फ्रेंच फ्राईज - जोशीकाकुंचे आॅडिट

Submitted by मकरंद गोडबोले on 18 February, 2019 - 22:01

सिल्वन टाॅवर ही काही तशी जुनी सोसाटी नव्हती. पण बिल्डरनी अगदी सगळी कागदपत्रे नीट करून दिल्यामुळे सगळी जबाबदारी अचानक सोसाटीवर आली होती. पुण्यात नाहीतर जागा सोसाटिच्या मालकिची कधी होतच नाही. पण फ्रेंच फ्राईजचे नशीब चांगले होते. मग लगेचच, सोसाटिच्या बाॅडिवर नेमणुक करण्याचे काम सुरू झाले.
बरीच भांडणे होउन, यथावकाश सगळी बाॅडी बनली, आणि सोसायटिच्या कारभाराला सुरुवात झाली. पण या सगळ्या प्रकरणी जोशीकाकू खजिनदार झाल्या हे कुणाच्याच लक्षात नव्हते. त्यामुळे त्यांना ते फावत होते. त्यात त्यांना घरात पैसे हे जोशिकाकांकडून भांडून घ्यावे लागायचे. इथे ते हक्काचे होते. त्यामुळे त्या खूष होत्या. यांना मनापासून चांगली खजिनदारी करायची होती. हे हक्काचे पद त्यांना घालवायचे नव्हते. शिक्षण पूर्ण झाल्यापासून त्यांनी त्यांची सही कशावरच केलेली नव्हती. पहिल्यांदा ती आठवूनच करावी लागली. पण आता ती करावी लागते आहे, याचा त्यांना अभिमान होता. त्यासाठी त्यांच्याकडे एक नविन घेतलेले रोलर पेन होते. अर्थात सोसायटिच्या खजिन्यातून. सोसायटिच्या सह्या करायला घरातले पैसे खर्च करायला त्या काही बावळट नव्हत्या. आता हे सोसायटिचे पेन शब्दकोडे सोडवायला, वाणकामाची लिस्ट बनवायलाही वापरले जायचेच. घरी नातू गणिते करतानाही तेच पेन वापरायचा. पण हे होणारच ना. इतके कसे पाळायचे? पण आत्ता समोर बसलेला आॅडिटर विचारत होता, की वर्षाला इतकी रोलरपेन्स का लागतात म्हणून. याचे उत्तर काय द्यायचे हे बिचाऱ्या जोशिकाकुंना कळत नव्हते.
त्याचे झाले असे, की नवीन सोसायटी, म्हणून तिला एक सल्लागार होता. त्याने खरेतर हे खूळ काढले. नाहीतर सगळे बरे चालले होते. या सल्लागाराचे म्हणणे पडले, की एकदा फायनान्शियल आॅडिट करून घेउ. नाहीतरी ते लागतेच करायला, आणि सवय ही होईल आपल्याला म्हणून. फायनान्शियल आॅडिट हा शब्द ऐकल्यावर इतके काही महत्त्वाचे आणि गंभीर आपल्याला होणार, याचाच आनंद जोशिकाकुंना झाला. नाहीतरी खजिनदार झाल्यापासून त्यांच्या आयुष्यात असे महत्त्वाचे काही होतच नव्हते. त्यामुळे त्यांनी लगेचच त्याला होकार दिला. वर आॅडिट करणारा इसम, हा सल्लागारांच्या ओळखिचाच असल्याने तो काही त्रास देणार नाही, असेही तो म्हणाला. त्यामुळे जोशिकाकू लगेचच तयार झाल्या. आॅडिटच्या दिवशी नेसायला त्यांनी नवी साडी आणली. अर्थातच सोसायटिच्या पैशातून. नाहीतरी ती वापरली जाणार होती सोसायटिच्या कामासाठीच ना? मग आॅडिट झाल्यावर ती जुनी साडी, जोशिकाकुंनी एकदोन ठिकाणी वापरलिही असती, तिसुद्धा सोसायटिच्याच