ग्रीन सिग्नल

Submitted by किल्ली on 13 January, 2019 - 02:14

एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती.
रोजचा परिचयाचा रस्ता असला तर आपण सराईतपणे गाडी चालवू शकतो. म्हणजे होतं असं की आता कुठलं वळण हा विचार करण्याची गरज नाही पडत. हात आपोआप गाडीचं हॅण्डल/स्टिअरिंग फिरवतात. कधी कधी असं होतं की आपलं मन कुठल्यातरी विचारात असतं आणि तरीही व्यवस्थितपणे गाडी चालवत आपण योग्य ठिकाणी जाऊन पोचतो. कमाल आहे न मानवी मेंदूची! अस म्हणतात की स्त्रीचा मेंदू मुळातच अनेक गोष्टी एकावेळी सहज प्रोसेस करू शकतो. अर्थात सर्वांना सरावाने ते जमत. पण उपजत स्त्रीयांची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. हे विविध विषयावरचे विचार म्हणजे रिळाला गुंडाळलेल्या दोर्याचप्रमाणे नसून नुसता गुंता असतो. त्याच्या गाठी उकलण हे कठीण होऊन बसत कधी कधी! तिचा गेली कित्येक वर्षे रोजचा जाण्यायेण्याचा हाच रस्ता असल्यामुळे मनात गाडी चालवताना अनियंत्रित विचार चालू होते.

“ या रस्त्यावर स्वतःच चिमुकलं जग सोबत घेऊन, मनात विविध विचारांची गर्दी घेऊन प्रत्येक जण धावत आहे. प्रत्येकाचं वाहन आपापल्या सोयीनुसार वेगवेगळं असलं तरी त्या सर्वांचा रस्ता मात्र एकच आहे. जणू सर्व विविधतेला एकत्र बांधू पाहत आहे हा रस्ता! पण तो तरी किती प्रयत्न करणार बापुडा! फारफार तर एखादा चौक किंवा वळण येईपर्यंत! तिथून लोकांच्या वाटा वेगळ्या होणारच आहेत. जीवनाचही ही असाच आहे, नाही का? आता मला जे सखे सोबती वाटत आहेत, माहिती नाही त्यांची साथ कधीपर्यंत असेल ते. एखाद शार्प वळण येईल आणि मी एकीकडे आणि माझे सो कॉल्ड सोबती एकीकडे होतील. ह्या जीवनात भेटलेले लोक म्हणजे महासागरात भेट झालेले लाकडी ओंडकेच असतात. समुद्र आणि वारा ठरवणार ह्यांनी हेलकावे घेत कुठवर जायच ते! ओडक्यांना कुठला आलाय मेंदू आणि बुदधी. आणि असली त्यांची क्षमता तरी त्यांचं ऐकतोय कोण? खरच कोणाचे नियंत्रण आहे ह्या सर्वावर. आपण फक्त कळसूत्री बाहुल्या आहोत ह्या आयुष्यरूपी रंगमच्यावरच्या!
इतक्यात एक कर्कश्य हॉर्न वाजला आणि तीची विचारधारा थांबली. एक दुचाकीवाला उलट्या बाजूने हॉर्न देत नियम तोडून भरधाव वेगाने निघून गेला.

