वागणुकीतले संकेत

Submitted by पशुपत on 22 January, 2019 - 01:03

मला आठवते , आमच्यावर लहानपणी असे संस्कार झाले होते कि कुणाकडे गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये , खायला मागू नये , खायला दिले तर थोडेसे खावे , आपल्यामुळे किंवा आपल्या कोणत्याही क्रुतीमुळे ज्यांच्याकडे आपण आलो आहोत त्याना कसल्याही प्रकारचा त्रास किंवा तसदी होवू नये याची नितांत काळजी घ्यावी. जेवायच्या वेळी शक्यतोवर कुणाकडे जाऊच नये. आभ्यासाला किंवा खेळायला कुण्या मित्रा कडे गेलात तर निघताना मांडलेला सगळा पसारा आवरून मगच बाहेर पडायचं !
मोठे झाल्यावर , कळायला लागल्यावर लक्षात आले कि आमची आई किती विचारी होती. किती विचारपूर्वक हे सारे तिने आम्हाला शिकवले ! दुसर्यांकडे गेल्यावर तुमचीच बडदास्त ठेवण्यात त्यांचा वेळ गेला तर शांतपणाने बसून गप्पा , विचारपूस , साहित्य-नाट्य-संगीत यावर चर्चा , माहितीची देवाण- घेवाण कशी होणार? टी व्ही वरचे कार्यक्रम - क्रिकेटच्या मॅचेस एकत्र बसून त्या घरच्या ग्रुहीणींना कशा बघायला मिळणार ? तुमचे केलेले पसारे आवरण्यात त्यांनी का वेळ घालवायचा ? त्यानाही त्यांचे उद्योग , नोकर्या आहेत , त्यांच्या हॉबीज आहेत , विरंगुळा आहे.... त्या सगळ्याचा आदर तितकाच महत्वाचा ... त्या कशात बाधा येऊ न देणे ही आपली जबाबदारी नाही का !
अशा शिस्तबद्ध वागणुकीमुळे शेजारी - पाजारी , मित्र ,नातेवाइक सगळ्यांच्या प्रेमाबरोबर नेहमी नकळत कौतुकाची शाबासकी मिळत गेली. आज पर्यंत सगळ्यांशी अतिशय घनिष्ट नाते-संबंध जोपासले गेले.

आजकाल मात्र वेगळेच चित्र दिसते. मुले वावसटपणे दुसर्यांच्या घरात धुडगूस मांडतात , वस्तू बिनधास्तपणे घेतात , हाताळतात , कुठेही कशाही टाकतात, आरडा ओरडा - किंचाळणे हेही बरोबरीने चालू असते.. आणि त्यांचे पालकही त्याना काही बोलत नाहीत , उलट थोडं जास्तच झालं तर , कौतुकाने " तो ऐकतच नाही" असे लाडाने म्हणतात ! आणि मोठ्याना या गदारोळात एक अक्षर शांतपणे बोलता येत नाही !

पुढे जाऊन आता अशी एक वेळ आली आहे कि अतिशय घनिष्ट प्रेम किंवा मैत्री म्हणजे दुसर्याला उगाचच खोड्या काढत त्रास द्यायचा , Embarrass करायचे... आणि त्यानेही ते 'प्रेमाने' सहन करायचे ... अशी व्याख्याच झालिये जणू ! आजकाल अशा जाहिरातीही पहायला मिळतात... आइसक्रीम दुसर्यासमोर धरायचे आणि तो खाऊ लागला कि त्याच्या तोंडासमोरून काढून घेऊन स्वतः च खायचे ... आणि फिदी फिदी टाळ्या देत हसायचे !

खूप जवळचा , खूप प्रेम म्हणजे हे 'असे वागण्याचा हक्क', हे कुठून आले ?

मला प्रश्ण पडतो कि फक्त मलाच हे बोचते का माझ्यासारखे इतरही आहेत कुणी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिस्तीचे संकेत लोकांना जाचक वाटतात. शिस्तीचा आग्रह धरणारी माणसे समाजात अप्रिय होतात. पालकनीती नावाचे मासिक पालकांना सुसंस्कृत करायच काम करीत असे. आत्ता काय परिस्थिती आहे माहित नाही.