फंक्शनला. म्हणजे तिचा खरा वापर सोसायटिच्या कामासाठीच होणार होता. मग काय हरकत होती. तर ती नवी साडी नेसून त्या तयार होत्या. नवऱ्याने देवासमोर दिवा लावावा, असे त्यांना वाटत होते. मुलाच्या परिक्षेला त्या नेहमी लावत असत. त्याशिवाय तो पास होणार नाही, अशी त्यांची पक्की खात्री होती. त्यामुळे त्या जोशीकाकांना दिवा लावायला बजावून बाहेर पडल्या. आणि पारोश्यानी चहा पीत, काकांनी फक्त रविवारी, बायको पुढचे काही तास त्रास देणार नाही या आनंदात हो ही म्हटले. जोशिकाकुंना आपण कुठल्यातरी मोहिमेवर निघालो आहेत, आणि आता, दोन्ही बाजूंनी बा अदब, बा मुलाहिजा…. अशा आरोळ्या येणार असे मनापासून वाटत होते. त्यामुळे त्या त्याच दिमाखात निघाल्या. असे काहीच नव्हते म्हणून त्यांची थोडी निराशाही झाली. पण लिफ्टमधे जग्गू नवी साडी बघून, विचारात पडला, आणि आठवून लगेच, "आॅडिटला का?" असे विचारता झाला. आपल्या खजिनदारिची खरी चाड यालाच आहे, हे जोशीकाकुंना मनापासून पटले. आणि त्यांनी गोड हसून त्याला होकार दिला. पिंकीच्या आईचे लक्ष आरशातून बाहेर येईना, त्यामुळे नविन साडी बघायची तिची संधी गेली, याचे जोशीकाकुंना राहून राहून वाईट वाटत होते.
सोसायटीच्या कार्यालयात, तावरेकाका जबाबदारीने ऊभे होते. त्यांच्याबरोबर आॅडीटर. दोघे चहा पीत होते. जोशीकाकूंना फारच वाईट वाटले. त्यांना वाटत होते, की बरीच गर्दी असेल, मग आॅडिटची फीत कापायचा काकूंना आग्रह होईल. मग फ्लॅशच्या झगमगाटात जोशीकाकू ती फीत कापतील. त्याच्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होईल. मग चोपडी आणि खतावण्यांची पूजा होईल. ती मात्र त्यांनी अगदी आॅडिटर सांगेल तशी करायची ठरवली होती. त्याच्यानंतर चहापान होईल, मग सगळ्यांना आॅडिटच्या वह्या लुटल्या, की संपला प्रोग्राम, अशी त्यांची कल्पना. पण इथे दोघेच होते, आणि चहापान आधिच चालू होते, हे बघून त्यांना जरा काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.
त्यात चहा पिउन झाल्यावर आॅडिटर आणी तावरेकाका, अपेक्षेनी जोशिकाकुंकडे बघत होते. हे तर फारच विचित्र होते. आता काय करायचे, याचा त्यांना प्रश्न पडला. शेवटी तावरेकाकांनी, जोशीकाकूंना, "हिशेब दाखवायचे का?" असे विचरल्यावर त्या भानावर आल्या. जोशीकाकांनी महिन्याचे हिशेब कालच बघितले होते. तरी ते यांना का बघायच्येत हे काकूंना कळेना. "वह्या काढा ना!" हा तावरेकाकांचा सल्ला त्यांना कळला, आणि त्यांनी मग कपाटातून वह्या काढल्या. तावरेकाकांनी स्वतः बसून सगळ्या वह्या जोशीकाकूंना सांगितल्या होत्या. त्यामुळे त्या होत्या. कॅशबुक बघितल्यावर आॅडिटरला साधारण पुढे काय होणार याची कल्पना आलीच. कॅशबुकात