हे अस नियम तोडण जमणार आहे का आपल्याला? उलट्या बाजूने गेला म्हणून लवकर पोचेल तो. पण हे चूक आहे. ही शॉर्टकट भोवली तर? मग केवढ्याला पडेल ते. कशाही गाड्यांना आपल्यावरून जाऊ देणार्याू रस्त्याची मात्र कमाल वाटते मला. रस्ता कुठलाही असला तरी एकात्मतेचं कर्तव्य निभावत वर्षानुवर्षे गाड्यांचे घाव झेलत तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यन्त पसरलेला असतो. भेदभाव त्याला माहित नाही. गाडीच्या आत भेदभाव असेल, पण रस्ता सर्वांना सारखीच वागणूक देतो. रस्त्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे सिग्नल! कितीही आलिशान महागडी कार असु देत वा प्रवाशांना कोंबून भरलेली सिटी बस किंवा एखादा नागमोडी वळणे घेत गाडी काढत पुढे पळण्याची धडपड करणारा दुचाकीस्वार, कोणीही असलं तरी सिग्नलला सर्वाना थांबावेच लागते. भर चौकातला तो सिग्नल जणू शिस्तीचे महत्व सूचित करतो. रोजच्या धबडग्यात सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणाऱ्यांना क्षणभर थांबवतो. “जरा विसावू ह्या वळणावर” असे तर सिग्नल सुचवित नसेल. क्षणभर सर्वांनी थांबून मग पुढे जावे हया नियमातून, कितीही गडबड असली तरी थोडीशी विश्रांती घेऊन पुढे जा, असे ममतेने तर हा सिग्नल संगत असेल का? अरेच्चा आलाच की हा सिग्नल.

शाब्बास, थोडंच अंतर राहिलं आता. ४ था milestone पार केलास तू!
तिने स्वतःच स्वतःला शाबासकी दिली. तिची ही पण एक सवय होती. तिने मुख्य चौकांना माईलस्टोन अशी नावं आणि क्रमांक दिले होते. ते पार झाले की तिला हायसं वाटत असे. आता थोडंच अंतर राहिलंय असं पुटपुटत तिने गाडीचा वेग वाढवला.
"ओह नो, लाल झाला सिग्नलचा दिवा!" असं म्हणून तिने गाडीचे ब्रेक दाबले. सिग्नलचा दिवा हिरवा होईपर्यंत आता थांबणे आले. पण ह्या क्षणी तिला लाल सिग्नल बरा वाटला. मघाशी सुचलेल्या विचाराला अनुसरून गाडीला आणि शरीराला तेव्हढीच विश्रांती मिळते अस तिला वाटलं. सिग्नलला गाड्या थांबल्या की कुतूहलाने कोणाला न कळू देता हळूच ती आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करू लागली.
आपापल्या विश्वात प्रत्येकजण मश्गुल होता. प्रत्येकाच्या पाठीवर एक अदृश्य जग असतं जणू! त्या जगात त्याचे परिचित, नातेवाईक, अगदी खास व्यक्ती , मित्रमैत्रिणी, सहकारी अशा वर्तुळांमध्ये लोकांची विभागणी केलेली असते. प्रत्येकासाठी एकच माणूस किती वेगळ्या भूमिकेत शिरून वागतो, नाही का? इथे तिला oop concepts मध्ये शिकलेला polymorphism आठवला. Same class performing different responsibilities, dynamic behavior हे सगळं प्रत्यक्षात map करून पाहत होती. उदाहरण बघायचं झालं तर, हे काका, सिग्नल वर थांबलेत. ह्या रस्त्यावर लोकासाठी ते एक सामान्य दुचाकीवाला असतील. पण ह्यांचं लक्ष घड्याळ्याच्या काट्यावर आहे. त्यांना घरी पोचून चिल्यापिल्याना भेटायचं असेल. म्हणूनच इतकी घाई चाललीये. एकदा पाहिलं होतं मी त्यांना त्यांच्या चिमुरडीबरोबर. कसल्या गप्पा चालू होत्या तिच्या. रममाण झाली होती अगदी.

अगं बाई, ही बया तर दिवा हिरवा व्हायच्या आत पळाली की पुढे! समोरून मोठी गाडी येतेय, जपून जा गं! पण मी म्हणते नियम मोडायचा कशाला? २ मिनिटांनी अशी कोणती मोठी रेस जिंकणार आहे काय माहिती.
हा टायमर का हळूहळू पडतोय पण. मोठा आहे वाटतं सिग्नल.

