हस्तव्यवसाय: एक दहशतीचे साम्राज्य

Submitted by mi_anu on 21 January, 2019 - 05:36

मुलांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असतात.आपल्या मनात 'ते नवं पार्लर कसं आहे बघून येऊया' किंवा 'अमक्या पोराच्या बड्डे पार्टीला पोराला सोडून मस्त मॉल मध्ये (मुलाच्या)बापाबरोबर फिरुया' असे विचार घोळत असतात.बापांच्या मनात 'चला ऑफिसातून घरी लवकर येऊन मस्त मॅच बघू' इ. विचार घोळत असतात.इतक्यात शाळेतून ती नोटीस येते आणि नियती खदखदून हसते!

"कचऱ्यातून कलानिर्मिती.तुमच्या मुलांबरोबर दळणवळणाची साधने आणि शहर या विषयावर हस्तव्यवसाय म्हणून एक 3डी मॉडेल बनवून परवाच्या उद्या सकाळी शाळेत पाठवा.रोल नंबर 1 ते 15 ने हवेतील दळणवळण,16 ते 30 ने पाण्यातील दळणवळण आणि 30 पासून पुढच्यानी रस्त्यावरील दळणवळण बनवून आणावे.सूचना: मॉडेल चालते असले पाहिजे."

आणि पालकांच्या स्वप्नांचे फुलपाखरू होऊन जमिनीवर लोळायला लागते.मूल '5 मिनिट क्राफ्ट' चे फेसबुक व्हिडीओ दाखवून दर क्षणाला आपल्या कल्पना मिग विमान,राफाल, बोईंग 737,अंतराळयान,पेगासस घोड्याचा उडता रथ या रेंज मध्ये झपाट्याने बदलत असते.'5 मिनिट क्राफ्ट व्हिडीओ बघून आपण केलेल्या वस्तू त्या व्हिडीओ मधल्या सारख्याच बनतील' ही 'सरकार बदलेल आणि सगळं काही मस्त होईल' याच्या खालोखाल जगात पसरलेली मोठी अंधश्रद्धा आहे. मुलाला 5 मिनिट क्राफ्ट च्या गुलाबी आकाशातून जमिनीवर आणेपर्यंत आपल्या मावसजावेच्या नणंदेच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचे बारसे दूरगावी आहे आणि त्याला आपल्याला उद्या एका दिवसात जाऊन यायचे आहे असा शोध लागतो.म्हणजे राहिला 1 दिवस.1 दिवसात कचऱ्यातून कला बनवायला चांगला न चेपलेला,न मळलेला स्वच्छ कचरा घरात हवा.

आजूबाजूच्या दुकानांवर आजूबाजूच्या सोसायटीतल्या पालकांची धाड पडते.आपण 'सुरणाचे फायटर प्लेन','मक्याचे जेट विमान' वगैरे अकल्पनिय विचार करत असताना मूल अचानक 'आई माझ्या ग्रुप ला रोल नंबर प्रमाणे रोडवेज ट्रान्सपोर्ट आहे' जाहीर करतं आणि अमूल ताक किंवा फ्रुटी च्या खोक्यांची आगगाडी बनवण्याचा प्लॅन जाहीर करतं.आपण 'त्यात काय मोठं' म्हणून 2 अमूल ताक,2 फ्रुटी आणि प्रोटीन म्हणून उलट्या उभ्या जॉन अब्राहम ची जाहिरात असलेलं सोफिट सोया मिल्क खरेदी करतो.नियती इथे पण खदखदून हसत असते.(या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत.)

बारश्याला जात असताना मन भूतकाळात जातं.आपण गृहकृत्यदक्ष वगैरे नसताना प्रि स्कुल होमवर्क म्हणून बटनांचं कासव, लोकरीच्या अनेक रंगाच्या तुकड्याचा कागदावर ससा,पेन्सिल शेव्हीन्ग चं घुबड,भेंडीचे ठसे काढून फुलांचा गुच्छ,कापसाचा पांढरा हत्ती(शाळा वाल्यांची समयसूचकता..त्या वर्षी फी वाढवल्याने तसेही ते पालकांसाठी पांढरा हत्तीच झालेले असतात.),बांगड्यांचं बदक, रिबन ची राजकन्या असे अनेक गड सर केलेले असतात.घराबाहेरच्या व्हरायटी वाल्या कडून त्याच्या कडची सगळ्या रंग आणि साईझ ची सगळी बटणं विकत घेऊन नंतर दुकानात बटणं घ्यायला आलेल्या पालकांचा पोपट करणे,चालू वर्षाचे फुलांचे कॅलेंडर फाडून कागदावर निसर्ग बनवणे,नवऱ्याच्या घड्याळाच्या खोक्यातून बुडाचे पांढरे सॅटिन उचकटून कागदावर त्याचा राणीचा फ्रॉक बनवणे, ऑफिसात केक कापल्यास त्या खालची चंदेरी कागद चिकटवलेले वर्तुळ साबणाने धुवून घरी आणून त्यावर मंडल डिझाइन काढणे वगैरे कला कौशल्ये पालकांच्या अंगी येत जातात.