सात विभाग होते. त्याला टायटल होते, '२०००', '५००', '२००', '१००', '५०', '२०', '१०' आणि 'सुटे'. त्यात २००० मधे दोन हजार रुपयाच्या तीन नोटा होत्या. आणि एकंदरीत सतरा नोटांची, त्यांच्या सिरियलनंबर सकट नोंद होती. त्या बॅंकेतून कधी आल्या याची. आणि कधी गेल्या याचीपण. तीच परिस्थिती ५०० च्या पानाची. इथे फक्त तेवीस नोटा होत्या, आणि सत्तेचाळीस नोटांची नोंद होती. आॅडिटरनी हताशपणे जोशीकाकूंकडे बघितले. तर त्या कॅशबुककडे फारच अभिमानानी बघत होत्या. आॅडिटरनी त्यांच्याकडे बघताच, त्यांनी खणातून एक छोटी पिशवी काढून त्याला दिली. वर ,"सुटे वहीत कसे ठेवणार?" असा गहन तात्विक प्रश्नही केला. एकंदरीत, लगेचच निघून जाणे प्रशस्त दिसले नसते म्हणून आॅडिटर थांबले, आणि त्यांनी एंन्ट्र्या बघायला सुरुवात केली. पहिलीच एन्ट्री होती, २००० च्या पानावरची, ती 'गवळी काका' दोन हजारांच्या दोन नोटांपुढे गवळीकाका, हे लिहिले होते. सोसायटीला दूध का लागते? असा आॅडिटरने प्रश्न विचारल्यावर, काकू म्हणाल्या, "सोसायटिला कशाला लागेल दूध? ते पैसे आमच्या दुधाचे दिल्येत"
"अहो पण ते सोसायटिचे का दिले?"
"तो इथेच आला ना पैसे मागायला. तेव्हा मी इथेच होते हिशेब लिहीत बसलेले. म्हणून दिले."
"पण मग तुम्ही सोसायटिचे चार हजार, स्वतःसाठी वापरले, ते परत केले का?"
"केले की."
"ते कुठे लिहिलेत? दाखवा"
"ते घरच्या वहीत लिहिल्येत. इथे कशाला लिहू?"
"म्हणजे?"
"अहो सोसायटिच्या केरवाल्या बाई वर आल्या ना पगार मागायला. मग मी घरचे काढून दिले. नाहीतरी मला परत करायचे होतेच ना."
"पण ते इथे का नाही लिहिले?"
"अहो इथे लिहिले, तर घरचा हिशेब चुकेल ना? म्हणून तिथे लिहिले. यांना सगळा हिशोब लागतो हो. पक्के आहेत ते तसे"
आॅडिटर थक्क होउन गप्प बसला. त्याला हे लाॅजिक खोडून काढता येईना. त्याने मुकाट पुढची एन्ट्री बघितली. पाचशेच्या पानावर पहिली एन्ट्री होती, यास्मिन. जोशीकाकूंना त्यानी याचा अर्थ विचारला. तर त्या म्हणाल्या की खानकाकांच्या मुलिनी मागितले. तिला अंडीवाल्याला द्यायचे होते. तिला दिले. आॅडिटरनी शांतपणे विचारले, "ते परत आले का?" "हो आले ना.." जोशीकाकू. "ते कुठे लिहिल्येत?" जोशीकाकू आता चिडल्या होत्या, त्या फणकाऱ्यानी म्हणाल्या, "तो मी कशाला लिहू? खानकाकांना विचारा कुठे लिहिलय तो" "पण ते परत आलेले कसे कळणार" आॅडिटर. "माळीकाकांना ॲडव्हान्स दिल्याचे कुठे सापडते आहे का बघा?" जोशीकाकू म्हणाल्या. आॅडिटरने वही चाळून नाही म्हणून सांगितले. जोशीकाकूंनी खूष होउन, हाच तो पुरावा असे आॅडिटरकडे बघितले. त्याला तरीही कळेना. "अहो असे काय करताय. माळी आला आगाउ रक्कम मागायला, तेव्हा त्याला