट मध्ये वाजणार माहीत असतं तर बिचाऱ्याने वाजवलीच नसती ती. ☺️☺️+१

मग हे लोक झोपताना पार्किंग मध्ये जाऊन तिथे लिफ्ट बोलावून जिन्याने वर येतात रात्रभर म्युझिक आपल्या मजल्यावर नको म्हणून

>>त्यापेक्षा त्याच मजल्यावरून ग्राऊंडफ्लोअरच बटण दाबून रिकामी लिफ्ट खाली सोडायची... हाकानाका Wink

आबा , शेवटचा परिच्छेद… Lol

आसा, बरेचदा आत बटणे असतात ना मजल्यांची भारतात जी दारं बंद केल्याशिवाय सुरु होत नाही?