शाळेच्या पालकांच्या व्हॉटसप ग्रुप वर सर्वांचे हताश उदगार चालूच असतात.अगदी 'सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट देते' म्हणून शाळा बदलण्यापर्यंत टोकाला जाऊन होते.तितक्यात तमक्या आय सी एस ई बोर्ड च्या शाळेत 7 वी च्या मुलांना प्रोजेक्ट म्हणून एक अंकी इंग्लिश संगीत नाटक लिहायला आणि ऍक्ट करायला सांगितले हे ऐकून 'नाय नाय, सी बी एस ई कित्ती छान, मुलांना किती मस्त काय काय करायला सांगतात' वर गाडी येते.

इथे पमीच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचं बारसं आवरून आपण घरी उशिरा येतो.दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि सकाळ पासून घरात आगगाडीचे वारे वाहायला लागतात.फ्रुटीच्या टेट्रा पॅक मध्ये थेंबभर राहिलेले फ्रुटी जिभेने चाटणे, मग मांडीवर पॅक झटकून पॅन्ट ला फ्रुटीचे डाग पाडणे वगैरे प्रकार करून होतात.एकदाचे डबे रिकामे करून त्याला चार्ट पेपर चिकटवून होतात.आता खिडक्या.खिडक्या करायला टूल बॉक्स मधले कटर घ्यावे तर ते आपणच ऑफिसात 'दिलशेपड इकोफ्रेंडली कंदील' स्पर्धेला नेलेलं असतं आणि ते टीम मधल्या चमन च्या मित्राने कुरियर चं पार्सल कापायला नेलेलं असतं.

मग सुरीने कॅन च्या खिडक्या भोसकणे चालू होते.'कचऱ्यातून कला' आपल्या 'सुट्टीचा कचरा' करणार आहे हा अंदाज आता आलेला असतो.'2 तासात पूर्ण करून उरलेल्या वेळात आराम' चे 'रात्री झोपेपर्यंत संपले पाहीजे' होत असते.जेरीस येऊन आगगाडी ची कार बनवून विषय संपवून टाकावा किंवा फक्त इंजिन बनवून 'बाकी गाडी पुढच्या स्टेशनला आहे' सांगणे असे पर्याय मनात येतात.पण आता छोट्या कलाकारांना आगगाडी चढलेली असते.खिडक्या बनवून डबे जमिनीवर ठेवल्यावर 'डबे चाकावर असतात' या शाश्वत सत्याची अनुभूती होऊन पांढरी झाकणे शोधली जातात.घरातल्या चिंच सॉस,शेझवान सॉस च्या बाटल्या उघड्या बोडक्या डोक्याने फिरायला लागतात.गाडीला 16 चाकं लागणार आणि आपल्याकडे कशी बशी 12 झाकणं आहेत असा शोध लागतो.मग मोठ्या डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी अमूल ताक होते ते) 4 चाकं आणि लहान डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी फ्रुटी होते ते) 2 चाकं लावायची ठरतात.'टेबलावरचं करकटक आण'म्हटल्यावर लहान कलाकार रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत बसतात.मग 'कंपास आण' सांगावं तर प्लास्टिक चा फक्त पेन्सिली असलेला कंपास आणून दिला जातो.शेवटी उठून कर्कटक घेऊन आल्यावर चाकांची हिंसा करणे चालू होते.

चाकांना भोसकताना हिरोला वाचवायला पुढे आलेल्या साईड हिरोईन सारखा सोफा मध्ये येणे वगैरे माफक गोंधळ होऊन सर्व चाकांना भोकं पाडून होतात.चाकात लाकडी बार्बेक्यू स्टिक खुपसून व्हील शाफ्ट बनतो.चाक आणि व्हीलशाफ्ट च्या जोडावर वर केक च्या आयसिंग सारखं बदाबदा फेव्हीकोल ओतून सगळी चाकं वाळायला ठेवली जातात.आपण चाकं नसलेली बुलेट ट्रेन बनवायला हवी होती ही पश्चातबुद्धी होते.

