जीवनसत्वे लेखमाला : भाग ४
( भाग ३ : https://www.maayboli.com/node/68623)
*******************************
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला. तो आधुनिक वैद्यकातील एक मूलभूत आणि महत्वाचा शोध असल्याने त्याच्या संशोधकाला त्याबद्दल नोबेल परितोषिक बहाल केले गेले.
या लेखात आपण ‘क’ चा शोध, त्याचे आहारातील स्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाचे परिणाम यांची माहिती घेऊ. शेवटी नवीन संशोधन, समज-गैरसमज आणि काही वादग्रस्त मुद्द्यांचा आढावा घेईन.
आहारातील स्त्रोत:
Citrus गटातील फळे म्हणजेच आवळा, लिंबू, संत्रे इ. याचे मुख्य स्त्रोत. त्यापैकी आवळा हा सर्वोत्तम म्हणता येईल. पण लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते. पेरू हे सुद्धा ‘क’ ने समृद्ध आणि बहुतेकांचे आवडते फळ. या फळांतून ‘क’ व्यवस्थित मिळण्यासाठी ती ताज्या व कच्च्या स्वरूपात खाल्ली पाहिजेत. 'क' हे उष्णतेने लगेच नाश पावते. म्हणून शिजवलेल्या अन्नातून ते मिळणार नाही. आपला भात,वरण, तूप, मीठ व लिंबू हा पारंपरिक आहार परिपूर्ण आहे. फक्त त्यात लिंबू पिळताना पानातील भात व वरण हे कोमट झालेले असावेत. लिंबाचे लोणचे हा प्रकार त्यातील ‘क’ छान टिकवून ठेवतो.
‘क’ च्या शोधाचा इतिहास:
आपल्याला ‘क’ मिळण्यासाठी ताज्या फळांचे सेवन किती महत्वाचे आहे हे आपण जाणतो. १-२ शतकांपूर्वी सैनिकांना जहाजातून दीर्घ युद्धमोहिमांवर पाठवले जाई. तेव्हा आहारातील फळांच्या अभावाने ते सर्व खूप आजारी पडत. तेव्हा या समूह-आजाराला “Sailor’s scurvy” असे म्हटले गेले. पुढे संशोधनातून ‘क’च्या गोळ्या तयार झाल्या आणि त्या नौसैनिकांना मोहीमेवर नियमित द्याव्यात असा विचार पुढे आला. नेपोलियन व नेल्सनचे प्रसिद्ध युद्ध झाले त्यात नेल्सनच्या सैनिकांना ‘क’ नियमित दिलेले होते तर नेपोलियनच्या नाही. त्यामुळे नेल्सनने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यात त्याच्या डावपेचांच्या बरोबरीने ‘क’ चा वाटाही महत्वाचा होता !
त्यानंतर ‘क’ च्या गोळ्या अशा मोहिमांवरील सैनिकांना नियमित दिल्या जाण्याची पद्धत पडली.
शरीरातील कार्य:
१. ‘क’ चे सर्वात महत्वाचे कार्य हे शरीर-सांगाड्याच्या बळकटी संबंधी आहे. ही बळकटी Collagen या प्रथिनामुळे येते. हे प्रथिन शरीरात सर्वत्र आहे पण मुख्यतः ते हाडे व रक्तवाहिन्यांमध्ये असते. ‘क’ त्याला बळकट करते.
२. आहारातील लोहाचे व्यवस्थित शोषण होण्यातही ‘क’ची भूमिका महत्वाची आहे. विशेषतः शाकाहारातील लोहाच्या शोषणात ती अधिक महत्वाची आहे.
३. त्याचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते antioxidant आहे. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘क’ आणि त्याच्या जोडीने ‘इ’ व ’अ’ या जीवनसत्वांचे योगदान मोलाचे आहे.
४. आपली सर्वसाधारण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे.
अभावाने होणारा आजार(Scurvy) :
आहारात ताजी फळे व भाज्यांचे सेवन नियमित असल्यास सहसा ‘क’ चा अभाव होत नाही. हा भाग एकट्या रहाणाऱ्या व्यक्ती, वसतीगृहातील मुले इ. च्या बाबतीत दुर्लक्षिला जातो. अशा कमतरतेतून होणाऱ्या अभावाला ‘bachelor’s scurvy’ असे म्हणतात.