मी आहे कि तुमच्यासोबत!! Lol

> पुढे जाऊन आता अशी एक वेळ आली आहे कि अतिशय घनिष्ट प्रेम किंवा मैत्री म्हणजे दुसर्याला उगाचच खोड्या काढत त्रास द्यायचा , Embarrass करायचे... आणि त्यानेही ते 'प्रेमाने' सहन करायचे ... अशी व्याख्याच झालिये जणू ! > हे पूर्वीदेखील होत होते. माझा अनुभव असा आहे कि उत्तरेकडचे लोक असं जास्त करतात.

थोड्याश्या ओळखीवर फोन करकरून "खाना खिला दो" म्हणून मागे लागायचं.
कधी तर बोलवले नसताना, आधी फोन न करता असंच जेवणाच्या वेळी लोकांच्या घरात घुसायच, अगदी स्वयंपाक घरापर्यंत पळत जायचं, गॅसवर शिजत असलेली भांडी उघडून बघायची, आरामात पाय पसरून हादडायच, होस्टच्या हातातला रिमोट हिसकावून घ्यायचा, रात्री १०.३०-११ वाजून गेले तरी टीव्ही बघत बसायचं...
आणि त्रयस्थ मी समजवायचा प्रयत्न केला तर उलटं मलाच "मेहमाननवाजी कोई चीज होती है"
"तुमच्या घरी बोलावून करा कि मेहमाननवाजी" म्हणलंतर "वो लडकी है (जिच्या घरी घुसला होता ती) उसने करना चाहिये ये सब"

#$&@^@&&

ळात पालकांच्याच शिस्तीच्या संकल्पना बदलल्या आहेत आजकाल.>>>

अगदी! पुर्वी शेजारी पाजारी रहाणार्‍या ज्येष्ठांचा योग्यता समजून मान राखला जायचा. त्यांनी रागे भरले तर ऐकायचे त्यांनी घरी सांगू नये ह्याची एक भीती असायची. आजकाल घरातले आजी आजोबा मुलांवर रागावले तर आई वडीलांना चालत नाही!!

ऍमी अगदी अगदी.'खाना खिला दो' वाले तर कधीकधी आपल्या ऑफिसमध्ये एकदाच लंच ला भेटलेले वगैरे असतात.
तुझं ते माझं आणि माझं ते पण माझंच.

अगदी खरंय, आजकाल पोरं दुसऱ्याच्या घरी काशी वागतात ते आपण वागलो असतो तर किती बेदम मार खाल्ला असता हेच जाणवत राहते
मार तर सोडा आई वडील च्या डोळ्यातील जरब पुरेशी असायची शिस्तीत वागायला

आमच्या पुण्यातल्या होस्टेलमधे गोव्याची एक मुलगी होती. शिक्षणानंतर एक वर्षनंतरही नोकरी मिळेना (२००० ते ०४ पर्यंतची मंदी) म्हणून ती परत घरी जाणारहोती. तर तिच्या रुममेट (एक मध्य प्रदेशची आणि दुसरी गुजरात)हात धुवून तिच्या मागे लागल्या "आम्हाला गोवा फिरवून आण म्हणून". मग त्या गरीब बिचार्या मुलीने पड खाल्ली. समोरच्या रुममधे मी रहात होते. तिने मलापण invite केलं "त्या दोघी येणार आहेतच, तुपण ये"
तिच्या घरी गेलो तर आईला आणि मोठ्या बहिणीला अर्थराईटीसमुळे जास्त हालचाल करता येत नव्हती. तीन बहिणी, दोन भाऊ असे मोठे कुटुंब.
ते बघून मी "चला आपण बाहेर फिरायला जाऊ" म्हणत यांना घराबाहेर काढायचा प्रयत्न केला. फक्त झोपायला आणि सकाळचे आवरायला इकडे यायचे, दिवसभर बाहेरच राहायचे, म्हणजे यांना आपली खाण्यापिण्याची बडदास्त ठेवायला नको असा माझा विचार होता.
तर ती गुजराती मुलगी मलाच झापायला लागली "तुला दिसत नाहीय का यांचे घर कसे आहे. ते कसे घेऊन जाणार तुला फिरायला?"
मी म्हणलं "बाई ग त्यांचं घर बघूनच म्हणतेय चला बाहेर. आणि त्यांनी कशाला फिरवायला पाहिजे?"
तरी काही त्या दोन्ही पोरींनी ऐकलं नाही. फिरवणे, खाणे पिणे सगळे त्यांच्याकडून इमानेइतबारे करून घेतले Sad

