वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग १ : विज्ञानभाषा मराठी

Submitted by कुमार१ on 13 February, 2019 - 04:30

सुमारे ३ महिन्यांपूर्वी २०१८चे विविध शाखांतील नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि यथावकाश प्रदान केले गेले.
यानिमित्ताने या पुरस्कारांची पार्श्वभूमी समजून घेऊ.

Alfred_Nobel3.jpg

Alfred Nobel (१८३३- १८९६) हे कुशल अभियंता आणि संशोधक होते. त्यांची जन्मभूमी स्वीडन तर कर्मभूमी नॉर्वे होती. ते धनाढ्य होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. तिचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस (अथवा संस्थेस) पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी:
१. भौतिकशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वैद्यकशास्त्र
४. साहित्य
५. शांतता
६. अर्थशास्त्र ( हे मुळात नव्हते, नंतर स्वीडिश बँकेने चालू केले)

१९०१ पासून ही दरवर्षी जागतिक स्तरावर दिली जातात. वैयक्तिक पारितोषिक जर विभागून दिले गेले तर त्यासाठी ३ व्यक्तींची मर्यादा आहे. एखादे वर्षी जर जागतिक स्तरावरचे कोणतेच संशोधन मूलभूत स्वरूपाचे वाटले नाही तर पुरस्कार दिला जात नाही.

ज्या विज्ञान शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात त्यात वैद्यकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे. जेव्हा एखादा वैद्यकातील पुरस्कार जाहीर होतो तेव्हा संबंधित विजेत्यांबरोबरच त्यांच्या संशोधनाचा विषयही कळून येतो. बऱ्याचदा त्या विषयाचे नाव आणि कामाचे स्वरूप हे सामान्य वाचकाला समजत नाही. तेव्हा हे काहीतरी ‘उच्च’ असून क्लिष्ट आहे अशी त्याची भावना होते. परंतु, कालांतराने या संशोधनावर आधारित एखादी नवी रोगनिदान अथवा रोगोपचार पद्धत उपलब्ध होते. तेव्हा असे संशोधन खऱ्या अर्थाने मानवजातीसाठी वरदान ठरते.

इतिहासात डोकावता असे दिसेल की १९०१ ते २०१८ च्या कालखंडात २१६ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. वैद्यकातील या पुरस्काराचे अधिकृत नाव ‘ Nobel prize in Physiology or Medicine’ असे आहे. यातील Physiology म्हणजे ‘शरीरक्रियाशास्त्र’ तर Medicine म्हणजे ‘औषधवैद्यक’. थोडक्यात सांगायचे तर Physiology हा औषधवैद्यकाचा पाया असतो. शरीराच्या अनेक क्रिया होत असताना विशिष्ट पेशींत काय मूलभूत घडामोडी होतात याचा तो अभ्यास असतो. त्या ज्ञानावर आधारित पुढे रोगांचा अभ्यास होतो. त्यापुढे जाऊन रोगनिदान पद्धती विकसित होतात आणि शेवटी योग्य ते उपचार शोधले जातात.

अशा प्रकारे गेल्या ११८ वर्षांत वैद्यकात अनेक नोबेल पुरस्कार दिले गेले आहेत. साधारणपणे त्या संशोधनांचे स्वरूप असे होते:
१. पेशींची रचना व कार्य
२. पेशींतील मूलभूत रेणूंचा शोध (उदा. DNA)
३. शरीरक्रियांचा अभ्यास

४. जनुकांचा अभ्यास
५. रोगजंतूंचा शोध
६. रोगांची कारणमीमांसा

७. रोगनिदान पद्धतींचा शोध
८. जीवरक्षक औषधांचा शोध
९. अवयवरोपणाचे उपचार

अशा संशोधानापैकी सुमारे १५-२० संशोधने ही अत्यंत मूलगामी स्वरूपाची होती आणि त्यांचा वैद्यकाच्या वाटचालीवर खूप प्रभाव पडला. ‘अभूतपूर्व’ आणि ‘क्रांतिकारी’ असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. या संशोधनांचा व संबंधित संशोधकांचा अल्प परिचय वाचकांना या लेखमालेतून करून द्यावा असा विचार आहे. तो शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करेन. लेखात संशोधन आणि त्याचा समाजाला झालेला उपयोग यावर भर असेल. संशोधकांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल लिहिणे शक्यतो टाळेन.

‘माबो’च्या मराठी भाषा दिन उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर वैद्यक-पुरस्कारांच्या इतिहासात डोकावत आहे. वाचकांनाही ते रोचक वाटेल अशी आशा आहे.
*********************************************
(लेखमाला ‘मिसळपाव.com’ वर पूर्वप्रकाशित).
(संयोजकांच्या निवेदनानुसार या मालेचे पहिले ३ भाग आता लिहितो. नंतर पुढचे उपक्रम संपल्यानंतर. तसा प्रत्येक लेख स्वतंत्र आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरुवात...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद.
म भा दिनाला मिळणारा प्रतिसाद पाहता एक निर्णय घेत आहे.
या लेखमालेचे पुढील भाग 'आरोग्यम धनसंपदा' मध्येच तिच्या मूळ शीर्षकासह यथावकाश प्रसिद्ध करेन.

उत्तम. माझ्या मते शीर्षकामुळे गडबड झाली असावी. म्हणजे कमी प्रतिसाद हा म भा दिनाबद्दल उदासीनतेमुळे नसून त्यातील उपक्रमांच्या स्वरूपाचा इम्पॅक्ट क्रिएट करण्याबद्दल फार विचार न झाल्यामुळे असावा.

कुमार१,
शीर्षकात बदल केल्याबद्दल धन्यवाद. उपक्रमांना अधिकाधिक प्रतिसाद ( लेखकांकडून आणि वाचकांकडूनही) मिळावा अशीच आमचीही इच्छा आहे. तुम्ही तुमचे पुढचे लेख विज्ञानभाषा मराठी या उपक्रमांतर्गत प्रकाशित केलेत तर आम्हाला आनंदच होईल.

संयोजक,
जरूर विचार करतो, धन्यवाद !

एक शंका.
वैद्यकशास्त्रातील सर्वाधिक नोबेल पुरस्कार आतापर्यंत कोणत्या देशातील संशोधकांना मिळाले आहेत ?

वरील सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !
शास्त्रीय लेखन आवडीने वाचणारे तुमच्यासारखे वाचक लेखकाला समाधान देतात.

या लेखमालेचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:

भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास

३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास

४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर

६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार

८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप