भारवाहक - सूरतेवरून मौल्यवान सामान घेऊन परतताना… भाग 1

Submitted by शशिकांत ओक on 30 January, 2019 - 13:29

भारवाहक - सूरतेवरून मौल्यवान सामान घेऊन परतताना… भाग 1

आजच्या काळातील मिलिट्री कमांडरच्याकडे हे नियोजन करण्यास सांगितले की तुम्ही सेना नायक म्हणून *१२ हजार घोडदळ आणि ३ हजार पायदळ यासह सध्याच्या सुरत शहरात एका हवेलीवर ताबा मिळवा. तिथून शहरात मिळेल त्या ठिकाणी सशस्त्र हल्ला करा. तेथील लोकांना धमकाऊन, वेळपडली तर जिवे मारून त्याच्या ताब्यातील किंमती वस्तू हस्तगत करा. जो कोणी जास्तीत जास्त माल जप्त करून आणेल त्याला त्या प्रमाणात इनाम दिले जाईल. हे काम पुढील ७२ तासात करून संपवाचे आहे…. (*हा आकडा इतिहासकारांना मान्य आहे असे मानू.)
...
समजा, जो आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिला होता तसा तो सध्याच्या मिलिट्री कमांडरने आपल्या दलास दिला आहे. जे या लेखनाचे वाचक आहेत ते म्हणजे आपण या दलातील तत्पर, निष्ठूरपणे हुकुमाची अंमलबजावणी करणारे शिवबांचे लष्करी सैनिक आहात. तुम्ही सामान्यतः ५० किलो वजन उचलून आणू शकता. जास्तीत जास्त ८० किलो वजन ओढत किंवा अन्य तर्‍हेने आणू शकता. ते अंतर जाऊन येऊन ५ किमी आहे. कोणत्याही पेठेतील दुकानातून सहजपणे माल मिळत नाही. मारपीट आणि बांधून ठेवल्याशिवाय माल मिळत नाही…
जस्ट डायल किंवा तत्सम वापर करून सुरतेत बाजारात पेठा, दुकाने, यांचे तपशील उपलब्ध होतील. त्या काळाचे भान ठेवून मॉल, एटीएम, सिनेमा, हॉटेल्स, आयटी पार्क, ऑफिसेस, असे प्रकार वगळावे. सोईसाठी सध्याचे सूरत रेल्वे स्थानक हे शिवाजी महाराजांच्या वास्तवाचे, माल एकत्र करायचे केंद्र होते असे मानावे. बँक म्हणजे सावकारी पेढी. पहिल्या दिवशी हातघाईच्या लढाया झाल्या. नंतर जाळपोळीच्या भितीने लोक प्रतिकार करण्याची हिम्मत राहिली नाही. असे मानले तर आपण काय काय प्रकारचे सामान, मौल्यवान वस्तू, धातू, कापडचोपड, आणू शकाल? पहा प्रयत्न करून. निदान दहा तरी सहभागी होतील असे अपेक्षित आहे.
(डिस्क्लेमर - हा वैचारिक कार्यक्रम आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा नाही..)

