मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - विज्ञानभाषा मराठी

Submitted by मभा दिन संयोजक on 8 February, 2019 - 13:26

नमस्कार!

प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या ’ रामन इफेक्ट’ या नोबेल पारितोषिकविजेत्या संशोधनाच्या सन्मानार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. भारतातल्या विविध संशोधन संस्थांमध्ये या दिवशी विज्ञान प्रदर्शने, व्याख्याने इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने यावर्षी आपण मायबोलीवरही विज्ञान दिन साजरा करत आहोत. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय विज्ञानभाषा मराठी हा उपक्रम!

जगात तर्‍हेतर्‍हेच्या विषयांवर संशोधन सुरू असतं. अनेक नवे नवे शोध लागत असतात. कधी कधी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या पलीकडे आपल्याला या संशोधनाबद्दल माहितीही नसतं आणि सगळ्याच संशोधनांना बातम्यांमध्ये स्थानही मिळत नाही. वरवर पाहता आपल्याला जरी हे संशोधन क्लिष्ट वाटलं, तरी ते अतिशय रोचक असू शकतं. आपल्यापैकी काहीजण असे असतात की ज्यांना अशा संशोधनात रस वाटतो, त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायला आवडतं. मग हे संशोधन भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा शुद्ध शास्त्रांमधलं असो, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा सामाजिक शास्त्रांमधलं असो, किंवा तंत्रज्ञानातलं असो. तुम्हाला जर अशी माहिती मिळवायला आवडत असेल तर हा उपक्रम तुमच्यासाठीच आहे! विज्ञान आणि तंत्रज्ञानामधल्या काही मूलभूत संकल्पना किंवा अलीकडच्या काळात लागलेले काही महत्त्वाचे शोध यांची ओळख सोप्या मराठीत मायबोलीकरांना व्हावी असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या निमित्ताने विज्ञानविषयक लेखांचा एक चांगला संग्रह तयार झाला तर मायबोलीवरच्या साहित्यात एक मोलाची भर पडेल.

अनेक मायबोलीकर असे आहेत की जे स्वत: संशोधनक्षेत्रात आहेत. या निमित्ताने संशोधक मायबोलीकरांनीही त्यांनी स्वत:च्या संशोधनाबद्दल (मग ते नवं असो किंवा जुनं) लिहावं, असं आम्ही त्यांना आवाहन करतो. ते वाचायला मायबोलीकरांना आवडेल याची खात्री आहे.

IMG-20190212-WA0025.jpgउपक्रमाचे नियम

१.लेख आटोपशीर होण्याच्या दृष्टीने या लेखांची शब्दसंख्या शक्यतो १५०० शब्दांहून जास्त नसावी.

२.लेखन संपूर्णपणे स्वत:चे असावे. (वापरलेल्या संदर्भांची सूची लेखाच्या शेवटी दिल्यास उपयुक्त ठरेल.)

३.लेखन पूर्वप्रकाशित असल्यास संबंधित परवानगी घेण्याची जबाबदारी लेखकाची असेल.

४. विज्ञान/ तंत्रज्ञानातील मूलभूत संकल्पना किंवा अलीकडच्या काळातील महत्त्वाचे संशोधन किंवा स्वतःचे संशोधन याविषयीची शक्य तितक्या सोप्या मराठीत माहिती असं स्वरूप लेखाचं असावं.

५. या उपक्रमाअंतर्गत एका आयडीला जास्तीत जास्त ३ लेख पाठवता येतील.

या उपक्रमांतर्गत लेख लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०१९' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
लेखाचे शीर्षक-विज्ञानभाषा मराठी

४. जर एकाच आयडीला एकापेक्षा जास्त लेख लिहायचे असतील तर विषयात
लेखाचे शीर्षक- विज्ञानभाषा मराठी (१)
लेखाचे शीर्षक-विज्ञानभाषा मराठी (२)
असे क्रमांक द्यावेत.

५. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. शब्दखुणा या बॉक्समध्ये विज्ञानभाषा मराठी - मराठी भाषा दिवस २०१९' हे शब्द लिहा.

७. मजकुरात आपला लेख लिहावा / कॉपी-पेस्ट करावा.

८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा.
सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लिक करा. म्हणजे तुमचा लेख सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना
दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय
वापरून मजकुरात बदल करू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रम चांगला आहे. आत्ताच कुमार१ यांचा विज्ञानभाषा मराठी - लेख वाचला. अजून कुणी लेख लिहिले आहेत का माहिती नाही. परंतु विषयाचे नाव "विज्ञानभाषा मराठी (१) - मराठी भाषा दिवस २०१९ - स्वतःचा मायबोली आयडी" यावरून वाचकाला काहीच उलगडा होत नाही. त्या लेखाला कमी वाचक मिळण्यामागे देखिल हे एक कारण असावे. कुमार यांचे इतर अनेक लेख मोठ्या प्रमाणावर वाचले जातात त्यामुळे ह्या लेखाशी तुलना कराविशी वाटली. कृपया लेखकांना विषय लिहिताना पाहिजे तसे 'कॅची टायटल' देता येईल याची मुभा दिल्यास बरे होईल. त्यात 'विज्ञानभाषा मराठी (१) - मराठी भाषा दिवस २०१९' एवढे लांबलचक काहीतरी असण्यापेक्षा, उदाहरणार्थ, 'वि.भा.म. - म.भा.दि.१९' असे काहीतरी लिहून मग टायटल लिहिल्यास तो लेख विभामशी संलग्न पण होईल आणि टायटल वाचून वाचकांना ठरवता येईल की हा त्यांच्या आवडीचा/वाचावासा असा विषय आहे की नाही.

>> विषयाचे नाव "विज्ञानभाषा मराठी (१) - मराठी भाषा दिवस २०१९ - स्वतःचा मायबोली आयडी" यावरून वाचकाला काहीच उलगडा होत नाही... ... कृपया लेखकांना विषय लिहिताना पाहिजे तसे 'कॅची टायटल' देता येईल याची मुभा दिल्यास बरे होईल.

+१११११ अगदी सहमत आहे. कृपया विचार व्हावा.

शंतनू,
आपली सूचना आवडली आणि पटली. लगेचच योग्य तो बदल करत आहोत.

अनेक मायबोलीकर आपापल्या क्षेत्रातले जाणकार आणि दिग्गज म्हणून ओळखले जातात. त्यांना आपापल्या विषयावर लिहायला उद्युक्त करा. ह्या निमित्ताने ते लिहिते होतील तर मराठी भाषेत संशोधन विषयक लेखांची छान भर पडेल.

संशोधन फक्त मूलभूत विज्ञान विषयातले हवे असे नाही. आपल्याच शिक्षण विषयावर हवे असेही नाही. आपल्या आवडीच्या इतर क्षेत्रातल्या घडामोडींवरही लिहायचे असल्यास चालेल.

तर ह्या धाग्याचे दोरे संबंधितांपर्यंत पोहोचवा. कृपया धन्यवाद Happy

मभा दिन संयोजकांचे मनःपूर्वक आभार. आपापले वैयक्तिक व्याप सांभाळून मराठी भाषा दिनाचे संयोजन करायचे. त्यासाठी नवनवीन कल्पक उपक्रम योजायचे खरेच सोपे नाही.
ह्या उपक्रमांच्या माध्यमातून माझ्यासारख्या हौशी लेखकांना काही तरी वेगळे लिहायची संधी मिळाली. त्यामुळे पुनःश्च आभारी आहे.
बाकीच्या सहभागी लेखकांचे देखील खूप कौतुक. कारण कित्येक क्लिष्ट शास्त्रीय विषयांवर मराठीतून लेख लिहिणे खरेच अवघड आहे. आता एक-एक लेख वाचायला घेत आहे.