विष

Submitted by ऑर्फियस on 11 February, 2019 - 20:11

रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते. "आयुष्यात आपल्याला हवं ते सारं मिळतंच असं नाही. मात्र सकारात्मक विचार असतील तर आहे त्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही तर कितीतरी मोठी झेप आयुष्यात घेतली आहे. साध्या केबल ऑपरेटर्सपासून सुरुवात करून आज मोठ्या कंपनीचे मालक झालात. जुन्या गोष्टीचं ओझं बाळगण्यात अर्थ नसतो..." शब्द अस्पष्ट होत गेले. रघुनाथरावांसमोर अण्णा आले. "रघ्या, कारखानीसांचं घड्याळ नेऊन दे आज" अण्णांचा तो आवाज कानी पडला की रघुला आपल्या आयुष्यात एक अभेद्य भिंत समोर उभी ठकल्यासारखं वाटत्त असे. अण्णांच्या रुपाने त्याच्यासमोर भिंतच उभी होती. रघुला ज्या गोष्टींची मनापासून तिटकारा होता नेमक्या त्याच गोष्टी अण्णांना आवडत असत. फाटक्या अंगाचे अण्णा त्यांच्या वीतभर दुकानात डोळ्याला भिंग लावून घड्याळे दुरुस्त करीत बसले की दुपारपर्यंत मान वर करत नसत. मग रघु डबा घेऊन येत असे. ते आधी सावकाश डबा उघडून पाहात. जेवणात तळलेलं तिखट जाळ काही नसलं की रघुच्या आईच्या नावानं कचकचीत शिव्या हासडल्या जात. रघुला ते भजी आणि तळलेल्या मिरच्या आणायला पिटाळत. संध्याकाळी अण्णांसारखेच फाटक्या अंगाचे त्यांचे मित्र जमत. मग त्या वीतभर दुकानात गावठीचा घमघमाट सुटत असे. पत्त्यांचे डाव पडत. येताना अण्णा शुद्धीत नसत त्यामुळे नेण्यासाठी रघुला यावे लागत असे. खरंतर अण्णांची शुद्ध गेली कि त्यांना नेताना त्रास झाला तरी रघुला एक समाधान असे की आज तरी आईचा मार चुकेल. तारेत असताना अण्णा थोडे जरी शुद्धीवर असले की रघुच्या आईची खैर नसे. तिचे आर्त ओरडणे आजही कधीतरी आठवते. रघुनाथराव त्या आठवणींनी गलबलून गेले. त्यांनी समोर पाहिले.

डॉक्टर बोलायचा थांबला होता. त्यांच्याकडे पाहत होता. बाजुला सुशीलाबाई त्यांना हलवत होत्या. "अहो डॉक्टर काय विचारताहेत .." "अं..काय? सॉरी डॉक्टर" रघुनाथराव सराईतपणे खोटे हसले. अण्णांच्या सहवासात राहणे म्हणजे जालिम अ‍ॅसीडच्या बाटलीत राहणे. जितकी वर्ष मी त्यांच्याबरोबर काढली तितकं या डॉक्टराचं वय तरी असेल का? रघुनाथराव मनातून तूच्छपणे हसले. सगळा उपदेश आयव्हरी टॉवरमधून. रघुनाथराव उठले. "थँक्यु डॉक्टर" त्यांनी निघताना मागे वळून पाहिले. सुशीलाबाई औषध लिहून घेत होत्या. डॉक्टरसमोर वाकताना त्यांनी मुद्दाम अंग लचकवलं असणार याची रघुनाथरावांना खात्री होती. डॉक्टरकडे जायचं तरी एखाद्या लग्नाला निघाल्यासारख्या त्या सजून निघाल्या होत्या. अण्णांची भिंत आयुष्यातून दूर झाली मात्र त्यांनी जाण्याआधी सुशीलाबाईंची ही भिंत आयुष्यात आणून ठेवली मात्र. भिंतीपासून सुटका नाही. कारमध्ये ते शांतपणे मान टेकून पडून राहिले. मध्येच सुशीलाबाईंनी केमिस्टच्या दुकानासमोर गाडी थांबवली. "या गोळ्या आधी घेतल्यात. काहीच फरक पडला नाही" असं म्हणत रघुनाथरावांनी प्रिस्क्रिप्शनचा कागद सुशीलाबाईंच्या हातून घेऊन फाडून टाकला आणि त्या काही म्हणायच्या आतच ड्रायव्हरला गाडी घराकडे नेण्यास सांगितले. अण्णांनी दहावी तरी होऊ दिलं पाहिजे होतं. मग खुप शिकता आलं असतं. रघुनाथरावांचं नेहेमीचं विचारचक्र सुरु झालं. अण्णांनी नशेत आपली पुस्तकं अशी जाळायला नको होती. आई ती विझवायला गेली आणि स्वतःच भाजली. मग पुढे त्याच दुखण्यात गेली.

