फेसबुक

Submitted by ध्येयवेडा on 4 February, 2019 - 06:10

झुक्याचं कुठून डोकं चाललं आणि त्यानं फेसबुक तयार केलं देव जाणे!
लिफ्ट मध्ये असताना आपला मजला यायचाय का? काढ फेसबुक, बोलता बोलता मित्राला फोन आला, काढ फेसबुक. हॉटेल मध्ये जेवण यायचंय का? काढ फेसबुक. सकाळी विधींना जाताना - काढ फेसबुक...
बघावं तिथे जो तो फेसबुक वर. प्रत्येकाला मोहात पाडण्यासारखं आहे तरी काय ह्या फेसबुक मध्ये?

फेसबुक म्हणजे आजच्या युगातील एक क्रांती आहे ह्यात शंका नाही. लोकांना जवळ आणायचं काम ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणात फेसबुक करू शकलंय, त्याची तुलना कोणाशीच नाही. एका दशकाहूनही जास्ती काळ फेसबुक यशस्वीरीत्या टिकून आहे, आणि त्याचा प्रभाव वाढतोच आहे.
कला, क्रीडा, राजकारण, मनोरंजन अश्या सर्व विषयांची उत्कृष्ट सांगड त्यानं घातली आहे. पूर्वी स्वतः:बद्दल एखादी चांगली गोष्ट इतरांना सांगायला किंवा दाखवायला लोकांच्या मनात एक संकोच असायचा. आज तसं राहिलेलं नाही. कारण प्रत्येकाला फेसबुकनं एक हक्काचं व्यासपीठ दिलं आहे. आज प्रत्येक जण इथं स्वतः:ची प्रतिमा तयार करण्यात झटतोय. त्यामुळे आपल्याला अनेक कलाकार, लेखक, फोटोग्राफर, ट्रेकर, खवय्ये, शेफ फेसबुकवर बघायला मिळत आहेत.

फेसबुकच्या निर्मात्यांनी कालानुरूप त्याच्यात जे बदल केले, ते जबरदस्त आहेत. फेसबुकचा अल्गोरिदम इतका हुशार आहे की तुम्ही कोणाच्या किती पोस्ट लाइक करताय, तुमच्या आवडी निवडी, तुम्ही कुठे फिरता, कोणासोबत फिरता हे त्याला बरोबर ठाऊक असतं. त्यानुसार तुमच्या वॉल वरती काय दाखवायचं ते तो ठरवतो. तुम्ही ठराविक लोकांचे फोटो आणि पोस्ट लाइक केले की त्यांचे इतर अपडेट्स फेसबुक तुम्हाला प्राधान्यानं दाखवायला सुरू करतो. ज्या मित्रांच्या पोस्ट तुम्ही लाइक करत नाही, त्यांच्या बद्दल तो तुम्हाला हळू हळू दाखवणं बंद करतो. एक दिवस अचानक तुम्हाला एखादा जुना मित्र आठवतो, आणि तुम्ही त्याचं काय चाललंय बघायला त्याच्या प्रोफाइलला भेट देता. तेव्हा तुम्हाला समजतं की ह्याच्या आयुष्यात इतकं काही घडतंय, आणि ते फेसबुकवर आपल्याला काहीच कसं दिसलं नाही. आणि ह्या विचारानं तुम्ही चक्रावून जाता!
त्यानंतर तुम्ही विचार करता की आपल्या फ़्रेंड लिस्ट मध्ये जवळपास पाचशेऱ्हजार मित्र आहेत. पण आपल्याला फेसबुक मात्र त्याच त्याच पाच-पंचवीस लोकांचे अपडेट्स दाखवत असतो. तुमच्या वॉल वरची नेमकी हीच जागा फेसबुकवरची एखादी जाहिरात घेते. त्यातूनच फेसबुक पैसे कमावतो!
ही गोष्ट जशी लक्षात येऊ लागली, तसं माझं (आणि बऱ्याच जणांचं) फेसबुकवरती फोटो आणि पोस्ट टाकणं फारच मर्यादित होऊन गेलं. पण थांबलं मात्र नाही. कारण मी माझे अपडेट्स दिले नाहीत, तर लोकांच्यात माझी प्रतिमा कशी तयार होणार? मी नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली, मी फाईव्ह स्टार मध्ये जेवलो, मी एक चित्रपट बघितला, मी अमेरिकेत गेलो.. ह्या गोष्टी इतरांपुढे कश्या मिरवणार? आजकाल एखादी जवळची व्यक्ती गेली, तर त्याचेही अपडेट्स बघायला मिळतात. ऑनलाईन सहानुभूती मिळवायची धडपड!

तर सांगायचं मुद्दा असा की आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाची आणि त्याच वेळेस आपल्या समाजाच्या स्वभावाची 'नस' ह्या फेसबुकनं अगदी पक्की ओळखली आहे.
फेसबुक वापरावर नियंत्रण नसल्यास एखाद्याच्या खासगी माहितीचा गैरवापर, समाजात जातीय तेढ निर्माण करणे, राजकीय संघर्ष पेटणे असे अनेक दुष्परिणाम बघायला मिळतात.
परंतु फेसबुकच्या वापरावर योग्य नियंत्रण असेल तर खरंच फेसबुक हे एक सुंदर व्यासपीठ आहे.
एखादी व्यक्ती घडवण्याची, तिच्यातील कलागुणांना न्याय मिळवून देण्याची क्षमता फेसबुक मध्ये आहे. योग्य वापर झाल्यास संपूर्ण समाजाचा उद्धार करण्याची शक्ती त्यात आहे.
एका तज्ञाने म्हटलंय -
"फेसबुक किंवा गूगल ही त्या कंपन्यांची खरी उत्पादनं नाहीतच. त्यांची खरी उत्पादने तर तुम्ही आहात!! "

- भूषण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.शेवटचं वाक्य एकदम पटलं.काय विकत घ्यावं, काय वापरावं,काय वाचावं,काय बघावं यावर आपलीच आपणच दिलेली माहिती वापरून हळुहळु ब्रेनवॉश होत राहतो.

योग्य विचार मांडलेत.
चांगल्या व्यासपीठाचा योग्य वापर करण्याची बुद्धी सर्वांना नसते.