कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

Submitted by कुमार१ on 10 February, 2019 - 21:18

खनिजांचा खजिना : भाग ४

भाग ३ (पोटॅशियम) : https://www.maayboli.com/node/68990
*****************************************

आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो.

कॅल्शियम
हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.
कॅल्शियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत

sources-calcium-6376545.jpg

हे चार गटांत विभागता येतील:
१. दूध, दही ,चीज, इ.
२. हिरव्या पालेभाज्या
३. सोयाबीन्स व इतर द्विदल धान्ये, कठीण कवचाची फळे (nuts).
४. तसेच कॅल्शियमने ‘संपन्न’ केलेली काही धान्ये आणि सोयाबीन्स बाजारात मिळतात.

अशा विविध स्त्रोतांतल्या कॅल्शियमचे आतड्यांत शोषण मात्र कमीजास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्यावे. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. एकूण स्त्रोतांपैकी दुग्धजन्य पदार्थांतील शोषण चांगले होते. पण इतर स्त्रोतांतील कॅल्शियमच्या शोषणात मात्र काही अडथळे असतात.

प्रथम पालेभाज्यांचे बघू. पालक आणि काही इतरांतले कॅल्शियम हे oxalates शी संयुगित असते. त्यामुळे त्याचे शोषण खूप कमी होते. ब्रोकोली व कोबीतील कॅल्शियमचे शोषण तुलनेने बरे होते.

तर द्विदल धान्ये आणि nuts मधील कॅल्शियम हे phytatesशी संयुगित असते. त्यानेही शोषणाला अडथळा होतो.
कॅल्शियमचे शोषण हे वाढत्या वयानुसारही कमी होत जाते. बालके आणि मुलांत ते आहारातील प्रमाणाच्या तब्बल ६०% असते तर म्हातारपणी ते बरेच कमी होते. उत्तम शोषण होण्यासाठी आहारात त्याच्या जोडीने ‘ड’ जीवनसत्व असणे जरुरीचे असते. ‘ड’ आणि कॅल्शियम यांचा परस्परसंबंध जाणण्यासाठी वाचकांनी माझा ‘ड’ वरील स्वतंत्र लेख इथे वाचावा: https://www.maayboli.com/node/68623.

प्रौढ व्यक्तीत कॅल्शियमची आहारातील रोजची गरज १ ग्रॅम इतकी आहे. म्हातारपणी हे प्रमाण १.२ ग्रॅम करावे लागते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे हाडांना व दातांना बळकट करणे. हाडांच्या प्रथिनयुक्त गाभ्यावरती मिश्र खनिजांचा थर चढवला जातो. या मिश्रणात कॅल्शियमबरोबर फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट व फ़्लुओराइडचा समावेश असतो. यामुळेच हाडे व दात बळकट होतात.
इथे हे लक्षात घ्यावे की हा थर कायमस्वरूपी नसतो. रोज त्यातील काही भाग खरवडून रक्तात येतो आणि त्याचे जागी रक्तातून आलेल्या खनिजांचा नवा थर चढवला जातो. म्हणजेच रोज आपली हाडे ही अंशतः ‘कात’ टाकत असतात.

२. स्नायूंचे आकुंचन: या मूलभूत क्रियेमध्ये तो मध्यवर्ती नियंत्रकाची भूमिका बजावतो.
३. रक्त गोठण्याची क्रिया: जखमेनंतर रक्तस्त्राव थांबण्याची जी गुंतागुंतीची क्रिया असते त्यात त्याचाही वाटा महत्वाचा असतो.
४. याव्यतिरिक्त पेशींच्या मूलभूत क्रिया, एन्झाइम्सचे उत्तेजन आणि काही हॉर्मोन्सच्या कार्यात तो मोलाची मदत करतो.