दिला खानकाकांकडे पाठवून. त्यांनी दिले त्याला पाचशे. हिसाब बराबर." जोशीकाकूंचा हिंदी डायलाॅग. आतापर्यंत पैसे जर खानकाकांनी दिले, तर ते जोशीकाकूंनी लिहायचे नाही, इतपत आॅडिटरला कळायला लागले होते. आतापर्यंत तावरेकाकांना दोनदा चक्कर येउन गेली होती. त्यांना चहा मागवावा, का घरी जाउन चक्क पेग मारावा? हे नीट कळत नव्हते. पण सेक्रेटरी म्हणून त्यांची काही जबाबदारी होती ना. त्यामुळे ते मुकाट बसले होते. आॅडिटरनी त्यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकलाच होता. आता परत सोसायटिच्या कामासाठी स्वतःच्या घरचा पेग जाणार याचे काकांना वाईट वाटले. त्यात आॅडिटर म्हणाला, "बाकिची जर्नल्स कुठे आहेत" त्याला कॅशबुकाची व्यवस्थित वाट लागली आहे हे कळलेच होते. तरी काम पूर्ण करू म्हणून तो बिचारा बसला होता. याच्यावर जेव्हा जोशीकाकूंनी थोडावेळ विचार करून, सोसायटिचे चेकबुक त्यांच्यासमोर ठेवले. तेव्हा मात्र त्यांचा संयम सुटला, आणि तावरेकाकांच्या घरचा पेग नक्की झाला.
तावरेकाकांच्या घरी त्यांच्या खर्चाने पेग मारत, काका, आॅडिटर आणि जोशीकाका, अशी मिटिंग झाली. जोशीकाकांना, तावरेच्या घरी शिवास रिगलचे आमंत्रण मिळणे, हे बायकोचे कर्तुत्व फारच आवडले होते. त्यामुळे ते एकंदरीत खूष होते. या मिटिंगमधे जोशीकाकूंनी रिझोल्यूशन हा शब्द पहिल्यांदा ऐकला. आणि तो ऐकल्यावर आपण खजिनदार नसून फक्त कॅशियर आहोत, असे त्यांना वाटायला लागले. बाकी सगळे जर्नल वगैरे प्रकार ऐकल्यावर तर, आपण फक्त कारकून होणार असे त्यांना वाटायला लागले. पण एकंदरीत आॅडिटरने, शेवटी "बाई हुषार आहेत. लवकर शिकतात. करतील बहुतेक नीट" असे ऐकल्यावर त्यांना जरा नवीन उत्साह आला, आणि त्यांनी कारकुनी तर कारकुनी, असे म्हणत हे नवीन आव्हान स्वीकारले.
पण तरी अजून त्यांना खानकाकांना दिलेल्या पैशाचा हिशोब आपण का ठेवायचा हे नव्हतेच कळले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Biggrin जबरी !
जोशी काकू तर कॉन्ट्रा एंट्री अकाउंटंट निघाल्या !

....पण फ्रेंच फ्राईजचे नशीब चांगले होते >>> हे समजलं नाही ! फ्रेंच फ्राईज की सिल्व्हन टॉव्हर ?

जबरी आहे!

लेखावर "फक्त घरी वाचण्यायोग्य" असे रेटींग देत जा. सार्वजनीक ठिकाणी हसू दाबताना फार पंचाईत होते नाही तर!

काय चुकलं जोशी काकुंचं? ज्यांनी पैसे दिले त्यांच्याच वहीत नोंद होणार की Proud

मस्त लिहिलं आहे, हसू आलं पण बिचाऱ्या ऑडीटरची दया आली Lol

पण फ्रेंच फ्राईजचे नशीब चांगले होते >>> हे समजलं नाही ! फ्रेंच फ्राईज की सिल्व्हन टॉव्हर ?
>>> दोन्ही सेमच हो. टीना आपटे ने दिलेले नाव आहे. आधीचे भाग वाचले नाहीत का ☺️

मस्त. Lol

छान