चाकं लावून झाल्यावर ज्या गरीब डब्याना दोनच चाकं मिळालीत ते टपकन एका बाजूला तिरके होतायत असा शोध लागतो.मग त्या डब्याला खालून अजून जखमा करून त्यात दोन लाकडी बार्बेक्यू स्टिक चे तुकडे आधाराला घालून डबे उभे होतात.(इथे आपण रेल्वे च्या कारखान्यात इंजिनिअर नसल्याबद्दल नवरा ईश्वराचे आभार मानतो.)

या सगळ्या दैवी लीला करताना सामान्य मनुष्य बनून जेवण बनवणे, जेवणे,लहान कलाकार नाचाच्या क्लास ला सोडणे,पडदे धुणे,कपडे इस्त्री ला देणे अशी भूतलावरची सामान्य कामं पण करावी लागतात.आता पेप्सी चा टिन जांभळे इंजिन बनतो आणि आपल्याला 'इंजिनाला पण चाकं लागतात' असा शोध लागतो.सुदैवाने शेजाऱ्यांनी जपून ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कामी येतात आणि निदान इंजिनाला तरी चार चाकं मिळण्याचं सौभाग्य लाभतं.

आता डबे एकमेकांना जोडणे.परत एकदा डब्यांच्या बाजू भसाभस भोसकल्या जातात.दिवार च्या अमिताभ ला गोळी मारण्याच्या जागेवर 786 चा बिल्ला असावा तसं या बाजूना टेट्रा पॅक बंद करताना एकावर एक आलेले 4 थर असतात.त्यामुळे डब्याचे कपलिंग बनवणे हे एक बिकट काम होऊन बसते.शेवटी भोक पाडून,त्यात सुतळी ओवून,सुतळी खिडकीतून बाहेर काढून त्याला बबल रॅप चा तुकडा बांधून सुतळी पक्की केली जाते.लहान कलाकार घरी नाहीत हे दुर्मिळ क्षण एकांतात एकमेकांबरोबर न घालवता सुतळ्या आणि सुऱ्या आणि फेव्हीकोल बरोबर घालवल्याबद्दल मनात 2 उसासे सोडले जातात.

"मी आगगाडी बनवली.आता रूळ तू बनव" म्हणून विश्वामित्र स्टाईल 'इदं न मम' करून झोपायला जावे तर बाहेरून हाका ऐकू येतात.दोन्ही इंजिनियरानी आगगाडी च्या निम्म्या लांबीचा लोहमार्ग बनवलेला असतो.शेवटी 'लोहमार्ग वळवून वळवून' गाडी पुठ्ठ्यावर माववून चिकटपट्टयांनी चिकटवली जाते.तितक्यात दोन चाकं प्राण सोडतात.इथे ग्रुप वर अग्नीबाणापासून ते विराट नौकेपर्यंत भारी भारी मॉडेल चे फोटो येत असतात.मुलाचे क्राफ्ट हा आता पालकांच्या इभ्रतीचा प्रश्न झालेला असतो.मुलीच्या आईने,मावशीने भरतकाम विणकाम केलेली रेडिओ कव्हर बनवून मुलगी बघायला आलेल्याला 'आमच्या सुलुने बनवलंय हो सगळं' सांगावं तसं सगळे निरनिराळे कलेचे नमुने साजरे करत असतात.शेवटी 'पुढच्या वेळी गुगल करून सोपी वस्तू निवडायची आणि सगळी स्वतः बनवायची' म्हणून लहान कलाकाराला दम दिला जातो.आणि सकाळी एकदाचं पारिजातकाच्या फुलासारखं जपत ती आगगाडी शाळेच्या बसमध्ये चढते.

परत येताना 6वी 7 वी च्या मुलांचे पालक भेटतात त्यांना 'तुमची मुलं सगळं स्वतः करत असतील ना प्रोजेक्ट' असं विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक हताश हास्य येतं ज्यात अनुभवी पालकांना 'डोंबल!घंटा!!सगळं स्वतः म्हणे!!' असे उद्गार ऐकू येतात.

