मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - साहित्य वाचन

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:45

नमस्कार मंडळी,

एकवीस वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या मराठी पाऊलखुणा शोधणारी मायबोली आता जालविश्वात चांगलीच स्थिरावली आहे. जगभरातील मराठी माणसे मायबोलीच्या या प्रेमळ धाग्यात गुंतून गेली आहेत.
आजपर्यंत मायबोली केवळ लिखित स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचत होती. लिखित माध्यम सर्वदूर पोहोचण्यासाठी सोयीचे असले तरी लेखनाचा आशय, अनुभूती वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्याला काही मर्यादा येतात.
इंटरनेटचा सर्वदूर वापर सुरु झाल्यावर या मर्यादा पार करण्यासाठी व्हिडीओ ब्लॉगचे काही प्रयोगसुद्धा झाले.

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने, मायबोलीवरचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून एक माध्यम वापरायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या नवीन माध्यमामुळे आपले साहित्य अधिक विस्तृत प्रमाणात श्रोत्यांपर्यंत पोहोचेल असा आमचा विश्वास आहे.

त्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत "साहित्यवाचन " हा उपक्रम.
जालीय जगातील आयडींच्या आजवर केवळ लिखाणावरून असणाऱ्या ओळखीला आता आवाज, कदाचित चेहरा सुद्धा मिळेल.

sa.png

हा उपक्रम अगदी सोपा सरळ आहे,
उपक्रमात भाग घेणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या कोणत्याही साहित्याचे अभिवाचन करून ते रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवायचे आहे.
हे रेकॉर्डिंग मायबोलीच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात येईल.
हे रेकॉर्डिंग दृकश्राव्य (व्हिडीओ) असेल तर फारच छान, पण जर काही कारणाने व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य नसेल तर केवळ ध्वनिमुद्रण ( ऑडिओ) दिलेत तरी चालेल.

उपक्रमाचे इतर नियम

१) कथा, ललित, प्रवासवर्णन, कविता, वैचारिक लेख असे कोणत्याही प्रकारचे साहित्य चालेल. ते
शक्यतो तुमचे स्वत:चे असावे. पण सगळ्याच लेखकांना सादरीकरण जमते असे नाही. आणि ज्यांना
सादरीकरण जमते त्यांना लिहिता येतेच असे नाही. त्यामुळे ध्वनिमुद्रित करण्याअगोदर मायबोलीकर लेखकांची पूर्वपरवानगी घेऊन इतर मायबोलीकरही यात भाग घेऊ शकतील.
अशी परवानगी मूळ लेखकाने , मायबोलीत प्रवेश करून (लॉगीन करून) मायबोलीची संपर्क सुविधा वापरूनच वेबमास्तरांना कळवावी आणि कुठल्या आयडीला ती परवानगी दिली आहे तेही कळवावे. थेट ईमेल किंवा फॉरवर्डेड ईमेल चालणार नाही. फक्त लेखकांनाच ही परवानगी देता यावी म्हणून ही काळजी घेत आहोत.

२) एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकेल.

३) रेकॉर्डिंग ची कमाल लांबी ८ ते १० मिनिटे असावी.

४) साहित्य मायबोलीवर / इतरत्र पूर्वप्रकाशित असले तरी चालेल.

५) इतरत्र पूर्वप्रकाशित साहित्य पुन:प्रकाशित करण्यासाठी पूर्वीच्या प्रकाशकाची परवानगी घेणे आवश्यक असेल तर ती घेण्याची जबाबदारी त्या त्या सदस्याची राहील.

६) सर्व सहभागी सदस्यांचे अभिवाचन प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, मात्र वादग्रस्त ठरू शकेल किंवा कायदेशीर समस्या उभ्या करेल असे वाटणारे अभिवाचन संपादित करण्याचे किंवा नाकारण्याचे हक्क मायबोली प्रशासन राखून ठेवत आहे.

७) रेकॉर्डिंग ची फाईल mp3, mp4 स्वरुपात २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत, mabhadi2019@maayboli.com या मेल id वर पाठवावी.

८) सर्वात महत्वाचे :- आलेली फाईल कोणत्याही तांत्रिक संस्करणाशिवाय प्रसारित होईल. दृकश्राव्य माध्यमात चुका खूप लवकर आणि मोठ्या दिसतात. त्यामुळे सादरीकरणाचा नीट विचार करून ध्वनि/चित्र मुद्रण करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान उपक्रम!! लवकरच पाठवते. Happy

एक शंका - एका ऐवजी दोन आयडींनी एकाच कथेचे वाचन केले तर चालेल का? म्हणजे दोन सहभागी असले तर चालतील का? ते छान पण वाटेल. __/\__

विनिता,
एका ऐवजी दोन आयडींनी एकाच कथेचे वाचन केले तर चालेल का? >> हो, चालेल. ही स्पर्धा नसून उपक्रम आहे. त्यामुळे काहीच हरकत नाही.