हस्तव्यवसाय: एक दहशतीचे साम्राज्य

Submitted by mi_anu on 21 January, 2019 - 05:36

मुलांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असतात.आपल्या मनात 'ते नवं पार्लर कसं आहे बघून येऊया' किंवा 'अमक्या पोराच्या बड्डे पार्टीला पोराला सोडून मस्त मॉल मध्ये (मुलाच्या)बापाबरोबर फिरुया' असे विचार घोळत असतात.बापांच्या मनात 'चला ऑफिसातून घरी लवकर येऊन मस्त मॅच बघू' इ. विचार घोळत असतात.इतक्यात शाळेतून ती नोटीस येते आणि नियती खदखदून हसते!

"कचऱ्यातून कलानिर्मिती.तुमच्या मुलांबरोबर दळणवळणाची साधने आणि शहर या विषयावर हस्तव्यवसाय म्हणून एक 3डी मॉडेल बनवून परवाच्या उद्या सकाळी शाळेत पाठवा.रोल नंबर 1 ते 15 ने हवेतील दळणवळण,16 ते 30 ने पाण्यातील दळणवळण आणि 30 पासून पुढच्यानी रस्त्यावरील दळणवळण बनवून आणावे.सूचना: मॉडेल चालते असले पाहिजे."

आणि पालकांच्या स्वप्नांचे फुलपाखरू होऊन जमिनीवर लोळायला लागते.मूल '5 मिनिट क्राफ्ट' चे फेसबुक व्हिडीओ दाखवून दर क्षणाला आपल्या कल्पना मिग विमान,राफाल, बोईंग 737,अंतराळयान,पेगासस घोड्याचा उडता रथ या रेंज मध्ये झपाट्याने बदलत असते.'5 मिनिट क्राफ्ट व्हिडीओ बघून आपण केलेल्या वस्तू त्या व्हिडीओ मधल्या सारख्याच बनतील' ही 'सरकार बदलेल आणि सगळं काही मस्त होईल' याच्या खालोखाल जगात पसरलेली मोठी अंधश्रद्धा आहे. मुलाला 5 मिनिट क्राफ्ट च्या गुलाबी आकाशातून जमिनीवर आणेपर्यंत आपल्या मावसजावेच्या नणंदेच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचे बारसे दूरगावी आहे आणि त्याला आपल्याला उद्या एका दिवसात जाऊन यायचे आहे असा शोध लागतो.म्हणजे राहिला 1 दिवस.1 दिवसात कचऱ्यातून कला बनवायला चांगला न चेपलेला,न मळलेला स्वच्छ कचरा घरात हवा.

आजूबाजूच्या दुकानांवर आजूबाजूच्या सोसायटीतल्या पालकांची धाड पडते.आपण 'सुरणाचे फायटर प्लेन','मक्याचे जेट विमान' वगैरे अकल्पनिय विचार करत असताना मूल अचानक 'आई माझ्या ग्रुप ला रोल नंबर प्रमाणे रोडवेज ट्रान्सपोर्ट आहे' जाहीर करतं आणि अमूल ताक किंवा फ्रुटी च्या खोक्यांची आगगाडी बनवण्याचा प्लॅन जाहीर करतं.आपण 'त्यात काय मोठं' म्हणून 2 अमूल ताक,2 फ्रुटी आणि प्रोटीन म्हणून उलट्या उभ्या जॉन अब्राहम ची जाहिरात असलेलं सोफिट सोया मिल्क खरेदी करतो.नियती इथे पण खदखदून हसत असते.(या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत.)