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?
- अनुराधा कुलकर्णी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल!!! Lol
चांगला न चेपलेला,न मळलेला स्वच्छ कचरा>> Proud

हाहा !! मस्त हहपुवा
भारी एकेक पंचेस .. Rofl Rofl
बऱ्याचदा अगदी अगदी होत होतं

Aamachyaa shalet sagal shaletach karayach asat..
Faar kwachit ghari yet.
~sukhi palace

Lekh hahapuva

धाग्या कर्त्यांचं नाव वाचून लोकलच्या मरणाच्या गर्दीत वाचायला घेतला लेख आणि बायका बघायला लागल्या हिला वेड लागलय काय... अगदी हवा देखील जाणार नाही अश्या अवस्थेत गर्दीत निश्चल उभे असताना ही मुलगी गालातल्या गालात का हसतेय असा लुक ...(बाहेर होते म्हणून मोठ्याने नाही हसले) ....,मी ही लहानपणी दिवाळीच्या सुट्टीनंतर पहाटे 5 वाजता सांगितलं होतं ...,आकाशकंदील बनवून आणायला सांगितलं आहे शाळेत !!! आईसाहेब करवादल्या ऑफिसची घाई आणि हिला आत्ता सुचतेय ...तेव्हा सुट्टीला घरी आलेले मामाश्री धावून आले आणि एकदाचा आकाशकंदील शाळेत पोहचला !!! आम्हाला आमचे भावी आयुष्य दिसतंय ...छोटे कलाकार अजून बरेच लहान आहेत ...,तोवर फाईव्ह मिनिट क्राफ्ट्स चे व्हिडिओ पाहून ठेवेन म्हणते!!!

मस्त लिहिले आहे, वाचायला मजा आली Happy

अवांतर : आम्ही कधीच मुलाला प्रोजेक्ट्स साठी मदत करत नाही, अत्यंत वाईट दिसतो त्याचा प्रोजेक्ट पण workable असतो, आम्हाला खूप आवडतो आणि पूर्ण मार्क पण मिळतात. गिटार, pulley साठी विहीर आणि रहाट, कुतुबमिनार असं सगळं स्वतः केलं आहे. पुठ्ठ्याच्या विहिरीत पाणी पण घातलं त्याने नको सांगत असताना Sad माझी विहीर मी ठरवणार पाणी असणार आहे, असं उत्तर दिलं!

मी_अनु, नेहमीप्रमाणेच खुमासदार लेख आहे!
रच्याकने.... ते हस्तव्यवसाय की हस्तकला?

आधी शीर्षक वाचून मला वाटलं होतं की हल्ली घरी काही काही बायका ज्वेलरी वगैरे तयार करतात आणि विकतात त्याबद्दल आहे की काय लेख!

शीर्षक फार भारी आहे, आमच्याकडे जे काय ते शाळेतच असल्याने दोन्ही मुलाच्या बाबतित अस काही कराव लागत नाहिये पण देशात भाउ वहिनी दोघ मीळुन खिन्ड लढवतायत आणी लेकरु टोव्ही बघतय अशी द्रुष्य बघितल्याच आठवतय...
आम्च्याकडे जरा वेगळा पिळ मुलिच्या वेळेस होता, दुसरीत तिला विकेन्ड ला काय काय केल हे किमान ५ -१० ओळित लिहायला असायच, १-२ क्लासेस आणि त्याचा रीलेटेड होमवर्क , प्लेडेट याउप्पर वेगळ अस दर्वेळेस शोधुन काय लिहणार? बर बॉस्तनच्या थन्डित /स्नो मधे दरवेळेस कुठे जाणार?पण काहितरी लिहायलाच हव शिवाय लेकिला काहीही रिपिट नको असायच आणी काहीतरी फनच पाहिजे ही तिचीच अट मग काय बिल्ड अ बेअर्,चकी चिझ , म्युझियमच्या वार्‍या, बॉलिन्ग गेम्स , जीमनॅस्टिक्स चे इव्हेन्ट , लायब्ररी एव्हेन्ट, क्राफ्ट अस बरच दरवेळेस शोधुन ठेवाव लागायच.

धम्म्माल!
आम्ही तयारी करतोय. आमचं क्राफ्टवर्क १.२ वर्शे वयाचंय आजून

धमाल लेख Lol
हस्तव्यवसाय वाचून आधी वाटलेलं की कुठे पर्यटनाला गेल्यानंतर तिथल्या हँडमेड वस्तू पाहतांना त्यांच्या अव्वाच्या-सव्वा भाव सांगून लुबाडतात, त्याबद्दल आहे की काय लेख... पण वाढत्या प्रतिसादामुळे उत्सुकतेने उघडला, आणि पूर्ण वाचला Happy मजा आली, अजून त्या फेजमध्ये नसल्याने फार चिंता नाही करत Proud

मस्तच लेख. नेहमी प्रमाणे. मी एकदा मिडलस्कूल मध्ये लेक असताना प्ले डो चे बारा डब्बे विकत घेउन आम्ही दोघींनी मिळून ड्राइन्ग पेपर वर आख्ही डायजेस्टिव सिस्टिम बन्वली होती. तेच ते आतडे जठर वगैरे.