हा कोण मागून पुढे आला हिरो? अरे वा! बुलेट वाटतं. पण हे काय? ह्याने चक्क बुलेटच्या हॅण्डलच्या मधोमध फोन बसवण्याचं स्टॅन्ड लावलय की! मॅप बघत असेल. आजकालची पोरं खूपच स्मार्ट झालीत हे मात्र खरं हो! अरे नाही, हा मात्र आपल ते गप्पा मारायचं अँप बघतोय, ही काय मोबाईलमधल्या फुटकळ विनोदावर हसायची वेळ आणि जागा आहे का? एवढी काय गडबड आहे रिप्लाय देण्याची? समजा खड्ड्याच्या धक्क्याने त्या होल्डर मधला मोबाईल उडून पडला तर? जाऊ दे मला काय करायचंय. ज्याचा फोन आहे त्याला तर काहीच पर्वा नाहीये.
सुरक्षेचा विचार बासनात गुंडाळून ठेवलाय ह्या पोराने. सुरक्षेवरून आठवलं नुकतीच हेल्मेट सक्ती झालीये ना. पण हेल्मेट तर मोजून ५-६ जणांनी घातलंय. बाकीच्यांच्या कवटीवर अदृश्य कवच असेल. म्हणून बिनधास्त असतील. कुठल्या कुठे गेले विचार माझे. भरकटण्यात एक नंबर आहे मी. एवढा गोंधळ कसला! अग बाई दिवा हिरवा झाला वाटतं, पळायला हवं नाहीतर मागचे लोक तिसरं महायुद्ध आलाय आणि जीव वाचवायचा आहे अशा आकांताने हॉर्न वाजवत बसतील. असं म्हणून तिने accelerator पिळला.

पुढच्या चौकातला सिग्नल हिरवा होता. पण बहुतेक टायमर संपत आला होता. दुसर्याग बाजूच्या गाड्यांची घाई इतकी होती की त्यांचा दिवा अजून हिरवा नसतानाही त्या गाड्या सुटल्या होत्या. तिची बिचारीची धडक होता होता राहिली.

तेवढ्या वेळात तिची हृदयाची धडधड कैकपटींनी वाढली होती. थोडंसं पुढे जाऊन तिने गाडी बाजुला घेतली. स्टँडला लावली, पर्समधून पाण्याची बाटली काढून एक घोट पाणी प्यायली. आता जरा बरं वाटलं. पुन्हा हेल्मेट, स्कार्फ असा जामानिमा करून घराकडे निघाली. ५-१० मिनिटात पोचणं अपेक्षित होतं. तिच्या घराजवळच्या कॉलोनीत शिरल्यावर तिला जरा हायसं वाटलं. हा रत्स्याच्या कडेला मोठी मोठी झाडे असणारा रहिवासी भाग होता. तिला नेहमीच इथे आल्यावर शांत वाटायचं. विचारांची मालिका चालू झाली होतीच. तिला तिच्या मैत्रीणीने केलेलं इथल्या रस्त्याच वर्णन आठवत होतं. दिवसा खासकरून इथले रस्ते खूप सुंदर दिसायचे. झाडांची सावली रत्स्याला झाकून टाकायची. विविध फुले फुललेली असायची आणि जोराचा वारा आला की फुलांची बरसात व्हायची. गुलमोहोर, नीलमोहोर, बहावा अशा रंगीबेरंगी फुलांमुळे डोळयांना एकदम ताजंतवानं वाटायचं. रात्रीच्या वेळी हीच झाडे वेगवेगळे आकार धारण केलेल्या आकृत्यांप्रमाणे भासायची.
कमकुवत मनाची व्यक्ती असेल तर ही झाडं पाहून नक्कीच घाबरली असती कारण ह्या भागात दिवे नव्हते. गाडीच्या दिव्याच्या साहाय्याने ती रस्ता कापत होती. ओळखीचा रस्ता असल्यामुळे तिला फारसे प्रयास पडत नसत. आता ३-४ गल्ल्या ओलांडल्या की ती घरी पोचणार होती. इकडे ट्रॅफिक नसल्यामुळे ती बिनधास्त झाली होती. तिने गाडीचा वेग थोडासा वाढवला.