पूर्णपणे सहमत आहे लेखातल्या विचारांशी. मागे माझ्या मुलाचा वाढदिवस घरी साजरा केला तेव्हा ह्या सगळ्याचा चांगलाच अनुभव आला. सर्व मुले चांगल्या खात्यापित्या घरची, सुसंस्कृत(?) सुशिक्षित घरची असून अशी वात्रट आणि अनिर्बंध वागतात की बास. असाच अनुभव प्रत्येकाच्या घरी वाढदिवस असला की येतो. आम्ही तर पक्के ठरवले की ह्यानंतर कुणालाही घरी बोलवायचेच नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना तसेच संस्कार दिलेत जसे तुम्ही पहिल्या परिच्छेदात सांगितलेत, त्यामुळे नेहमी आम्हाला आमच्या मुलांच्या शांत आणि जबाबदारीने वागण्याचे कौतुकच ऐकायला मिळते, ते चांगले वाटत असले तरी ही गोष्ट सगळ्या मुलांसाठी नॉर्मल असायला हवी ना? आता 'नॉर्मल' वागणेही 'विशेष' वाटू लागले आहे.

ह्यावर काय उपाय आहे पण? आजचे पालक लोक अशाच कडक शिस्तीत (जी त्यांना लहानप्णी अजिबात आवडत नसावी) वाढलेत, त्यामुळे अशी शिस्त मुलांना लावणे चुकीचे असे त्यांना वाटत असावे. त्यातून ढील देत आहेत स्वतःच्या मुलांना.

<< ऍमी अगदी अगदी.'खाना खिला दो' वाले तर कधीकधी आपल्या ऑफिसमध्ये एकदाच लंच ला भेटलेले वगैरे असतात. >> सर्वसाधारणपणे कुणाला प्रमोशन मिळालं किंवा काही पुरस्कार - पारितोषिक मिळालं तर सगळे त्याच्याकडे पार्टी मागून त्याला बळेच खड्ड्यात घालतात .. आमच्या एका मित्राने आमच्यात नवा पायंडा पाडला कि बाकीच्यांनी मिळून पार्टी करायची आणी त्याला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवायचे !!

माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या घरी राहायला मुलांसकट...
मुलांमधे सगळ्यात जी मोठी होती (वय १४) तिने घरी आल्या क्षणा पासून प्रचंड पसारा/ पदार्थांची नासधूस ( मी काही करून दखवते ह्या विचाराने ऊ. स्लाईम बनवणे), किचन रोल्स उडवणे, अ‍ॅल्युमिनियम फॉईल पूर्ण पसरून पाहणे , ईतर मुलांच्या अन्गावर पाणी ऊडवणे ई प्रकार मजेच्या नावाखाली केले. ती उच्चभू कुटुंबातली आहे आणि म्हणून वस्तूंची किम्मत नसावी का?
तिची आई म्हणजे माझी मैत्रीण खूप ऑर्गनाईझ्ड असून तिच्या मुलीकडे बेसिक मॅनर्स का नन्व्हते?।हॉटेल मधेही टिश्यू पेपर च्या होडी बनवून ग्लास मधल्या पाण्यात सोडणे ई पाहून मला धक्का च बस ला . रिसोर्सेस चं महत्व ह्याना शाळेत शिकवलं नसेल का?
कुणाकुणाला दोष द्यावा मलाच कळलं नाही

मिळतंय म्हणून वाटेल तसं उधळायच नाही आणि आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये या गोष्टी मुलांना शिकवायला हव्यात, वस्तूंची किंमत आणि श्रमांची किंमत मुलाना लहानपणीच ओळखायला शिकवलं पाहिजे. जुन्या काळच्याएवढी कडक शिस्त मला वाटतं कुणाच्याच घरी नसेल पण पालक म्हणून स्वतःची सुद्धा जरब बसवली गेली पाहिजे. तसंच मागेल तेव्हा मिळत नसते या दुनियदारीची ओळख करून द्यायला पाहिजे, पुढे जाऊन मुलांना कष्टाची सवय च लागली नाही तर अवघड जाणार.