बारश्याला जात असताना मन भूतकाळात जातं.आपण गृहकृत्यदक्ष वगैरे नसताना प्रि स्कुल होमवर्क म्हणून बटनांचं कासव, लोकरीच्या अनेक रंगाच्या तुकड्याचा कागदावर ससा,पेन्सिल शेव्हीन्ग चं घुबड,भेंडीचे ठसे काढून फुलांचा गुच्छ,कापसाचा पांढरा हत्ती(शाळा वाल्यांची समयसूचकता..त्या वर्षी फी वाढवल्याने तसेही ते पालकांसाठी पांढरा हत्तीच झालेले असतात.),बांगड्यांचं बदक, रिबन ची राजकन्या असे अनेक गड सर केलेले असतात.घराबाहेरच्या व्हरायटी वाल्या कडून त्याच्या कडची सगळ्या रंग आणि साईझ ची सगळी बटणं विकत घेऊन नंतर दुकानात बटणं घ्यायला आलेल्या पालकांचा पोपट करणे,चालू वर्षाचे फुलांचे कॅलेंडर फाडून कागदावर निसर्ग बनवणे,नवऱ्याच्या घड्याळाच्या खोक्यातून बुडाचे पांढरे सॅटिन उचकटून कागदावर त्याचा राणीचा फ्रॉक बनवणे, ऑफिसात केक कापल्यास त्या खालची चंदेरी कागद चिकटवलेले वर्तुळ साबणाने धुवून घरी आणून त्यावर मंडल डिझाइन काढणे वगैरे कला कौशल्ये पालकांच्या अंगी येत जातात.

शाळेच्या पालकांच्या व्हॉटसप ग्रुप वर सर्वांचे हताश उदगार चालूच असतात.अगदी 'सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट देते' म्हणून शाळा बदलण्यापर्यंत टोकाला जाऊन होते.तितक्यात तमक्या आय सी एस ई बोर्ड च्या शाळेत 7 वी च्या मुलांना प्रोजेक्ट म्हणून एक अंकी इंग्लिश संगीत नाटक लिहायला आणि ऍक्ट करायला सांगितले हे ऐकून 'नाय नाय, सी बी एस ई कित्ती छान, मुलांना किती मस्त काय काय करायला सांगतात' वर गाडी येते.

इथे पमीच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचं बारसं आवरून आपण घरी उशिरा येतो.दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि सकाळ पासून घरात आगगाडीचे वारे वाहायला लागतात.फ्रुटीच्या टेट्रा पॅक मध्ये थेंबभर राहिलेले फ्रुटी जिभेने चाटणे, मग मांडीवर पॅक झटकून पॅन्ट ला फ्रुटीचे डाग पाडणे वगैरे प्रकार करून होतात.एकदाचे डबे रिकामे करून त्याला चार्ट पेपर चिकटवून होतात.आता खिडक्या.खिडक्या करायला टूल बॉक्स मधले कटर घ्यावे तर ते आपणच ऑफिसात 'दिलशेपड इकोफ्रेंडली कंदील' स्पर्धेला नेलेलं असतं आणि ते टीम मधल्या चमन च्या मित्राने कुरियर चं पार्सल कापायला नेलेलं असतं.

मग सुरीने कॅन च्या खिडक्या भोसकणे चालू होते.'कचऱ्यातून कला' आपल्या 'सुट्टीचा कचरा' करणार आहे हा अंदाज आता आलेला असतो.'2 तासात पूर्ण करून उरलेल्या वेळात आराम' चे 'रात्री झोपेपर्यंत संपले पाहीजे' होत असते.जेरीस येऊन आगगाडी ची कार बनवून विषय संपवून टाकावा किंवा फक्त इंजिन बनवून 'बाकी गाडी पुढच्या स्टेशनला आहे' सांगणे असे पर्याय मनात येतात.पण आता छोट्या कलाकारांना आगगाडी चढलेली असते.खिडक्या बनवून डबे जमिनीवर ठेवल्यावर 'डबे चाकावर असतात' या शाश्वत सत्याची अनुभूती होऊन पांढरी झाकणे शोधली जातात.घरातल्या चिंच सॉस,शेझवान सॉस च्या बाटल्या उघड्या बोडक्या डोक्याने फिरायला लागतात.गाडीला 16 चाकं लागणार आणि आपल्याकडे कशी बशी 12 झाकणं आहेत असा शोध लागतो.मग मोठ्या डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी अमूल ताक होते ते) 4 चाकं आणि लहान डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी फ्रुटी होते ते) 2 चाकं लावायची ठरतात.'टेबलावरचं करकटक आण'म्हटल्यावर लहान कलाकार रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत बसतात.मग 'कंपास आण' सांगावं तर प्लास्टिक चा फक्त पेन्सिली असलेला कंपास आणून दिला जातो.शेवटी उठून कर्कटक घेऊन आल्यावर चाकांची हिंसा करणे चालू होते.

