Odd Man Out (भाग २)

Submitted by nimita on 28 January, 2019 - 02:39

" या गं दोघी लवकर जेवायला." नम्रतानी गरमागरम पोळ्या dining table वर ठेवत मुलींना हाक मारली. नेमका त्याच वेळी कुठलासा कार्टून शो सुरू होता. अनुजा नी हळूच विचारलं," आई, आज टीव्ही समोर बसू जेवायला ? फक्त आजचाच दिवस, please !!!" खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तिला आधीच माहिती होतं.. कारण या बाबतीत नम्रता खूप strict होती. 'प्रत्येक कामासाठी एक जागा ठरलेली आहे. त्यात शक्यतो बदल करायचा नाही."असा तिचा आग्रह असायचा. " जेवण फक्त dining table वर च, तसंच अभ्यास हा फक्त स्टडी टेबल वरच.. कॉटवर लोळत किंवा टीव्ही बघत जेवण किंवा अभ्यास केलेला तिला अजिबात खपायचा नाही.

ती काही बोलणार इतक्यात अनुजा च म्हणाली,"काही हरकत नाही. पटकन जेवतो आणि मग जातो टीव्ही बघायला." आई ओरडेल की काय या भीतीनी तिनी आधीच पांढरं निशाण फडकावलं. तिची ती धांदल बघून नम्रता ला अचानक तिच्यावर खूपच प्रेम आलं.. तिला उचलून खुर्चीवर बसवत नम्रता म्हणाली, "गुड गर्ल! चला आता दोघी जेवा बघू लवकर."

"बाबा येऊ दे ना..एकत्रच जेवू.. मग स्विमिंग ला पण जायचंय ना आम्हांला!" नंदिनीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. तिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे 'हिरो' होते.. त्यांच्या बद्दल बोलताना ती नेहेमीच खूप खुश असायची.

दर शनिवारी मुलींच्या शाळेचा हाफ डे असल्यामुळे दुपारी सगळेजण एकत्रच जेवायचे.एकीकडे जेवण आणि एकीकडे गप्पा !! शाळेतल्या गमतीजमती , मित्र मैत्रिणींच्या तक्रारी, त्यांची 'so called' सिक्रेट्स,अभ्यासात मिळालेले गोल्डन स्टार्स........जेवण संपायचं पण चौघांच्या गप्पा नंतरही कितीतरी वेळ चालूच असायच्या. कधीकधी तर बाप लेकी एकमेकांत इतके गुंग व्हायचे की ते नम्रताला चक्क विसरून जायचे...पण या गोष्टीचा तिला कधीच राग किंवा दुःख नाही वाटलं. उलट त्या तिघांना असं त्यांच्याच विश्वात गुरफटलेलं बघून तिला खूप समाधान वाटायचं. तिला जाणीव होती की या सगळ्या गप्पा, चेष्टा मस्करी, तिघांचं असं एकत्र वेळ घालवणं..... हेच सगळं नंतर बहुमूल्य आठवणींच्या रुपात त्यांच्यासमोर येणार होतं. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा ते चौघं असा एकत्र वेळ घालवायचे तेव्हा तेव्हा नम्रता ते सोनेरी क्षण कॅमेरात टिपून ठेवायची. तिच्या या सवयीमुळे मागच्या आठ नऊ वर्षांत अशा कितीतरी आठवणी फोटोग्राफ्स च्या रुपात तिनी अल्बम्स् मधे साठवून ठेवल्या होत्या. संग्राम गमतीनी म्हणायचा देखील," आपल्या लग्नात पण एवढे फोटो नव्हते काढले गं! तुझ्या या छंदामुळे आपल्या घरातलं सामान वाढतंय आणि कितीतरी फोटो स्टुडिओ वाल्यांची घरं चालतायत."

पण नम्रता हे सगळं ऐकूनही न ऐकल्यासारखं करायची. कारण तिला माहित होतं की संग्राम जरी वर वर हे सगळं म्हणत असला तरी प्रत्येक वेळी बाहेरगावी जाताना तो त्यातले लेटेस्ट अल्बम्स् हळूच -कोणाच्या नकळत - आपल्या सामानात ठेवून घ्यायचा. म्हणजे त्याला असं वाटायचं की 'कोणाला कळलं नाही', पण नम्रताच्या नजरेतून कधीच काहीच सुटायचं नाही.

तरीही तिनी कधी त्याला तसं बोलून नाही दाखवलं.