अजून एक म्हणजे:
घरी अतिशय स्वच्छता बाळगणाऱ्या पालकांना बाहेर मुलाने रस्त्यावर चॉकलेट किंवा चिप्स चे प्लास्टिक रॅपर टाकले तरी काही वाटत नाही.'मुलाने टाकले' आणि 'बाहेर टाकले' या बेसिस वर पोरं कचरा करत असताना पालक बरोबर मख्खपणे चालत असतात.मुलाने टाकलेला कचरा आपण उचलून कचरा कुंडीत टाकावा,त्यांनी कचरा टाकण्याआधी लक्ष ठेवून इथे टाकू नकोस, कचरा कुंडीत टाक किंवा माझ्या हातात दे सांगणे,निदान पुढचा कचऱ्याचा हफ्ता रस्त्यावर जाण्यापासून रोखणे वगैरे काही नाही.'मी स्वतः नाही टाकला' म्हणजे सगळं माफ.काही बोललं तर 'सगळे टाकतात' 'आपण सफाई कर्मचाऱ्याना यासाठी पगार देतो' म्हणायचं.
(आपण टॅक्स भरतो त्यात मनपा च्या शववाहिनी चाही खर्च होत असेल.म्हणून तो वसूल करायला लोक मरायला तयार असतील का?)

वावसटपणे>> हा शब्द आवडला आहे.

इथे आम्हीच / मीच कसा शिस्तबद्ध आणि दुसरे/ते हे / अमके तमके कसे बेशिस्त असे किस्से लिहायचे ना?

काय हिस्टरी वगैरे माहीत नाही बा.
मी करत असलेल्या बऱ्याच गोष्टी इतर जास्त कडक शिस्तीच्या घरात बेशिस्त मानल्या जात असतील.ते किस्से ते लोक सांगूदे मी नाही सांगणार ☺️☺️

आपण टॅक्स भरतो त्यात मनपा च्या शववाहिनी चाही खर्च होत असेल.म्हणून तो वसूल करायला लोक मरायला तयार असतील का?)>>
Biggrin Biggrin Biggrin
अगदी.. लेखकाला पडलेला प्रश्न मलाही काही वर्षे पडलेला आहे.. आणि अशी वावसट वागण्याची तऱ्हा आताच्याच नव्हे तर यापूर्वीच्या देखील पिढ्यांमध्ये पाहिली आहे.. फक्त प्रमाण वाढले आहे

मला .'शिस्त' अभिप्रेत नाहिये(माझ्याकडून तो शब्द वापरला गेलाय पण..)... थोडेसे 'शिष्टाचार' कल्पनेच्या जवळचे काहीतरी ... योग्य शब्द सुचत नाहीये.

वावसट म्हणजे काय?

===
सिम्बा,
हिस्ट्री नसेलही लेखकाच्या मनात; पण मी मला सोयीस्कर असल्याने https://www.maayboli.com/node/68710 हा इतिहास आहे असे समजून घेतले Wink

<< हिस्ट्री नसेलही लेखकाच्या मनात; पण मी मला सोयीस्कर असल्याने https://www.maayboli.com/node/68710 हा इतिहास आहे असे समजून घेतले >>

मी नाही वाचलेला हा धागा .. या विषयाशी संबंधित काही आले आहे का त्यात ?

मला प्रचंड धिंगाणा घालणारी, आरडा ओरडा करणारी, स्वतःच्या मनासारखी वागणारी लहान मुले (१० वर्षाच्या खालची) आवडतात. . त्यामुळे मी त्यांच्या बाबतीत तुमच्याशी असहमत. :). तोपर्यंत मुले खर म्हणजे पालक त्यांना जसे वागू देतील तशी वागत असतात. पण ती कशीही वागली तरी मला काही फरक पडत नाही. Happy

मला प्रचंड धिंगाणा घालणारी, आरडा ओरडा करणारी, स्वतःच्या मनासारखी वागणारी लहान मुले (१० वर्षाच्या खालची) आवडतात.>>>>>>>>
विक्रमसिंह, स्वतःची की दुसर्यांचीपण. कारण असं वागणारी दुसर्‍यांची मुलं बेशिस्त असतात आणि आपली मुलं शिस्तीची Happy

> मी नाही वाचलेला हा धागा .. या विषयाशी संबंधित काही आले आहे का त्यात ? > नसेल वाचला तर ठीकच आहे. आवर्जून वाचण्यासारखे काही नाही त्यात.

पशुपत, तुमच्या धाग्याशी सहमत.
विक्रमसिंह, तुम्ही म्हणताय तशी मुलं वागेनात का कशीही पण स्वतःच्या घरात. दुसर्‍यांच्या घरात वाट्टेल तसा धुडगुस घालत न जुमानणारी व्रात्य मुलं मुळीच झेपत नाहीत. माझं बीपी हाय व्हायला लागतं. माझी मुलं मोठी झाल्यामुळे आता एकूणच हा गोंधळ नकोसा होऊ लागला आहे.