कॅल्शियमची रक्तपातळी
ही पातळी ९-११ mg/dL इतकी असते. कॅल्शियमची शरीरातील अनेक महत्वाची कार्ये बघता ती कायम स्थिर ठेवावी लागते. त्यासाठी दोन हॉर्मोन्सचे योगदान खूप महत्वाचे असते:

१. पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) : मानेतील थायरॉइड ग्रंथीच्या बाजूस ४ छोट्या पॅराथायरॉइड ग्रंथी असतात त्यांत हे तयार होते. ते हाडातील कॅल्शियम रक्तात आणण्यास मदत करते.
२. ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप (Calcitriol) हे हॉर्मोन असते आणि ते मूत्रपिंडात तयार होते. ते आहारातील कॅल्शियमचे शोषण वाढवते आणि रक्तातील कॅल्शियमला हाडात जाण्यास मदत करते.

निरोगीपणात वरील दोन्ही हॉर्मोन्सचा सुरेख समतोल साधला जातो जेणेकरून कॅल्शियम हाडांत व रक्तात योग्य प्रमाणात राहते. आहारात कॅल्शियम व ‘ड’ ची दीर्घकाल कमतरता झाल्यास मात्र हाडांतील कॅल्शियम खूप खरवडले जाऊन रक्तपातळी टिकवली जाते पण त्याचबरोबर हाडे कमकुवत होतात. मुलांत या आजाराला मुडदूस म्हणतात.

कॅल्शियमची पातळी विविध आजारांत कमी व जास्त होऊ शकते. आता त्याचा आढावा घेऊ.

कॅल्शियम रक्तपातळी कमतरता
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता : यात आहारातील कॅल्शियमचे शोषण होत नाही.
२. PTH ची कमतरता
३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार : यात ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप तयार होत नाही.

या कमतरतेचे रुग्णावर परिणाम असे होतात:
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका, मानसिक स्थितीतील बदल आणि हृदयकार्यावर विपरीत परिणाम.

कॅल्शियम रक्तपातळी अधिक्य

ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. PTH चे अधिक्य
२. विविध कर्करोग : यांत PTH सारखे एक प्रथिन तयार होते आणि ते हाडांना पोखरून काढते. मग त्यांतील भरपूर कॅल्शियम रक्तात उतरतो.

अधिक्याचे परिणाम:
१. चेतासंस्थेचे बिघाड व मानसिक दौर्बल्य
२. मळमळणे, बद्धकोष्ठता
३. मूतखडे होणे
४. हृदयकार्यावर विपरीत परिणाम.
* * * * *

फॉस्फरस

कॅल्शियमचा जोडीदार असलेले हे खनिज. शरीरातील खनिजसाठ्यांमध्ये त्याचे स्थान कॅल्शियमच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा सर्वाधिक साठा अर्थातच हाडांत आहे. अल्प प्रमाणात ते रक्तात असते आणि तेथील त्याचे प्रमाण हे कॅल्शियमच्या सुमारे निम्म्याने असते.
पेशींतले फॉस्फरस हे उर्जा देणाऱ्या संयुगांच्या स्वरुपात असते. पेशीत तयार होणारी उर्जा ही ATP या ‘चलना’त साठवली जाते. त्यातील ‘P’ म्हणजे फॉस्फेट होय. तसेच DNA व RNA या मूलभूत रेणूंचाही फॉस्फरस हा घटक असतो.

त्याचे आहारातील चांगले स्त्रोत म्हणजे दूध आणि मांस. ज्या पदार्थांतून कॅल्शियम व प्रथिन उत्तम मिळते त्यांतून फॉस्फरसही आपोआप उपलब्ध होते. आहारातील कॅल्शियम :फॉस्फरसचे प्रमाण १.५ : १ या गुणोत्तरात असावे.