काय काय गेलं त्या आगीत. छोटंसं महाभारताचं पुस्तक होतं. रामायण होतं. जुने फुटपाथवर घेतलेले अंक होते. एक दारुची लाट आली आणि आग लावून निघून गेली. रघुनाथरावांना खुप खुप शिकायचं होतं. निरनिराळे विषय अभ्यासायचे होते. मार्क्स वाचायचा होता. कांट अभ्यासायचा होता. शेक्सपियरची स्वगतं पाठ करायची होती. फ्रॉईडचं विश्लेषण शिकायचं होतं. अशा कितीतरी गोष्टी होत्या. पण एक आग लागली आणि सारी राख झाली. मग मात्र रघुनाथराव अगदी निबर झाले. रघुने अण्णांच्या दुकानात पाठ मोडून काम केले. अण्णांच्या समोरच केबलचा उद्योग सुरु केला. अगदी भरभराटीला आणला. अण्णा तर मुलाचे वैभव बघून अगदी वेड्यासारखे झाले होते. आपण पुस्तके जाळली ते बरेच केले असे ते मित्रांना सांगत. देखण्या सुशीलाबाईंचं स्थळ आलं. रघुनाथरावांना किंचित आशा वाटत होती. बायको शिकलेली असेल. तिच्याशी आपण पुस्तकांबद्दल बोलु. तिला जुनी नाटकं दाखवायला नेऊ. पण पहिल्याच भेटीत सुशीलाबाईंनी आपल्याला पुस्तकांचा किती कंटाळा आहे आणि त्यापेक्षा त्यांना सिनेमा पाहणे कसे आणि किती आवडते हे ऐकवले. कुठल्यातरी फाटक्या हिरोचे गाणे सुशीलेच्या तोंडून ऐकताना तर रघुनाथराव शरमुनच गेले. तिने आठवीतूनच शाळेतून पळ काढला होता. गडगंज संपत्ती होती. लाडावलेल्या सुशीलेला कसलिही कमतरता नव्हती. अण्णांना मोठ्या हुंड्याची लालूच देऊन सासर्‍याने डाव साधला. आणि सुशीलाबाई घरी आल्या.

सुशीलाबाई घरी आल्या आणि त्याच वर्षी नशेत दगडावर पडण्याचे निमित्त झाले आणि अण्णा गेले. रघुनाथरावांचा संसार सुरु झाला. आणि अगदी सुरुवातीलाच रघुनाथरावांचे मन संसारातून उडाले. ज्योतिषाने गुण जुळवले होते पण प्रत्यक्षात कुठलेच गुण जुळत नव्हते. तरीही रघुनाथरावांना एक आशा वाटत होती. त्यांच्या मनात त्यांच्या मित्राचे बोल घुमत होते. काशीनाथ म्हणाला होता " अरे तुला शिकता आलं नाही ना? मुलांना शिकव. मोठं कर. त्यांच्या प्रगतीत तुला स्वतःला पाहा. भरपूर शिकव त्यांना. " सुरुवातीला रघुनाथरावांना काशीनाथचे म्हणणे पटले नव्हते. पण हळुहळु त्यांना वाटले बरोबरच म्हणतो आहे काशीनाथ. मुलं म्हणजे एक प्रकारे आपलाच पुनर्जन्म की. भरपूर शिकवूयात त्यांना. आपण जे करु शकलो नाही ते त्यांच्याकडून करवून घेऊ. सुशीलाबाईंना दिवस गेले. रघुनाथरावांनी उत्साहाने तयारी सुरु केली. पुस्तकांची वेगळी खोली तयार केली. सुशीलाबाईंना ते आवर्जून त्या खोलीत नेऊ लागले. सुशीलाबाई कंटाळून जात पण रघुनाथरावांचा उत्साह कमी होत नसे. यथावकाश मुलाचा जन्म झाला. सुशीलाबाईंचा विरोध डावलून त्यांनी आपल्या मुलाचे नाव चिंतामणी ठेवले. ते त्याला मुद्दाम पुस्तकांच्या सहवासात ठेवत असत. "बाबु, बाबुडी..ये ये.." म्हणत त्याला बोलावित. निरनिराळी रंगीत पुस्तकं त्याला दाखवत. पण पुढे काय झाले कळलेच नाही. पोरगं पुस्तकं पाहून रडू लागलं आणि रघुनाथराव खचलेच. चिंतामणी मोठा होऊ लागला. शाळेत जाऊ लागला. त्याच्या गोर्‍या रंगामुळे त्याचं सोज्वळ चिंतामणी नाव मागे पडून मुलं त्याला लाल्या म्हणू लागली. रघुनाथराव आणखिनच कोषात गुरफटत गेले. चिन्तामणीने दहावीला तीनवेळा बसून कशीबशी परीक्षा रेटली आणि रघुनाथरावांसाठी मुलगा दुरावला तो कायमचाच. अचानक गाडीचा ब्रेक लागला.