चाकांना भोसकताना हिरोला वाचवायला पुढे आलेल्या साईड हिरोईन सारखा सोफा मध्ये येणे वगैरे माफक गोंधळ होऊन सर्व चाकांना भोकं पाडून होतात.चाकात लाकडी बार्बेक्यू स्टिक खुपसून व्हील शाफ्ट बनतो.चाक आणि व्हीलशाफ्ट च्या जोडावर वर केक च्या आयसिंग सारखं बदाबदा फेव्हीकोल ओतून सगळी चाकं वाळायला ठेवली जातात.आपण चाकं नसलेली बुलेट ट्रेन बनवायला हवी होती ही पश्चातबुद्धी होते.

चाकं लावून झाल्यावर ज्या गरीब डब्याना दोनच चाकं मिळालीत ते टपकन एका बाजूला तिरके होतायत असा शोध लागतो.मग त्या डब्याला खालून अजून जखमा करून त्यात दोन लाकडी बार्बेक्यू स्टिक चे तुकडे आधाराला घालून डबे उभे होतात.(इथे आपण रेल्वे च्या कारखान्यात इंजिनिअर नसल्याबद्दल नवरा ईश्वराचे आभार मानतो.)

या सगळ्या दैवी लीला करताना सामान्य मनुष्य बनून जेवण बनवणे, जेवणे,लहान कलाकार नाचाच्या क्लास ला सोडणे,पडदे धुणे,कपडे इस्त्री ला देणे अशी भूतलावरची सामान्य कामं पण करावी लागतात.आता पेप्सी चा टिन जांभळे इंजिन बनतो आणि आपल्याला 'इंजिनाला पण चाकं लागतात' असा शोध लागतो.सुदैवाने शेजाऱ्यांनी जपून ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कामी येतात आणि निदान इंजिनाला तरी चार चाकं मिळण्याचं सौभाग्य लाभतं.

आता डबे एकमेकांना जोडणे.परत एकदा डब्यांच्या बाजू भसाभस भोसकल्या जातात.दिवार च्या अमिताभ ला गोळी मारण्याच्या जागेवर 786 चा बिल्ला असावा तसं या बाजूना टेट्रा पॅक बंद करताना एकावर एक आलेले 4 थर असतात.त्यामुळे डब्याचे कपलिंग बनवणे हे एक बिकट काम होऊन बसते.शेवटी भोक पाडून,त्यात सुतळी ओवून,सुतळी खिडकीतून बाहेर काढून त्याला बबल रॅप चा तुकडा बांधून सुतळी पक्की केली जाते.लहान कलाकार घरी नाहीत हे दुर्मिळ क्षण एकांतात एकमेकांबरोबर न घालवता सुतळ्या आणि सुऱ्या आणि फेव्हीकोल बरोबर घालवल्याबद्दल मनात 2 उसासे सोडले जातात.

"मी आगगाडी बनवली.आता रूळ तू बनव" म्हणून विश्वामित्र स्टाईल 'इदं न मम' करून झोपायला जावे तर बाहेरून हाका ऐकू येतात.दोन्ही इंजिनियरानी आगगाडी च्या निम्म्या लांबीचा लोहमार्ग बनवलेला असतो.शेवटी 'लोहमार्ग वळवून वळवून' गाडी पुठ्ठ्यावर माववून चिकटपट्टयांनी चिकटवली जाते.तितक्यात दोन चाकं प्राण सोडतात.इथे ग्रुप वर अग्नीबाणापासून ते विराट नौकेपर्यंत भारी भारी मॉडेल चे फोटो येत असतात.मुलाचे क्राफ्ट हा आता पालकांच्या इभ्रतीचा प्रश्न झालेला असतो.मुलीच्या आईने,मावशीने भरतकाम विणकाम केलेली रेडिओ कव्हर बनवून मुलगी बघायला आलेल्याला 'आमच्या सुलुने बनवलंय हो सगळं' सांगावं तसं सगळे निरनिराळे कलेचे नमुने साजरे करत असतात.शेवटी 'पुढच्या वेळी गुगल करून सोपी वस्तू निवडायची आणि सगळी स्वतः बनवायची' म्हणून लहान कलाकाराला दम दिला जातो.आणि सकाळी एकदाचं पारिजातकाच्या फुलासारखं जपत ती आगगाडी शाळेच्या बसमध्ये चढते.