या व्यतिरिक्त कुपोषण वा आतड्यांचा दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्ती ,गरोदर स्त्रिया आणि फक्त गाईच्या दुधावर पोसलेली तान्ही बालके यांत हा अभाव होण्याची शक्यता जास्त असते.
अभावाचे परिणाम असे असतात:

१. हिरड्यांचा दाह होणे, सुजणे वा त्यातून रक्तस्त्राव होणे
२. त्वचेखाली व अन्यत्रही रक्तस्त्राव होणे
३. जखमा लवकर न भरणे
४. सांधेदुखी
५. अशक्तपणा व थकवा.
औषधरूपातील ‘क’ आणि आजार प्रतिबंध :
‘क’ हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते औषधरुपात जरी गरजेपेक्षा जास्त घेतले तरी बिघडत नाही. शरीराला गरज नसलेला जास्तीचा भाग लघवीतून बाहेर पडतो. त्याच्या या गुणधर्माचा गैरफायदा वैद्यकात बऱ्याचदा घेतला गेला आहे. आयुष्यात अनेक दीर्घकालीन कटकटीचे आजार आपल्याला सतावतात. त्यांच्यावर उपचार म्हणून विविध उपचारपद्धतींची औषधे आपण घेतो. तरीसुद्धा बऱ्याचदा रुग्णाचे पुरेसे समाधान होत नाही. तो कमीअधिक प्रमाणात पिडलेलाच असतो. मग अशा आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून ‘क’ चा वापर केला जातो. त्याला फारसा शास्रीय पाया नसतो. पण, ‘क’चा एखादा गुणधर्म त्या आजारात “उपयोगी पडू शकेल” अशा आशेने ते मोठ्या डोसमध्ये दिले जाते. कधी आजार-प्रतिबंध म्हणून तर कधी ‘रामभरोसे’ उपचार म्हणून. त्यातूनच पुढे समाजात त्याबद्दलचे गैरसमज पसरतात. मग त्याचा उठसूठ गैरवापर होऊ लागतो.
आता अशा आजारांची यादी बघूया:
१. सर्दी-पडसे
२. कर्करोग
३. हृदयविकार
४. मोतीबिंदू व दृष्टीपटलाचे काही आजार
५. उच्च रक्तदाब .
यातील सर्दी वगळता बाकीच्या यादीकडे पाहिल्यास वाचकांच्या भुवया लगेचच उंचावतील ! तेव्हा त्यातील दोन आजारांचे वास्तव समजून घेऊ.
१. सर्दी : वरवर ‘साधा’ दिसणारा पण रुग्णास अगदी सतावणारा हा आजार. ऋतुबदलातील सर्दी तर बहुतेक सर्वांना होणारी. त्यावर नक्की उपाय काय हा अगदी पेचात टाकणारा प्रश्न. ‘क’ आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो.
२. कर्करोग : हा तर गंभीर आजार. त्याचे विविध उपचारही अंगावर काटा आणणारे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर संशोधनाचे लक्ष्य केंद्रित होणे स्वाभाविक आहे. गेल्या शतकापासून अनेकांनी त्यासाठी ‘क’ चा वापर करून पाहिला आहे. अलीकडे या रोगाच्या केमोथेरपी बरोबर ‘क’ चे पूरक उपचार करण्याचेही प्रयोग झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष अद्याप तरी दखलपात्र नाहीत.
वरच्या यादीतील अन्य आजारांबाबतही यासंदर्भात कोणतेही ठाम विधान करता येत नाही. अनेक उलटसुलट दावे आणि अपुरे संशोधन यामुळे ‘क’ आणि गंभीर आजारांचा प्रतिबंध हा विषय सध्या वादग्रस्त आहे.
......
तर असे हे Ascorbic acid उर्फ ‘क’. स्वतः ‘तब्बेतीने’ नाजूक आहे खरे, पण आपल्याला कसे बळकट करून जाते !
*********************************************
चित्रे जालावरुन साभार
@ साद,
@ साद,
‘क’ मिळण्यासाठी आवळा, लिंबू सर्वांनीच जरूर खावे. संधीवाताच्या रुग्णांना आधुनिक वैद्यकानुसार त्याची बंदी नाही. पण आयुर्वेदानुसार असू शकेल. माझा त्याबद्दल अभ्यास नाही.