कारण ती संग्रामला पूर्णपणे ओळखून होती. स्वतः च्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं हा त्याचा स्वभावच नव्हता. लग्नानंतर काही दिवसांतच नम्रताला तसं जाणवलं होतं. एक दोन वेळा ती बोलली देखील होती त्याच्याशी याबद्दल. पण त्याचं उत्तर ठरलेलं होतं.."हम तो ऐसे ही हैं।"

त्याच्या 'ऐसे ही' असण्याबद्दल तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याचा स्वभावच तसा होता ;आणि हे ती जाणून होती. पण तरीही का कोणास ठाऊक , तिला कधी कधी त्याची काळजी वाटायची. वाटायचं, अशा सगळ्या भावना मनात ठेवून ठेवून त्याला त्रास तर नाही ना होणार ! खास करून दुःख, राग या आणि अशा निगेटिव्ह भावनांचा वेळीच निचरा नाही झाला तर भविष्यात तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो.. असं कुठेसं वाचलं होतं तिनी.

आणि गंमत म्हणजे नम्रताचा स्वभाव अगदी याउलट होता. संग्राम जितका गप्प आणि शांत तितकीच ती बडबडी ! दिवसभर तिच्या तोंडाची टकळी चालू असायची. तिची नणंद नेहेमी म्हणायची," तुमची म्हणजे अगदी 'रब ने बना दी जोडी' आहे....संग्रामचा बोलण्याचा quota तू पूर्ण करतेस ! "

संग्रामच्या अशा धीरगंभीर स्वभावासाठी त्याच्या आईकडे मात्र एक स्पष्टीकरण ठरलेलं असायचं," अगं, आधी खूप खेळकर स्वभाव होता त्याचा.. पण NDA मधे गेल्यापासून असा झालाय."

त्यांच्या या विधानाला घरातील इतर सगळ्यांचा आणि मुख्य म्हणजे खुद्द संग्राम चा ही अगदी पूर्ण विरोध होता, पण त्या मात्र आपल्या मतावर ठाम असायच्या...'माँ का प्यार...और क्या?" असं म्हणून नम्रता नेहेमी हसून साजरं करायची.

आत्ताही हे सगळं आठवून तिला हसू आलं.

"अगं आई, मी विचारतीये की बाबा कधी येणार...त्यात हसण्यासारखं काय आहे?" नम्रताच्या हाताला स्पर्श करत नंदिनी नी विचारलं.

"अं, काय गं बेटा? काय म्हणालीस ? सॉरी, मी दुसराच कुठलातरी विचार करत होते." नम्रता भानावर येऊन म्हणाली.

'आज असं का होतंय? छोट्या छोट्या गोष्टींमुळे अशा आठवणींच्या लडी का उलगडतायत मनात?' नम्रता विचारात पडली. तेवढ्यात अनुजा नी तिचा चेहेरा आपल्याकडे वळवून घेत विचारलं," सांग ना, बाबा कधी येणार ?"

आता मुलींना खरं काय ते सांगायची वेळ आली होती. आपलं सगळं संभाषण कौशल्य पणाला लावून नम्रता म्हणाली," अगं, खरं म्हणजे बाबा आज लवकरच आले होते .. पण त्यांना आज काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे..एकदम अर्जंट.. आणि म्हणून त्यासाठी सगळ्याच अंकल्स ना परत बोलावलंय ऑफिसमधे. काम झालं की लग्गेच परत येतील बाबा."

" म्हणजे आज ते स्विमिंग करता नाही येऊ शकणार?" नंदिनीनी हिरमुसल्या स्वरांत विचारलं.

तिचा हात हातात घेऊन नम्रता म्हणाली," नक्की कसं सांगणार ना? काम लवकर संपलं तर येतीलही कदाचित. पण मला एक आयडिया सुचलीये. मी येऊ का तुमच्या बरोबर ? आज तुम्ही दोघी मिळून मला underwater पोहायला शिकवा. मी कितीवेळा ट्राय केलं पण तुमच्यासारखं जमतच नाही मला. कुठे चुकतं काय माहीत ! प्लीज, आज शिकवा ना तुम्ही मला !"

नम्रताची ही युक्ती सफल झाली. 'आज आपण आईला शिकवणार' या नुसत्या कल्पनेनीच दोघी मुली खूप खुश झाल्या आणि पटापट जेवण संपवून स्विमिंग ला जायची तयारी करायला पळाल्या.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users