दाढीपुराण

Submitted by राजीव मासरूळकर on 20 January, 2019 - 12:11

दररोज दाढी खरवडणं हे जगातलं सर्वांत कंटाळवाणं काम असावं, नाही? निरस अगदी. दाढी वाढवावी म्हटलं, तर ती अर्धीअधिक पांढरीफटक झालेली. खरं वय दाखवायची हिंमत नाही. बरं आपण कमी वयात म्हातारं वगैरे झालेलो अाहोत असं दाखवायला आपण कुणी सेलीब्रिटी वगैरे थोडंच आहोत? आपण सकाळसकाळी आरशासमोर उभे राहून दाढीवर वाढलेली काळीपांढरी काटेरी खुंटं घाईघाईत ओरबाडून काढून पाण्यात स्वाहा केले तरी दुस-या दिवशी सकाळी घनघोर युद्धात कापून पाण्यात फेकलेल्या शत्रुसैन्याच्या डेडबॉडीज फुगून पाण्यातून वर याव्यात तशी ही काळीपांढरी खुंटं दाढीवर दत्त म्हणून उभी राहिलेली दिसतात. बरं त्यावर कडी म्हणजे हा कडक हिवाळा! कडाक्याच्या थंडीत दाढीला थंडगार पाण्याचे असे काही ठाके बसतात की काय सांगावं! अशा बिकट स्थितीत बिनपाण्याची कशी करणार? सोलून काढावी लागते ती जणुकाही. बरं सोलूनमध्ये... म्हणजे ते आपलं सलून म्हणायचंय हो मला. सलूनमध्ये जावं तर दाढी कटिंग कमी अन् शायनिंगच जास्त. कैच्या-वस्तरे कमी अन् आरसेच अधिक. कैच्याकैच. चारचौघात आणखीनच आपलं पितळ (कि चांदी) उघडं करून घ्यायचं काम. सलुनवाल्याला कंटाळा येत नसंल का राव सगळ्यांची भादरायचा ? हां पण पैसा भेटतो, म्हणून खुशीत असणार तो कायम. टपरीसमोरून जाताना कसा गोड हसतो दररोज रामराम घालून आपल्याला. त्याच्याकडे गेलं की भारी गंमत येते पण. नंबर जास्त असले की फुकटात पेपर वाचून होतो तो होतोच, पण सगळ्या गावाच्या खबरा लागतात त्या वेगळ्याच. सलुनवाला अगदी चवीनं स्टो-या सांगत असतो एकेकाच्या. सरपंचानं काय केलं, पोलिसपाटलानं कुणाची हजामत... सॉरी... जमानत घेतली, कोणाचं कोणासोबत लफडं आहे, कोणाचं कोणत्या गावातल्या कोणत्या पोरीसोबत लग्न जुळलं, काल कोणाची कशी भादरली.... एक ना अनेक! सरपंचापासून पंतप्रधानापर्यंतचं राजकारण अन् गुर्जीपासून पीयेसायपर्यंतच अर्थकारण बसल्याबसल्या समजायचं ठिकाण म्हणजे सलून. कहर म्हणजे झेडपीच्या सीईओच्या केबिनमध्येही नसेल अशी दिमाखदार खुर्ची असते सलूनमध्ये बसायला. एका बाजूनॆ मंजुळ एफएम तर दुस-या बाजूने भसाडा सलूनवाला. (आता भसाडा वगैरे खाजगीत म्हणणं ठीकच. प्रत्यक्षात त्याच्यासमोर असं काही म्हणण्याची आपली काय बिशाद? त्याच्या गळ्यात अन् आपल्या गळ्यात फक्त एका वस्त-याचंच तर अंतर असतं. नाहीतर खरं बोलायला आपण घाबरतो थोडंच? ) पण काहींच्या हाताला मख्खन असते मख्खन! बिलकुल त्रास होऊ देत नाहीत बिचारे. गरम पाणी, मुलायम ब्रश आणि खुशबूदार क्रिम. दाढीवर ब्रश असा काही बेमालुम सफाईदारपणे फिरवतात की त्यानं ते संपवूच नये अस वाटत राहतं. तो दाढीवर ब्रश फिरवून फेस करू लागला की आपण मस्त डोळे मिटून निवांत एफेम ऐकत बसायचं. आपले गालफडं बसलेले असतील तर तो मोठा फेस करून गालावरचा खड्डा फेसानं भरून काढण्याचा चाळा करत राहतो आणि आपण ते पाहत सुखावत राहतो. नाहीतर घरी आपलं ते नेहमीचंच... लाव पाणी अन् कर कालच्यावानी! बरं हे सगळं सुरू असताना किती आस्थेवाईकपणे विचारपूस करतो तो आपली! आपल्या चारदोन व्यवसायबंधुंच्या ओळखीपाळखी अन् लफडे हे ओघानं येतंच पुन्हा. दाढीवर , गळ्यावर म्हस असला तर विचारतो, कधीपासून आहे? मोठा कसा झाला... वगैरे आणि तो नष्ट करायचा असेल तर कापून चुना लावायचा जालिम इलाजही फुकटात सांगून टाकतो. म्हसाजवळ चर्र्कन वाजलं कि आपण विचारतो, कटलाक्काय? तर तो म्हणतो, आसाकसा कटू दिन मी? आपला दाढी ओरबाडून घेण्याचा प्रत्येक दिवस कटू दिनच असतो हे त्याला कुठे माहित असतं !
असो. पण घरी स्वत:च स्वत:ची हजामत करून घेण्यासारखं कंटाळवाणं काम दुसरं नाहीच.
एकंदरीत काय तर आपणही सलुनवालेच तर आहोत. दररोज आपलीच करत असतो बिनपाण्यानं. तसंही एक बायको वगळली तर आपल्याला आपल्याइतकं जवळून फक्त सलूनवालाच तर पाहत असतो!

~ राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Use group defaults