इतक्यात बाजूच्या गल्लीतून इंडिकेटर किंवा हॉर्न न देता एक कारवाला भरधाव वेगाने आला आला आणि .......
ज्यापासून मघाशी ती वाचली होती ते झालं ..
कारची तिच्या दुचाकीला धडक बसली आणि तिची गाडी घसरत थोड्या अंतरावर जाऊन थांबली. तिचे नियंत्रण केव्हाच सुटले होते. तिच्या सर्वात जास्त भरवसा असलेल्या रस्त्यावर एकीकडे हेल्मेट, एकीकडे पर्स अशा अवस्थेत जखमी होऊन ती पडली होती... कारवाला केव्हाच पळून गेला होता. अजूनही चालू असलेल्या तिच्या दुचाकिचा दिवा चालू बंद होत होता.
मोबाईलची रिंग वाजत होती पण उचलायला ती शुद्धीत कुठे होती!

----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! सुरेखच!!
अगदी सहज ओघवतं लिहिलय.

किल्लीतै छान जमलीय कथा.. अगदी सुंदर... खूप भारी लिहीलीयस हो. Happy

जणू सर्व विविधतेला एकत्र बांधू पाहत आहे हा रस्ता! पण तो तरी किती प्रयत्न करणार बापुडा! .........खरच कोणाचे नियंत्रण आहे ह्या सर्वावर. आपण फक्त कळसूत्री बाहुल्या आहोत ह्या आयुष्यरूपी रंगमच्यावरच्या! >> हे खूप छान शब्दांत मांडलंयस Happy

बांधले होते, तरी पडले.... हेल्मेट सुरक्षा म्हणून नाही तर compusion म्हणून घातले तर असा निष्काळजी पणा व्हायचाच..तुमचा मुद्दा बरोबर आहे.. mazya लक्षात आणून दिल्याबद्दल धन्स Happy

छान मांडालेस Happy

शेवटी मला वाटलं.... 'ती धडक झाल्यावर पडली ते..... तिचं बाजूला उभी राहून पहाते की काय!'

हा एक फ्लॅशबॅक Happy

खुप धन्यवाद विनिता.झक्कास Happy

'ती धडक झाल्यावर पडली ते..... तिचं बाजूला उभी राहून पहाते की काय!' हा एक फ्लॅशबॅक>> गुड आयडीया Happy

सत्यघटनेवर आधारित आहे कथा, त्यामुळे असा शेवट नाही केला Happy

हो, एकदम टकाटक आहे.. Happy
खर्‍या घटनेत दुचाकीने धडक दिली होती तिला,
हेल्मेट व्यवस्थित असल्यामुळे फार गम्भीर लागले नव्हते, खरचटले होते, चष्मा आदळून फुटला होता

मला त्या दुचाकीवाल्याची काळजी वाटतेय>>>>>
त्याची चूक होती, तो पळून गेला होता,
पण असही त्याची स्कूटी आणि माझी activa ( तेही जुनं मोडेल) होती, माझ काय नुकसान करणार तो!

काळजी घ्या>> २ वर्ष झाले ह्या गोष्टीला.. Proud
कथेत dramatization केलय मी, एरवी अशा पडण्याला कोणी विचारत नै ना Proud

धन्यवाद अज्ञातवासी Happy

खूपच छान ...अगदी सहज सुंदर रीतीने लिहिले किल्ली.. ट्रॅफिक नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत ..नाहीतर जे नियम पाळून गाडी चालवतात त्यांनाही भोगायला लागते थोड्या मूर्ख उतावळ्या लोकांमुळे..काळजी घ्या किल्ली.. Happy

>>> “जरा विसावू ह्या वळणावर” असे तर सिग्नल सुचवित नसेल?>>>.
मला हे आवडले Happy मलाही सवय आहे सिग्नलला थांबले की बाकी लोकांचे निरीक्षण करायची..किती तरी प्रकारचे लोक दिसतात आणि त्यावर आपण आपल्या मनात प्रतिक्रिया पण देत असतो नकळत...तेवढाच टाइमपास सिग्नल वर Happy

Pages