.....
@ सोनाली,
ताज्या कच्च्या आवळ्यातून जेवढे क मिळेल तेवढे शिजवलेल्या आवळ्यातून नाही मिळणार. जर आवळ्याचे पदार्थ करताना तो उकळून शिजवला तर त्यातले बरेच क बाजूच्या पाण्यात उतरते. आता जर ते पाणी फेकून दिले तर ते क वाया जाते. त्यामुळे असे पदार्थ तयार करण्याची पद्धत महत्वाची ठरते.
सारांश: ताजी फळेच उत्तम.
हा लेख सुद्धा नेहमीप्रमाणे
हा लेख सुद्धा नेहमीप्रमाणे छान आहे.
मी रोज सकाळी ACV प्यायचे, पण त्याचे बरेच साईड इफेक्ट्स वाचल्यावर आता आवळा ज्यूस (आगळ) प्यायला सुरुवात केली आहे. आगळ, सरबतापेक्षा वेगळं म्हणजे किंचित salted असतं, sweet अजिबात नसतं. तर हे आगळ बनवताना आवळा शिजवलेला असतो की कच्चाच ज्यूस काढतात? शिजवलेला असेल तर हे पण बंद करून सरळ लिंबू पाणी प्यायला सुरुवात करणार.
मीरा, धन्यवाद.ACV म्हणजे काय?
मीरा, धन्यवाद.
ACV म्हणजे काय?
सरळ लिंबू पाणी प्यायला सुरुवात करणार.>>>> हे सर्वात उत्तम.
अप्पल सायदर व्हिनेगर
अप्पल सायदर व्हिनेगर
चर्प्स, थँक्स
चर्प्स, थँक्स
डॉक्टर, ACV = Apple Cider Vinegar
नेटवर याचे बरेच बेनेफिट्स लिहिलेले दिसतील, पण याचे साईड इफेक्ट्सही आहेत. मी मेटबॉलिजम सुधारण्यासाठी रोज सकाळी घेत होते, पण मग थांबवलं कारण मला वजन कमी करण्याची आवश्यकता नाही. पण फायदा अगदी खात्रीशीर होतो याची उदाहरण आहेत. आता मी फक्त external use, म्हणजे केस, स्कीन यासाठी वापरते. रिसल्ट्स दिसताहेत.
च्रप्स व मीरा, धन्यवाद.
च्रप्स व मीरा, धन्यवाद.
बरोबर. जालावर वाचून ACV घेणारे अनेक जण आहेत. मागे मला 'गाऊट'च्या धाग्यावरही त्याच्या उपयुक्तते बद्दल शंका विचारली गेली होती.
अशा पेयांचे हजारो रुग्णांवर शास्त्रीय प्रयोग झालेले नसतात. त्यामुळे त्यावर वैद्यकीय मत देता येत नाही.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
पुढचे जीवनसत्व (इ) इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68717
सगळे भाग वाचतोय...
सगळे भाग वाचतोय...
खुप उपयुक्त.... धन्यवाद ....
दत्तात्रय साळुंके,
दत्तात्रय साळुंके,
तुम्ही एका दमात या मालेचे सर्व भाग वाचून आस्थेने प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनापासून आभार !
फक्त गाईच्या दुधावर पोसलेली
फक्त गाईच्या दुधावर पोसलेली तान्ही बालके यांत हा अभाव होण्याची शक्यता जास्त असते.>> जर आई कोणत्यातरी कारणाने स्तनपान करवू शकत नसेल तर मग फक्त गाईचं दुध हाच पर्याय उरतो ना?? मग अशा वेळी "क" चा अभाव होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील?? तान्ह्या (तीन महिन्यांच्या आतील) बालकांना असा कोणता आहार देता येऊ शकतो??
की तीन महिन्यानंतर "क" युक्त आहार दिल्याने हा अभाव आणि त्याचे दुष्परिणाम नष्ट होऊ शकतात.??
