आम्ही आतूूर झालेलो आहोत...

Submitted by राजीव मासरूळकर on 17 January, 2019 - 11:53

हे विश्वनिर्मात्या,
वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या
उंच शिखरावर पोहोचून
वैयक्तिक स्वातंत्र्याचा असीम श्वास घेत
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संज्ञाप्रवाह रक्तात मिसळून
ताशी हजारो प्रकाशवर्षे वेगाने वाहत
निघालो आहोत आम्ही
आमच्या जन्मस्थळाकडे...
होत चाललो आहोत आदिम...
हा असुरी वेग
आवेगाने
करतोय नामशेष
आम्ही स्वाभिमानाने उत्क्रांत केलेली
यच्चयावत आदमखोर संस्कृती
तिच्या धार्मिक परिप्रेक्ष्यांसह...
आणि मला दिसतंय लख्खपणे
की
या भूतलावर लवकरच
होईल प्रचंड तंत्रोद्भव तांडव
आदिम इच्छापुर्तीसाठी...
आणि जगू लागतील मुक्तपणे
स्वानंदी नर आणि नारी
कृत्रिम बुद्धिमत्तेला वश झालेले देहच उरतील फक्त
कुणीच असणार नाही बाप, भाऊ,मुलगा,काका, मामा,
आई, बहिण,मुलगी, वगैरे वगैरे....
सगळीकडे नांदेल
फक्त स्वातंत्र्य आणि समता....!

हे सगळं खरंच
तूच योजून ठेवलं आहेस का?
तुझं हे अनादिअनंत वर्तुळ
आम्ही भेदूच शकणार नाहीयोत का....?

★★★

हे तंत्रज्ञानोपयोजित सजीवसृष्टीयुक्त
पंचमहाभूतविभुषित निर्जीव गोलाकार ग्रहा,
तुला आम्ही स्वातंत्र्य बहाल करीत आहोत...
आजपासून तू
आमच्या धर्मवेत्त्या ज्ञानसूर्यांच्या गुरूत्वाकर्षणातून
मुक्त आहेस...
आता तू राहिलेला नाहिस
आमची धरणीमाता वगैरे
चंद्रही आमचा मामा
आणि
सूर्यही आमचा देव वगैरे लागत नाही
कारण आम्ही
नात्यागोत्यांच्या,
नीतिअनितीच्या पार पलिकडे निघालो आहोत
तू ही
खुशाल
तुला आवडेल तिकडे जा...
ऐश कर!

अवकाशातील हजारो कृत्रिम उपग्रहांवरून
आणि गल्लोगल्ली, घरोघरी बसवलेल्या
सीसीटीव्ही कॅमे-यांतून
तुझे सम/विषमलिंगी संभोग
कैद करण्यासाठी
आम्ही आतूर झालेलो आहोत......

~ © राजीव मासरूळकर
सावंगी, औरंगाबाद
दि.21/11/2018

Group content visibility: 
Public - accessible to all site users