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वेळोवेळी सधन बाजार पेठांमध्ये जाऊन तेथून राज्य कारभार चालवायला लागणारी साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या मोहिमा हाती घ्याव्या लागल्या होत्या. मिळवलेली साधन संपत्ती त्यांनी वैयक्तिक उपयोगात आणली असती किंवा त्या संपत्तीचा विनियोग जवळच्या लोकात आपापसात वाटून चैन किंवा ऐशारामात खर्च केला असता तर ते सर्वस्वी दुष्टपणाचे, स्वार्थी आणि अनैतिक ठरले असते.
शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी ह्या साधनसामग्रीचा विनियोग कसा केला यावर अनेक विद्वान इतिहासकारांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी नोंद केलेल्या माहितीतून, ऐतिहासिक पुराव्यातून जे चित्र दर्शनास येते त्यातून शिवाजी महाराजांनी वैयक्तिक महत्वाकांक्षेने पेटून त्या काळातील विविध भागातील राजसत्तेला टक्कर देण्यासाठी आपली सेना आणि अन्य मनुष्यबळ उभे केले नव्हते हेच प्रकर्षाने जाणवते.
आपले लष्कर तत्परतेने, शस्त्र संपन्न होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात जनसामान्यांच्या रक्षणासाठी, धर्म, अर्थ आणि शास्त्र यावरील विचारक, कलाकार, कारागीर यांना विना अडथळा शांततापूर्ण सहजीवनाचा लाभ घडवून देण्याच्या उद्देशाने ते सदैव कार्यरत असावेत. या लोककल्याणकारी महत्त्वाकांक्षेने त्यांनी राज्य निर्माण केले, वाढवले. त्यांच्या दूरदृष्टीचा आवाका लक्षात न आल्याने अनेक वरिष्ठ तत्कालीन सुभेदार, जमीनदार, किल्लेदार आपापल्या जहागिरीला धक्का बसेल या भितीने शत्रू झाले असावेत. राज्यकारभाराची जाण, अनुभव नसलेल्या तरूणाकडे जाऊन मिळण्यात प्रतिष्ठा आड येऊन शक्य तितका प्रतिकार करण्यात गुंतले असावेत. त्यात जवळच्या नात्यातल्या वरिष्ठांचा समावेत होता. तर काहींना कुंपणावरील राजकारण करून जिंकणाऱ्या सत्तेसमोर मान तुकवून आपले मानमरातब, हक्क, वहिवाटी, जागिरीच्या सीमा सुरक्षित करण्यात समाधान वाटत असावे.
अपेक्षित ध्येय मिळवायचे असेल तर अशा लोकांशी शत्रुत्व करणे भाग पडले असेल. सैन्य बळाला उपयुक्त सामान, पैसा अडका, मौल्यवान धातू, आधुनिक शस्त्रे, शस्त्रे निर्मितीची साधने, लागणारे कारागीर व स्पेयर पार्ट्स मिळवायला शिवाजीमहाराजांना मोहिमा काढायला लागल्या असाव्यात. अशा मोहिमा यशस्वी करायसाठी श्रीमंत व्यापारी, सोनार, धनाढ्य व्यावसायिक, वाहतूकदार, कुशल कारागीर यांना साम दाम दंड भेद या सर्व प्रकारे हाताळून धन संपत्ती मिळवणे हे अनैतिक ठरू नये. ह्या महत्वाच्या निकषावर महाराजांच्या मोहिमा घडल्या असाव्यात. . अत्याचार, जाळपोळ, संपत्तीचे अपहरण, आणि मिळवलेल्या संपत्तीला सांभाळून ती आपल्या अखत्यारीतील सुरक्षित ठिकाणी त्यास नेऊन त्याचा योग्य वेळी योग्य कार्यात उपयोग करावा म्हणून मोजून, तोलूनमापून जपून ठेवायची व्यवस्था करण्यात आली असावी. याची एक झलक महाराजांच्या संपत्तीची मोजदाद करून मिळालेल्या नोंदीनुसार लक्षात येते.
अशा मोहिमांमध्ये सूरत या त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून नावलौकिक असलेल्या बाजारपेठवर महाराजांचे डोळे नसतील असे कसे होईल? विशेषतः सन १६६० च्या आसपास दक्षिणेचा सुभेदार शाहिस्तेखान पुणे विभागात ३ वर्षे राहून आपल्या प्रचंड लष्करासह तळ ठोकून बसल्याने महाराजांना आपल्या सैन्याची घडी नीट बसू देण्याकरता १६६४ मधे आणि सन १६६५ च्या करारामध्ये गमावलेल्या किल्ले आणि जमिनीमुळे, राज्य कारभाराचे अपरिमित झालेले नुकसान भरपाई होणे अति आवश्यक झाले होते. त्यामुळे ऑक्टोबर सन १६७० मधे सूरतेवरून दुसर्‍या वेळी चाल करून जाऊन संपत्ती मिळवायला मोहिमा काढून यशस्वी केल्या गेल्या.