रघुनाथराव जागे झाले. क्षणभर आपण कुठे आहोत त्यांना कळलेच नाही. गेले काही वर्ष हे असेच चालले होते. दिवसभर उदासवाणे वाटत असे. स्वतःला रेटून ते ऑफीसमध्ये जात. कर्तबगार माणसे जमवली होती. कंपनीची भरभराट होत होती. मात्र रघुनाथराव आतून पोखरत चालले होते. अनेकदा ते काही गोष्टी विसरून जात. थकवा तर पाचवीलाच पुजलेला होता. डॉक्टरांनी तीव्र नैराश्याचे निदान केले होते. औषधे झाली. समुपदेशन झाले. काही नवे ऐकले की सुशीलाबाई त्यांना उत्साहाने तेथे नेत असत. आजचा डॉक्टर नक्की कितवा ते रघुनाथरावांना आठवेना. ते गाडीतून उतरले. थकलेल्या नजरेने त्यांनी आपल्या आलिशान घराकडे पाहिले. त्यांना वाटले आपल्या पोटातच विष भिनलंय. अण्णांपासून त्याची सुरुवात झाली. सुशीलेने ते सघन केलं आणि चिंतामणीने ते जास्त जालिम बनवलं. आपलं सारं शरीरंच आता विषारी झालंय. कुठलाही डॉक्टर, वैद्य काहीही करु शकणार नाही. हे आता आपल्याबरोबरच जाणार. थकलेल्या पावलांनी ते स्वतःला रेटु लागले. स्वतःच्या खोलीकडे जाताना त्यांना काहीतरी गडबड ऐकू आली. अचानक त्यांच्या लक्षात आले आज चिंतामणी येणार होता. दोन वर्षापूर्वी त्याने दुसर्‍या धर्मातल्या मुलीशी लग्न केले होते. रघुनाथरावांना धर्माचे फारसे सोयरसुतक वाटले नाही पण कार्ट्याने त्याच्यासारखीच अडाणी मुलगी निवडली होती. ती म्हणे याच्यासाठी आत्महत्या करायला निघाली होती. पुस्तकांच्या सहवात रघुनाथराव शांतपणे बसले. पुस्तके पाहून त्यांना किंचित बरे वाटले. दोन वर्ष त्यांना चिंतामणी काय करतो त्याची खबर घेण्याची गरज भासली नव्हती इतका कडवटपणा त्यांच्या मनात साचला होता. वाटले त्याने न भेटताच निघून जावे. खपली निघु नये. जखम भळभळा वाहु नये. पण दारात कुणीतरी उभे राहिल्यासारखे वाटले.

रघुनाथरावांनी डोळे नीट ताणून पाहिले तर सुशीलाबाई छोट्या बाळाला घेऊन समोर उभ्या होत्या. त्याला सांगत होत्या. "ते बघ तुझे आजोबा..जायच्यं ना त्यांच्याकडे.." म्हणजे? हा चिन्तामणीचा मुलगा? रघुनाथरावांना नातवाच्या जन्माचे कळले होते पण रघुनाथराव गेले नाहीत. मनातल्या कटूपणाने त्यांना मुलापासून दूर केले होते. चिन्तामणीचं अपयश त्यांना स्वतःचं अपयश वाटत असे. त्याला पाहण्म म्हणजे आपल्याच अपयशाचं तोंड पाहणं. ते नकोच असा विचार त्यांनी केला होता आणि मुलाबद्दलचा मनातला कोपरा कायमचा लिम्पून टाकला. पण आज नातू समोर उभा होता. काही क्षण रघुनाथराव त्याच्याकडे पाहात राहिले. मग त्यांच्या मनात लक्ककन वीज चमकल्यासारखे झाले. सुकलेल्या वेलीला पाणी मिळून ती झरझर हिरवी व्हावी तसे काहीतरी त्यांच्या मनात उमलले. हा चिन्तामणीचा मुलगा, आपला वारस. याला आपण मोठं करुया. खुप शिकवूया. आपलं आयुष्य त्याच्यात पाहुया. आपल्या जे जमलं नाही ते त्याच्या कडून करवून घेऊया. तरच हे मनात साठलेलं विष बाहेर पडेल, त्याचा निचरा होईल, आपण शांत होऊ. नव्या उमेदीने रघुनाथराव उठले. त्यांनी हात पुढे केले. "बाबु, बाबुडी..ये ये.." म्हणत ते त्याला पुस्तकांची कपाटे दाखवू लागले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली!
लेखनशैली भारी आहे. लिहित रहा

खूप सुरेख आहे कथा.. पण जरा र्‍ह्स्व दीर्घाचं पहा....त्याने रसभंग होतो....
जी एंच्या भाषेशी मिळती जुळती भाषा असल्याने आनंद वाटला. फार दिवसांनी काही तरी 'आतून' लिहीलेले वाचायला मिळाले!

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy
आंबट गोड Happy जीए आमचं दैवत Happy त्यांना दंडवत घालूनच लिहित असतो. त्यांचा खूप प्रभाव आहे पण मला वेगळं लिहिण्याची इच्छा आहे.
शूद्धलेखनाचं लक्षात ठेवीन.

Pages