आता ग्रॅजुएशन मध्ये फिल्म बनवायची आहे त्याच्या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट तिने स्टारबक्स मध्ये बसून लिहीला. व मी रात्री ऐकून घेतला. आडून आडून हे कसे वाटेल ते कसे वाटेल अश्या सूचना केल्या. पण ते उगीचच. बजेटिंग पासून शूट पोस्ट प्रॉड. सर्व फिल्म तिची तीच बनवणार.

एस आर्डी म्हटले तसे असले आगगाड्या कारा, मी पण उगीचच बनवायचे. स्पेस क्राफ्ट ज्ञानेश्वर पादुकां ची पालखी, रेड लेबल चहाच्या डब्यात
डिस्को, क्यामेरा, असले भरप्पूर बनवले आहे लहान पणी. परवाच एक टाकून दिलेले तोरण उचलून आणले व त्याचे मणी सोडवून त्यातून पाच सहा माळा बनवल्या. मग त्याला मॅचिन्ग कुडते आण्ले!!!! मज्जानु लाइफ.

जबरदस्त झालाय लेख. वाक्या-वाक्यावर हसून हसून पुरेवाट झाली. '(या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत.)' - या वाक्यात शीर्षकातला सगळा वैताग सामावला आहे. खत्तरनाक!

कसलं लिहिलंय! कसलं लिहिलंय. भारी!!
शब्द शब्द रीलेट झालाय.

<<<<<या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत>>>>
<<<< 5 मिनिट क्राफ्ट व्हिडीओ बघून आपण केलेल्या वस्तू त्या व्हिडीओ मधल्या सारख्याच बनतील' ही 'सरकार बदलेल आणि सगळं काही मस्त होईल' याच्या खालोखाल जगात पसरलेली मोठी अंधश्रद्धा आहे. >>>>
<<<<<रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत >>>>>
<<<<<लहान कलाकार घरी नाहीत हे दुर्मिळ क्षण एकांतात एकमेकांबरोबर न घालवता सुतळ्या आणि सुऱ्या आणि फेव्हीकोल बरोबर घालवल्याबद्दल मनात 2 उसासे सोडले जातात.>>>>
हे पंच भारीच आवडलेत. Happy

मस्त लिहिल आहे .
been there , done there Happy

मी "लेकालाच करू दे काय ते , जस होईल तसं होईल " , या मताची .
पण एरवी कुठल्या कामात फारसा रस न दाखवणारे 'स्वतः' या प्रोजेक्टस बाबतीत फारच passionate होतातं .
आमचे यावेळेचे 31st december आणि 1january , एका पुठ्ह्याच्या किल्ल्यापायी धारातिर्थी पडले .
जणूकाही खुद्द महाराजांनी यांच्यावर किल्ला बनवायची कामगिरी सोपवली होती . Uhoh

पण कधीकधी मज्जा येत.. "आमच्या वेळी असं काही नव्हतं " , म्हणूनच त्यावेळीची हस्तकलेची हौस आता भागवून घेतोय असं वाटतं

भारी लिहिलंय Lol

साधना, संन्यास घेऊन हिमालयात जायची वेळ आलीच तर दोघी मिळून जाऊ. Wink

बघा बरं.हिमालयात तुमच्या लँडलोर्ड च्या मुलांच्या शाळेत 'बर्फ़ाच्या चुऱ्याचा हंस बनवून पाठवा' वगैरे मागितले असेल तर तिथेही काम करावे लागेल ☺️☺️☺️☺️

{{{ कहर म्हणजे, दुसर्‍या दिवशी शाळेच्या व्हॉट्स अप ग्रुप वर पालक मंडळी आपापल्या पाल्याने तयार केलेल्या कलाकृतींचे सुंदर सुंदर फोटो पाठवून आपण काहीकाही कामाचे नाही याची जाणीव करुन देत असतात }}}

मग असे पालक मायबोलीवर लेख लिहिणार्‍यांपैकी किंवा प्रतिसाद देणार्‍यांपैकी नाहीत का?

Pages