फॉस्फरसची रक्तपातळी

ही 2.5 to 4.5 mg/dL इतकी असते. मुलांत ती प्रौढापेक्षा अधिक असते कारण हे वाढीचे वय असते.
ही पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार. ती पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा कॅल्शियमशी अधिक प्रमाणात संयोग होतो. परिणामी त्या दोघांचे मिळून तयार होणारे ‘खडे’ शरीराच्या मउ भागांतही साठू लागतात.
*************************************************
चित्र जालावरुन साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीर्घकालीन अस्थिरोगाच्या वेदना दरसाल हवामान बदला दरम्यान वाढतात का, हा एक कुतुहलाचा व संशोधनाचा विषय आहे. काही रुग्णांचा असा अनुभव असतो, तर काहींचा नसतो. यासंदर्भात अनेक अभ्यास झालेले आहे. त्यामध्ये वातावरणातील खालील घटकांच्या बदलांची दखल घेण्यात आली :

• तापमान
• वातावरणातील दाब
• सापेक्ष आर्द्रता आणि
• पाऊस

आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसले आहे. काही रुग्णांच्या गटांमध्ये वरील चार घटकांपैकी एखादा घटक आणि वेदना यांचा संबंध दिसला आहे. अन्य काही अभ्यासात तसा संबंध दिसलेला नाही.
यासंदर्भात दोन गृहीतके मांडण्यात आली आहेत :
१. सांध्यामधील विशिष्ट चेतातंतू हे अशा रुग्णांमध्ये अधिक संवेदनशील असतात. जेव्हा वातावरणातील दाब बऱ्यापैकी बदलतो तेव्हा ते उत्तेजित होतात आणि वेदना वाढते.

२. काही सांध्यांच्याबाबतीत (खुबा) हवामान बदलामुळे त्यांची अस्थिरता वाढते.

३. याला अजून एक पदर आहे. तो म्हणजे रुग्णाची मानसिकता. एकदा का रुग्णाला हवामान बदलाने त्रास वाढल्याचे लक्षात आले, की मग त्याच्या मनात ते पक्के बसते आणि प्रत्येक हवामान बदलाच्या वेळेला तो अधिक साशंक होत राहतो.

एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या अभ्यासातून यासंदर्भात ठोस निष्कर्ष काढता येत नाही, हे खरे.

कॅल्शियम रक्तपातळी अधिक्य +

जास्त कॅल्शिअममुळे मूतखडे होतात का ,हा मात्र अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. जर कॅल्शिअमच्या गोळ्या चालू असताना आहारातील oxalates चे प्रमाण कमी ठेवले, तर अजिबात खडे होत नाहीत, असे अलीकडील संशोधन सांगते. त्यासाठी त्या दरम्यान सोयाबीन, मांस, पालेभाज्या यांचे सेवन कमी करावे.

Family history
The risk of becoming a stone former is more than 2.5
times greater in individuals who have a family history of
stone disease. This increased risk has been attributed
both to genetic, environmental, and dietary factors

=== >
मुतखड्याचा त्रास झाल्याने पुन्हा वाचन केले असता वरील माहिती भेटली .

कुमार सरांचे लेखन खूप उपयोगी ठरते !!!

सतीश, धन्यवाद.
मुतखड्याचा त्रास झाल्याने
>>>
आता तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली योग्य ती काळजी घ्यालच.
पुन्हा खडे न होण्यासाठी शुभेच्छा Happy

१. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता : यात आहारातील कॅल्शियमचे शोषण होत नाही.>> हा ब्रेस्ट कॅन्सर चा एक मार्कर आहे. अगदी कॉमन केसेस मध्ये ब्रेस्ट कॅन्सर जो दुसृया अवय्वांमध्ये मेट होतो तेव्हा पहिले हाडात जातो. पुढे हाडांना भोके पडून स्पायनल कॉर्ड ला आघात होण्याची शक्यता वाढते. महिलांनी विशे षतः डी विटा मिन डेफिशिअन्सी व कॅल्शिअम ची कमी टेस्ट मध्ये दिसल्यास एक मॅमो ग्राम जरूर करून घ्यावा .

Pages