अनु, तुझी पोस्ट खूप छान आहे.

पशुपत, लेखाचा विषय आणि तुमचं म्हणणं थोडक्यात लिहिलं आहे ते आवडलं.

आजकालची मुलं जरा जास्तच बदतमीज असतात हे खरं आहे. Sorry to say पण हे मी मध्यमवर्गीय मुलांच्या बाबतीत जास्त नोटीस केलं आहे. कदाचित अभावातून वाढलेले पालक आता पैसा मिळायला लागल्यावर आणि लहानपणाच्या शिस्तीच्या आलेल्या तिटकार्यातून मुलांना जास्तच स्वातंत्र्य देतात आणि वाह्यात लाड करत असतील का?

साधं उदाहरण - आमच्याकडे होणाऱ्या पार्टीज मध्ये एक रूल आहे की जिथे पालक बसतात तिथे मुलांनी स्ट्रीक्टली जायचं नाही. मुलांच्या पार्टी प्लेसमध्ये यच्चयावत सगळ्या वस्तू, खाणंपिणं, tv, gadgets, आणि मेड असते. त्यांना काही सांगायचं असेल किंवा हवं असेल तर मेडने सांगायला यायचं. (उद्देश - ,पालकांना मोकळेपणा आणि मुलांनी ड्रिंक्स किंवा स्मोकिंग झोन मध्ये येऊ नये) हा रूल नेहमी येणारे सगळे पाळतात / मुलांना पाळायला लावतात, कारण त्यांना माहीत आहे की आम्ही या नियमाच्या बाबतीत खूप पर्टीक्युलर आहोत. पण काही गेस्टस, 'तो /ती ऐकतच नाही, येऊ देत' म्हणणारे पण असतात. जेव्हा होस्टने नो किड्स पार्टीच आमंत्रण दिलं असेल तेव्हा मुलांना आणणं किंवा होस्टने काही नियम सांगितले असतील तर ते न पाळण, हे पाहूनच मुलं पुढे शिकत असतात.

पुढे मोठी झाल्यावर हीच मुलं ऑफिसमध्ये अगदी मॅनरलेस उठून दिसतात, रादर डोक्यात जातात. मोठं उदाहरण म्हणजे कॉन्फरन्स रूममध्ये चहा / कॉफी प्यायल्यावर मध्यभागी मिटिंग टेबलवर कप्स सोडून जाणे, अगदी डीस्पोजेबल कप्स असताना ही वेस्ट बिन मध्ये न टाकणे. माझ्या केबिनमध्ये भेटून जाणारा माणूस उठल्यावर चेअर कशी सोडून जातो यावरून पण मी त्याची लायकी ठरवते, किंवा कॅन्टीनमध्ये क्यू मध्ये लोक कसे वागतात हे सगळं त्यांच्या लहानपणी त्यांना कशी शिकवणूक मिळाली आहे त्यावर अवलंबून असते. केबिनमध्ये आल्यावर समोर उभं राहून बोलण्याऐवजी तुमच्या चेअरच्या बाजूला किंवा तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये शिरून बोलणारी माणसं बेसिक एटिकेट्स शिकलेले नसतात. आणि मोठेपणी असणारे हे फ्लॉज लहानपणी पालकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वागणुकीतून कसं शिकवलं आहे त्यावर अवलंबून असते. म्हणून लहानपणी मुलांना शिस्त आणि मॅनर्स /एटिकेट्स शिकवणं अगदी जरुरी आहे

केबिनमध्ये आल्यावर समोर उभं राहून बोलण्याऐवजी >>>>>
त्यांना प्लिज हॅव अ सीट म्हणणं बेसिक एटिकेट्सचा भाग नाही का?
मलाही माझ्या केबिनमध्ये कुणी अगदी जवळ आलेलं नाही चालत, पण प्रत्येक आलेल्या व्यक्तीला उभं ठेवण माझ्या तत्वात नाही बसत.
किंबहुना आपल्या खुर्चीसमोरची जागा त्यांना दिली, की आपल्या कम्फर्ट झोनवर अतिक्रमण करायचं कारणच उरत नाही. अटलिस्ट ४ ५ फूट तरी स्पेस उरतो.
कुणाशी उभ्याने बोलावं लागणार असेल माझ्या केबिनमध्ये, तर तेही मी उभ्याने बोलतो, बसून नाही.

Pages