परत येताना 6वी 7 वी च्या मुलांचे पालक भेटतात त्यांना 'तुमची मुलं सगळं स्वतः करत असतील ना प्रोजेक्ट' असं विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक हताश हास्य येतं ज्यात अनुभवी पालकांना 'डोंबल!घंटा!!सगळं स्वतः म्हणे!!' असे उद्गार ऐकू येतात.

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?
- अनुराधा कुलकर्णी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी हहपुवा लिहील आहे..

शिर्षकावरून लेखात काय असेल ह्याचा पत्ता लागत नाही.
लेख वाचल्यान्नतर कळत शिर्षकाच गाम्भीर्य Proud

फोटो नाही का?>>> मीही हेच विचारणार होते, फोटो द्याच
एव्हढ महत्प्रयासाने बनवलेल प्रोडक्ट बघायच आहे

या मायबोलीवराचे शंभरावे चाहते व्हायचे ठरवले आहे आणि आता ते स्टेशन फार दूर नाही.

काही आइटीकरांच्या फसलेल्या पिकनिकबद्दल विनोदी धागा असणार म्हणून वाचायला गेलो तर भलताच विस्तववादी धागा निघाला!

भारी आहे.

खरंच वेळ नै झाला.स्टॉपवर लक्षात आलं.
फेसबुकवर सगळ्या वर्गाच्या प्रोजेक्ट चे फोटो आले तर त्यातून काढून टाकेन.

देवा....

'आमच्या वेळेला असली फॅडे नव्हती हो......' हे वाक्य स्वतःला दहा वेळा ऐकवून परत परत आनंदाचा प्रत्यय घेतेय.... हे सगळे सुरू व्हायच्या आधीच माझ्या आयुष्यातून मुलांचे शाळा प्रकरण संपले याचा प्रचंड आनंद होतोय..

(आता हे फॅड नातवंडरूपाने गळ्यात पडले नाही म्हणजे गंगेत घोडे न्हाले, तशी धुसरशी शक्यता जरी दिसली तरी मी संन्यास घेऊन हिमालय गाठीन).

मी असल्या गाड्या हौस म्हणून बनवायचो ते आठवले, शाळेसाठी नव्हते.
पण यावर एक खरेखुरे हस्तवयवसाय मार्गदर्शन सदर मायबोलीवर असायला हवे.

>>>आता हे फॅड नातवंडरूपाने गळ्यात पडले नाही म्हणजे गंगेत घोडे न्हाले, ~~~>>

छ्या! ते उरकेपर्यंत आजीआजी. मग "आजी, तू हल्ली हिमालयात जात नाहीस का?"

तुफान !!

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?>>>>>> +१२३४५६७९१०

हसुन हसुन पुरेवाट! Lol
रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत बसतात. Lol Lol
ते नियतीचे दात पाडायचं मनावर घ्याच तुम्ही.

खूप भारी लिहिलेय हे सांगायचे राहिलेच...

शीर्षक वाचून पॉकेटमारांबद्दल आहे की काय असे वाटले होते. पण खालचा लेख वाचल्यावर ह्यापेक्षा पॉकेटमारी सहन करण्याजोगी आहे असे वाटले Happy Happy

आवडले Happy
मध्ये मध्ये अगदी अगदी..होत होते

आपण म्हणतो.मुलं त्याला काहीच म्हणत नाहीत.त्याला कंपास म्हटलं तर त्यांना कळत नाही.
मोठ्या वर्गात जाऊन भूमिती चालू झाल्यावर टीचर लोक्स योग्य शब्द सांगतील ☺️☺️

ऐन सोमवारी तुमचे लिखाण वाचावयास मिळाले, आता आठवडा चांगला जाईल Happy
बा द वे, भर मन्डेला धागा उघडलात, भारी अहात Happy Happy