या मोहिमेतून परतताना मिळवलेली संपत्ती आणि जड, अवजड सामान सूरतेवरून आपल्या राज्यात सुरक्षितपणे आणणे ही जोखमीची जबाबदारी पार पाडावी लागणार होती. शिवाजी महाराजांनी या मोहिमा कशा आखल्या? प्रत्यक्षात कशा आमलात आणल्या? त्यात शत्रूच्या अपेक्षित हल्ल्याला कसे सामोरे जावे लागले? आपल्या नियोजनात वेळोवेळी बदल करून सर्व साधन सामुग्रीला आणताना कोणते धूर्त लढाई तंत्र वापरले? कांचनबारीतील हुलकावणीची लढाई कशी खेळली? याची कल्पना आजच्या पिढीला समजून घ्यायची असेल तर?
मिळवलेल्या संपत्तीचा काही भाग जमिनीवरून वाहून नेण्याच्या धोक्याला आटोक्यात ठेवण्यासाठी नाविकदलाच्या ताफ्यातून बोजड, पण किमती सामान जलमार्गाने पाठवून कशी कल्पकता दाखवली असावी?
या सर्वाचा एक मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना या मोहिमांमध्ये भारवाहक जनावरे आणि त्यांचे चालक यांचा यात फार महत्त्वाचा आहे याची जाणीव होते. या अंगांनी विचार करता त्या जनावरांचे चालक वाटाडे म्हणून कामाला येत असावेत. जेंव्हा शक्य असेल तेंव्हा तांड्यांसोबतीने जाता जाता डोळे चुकवून चलाखीने पसार व्हायचे प्रयत्न त्यांनी केले असले पाहिजेत. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याला तांड्यांसोबतीने कडक पहाऱ्यात सदैव तत्पर असावे लागले असेल आणि शत्रूच्या अखत्यारीतील प्रदेशात सैन्य हल्ला परतवून लावायला सज्ज असावे लागले असेल. अशा दुहेरी कामात अडकून मिळवलेली साधनसंपत्ती पूर्णपणे गमवायची वेळ येऊ नये म्हणून रात्रंदिवस सावधान राहावे लागले असेल.
हस्तगत संपत्ती आणि सामान काय काय असावे? ते वाहून नेण्यास कोण कोणत्या जनावरांचा उपयोग केला गेला असेल? त्या जनावरांची एका टप्प्यात ओझी वाहन क्षमता, चालायची दमणूक, चारापाणी, विश्रांती, सोबतच्या चालकांची जेवणाखाण्याची, नंतर परतीच्या बोलीवर दिले जाणारे मानधन, विभाग बदलला की बदलती जनावरे, त्यांच्या अंगावर लादलेल्या गोण्या, पडशा, त्यांतील माल खाली पडू नये म्हणून दोर बांधणी, जनावरांच्या अंगावरून खाली घसरून न जाण्यासाठी लाकडी साडगी, पट्टे, नाकातील वेसण्या वगैरे मधून या तांड्याचे संचलन किती जिकीरीचे आणि वेळखाऊ असेल याचा विचार केला पाहिजे.
... भाग २ पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय. आग्र्याहुन सुटके एव्हढे रोमांचकारी नसले तरी या घटनांमधले काहि प्रसंग नक्किच धाडसी असावेत. लेखात आलेल्या प्रश्नांचा आढावा पुढिल भागांत येइल हि आशा बाळगतो.

खुप दिवसांनंतर केलेल्या पुनरागमनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!!

मित्रांनो धन्यवाद...
'त' ला ताळ्यावर आणतो...
फोटो टाकायला कटकट वाटते. काही उपाय?

स्व. मुरली खैरनार यांच्या शोध या कादंबरीत
मिलिटरी कमांडरांना नंतर घडणाऱ्या हुलकावणी - लढाईकरिता जे सुयोग्य कथन वाटेल त्यातून लढाईची बांधणी करण्याचा प्रयत्न आहे. शोध मधील ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण, लेखन विचार करायला लावते. त्यातील स्यमंतक मण्याचा व अन्य व्यक्तिमत्वांचा कादंबरीतील रंगत वाढवायला दिलेला तपशील थ्रिलर म्हणून वापरले आहेत.