अशा वेळी "क" चा अभाव होऊ नये
अशा वेळी "क" चा अभाव होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील?? >>>>
महत्वाच्या जीवनसत्वानी युक्त असे औषधी थेंब मिळतात. ते बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने देता येतील. योग्य काळाने बाळाला आहारातून ते देता येईल.
Thank you doctor.
Thank you doctor.
अॅसिडिटीचा त्रास असणार्याना
अॅसिडिटीचा त्रास असणार्याना लिंबाचा त्रास जास्त होईल ना /का ?
बरोबर आहे, होईल. आंबट ढेकर
बरोबर आहे, होईल. आंबट ढेकर येऊ शकतील. त्यांनी ते सरबत पिण्याऐवजी भाजी/ कोशिम्बिरीत पिळावे. पेरू सारख्या फळांवर भर द्यावा. तसेच ते उपाशी पोटी घेऊ नये.
हाडांचे त्रास असणार्या
हाडांचे त्रास असणार्या लोकांनी रोज लिंबूपाणी किंवा नुसते लिंबू आहारात घेऊ नये असे म्हटले जाते.यात कितपत तथ्य आहे डॉक्टर?
देवकी, आधुनिक वैद्यकानुसार
देवकी, आधुनिक वैद्यकानुसार असे काही नाही. लिंबातले क हाडांना उपयुक्तच आहे.
आयुर्वेदानुसार तसे पथ्य असावे; माझा त्यात अभ्यास नाही.
धन्यवाद डॉक्टर!
धन्यवाद डॉक्टर!
तुमचे लेख मी वाचतो. उत्कृष्ट
तुमचे लेख मी वाचतो. उत्कृष्ट आणि उपयोगी माहिती. धन्यवाद.
मला एकदा क जीवनसत्वाचा खूपच फायदा झाला होता, त्याबद्दल....
एकदा सकाळी उठल्यावर अंगात ताप. पलंगावरून उतरताच येईना. प्रचंड सांधेदुखी. ताप दोन दिवसात गेला.पण सांधेदुखी तशीच. नुसता वैताग आला होता. जालावर शोधताना ही लक्षणे Ross river fever (चिकनगुण्याचा धाकटा भाऊ) सारखी वाटली. तिथेच यावर क जीवनसत्वाच्या गोळ्या उपयोगी पडू शकतील असे वाचले. आणि मी स्वतःच त्या चालू केल्या. जादू झाल्यासारखी सांधेदुखी थांबली. गोळी बंद केल्यावर परत चालू.
तीन चार महिन्यांनी acidity चा त्रास व्हायला लागला म्हणून बंद केली. पण तोवर सांधेदुखी थांबली होती.
त्यावेळेस जनहितार्थ मायबोलीवर या माहितीचा लेख ही लिहीला होता.
विक्रमसिंह, धन्यवाद.
विक्रमसिंह, धन्यवाद.
तुमचा अनुभव रोचक आहे. लेखाचा दुवा देता का? वाचायला आवडेल.
कुमार जी. मला तो लेख सापडत
कुमार जी. मला तो लेख सापडत नाहीये. शोधून सांगतो.
तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या
तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखात खालील उल्लेख आहे
औषधरूपातील ‘क’ आणि मोतीबिंदू प्रतिबंध
>>>
या संदर्भातील काही नवीन संशोधनाची भर घालतो. मोतीबिंदू होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे वाढत्या वयानुसार होणारा. यात डोळ्याच्या भिंगातील दीर्घकालीन ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया सुरू होते असे मानतात.
क जीवनसत्वाला ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंद करता येईल का आणि त्यामुळे मोतीबिंदू १० वर्षांनी पुढे ढकलला जाईल का हा उत्सुकतेचा विषय आहे.परंतु अलीकडील संशोधनानुसार असा निष्कर्ष निघालेला नाही.
मोतीबिंदू होण्याच्या अन्य एका कारणाबाबत आशादायक परिस्थिती आहे. दृष्टीदोषाच्या काही रुग्णांवर डोळ्यांची एक विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते (vitrectomy). त्याचा दुष्परिणाम म्हणून पुढे मोतीबिंदू होतो. अशा रुग्णांना जर शस्त्रक्रियेनंतर क जीवनसत्व औषध रूपात दिले तर दुष्परिणामामुळे होणारा मोतीबिंदू टाळता येईल असा काही अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7602486/
Pages