भारी!
आमची मुलं अजून असले होमवर्क मिळण्याच्या वयाला पोचली नाहीयेत. पण, नवऱ्याच्या ऑफिसातल्या कलीगने एक किस्सा सांगितला. तिच्या सोसायटीत राहणाऱ्या, ओळखीच्या एका बाईने ( किंवा असं म्हणू की सातवी-आठवीतल्या मुलीच्या आईने Wink ) पहाटे साडेचारला हिच्या आधी इंटरकॉमची, मग मोबाईलची आणि शेवटी दाराची बेल वाजवली.. कशाला, तर मुलीच्या कुठल्याशा प्रोजेक्टसाठी सेलोटेप हवीये!!! संपली म्हणे ऐनवेळी!!

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?
सुंदर आडीया...
७८६, नुस्त इंजिन.... काय काय ... कसं सुचलं हो...
खूप सुंदर Happy

भारीच! सुंदर. वास्तव लिहिलंय.

आम्ही मुलांच्या क्राफ्टमध्ये स्वत:चा सहभाग केवळ २०% ठेवतो. दहा पंधरा मिनिटात होण्यासारखे असेल तरच पूर्ण क्राफ्ट करुन देतो. मी कधीच क्राफ्ट करुन देत नसल्याने मुलाला स्वतःहुन स्वतःचे क्राफ्ट वेळेवारी पूर्ण करायची शिस्त लागली (कारण सुरुवातीला बरेचदा विनाक्राफ्ट शाळेत जावे लागले त्याला -आपले म्हणजे तत्त्व म्हणजे तत्त्व) . तरी बायको म्हणतेच की इतर सगळ्या मैत्रिणी म्हणतात 'तुझं काय, तुझा नवरा तर आर्टीस्टच आहे, सोपं असेल तुम्हाला क्राफ्ट करणे' बायको बिचारी कसनुसं हसते.

सगळ्यात भंगार क्राफ्ट माझ्याच मुलाचे असतात वर्गात. पण मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. Wink

जबरा लिहिलय! Lol एकेक शब्द रीलेट झाला.
आम्च लेकरु थोडस अलिकडच्या काळात जन्मल्यामुळे इथवर छळ झाला नाही. थोडफार जे केल ते उसन्या उत्साहाने रात्ररात्र जागुन करुन... सकाळी शाळेपर्यन्त मोडता पोहचवायचे दिव्य पार करत कृतकृत्य होत,चुरचुरत्या डोळ्यानी दिवसभर ऑफीस अटेन्ड केलेल आठवतय.
पण आजच्या काळातल्या मायबापांना खरोखर दंडवत! ___/\___

दिवाळीच्या / ख्रिसमस हॉलीडे आरामात घालवल्यावर... दाटुन दडपुन हॉलीडे होमवर्क करुन मनाचे समाधान झालेले पालक आणि त्याचवेळी चार्ट पेपर वर अमुक अमुक बनवुन आणायला सान्गितले होते असे आदल्या रात्री ९ वाजता आठवणारी आम्च्या भावाची 'रत्ने' आणि मग त्या मायबापांचे केविलवाणे झालेले चेहरे, धावपळ, जागरण हे नजरेसमोर घडलेले पाहिले की कीव येते खरच.

मस्त Lol
अगदी अगदी झालं वाचतांना..
कर्कटकला अजूनही कर्कटकच म्हणतात काय? >>> पालक म्हणतात. पोरांना कळत नाही पण मग नक्की कोणते उपकरण ते.

धमाल लिहिलंय !
या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत>>> या आणि असल्या वाक्या वाक्यांतून सात्विक संताप नुसता डोकावतच नाही तर डोकावता डोकावता धापकन पडतोय.. Biggrin
कहर म्हणजे, दुसर्‍या दिवशी शाळेच्या व्हॉट्स अप ग्रुप वर पालक मंडळी आपापल्या पाल्याने तयार केलेल्या कलाकृतींचे सुंदर सुंदर फोटो पाठवून आपण काहीकाही कामाचे नाही याची जाणीव करुन देत असतात Happy

Pages